Shri guru charitra gurucharitra granth full श्री गुरू चरित्र गुरुचरित्र ग्रंथ

गुरूचरित्र – अध्याय पहिला

।। श्री गणेशाय नमः ।।

श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः ।
श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा ।
जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥

हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे ।
त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥

तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन ।
किंवा उदित प्रभारमण । तैसे तेज फाकतसे ॥३॥

विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश धरिलासी ।
नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥

चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका ।
प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्ने करूनिया ॥५॥

तुझे चिंतन जे करिती । तया विघ्ने न बाधती ।
सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥

सकळ मंगल कार्यासी । प्रथम वंदिजे तुम्हासी ।
चतुर्दश विद्यांसी । स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥

वेद शास्त्रे पुराणे । तुझेचि असेल बोलणे ।
ब्रह्मादिकि या कारणे । स्तविला असे सुरवरी ॥८॥

त्रिपुर साधन करावयासी । ईश्वरे अर्चिले तुम्हासी ।
संहारावया दैत्यांसी । पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥

हरिहर ब्रह्मादिक गणपती । कार्यारंभी तुज वंदिती ।
सकळाभीष्टे साधती । तुझेनि प्रसादे ॥१०॥

कृपानिधी गणनाथा । सुरवरादिका विघ्नहर्ता ।
विनायका अभयदाता । मतिप्रकाश करी मज ॥११॥

समस्त गणांचा नायक । तूचि विघ्नांचा अंतक ।
तूते वंदिती जे लोक । कार्य साधे तयांचे ॥१२॥

सकळ कार्या आधारू । तूचि कृपेचा सागरू ।
करुणानिधि गौरीकुमरू । मतिप्रकाश करी मज ॥१३॥

माझे मनींची वासना । तुवा पुरवावी गजानना ।
साष्टांग करितो नमना । विद्या देई मज आता ॥१४॥

नेणता होतो मतिहीन । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
चौदा विद्यांचे निधान । शरणागतवरप्रदा ॥१५॥

माझिया अंतःकरणीचे व्हावे । गुरुचरित्र कथन करावे ।
पूर्णदृष्टीने पहावे । ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥

आता वंदू ब्रह्मकुमारी । जिचे नाम वागीश्वरी ।
पुस्तक वीना जिचे करी । हंसवाहिनी असे देखा ॥१७॥

म्हणोनि नमतो तुझे चरणी । प्रसन्न व्हावे मज स्वामिणी ।
राहोनिया माझिये वाणी । ग्रंथी रिघू करी आता ॥१८॥

विद्या वेद शास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेशी ।
तिये वंदिता विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥१९॥

ऐक माझी विनंती । द्यावी आता अवलीला मती ।
विस्तार करावया गुरुचरित्री । मतिप्रकाश करी मज ॥२०॥

जय जय जगन्माते । तूचि विश्वी वाग्देवते ।
वेदशास्त्रे तुझी लिखिते । नांदविशी येणेपरी ॥२१॥

माते तुझिया वाग्बाणी । उत्पत्ति वेदशास्त्रपुराणी ।
वदता साही दर्शनी । त्यांते अशक्य परियेसा ॥२२॥

गुरूचे नामी तुझी स्थित । म्हणती नृसिंहसरस्वती ।
याकारणे मजवरी प्रीति । नाम आपुले म्हणूनी ॥२३॥

खांबसूत्रींची बाहुली जैसी । खेळती तया सूत्रासरसी ।
स्वतंत्रबुधि नाही त्यांसी । वर्तती आणिकाचेनि मते ॥२४॥

तैसे तुझेनि अनुमते । माझे जिव्हे प्रेरीमाते ।
कृपानिधि वाग्देवते । म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥

म्हणोनि नमिले तुझे चरण । व्हावे स्वामिणी प्रसन्न ।
द्यावे माते वरदान । ग्रंथी रिघू करवी आता ॥२६॥

आता वंदू त्रिमूर्तीसी । ब्रह्माविष्णुशिवांसी ।
विद्या मागे मी तयासी । अनुक्रमे करोनी ॥२७॥

चतुर्मुखे असती ज्यासी । कर्ता जो का सृष्टीसी ।
वेद झाले बोलते ज्यासी । त्याचे चरणी नमन माझे ॥२८॥

आता वंदू ह्रषीकेशी । जो नायक त्या विश्वासी ।
लक्ष्मीसहित अहर्निशी । क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥

चतुर्बाहु नरहरी । शंख चक्र गदा करी ।
पद्महस्त मुरारी । पद्मनाभ परियेसा ॥३०॥

पीतांबर असे कसियेला । वैजयंती माळा गळा ।
शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ॥३१॥

आता नमू शिवासी । धरिली गंगा मस्तकेसी ।
पंचवक्त्र दहा भुजेसी । अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥

पंचवदने असती ज्यासी । संहारी जो या सृष्टीसी ।
म्हणोनि बोलती स्मशानवासी । त्याचे चरणी नमन माझे ॥३३॥

व्याघ्रांबर पांघरून । सर्वांगी असे सर्पवेष्टण ।
ऐसा शंभु उमारमण । त्याचे चरणी नमन माझे ॥३४॥

नमन समस्त सुरवरा । सिद्धसाध्यां अवधारा ।
गंधर्वयक्षकिन्नरा । ऋषीश्वरा नमन माझे ॥३५॥

वंदू आता कविकुळासी । पराशरादि व्यासांसी ।
वाल्मीकादि सकळिकांसी । नमन माझे परियेसा ॥३६॥

नेणे कवित्व असे कैसे । म्हणोनि तुम्हा विनवितसे ।
ज्ञान द्यावे जी भरवसे । आपुला दास म्हणोनि ॥३७॥

न कळे ग्रंथप्रकार । नेणे शास्त्रांचा विचार ।
भाषा नये महाराष्ट्र । म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥

समस्त तुम्ही कृपा करणे । माझिया वचना साह्य होणे ।
शब्दब्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥

ऐसे सकळिका विनवोनि । मग ध्याइले पूर्वज मनी ।
उभयपक्ष जनकजननी । माहात्म्य पुण्यपुरुषांचे ॥४०॥

आपस्तंबशाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि ।
साखरे नाम ख्यातिशी । सायंदेवापासाव ॥४१॥

त्यापासूनि नागनाथ । देवराव तयाचा सुत ।
सदा श्रीसद्‍गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥

नमन करिता जनकचरणी । मातापूर्वज ध्यातो मनी ।
जो का पूर्वज नामधारणी । आश्वलायन शाखेचा ॥४३॥

काश्यपाचे गोत्री । चौंडेश्वरी नामधारी ।
वागे जैसा जन्हु अवधारी । अथवा जनक गंगेचा ॥४४॥

त्याची कन्या माझी जननी । निश्चये जैशी भवानी ।
चंपा नामे पुण्यखाणी । स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥

नमिता जनकजननीसी । नंतर नमू श्रीगुरुसी ।
घाली मति प्रकाशी । गुरुचरण स्मरावया ॥४६॥

गंगाधराचे कुशी । जन्म झाला परियेसी ।
सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावे निरंतर ॥४७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । करी संतांसी नमस्कार ।
श्रोतया विनवी वारंवार । क्षमा करणे बाळकासी ॥४८॥

वेदाभ्यासी संन्यासी । यती योगेश्वर तापसी ।
सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥४९॥

विनवितसे समस्तांसी । अल्पमती आपणासी ।
माझे बोबडे बोलांसी । सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥

तावन्मात्र माझी मति । नेणे काव्यव्युतपत्ति ।
जैसे श्रीगुरु निरोपिती । तेणे परी सांगत ॥५१॥

पूर्वापार आमुचे वंशी । गुरु प्रसन्न अहर्निशी ।
निरोप देती माते परियेसी । चरित्र आपुले विस्तारावया ॥५२॥

म्हणे ग्रंथ कथन करी । अमृतघट स्वीकारी ।
तुझे वंशी परंपरी । लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥

गुरुवाक्य मज कामधेनु । मनी नाही अनुमानु ।
सिद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥

त्रैमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर ।
कवण जाणे याचा पार । चरित्र कवणा न वर्णवे ॥५५॥

चरित्र ऐसे श्रीगुरुचे । वर्णू न शके मी वाचे ।
आज्ञापन असे श्रीगुरुचे । म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥

ज्यास पुत्रपौत्री असे चाड । त्यासी कथा हे असे गोड ।
लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनी परियेसा ॥५७॥

ऐशी कथा जयाचे घरी । वाचिती नित्य प्रेमभरी ।
श्रियायुक्त निरंतरी । नांदती पुत्रकलत्रयुक्त ॥५८॥

रोग नाही तया भुवनी । सदा संतुष्ट गुरुकृपेकरोनि ।
निःसंदेह साता दिनी । ऐकता बंधन तुटे जाणा ॥५९॥

ऐसी पुण्यपावन कथा । सांगेन ऐक विस्तारता ।
सायासाविण होय साध्यता । सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥

निधान लाधे अप्रयासी । तरी कष्ट का सायासी ।
विश्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥

आम्हा साक्षी ऐसे घडले । म्हणोनि विनवितसे बळे ।
श्रीगुरुस्मरण असे भले । अनुभवा हो सकळिक ॥६२॥

तृप्ति झालियावरी ढेकर । देती जैसे जेवणार ।
गुरुमहिमेचा उद्गार । बोलतसे अनुभवोनि ॥६३॥

मी सामान्य म्हणोनि । उदास व्हाल माझे वचनी ।
मक्षिकेच्या मुखांतुनी । मधु केवी ग्राह्य होय ॥६४॥

जैसे शिंपल्यांत मुक्ताफळ । अथवा कर्पूर कर्दळ ।
विचारी पा अश्वत्थमूळ । कवणापासावउत्पत्ति ॥६५॥

ग्रंथ कराल उदास । वाकुड कृष्ण दिसे ऊस ।
अमृतवत निघे त्याचा रस । दृष्टि द्यावी तयावरी ॥६६॥

तैसे माझे बोलणे । ज्याची चाड गुरुस्मरणे ।
अंगिकार करणार शहाणे । अनुभविती एकचित्ते ॥६७॥

ब्रह्मरसाची गोडी । अनुभवितां फळें रोकडी ।
या बोलाची आवडी । ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥

गुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय महाज्ञानु ।
श्रोती करोनिया सावध मनु । एकचिते परियेसा ॥६९॥

श्रीगुरुनृसिंहसरस्वती । होते गाणगापुरी ख्याति ।
महिमा त्यांचा अत्यद्‍भुती । सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥

तया ग्रामी वसती गुरु । म्हणोनि महिमा असे थोरु ।
जाणती लोक चहू राष्ट्रु । समस्त जाती यात्रेसी ॥७१॥

तेथे राहोनि आराधिती । त्वरित होय फलप्राप्ति ।
पुत्र दारा धन संपत्ति । जे जे इच्छिले होय जना ॥७२॥

लाधोनिया संताने । नामे ठेविती नामकरणे ।
संतोषरूपे येऊन । पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥

ऐसे असता वर्तमानी । भक्त एक ’नामकरणी’ ।
कष्टतसे अति गहनी । सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥

ऐसा मनी व्याकुळित । चिंतेने वेष्टिला बहुत ।
गुरुदर्शना जाऊ म्हणत । निर्वाणमानसे निघाला ॥७५॥

अति निर्वाण अंतःकरणी । लय होवोनि गुरुचरणी ।
जातो शिष्यशिरोमणी । विसरोनिया क्षुधातृषा ॥७६॥

निर्धार करोनि मानसी । म्हणे पाहीन श्रीगुरुसी ।
अथवा सांडीन देहासी । जडस्वरूपे काय काज ॥७७॥

ज्याचे नामस्मरण करिता । दैन्यहानि होय त्वरिता ।
आपण तैसा नामांकिता । किंकर म्हणतसे ॥७८॥

दैव असे आपुले उणे । तरी का भजावे श्रीगुरुचरण ।
परिस लावता लोहा जाण । सुवर्ण केवी होतसे ॥७९॥

तैसे तुझे नाम परिसे । माझे ह्रदयी सदा वसे ।
माते कष्टी सायासे । ठेविता लाज कवणासी ॥८०॥

या बोलाचिया हेवा । मनी धरोनि पहावा ।
गुरुमूर्ती सदाशिवा । कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥

अतिव्याकुळ अंतःकरणी । निंदास्तुति आपुली वाणी ।
कष्टला भक्त नामकरणी । करिता होय परियेसा ॥८२॥

राग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे । आजि पाहुणे पंढरीचे रावे ।
वंदू विघ्नहरा भावे । नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥

गुरूची त्रैमूर्ति । म्हणती वेदश्रुति ।
सांगती दृष्टान्ती । कलियुगात ॥८४॥

कलियुगात ख्याति । श्रीनृसिहसरस्वती ।
भक्तांसी सारथी । कृपासिंधू ॥८५॥

कृपासिंधु भक्ता । वेद वाखाणिता।
त्रयमूर्ति गुरुनाथा । म्हणोनिया ॥८६॥

त्रयमूर्तीचे गुण । तू एक निधान ।
भक्तांसी रक्षण । दयानिधि ॥८७॥

दयानिधि यती । विनवितो मी श्रीपती ।
नेणे भावभक्ति । अंतःकरणी ॥८८॥

अंतःकरणी स्थिरु । नव्हे बा श्रीगुरु ।
तू कृपासागरु । पाव वेगी ॥८९॥

पाव वेगी आता । नरहरी अनंता ।
बाळालागी माता । केवी टाकी ॥९०॥

तू माता तू पिता । तूचि सखा भ्राता ।
तूचि कुळदेवता । परंपरी ॥९१॥

वंशपरंपरी । धरूनि निर्धारी ।
भजतो मी नरहरी । सरस्वतीसी ॥९२॥

सरस्वती नरहरी । दैन्य माझे हरी ।
म्हणूनि मी निरंतरी । सदा कष्टे व९३॥

सदा कष्ट चित्ता । का हो देशी आता ।
कृपासिंधु भक्ता । केवी होसी ॥९४॥

कृपासिंधु भक्ता । कृपाळू अनंता ।
त्रयमूर्ति जगन्नाथा । दयानिधी ॥९५॥

त्रयमूर्ति तू होसी । पाळिसी विश्वासी ।
समस्त देवांसी । तूचि दाता ॥९६॥

समस्ता देवांसी । तूचि दाता होसी ।
मागो मी कवणासी । तुजवांचोनी ॥९७॥

तुजवाचोनी आता । असे कवण दाता ।
विश्वासी पोषिता । सर्वज्ञ तू ॥९८॥

सर्वज्ञाची खूण । असे हे लक्षण ।
समस्तांचे जाणे । कवण ऐसा ॥९९॥

सर्वज्ञ म्हणोनि । वानिती पुराणी ।
माझे अंतःकरणी । न ये साक्षी ॥१००॥

कवण कैशापरी । असती भूमीवरी ।
जाणिजेचि तरी । सर्वज्ञ तो ॥१॥

बाळक तान्हये । नेणे बापमाये ।
कृपा केवी होय । मातापित्या ॥२॥

दिलियावांचोनि । न देववे म्हणोनि ।
असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥

समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे बळी ।
त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥

सुवर्णाची लंका । तुवा दिल्ही एका ।
तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥

अढळ ध्रुवासी । दिल्हे ह्रषीकेशी ।
त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥

निःक्षत्र करूनी । विप्राते मेदिनी ।
देता तुम्हा कोणी । काय दिल्हे ॥७॥

सृष्टीचा पोषक । तूचि देव एक ।
तूते मी मशक । काय देऊ ॥८॥

नाही तुम्हा जरी । श्रीमंत नरहरी ।
लक्ष्मी तुझे घरी । नांदतसे ॥९॥

याहोनी आम्हासी । तू काय मागसी ।
सांग ह्रषीकेशी । काय देऊ ॥११०॥

मातेचे वोसंगी । बैसोनिया बाळ वेगी ।
पसरी मुखसुरंगी । स्तनकांक्षेसी ॥११॥

बाळापासी माता । काय मागे ताता ।
ऐक श्रीगुरुनाथा । काय देऊ ॥१२॥

घेऊनिया देता । नाम नाही दाता ।
दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥

देऊ न शकसी । म्हणे मी मानसी ।
चौदाही भुवनासी । तूचि दाता ॥१४॥

तुझे मनी पाही । वसे आणिक काही ।
सेवा केली नाही । म्हणोनिया ॥१५॥

सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य ।
नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥

तळी बावी विहिरी । असती भूमीवरी ।
मेघ तो अंबरी । वर्षतसे ॥१७॥

मेघाची ही सेवा । न करिता स्वभावा ।
उदकपूर्ण सर्वा । केवी करी ॥१८॥

सेवा अपेक्षिता । बोल असे दाता ।
दयानिधि म्हणता । केवी साजे ॥१९॥

नेणे सेवा कैसी । स्थिर होय मानसी ।
माझे वंशोवंशी । तुझे दास ॥१२०॥

माझे पूर्वजवंशी । सेविले तुम्हांसी ।
संग्रह बहुवसी । तुझे चरणी ॥२१॥

बापाचे सेवेसी । पाळिती पुत्रासी ।
तेवी त्वा आम्हासी । प्रतिपाळावे ॥२२॥

माझे पूर्वधन । तुम्ही द्यावे ऋण ।
का बा नये करुणा । कृपासिंधु ॥२३॥

आमुचे आम्ही घेता । का बा नये चित्ता ।
मागेन मी सत्ता । घेईन आता ॥२४॥

आता मज जरी । न देसी नरहरी ।
जिंतोनि वेव्हारी । घेईन जाणा ॥२५॥

दिसतसे आता । कठिणता गुरुनाथा ।
दास मी अंकिता । सनातन ॥२६॥

आपुले समान । असेल कवण ।
तयासवे मन । कठिण कीजे ॥२७॥

कठीण कीजे हरी । तुवा दैत्यांवरी ।
प्रल्हाद कैवारी । सेवकांसी ॥२८॥

सेवका बाळकासी । करू नये ऐसी ।
कठिणता परियेसी । बरवे न दिसे ॥२९॥

माझिया अपराधी । धरोनिया बुद्धि ।
अंतःकरण क्रोधी । पहासी जरी ॥१३०॥

बाळक मातेसी । बोले निष्ठुरेसी ।
अज्ञाने मायेसी । मारी जरी ॥३१॥

माता त्या कुमारासी । कोप न धरी कैशी ।
आलिंगोनि हर्षी । संबोखी पा ॥३२॥

कवण्या अपराधेसी । न घालिसी आम्हासी ।
अहो ह्रषीकेशी । सांगा मज ॥३३॥

माता हो कोपासी । बोले बाळकासी ।
जावोनि पितयासी । सांगे बाळ ॥३४॥

माता कोपे जरी । एखादे अवसरी ।
पिता कृपा करी । संबोखूनि ॥३५॥

तू माता तू पिता । कोपसी गुरुनाथा ।
सांगो कवणा आता । क्षमा करी ॥३६॥

तूचि स्वामी ऐसा । जगी झाला ठसा ।
दास तुझा भलतैसा । प्रतिपाळावा ॥३७॥

अनाथरक्षक । म्हणती तुज लोक ।
मी तुझा बाळक । प्रतिपाळावे ॥३८॥

कृपाळु म्हणोनि । वानिती पुराणी ।
माझे बोल कानी । न घालिसीच ॥३९॥

नायकसी गुरुराणा । माझे करुनावचना ।
काय दुश्चितपणा । तुझा असे ॥४०॥

माझे करुणावचन । न ऐकती तुझे कान ।
ऐकोनि पाषाण । विखुरतसे ॥४१॥

करुणा करी ऐसे । वानिती तुज पिसे ।
अजुनी तरी कैसे । कृपा न ये ॥४२॥

ऐसे नामांकित । विनविता त्वरित ।
कृपाळु श्रीगुरुनाथ । आले वेगी ॥४३॥

वत्सालागी धेनु । जैशी ये धावोनु ।
तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥४४॥

येतांचि गुरुमुनि । वंदी नामकरणी ।
मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥४५॥

केश तो मोकळी । झाडी चरणधुळी ।
आनंदाश्रुजळी । अंघ्रि क्षाळी ॥४६॥

ह्रदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त ।
पूजा उपचारित । षोडशविधि ॥४७॥

आनंदभरित । झाला नामांकित ।
ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥४८॥

भक्तांच्या ह्रदयांत । राहे श्रीगुरुनाथ।
संतोष बहुत । सरस्वतीसी ॥४९॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥

॥ ओवीसंख्या १४९ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


गुरूचरित्र – अध्याय दुसरा

।। श्री गणेशाय नमः ।।

त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा । कृष्णातिरी वास करोनि वोजा ।
सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ॥१॥

ऐसे श्रीगुरुचरण ध्यात । जातां विष्णुनामांकित ।
अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळी ॥२॥

क्षण एक निद्रिस्त । मनी श्रीगुरु चिंतित ।
कृपानिधि अनंत । दिसे स्वप्नी परियेसा ॥३॥

रूप दिसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मांकित ।
व्याघ्रचर्म परिधानित । पीतांबर कासे देखा ॥४॥

येऊनि योगीश्वर जवळी । भस्म लाविले कपाळी ।
आश्वासूनि तया वेळी । अभयकर देतसे ॥५॥

इतुके देखोनि सुषुप्तीत । चेतन झाला नामांकित ।
चारी दिशा अवलोकित । विस्मय करी तया वेळी ॥६॥

मूर्ति देखिली सुषुप्तीत । तेचि ध्यातसे मनात ।
पुढे निघाला मार्ग क्रमित । प्रत्यक्ष देखे तैसाचि ॥७॥

देखोनिया योगीशाते । करिता झाला दंडवते ।
कृपा भाकी करुणवक्त्रे । माता पिता तू म्हणतसे ॥८॥

जय जयाजी योगाधीशा । अज्ञानतमविनाशा ।
तू ज्योतिःप्रकाशा । कृपानिधि सिद्धमुनी ॥९॥

तुझे दर्शने निःशेष । गेले माझे दुरितदोष ।
तू तारक आम्हास । म्हणोनि आलासि स्वामिया ॥१०॥

कृपेने भक्तालागुनी । येणे झाले कोठोनि ।
तुमचे नाम कवण मुनि । कवणे स्थानी वास तुम्हा ॥११॥

सिद्ध म्हणे आपण योगी । हिंडो तीर्थ भूमीस्वर्गी ।
प्रसिद्ध आमुचा गुरु जनी । नृसिंहसरस्वती विख्यात ॥१२॥

त्यांचे स्थान गाणगापूर । अमरजासंगम भीमातीर ।
त्रयमूर्तीचा अवतार । श्रीनृसिंहसरस्वती ॥१३॥

भक्त तारावयालागी । अवतार त्रयमूर्ति जगी ।
सदा ध्याती अभ्यासयोगी । भवसागर तरावया ॥१४॥

ऐसा श्रीगुरु कृपासिंधु । भक्तजना सदा वरदु ।
अखिल सौख्य श्रियानंदु । देता होय शिष्यवर्गा ॥१५॥

त्याचे भक्ता कैचे दैन्य । अखंड लक्ष्मी परिपूर्ण ।
धनधान्यादि गोधन । अष्टैश्वर्ये नांदती ॥१६॥

ऐसे म्हणे सिद्ध मुनि । ऐकोनि विनवी नामकरणी ।
आम्ही असती सदा ध्यानी । तया श्रीगुरुयतीचे ॥१७॥

ऐशी कीर्ति ब्रीद ख्याति । सांगतसे सिद्ध यति ।
वंशोवंशी करितो भक्ति । कष्ट आम्हा केवी पाहे ॥१८॥

तू तारक आम्हांसी । म्हणोनि माते भेटलासी ।
संहार करोनि संशयासी । निरोपावे स्वामिया ॥१९॥

सिद्ध म्हणे तये वेळी । ऐक शिष्या स्तोममौळी ।
गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी । भक्तवत्सल परियेसा ॥२०॥

गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य दिसे कैचे त्यासी ।
समस्त देव त्याचे वंशी । कळिकाळासी जिंके नर ॥२१॥

ऐसी वस्तु पूजूनी । दैन्यवृत्ति सांगसी झणी ।
नसेल तुजे निश्चय मनी । म्हणोनि कष्ट भोगितोसी ॥२२॥

त्रयमूर्ति श्रीगुरु । म्हणोनि जाणिजे निर्धारू ।
देऊ शकेल अखिल वरू । एका भावे भजावे ॥२३॥

एखादे समयी श्रीहरि । अथवा कोपे त्रिपुरारि ।
रक्षील श्रीगुरु निर्धारी । आपुले भक्तजनांसी ॥२४॥

आपण कोपे एखाद्यासी । रक्षू न शके व्योमकेशी ।
अथवा विष्णु परियेसी । रक्षू न शके अवधारी ॥२५॥

ऐसे ऐकोनि नामकरणी । लागे सिद्धाचिया चरणी ।
विनवीतसे कर जोडुनी । भक्तिभावे करोनिया ॥२६॥

स्वामी ऐसा निरोप देती । संदेह होता माझे चित्ती ।
गुरु केवी झाले त्रिमूर्ति । ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥२७॥

आणीक तुम्ही निरोपिलेती । विष्णु रुद्र जरी कोपती ।
राखो शके गुरु निश्चिती । गुरु कोपलिया न रक्षी कोणी ॥२८॥

हा बोल असे कवणाचा । कवण शास्त्रपुराणींचा ।
संदेह फेडी गा मनाचा । जेणे मन दृढ होय ॥२९॥

येणेपरी नामकरणी । सिद्धांसी पुसे वंदोनि ।
कृपानिधि संतोषोनि । सांगतसे परियेसा ॥३०॥

सिद्ध म्हणे शिष्यासी ।
तुवा पुसिले आम्हांसी वेदवाक्य साक्षीसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥३१॥

वेद चारी उत्पन्न । झाले ब्रह्मयाचे मुखेकरून ।
त्यापासाव पुराण । अष्टादश विख्यात ॥३२॥

तया अष्टादशांत । ब्रह्मवाक्य असे ख्यात ।
पुराण ब्रह्मवैवर्त । प्रख्यात असे त्रिभुवनी ॥३३॥

नारायण विष्णुमूर्ति । व्यास झाला द्वापारांती ।
प्रकाश केला या क्षिती । ब्रह्मवाक्यविस्तारे ॥३४॥

तया व्यासापासुनी । ऐकिले समस्त ऋषिजनी ।
तेचि कथा विस्तारोनि । सांगेन ऐका एकचित्ती ॥३५॥

चतुर्मुख ब्रह्मयासी । कलियुग पुसे हर्षी ।
गुरुमहिमा विनवीतसे करद्वय जोडोनि । भावभक्ति करोनिया ॥३७॥

म्हणे सिद्धा योगीश्वरा । अज्ञानतिमिरभास्करा ।
तू तारक भवसागरा । भेटलासी कृपासिंधु ॥३८॥

ब्रह्मदेवे कलियुगासी । सांगितले केवी कार्यासी ।
आद्यंत विस्तारेसी । निरोपिजे स्वामिया ॥३९॥

ऐक शिष्या एकचित्ता । जधी प्रळय झाला होता ।
आदिमूति निश्चिता । होते वटपत्रशयनी ॥४०॥

अव्यक्तमूर्ति नारायण । होते वटपत्री शयन ।
बुद्धि संभवे चेतन । आणिक सृष्टि रचावया ॥४१॥

प्रपंच म्हणजे सृष्टिरचना । करणे म्हणोनि आले मना ।
जागृत होय या कारणा । आदिपुरुष तये वेळी ॥४२॥

जागृत होवोनि नारायण । बुद्धि संभवे चेतन ।
कमळ उपजवी नाभीहून । त्रैलोक्याचे रचनाघर ॥४३॥

तया कमळामधून । उदय झाला ब्रह्मा आपण ।
चारी दिशा पाहोन । चतुर्मुख झाला देखा ॥४४॥

म्हणे ब्रह्मा तये वेळी । समस्ताहुनी आपण बळी ।
मजहून आणिक बळी । कवण नाही म्हणतसे ॥४५॥

हासोनिया नारायणु । बोले वाचे शब्दवचनु ।
आपण असे महाविष्णु । भजा म्हणे तया वेळी ॥४६॥

देखोनिया श्रीविष्णुसी । नमस्कारी ब्रह्मा हर्षी ।
स्तुति केली बहुवसी । अनेक काळ परियेसा ॥४७॥

संतोषोनि नारायण । निरोप दिधला अतिगहन ।
सृष्टि रची गा म्हणून । आज्ञा दिधली तये वेळी ॥४८॥

ब्रह्मा म्हणे विष्णुसी । नेणे सृष्टि रचावयासी ।
देखिली नाही कैसी । केवी रचू म्हणतसे ॥४९॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । निरोपि त्यासी महाविष्णु आपण ।
वेद असती हे घे म्हणोन । देता झाला तये वेळी ॥५०॥

सृष्टि रचावयाचा विचार । असे वेदांत सविस्तार ।
तेणेचि परी रचुनी स्थिर । प्रकाश करी म्हणितले ॥५१॥

अनादि वेद असती जाण । असे सृष्टीचे लक्षण ।
जैसा आरसा असे खूण । सृष्टि रचावी तयापरी ॥५२॥

या वेदमार्गे सृष्टीसी । रची गा ब्रह्मया अहर्निशी ।
म्हणोनि सांगे ह्रषीकेशी । ब्रह्मा रची सृष्टिते ॥५३॥

सृजी प्रजा अनुक्रमे । विविध स्थावरजंगमे ।
स्वेदज अंडज नामे । जारज उद्‍भिजे उपजविले ॥५४॥

श्रीविष्णुचे निरोपाने । त्रिजग रचिले ब्रह्मयाने ।
ज्यापरी सृष्टिक्रमणे । व्यासे ऐसी कथियेली ॥५५॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । नारायण वेदव्यास ऋषि ।
विस्तार केला पुराणांसी । अष्टादश विख्यात ॥५६॥

तया अष्टादशांत । पुराण ब्रह्मवैवर्त ।
ऋषेश्वरासी सांगे सूत । तेचि परी सांगतसे ॥५७॥

सनकादिकांते उपजवोनि । ब्रह्मनिष्ठ निर्गुणी ।
मरीचादि ब्रह्म सगुणी । उपजवी ब्रह्मा तये वेळी ॥५८॥

तेथोनि देवदैत्यांसी । उपजवी ब्रह्मा परियेसी ।
सांगतो कथा विस्तारेसी । ऐक आता शिष्योत्तमा ॥५९॥

कृत त्रेता द्वापार युग । उपजवी मग कलियुग ।
एकेकाते निरोपी मग । भूमीवरी प्रवर्तावया ॥६०॥

बोलावूनि कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी ।
तुवा जावोनि भूमीसी । प्रकाश करी आपणाते ॥६१॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कृतयुग आले संतोषोन ।
सांगेन त्याचे लक्षण । ऐका श्रोते एकचित्ते ॥६२॥

असत्य नेणे कधी वाचे । वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे ।
यज्ञोपवीत आरंभण त्याचे । रुद्राक्षमाळा करी कंकणे ॥६३॥

येणे रूपे युग कृत । ब्रह्मयासी असे विनवित ।
माते तुम्ही निरोप देत । केवी जाऊ भूमीवरी ॥६४॥

भूमीवरी मनुष्य लोक । असत्य निंदा अपवादक ।
माते न साहवे ते ऐक । कवणे परी वर्तावे ॥६५॥

ऐकोनि सत्ययुगाचे वचन । निरोपीतो ब्रह्मा आपण ।
तुवा वर्तावे सत्त्वगुण । क्वचित्त्‌काळ येणेपरी ॥६६॥

न करी जड तूते जाण । आणिक युग पाठवीन ।
तुवा रहावे सावध होऊन । म्हणूनि पाठवी भूमीवरी ॥६७॥

वर्तता येणेपरी ऐका । झाली अवधि सत्याधिका ।
बोलावूनि त्रेतायुगा देखा । निरोपी ब्रह्मा परियेसा ॥६८॥

त्रेतायुगाचे लक्षण । ऐक शिष्या सांगेन ।
असे त्याची स्थूल तन । हाती असे यज्ञसामग्री ॥६९॥

त्रेतायुगाचे कारण । यज्ञ करिती सकळ जन ।
धर्मशास्त्रप्रवर्तन । कर्ममार्ग ब्राह्मणांसी ॥७०॥

हाती असे कुश समिधा ऐसे । धर्मप्रवर्तक सदा वसे ।
ऐसे युग गेले हर्षे । निरोप घेऊनि भूमिवरी ॥७१॥

बोलावूनि ब्रह्मा हर्षी । निरोप देत द्वापारासी ।
सांगेन तयाचे रूपासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥७२॥

खड्गे खट्वांग धरोनि हाती । धनुष्य बाण एके हाती ।
लक्षण उग्र असे शांति । निष्ठुर दया दोनी असे ॥७३॥

पुण्य पाप समान देखा । स्वरूपे द्वापार असे निका ।
निरोप घेऊनि कौतुका । आला आपण भूमीवरी ॥७४॥

त्याचे दिवस पुरल्यावरी । कलियुगाते पाचारी ।
जावे त्वरित भूमीवरी । म्हणोनि सांगे ब्रह्मा देखा ॥७५॥

ऐसे कलियुग देखा । सांगेन लक्षणे ऐका ।
ब्रह्मयाचे सन्मुखा । केवी गेले परियेसा ॥७६॥

विचारहीन अंतःकरण । पिशाचासारखे वदन ।
तोंड खालते करुन । ठायी ठायी पडतसे ॥७७॥

वृद्ध आपण विरागहीन । कलह द्वेष संगे घेऊन ।
वाम हाती धरोनि शिश्न । येत ब्रह्मयासन्मुख ॥७८॥

जिव्हा धरोनि उजवे हाती । नाचे केली अतिप्रीती ।
दोषोत्तरे करी स्तुति । पुण्यपापसंमिश्र ॥७९॥

हासे रडे वाकुल्या दावी । वाकुडे तोंड मुखी शिवी ।
ब्रह्मयापुढे उभा राही । काय निरोप म्हणोनिया ॥८०॥

देखोनि तयाचे लक्षण । ब्रह्मा हासे अतिगहन ।
पुसतसे अतिविनयाने । लिंग जिव्हा का धरिली ॥८१॥

कलियुग म्हणे ब्रह्मयासी । जिंकीन समस्त लोकांसी ।
लिंग जिव्हा रक्षणारांसी । हारी असे आपणाते ॥८२॥

याकारणे लिंग जिव्हा । धरोनि नाचे ब्रह्मदेवा ।
जेथे मी जाईन स्वभावा । आपण न भिये कवणाते ॥८३॥

ऐकोनि कलीचे वचन । निरोप देत ब्रह्मा आपण ।
भूमीवरी जाऊन । प्रकाश करी आपुले गुणे ॥८४॥

कलि म्हणे ब्रह्मयासी । मज पाठविता भूमीसी ।
आपुले गुण तुम्हांसी । सांगेन ऐका स्वामिया ॥८५॥

उच्छेद करीन धर्मासी । आपण असे निरंकुशी ।
निरानंद परियेसी । निंदा कलह माझेनी ॥८६॥

परद्रव्यहारक परस्त्रीरत । हे दोघे माझे भ्रात ।
प्रपंच मत्सर दंभक । प्राणसखे माझे असती ॥८७॥

बकासारिखे संन्यासी । तेचि माझे प्राण परियेसी ।
छळण करोनि उदरासी । मिळविती पोषणार्थ ॥८८॥

तेचि माझे सखे जाण । आणीक असतील पुण्यजन ।
तेचि माझे वैरी जाण । म्हणोनि विनवी ब्रह्मयासी ॥८९॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । सांगे तुज उपदेशी ।
कलियुगी आयुष्य नरासी । स्वल्प असे एक शत ॥९०॥

पूर्व युगांतरी देखा । आयुष्य बहु मनुष्यलोका ।
तप अनुष्ठान ऐका । करिती अनेक दिवसवरी ॥९१॥

मग होय तयांसी गती । आयुष्य असे अखंडिती ।
याकारणे क्षिती कष्टती । बहु दिवसपर्यंत ॥९२॥

तैसे नव्हेचि कलियुग जाण । स्वल्प आयुष्य मनुष्यपण ।
करिती तप अनुष्ठान । शीघ्र पावती परमार्था ॥९३॥

जे जन असती ब्रह्मज्ञानि । पुण्य करितील जाणोनि ।
त्यास तुवा साह्य होऊनि । वर्तत असे म्हणे ब्रह्मा ॥९४॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कली म्हणतसे नमोन ।
स्वामींनी निरोपिले जे जन । तेचि माझे वैरी असती ॥९५॥

ऐसे वैरी जेथे असती । केवी जाऊ तया क्षिती ।
ऐकता होय मज भीति । केवी पाहू तयासी ॥९६॥

पंचशत भूमंडळात । भरतखंडी पुण्य बहुत ।
मज मारितील देखत । कैसा जाऊ म्हणतसे ॥९७॥

ऐकोनि कलीचे वचन । ब्रह्मा निरोपी हासोन ।
काळात्म्याते मिळोन । तुवा जावे भूमीसी ॥९८॥

काळात्म्याचे ऐसे गुण । धर्मवासना करिल छेदन ।
पुण्यात्म्याचे अंतःकरण । उपजेल बुद्धि पापाविषयी ॥९९॥

कली म्हणे ब्रह्मयासी । वैरी माझे परियेसी ।
वसतात भूमंडळासी । सांगेन स्वामी ऐकावे ॥१००॥

उपद्रविती माते बहुत । कृपा न ये मज देखत ।
जे जन शिवहरी ध्यात । धर्मरत मनुष्य देखा ॥१॥

आणिक असती माझे वैरी । वास करिती गंगातीरी ।
आणिक वाराणशीपुरी । जाऊनि धर्म करिती देखा ॥२॥

तीर्थे हिंडती जे चरणे । आणिक ऐकती पुराणे ।
जे जन करिती सदा दाने । तेचि माझे वैरी जाण ॥३॥

ज्यांचे मनी वसे शांति । तेचि माझे वैरी ख्याति ।
अदांभिकपणे पुण्य करिती । त्यांसी देखता भीतसे ॥४॥

नासाग्री दृष्टि ठेवुनी । जप करिती अनुष्ठानी ।
त्यासि देखताचि नयनी । प्राण माझा जातसे ॥५॥

स्त्रियांपुत्रांवरी प्रीति । मायबापा अव्हेरिती ।
त्यावरी माझी बहु प्रीति । परम इष्ट माझे जाणा ॥६॥

वेदशास्त्रांते निंदिती । हरिहरांते भेद पाहती ।
अथवा शिव विष्णु दूषिती । ते परम आप्त माझे जाणा ॥७॥

जितेंद्रिय जे असती नर । सदा भजती हरिहर ।
रागद्वेषविवर्जित धीर । देखोनि मज भय ॥८॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । तुझा प्रकाश बहुवसी ।
तुवा जाताचि भूमीसी । तुझे इच्छे रहाटतील ॥९॥

एखादा विरळागत । होईल नर पुण्यवंत ।
त्याते तुवा साह्य होत । वर्तावे म्हणे ब्रह्मा ॥११०॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । कलियुग करीतसे नमन ।
करसंपुट जोडोन । विनवितसे परियेसा ॥११॥

माझ्या दुष्ट स्वभावासी । केवी साह्य व्हावे धर्मासी ।
सांगा स्वामी उपायासी । कवणेपरी रहाटावे ॥१२॥

कलीचे वचन ऐकोनि । ब्रह्मा हसे अतिगहनि ।
सांगतसे विस्तारोनि । उपाय कलीसी रहाटावया ॥१३॥

काळ वेळ असती दोनी । तुज साह्य होउनी ।
येत असती निर्गुणी । तेचि दाविती तुज मार्ग ॥१४॥

निर्मळ असती जे जन । तेचि तुझे वैरी जाण ।
मळमूत्रे जयासी वेष्टन । ते तुझे इष्ट परियेसी ॥१५॥

याचि कारणे पापपुण्यासी । विरोध असे परियेसी ।
जे अधिक पुण्यराशी । तेचि जिंकिती तुज ॥१६॥

या कारणे विरळागत । होतील नर पुण्यवंत ।
तेचि जिंकिती निश्चित । बहुतेक तुज वश्य होती ॥१७॥

एखादा विवेकी जाण । राहे तुझे उपद्रव साहोन ।
जे न साहती तुझे दारुण । तेचि होती वश्य तुज ॥१८॥

या कारणे कलियुगाभीतरी । जन्म होतील येणेपरी ।
जे जन तुझेचि परी । न होय त्या ईश्वरप्राप्ति ॥१९॥

ऐकोनि ब्रह्मदेवाचे वचन । कलियुग करितसे प्रश्न ।
कैसे साधूचे अंतःकरण । कवण असे निरोपावे ॥१२०॥

ब्रह्मा म्हणे तये वेळी । एकचित्ते ऐक कली ।
सांगेन ऐका श्रोते सकळी । सिद्ध म्हणे शिष्यासी ॥२१॥

धैर्य धरोनि अंतःकरण । शुद्ध बुद्ध वर्तती जन ।
दोष न लागती कधी जाण । लोभवर्जित नरांसी ॥२२॥

जे नर भजनी हरिहरांसी । अथवा असती काशीनिवासी ।
गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुझा न लगे दोष ॥२३॥

मातापिता सेवकासी । अथवा सेवी ब्राह्मणासी ।
गायत्री कपिला धेनूसी । भजणारांसी न लगे दोष ॥२४॥

वैष्णव अथवा शैवासी । जे सेविती नित्य तुळसीसी ।
आज्ञा माझी आहे ऐसी । तयासी बाधू नको ॥२५॥

गुरुसेवक असती नर । पुराण श्रवण करणार ।
सर्वसाधनधर्मपर । त्याते तुवा न बाधावे ॥२६॥

सुकृती शास्त्रपरायणासी । गुरूते सेवित वंशोवंशी ।
विवेके धर्म करणारासी । त्याते तुवा न बाधावे ॥२७॥

कलि म्हणे ब्रह्मयासी । गुरुमहिमा आहे कैशी ।
कवण गुरुस्वरूपे कैसी । विस्तारावे मजप्रति ॥२८॥

ऐकोनि कलीचे वचन । ब्रह्मा सांगतसे आपण ।
गकार म्हणजे सिद्ध जाण । रेफः पापस्य दाहकः ॥२९॥

उकार विष्णुरव्यक्त । त्रितयात्मा श्रीगुरु सत्य ।
परब्रह्म गुरु निश्चित । म्हणोनि सांगे कलीसी ॥१३०॥

श्लोक ॥ गणेशो वाऽग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः ॥३१॥

टीका ॥ गणेशाते म्हणती गुरु । तैसाचि असे वैश्वानरू ।
ऐसाचि जाण शार्ङ्गधरू । गुरुशब्द वर्ते इतुके ठायी ॥३२॥

श्लोक ॥ गुरुः पिता गुरुर्माता । गुरुरेव परः शिवः ।
शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन ॥३३॥

टीका ॥ गुरु आपला मातापिता । गुरु शंकरु निश्चिता ।
ईश्वरु होय जरि कोपता । गुरु रक्षील परियेसा ॥३३॥

गुरु कोपेल एखाद्यासी । ईश्वर न राखे परियेसी ।
ईश्वरू कोपेल ज्या नरासी । श्रीगुरु रक्षी निश्चये ॥३५॥

श्लोक ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेकः परं ब्रह्म तस्मातगुरुमुपाश्रयेत ॥३६॥

टीका ॥ गुरु ब्रह्मा सत्य जाण । तोचि रुद्र नारायण ।
गुरुचि ब्रह्म कारण । म्हणोनि गुरु आश्रावा ॥३७॥

श्लोक ॥ हरौ प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनाः संप्रार्थयन्ते गुरुअक्तिमव्ययाम्‍ ।
गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः ॥३८॥

टीका ॥ ईश्वर जरी प्रसन्न होता । त्यासी गुरु होय ओळखविता ।
गुरु आपण प्रसन्न होता । ईश्वर होय आधीन आपुल्या ॥३९॥

श्लोक ॥ गुरुः सदा दर्शयिता प्रवृत्ति तीर्थं व्रतं योगतपादिधर्मान् ।
आचारवर्णादिविवेकयज्ञान् ज्ञानं परं भक्तिविवेकयुक्तम् ॥१४०॥

टीका ॥ गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनि । तीर्थव्रतयोगतपादि मुनी ।
आचारवर्णादि ज्ञानी । ज्ञान परम भक्तिविवेकयुक्त ॥४१॥

या कारणे श्रीगुरुसी । भजावे शास्त्रमार्गेसी ।
तीर्थव्रतयागतपासी । ज्योतिःस्वरूप असे जाणा ॥४२॥

आचारधर्मावर्णाश्रमांसी । विवेकधर्ममार्गासी भक्तिवैराग्ययुक्तांसी ।
गुरुचि मार्ग दाविणार ॥४३॥

इतुके ऐकोनि कलि आपण । विनवीतसे कर जोडून ।
गुरु सर्व देवासमान । केवी झाला सांगा मज ॥४४॥

ब्रह्मा म्हणे कलीसी । सांगेन तुज विस्तारेसी ।
एकचित्ते परियेसी । गुरुवीण पार नाही ॥४५॥

श्लोक ॥ गुरु विना न श्रवेण भवेत् कस्यापि कस्यचित् ।
विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत् ॥४६॥

टीका । गुरुवीण समस्तांसी । श्रवण कैचे परियेसी ।
श्रवण होता मनुष्यांसी । समस्त शास्त्रे ऐकती ॥

शास्त्र ऐकता परियेसी । तरतील संसारासी ।
या कारणे गुरुचि प्रकाशी । ज्योतःस्वरूप जाणावा ॥४८॥

गुरु सेविता सर्व सिद्धि । होती परियेसा त्रिशुद्धि ।
कथा वर्तली अनादि । अपूर्व तुज सांगेन ॥४९॥

पूर्वी गोदावरीचे तीरी । अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी ।
वृक्ष असती नानापरी । पुण्यनामे मृग वसती ॥५०॥

ब्रह्मऋषि आदिकरोनि । तप करिती तया स्थानी ।
तयांत वेदधर्म म्हणोनि । पैलपुत्र होता द्विज ॥५१॥

तया शिष्य बहु असती । वेदशास्त्र अभ्यासिती ।
त्यात दीपक म्हणोनि ख्याति । शिष्य होता परियेसा ॥५२॥

होता शिष्य गुरुपरायण । केला अभ्यास शास्त्रपुराण ।
झाला असे अतिनिपुण । सेवा करिता श्रीगुरुची ॥५३॥

वेदधर्म एके दिनी । समस्त शिष्यांसी बोलावूनी ।
पुसतसे संतोषोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५४॥

बोलावुनि शिष्यांसी । बोले गुरु परियेसी ।
प्रीति असेल आम्हांसी । तरी माझे वाक्य परियेसा ॥५५॥

शिष्य म्हणती गुरूसी । जे जे स्वामी निरोपिसी ।
तू तारक आम्हांसी । अंगिकारू हा भरवसा ॥५६॥

गुरूचे वाक्य जो न करी । तोचि पडे रौरव घोरी ।
अविद्या मायासागरी । बुडोन जाय तो नर ॥५७॥

मग तया कैची गति । नरकी पडे तो सतती ।
गुरु तारक हे ख्याति । वेदपुराणे बोलती ॥५८॥

ऐकोनि शिष्यांची वाणी । तोषला वेदधर्म मुनी ।
संदीपकाते बोलावुनी । सांगतसे परियेसा ॥५९॥

ऐका शिष्य सकळीक । आमचे पूर्वार्जित असे एक ।
जन्मांतरी सहस्त्राधिक । केली होती महापातके ॥१६०॥

आमचे अनुष्ठान करिता । बहुत गेले प्रक्षाळिता ।
काही शेष असे आता । भोगिल्यावाचून न सुटे जाणा ॥६१॥

तप सामर्थ्ये उपेक्षा करितो । पापमोक्षा आड रिघतो ।
याचि कारणे निष्कृति करितो । तया पाप घोरासी ॥६२॥

न भोगिता आपुले देही । आपले पापा निष्कृति नाही ।
हा निश्चय जाणोनि पाही । भोगावे आम्ही परियेसा ॥६३॥

या पापाचे निष्कृतीसी । जावे आम्ही वाराणशीसी ।
जाईल पाप शीघ्रेसी । प्रख्यात असे अखिल शास्त्री ॥६४॥

या कारणे आम्हांसी । न्यावे पुरी वाराणशीसी ।
पाप भोगीन स्वदेहासी । माते तुम्ही सांभाळावे ॥६५॥

या समस्त शिष्यांत । कवण असे सामर्थ्यवंत ।
अंगिकारावे त्वरित । म्हणोनि पुसे शिष्यांसी ॥६६॥

तया शिष्यांमध्ये एक । नाम असे संदीपक ।
बोलतसे अतिविवेक । तया गुरूप्रति देखा ॥६७॥

दीपक म्हणे गुरुस । पाप करितां देहनाश ।
न करावा संग्रहो दुःखास । शीघ्र करा प्रतिकारू ॥६८॥

वेदधर्म म्हणे तयासी । दृढ देह असता मनुष्यासी ।
क्षालन करावे पापासी । पुढती वाढे विषापरी ॥६९॥

अथवा तीर्थे प्रायश्चित्ते । आपुले देही भोगोनि त्वरिते ।
पापावेगळे न होता निरुते । मुक्ति नव्हे आपणांसी ॥१७०॥

देव अथवा ऋषेश्वरांसी । मनुष्यादि ज्ञानवंतासी ।
क्षालन न होय पापासी । आपुले आपण न भोगिता ॥७१॥

दीपक म्हणे गुरूसी । स्वामी निरोपावे आपणासी ।
सेवा करीन स्वशक्तीसी । न करिता अनुमान सांगिजे ॥७२॥

ऐकोनि दीपकाचे वचन । वेदधर्म म्हणे आपण ।
कुष्ठे होईल अंग हीन । अंधक पांगूळ परियेसा ॥७३॥

संवत्सर एकविशंत । माते सांभाळावे बहुत ।
जरी असेल दृढ व्रत । अंगिकारावी तुम्ही सेवा ॥७४॥

दीपक म्हणे गुरूसी । कुष्ठी होईन आपण हर्षी ।
अंध होईन एकवीस वर्षी । पापनिष्कृति करीन ॥७५॥

तुमचे पापाचे निष्कृति । मी करीन निश्चिती ।
स्वामी निरोपावे त्वरिती । म्हणोनि चरणांसी लागला ॥७६॥

ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषला वेदधर्म मुनी ।
सांगतसे विस्तारोनि । तया पाप-लक्षणे ॥७७॥

आपुले पाप आपणासी । ग्राह्य नव्हे पुत्रशिष्यांसी ।
न भोगितां स्वदेहासी । न वेचे पाप परियेसा ॥७८॥

याकारणे आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा ।
सांभाळी मज तू संदीपका । एकवीस वर्षेपर्यंत ॥७९॥

जे पीडिती रोगे देखा । प्रतिपाळणारासी कष्ट अधिका ।
मजहूनि संदीपका । तूते कष्ट अधिक जाण ॥१८०॥

या कारणे आपुले देही । भोगीन पाप निश्चयी ।
तुवा प्रतिपाळावे पाही । काशीपूरा नेऊनिया ॥८१॥

तया काशीपुरी जाण । पापावेगळा होईन ।
आपण शाश्वतपद पावेन । तुजकरिता शिष्योत्तमा ॥८२॥

दीपक म्हणे गुरूसी । अवश्य नेईन पुरी काशी।
सेवा करीन एकवीस वर्षी । विश्वनाथासम तुमची ॥८३॥

ब्रह्मा म्हणे कलियुगासी । कैसा होता शिष्य त्यासी ।
कुष्ठ होतांची गुरूसी । नेले काशीपुरा ॥८४॥

मणिकर्णिका उत्तरदेशी । कंबळेश्वर सन्निधेसी ।
राहिले तेथे परियेसी । गुरू शिष्य दोघेजण ॥८५॥

स्नान करूनि मणिकर्णिकेसी । पूजा करिती विश्वनाथासी ।
प्रारब्धभोग त्या गुरूसी । भोगीत होता तया स्थानी ॥८६॥

कुष्ठरोग झाला बहुत । अक्षहीन अतिदुःखित ।
संदीपक सेवा करित । अतिभक्ती करूनिया ॥८७॥

व्यापिला देह कुष्ठे बहुत । पू कृमि पडे रक्त ।
दुःखे व्यापला अत्यंत । अपस्मारी झाला जाण ॥८८॥

भिक्षा मागोनि संदीपक । गुरूसी आणोनि देत नित्यक ।
करी पूजा भावे एक । विश्वनाथस्वरूप म्हणतसे ॥८९॥

रोगे करूनि पीडितां नरू । साधुजन होती क्रूरू ।
तोचि देखा द्विजवरू । होय क्रूर एखादे वेळी ॥१९०॥

भिक्षा आणितां एखादे दिवशी । न जेवे श्रीगुरु कोपेसी ।
स्वल्प आणिले म्हणोनि क्लेशी । सांडोनि देत भूमीवरी ॥९१॥

येरे दिवशि जाऊनि शिष्य । आणि अन्ने बहुवस ।
मिष्टान्ने न आणी म्हणोनि क्लेश । करिता झाल परियेसा ॥९२॥

परोपरीचे पक्वान्न । का नाणिशी म्हणे जाण ।
कोपे मारू येत आपण । शाका परोपरी मागतसे ॥९३॥

जितुके आणि मागोनिया । सर्वस्वे करीतसे वाया ।
कोपे देत शिविया । परोपरी परियेसा ॥९४॥

एखादे समयि शिष्यासी । म्हणे ताता ज्ञानराशी ।
मजनिमित्त कष्टलासी । शिष्यराया शिखामणी ॥९५॥

सवेचि म्हणत वचने क्रूर । माते गांजिले अपार ।
तू आमुचे विष्ठामूत्र । क्षणाक्षणा धूत नाही ॥९६॥

खाताती मज मक्षिका । कां न निवारिसी संदीपका ।
सेवा करितां म्हणे ऐका । भिक्षा नाणिशी म्हणतसे ॥९७॥

या कारणे पापगुण । ऐसेची असती जाण ।
वोखट वाक्य निर्गुण । पाप म्हणोनि जाणावे ॥९८॥

पाप असे जेथे बहुत । दैन्य मत्सर वसे तेथ ।
शुभाशुभ नेणे क्वचित । पापरूपे जाणावे ॥९९॥

एखादे दैन्यकासी । दुःखे प्राप्त होती कैसी ।
अपस्मार होय जयासी । पाअरूप तोचि जाणा ॥२००॥

समस्त रोग असती देखा ।
कुष्ठ सोळा भाग नव्हे निका । वेदधर्म द्विज ऐका कष्टतसे येणेपरी ॥१॥

ऐसे गुरूचे गुणदोष । मनांत न आणी तोचि शिष्य।
सेवा करी एकमानस । तोचि ईश्वर मानोनि ॥२॥

जैसे जैसे मागे अन्न । आणूनि देतसे परिपूर्ण ।
जैसा विश्वेश्वर नारायण । तैसा गुरु म्हणतसे ॥३॥

काशीक्षेत्र थोर असतां । न करी सदा तीर्थयात्रा ।
न जाय देवदर्शना सर्वथा । गुरुसेवेवांचूनि ॥॥

श्लोक ॥ न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा ।
अहर्निश ब्रह्म हरिः सुबुद्धो गुरुः प्रसेव्यो न हि सेव्यमन्यत्‍ ॥५॥

टीका ॥ आपुले देहसंरक्षण । कधी न करी शिष्य जाण ।
लय लावूनि श्रीगुरुचरण । कवणासवे न बोलेची ॥६॥

अहोरात्र येणेपरी । ब्रह्मा शिव म्हणे हरी ।
गुरुचि होय निर्धारी । म्हणोनि सेवा करीतसे ॥७॥

गुरु बोले निष्ठुरेसी । आपण मनी संतोषी ।
जे जे त्याचे मानसी । पाहिजे तैसे वर्ततसे ॥८॥

वर्तता येनेपरी देख । प्रसन्न होवोनि पिनाक ।
उभा येऊनि सन्मुख । वर माग म्हणतसे ॥९॥

अहो गुरुभक्त दीपका । महाज्ञानी कुलदीपका ।
तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका । प्रसन्न झालो माग आता ॥२१०॥

दीपक म्हणे ईश्वरासी । हे मृत्युंजय व्योमकेशी ।
न पुसतां आम्ही गुरुसी । वर न घे सर्वथा ॥११॥

म्हणोनि गेला गुरुपासी । विनवीतसे तयासी ।
विश्वनाथ आम्हांसी । प्रसन्न होवोनि आलासे ॥१२॥

निरोप झालिया स्वामीचा । मागेन उपशर्म व्याधीचा ।
वर होता सदाशिवाचा । बरवे होईल म्हणतसे ॥१३॥

ऐकोनिया शिष्याचे वचन । बोले गुरु कोपायमान ।
माझे व्याधिनिमित्त जाण । नको प्रार्थू ईश्वरासी ॥१४॥

भोगिल्यावाचोनि पातकासी । निवृत्ति नव्हे गा परियेसी ।
जन्मांतरी बाधिती निश्चयेसी । धर्मशास्त्री असे जाण ॥१५॥

मुक्ति अपेक्षा ज्याचे मनी । तेणे करावी पापधुणी ।
शेष राहतां निर्गुणी । विघ्न करितील मोक्षासी ॥१६॥

ऐशियापरी शिष्यासी । गुरु सांगे परियेसी ।
निरोप मागोनि श्रीगुरुसी । गेला ईश्वरासन्मुख ॥१७॥

जाऊनि सांगे ईश्वरासी । नलगे वर आपणासी ।
नये गुरुचे मानसी । केवी घेऊ म्हणतसे ॥१८॥

विस्मय करोनि व्योमकेशी । गेला निर्वाणमंडपासी ।
बोलावून समस्त देवांसी । सांगे वृत्तान्त विष्णूपुढे ॥१९॥

श्रीविष्णु म्हणे शंकरास । कैसा गुरु कैसा शिष्य ।
कोठे त्यांचा रहिवास । सांगावे मज निर्धारे ॥२२०॥

सांगे ईश्वर विष्णुसी । आश्चर्य देखिले परियेसी ।
दीपक शिष्य निश्चयेसी । गुरुभक्त असे जाणा ॥२१॥

गोदावरीतीरवासी । वेदधर्म म्हणिजे तापसी ।
त्याची सेवा अहर्निशी । करितो भावे एकचित्ते ॥२२॥

नाही त्रिलोकी देखिला कोणी । गुरुभक्ति करणार निर्गुणी ।
त्याते देखोनि माझे मनी । अतिप्रीति वर्ततसे ॥२३॥

वर देईन म्हणोनि आपण । गेलो होतो तयाजवळी जाण ।
गुरूचा निरोप नाही म्हणोन । न घे वर परियेसा ॥२४॥

अनेक दिव्यसहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषि ।
वर मागती अहर्निशी । नाना कष्ट करोनिया ॥२५॥

तैसा तापसी योगी यांसी । नव्हे मज वर द्यावयासी ।
बलात्कारे देता तयासी । वर न घे तो दीपक ॥२६॥

तनमन अर्पूनि श्रीगुरूसी । सेवा करितो संतोषी ।
त्रयमूर्ति म्हणोनि गुरूसी । निश्चये भजतसे ॥२७॥

समस्त देव मातापिता । गुरुचि असे तत्त्वतां ।
निश्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ॥२८॥

किती म्हणोनि वर्णू त्यासी । अविद्या-अंधकारासी ।
छेदिता दीपक परियेसी । कुलदीपक नाम सत्य ॥२९॥

धर्म ज्ञान सर्व एक । गुरुचि म्हणे कुलदीपक ।
चरणसेवा मनःपूर्वक । करितो गुरूची भक्तीने ॥२३०॥

इतुके ऐकोनि शार्ङ्गधरू । पहावया गेला शिष्यगुरु ।
त्यांचा भक्तिप्रकारू । पाहे तये वेळी ॥३१॥

सांगितले विश्वनाथे । त्याहून दिसे आणिक तेथे ।
संतोषोनि दीपकाते । म्हणे विष्णु परियेसा ॥३२॥

दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी ।
वर देतोसी परियेसी । कवण कार्या सांग मज ॥३४॥

लक्ष कोटी सहस्त्र वरुषी । तप करिती अरण्यावासी ।
त्यांसी करितोसी उदासी । वर न देसी नारायण ॥३५॥

मी तरी तुज भजत नाही । तुझे नाम स्मरत नाही ।
बलात्कारे येवोनि पाही । केवी देशी वर मज ॥३६॥

ऐकोनि दीपकाचे वचन । संतोषला नारायण ।
सांगतसे विस्तारोन । तया दीपकाप्रती देखा ॥३७॥

गुरुभक्ति करिसी निर्वाणेसी । म्हणोनि आम्ही जाहलो संतोषी ।
जे भक्ति केली त्वां गुरूसी । तेचि आम्हांसी पावली ॥३८॥

जो नर असेल गुरुभक्त जाण । तोचि माझा जीवप्राण ।
त्यासी वश्य झालो आपण । जे मागेल ते देतो तया ॥३९॥

सेवा करी माता पिता । ती पावे मज तत्त्वतां ।
पतिसेवा स्त्रिया करिता । तेही मज पावतसे ॥२४०॥

एखाद्या भल्या ब्राह्मणासी । यती योगेश्वर तापसी ।
करिती नमन भक्तीसी । तेचि मज पावे जाणा ॥४१॥

ऐसे ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिक ।
विनवीतसे देख । म्हणे सिद्ध नामधारका ॥४२॥

ऐक विष्णु ह्रषीकेशी । निश्चय असो माझे मानसी ।
वेदशास्त्र मीमांसादिकांसी । गुरु आम्हांसी देणार ॥४३॥

गुरूपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां आधीन ।
आमुचा गुरुचि देव जाण । अन्यथा नाही जाण पा ॥४४॥

सर्व देव सर्व तीर्थ । गुरूचि आम्हा असे सत्य ।
गुरूवांचूनि आम्हां परमार्थ । काय दूर असे सांगा ॥४५॥

समस्त योगी सिद्धजन । गुरूवांचूनि न होती सज्ञान ।
ज्ञान होता ईश्वर आपण । केवी दूर असे सांगा ॥४६॥

जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतो काय चोज ।
याकारणे श्रीगुरुराज । भजतसे परियेसा ॥४७॥

संतोषोनि नारायण । म्हणे धन्य धन्य माझा प्राण ।
तू शिष्य-शिरोरत्‍न । बाळक तूचि आमुचा ॥४८॥

काही तरी माग आता । वर देईन तत्त्वतां ।
विश्वनाथ आला होता । दुसरेन वर द्यावयासी मी आलो ॥४९॥

आमचेनि मन संतोषी । वर माग जो तुझे मानसी ।
तुज वश्य झालो निर्धारेसी । जे पाहिजे ते देईन आता ॥२५०॥

दीपक म्हणे विष्णुसी । जरी वर आम्हां देसी ।
गुरुभक्ति होय अधिक मानसी । ऐसे मज ज्ञान द्यावे ॥५१॥

गुरूचे रूप आपण ओळखे । ऐसे ज्ञान देई सुखे ।
यापरते न मागे निके । म्हणोनि चरणी लागला ॥५२॥

दिधला वर शार्ङ्गपाणी । संतोषोनि बोले वाणी ।
अरे दीपका शिरोमणी । तू माझा प्राणसखा होशी ॥५३॥

तुवा ओळखिले गुरूसी । देखिले दृष्टी परब्रह्मासी ।
आणीक जरी आम्हां पुससी । सांगेन एक एकचित्ते ॥५४॥

लौकिक सुबुद्धि होय जैशी । धर्माधर्मसुमने तैशी ।
उत्कृष्टाहूनि उत्कृष्टेसी । स्तुति करि गा अहर्निशी ॥५५॥

जे जे समयी श्रीगुरूसी । तू भक्तीने स्तुति करिसी । तेणे ।
होऊ आम्ही संतोषी । तेचि आमुची स्तुति जाण ॥५६॥

वेद वाचिती सांगेसी । वेदान्त भाष्य अहर्निषी ।
वाचिती जन उत्कृष्टेसी । आम्हा पावे निर्धारी ॥५७॥

बोलती वेद सिद्धान्त । गुरुचि ब्रह्म असे म्हणत ।
याचि कारणे गुरु भजता सत्य । सर्व देवता तुज वश्य ॥५८॥

गुरु म्हणजे अक्षर दोन । अमृताचा समुद्र जाण ।
तयामध्ये बुडता क्षण । केवी होय परियेसा ॥५९॥

जयाचे ह्रदयी गुरुस्मरण । तोचि त्रिलोकी पूज्य जाण ।
अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ॥२६०॥

श्लोक ॥ यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि ।
अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्‍गुरुस्तदा ॥६१॥

टीका ॥ आपण अथवा ईश्वरु । ब्रह्मा जरी देता वरु ।
तद्वत्‍ फलदाता गुरु । गुरु त्रैमूर्ति याचि कारणे ॥६२॥

ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूने परियेसी ।
ब्रह्मा सांगे कलीसी । एकचित्ते परियेसा ॥६३॥

वर लाधोनि दीपक । गेला गुरूचे सन्मुख ।
पुसतसे गुरु ऐक । तया शिष्या दीपकासी ॥६४॥

ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधले वैकुंठनायका ।
विस्तारोनि सांगे निका । माझे मन स्थिर होय ॥६५॥

दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला ह्रषीकेशी ।
म्या मागितले तयासी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनिया ॥६६॥

गुरुची सेवा तत्परेसी । अंतःकरण दृढेसी ।
वर दिधला संतोषी । दृढभक्ति माझी तुमचे चरणी ॥६७॥

संतोषोनि श्रीगुरु । प्रसन्न झाला साक्षात्कारू ।
जीवित्वे होय तू स्थिरू । काशीपुरी वास करी ॥६८॥

तुझे वाक्य सर्वसिद्धि । तुझे घरी नवनिधि ।
विश्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषोनि ॥६९॥

तुझे स्मरण जे करिती । त्यांचे कष्ट निवारण होती ।
श्रियायुक्त नांदती । तुझे स्मरणमात्रेसी ॥२७०॥

येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसी ।
दिव्यदेह झाला तत्क्षणेसी । झाला गुरु वेदधर्म ॥७१॥

शिष्याचा भाव पहावयास । कुष्ठी झाला महाक्लेश ।
तो तापसी अतिविशेष । त्यासी कैचे पाप राहे ॥७२॥

लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशी ।
काशीक्षेत्रमहिमा ऐसी । पाप जाय सहस्त्र जन्मीचे ॥७३॥

तया काशीनगरात । धर्म अथवा अधर्म-रत ।
वास करिती क्वचित । त्यांसि पुनर्जन्म नाही जाणा ॥७४॥

सूत म्हणे ऋषीश्वरासी । येणे प्रकारे कलीसी ।
सांगे ब्रह्मा परियेसी । शिष्यदीपक आख्यान ॥७५॥

सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावे याचि गुणी ।
तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे येणेविधी ॥७६॥

श्लोक ॥ यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः ।
तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति ॥७७॥

टीका । जरी भक्ति असे दृढेसी । त्रिकरणसह मानसी ।
तोचि लाधे ईश्वरासी । ईश्वर होय तया वश्य ॥७८॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥२॥

श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ।

॥ ओवीसंख्या ॥२७९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


गुरूचरित्र – अध्याय तिसरा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि ।
संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥

जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी ।
संदेह होता माझे मनी । आजि तुवा फेडिला ॥२॥

तुझेनि सर्वस्व लाधलो । आनंदजळी बुडालो ।
परम तत्त्व जोडलो । आजिचेनि दातारा ॥३॥

ऐसे श्रीगुरुमहिमान । मज निरोपिले त्वां ज्ञान ।
आनंदमय माझे मन । तुझेनि धर्मे स्वामिया ॥४॥

कवणे ठायी तुमचा वास । नित्य तुम्हा कोठे ग्रास ।
होईन तुझा आतां दास । म्हणोनि चरणी लागला ॥५॥

कृपानिधी सिद्ध मुनी । तया शिष्या आलिंगोनि ।
आशीर्वचन देऊनि । सांगे आपुला वृत्तान्त ॥६॥

जे जे स्थानी होते गुरु । तेथे असतो चमत्कारू ।
पुससी जरी आम्हां आहारू । गुरुस्मरणी नित्य जाणा ॥७॥

श्रीगुरुचरित्र महिमान । तेचि आम्हा अमृतपान ।
सदा सेवितो याचे गुण । म्हणोनि पुस्तक दाविले ॥८॥

भुक्ति मुक्ति परमार्थ । जे जे वांछिजे मनांत ।
ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥९॥

धनार्थी यासी अक्षय धन । पुत्रपौत्रादि गोधन ।
कथा ऐकता होय जाण । ज्ञानसिद्धी तात्काळ ॥१०॥

जे भक्तीने सप्तक एक । पढती ऐकती भक्तलोक ।
काम्य होय तात्कालिक । निपुत्रिका पुत्र होती ॥११॥

ग्रहरोगादिपीडन । न होती व्याधि कधी जाण ।
जरी मनुष्यास असेल बंधन । त्वरित सुटे ऐकता ॥१२॥

ज्ञातवंत शतायुषी । ऐकता होय भरवसी ।
ब्रह्महत्यापापे नाशी । एकचित्ते ऐकता ॥१३॥

इतुके ऐकोनि त्या अवसरी । नामधारक नमस्कारी ।
स्वामी माते तारी तारी । कृपानिधि सिद्ध मुनी ॥१४॥

साक्षात्कारे गुरुमूर्ति । भेटलासी तू जगज्योती ।
होती वासना माझे चित्ती । गुरुचरित्र ऐकावे ॥१५॥

एखादा तृषेने पीडित । जात असता मार्गस्थ ।
त्या आणूनि देती अमृत । तयापरी तू मज भेटलासी ॥१६॥

गुरूचा महिमा ऐको कानी । सांगिजे स्वामी विस्तारोनि ।
अंधकार असतां रजनी । सूर्योदयापरी करी ॥१७॥

इतुकिया अवसरी । सिद्ध योगी अभय करी ।
धरोनिया सव्य करी । घेवोनि गेला स्वस्थाना ॥१८॥

असे ठाव ज्ञानपंथी । कल्पवृक्ष अश्वत्थी ।
बैसोनि सांगे ज्ञानज्योती । ऐक शिष्या नामधारका ॥१९॥

नेणती सोय गुरुदास्यका । याचि कारणे उपबाधका ।
होती तुज अनेका । चिंता क्लेश घडती तुज ॥२०॥

ओळखावया गुरुमूर्तीसी । आपुला आचार परियेसी ।
दृढ भक्ति धरोनि मानसी । ओळखिजे मग श्रीगुरु ॥२१॥

ऐकोनि सिद्धांचे वचन । संतोषे नामधारक सगुण ।
क्षणक्षणा करी नमन । करुणावचने करोनिया ॥२२॥

तापत्रयाग्नीत पोळलो । मी संसारसागरी बुडालो ।
क्रोधादि जलचरी वेष्टिलो । अज्ञानजाळे वेष्टूनिया ॥२३॥

ज्ञाननौकी बसवूनि । कृपेचा वायू पालाणुनि ।
देहा तारक करूनि । तारावे माते स्वामिया ॥२४॥

ऐशिया करुणावचनी । विनवितसे नामकरणी ।
मस्तक सिद्धाचिया चरणी । ठेविता झाला पुनः पुनः ॥२५॥

तव बोलिला सिद्ध मुनि । न धरी चिंता अंतःकरणी ।
उठवीतसे आश्वासोनि । सांकडे फेडीन तुझे आता ॥२६॥

ज्यांसी नाही दृढ भक्ति । सदा दैन्ये कष्टती ।
श्रीगुरूवरी बोल ठेविती । अविद्यामाया वेष्टूनि ॥२७॥

संशय धरोनि मानसी । श्रीगुरु काय देईल म्हणसी ।
तेणे गुणे हा भोग भोगिसी । नाना कष्टे व्याकुळित ॥२८॥

सांडोनि संशय निर्धार । गुरुमूर्ति देईल अपार ।
ऐसा देव कृपासागर । तुज नुपेक्षी सर्वथा ॥२९॥

गुरुमूर्ति कृपासिंधु । प्रख्यात असे वेदा बोधु ।
तुझे अंतःकरणी वेधु । असे तया चरणांवरी ॥३०॥

तो दातार अखिल मही । जैसा मेघाचा गुण पाही ।
पर्जन्य पडतो सर्वां ठायी । कृपासिंधु ऐसा असे ॥३१॥

त्यांतचि पात्रानुसार । सांगेन साक्षी एक थोर ।
सखोल भूमि उदक स्थिर । उन्नती उदक नाही जाण ॥३२॥

दृढ भक्ति जाणा सखोल भूमि । दांभिक ओळखा उन्नत तुम्ही ।
याचिया कारणे मनोकर्मी । निश्चयावे श्रीगुरूसी ॥३३॥

म्हणोनि श्रीगुरुउपमा । ऐसा कणव असे महिमा ।
प्रपंच होय परब्रह्मा । हस्त मस्तकी ठेवोनिया ॥३४॥

कल्पतरूची द्यावी उपमा । कल्पिले लाभे त्याचा महिमा ।
न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरु ॥३५॥

ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ति । ख्याति असे श्रुतिस्मृती ।
संदेह सांडूनि एकचित्ती । ध्याय पदांबुज श्रीगुरूचे ॥३६॥

इतके परिसोनि नामधारक । नमन करोनि क्षणैक ।
करसंपुट जोडोनि ऐक । विनवितसे सिद्धासी ॥३७॥

श्रीगुरू सिद्ध योगेश्वरा । कामधेनु कृपासागरा ।
विनवितसे अवधारा । सेवक तुमचा स्वामिया ॥३८॥

स्वामींनी निरोपिले सकळ । झाले माझे मन निर्मळ ।
वेध लागला असे केवळ । चरित्र श्रीगुरूचे ऐकावया ॥३९॥

गुरु त्रयमूर्ति ऐको कानी । का अवतरले मनुष्ययोनी ।
सर्व सांगावे विस्तारोनि । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥

मग काय बोले योगींद्र । बा रे शिष्या तू पूर्णचंद्र ।
माझा बोधसमुद्र । कैसा तुवा उत्साहविला ॥४१॥

तूते महासुख लाधले । गुरुदास्यत्व फळले ।
परब्रह्म अनुभवले । आजिचेनि तुज आता ॥४२॥

हिंडत आलो सकळ क्षिति । कवणा नव्हे ऐशी मति ।
गुरुचरित्र न पुसती । तूते देखिले आजि आम्ही ॥४३॥

ज्यासी इहपरत्रींची चाड । त्यासी ही कथा असे गोड ।
त्रिकरणे करोनिया दृढ । एकचित्ते ऐकिजे ॥४४॥

तू भक्त केवळ श्रीगुरुचा । म्हणोनि भक्ति झाली उंचा ।
निश्चयो मानी माझिया वाचा । लाधसी चारी पुरुषार्थ ॥४५॥

धनधान्यादि संपत्ति । पुत्रपौत्र श्रुतिस्मृति ।
इह सौख्य आयुष्यगति । अंती गति असे जाणा ॥४६॥

गुरुचरित्र कामेधेनु । वेदशास्त्रसंमत जाणु ।
अवतरला त्रयमूर्ति आपणु । धरोनि नरवेष कलियुगी ॥४७॥

कार्याकारण अवतार । होऊनि येती हरिहर ।
उतरावया भूमिभार । भक्तजनाते तारावया ॥४८॥

ऐकोनि सिद्धाच वचना । प्रश्न करी शिष्यराणा ।
त्रयमूर्ति अवतार किंकारणा । देह धरोनि मानुषी ॥४९॥

विस्तारोनि ते आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागला चरणासी । करुणावचने करोनिया ॥५०॥

सिद्ध म्हणे नामधारका । त्रयमूर्ति तीन गुण ऐका ।
आदिवस्तु आपण एका । प्रपंच वस्तु तीन जाणा ॥५१॥

ब्रह्मयाचा रजोगुण । सत्त्वगुन विष्णु जाण।
तमोगुण उमारमण । मूर्ति एकचि अवधारा ॥५२॥

ब्रह्मा सृष्टिरचनेसी । पोषक विष्णु परियेसी ।
रुद्रमूर्ति प्रळयासी । त्रयमूर्तीचे तीन गुण ॥५३॥

एका वेगळे एक न होती । कार्याकारण अवतार होती ।
भूमीचा भार फेडिती । प्रख्यात असे पुराणी ॥५४॥

सांगेन साक्ष आता तुज । अंबरीष म्हणिजे द्विज ।
एकादशीव्रताचिया काज । विष्णूसी अवतार करविले ॥५५॥

अवतार व्हावया कारण । सांगेन तुज विस्तारून ।
मन करोनि सावधान । एकचित्ते परियेसा ॥५६॥

द्विज करी एकादशीव्रत । पूजा करी अभ्यागत ।
निश्चयो करी दृढचित्त । हरिचिंतन सर्वकाळ ॥५७॥

असो त्याचिया व्रतासी । भंग करावया आला ऋषि ।
अतिथि होऊनि हठेसी । पावला मुनि दुर्वास ॥५८॥

ते दिवशी साधनद्वादशी घडी एक । आला अतिथि कारणिक ।
अंबरीषास पडला धाक । केवी घडे म्हणोनिया ॥५९॥

ऋषि आले देखोनि । अंबरीषाने अभिवंदोनि ।
अर्घ्य पाद्य देवोनि । पूजा केली उपचारे ॥६०॥

विनवितसे ऋषीश्वरासी । शीघ्र जावे स्नानासी ।
साधन आहे घटिका द्वादशी । यावे अनुष्ठान सारोनिया ॥१॥

ऋषि जाऊनि जाऊनि नदीसी । अनुष्ठान करती विधींसी ।
विलंब लागता तयासी । आली साधन घटिका ॥६२॥

व्रत भंग होईल म्हणोनि । पारणे केले तीर्थ घेऊनि ।
नाना प्रकार पक्वानी । पाक केला ऋषीते ॥६३॥

तव आले दुर्वास देखा । पाहूनि अंबरीषाच्या मुखा ।
म्हणे भोजन केलेसि का । अतिथीविण दुरात्मया ॥४॥

शाप देता ऋषीश्वर । राजे स्मरला शार्ङ्गधर ।
करावया भक्ताचा कैवार । टाकून आला वैकुंठा ॥६५॥

भक्तवत्सल नारायण । शरणागताचे रक्षण ।
बिरूद बोलती पुराणे जाण । धावे धेनु वत्सासि जैसी ॥६६॥

शापिले ऋषीने द्विजासी । जन्मावे गा अखिल योनीसी ।
तव पावला ह्रषीकेशी । येऊनि जवळी उभा ठेला ॥६७॥

मिथ्या नव्हे ऋषीचे वचन । द्विजे धरिले श्रीविष्णुचे चरण ।
भक्तवत्सल ब्रीद जाण । तया महाविष्णूचे ॥६८॥

विष्णु म्हणे दुर्वासासी । तुवा शापिले अंबरीषासी ।
राखीन आपुल्या दासासी । शाप आम्हासी तुम्ही द्यावा ॥६९॥

दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर । केवळ ईश्वर अवतार ।
फेडावयास भूमिभार । कारण असे पुढे म्हणतसे ॥७०॥

जाणोनि ज्ञानीशिरोमणी । म्हणे तप करितां युगे क्षोणी ।
भेटी नव्हे हरिचरणी । भूमीवरी दुर्लभ ॥७१॥

शापसंबंधे अवतरोनि । येईल लक्ष्मी घेऊनि ।
तारावयालागोनी । भक्तजना समस्ता ॥७२॥

परोपकारसंबंधेसी । शाप द्यावा विष्णुसी ।
भूमिभार फेडावयासी । कारण असे म्हणोनिया ॥७३॥

ऐसे विचारोनि मानसी । दुर्वास म्हणे विष्णूसी ।
अवतरोनी भूमीसी । नाना स्थानी जन्मावे ॥७४॥

प्रसिद्ध होसी वेळ दहा । उपर अवतार पूर्ण दहा ।
सहज तू विश्वात्मा महा । स्थूळसूक्ष्मी वससी तू ॥७५॥

ऐसा कार्यकारण शाप । अंगिकारी जगाचा बाप ।
दुष्टांवरी असे कोप । सृष्टिप्रतिपाळ करावया ॥७६॥

ऐसे दहा अवतार झाले । असे तुवा कर्णी ऐकिले ।
महाभागवती विस्तारिले । अनंतरूपी नारायण ॥७७॥

कार्यकारण अवतार होती । क्वचित्प्रकट क्वचित्‍ गुप्ती ।
ते ब्रह्मज्ञानी जाणती । मूढमति काय जाणे ॥७८॥

आणीक सांगेन तुज । विनोद झालासे सहज ।
अनुसया अत्रिऋषीची भाज । पतिव्रताशिरोमणी ॥७९॥

तिचे गृही जन्म जाहले । त्रयमूर्ति अवतरले ।
कपटवेष धरोनि आले । पुत्र जाहले तियेचे ॥८०॥

नामधारक पुसे सिद्धासी । विनोदकथा निरोपिलीसी ।
देव अतिप्रकट वेषी । पुत्र जाहले कवणे परी ॥८१॥

अत्रि ऋषि पूर्वी कवण । कवणापासूनि उत्पन्न ।
मूळ पुरुष होता कवण । विस्तारोनि मज सांगावे ॥८२॥

म्हणे सरस्वती गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकता होय मनोहर । सकलांभीष्टे साधती ॥८३॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अंबरीषव्रतनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥

॥ ओवीसंख्या ॥८३॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


गुरूचरित्र – अध्याय चौथा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती ।
साधु साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणी ॥१॥

ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
आठवतसे तुझ्या प्रश्नी । आदिमध्यावसानक ॥२॥

प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका ।
अत्रि ऋषीचा पूर्वका । सृष्टीपासोनि सकळ ॥३॥

पूर्वी सृष्टि नव्हती काही । जलमय होते सर्वही ।
आपोनारायण म्हणोनि पाही । वेद बोलती याची कारणे ॥४॥

उदक आपोनारायण । सर्वां ठायी वास पूर्ण ।
बुद्धिसंभवप्रपंचगुण । हिरण्यगर्भ अंड निर्मिले ॥५॥

तेचि ब्रह्मांड नाम जाहले । रजोगुने ब्रह्मासि निर्मिले ।
हिरण्यगर्भ नाम पावले । देवतावर्ष एक होते ॥६॥

तेचि ब्रह्मांड देखा । फुटोनि शकले झाली ऐका ।
एक शकल भूमिका । होऊनि ठेली शकले दोनी ॥७॥

ब्रह्मा तेथे उपजोन । रचिले चवदाहि भुवन ।
दाही दिशा मानसवचन । काळ कामक्रोधादि सकळ ॥८॥

सृष्टि रचावयासी । सप्त पुत्र उपजवी मानसी ।
नामे सांगेन परियेसी । सात जण ब्रह्मपुत्र ॥९॥

मरीचि अत्रि आंगिरस । पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ ।
सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ । सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण ॥१०॥

सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि । तेथूनि पीठ गुरुसंतति ।
सांगेन ऐका एकचित्ती । सभाग्य नामधारका ॥११॥

ऋषि अत्रीची भार्या । नाम तिचे अनसूया ।
पतिव्रताशिरोमणिया । जगदंबा तेचि जाण ॥१२॥

तिचे सौंदर्यलक्षण । वर्णू शके ऐसा कोण ।
जिचा पुत्र चंद्र आपण । तिचे रूप काय सांगो ॥१३॥

पतिसेवा करी बहुत । समस्त सुरवर भयाभीत ।
स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित । म्हणोनि चिंतिती मानसी ॥१४॥

इंद्रादि सुरवर मिळुनि । त्रयमूर्तिपासी जाउनी ।
विनविताती प्रकाशोनी । आचार अत्रि ऋषीचा ॥१५॥

इंद्र म्हणे स्वामिया । पतिव्रता स्त्री अनसूया ।
आचार तिचा सांगो काया । तुम्हाप्रती विस्तारोनि ॥१६॥

पतिसेवा करी भक्तीसी । मनोवाक्कायमानसी ।
अतिथिपूजा महाहर्षी । विमुख नव्हे कवणे काळी ॥१७॥

तिचा आचार देखोनि । सूर्य भीतसे गगनी ।
उष्ण तिजला होईल म्हणोनि । मंद मंद तपतसे ॥१८॥

अग्नि झाला भयाभीत । शीतळ असे वर्तत ।
वायु झाला भयचकित । मंद मंद वर्ततसे ॥१९॥

भूमि आपण भिऊनि देखा । नम्र जाहली पादुका ।
शाप देईल म्हणोनि ऐका । समस्त आम्ही भीतसो ॥२०॥

नेणो घेईल कवण स्थान । कोण्या देवाचे हिरोन ।
एखाद्याते वर देता जाण । तोही आमुते मारू शके ॥२१॥

यासि करावा उपाय । तू जगदात्मा देवराय ।
जाईल आमुचा स्वर्गठाय । म्हणोनि आलो तुम्हा सांगो ॥२२॥

न कराल जरी उपाय यासी । सेवा करू आम्ही तिसी ।
तिचे द्वारी अहर्निशी । राहू चित्त धरोनिया ॥२३॥

ऐसे ऐकोनि त्रयमूर्ति । महाक्रोधे कापती ।
चला जाऊ पाहू कैसी सती । म्हणती आहे पतिव्रता ॥२४॥

वतभंग करूनी तिसी । ठेवूनि येऊ भूमीसी ।
अथवा वैवस्वतालयासी । पाठवू म्हणोनि निघाले ॥२५॥

सत्त्व पहावया सतीचे । त्रयमूर्ती वेष भिक्षुकाचे ।
आश्रमा आले अत्रीचे । अभ्यागत होऊनिया ॥२६॥

ऋषि करू गेला अनुष्ठान । मागे आले त्रयमूर्ति आपण ।
अनसूयेसी आश्वासून । अतिथि आपण आलो म्हणती ॥२७॥

क्षुधे बहु पीडोन । आम्ही आलो ब्राह्मण ।
त्वरित द्यावे सती अन्न । अथवा जाऊ आणिका ठाया ॥२८॥

सदा तुमचे आश्रमांत । संतर्पण अभ्यागत ।
ऐको आली कीर्ति विख्यात । म्हणोनि आलो अनसूये ॥२९॥

इच्छाभोजनदान तुम्ही । देता म्हणोनि ऐकिले आम्ही ।
ठाकोनि आलो याचि कामी । इच्छाभोजन मागावाया ॥३०॥

इतुके ऐकोनि अनसूया । नमन केले तत्क्षणिया ।
बैसकार करूनिया । क्षालन केले चरण त्यांचे ॥३१॥

अर्ध्य पाद्य देऊनि त्यांसी ।
गंधाक्षतापुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी । आरोगण सारिजे ॥३२॥

अतिथी म्हणे तये वेळी । करोनि आलो आंघोळी ।
ऋषि येती बहुता वेळी । त्वरित आम्हा भोजन द्यावे ॥३३॥

वासना पाहोनि अतिथीते । काय केले पतिव्रते ।
ठाय घातले त्वरिते । बैसकार केला देखा ॥३४॥

बैसवोनिया पाटावरी । घृतेसी पात्र अभिधारी ।
घेवोनी आली आपण क्षीरी । शाक पाक तये वेळी ॥३५॥

तिसी म्हणती अहो नारी । आम्ही अतिथी आलो दुरी ।
देखोनि तुझे स्वरूप सुंदरी । अभीष्ट मानसी आणिक वसे ॥३६॥

नग्न होवोनि आम्हांसी । अन्न वाढावे परियेसी ।
अथवा काय निरोप देशी । आम्ही जाऊ नाही तरी ॥३७॥

ऐकोनि द्विजांचे वचन । अनसूया करी चिंतन ।
आले विप्र पहावया मन । कारणिक पुरुष होतील ॥३८॥

पतिव्रता शिरोमणी । विचार करी अंतःकरणी ।
अतिथी विमुख तरी हानि । निरोप केवी उल्लंघू ॥३९॥

माझे मन असे निर्मळ । काय करील मन्मथ खळ ।
पतीचे असे तपफळ । तारील मज म्हणतसे ॥४०॥

ऐसे विचारोनि मानसी । तथास्तु म्हणे तयांसी ।
भोजन करावे स्वस्थ चित्तेसी । नग्न वाढीन म्हणतसे ॥४१॥

पाकस्थाना जाऊनि आपण । चिंतन करी पतीचे चरण ।
वस्त्र फेडोनि नग्न । म्हणे अतिथी बाळे माझी ॥४२॥

नग्न होवोनी सती देखा । घेऊनि आली अन्नोदका।
तव तेचि झाले बाळका । ठायांपुढे लोळती ॥४३॥

बाळे देखोनि अनसूया । भयचकित होवोनिया ।
पुनरपि वस्त्रे नेसोनिया । आली तया बाळकांजवळी ॥४४॥

रुदन करिती तिन्ही बाळे । अनसूया रहावी वेळोवेळ ।
क्षुधार्त झाली केवळ । म्हणोनि कडिये घेतसे ॥४५॥

कडिये घेवोनि बाळकांसी । स्तनपान करवी अतिहर्षी । एका सांडोनि एकाशी । क्षुधा निवारण करितसे ॥४६॥

पाहे पा नवल काय घडले । त्रयमूर्तीची झाली बाळे ।
स्तनपान मात्रे तोषले । तपफळ ऐसे पतिव्रतेचे ॥४७॥

ज्याचे उदरी चौदा भुवन । सप्त समुद्र वडवाग्नि जाण ।
त्याची क्षुधा निवारण । पतिव्रतास्तनपानी ॥४८॥

चतुर्मुख ब्रह्मयासी । सृष्टि करणे अहर्निशी ।
त्याची क्षुधा स्तनपानेसी । केवी झाली निवारण ॥४९॥

भाळाक्ष कर्पूर गौर । पंचवक्त्र काळाग्निरुद्र ।
स्तनपान करवी अनसूया सुंदर । तपस्वी अत्री ऐसा ॥५०॥

अनसूया अत्रिरमणी । नव्हती ऐशी कोणी ।
त्रयमूर्तीची झाली जननी । ख्याति झाली त्रिभुवनांत ॥५१॥

कडिये घेवोनि बाळकांसी । खेळवीतसे तिघांसी ।
घालोनिया पाळण्यासी । पर्यंदे गाई तये वेळी ॥५२॥

पर्यंदे गाय नानापरी । उपनिषदार्थ अतिकुसरी ।
अतिउल्हासे सप्त स्वरी । संबोखितसे त्रिमूर्तीसी ॥५३॥

इतुके होता तये वेळी । माध्यान्हवेळ अतिथिकाळी ।
अत्रि ऋषि अतिनिर्मळी । आला आपुले आश्रमा ॥५४॥

घरामाजी अवलोकिता । तव देखिली अनसूया गाता ।
कैची बाळे ऐसे म्हणता । पुसतसे स्त्रियेसी ॥५५॥

तिणे सांगितला वृत्तान्त । ऋषि ज्ञानी असे पाहात ।
त्रयमूर्ति हेचि म्हणत । नमस्कार करितसे ॥५६॥

नमस्कारिता अत्रि देखा । संतोष विष्णुवृषनायका ।
आनंद झाला चतुर्मुखा । प्रसन्न झाले तये वेळी ॥५७॥

बाळ राहिले पाळणेसी । निजमूर्ति ठाकले सन्मुखेसी ।
साधु साधु अत्रि ऋषि । अनसूया सत्य पतिव्रता ॥५८॥

तुष्टलो तुझे भक्तीसी । माग मनी वर इच्छिसी ।
अत्रि म्हणे सतीसी । जे वांछिसी माग आता ॥५९॥

अनसूया म्हणे ऋषीसी । प्राणेश्वरा तूचि होसी ।
देव पातले तुमच्या भक्तीसी । पुत्र मागा तुम्ही आता ॥६०॥

तिघे बाळक माझे घरी । रहावे माझे पुत्रापरी ।
हेचि मागतो निर्धारी । त्रयमूर्ति आपणां एकरूपा ॥६१॥

ऐसे वचन ऐकोनि । वर दिधला मूर्ती तिन्ही ।
राहती बाळके म्हणोनि । आपण गेले निजालयासी ॥६२॥

त्रिमूर्ति राहिले त्यांचे घरी । अनसूया पोशी बाळकापरी ।
नामे ठेविली प्रीतिकरी । त्रिवर्गांची परियेसा ॥६३॥

ब्रह्मामूर्ति चंद्र झाला । विष्णुमूर्ति दत्त केवळा ।
ईश्वर तो दुर्वास नाम पावला । तिघे पुत्र अनसूयेचे ॥६४॥

दुर्वास आणि चंद्र देखा । उभे राहूनि मातेसन्मुखा ।
निरोप मागती कौतुका । जाऊ तपा निजस्थाना ॥६५॥

दुर्वास म्हणे जननी । आम्ही ऋषि अनुष्ठानी ।
जाऊ तीर्थे आचरोनि । म्हणोनि निरोप घेतला ॥६६॥

चंद्र म्हणे अहो माते । निरोप द्यावा आम्हा त्वरिते ।
चंद्रमंडळी वास माते । नित्य दर्शन तुमचे चरणी ॥६७॥

तिसरा दत्त विष्णुमूर्ति । असेल तुमचे धरोनि चित्ती ।
त्रयमूर्ति तोचि निश्चिती । म्हणोनि सांगती तियेसी ॥६८॥

त्रयमूर्ति जाण तोचि दत्त । सर्व विष्णुमय जगत ।
राहील तुमचे धरोनि चित्त । विष्णुमूर्ति दत्तात्रेय ॥६९॥

त्रयमूर्ति ऐक्य होऊन । दत्तात्रेय राहिला आपण ।
दुर्वास चंद्र निरोप घेऊन । गेले स्वस्थाना अनुष्ठानासी ॥७०॥

अनसूयेचे घरी देखा । त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका ।
नाम दत्तात्रेय एका । मूळपीठ श्रीगुरूचे ॥७१॥

ऐशापरी सिद्ध देखा । कथा सांगे नामधारका ।
संतोषे प्रश्न करी अनेका । पुसतसे सिद्धासी ॥७२॥

जय सिद्ध योगीश्वरा । भक्तजनमनोहरा ।
तारक संसारसागरा । ज्ञानमूर्ति कृपासिंधो ॥७३॥

तुझेनि प्रसादे मज । ज्ञान उपजले सहज ।
तारक आमुचा योगिराज । विनंती माझी परियेसा ॥७४॥

दत्तात्रेयाचा अवतारू । सांगितला पूर्वापारू ।
पुढे अवतार जाहले गुरु । कवणेपरी निरोपिजे ॥७५॥

म्हणे सरस्वतीगंगाधरू । पुढील कथेचा विस्तारू ।
ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥७६॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥४॥

॥ ओवीसंख्या ॥७७॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


गुरूचरित्र – अध्याय पाचवा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी ।
अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥

ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा ।
अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥

मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचे मुख ।
वामनरूप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी ॥३॥

दशरथाचे कुळी जन्म । प्रख्यात अवतार श्रीराम ।
राजा होऊनि मागुती जन्म । गौळियाघरी गुरे राखी ॥४॥

वस्त्रे फेडूनि झाला नग्न । बौद्धरूपी झाला आपण ।
होऊनि कलंकी अवतार जाण । तुरुंगारूढ काय आवडी ॥५॥

नाना प्रकार नाना वेष । अवतार धरी ह्रषीकेश ।
तारावया भक्तजनास । दुष्टहनन करावया ॥६॥

द्वापारांती झाला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळी ।
आचारहीन होऊनि प्रबळी । वर्तती महिमा कलियुगी ॥७॥

भक्तजनतारणार्थ । अवतार धरी श्रीगुरुनाथ ।
सगराकारणे भगीरथ । आणी गंगा भूमंडळी ॥८॥

तैसे एक विप्रवनिता । आराधी श्रीविष्णु दत्ता ।
तिचे उदरी अवतार धरिता । आश्चर्य झाले परियेसा ॥९॥

पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥

तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥

ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥

वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥

न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥

त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥

दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६॥

ऐकोनि स्वामींचे वचन । विप्रवनिता करी चिंतन ।
विनवीतसे करद्वय जोडून । नानापरी स्तवोनिया ॥१७॥

म्हणे जय जय जगन्नाथा । तू तारक भवासी तत्त्वता ।
माझे मनी असे जे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥

तू कृपाळु सर्वा भूती । वेदपुराणे वाखाणिती ।
केवी वर्णावी तुझी कीर्ती । भक्तवत्सला कृपानिधि ॥१९॥

मिथ्या नोहे तुझा बोल । जे का ध्रुवासी दिधले पद अढळ ।
बिभीषणासी लंकास्थळ । देऊनि राज्य समर्पिले ॥२०॥

भक्तजना तू आधार । तयालागी धरिसी अवतार ।
ब्रीद असे चराचर । चौदा भुवनामाझारी ॥२१॥

आता माते वर देसी । वासना असे माझे मानसी ।
न व्हावे अन्यथा बोलासी । कृपानिधि देवराया ॥२२॥

माझे मनीची वासना । पुरवावी जगज्जीवना ।
अनाथरक्षका नारायणा । म्हणोनि चरणा लागतसे ॥२३॥

ऐकोनि तियेचे करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण ।
कर धरिला आश्वासोन । सांग जननी म्हणतसे ॥२४॥

तव बोलिली पतिव्रता । स्वामी जे निरोपिले आता ।
जननी नाम मज ठेविता । करा निर्धार याच बोला ॥२५॥

मज पुत्र झाले बहुत । नव्हेत स्थिर उपजतमृत ।
जे वाचले आता असत । अक्षहीन पादहीन ॥२६॥

योग्य झाले नाही कोणी । काय करावे मूर्ख प्राणी ।
असोनि नसती येणे गुणी । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥

व्हावा पुत्र मज ऐसा । ज्ञानवंत पुराणपुरुषा ।
जगद्वंद्य वेदसदृशा । तुम्हांसारिका दातारा ॥२८॥

ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला दत्त आपण ।
पुढे असे कार्यकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥

तापसी म्हणे तियेसी । पुत्र होईल परियेसी ।
उद्धरिल तुझे वंशासी । ख्यातिवंत कलियुगी ॥३०॥

असावे तुम्ही त्याचे बोली । येर्‍हवी न राहे तुम्हांजवळी ।
ज्ञानमार्गी अतुर्बळी । तुमचे दैन्य हरील ॥३१॥

इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसी ।
विस्मय करितसे मानसी । विप्रवनिता तयेवेळी ॥३२॥

विस्मय करोनि मनात । पतीसी सांगे वृत्तान्त ।
दोघे हर्षे निर्भर होत । म्हणती दत्तात्रेय होईल ॥३३॥

माध्यान्हसमयी अतिथिकाळी । दत्त येताती तये वेळी ।
विमुख न होता तये काळी । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥

दत्तात्रेयाचे स्थान । माहूर करवीर क्षेत्र खूण ।
तयाचा वास सदा जाण । पांचाळेश्वर नगरात ॥३५॥

नाना वेष भिक्षुकरूप । दत्तात्रेय येती साक्षेप ।
न पुसतां मज निरोप । भिक्षा घाली म्हणतसे ॥३६॥

विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली तुम्हांसी ।
ब्राह्मण न जेवता आपण त्यासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥

ऐकोनी सतीच्या बोला । विप्र मनी संतोषला ।
म्हणे पतिव्रते लाभ झाला । पितर माझे तृप्त झाले ॥३८॥

करावे कर्म पितरांच्या नामी । सर्मपावे विष्णुसी आम्ही ।
साक्षात्कारे येऊनि स्वामी । भिक्षा केली आम्हा घरी ॥३९॥

कृतार्थ झाले पितृगण समस्त । निर्धारे झाले स्वर्गस्थ ।
साक्षात्‍ विष्णु भेटले दत्त । त्रैमूर्तिअवतार ॥४०॥

धन्य तुझी मातापिता । जे वर लाधलीस मुख्य आता ।
पुत्र होईल निभ्रांता । न धरी चिंता मानसी ॥४१॥

हर्षे निर्भर होवोनि । राहिली दोघे निश्चित मनी ।
होती जाहली गर्भिणी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥

ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनी ।
विप्रे स्नान करूनि । केले जातककर्म तये वेळी ॥४३॥

मिळोनि समस्त विप्रकुळी । जातक वर्तविती तये वेळी ।
म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्‍गुरू ॥४४॥

ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता ।
आम्हा वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविती तया नाव ॥४५॥

श्रीपाद म्हणोनि या कारण । नाम ठेवी तो ब्राह्मण ।
अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥

वर्तत असता त्याचे घरी । झाली सात वर्षे पुरी ।
मौजीबधन ते अवसरी । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥

बांधिता मौजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी ।
मीमांसा तर्क अतिविस्तारी । म्हणो लागला तये वेळी ॥४८॥

ऐकोनि समस्त नगरलोक। विस्मय करिती सकळिक ।
होईल अवतार कारणिक । म्हणोन बोलती आपणात ॥४९॥

आचार व्यवहार प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत ।
वेदान्तभाष्य वेदार्थ । सांगतसे द्विजवरांसी ॥५०॥

वर्तता ऐसे तयासी । झाली वर्षे षोडशी ।
विवाह करू म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥

विचार करिती पुत्रासवे । बा रे लग्न तुवा करावे ।
श्रीपाद म्हणे ऐका भावे । माझी वांछा सांगेन ॥५२॥

कराल विवाह माझा तुम्ही । सांगो ऐका विचार आम्ही ।
वैराग्यस्त्रीसंगे असेन मी । काम्य आमुचे तियेजवळी ॥५३॥

ते स्त्रियेवाचूनि आणीक नारी । समस्त जाणा मातेसरी ।
जरी आणाल ते सुंदरी । वरीन म्हणे तये वेळी ॥५४॥

आपण तापसी ब्रह्मचारी । योगस्त्रियेवांचोनि नारी ।
बोल धरा निर्धारी । श्रीवल्लभ नाम माझे ॥५५॥

श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे । झाले त्रिमूर्ति कैसे ।
पितयाते म्हणतसे । जाउ उत्तरपंथासी ॥५६॥

ऐकोनि पुत्राचे वचन । आठविले पूर्वसूचन ।
भिक्षुके सांगितली जे खूण । सत्य झाली म्हणतसे ॥५७॥

आताच या बोलासी । मोडा घालिता परियेसी ।
विघ्न होईल त्वरितेसी । म्हणोनि विचारिती तये वेळी ॥५८॥

न म्हणावे पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी ।
जैसे याचे वसे मानसी । तैसे करावे म्हणती दोघे ॥५९॥

निश्चय करूनि आपुले मनी । पुत्राभिमुख जनकजननी ।
होती आशा आम्हांलागुनी । प्रतिपाळिसी म्हणोनिया ॥६०॥

ऐशी मनी व्याकुळित । डोळा निघती अश्रुपात ।
माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहे करोनिया ॥६१॥

देखोनि मातेचे दुःख । संबोखित परमपुरुष ।
उठवूनि स्वहस्ते देख । अश्रुपात पुशितसे ॥६२॥

न करी चिंता अहो माते । जे मागसी ते देईन तूते ।
दृढ करूनि चित्ताते । रहा सुके म्हणतसे ॥६३॥

बा रे तुजकरिता आपण । दुःख विसरले संपूर्ण ।
रक्षिसी आम्हा वृद्धांलागून । दैन्यावेगळे करोनि ॥६४॥

पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन ।
त्याते पोशील आता कोण । आम्हा कवण रक्षील ॥६५॥

ऐकोनि जननीचे वचन । अवलोकी अमृतदृष्टीकरून ।
पुत्र दोघेही झाले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥

वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण ।
दोघे येऊनि धरिती चरण । कृतार्थ झालो म्हणोनिया ॥६७॥

आश्वासून तया वेळी । दिधला वर तत्काळी ।
पुत्रपौत्री नांदा प्रबळी । श्रियायुक्त सनातन ॥६९॥

सेवा करा जनकजननी । पावा सुख महाज्ञानी ।
इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चये ॥७०॥

ऐसे बोलोनि तयांसी । संबोधितसे मातेसी ।
पाहोनिया दोघा पुत्रांसी । राहता सुख पावाल ॥७१॥

पुत्र दोघे शतायुषी । निश्चय धरी वो मानसी ।
कन्या पुत्र होतील यांसी । तुम्ही नेत्री देखाल ॥७२॥

अखंड लक्ष्मी यांचे घरी । यांचे वंशपरंपरी ।
कीर्तिवंत सचराचरी । संपन्न होती वेदशास्त्रे ॥७३॥

आमची अवज्ञा न करिता । निरोप द्यावा आम्हा त्वरिता ।
जाणे असे उत्तरपंथा । दीक्षा द्यावया साधुजना ॥७४॥

सांगोनि मातापित्यासी । अदृश्य झाला परियेसी ।
पावला त्वरित पूरी काशी । गुप्तरूपे होता तेथे ॥७५॥

निघाला तेथूनि बदरीविना । भेटी घेऊनि नारायणा ।
अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेही ॥७६॥

दीक्षा करावया भक्तजना । तीर्थे हिंडणे आपणा ।
मनोवेगे मार्गक्रमणा । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥

ऐकोनि सिद्ध मुनींचे वचन । विनवी नामधारक आपण ।
ते परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥७८॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेयावतारकथनं नाम पंचमेऽध्यायः ॥५॥

॥ श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ ओवीसंख्या ॥७८॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


गुरूचरित्र – अध्याय सहावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तू ज्योति अंधकारासी ।
प्रकाश केला जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥१॥

त्रैमूर्ति होऊनि आपण । तीर्थे करावी किंकारण ।
विशेष असे काय गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥

तीर्थे असती अपरंपारी । समस्त सांडूनि प्रीति करी ।
कैसा पावला दत्तात्री । अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ॥३॥

ऐक शिष्या शिखामणी । तुवा पुशिले जे का प्रश्नी ।
संतोष जाला अंतःकरणी । सांगेन चरित्र श्रीगुरूंचे ॥४॥

विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागला चरणांसी । नामधारक प्रीतिकारे ॥५॥

ऐकोनि नामधारकाचे वचन । संतोषले सिद्धाचे मन ।
सांगतसे विस्तारोन । गुरुचरित्र परियेसा ॥६॥

तुजकरिता आम्हासी । लाभ झाला असे मानसी ।
गुरुचरित्र सांगावयासी । उत्कंठा मानसी होय ते ॥७॥

म्हणे त्रैमूर्ति अवतरोन । तीर्थे हिंडे केवी आपण ।
विशेष पावला गोकर्ण । म्हणोनि पुससी आम्हाते ॥८॥

दत्तात्रेय आप्ण । तीर्थे हिंडे तयाचे कारण ।
भक्तजनाहितार्थ दीक्षेस्तव जाण । उपदेश करावया ॥९॥

विशेष तीर्थ आपुले स्थान । गोकर्णी शंकर असे जाण ।
याच कारणे निर्गुण । त्रैंमूर्ति वसती तया ठाया ॥१०॥

गोकर्णीचे माहात्म्य । सांगतसे अनुपम्य ।
एकचित्त करूनि नेम । ऐक शिष्या नामधारका ॥११॥

त्या तीर्थाचे आदि अंती । सांगेन तुम्हां विस्तृती ।
जे पूर्वी वर लाधले असती । अपूर्व असे ऐकता ॥१२॥

महाबळेश्वरलिंग देखा । स्वयंभू शिव असे ऐका ।
आख्यान त्याचे ऐका । लंबोदरे प्रतिष्ठले ते ॥१३॥

शिष्य म्हणे सिद्धासी । तीर्थमहिमा वानिसी ।
विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी । विस्तारोनि सांग मज ॥१४॥

ऐसे शिष्य विनवीत । ऐकोनि बहु संतोषत ।
निरोपित आद्यंत । महाबळेश्वरचरित्र ॥१५॥

पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या । नाम तियेचे कैकया ।
ईश्वरभक्ति अतिप्रिया । शिवपूजा सर्वकाळ ॥१६॥

नित्य करी शिवपूजन । पूजेवीण न घे अन्न ।
ऐसे करिता एक दिन । न मिळे लिंग पूजेसी ॥१७॥

व्रतभंग होईल म्हणोनि । मृत्तिकालिंग करूनि ।
पूजी अति संतोषोनि । भक्तिपुर्वक अवधारा ॥१८॥

तिचा पुत्र अतिक्रूर । नाम तया दशशिर ।
आला तेथे वेगवत्तर । मातृदर्शन करावया ॥१९॥

नमिता झाला मातेसी । पुसे पूजा काय करिसी ।
माता सांगे विस्तारेसी । लिंग पूजिले मृत्तिकेचे ॥२०॥

रावण म्हणे जननीसी । माझी माता तू म्हणविसी ।
मृतिकेचे लिंग पूजेसी । अभाग्य आपुले म्हणतसे ॥२१॥

मागुती म्हणे तियेसी । पूजिता फळ काय यासी ।
कैकया सांगे पुत्रासी । कैलासपद पाविजे ॥२२॥

रावण म्हणे मातेसी । कैलास आणुनी तुजपासी ।
देईन हे निश्चयेसी । सायास का वो करित्येसी ॥२३॥

ऐसे बोले तो रावण । मातेसवे करी पण ।
आणीन त्वरित उमारमण । कैलासासहित लंकेसी ॥२४॥

पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी । मृत्तिकालिंग का करिसी ।
म्हणोनि निघाला त्वरितेसी । मनोवेगे निशाचर ॥२५॥

पावला त्वरे शिवपुरासी । शुभ्र रम्य पर्वतासी ।
धरोनि हालवीक्रोधेसी । वीस बाहु भुजाबळे ॥२६॥

आंदोळले कैलासभुवन । उपटीतसे तो रावण ।
दाही शिरे टेकून । उचलीन म्हणे उल्हासे ॥२७॥

शिर लावून पर्वतासी । कर टेकून मांडीसी ।
उचलिता झाला प्राणेसी । सप्तपाताळ आंदोळले ॥२८॥

फणा चुकवी शेष आपण । कूर्म भ्याला कांपोन ।
भयचकित देवगण । अमरपुर कांपतसे ॥२९॥

कंप झाला स्वर्गभुवन । सत्यलोक विष्णुभुवन ।
येरू पडतसे गडबडोन । म्हणती प्रळय मांडला ॥३०॥

कैलासपुरीचे देवगण । भयाभीत झाले कंपायमान ।
भयाभीत गिरिजा आप । होऊनि गेली शिवापासी ॥३१॥

पार्वती विनवी शिवासी । काय झाले कैलासासी ।
आंदोळतसे सभेसी । पडो पहात निर्धारे ॥३२॥

नगरात झाला आकान्त । बैसलेती तुम्ही स्वस्थ ।
करा प्रतिकार त्वरित । म्हणोनि चरणां लागली ॥३३॥

ईश्वर म्हणे गिरिजेसी । न करी चिंता मानसी ।
रावण माझा भक्त परियेसी । खेळतसे भक्तीने ॥३४॥

ऐसे वचन ऐकोनि । विनवी गिरिजा नमोनि ।
रक्ष रक्ष शूलपाणी । समस्त देवगणाते ॥३५॥

ऐकोनि उमेची विनंती । शंकरे चेपिला वामहस्ती ।
दाही शिरे भुजांसहिती । दडपलासे गिरीच्या तळी ॥३६॥

चिंता करी मनी बहुत । शिव शिव ऐसे उच्चारित ।
ध्यातसे स्तोत्र करीत । शरणागता रक्ष म्हणोनि ॥३७॥

त्राहि त्राहि पिनाकपाणी । जगद्रक्षकशिरोमणी ।
शरण आलो तुझे चरणी । मरण कैचे भक्तासी ॥३८॥

शंकर भोळा चक्रवर्ती । ऐकोनि त्याची विनंती ।
चेपिले होते वामहस्ती । काढिले त्वरित कृपेने ॥३९॥

सुटला तेथूनि लंकेश्वर । स्तोत्र करीतसे अपार ।
स्वशिरे छदोनि परिकरे । तंतु लाविले निज अंत्रे ॥४०॥

वेद सहस्त्र एकवचनी । वर्णक्रमादि विस्तारोनि ।
सामवेद अतिगायनी । समस्त रागे गातसे ॥४१॥

गण रसस्वरयुक्त । गायन करि लंकानाथ ।
तयांची नामे विख्यात । सांगेन ऐका एकचित्ते ॥४२॥

आठही गण प्रख्यात । उच्चारीतसे लंकानाथ ।
मगण ब्राह्मण प्रख्यात । नगण क्षत्री विशेष ॥४३॥

भगण वैश्य ध्यानेसी । तगण शूद्रवर्णेसी ।
जगण दैत्य परियेसी । रगण प्रत्यक्ष च्यूतगुणे ॥४४॥

सगण तुरंगरूपेसी । यगण शुद्ध परियेसी ।
विस्तारित गायनेसी । लंकापति रावण ॥४५॥

गायन करीत नवरसेसी । नांवे सांगेन परियेसी ।
शांत भयानक अद्‌भुतेसी । शृंगार हास्य करुणरसे ॥४६॥

रौद्र वीर बीभत्सेसी । गायन करी अति उल्हासी ।
वेणू वाजवी सप्तस्वरेसी । ध्यानपूर्वक विधीने ॥४७॥

जंबुद्वीप वास ज्यासी । षड्‌जस्वर नाम परियेसी ।
कंठीहूनि उपज ज्यासी । मयूरस्वर आलापित ॥४८॥

उत्तमवंशी उपज ज्यासी । गीर्वाणकुळी ब्रह्मवंशी ।
पद्मपत्र वर्ण परियेसी । वन्हि देवता शृंगार रसे ॥४९॥

द्वितीय स्वर ऋषभासी । जन्म प्लक्ष द्वीपासी ।
उपज ह्रदयस्थानेसी । चाषस्वर आलापित ॥५०॥

प्रख्यात जन्म क्षत्रवंशी । विराजवर्ण यमदेवतेसी ।
क्रीडा अद्‌भुत रस ऐसी । वीणा वाजवी रावण ॥५१॥

तृतीय स्वर गांधारेसी । गायन करी रावण परियेसी ।
कुशद्वीप वास ज्यासी । नासिकस्थान अवधारा ॥५२॥

अजस्वर आलापत्यासी । गीर्वाण कुल वैश्यवंशी ।
सुवर्णवर्ण कांतीसी । चंद्रदेवता अद्‌भुत रसे ॥५३॥

मध्यम स्वर चातुर्थक । क्रौचद्वीप वास ऐक ।
उरस्थान उक्त उच्चारी मुखे । क्रौचस्वरे आलापित ॥५४॥

गीर्वाणकुळ ब्रह्मवंश । कुंदवर्ण रूप सुरस ।
ध्यान करी लंकाधीश । लक्ष्मी देवता करुणा रस ॥५५॥

शाल्मली द्वीप भूमीसी । जन्म पंचमस्वरासी ।
कंठी उपजोनि नादासी । कोकिळास्वरे गातसे ॥५६॥

ध्यान करी तया स्वरासी । उपज झाला पितृवंशी ।
कृष्णवर्ण रूप त्यासी । गणनाथ देव हास्यरसे ॥५७॥

श्‍वेतद्वीप जन्म ख्यात । स्वर असे नाम धैवत ।
ललाट स्थान नाद व्यक्त । दर्दुरस्वरे आलापी देखा ॥५८॥

ऐसा धैवत स्वरासी । बीभत्स रस अतिउल्हासी ।
गाय रावण परियेसी । ईश्वराप्रती भक्तीने ॥५९॥

पुष्कर द्वीप उपजे त्यासी । निषाद स्वर नाम परियेसी ।
उत्पत्ति तालव्य संधीसी । हस्तिस्वरे गातसे ॥६०॥

असुरवंश वैश्यकुळी । कल्प शुद्ध वर्ण पाटली ।
तुंबर मुनि देवता जवळी । सूर्य देवता अवधारी ॥६१॥

भयानक रस देखा । चर्ची व्याकुळ असे निका ।
येणेपरी सप्त स्वरिका । गायन करी लंकानाथ ॥६२॥

रागसहितरागिणीसी । गायन करी सामवेदासी ।
श्रीरागादि वसंतासी । आलाप करी दशशिर ॥६३॥

भैरवादि पंचमरागी । नटनारायण मेघरागी ।
गायन करी अभ्यासयोगी । लंकानाथ शिवाप्रति ॥६४॥

गौडी कोल्हाळ आंधळी । द्राविडरागी कौशिकमाळी ।
देवगांधार आनंदलिळी । गायन करी लंकानाथ ॥६५॥

धनाश्रिया वराडीसी । रामकलि मंजिरेंसी ।
गौडकी दशाक्षी हारिसी । गायन करी लंकेश्वर ॥६६॥

भैरवी गुर्जरीसहित । वेळावली राग ललित ।
कर्नाटकी हंसयुक्त । गायन करी दशशिर ॥६७॥

त्राटकी मोटकि देखा । टंकाक्षी सुधा नाटका ।
सैधवा माळाकी ऐका । गायन करी लंकानाथ ॥६८॥

बंगाली राग सोरटीसी । कामबोध मधुमाधवीसी ।
देवाक्रिया भूपाळीसी । गायन करी दशानन ॥६९॥

रागवल्लभ माधुरीसी । राव्हेरी राग हर्षी ।
विहंगदात्री चंडीसी । वसवीजादि रागाने ॥७०॥

शिर कापून आपुले देखा । यंत्र केले करकमळिका ।
शिरा काढून तंतुका । रावणेश्वर गातसे ॥७१॥

समयासमयी आलापन । करी दशशिर आपण ।
प्रातःकाळी करी गायन । अष्टराग परियेसा ॥७२॥

मध्यमराग वेळोवेळी । दशांकभैरव करी भूपाळी ।
मल्हार धनाश्री बंगाली । प्रातःकाळी गातसे ॥७३॥

बराडी ललिता गुर्जरासी । गौडक्री आहिरी कौशिकेसी ।
माध्याह्नसमयी गायनासी । रावण करी परियेसा ॥७४॥

कुरंजी तोडी मालश्रियेसी । दशांक पंचम परियेसी ।
अपराह्न वेळ अतिहर्षी । ईश्वराप्रती गातसे ॥७५॥

चारी प्रकार गौडियेसी । रामकली श्रीरागासी ।
देवकीपट मंजिरेसी । वसंतुरागे ऋतुकाळी ॥७६॥

ऐसे छत्तीस रागेसी । गायन करी सामवेदासी ।
निर्वाणरूप भक्तीसी । चंद्रमौळी सांबाचिये ॥७७॥

रावणाचे भक्तीसी । प्रसन्न ईश्वर त्वरितेसी ।
निजरूप अतिहर्षी । उभा राहिला सन्मुख ॥७८॥

पंचवक्त्र त्रिनेत्रेसी । उभा राहोनि संतोषी ।
काय इच्छा तुझे मानसी । माग वर म्हणतसे ॥७९॥

म्हणे रावण शिवासी । काय मागावे तुजपासी ।
लक्ष्मी माझे घरची दासी । आठ निधि माझे घरी ॥८०॥

चतुरानन माझा जाशी । तेहेतीस कोटी देव हर्षी ।
सेवा करिती अहर्निशी । सूर्य चंद्र वरुण वायु ॥८१॥

अग्नि सारिखा सेवा करी । वस्त्रे धूत अतिकुसरी ।
यम माझा आज्ञाधारी । निरोपावेगळा न मारी कवणा ॥८२॥

इंद्रजितासारिखा पुत्र । कुंभकर्णाऐसा भ्रात्र ।
स्थान समुद्रामाजी पवित्र । कामधेनु माझे घरी ॥८३॥

सहस्त्र कोटी आयुष्य मज । हे सांगणे नलगे तुज ।
आलो असे जे काज । कैलास नेईन लंकेसी ॥८४॥

व्रत असे जननीसी । नित्य पुजन तुम्हांसी ।
मनोरथ पुरवावे भक्तीसी । कृपासिंधु दातारा ॥८५॥

ईश्वर म्हणे रावणासी । जरी चाड असे पूजेसी ।
काय करिसी कैलासासी । आत्मलिंग तुज देतो आता ॥८६॥

जे जे मनीची वासना । पुरेल त्वरित ऐक जाणा ।
लिंग असे प्राण आपणा । म्हणोनि दिधले रावणासी ॥८७॥

पूजा करी वेळ तिन्ही । अष्टोत्तर शत जप करोनि ।
रुद्राभिषेके अभिषेकोनि । पूजा करावी एकचित्ते ॥८८॥

वर्षे तीन जे पूजिती । तेचि माझे स्वरूप ओती ।
जे जे मनी इच्छिती । ते ते पावती अवधारा ॥८९॥

हे लिंग असे जयापासी । मृत्यु नाही गा परियेसी ।
दर्शनमात्रे महादोषी । उद्धरतील अवधारा ॥९०॥

ठेवू नको भूमीवरी । जोवरी पावे तुझी नगरी ।
वर्षे तीन पूजा करी । तूचि ईश्वर होशील ॥९१॥

वर लाधोनि लंकेश्वर । निरोप देत कर्पूरगौर ।
करूनि साष्टांग नमस्कार । निघाला त्वरित लंकेसी ॥९२॥

इतुका होता अवसर । नारद होता ऋषीश्वर ।
निघोनि गेला वेगे सत्वर । अमरपुरा इंद्रभुवना ॥९३॥

नारद म्हणे इंद्रासी । काय स्वस्थ चित्ते बैसलासी ।
अमरत्व दिधले रावणासी । लक्ष्मी गेली आजि तुमची ॥९४॥

चिरायु झाला लंकेश्वर । प्राणलिंग देत कर्पूरगौर ।
आणिक दिधला असे वर । तूचि ईश्वर होशील ॥९५॥

वर्षे तीन पूजिलियासी । तूचि माझे स्वरूप होसी ।
तुझे नगर कैलासी । मृत्यु नाही कदा तुज ॥९६॥

ऐसा वर लाधोनि । गेला रावण संतोषोनि ।
तेहेतीस कोटी देव कोठूनि । सुटती आता तुम्हासी ॥९७॥

जावे त्वरित तुम्ही आता । सेवा करावी लंकानाथ ।
उर्वशी रंभा मेनका । त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ॥९८॥

ऐसे वचन ऐकोनि । इंद्र भयभीत मनी ।
नारदा विनवी कर जोडूनि । काय करावे म्हणतसे ॥९९॥

नारद म्हणे इंद्रासी । उपाय काय त्वरितेसी ।
जावे तुम्ही ब्रह्मयासी । तयासी उपाय करील ॥१००॥

इंद्र नारदासमवेत । गेले ब्रह्मलोका त्वरित ।
विस्तारोनिया वृत्तान्त । सांगे इंद्र ब्रह्मयासी ॥१०१॥

ब्रह्मा म्हणे इंद्रासी । जावे त्वरित वैकुंठासी ।
दैत्येवरी ह्रषीकेशी । उपाय करील निर्धारे ॥२॥

म्हणोनि निघाले तिघेजण । पावले त्वरित वैकुंठभुवन ।
भेटला तत्काळ नारायण । सांगती वृत्तान्त रावणाचा ॥३॥

विरिंचि म्हणे विष्णूसी । प्रतिकार करावा वेगेसी ।
कारण असे तुम्हांसी । राम-अवतारी परियेसा ॥४॥

तेहतीस कोटी देवांसी । घातले असे बंदीसी ।
याचि कारणे तुम्हांसी । करणे असे अवधारा ॥५॥

ईश्वराचे प्राणलिंग । घेऊनि गेला राक्षस चांग ।
आता रावणा नाही भंग । तोचि होईल ईश्वर ॥६॥

त्वरित उपाय करावा यासी । पुढे जड होईल तुम्हांसी ।
निर्दाळावया राक्षसांसी । अवतरोनि तुम्हीच यावे ॥७॥

ऐसे विनवी चतुरानन । मग कोपोन नारायण ।
कार्य नासेल म्हणोन । निघाला झडकर कैलासा ॥८॥

विष्णु आला ईश्वरापाशी । म्हणे शंकरा परियेसी ।
प्राणलिंग रावणासी । द्यावया कारण तुम्हां काय ॥९॥

रावण क्रूर महादैत्य । सुरवर सकळ त्याचे भृत्य ।
कारागृही असती समस्त । केवी सुटती सांग आम्हा ॥११०॥

ऐसे दुराचारियासी । वर देता उल्हासी ।
देवत्व गेले त्याचे घरासी । घेईल स्वर्ग निर्धारे तो ॥११॥

ईश्वर म्हणे विष्णुसी । तुष्टलो तयाचे भक्तीसी ।
विसर पडला आम्हांसी । संतोषे दिधले प्राणलिंग ॥१२॥

आपले शिर छेदोनि देखा । वीणा केला स्वहस्तका ।
सप्तस्वर वेदादिका । गायन केले संतोषे ॥१३॥

जरी मागता पार्वतीसी । देतो सत्य परियेसी ।
भुली पडली भक्तीसी । लिंग नेले प्राण माझा ॥१४॥

विष्णु म्हणे उमाकांता । तुम्ही ऐसा वर देतां ।
आम्हां सायास होय तत्त्वतां । दैत्य उन्मत्त होताती ॥१५॥

देवद्विज लोकांसी । पीडा करिती बहुवशी ।
कारणे आम्हांसी । अवतार धरणे घडते देखा ॥१६॥

कधी दिले लिंग त्यासी । नेले असेल लंकेसी ।
शंकर म्हणे विष्णुसी । पांच घटी झाल्या आता ॥१७॥

ऐकताच शिववचन । उपाय करी नारायण ।
धाडिले चक्र सुदर्शन । सूर्याआड व्हावया ॥१८॥

बोलावूनि नारदासी । सांगतसे ह्रषीकेशी ।
तुम्ही जावे त्वरितेसी । रावण जातो लंकेसी देखा ॥१९॥

मार्गी जाऊनि तयासी । विलंब करावा परियेसी ।
जाऊ न द्यावे लंकेसी । त्वरित जावे म्हणतसे ॥१२०॥

चक्र झाले सूर्याआड । स्नानसंध्या रावणा चाड ।
तुम्ही जाऊनिया दृढ । विलंब करावा तयासी ॥२१॥

ऐकोनिया श्रीविष्णूच्या बोला । नारद त्वरित निघोन गेला ।
मनोवेगे पावला । जेथे होता लंकानाथ ॥२२॥

नारदाते पाठवूनि । विष्णू विचारी आपुल्या मनी ।
गणेशासी बोलावूनि । पाठवू म्हणे विघ्नासी ॥२३॥

बोलावूनि गणेशासी । सांगे विष्णु परियेसी ।
कैसा रावण तुजसी । सदा उपेक्षितो ॥२४॥

सकळ देव तुज वंदिती । त्याचे मनोरथ पुरती ।
तुज जे का उपेक्षिती । विघ्ने बाधती तयांसी ॥२५॥

तुज नेणतां रावण देखा । घेऊनि गेला निधान ऐका ।
प्राण लिंगा अतिविशेखा । नेले शिवाजवळूनि ॥२६॥

आता त्वा करावे एक । रावणापाशी जाऊनि देख ।
कपटरुपे कुब्जक । बाळवेष धरोनिया ॥२७॥

वाटेसि होईल अस्तमान । रावण करील संध्यावंदन ।
नारद गेला याचि कारण । विलंब करावया दैत्यासी ॥२८॥

आज्ञा शिवाची रावणासी । न ठेवी लिंग भूमीसी ।
शौचाचमनसमयासी । आपणाजवळी न ठेविजे ॥२९॥

बाळवेषे तुवा जावे । शिष्यरूप करुणाभावे ।
सूक्ष्मरूप दाखवावे । लिंग घ्यावे विश्वासुनी ॥३०॥

संध्यासमयी तुझे हाती । लिंग देईल विश्वासरीती ।
तुवा ठेवावे तत्काळ क्षिती । लिंग राहील तेथेची ॥३१॥

येणेपरी गणेशासी । शिकवी विष्णु परियेसी।
संतोषोनि हर्षी । भातुके मागे तये वेळी ॥३२॥

लाडू तिळव पंचखाद्य । इक्षु खोबरे दालिम आद्य ।
शर्करा घृत क्षीर सद्य । द्यावे त्वरित आपणासी ॥३३॥

चणे भिजवून आपणासी । तांदूळ लाह्या साखएसी ।
त्वरित भक्षण करावयासी । द्यावे स्वामी म्हणतसे ॥३४॥

जे जे मागितले विघ्नेश्वरे । त्वरित दिधले शार्ङ्गधरे ।
भक्षित निघाला वेगवक्त्रे । ब्रह्मचारीवेष धरूनि ॥३५॥

गेला होता नारद पुढे । ब्रह्मऋषि महात्म्य गाढे ।
उभा ठाकला रावणापुढे । कवण कोठूनि आलासी ॥३६॥

रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी ।
केले उत्कृष्ट तपासी । तोषविले तया शिवा ॥३७॥

तेणे प्रसन्न होऊनि आम्हांसी । लिंग दिधले परियेसी ।
आणिक सांगितले संतोषी । लिंग महिमा अपार ॥३८॥

नारद म्हणे लंकानाथा । दैव थोर तुझे आता ।
लिंग लाधलासी अद्‌भुता । जाणो आम्ही आद्यंत ॥३९॥

दाखवी लिंग आम्हांसी । खुणे ओळखू परियेसी ।
लिंगलक्षण विस्तारेसी । सांगू आम्ही तुजलागी ॥१४०॥

नारदाचिया वचनासी । न करी विश्वास परियेसी ।
दाखवीतसे दुरोनि लिंगासी । व्यक्त करोनि त्या समयी ॥४१॥

नारद म्हणे लंकेशा । लिंग महिमेचा प्रकार ऐसा ।
सांगेन तुज बहु सुरसा । बैसोनि ऐके स्वस्थ चित्ते ॥४२॥

लिंग उपजले कवणे दिवशी । पूर्वी जाणिले तयासी ।
एकचित्ते परियेसी । कथा असे अतिपूर्व ॥४३॥

गिळूनि सकळ सौरभासी । मृग एक काळाग्निसमेसी ।
ब्रह्मांडखंड परियेसी । पडिला होता तो मृग ॥४४॥

ब्रह्माविष्णु महेश्वरांसी । गेले होते पारधियेसी ।
मृग मारिले परियेसी । भक्षिले मेद तये वेळी ॥४५॥

तयासी होती तीन शृंगे । खाली असती तीन लिंगे ।
तिघी घेतली तीन भागे । प्राणलिंगे परियेसा ॥४६॥

लिंगमहिमा ऐक कानी । जे पूजिती वर्षे तिनी ।
तेचि ईश्वर होती निर्गुणी । वेदमूर्ति तेचि होय ॥४७॥

लिंग असे जये स्थानी । तोचि कैलास जाण मनी ।
महत्त्व असे याच गुणी । ब्रह्माविष्णुमहेश्वरांसी ॥४८॥

असे आणिक एक बरवे । सांगेन ऐक एकभावे ।
रावण म्हणे आम्हा जाणे । असे त्वरित लंकेसी ॥४९॥

म्हणोनि निघाला महाबळी । नारद म्हणे तये वेळी ।
सूर्यास्त आहे जवळी । संध्याकाळ ब्राह्मणासी ॥१५०॥

सहस्त्रवेद आचरसी । संध्याकाळी मार्ग क्रमिसी ।
वाटेस होईल तुज निशी । संध्यालोप होईल ॥५१॥

आम्ही जाऊ संध्यावंदनासी । म्हणोनि नारद विनयेसी ।
पुसोनिया रावणासी । गेला नदीतीरा ॥५२॥

इतुकिया अवसरी । पातला गणेश ब्रह्मचारी ।
रावणापुढे चाचरी । समिधा तोडी कौतुके ॥५३॥

रावण चिंती मानसी । व्रतभंग होईल आपणासी ।
संध्या करावी त्रिकाळेसी । संदेह घडला म्हणतसे ॥५४॥

ईश्वरे सांगितले आम्हांसी । लिंग न ठेवावे भुमीसी ।
संध्यासमयो झाली निशी । काय करू म्हणतसे ॥५५॥

तव देखिला ब्रह्मचारी । अति सुंदर बाळकापरी ।
हिंडतसे नदीतीरी । देखिला रावणे तये वेळी ॥५६॥

मनी विचारी लंकानाथ । ब्रह्मचारी कुमार दिसत ।
न करी आमुचा विश्वासघात । लिंग देऊ तया हाती ॥५७॥

संध्या करू स्वस्थचित्तेसी । लिंग असेल तयापाशी ।
बाळक असे हे निश्चयेसी । म्हणोनि गेला तया जवळी ॥५८॥

देखोनिया दशशिर । पळतसे लंबोदर ।
रावण झाला द्विजवर । अभय देऊनि गेला जवळी ॥५९॥

रावण म्हणे तयासी । तू कवण बा सांग आम्हांसी ।
मातापिता कवण तुजसी । कवण कुळी जन्म तुझा ॥१६०॥

ब्रह्मचारी म्हणे रावणा । इतुके पुससी कवण्या कारणा ।
आमुच्या बापे तुझ्या ऋणा । काय द्यावे सांग मज ॥६१॥

हासोनिया लंकेश्वर । लोभे धरिला त्याचा कर ।
सांग बाळका कवणाचा कुमर । प्रीतीभावे पुसतो मी ॥६२॥

ब्रह्मचारी म्हणे रावणासी । आमुचा पिता काय पुससी ।
जटाधारी भस्मांगासी । रुद्राक्ष माळा असती देखा ॥६३॥

शंकर म्हणती तयाशी । भिक्षा मागणे अहर्निशी ।
वृषारूढ उमा सरसी । जननी ते जगन्माता ॥६४॥

इतुके आम्हांसी पुसतोसी । तुज देखता भय मानसी ।
बहुत वाटे परियेसी । सोड हात जाऊ दे ॥६५॥

रावण म्हणे ब्रह्मचारी । तव पिता असे दरिद्री ।
भिक्षा मागे घरोघरी । सौख्य तुज काही नसे ॥६६॥

आमुचे नगर लंकापूर । रत्‍नखचित असे सुंदर ।
आम्हांसवे चाल सत्वर । देवपूजा करीत जाई ॥६७॥

जे जे मागसी आम्हांसी । सकळ देईन परियेसी ।
सुखे रहावे मजपाशी । म्हणे रावण तये वेळी ॥६८॥

ब्रह्मचारी म्हणे त्यासी । लंकेसी बहुत राक्षसी ।
आम्ही बाळक अरण्यवासी । खातील तेथे जातांची ॥६९॥

न येऊ तुझिया नगरासी । सोड जाऊं दे घरासी ।
क्षुधे पीडतो बहुवसी । म्हणोनि भक्षितो भातुके ॥१७०॥

इतुके ऐकोनि लंकानाथ । त्या बाळका संबोधित ।
लिंग धरी ऐसे म्हणत । मी संध्या करीन तोवरी ॥७१॥

बाळक विनवी तयासी । न धरी लिंग परियेसी ।
मी ब्रह्मचारी अरण्यवासी । उपद्रवू नको म्हणतसे ॥७२॥

तव लिंग असे जड । मी पण बाळ असे वेड ।
न घे लिंग जाऊ दे सोड । धर्म घडेल तुजलागी ॥७३॥

नानापरी संबोधित । लिंग देत लंकानाथ ।
संध्या करावया आपण त्वरित । समुद्रतीरी बैसला ॥७४॥

ब्रह्मचारी तयासी । उभा विनवीतसे रावणासी ।
जड झालिया आपणासी । ठेवीन त्वरित भूमीवरी ॥७५॥

वेळ तीन परियेसी । बोलवीन तुम्हांसी ।
वेळ लागलिया परियेसी । आपण ठेवीन भूमीवरी ॥७६॥

ऐसा निर्धार करोनि । उभा गणेश लिंग घेऊनि ।
समस्त देव विमानी । बैसोनि पाहती कौतुके ॥७७॥

अर्घ्यसमयी रावणासी । बोलवी गणेश परियेसी ।
जड झाले लिंग आम्हांसी । सत्वर घे गा म्हणतसे ॥७८॥

न्यासपूर्वक अर्घ्य देखा । रावण करी अति विवेका ।
हाता दाखवी बाळका । येतो राहे म्हणोनि ॥७९॥

आणिक क्षणभर राहोनि । गणेश बोले वेळ दोनी ।
जड झाले म्हणोनि । शीघ्र यावे म्हणतसे ॥८०॥

न ये रावण ध्यानस्थ । गणेश असे विचारीत ।
समस्त देवांते साक्षी करीत । लिंग ठेवीत भूमीवरी ॥८१॥

श्रीविष्णूते स्मरोनि । लिंग ठेविले स्थापोनि ।
संतोष जाहला गगनी । पुष्पे वर्षती सुरवर ॥८२॥

अर्घ्य देवोनी लंकेश्वर । निघोनि आला सत्वर ।
लिंग देखिले भूमीवर । मनी विकळ जाहला ॥८३॥

आवेशोनि रावण देखा । ठोसे मारी गणनायका ।
हास्यवदन रडे तो ऐका । भूमीवरी लोळतसे ॥८४॥

म्हणे माझिया पित्यासी । सांगेन आता त्वरितेसी ।
का मारिले मज बाळकासी । म्हणोनि रडत निघाला देखा ॥८५॥

मग रावण काय करी । लिंग धरोनिया दृढ करी ।
उचलू गेला नानापरी । भूमीसहित हालतसे ॥८६॥

कापे धरणि तये वेळी । रावण उचली महाबळी ।
न ये लिंग शिर आफळी । महाबळी राहिला ॥८७॥

नाम पाविला याचि कारणे । महाबळेश्वर लिंग जाणे ।
मुरडोनि ओढिता रावणे । गोकर्णाकार जाहले ॥८८॥

ऐसे करिता लंकानाथ । मागुती गेला तपार्थ ।
ख्याती झाली गोकर्णांत । समस्त देव तेथे आले ॥८९॥

आणिक असे अपार महिमा । सांगतसे अनुपमा ।
स्कंदपुराण वर्णिली सीमा । प्रख्याद असे परियेसा ॥१९०॥

ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक संतोषोन ।
पुनरपि चरणा लागे जाण । म्हणे सरस्वती गंगाधरू ॥१९१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमा वर्णनं नाम षष्ठोऽध्यायः॥६॥

॥ ओवीसंख्या ॥१९१॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरूचरित्र – अध्याय सातवा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा आम्हांसी ।
निरोपिजे स्वामी कृपेसी । पूर्वी कवणा साक्ष झाली ॥१॥

समस्त तीर्थ सांडुनी । श्रीपाद गेले किंकारणी ।
पूर्वी आधार केला कवणी । पुराण कथा सांगा मज ॥२॥

ज्यावरी असेल गुरूची प्रीति । तीर्थमहिमा ऐकणे चित्ती ।
वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपासिंधु गुरुराया ॥३॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी ।
सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते परियेसा ॥४॥

पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसी ।
प्रतापवंत क्षत्रियराशी । सर्वधर्मरत देखा ॥५॥

राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण ।
बलाढ्य शूर महाभीम । विद्योद्योगी दयानिधि ॥६॥

असता राजा एके दिवशी । विनोदे निघाला पारधीसी ।
प्रवेशला महावनासी । वसती शार्दूल सिंह जेथे ॥७॥

निर्मनुष्य अरण्यात । राजा पारधि खेळत ।
भेटला तेथे अद्‌भुत । दैत्य ज्वाळाकार भयानक ॥८॥

राजा देखोनि तयासी । वर्षता शर झाला कोपेसी ।
मूर्छना येऊनि धरणीसी । पडला दैत्य तया वेळी ॥९॥

होता तयाचा बंधु जवळी । आक्रंदतसे प्रबळी ।
पाषाण हाणी कपाळी । बंधुशोके करोनिया ॥१०॥

प्राण त्यजिता निशाचर । बंधूसी म्हणतसे येर ।
जरी तू होसी माझा सहोदर । सूड घेई माझा तू ॥११॥

ऐसे बोलोनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी ।
अनेक मायापाशी । नररूप धरिले तया वेळी ॥१२॥

रूप धरोनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचे ।
सेवकत्व करी राजयाचे । अतिनम्रत्वे बोलोनिया ॥१३॥

सेवा करी नानापरी । सेवकाचे सारखे मन धरी ।
कितीक दिवसांवरी । वनांतरी राजा होता देखा ॥१४॥

समस्त मृग जिंकूनि । दुष्ट जीवाते वधोनि ।
राजा आला परतोनि । आपुल्या नगरा परियेसा ॥१५॥

ऐसे असता एके दिवशी । पितृश्राद्ध आले परियेसी ।
आमंत्रण सांगे ऋषींसी । वसिष्ठादिका परियेसा ॥१६॥

ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक । करवीतसे सविवेक ।
कापट्ये होता तो सेवक । तया स्थानी ठेविला ॥१७॥

राजा म्हणे तयासी । पाकस्थानी तू वससी ।
जे जे मागेल भाणवसी । सर्व आणूनि त्वा द्यावे ॥१८॥

अंगिकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख ।
कापट्यभावे करवी पाक । केली शाक तया वेळी ॥१९॥

ठाय घालिता ऋषेश्वरांसी । पहिलेच वाढिले नरमांसासी ।
पाहता कोप आला वसिष्ठासी । दिधला शाप तये वेळी ॥२०॥

वसिष्ठ म्हणे रायासी । नरमांस वाढिले आम्हांसी ।
त्वरित ब्रह्मराक्षस होसी । म्हणोनि शाप दिधला ॥२१॥

शाप देता तये काळी । राजा कोपला तात्काळी ।
अपराध नसता प्रबळी । वाया मज का शापिले ॥२२॥

नेणे मांसपाक कोणी केला । माझा निरोप नाही झाला ।
वृथा आमुते शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥२३॥

उदक घेऊनि अंजुळी । शापावया सिद्ध झाला तये काळी ।
तव राजपत्‍नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते ॥२४॥

पतीसी म्हणे ते नारी । गुरूसी शापिता दोष भारी ।
वंदुनी तयाचे चरण धरी । तेणे भवसागर तरशील ॥२५॥

मदयंती सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण ।
अंजुळीचे उदक जाण । टाकी आपुले चरणावरी ॥२६॥

शाप देता कल्मषपाणी । पडले राजाचे चरणी ।
कल्मषपाद नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥२७॥

राजपत्‍नी येऊनि परियेसी । लागली वसिष्ठचरणांसी ।
उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय काज ॥२८॥

करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि ।
वर्षे बारा क्रमोनि । पुनरपि राजा होशील ॥२९॥

उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले स्थानासी ।
ब्रह्मराक्षस राजा परियेसी । होऊनी गेला वनांतरा ॥३०॥

निर्मनुष्य अरण्यात । राजा राहिला प्रख्यात ।
भक्षीतसे अनेक जंत । पशुमनुष्य आदिकरूनि ॥३१॥

ऐसे क्रमिता तये वनी । मार्गस्थ दंपत्ये दोनी ।
ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी । देखिला राक्षस भयासुर ॥३२॥

येऊनि धरी ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी ।
घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री समागमे ॥३३॥

अतिशोक करी ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसचरणी ।
राखे मजला अहेवपणी । प्राणेश्वराते सोडी पितया ॥३४॥

न भक्षी गा माझा पति ।माझी तयावरी अतिप्रीति ।
मज भक्षी गा म्हणे सुमति । वल्लभाते सोडोनिया ॥३५॥

पतीविण राहता नारी । जन्म वृथाचि दगडापरी ।
पहिले माते स्वीकारी । प्राण राखे पतीचे ॥३६॥

पति लावण्य पूर्ववयेसी । वेदशास्त्रपारंगेसी ।
याचा प्राण जरी तू रक्षिसी । जगी होईल तुज पुण्य ॥३७॥

कृपा करी गा आम्हावरी । होईन तुझी कन्या कुमारी ।
मज पुत्र होतील जरी । नाम वाढवीन तुझे मी ॥३८॥

ऐसे नानापरी देखा । विप्रस्त्री करी महादुःखा ।
बोल न मानोनि राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥३९॥

पतीते भक्षिले देखोनि । शाप वदली ते ब्राह्मणी ।
म्हणे राक्षसा ऐक कानी । शाप माझा निर्धारे ॥४०॥

तू राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी ।
पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनि ॥४१॥

परि रमता स्त्रियेसवे । प्राण जाईल स्वभावे ।
अनाथा भक्षिले दुष्ट भावे । दुरात्म्या तू राक्षसा ॥४२॥

शाप देऊनि तया वेळी । पतीच्या अस्थि मिलवूनि जवळी ।
काष्ठे घालोनिया प्रबळी । अग्निप्रवेश केला तिने ॥४३॥

ऐसे असता राव देखा । क्रमी बारा वर्षे निका ।
पुनरपि राजा होऊन ऐका । आला आपुले नगरासी ॥४४॥

विप्रस्त्रियेचे शापवचन । स्त्रियेसी सांगितली खूण ।
म्हणे संग करिता तत्क्ष्ण । मृत्यु असे आपणासी ॥४५॥

ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण ।
मन करूनि निर्वाण । त्यजावया प्राण पहातसे ॥४६॥

मदयंती म्हणे रायासी । संतान नाही तुमचे वंशासी ।
वनी कष्टला बारा वर्षी । आपुले कर्म न चुकेची ॥४७॥

ऐकोनि सतीचे वचन । शोके दाटला अतिगहन ।
अश्रु आले नेत्रांतून । काय करू म्हणतसे ॥४८॥

मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविले परियेसी ।
ब्रह्महत्या घडली आम्हांसी । विमोचन होय कवणेपरी ॥४९॥

मंत्रीवृद्धपुरोहित । तयासी म्हणती ऐका मात ।
तीथे आचरावी समस्त । तेणे पुनीत व्हाल तुम्ही ॥५०॥

करोनि ऐसा विचार । राजा निघे तीर्था साचार ।
सर्व तीर्थपरिकर । विधिपूर्वक करीतसे ॥५१॥

ज्या ज्या तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण ।
यज्ञादिक कर्म अन्नदान । ब्राह्मणादिका देतसे ॥५२॥

ऐसी नाना तीर्थे करीत । परी ब्रह्महत्या सवेचि येत ।
अघोररूपी असे दिसत । कवणेपरी न जायची ॥५३॥

कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभीतरी ।
हिंडत पातला मिथिलापुरी । चिंताग्रस्त होवोनिया ॥५४॥

नगरा-बाह्यप्रदेशी । श्रमोनि राजा परियेसी ।
चिंता करी मानसी । वृक्षच्छाये बैसलासे ॥५५॥

ऋषेश्वरासमवेत । जैसा रुद्र प्रकाशित ।
गौतम ऋषि अवचित । तया स्थानासि पातला ॥५६॥

राजा देखोनि गौतमासी । चरणी लोळे संतोषी ।
नमन करी साष्टांगेसी । भक्तिभावे करोनिया ॥५७॥

आश्वासूनि तये वेळी । गौतम पुसे करुणाबहाळी ।
क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृत्तान्त ॥५८॥

काय झाले तुझे राज्य । अरण्यवासाचे काय काज ।
चिंताकुलित मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥५९॥

ऐकोनि ऋषीचे वचन । राजा सांगे विस्तारोन ।
शाप जाहला ब्रह्मवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥६०॥

प्रायश्चित्ते सकळिक । यज्ञादि कर्मे धर्मादिक ।
सुक्षेत्रे अपार तीर्थे देख । आपण सकळ आचरली ॥६१॥

शमन न होय महादोष । सवेचि येत अघोर वेष ।
व्रते आचरलो कोटीश । न जाय दोष सर्वथा ॥६२॥

आजिचेनि माझे सफळ जनन । दर्शन झाले जी तुमचे चरण ।
होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणा लागलो ॥६३॥

ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण ।
म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥६४॥

तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषी ।
महापातक संहारावयासी । गोकर्ण क्षेत्र असे भले ॥६५॥

स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी ।
तेथे ईश्वर सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥६६॥

जैसे कैलासाचे शिखर । अथवा स्वर्धुनीमंदिर ।
निश्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥६७॥

जैसी अंधकाररजनी । प्रकाशावया जेवी अग्नि ।
चंद्रोदय जरि होय निर्वाणी । तरी सूर्यप्रकाशावीण गति नव्हे ॥६८॥

तैसे समस्त तीर्थाने । पाप नच जाय याचि कारणे ।
सूर्योदयी तमहरणे । तैसे गोकर्णदर्शने होय ॥६९॥

सहस्त्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असती या शरीरी ।
प्रवेश होता गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥७०॥

रुद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका ।
तप केले हो सकळिका । कार्यसिद्धि होय त्यांप्रती ॥७१॥

भक्तिपूर्वक तया स्थानी । जप व्रत करिती जाणोनि ।
फळ होय त्या लक्षगुणी । असे पुण्यक्षेत्र असे ॥७२॥

जैसे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवा सकळिका ।
साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगू ॥७३॥

जाणा तो साक्षात्‌ ईश्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर ।
प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर । विष्णुनिरोपे विनयार्थ ॥७४॥

समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्री वास करिती ।
ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्वेदेवे मरुद्‍गण ॥७५॥

चंद्र सूर्य वस्वादिक । पूर्वद्वारी राहिले ऐक ।
प्रीति करी भक्तिपूर्वक । बैसले असती तये स्थाना ॥७६॥

अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पितृदैवत ।
दक्षिणद्वारी वास करीत । संतोषे राहिले असती ॥७७॥

वरुणासहित गंगा सकळी । राहती पश्चिमद्वारस्थळी ।
प्रीति करी चंद्रमौळी । तया सकळां परियेसा ॥७८॥

कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी ।
उत्तरवास त्रिकाळी । पूजा करिती महाबळेश्वराची ॥७९॥

चित्ररथादि विश्वावसु परियेसी । चित्रसेन गंधर्व सुरसी ।
पूजा करिती सदाशिवासी । सदा वसोनि तया ठायी ॥८०॥

घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका ।
नित्य नृत्य करिती देखा । महाबळेश्वराचे सन्मुख ॥८१॥

वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्वामित्र महातापसी ।
भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथे ॥८२॥

कृतयुगी ब्रह्म-ऋषि । आचार करिती महातापसी ।
महाबळेश्वराचे भक्तीसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥८३॥

मरीचि नारद अत्रि ऋषि । दक्षादि ब्रह्म-ऋषि परियेसी ।
सनकादिक महातापसी । उपनिषदार्थ उपासिती ॥८४॥

अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्वर अजिनधारण ।
दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथे वसती ॥८५॥

त्वगस्थिमात्रशरीरेसी । अनुष्ठिती महातापसी ।
पूजा करिती भक्तीसी । चंद्रमौळीची परियेसा ॥८६॥

गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव ।
विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥

गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक ।
पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजेसी तया स्थाना ॥८८॥

नाना श्रृंगार करूनि । अनेक भूषणे विराजमानी ।
सूर्यशशी विमानी । वहनी येती वळंघोनिया ॥८९॥

स्तोत्रे गायन करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका ।
पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्वरलिंगासी ॥९०॥

जे जे इच्छिती मनकामना । पावती त्वरित निर्धारे जाणा ।
समान नाही क्षेत्र गोकर्ण । या ब्रह्मांडगोलकांत ॥९१॥

अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार ।
अग्निदेवदानवादि येर । वर लाधले सर्व तया ठायी ॥९२॥

शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळी ।
नागाते गरुड न गिळी । महाबळेश्वरदर्शने ॥९३॥

रावणादि राक्षसकुळी । कुंभकर्ण येर सकळी ।
वर लाधले ये स्थळी । बिभीषण पूजीतसे ॥९४॥

ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ ।
गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥

लिंग स्थापिती आपुले नामी । असे ख्याति तया नामी ।
वर लाधले अनेक कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥९६॥

ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका ।
आपुले नामी लिंग देखा । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥९७॥

धर्मक्षेत्रपाळादी । दुर्गादेवीशक्तिवृंदी ।
लिंग स्थापिले आपुले नामी । ज्या गोकर्णक्षेत्रात ॥९८॥

गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्य जाण ।
पदोपदी असे निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम असे ॥९९॥

सांगो किती विस्तारोन । असंख्यात तीर्थे जाण ।
पाषाण समस्त लिंग खूण । समस्त उदके जाणावी तीर्थे ॥१००॥

कृतयुगी महाबलेश्वर श्वेत । त्रेतायुगी लोहित ।
द्वापारी सुवर्णपित । कलियुगी कृष्णवर्ण जाहला ॥१॥

सप्त पाताळ खोलावोन । उभे असे लिंग आपण ।
कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्ममरूपाने ॥२॥

पश्चिम समुद्रतीरासी । गोकर्णक्षेत्रविशेषी ।
ब्रह्महत्यादि पातके नाशी । काय आश्चर्य परियेसा ॥३॥

ब्रह्महत्यादि महापापे । परदारादि षट्‍ पापे ।
दुःशील दुराचारी पापे । जाती गोकर्णदर्शने ॥५॥

दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधती ।
अंती होय तयांसी गति । गोकर्णलिंगदर्शने ॥५॥

तये स्थानी पुण्यदिवशी । जे जे अर्चिती भक्तीसी ।
तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥६॥

एखादे समयी गोकर्णासी । जाय भक्तीने मानुषी ।
पूजा करिता सदाशिवासी । शिवपद निश्चये पावे जाणा ॥७॥

आदित्य सोम बुधवारी । अमावास्यादि पर्वाभितरी ।
स्नान करूनि समुद्रतीरी । दानधर्म करावा ॥८॥

शिवपूजा व्रत हवन । जप ब्राह्मणसंतर्पण ।
किंचित्‍ करिता अनंत पुण्य । गौतम म्हणे रायासी ॥९॥

व्यतिपातादि पर्वणीसी । सूर्य-संक्रांतीचे दिवशी ।
महाप्रदोष त्रयोदशी । पूजितां पुण्य अगण्य ॥११०॥

काय सांगो त्याचा महिमा । निवाडा होय अखिल कर्मा ।
ईश्वर भोळा अनंतमहिमा । पूजनमात्रे तुष्टतसे ॥११॥

असित पक्ष माघमासी । शिवरात्री चतुर्दशीसी ।
बिल्वपत्र वाहिले यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥१२॥

ऐसे अनुपम स्थान असता । न जाती मूर्ख लोक ऐकता ।
शिवतीर्थ असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥१३॥

उपोषणादि जागरण । लिंग सन्निध गोकर्ण ।
स्वर्गासि जावया सोपान । पद्धति असे परियेसा ॥१४॥

ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जाती जन यात्रेसी ।
चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधती लोक अवधारा ॥१५॥

स्नान करूनि समस्त तीर्थी । महाबळेश्वरलिंगार्थी ।
पूजा करावी भक्त्यर्थी । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥१६॥

ऐशापरी गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी गौतमा ।
राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला ते वेळी ॥१७॥

राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान निरोपिलेसी ।
पूर्वी पावला कोण यापासी । साक्ष झाली असेल ॥१८॥

विस्तारोनि ते आम्हांसी । सांगावे स्वामी करुणेसी ।
म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्ति करोनिया ॥१९॥

म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी ।
जाणो आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥१२०॥

गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टान्त विचित्र ।
आले होते तेथे जनमात्र । यात्रारूपे करोनिया ॥२१॥

माध्याह्नकाळी आम्ही तेथे । बैसलो होतो वृक्षच्छायेते ।
दुरोनि देखिले चांडाळीते । वृद्ध अंध महारोगी ॥२२॥

शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरी ।
कृमि पडले अघोरी । पूय शोणित दुर्गंधी ॥२३॥

कुक्षिरोगी गंडमाळा । कफे दाटला असे गळा ।
दंतहीन अति विव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥२४॥

चंद्रसूर्यकिरण पडता । प्राण जाय कंठगता ।
शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥२५॥

विधवा आपण केशवपनी । दिसे जैसी मुखरमणी ।
क्षणक्षणा पडे धरणी । प्राणत्याग करू पाहे ॥२६॥

ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी ।
देह टाकिला धरणीसी । त्यजू पाहे प्राण आपुला ॥२७॥

प्राण त्यजिता तये वेळी । विमान उतरे तत्काळी ।
शिवदूत अतिबळी । त्रिशूळ खट्‍वांग धरूनिया ॥२८॥

टंकायुधे चंद्र भाळी । दिव्यकांति चंद्रासारखी केवळी ।
किरीटकुंडले मिरवली । चतुर्वर्ग येणेपरी ॥२९॥

विमानी सूर्यासारिखे तेज । अतिविचित्र दिसे विराज ।
आले चांडाळियेकाज । अपूर्व वर्तले तये वेळी ॥३०॥

आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण्या कार्यासी ।
दूत म्हणती आम्हांसी । न्यावया आलो चांडाळिते ॥३१॥

ऐकोनि दूताचे वचन । विस्मित झाले आमुचे मन ।
पुनरपि केला त्यासी प्रश्न । ऐक राया तू एकचित्ते ॥३२॥

ऐशिया चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसी ।
नेऊनिया श्वानासी । सिंहासनी कैसे योग्य ॥३३॥

या जन्मादारभ्य इसी । पापे पापसंग्रहासी ।
ऐशी पापीण दुर्वृत्त इसी । केवी न्याल कैलासा ॥३४॥

नाही इसी शिवज्ञान । न करीच हे तपसाधन ।
दया सत्य कदा नेणे । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३५॥

पशुमांस आहार इसी । सदा करी जीवहिंसी ।
ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी । केवी नेता स्वर्गभुवना ॥३६॥

अथवा कधी शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन ।
नाही केले शिवस्मरण । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३७॥

शिवरात्री उपोषण । नाही केले पुण्यदान ।
यज्ञयागादि साधन । नाही केले इणे कधी ॥३८॥

न करी स्नान पर्वकाळी । नेणे तीर्थ कवणे वेळी ।
अथवा व्रतादि सकळी । केले नाही इणे कधी ॥३९॥

या सर्वांगी पूय शोणित । दुर्गंधी असे बहुत ।
ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानी बैसवाल ॥१४०॥

अर्चन जन्मांतरीचे म्हणा । कुष्ठ सर्वांग तेचि खुणा ।
कृमि निघती मुखांतून । पूर्वाजित काय केले ॥४१॥

ऐशी पापिणी दुराचारी । केवी नेता कैलासपुरी ।
योग्य नव्हे चराचरी । तुम्ही केवी न्याल इसी ॥४२॥

गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिले दूतांसी ।
त्यांनी सांगितला आम्हांसी । आद्यंत तये चांडाळीचा ॥४३॥

म्हणे गौतम ऋषेश्वर । चांडाळीचे पूर्वापार ।
सांगेन तुम्हांस सविस्तर । असे आश्चर्य परियेसा ॥४४॥

पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकन्या असे जाण ।
सौदामिनी नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥४५॥

अतिसुंदर रूप इसी । उपवर जाहली पितृगृहासी ।
न मिळे वर तियेसी । चिंता करिती मातापिता ॥४६॥

न मिळे वर सुंदर तिसी । उन्मत्त जाहली दहा वरुषी ।
मिळवूनि एका द्विजासी । गृह्योक्तेंसी लग्न केले ॥४७॥

विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी ।
क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥४८॥

वर्तता असे पुढे देख । तिचे पतीस झाले दुःख ।
पंचत्व पावला तात्काळिक । विधिलेख करूनिया ॥४९॥

ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरा आणिती तत्त्वता ।
पतीचे दुःखे दुःखिता । खेद करी ते नारी ॥१५०॥

अतिसुंदर पूर्ववयासी । मदे व्याप्त प्रतिदिवसी ।
चंचळ होय मानसी । परपुरुषाते देखोनिया ॥५१॥

गुप्तरुपे क्वचित्काळी । जारकर्म करी ते बाळी ।
प्रगट जाहले तत्काळी । गौप्य नोहे पातक ॥५२॥

आपण विधवा असे नारी । पूर्ववयासी अतिसुंदरी ।
विषयी प्रीति असे भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥५३॥

ऐसे तिचिया पातकासी । विदित जाहले सर्वांसी ।
वाळीत केले तियेसी । मातापिताबंधुवर्गी ॥५४॥

शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी ।
प्रकटरूप अहर्निशी । रमो लागली नगरांत ॥५६॥

तिये नगरी एक वाणी । रूपे होता अतिलावण्यगुणी ।
त्यासी तिणे पूर्ववयस देखोनि । झाली त्याची कुलस्त्री ॥५७॥

तया शूद्राचिया घरी । वर्ततसे ते नारी ।
ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥५८॥

श्लोक ॥ स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया ।
राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोगसंग्रहात ॥५९॥

टीका ॥ स्त्रिया नासती कामवेगे । ब्राह्मण नासती हीनसेवे ।
राज्य जाय द्विजक्षोभे । यति नासे विषयसेवने ॥१६०॥

शूद्रासवे अहर्निशी । रमत होती अतिहर्षी । पु
त्र जाहला तियेसी । शूद्रगृही असता ॥६१॥

नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसी ।
होऊनि तया शूद्रमहिषी । होती पापिणी दुराचारी ॥६२॥

वर्तता एके दिवसी । उन्मत्त होवोनि परियेसी ।
छेदिले वासरू आहारासी । मेष म्हणोनि पापिणीने ॥६३॥

छेदोनि वत्स परियेसी । पाक केला विनयेसी ।
शिर ठेविले शिंकियासी । दुसरे दिवशी भक्षावया ॥६४॥

आपण भ्रमित मद्यपानी । जागृत जाहली अस्तमानी ।
वासरू पाहे जावोनि । धेनु दोहावयालागी ॥६५॥

वत्सस्थानी असे मेष । भ्रमित जाहली अतिक्लेश ।
घरी पाहातसे शिरास । स्पष्ट दिसे वासरू ॥६६॥

अनुतप्त होवोनि तये वेळी । शिव शिव म्हणे चंद्रमौळी ।
अज्ञानाने ऐशी पापे घडली । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥६७॥

तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी ।
पति कोपेल म्हणोनि परियेसी । अस्थिचर्म निक्षेपिले ॥६८॥

जाऊनि सांगे शेजार लोका । व्याघ्रे वत्स नेले ऐका ।
भक्षिले म्हणोनि रडे देखा । पतीपुढे येणेपरी ॥६९॥

ऐसी कितीक दिवसांवरी । नांदत होती शूद्राघरी ।
पंचत्व पावली ते नारी । नेली दूती यमपुरा ॥१७०॥

घातली तियेसी नरकात । भोग भोगी अतिदुःखित ।
पुनरपि जन्मा चांडाळी जात । उपजली नारी परियेसा ॥७१॥

उपजतांचि जाहलि अंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी ।
माता पिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहे ॥७२॥

उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा । स्वजन तियेचे अखंडा ।
बाळपणी तयेसि विघडा । पोसिताती येणेपरी ॥७३॥

ऐसे असता वर्तमानी । सर्वांग झाले कुष्ठवर्णी ।
पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥७४॥

सर्वांग कुष्ठवर्णपीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात ।
भिक्षा मागोनि उदर भरित । रक्षण करी शरीर आपुले ॥७५॥

येणेपरी चांडाळी । वर्तत असे बहुतकाळी ।
क्षुधेने पीडित सर्वकाळी । आपण अंध कुष्ठ देही ॥७६॥

न मिळे तिसी वस्त्र अन्न ।
दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टे ॥७७॥

भिक्षा मागे जनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी ।
कधी न भरे उदर तिसी । दुःखे विलापे अपार ॥७८॥

व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी ।
दुर्गंधि येत असे महादोषी । सर्वांग कुष्ठे गळतसे ॥७९॥

ऐसे वर्ततांम माघमासी । लोक निघाले यात्रेसी ।
महास्थान गोकर्णासी । कलत्रपुत्रसहित देख ॥१८०॥

शिवरात्रीचे यात्रेसी । येती लोक देशोदेशी ।
चतुर्वर्ण आसपासी । हरुषे येती परियेसा ॥८१॥

देशोदेशीचे राजे देखा । हस्तीरथादिसहित ऐका ।
येती समस्त भूमांडलिका । महाबळेश्वरदर्शनासी ॥८२॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती यात्रेसी विनोद ।
समारंभ वाद्यनाद । अमित लोक परियेसा व८३॥

किती हासती गायन करिती । धावती नृत्य करीत येती ।
शिवस्मरणे गर्जना करिती । यात्राप्रसंगी जन देखा ॥८४॥

ऐसी महाजनांसमवेत । चांडाळी गेली तेथे त्वरित ।
सवे भिक्षुक असती बहुत । तयांसवे जात असे ॥८५॥

येणेपरी गोकर्णासी । चांडाळी पातली सायासी ।
करावलंबे महाजनांसी । भिक्षा मागे करुणावचने ॥८६॥

लोक जाती मार्गात । शयन करी आक्रंदत ।
कर वोढूनि मागत । महाजन लोकांसी ॥८७॥

पूर्वीची पापी आपण । पीडत असे याची कारण ।
भिक्षा घाला क्षुधानिवारण । म्हणोनि मागे सकळिका ॥८८॥

नेणे कधीच वस्त्र प्रावरण । धुळीत लोळे आपण ।
क्षुधाक्रांत होतसे मरण । धर्म करा सकळांसी म्हणे ॥८९॥

सर्वांगी रोगग्रस्त । वस्त्रावीण बाघे शीत ।
अक्ष नाही क्षुधाक्रांत । धर्म करा सकळिक हो ॥१९०॥

पूर्वी जन्मशतांतरी । नाही केले पुण्य येरी ।
याचि कारणे पीडित भारी । धर्म करा सकळिक ॥९१॥

येणेपरी मार्गांत । चांडाळी असे याचित ।
ते दिवशी असे शिवरात्रीव्रत । कोणी न घाली भिक्षा तिसी ॥९२॥

येरी विव्हळे क्षुधाक्रांत । जठराग्नि प्रदीप्त असे बहुत ।
धर्म करा ऐसे म्हणत । पडली मार्गात तेधवा ॥९३॥

पूजेसि जाती सकळजन । त्याते मागे आक्रंदोन ।
एक म्हणती हांसोन । उपवास आजि अन्न कैचे ॥९४॥

हाती होती बिल्वमंजरी । घाली ती तियेच्या करी ।
आघ्राणोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥९५॥

कोपोनि टाकी ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी ।
रात्री असती अंधारी । अलभ्य पूजा घडली देखा ॥९६॥

कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी ।
पूजा पावली त्या शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकी ॥९७॥

इतुके पुण्य घडले तिसी । प्रयत६न न करिता परियेसी ।
तुष्टला ईश्वर हर्षी । भवार्णवाकडे केले ॥९८॥

येणेपरी चांडाळीसी । उपवास घडला अनायासी ।
तेथूनि उठली दुसरे दिवसी । भिक्षा मागावयाकारणे ॥९९॥

पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त झाली उपवासे ।
चक्षुहीन मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥

सूर्यरश्मीकरूनि तिसी । दुःख होय असमसहसी ।
पूर्वार्जित कर्मे ऐसी । म्हणती दूत गौतमाते ॥१॥

ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षच्छायेसमीप ।
त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनिया आलो धावोनि ॥२॥

पुण्य घडले इसी आजी । उपवास शिवतिथीकाजी ।
बिल्वपत्रे ईश्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥३॥

तया पुण्येकरूनि इचे । पाप गेले शतजन्मीचे ।
हे प्रीतिपात्र ईश्वराचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥४॥

ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपूनिया अमृत ।
दिव्यदेह पावूनि त्वरित । गेली ऐका शिवलोका ॥५॥

ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारोन ।
रायासि म्हणे तू निघोन । त्वरित जाई गोकर्णासी ॥६॥

जातांचि तुझी पापे जाती । इह सौख्य परत्र उत्तम गति ।
संशय न धरी गा चित्ती । म्हणोनि निरोपी रायासी ॥७॥

परिसोनि गौतमाचे वचन । राजा मनी दृढ संतोषोन ।
त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण । पापावेगळा जाहला तो ॥८॥

ऐसे पुण्यपावन स्थान । म्हणोनि राहिले श्रीपाद आपण ।
सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥९॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगे गुरुचरित्र विस्तारू ।
श्रोते करूनि निर्धारू । एकचित्ते परियेसा ॥२१०॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥

॥ ओवीसंख्या ॥२१०॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


गुरुचरित्र – अध्याय आठवा

॥ श्री गणेशायनमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा निरोपिलासी ।
श्रीगुरु राहिले किती दिवसी । वर्तले पुढे काय सांग ॥१॥

श्रीगुरुमूर्ति कृपासिंधु । माझे मनी लागला वेधु ।
चरित्र ऐकतां महानंदु । अतिउल्हास होतसे ॥२॥

परिसोनि शिष्याचे वचन । संतोषे सिद्ध अतिगहन ।
सांगता झाला विस्तारोन । श्रोते तुम्ही अवधारा ॥३॥

गोकर्णक्षेत्री श्रीपाद यति । राहिले वर्षे तीन गुप्ती ।
तेथोनि श्रीगिरिपर्वता येती । लोकानुग्रहाकारणे ॥४॥

जयाचे करिता चरणदर्शन । समस्त तीर्थासमान जाण ।
'चरणं पवित्रं विततं पुराणं । वेदश्रुति ऐसे बोलतसे ॥५॥

समस्त तीर्थे गुरुचरणी । तो कां हिंडे तीर्थभवनी ।
लोकानुग्रहालागुनी । जात असे परियेसा ॥६॥

मास चारी क्रमोनि तेथे । आले निवृत्तिसंगमाते ।
दर्शन देती साधुभक्तांते । पातले तया कुरवपुरा ॥७॥

कुरवपुर महाक्शेत्र । कृष्णा गंगा वाहे नीर ।
महिमा तेथील सांगता अपार । भूमंडाळात दुर्लभ ॥८॥

तेथील महिमा सांगता । विस्तार होईल बहुत कथा ।
पुढे असे चरित्र अमृता । सांगेन ऐका एकचित्ते ॥९॥

श्रीपाद राहिले कुरवपुरी । ख्याति राहिली भूमीवरी ।
प्रगटे महिमा अपरंपारी । सांगतां विस्तार असे देखा ॥१०॥

जे जन भजती भक्तीसी । सौख्य पावती अप्रयासी ।
कन्या पुत्र लक्ष्मीसी । चिंतिले फळ पावती ॥११॥

समस्त महिमा सांगावयासी । विस्तार होईल बहुवसी ।
नामधारका स्वस्थ परियेसी । सांगेन किंचित् तुज आतां ॥१२॥

पुढे अवतार व्हावया गति । सांगेन ऐका एकचित्ती ।
श्रीपाद कुरवपुरा असती । कार्यकारणमनुष्यदेही ॥१३॥

अवतार व्हावयाचे कारण । सांगेन त्याचे पूर्वकथन ।
वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण । होता तया ग्रामी ॥१४॥

त्याची भार्या होती देखा । नाम तियेचे अंबिका ।
सुशील आचार पतिसेवका । महापुण्य सती देखा ॥१५॥

तियेसी पुत्र होऊनि मरती । पूर्वकर्मफळ अर्जिती ।
अनेक तीर्थे आचरती । तिणे केलि परियेसा ॥१६॥

ऐसे असतां जे होणार गति । पुत्र जाहला मंदमति ।
माता स्नेह करी भक्ती । अपूर्व आपणासी म्हणोनि ॥१७॥

वर्धता मातापित्याघरी । विप्रात्मज वाढला प्रीतिकरी ।
व्रतबंध करिती कुळाचारी । वेदाभ्यास करावया ॥१८॥

विद्या नये तया कुमरा । मंदमति अज्ञान बहिरा ।
चिंता वर्ते त्या द्विजवरा । म्हणे पुत्र मंदमति ॥१९॥

अनेक देव आराधोनि । पुत्र लाधलो कष्टोनि ।
प्राचीन कर्म न सुटे म्हणोनि । चिंता करी अहोरात्र ॥२०॥

अनेक प्रकारे शिकवी त्यासी । ताडन करी बहुवसी ।
होतसे दुःख जननीसी । वर्जी आपुले पतीते ॥२१॥

पतीसी म्हणे ते नारी । पुत्र नाहीत आम्हा घरी ।
कष्ट करोनि नानापरी । पोसिले एका बाळकासी ॥२२॥

विद्यान येचि वेद त्यासी । वाया मारून का कष्टसी ।
प्राचीन कर्म न सुटे त्यासी । की मूढ होऊनि उपजावे ॥२३॥

आतां जरी तुम्ही यासी । ताडन कराल अहर्निशी ।
प्राण त्यजीन मी भरवसी । म्हणोनि विनवी पतीते ॥२४॥

स्त्रियेचे वचन ऐकोनि । विप्र राहिला निचिंत मनी ।
ऐसा काही काळ क्रमोनि । होती तया ग्रामांत ॥२५॥

वर्तता ऐसे तया स्थानी । विप्र पडला असमाधानी ।
दैववशेकरूनि । पंचत्व पावला परियेसा ॥२६॥

मग पुत्रासहित ते नारी । होती तेथे कुरवपुरी ।
याचूनि आपुले उदर भरी । येणेपरी जीवित्व रक्षी ॥२७॥

विप्रस्त्रियेचा पुत्र देखा । विवाहाहायोग्य झाला निका ।
निंदा करिती सकळीका । मतिहीन म्हणोनिया ॥२८॥

कन्या न देती तयासी कोणी। म्हणती काष्ठे वाहतो का पाणी ।
समस्त म्हणती असे दूषणी । उदर भरी येणे विद्ये ॥२९॥

समस्त लोक म्हणती त्यासी । तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी ।
लांछन लाविले वंशासी । अरे मूर्खा कुळनाशका ॥३०॥

तुझ्या पितयाचा आचार । ख्याति असे चारी राष्ट्र ।
जाणे धर्म वेद शास्त्र । त्याचे पोटी अवतरलासी ॥३१॥

बोल आणिलासी तुवा पितरांसी । घातले तया अधोगतीसी ।
भिक्षा मागोनि उदर भरिसी । लाज कैसी तुज न वाटे ॥३२॥

जन्मोनिया संसारी । काय व्यर्थ पशूचिये परी ।
अथवा गंगेत प्रवेश करी । काय जन्मोनि सार्थक ॥३३॥

ऐसे ऐकोनि ब्रह्मचारी । दुःख करीत नाना प्रकारी ।
मातेसि म्हणे ते अवसरी । प्राण त्यागीन मी आता ॥३४॥

निंदा करिती सर्वही मज । असोनि देह कवण काज ।
पोसू न शके माते तुज । जाईन अरण्यवासासी ॥३५॥

ऐकोनि पुत्राचे वचन । माता करी चिंता गहन ।
शोकदुःखेकरून । विलाप करी ते नारी ॥३६॥

माता सुत दुःख करीत । गेली गंगाप्रवाहात ।
तेथे देखिले जगदुद्धरित । श्रीपाद योगी स्नान करिता ॥३७॥

जाऊनि दोघे लागती चरणी । विनविताती कर जोडुनी ।
वासना असे आमुचे मनी । प्राण त्यजावा गंगेत ॥३८॥

निरोप द्यावा जी आम्हांसी । सद्‌गति व्हावया कारणासी ।
आत्महत्या महादोषी । म्हणोनि विनवितो कृपासिंधु ॥३९॥

ऐकोनि विप्रसतीचे वचन । पुसती श्रीपाद कृपायमान ।
कां संकटी तुमचे मन । त्यजिता प्राण काय निमित्त ॥४०॥

विप्रस्त्री तया वेळा । सांगतसे दुःखा सकळा ।
म्हणे स्वामी भक्तवत्सला । तारावे आम्हा बाळकाते ॥४१॥

पुत्रावीण कष्ट भारी । अनेक तीर्थे पादचारी ।
केले व्रत पूजा जरी । सकळ देव आराधिले ॥४२॥

व्रते उपवास सांगू किती । करिते झाले अपरिमिती ।
झाला पुत्र हा दुर्मति । निंदा करिती सकळ जन ॥४३॥

वेदशास्त्रसंपन्न । पति माझा होता ब्राह्मण ।
त्याचिये पोटी झाला हीन । मंदमति दुरात्मा हा ॥४४॥

कृपा करी गा श्रीपाद यति । जन्मोजन्मी दैवगति ।
पुत्र न व्हावा मंदमति । ऐसा प्रकार सांगावा ॥४५॥

कृपासागर दैन्यहरण । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
शरणागताचे करावया रक्षण । आलासि आजि कृपासिंधु ॥४६॥

जन्मोनिया संसारी । कष्ट केले नानापरी ।
न देखेचि सौख्यकुसरी । परी जाहले पुत्र न राहती ॥४७॥

वाचोनिया हा एक सुत । शेळीचे गळा स्तन लोंबत ।
वृथा जन्मला म्हणत । विनवीतसे श्रीगुरूसी ॥४८॥

देवा आता ऐसे करणे । पुढील जन्मी मनुष्यपणे ।
पूज्यमान पुत्र पावणे । जैसा पूज्य तू जगत्त्रयासी ॥४९॥

सकळ लोक ज्यासि वंदिती । ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती ।
उपाय सांगा श्रीगुरु यती । म्हणोनि चरणां लागली ॥५०॥

त्याचेनि माते उद्धारगति । मागुती न होय पुनरावृत्ति ।
पितरां सकळा स्वर्गप्राप्ति । लाधे ऐसे निरोपावे ॥५१॥

वासना असे माझे मनी । पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी ।
बाळपणिच पाहो नयनी । पूज्यमान समस्तांसी ॥५२॥

ऐकोनि तियेचे वचन । सांगती कृपा भक्ति पाहोन ।
करी वो ईश्वरआराधन । पुत्र होईल श्रीहरीऐसा ॥५३॥

गौळियाचे घरी देखा । कृष्ण उपजला कारणिका ।
व्रत केले गौळी ऐका । ईश्वराची आराधना ॥५४॥

तैसा तू आराधी ईश्वर । पुत्र पावशील हा निर्धार ।
तुझा मनोरथ साचार । पावेल सिद्धि श्रीपाद म्हणती ॥५५॥

विप्रस्त्री म्हणे ते वेळी । कैसे व्रत आचरले गौळी ।
कैसा पूजिला चंद्रमौळी । विस्तारावे मजप्रती ॥५६॥

तैसेच व्रत करीन आपण । म्हणोनि धरी सद्‌गुरुचरण ।
कृपामूर्ति सद्‌गुरु जाण । सांगता झाला ते वेळी ॥५७॥

म्हणती श्रीपाद यति तियेसी । ईश्वर पूजी हो प्रदोषी ।
मंदवारी तू विशेषी । पूजा करी भक्तीने ॥५८॥

पूजा करी जे गौळणी । विस्तार असे स्कंदपुराणी ।
कथा सांगेन ऐक कानी । म्हणती श्रीगुरु तियेसी ॥५९॥

ऐकोन श्रीगुरूचे वचना । संतोषली विप्रांगना ।
पुढती घाली लोटांगणा । तया श्रीपाद श्रीगुरूप्रती ॥६०॥

विप्रस्त्री म्हणे स्वामीसी । अभिनव माते निरोपिलेसी ।
देखता पूजा प्रदोषी । पुत्र झाला कृष्णा ऐस ॥६१॥

आपण केलिया पूजा जरी । फळ पावेन निर्धारी ।
पुर्वी कवणे परी । विस्तारावे दातारा ॥६२॥

श्रीगुरु सांगती तियेसी । सांगेन ऐक एकचित्तेसी ।
उज्जनी नाम नगरीसी । जाहले विचित्र परियेसा ॥६३॥

तया नगरी चंद्रसेन । राजा होता धर्मपरायण ।
त्याचा सखा असे प्राण । मणिभद्र नामे परियेसा ॥६४॥

सदा ईश्वरभक्ति करी । नाना प्रकारे अपरंपारी ।
भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणि एक ॥६५॥

कोटिसूर्यांचा प्रकाश । माणिक शोभे महासरस ।
कंठी घालिता महाहर्ष । तया मणिभद्ररायासी ॥६६॥

तया मण्याचे लक्षण । सुवर्ण होय लोह पाषाण ।
तेज फाकले ज्यावरी जाण । ते कनक होय परियेसा ॥६७॥

जे जे चिंतीत मानसी । ते ते पावत त्वरितेसी ।
ऐशी ख्याति माणिकासी । समस्त राजे कांक्षा करिती ॥६८॥

इष्टत्वे मागती किती एक । मागो पाठविती ते माणिक ।
बलात्कारे इच्छिती एक । राजे वांछिती परियेसा ६९॥

म्हणती विक्रय करूनि देखा । आपणा द्यावे ते माणिका ।
जरी न देशी स्वाभाविका । तरी युद्धालागी येऊ म्हणती ॥७०॥

राजे समस्त मिळोनि । पातले नगराते उज्जनी ।
अपार सैन्य मिळवूनि । वेढिले तया नगरासी ॥७१॥

ते दिवशी शनिवार त्रयोदशी । राजा बैसला पूजनासी ।
शंका न धरितां मानसी । एकचित्ते पूजीतसे ॥७२॥

महाबळेश्वरलिंगासी । पूजा करी तो राजा हर्षी ।
गौळियाचा कुमर पहावयासी । आला तया शिवालया ॥७३॥

पूजा पाहोनि शिवाची । मुले म्हणती गौळियांची ।
खेळू चला आम्ही असेची । लिंग करुनि पुजू आता ॥७४॥

म्हणोनि विनोदेकरूनि । आपुले गृहासन्निधानी ।
एकवटोनि पाषाणी । कल्पिले तेथे शिवालय ॥७५॥

पाषाणाचे करूनि लिंग । पूजा करीत बाळके चांग ।
नानापरीची पत्री सांग । कल्पिली तेथे पूजेसी ॥७६॥

षोडशोपचारे पूजा करिती । उदक नैवेद्य समर्पिती ।
ऐसे कौतुके खेळती । गोपकुमर तये वेळी ॥७७॥

गोपिका स्त्रिया येउनी । पुत्रांते नेती बोलावुनी ।
भोजनाकारणे म्हणोनि । गेले सकळही बाळक ॥७८॥

त्यातील एक गोपीसुत । लिंगभुवन न सोडित ।
त्याची माता जवळी येत । मारी आपुले पुत्रासी ॥७९॥

म्हणे कुमारा भोजनासी । चाल गृहासी झाली निशी ।
काही केल्या न जाय परियेसी । तो गोपकुमारक ॥८०॥

कोपेकरूनि ते गौळिणी । मोडी पूजा खेळ अंगणी ।
पाषाण दूर टाकुनी । गेली आपुले सदनासी ॥८१॥

पूजा मोडिता तो बाळक । प्रलाप करी अनेक ।
मूर्च्छा येऊनि क्षणेक । पडिला भूमी अवधार ॥८२॥

लय लावूनी लिंगस्थानी । प्राण त्यजू पाहे निर्वाणी ।
प्रसन्न झाला शूलपाणी । तया गोपसुताकारणे ॥८३॥

शिवालय रत्‍नखचित । सूर्यासमान प्रभावंत ।
लिंग दिसे रत्‍नखचित । जागृत झाला तो बाळ ॥८४॥

निजरूप धरी गौरीरमण । उठवी बाळ करी धरून ।
वर माग म्हणे मी झालो प्रसन्न । देईन जे वांछिसी ते ॥८५॥

बाळके नमिले ईश्वरासी । कोप न करावा मातेसी ।
पूजा बिघडली तव प्रदोषी । क्षमा करणे म्हणतसे ॥८६॥

ईश्वर भोळा चक्रवर्ती । वर दिधला बहुप्रीती ।
प्रदोषसमयी पूजा देखती । गौळिणी होय देवजननी ॥८७॥

तिचे पोटी होईल सुत । तोचि विष्णु अवतार ख्यात ।
न करी पूजा पाहिली म्हणत । पोषील आपुले पुत्रासी ॥८८॥

जे जे मानसी तू इच्छिसी । पावेल ते ते धरी मानसी।
अखिल सौख्य तुझिया वंशासी । पुत्रपौत्रेसी नांदसील ॥८९॥

प्रसन्न होवोनि गिरिजापती । गेले लिंगालयी गुप्ती ।
लिंग राहिले रत्‍नखचिती । गौळियाघरी याचिपरी ॥९०॥

कोटिसूर्यप्रकाश । शिवालय दिसे अति सुरस ।
लोक म्हणती काय प्रकाश । उदय झाला दिनकरा ॥९१॥

आले होते परराष्ट्रराजे । विस्मय करिती चोजे ।
सांडूनि द्वेष बोलती सहजे । भेटू म्हणती रायासी ॥९२॥

पाहे या पवित्र नगरांत । सूर्य झाला असे उदित ।
राजा असे बहु पुण्यवंत । ऐसियासी विरोध न करावा ॥९३॥

म्हणोनि पाठविती सेवकासी । भेटू म्हणती रायासी ।
राजा बोलवी तयांसी । आपुले गृहासी नगरांत ॥९४॥

इतुके होता ते अवसरी । राजा पुसतसे प्रीतिकरी ।
रात्री असतां अंधकारी । उदय पावला केवी सूर्य ॥९५॥

राजा चंद्रसेनसहित । पाहावया येती कौतुकार्थ ।
दिसे विचित्र रत्‍नखचित । शिवालय अनुपम ॥९६॥

येणेचि परी गौळ्याचे सदन । अतिरम्य विराजमान ।
पुसता झाला आपण । तया गौळिकुमारकाते ॥९७॥

सांगितला सकळ वृत्तान्त । संतोष करिती राजे समस्त ।
गौळियांत राजा तू म्हणत । देती नानादेशसंपदा ॥९८॥

निघोनि गेले राजे सकळ । राहिला चंद्रसेन निर्मळ ।
शनिप्रदोष पूजा सफळ । भय कैचे तया राजा ॥९९॥

गौळीकुमर येऊनि घरा । सांगे माते सविस्तरा ।
पुढे येईल तुझ्या उदारा । नारायण अवतरोनि ॥१००॥

ऐसा ईश्वरे दिधला वर । संशय न करी तू निर्धार ।
संतोषला कर्पूरगौर । देखिली पूजा प्रदोषाची ॥१॥

मोडिली पूजा म्हणोनि । म्यां विनविला शूलपाणी ।
क्षमा करूनि घेतले म्हणोनि । सांगे वृत्तान्त मातेसी ॥२॥

ऐसा ईश्वर प्रसन्न झाला । प्रदोषपूजने तया फळला ।
श्रीपाद सांगती तया वेळा । विप्रस्त्रियेकारणे ॥३॥

तुझे मनी असेल जरी । होईल पुत्र मजसरी ।
संशय सांडूनि निर्धारी । शनिप्रदोषी पूजी शंभू ॥४॥

ऐसे म्हणोनि श्रीपाददेव । चक्रवर्ती भोळा शिव ।
विप्रस्त्रियेचा पाहोनि भाव । प्रसन्न होत तया वेळी ॥५॥

बोलावूनि तिचे कुमारासी । हस्त ठेविती मस्तकेसी ।
ज्ञान जाहले तत्काळेसी । त्रिवेदी झाला तो ब्राह्मण ॥६॥

वेदशास्त्रादि तर्कभाषा । म्हणता झाला अतिप्रकाशा ।
विस्मय झाला असे सहसा । विप्र म्हणती आश्चर्य ॥७॥

विस्मय करोनि विप्रवनिता । म्हणे ईश्वर हाचि निश्चिता ।
कार्याकारणे अवतार होता । आला नरदेह धरोनि ॥८॥

पूर्वजन्मीचे पुण्यार्जित । जोडला आम्हा हा निश्चित ।
भेटला असे श्रीगुरुनाथ । म्हणोनि नमिती क्षणोक्षणा ॥९॥

म्हणे ईशर तूचि होसी । पूजा करीन तुझी मी प्रदोषी ।
मिथ्या नोहे तुझे वाक्यासी । पुत्र व्हावा तुज ऐसा ॥११०॥

ऐसा निश्चय करोनि । पूजा करिती नित्य येऊनि ।
प्रदोषपूजा अति गहनी । करी श्रीपादरायासी ॥११॥

पुत्र तिचा झाला ज्ञानी । वेदशास्त्रार्थसंपन्नी ।
पूज्या जाहला सर्वांहूनि । ब्रह्मवृंद मानित ॥१२॥

विवाह झाल मग यासी । पुत्रपौत्री नांदे हर्षी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । ऐसे होय अवधारा ॥१३॥

ऐसा श्रीगुरु कृपावंत । भक्तजना असे संरक्षित ।
ऐक शिष्या एकचित्त । नामधारका श्रीमता ॥१४॥

नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी ।
परियेसा समस्त अहर्निशी । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥११५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्यानेसिद्धनामधारकसंवादे प्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्यायः ॥८॥

॥ श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ॥ ओवीसंख्या ॥११५॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय नववा

॥ श्री गणेशाय नमः ॥

ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी नमन ।
विनवीत कर जोडून । भक्तिभावे करोनिया ॥१॥

श्रीपाद कुरवपुरी असता । पुढे वर्तली कैसी कथा ।
विस्तारूनि सांग आता । कृपामुर्ति दातारा ॥२॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढे कथा अपूर्व देखा ।
तया ग्रामी रजक एका । सेवक झाला श्रीगुरूचा ॥३॥

भक्तवत्सल श्रीगुरुराव । जाणोनि शिष्याचा भाव ।
विस्तार करोनि भक्तीस्तव । निरोपित गुरुचरित्र ॥४॥

नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती ।
लोकवेव्हार संपादिती । त्रयमूर्ति आपण ॥५॥

ज्याचे दर्शन गंगास्नान । त्यासी कायसे आचरण ।
लोकानुग्रहाकारण । स्नान करीत परियेसा ॥६॥

वर्तता ऐसे एके दिवशी । श्रीपाद यति येती स्नानासी ।
गंगा वहात असे दशदिशी । मध्ये असती आपण ॥७॥

तया गंगातटाकांत । रजक असे वस्त्रे धूत ।
नित्य येऊनि असे नमित । श्रीपादगुरुमूर्तीसी ॥८॥

नित्य त्रिकाळ येवोनिया । दंडप्रमाण करोनिया ।
नमन करी अतिविनया । मनोवाक्कायकर्मे ॥९॥

वर्तता ऐसे एके दिवशी । आला रजक नमस्कारासी ।
श्रीपाद म्हणती तयासी । एकचित्ते परियेसा ॥१०॥

श्रीपाद म्हणती रजकासी । का नित्य कष्टतोसी ।
तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी । सुखे राज्य करी आता ॥११॥

ऐकता गुरूचे वचन । गाठी बांधी पल्लवी शकुन ।
विनवीतसे कर जोडून । सत्यसंकल्प गुरुमूर्ति ॥१२॥

रजक सांडी संसारचिंता । सेवक जाहला एकचित्ता ।
दुरोनि करी दंडवता । मठा गेलिया येणेचि परी ॥१३॥

ऐसे बहुत दिवसांवरी । रजक तो सेवा करी ।
आंगण झाडी प्रोक्षी वारी । नित्य नेमे येणे विधी ॥१४॥

असता एके दिवशी देखा । वसंतऋतु वैशाखा ।
क्रीडा करीत नदीतटाका । आला राजा म्लेछ एक ॥१५॥

स्त्रियांसहित राजा आपण । अलंकृत आभरण ।
क्रीडा करीत स्त्रिया आपण । गंगेमधून येतसे ॥१६॥

सर्व दळ येत दोनी थडी । अमित असती हस्ती घोडी ।
मिरविताती रत्‍नकोडी । अलंकृत सेवकजन ॥१७॥

ऐसा गंगेच्या प्रवाहात । राजा आला खेळत ।
अनेक वाद्यनाद गर्जत । कृष्णावेणि थडियेसी ॥१८॥

रजक होता नमस्कारित । शब्द झाला तो दुश्चित ।
असे गंगेत अवलोकित । समारंभ राजयाचा ॥१९॥

विस्मय करी बहु मानसी । जन्मोनिया संसारासी ।
जरी न देखिजे सौख्यासी । पशुसमान देह आपुला ॥२०॥

धन्य राजयाचे जिणे । ऐसे सौख्य भोगणे ।
स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा भक्त ईश्वराच ॥२१॥

कैसे याचे आर्जव फळले । कवण्या देवा आराधिले ।
कैसे श्रीगुरु असती भेटले । मग पावला ऐसी दशा ॥२२॥

ऐसे मनी चिंतित । करीतसे दंडवत ।
श्रीपादराय कृपावंत । वळखिली वासना तयाची ॥२३॥

भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । जाणोनि अंतरी त्याची स्थिति ।
बोलावूनिया पुसती । काय चिंतिसी मनांत ॥२४॥

रजक म्हणे स्वामीसी । देखिले दृष्टी रायासी ।
संतोष झाला मानसी । केवळ दास श्रीगुरूचा ॥२५॥

पूर्वी आराधोनि देवासी । पावला आता या पदासी ।
म्हणोनि चिंतितो मानसि । कृपासिंधु दातारा ॥२६॥

ऐसे अविद्यासंबंधेसी । नाना वासना इंद्रियांसी ।
चाड नाही या भोगासी । चरणी तुझे मज सौख्य ॥२७॥

श्रीपाद म्हणती रजकासी । जन्मादारभ्य कष्टलासी ।
वांछा असे भोगावयासी । राज्यभोग तमोवृत्ति ॥२८॥

निववी इंद्रिये सकळ । नातरी मोक्ष नव्हे निर्मळ ।
बाधा करिती पुढे केवळ । जन्मांतरी परियेसी ॥२९॥

तुष्टवावया इंद्रियांसी । तुवा जावे म्लेछवंशासी ।
आवडी जाहली तुझे मानसी । राज्य भोगी जाय त्वरित ॥३०॥

ऐकोनि स्वांमीचे वचन । विनवी रजक कर जोडून ।
कृपासागरू तू गुरुराज पूर्ण । उपेक्षू नको म्हणतसे ॥३१॥

अंतरतील तुझे चरण । द्यावे माते पुनर्दर्शन ।
तुझा अनुग्रह असे कारण । ज्ञान द्यावे दातारा ॥३२॥

श्रीगुरु म्हणती तयासी । वैदुरानगरी जन्म घेसी ।
भेटी देऊ अंतकाळासी । कारण असे येणे आम्हा ॥३३॥

भेटी होतांचि आम्हांसी । ज्ञान होल तुझे मानसी ।
न करी चिंता भरवसी । आम्हा येणे घडेल ॥३४॥

आणिक कार्यकारणासी । अवतार घेऊ परियेसी ।
वेष धरोनि संन्यासी । नाम नृसिंहसरस्वती ॥३५॥

ऐसे तया संबोधूनि । निरोप देती जाय म्हणोनि ।
रजक लागला तये चरणी । नमस्कारीत तये वेळी ॥३६॥

देखोनि श्रीगुरु कृपामूर्ति । रजकासी जवळी पाचारिती ।
इह भोगिसी की पुढती । राज्यभोग सांग मज ॥३७॥

रजक विनवीत श्रीपादासी । झालो आपण वृद्धवयेसी ।
भोग भोगीन बाळाभ्यासी । यौवनगोड राज्यभोग ॥३८॥

ऐकोनि रजकाचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण ।
त्वरित जाई रे म्हणोन । जन्मांतरी भोगी म्हणती ॥३९॥

निरोप देता तया वेळी । त्यजिला प्राण तत्काळी ।
जन्माता झाला म्लेछकुळी । वैदुरानगरी विख्यात ॥४०॥

ऐसी रजकाची कथा । पुढे सांगून विस्तारता ।
सिद्ध म्हणे नामधारका आता । चरित्र पुढती अवधारी ॥४१॥

ऐसे झालीया अवसरी । श्रीपादराय कुरवपुरी ।
असता महिमा अपरंपारी । प्रख्यात असे परियेसा ॥४२॥

महिमा सकळ सांगता । विस्तार होईल बहु कथा ।
पुढील अवतार असे ख्याता । सांगेन ऐक नामधारका ॥४३॥

महत्त्व वर्णावया श्रीगुरूचे । शक्ति कैची या वाचे ।
नवल हे अमृतदृष्टीचे । स्थानमहिमा ऐसा ॥४४॥

श्रीगुरु राहती जे स्थानी । अपार महिमा त्या भुवनी ।
विचित्र जयाची करणी । दृष्टान्ते तुज सांगेन ॥४५॥

स्थानमहिमाप्रकार । सांगेन ऐक एकाग्र ।
प्रख्यात असे कुरवपूर । मनकामना पुरती तेथे ॥४६॥

ऐसे कित्येक दिवसांवरी । श्रीपाद होते कुरवपुरी ।
कारण असे पुढे अवतारी । म्हणोनि अदृश्य होते तेथे ॥४७॥

आश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥४८॥

लौकिकी दिसती अदृश्य जाण । कुरवपुरी असती आपण ।
श्रीपादराव निर्धार जाण । त्रयमूर्तिचा अवतार ॥४९॥

अदृश्य होवोनि तया स्थानी । श्रीपाद राहिले निर्गुणी ।
दृष्टान्त सांगेन विस्तारोनि । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥५०॥

जे जन असती भक्त केवळ । त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ ।
कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ । असे प्रख्यात भूमंडळी ॥५१॥

सिद्ध सांगे नामधारकासी । तेचि कथा विस्तारेसी ।
सांगतसे सकळिकांसी । गंगाधराचा आत्मज ॥५२॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः ॥९॥

॥ ओवीसंख्या ॥५२॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय दहावा

॥ श्री गणेशाय नमः ॥

ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण ।
कुरवपुरीचे महिमान । केवी जाहले परियेसा ॥१॥

म्हणती श्रीपाद नाही गेले । आणि म्हणती अवतार झाले ।
विस्तार करोनिया सगळे । निरोपावे म्हणतसे ॥२॥

सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी ।
अनंतरूपे होती परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥३॥

पुढे कार्यकारणासी । अवतार झाले परियेसी ।
राहिले आपण गुप्तवेषी । तया कुरवक्षेत्रांत ॥४॥

पाहे पा भार्गवराम देखा । अद्यापवरी भूमिका ।
अवतार जाहले अनेका । त्याचेच एकी अनेक ॥५॥

सर्वा ठायी वास आपण । मूर्ति एक नारायण ।
त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिति आणि प्रलय ॥६॥

भक्तजना तारावयासी । अवतरतो ह्रषीकेशी ।
शाप देत दुर्वासऋषि । कारण असे तयांचे ॥७॥

त्रयमूर्तीचा अवतार । याचा कवणा न कळे पार ।
निधान तीर्थ कुरवपूर । वसे तेथे गुरुमूर्ति ॥८॥

जे जे चिंतावे भक्तजने । ते ते पावे गुरुदर्शने ।
श्रीगुरु वसावयाची स्थाने । कामधेनु असे जाणा ॥९॥

श्रीपादवल्लभस्थानमहिमा । वर्णावया अनुपमा ।
अपार असे सांगतो तुम्हा । दृष्टान्तेसी अवधारा ॥१०॥

तुज सांगावया कारण । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण ।
सर्वथा न करी निर्वाण । पाहे वाट भक्तांची ॥११॥

भक्ति करावी दृढतर । गंभीरपणे असावे धीर ।
तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्री सौख्य पावे ॥१२॥

याचि कारणे दृष्टान्ते तुज । सांगेन ऐक वर्तले सहज ।
काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया वल्लभेश ॥१३॥

सुशील द्विज आचारवंत । उदीम करूनि उदर भरीत ।
प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया श्रीपादक्षेत्रासी ॥१४॥

असता पुढे वर्तमानी । उदीमा निघाला तो धनी ।
नवस केला अतिगहनी । संतर्पावे ब्राह्मणासी ॥१५॥

उदीम आलिया फळासी । यात्रेसी येईन विशेषी ।
सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन म्हणे ॥१६॥

निश्चय करोनि मानसी । निघाला द्विजवर उदीमासी ।
चरण ध्यातसे मानसी । सदा श्रीपादवल्लभाचे ॥१७॥

जे जे ठायी जाय देखा । अनंत संतोष पावे निका ।
शतगुणे लाभ झाला ऐका । परमानंदा प्रवर्तला ॥१८॥

लय लावूनि श्रीपादचरणी । यात्रेसि निघाला ते क्षणी ।
वेचावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले समागमे ॥१९॥

द्रव्य घेऊनि द्विजवर । निघता देखती तस्कर ।
कापट्यवेषे सत्वर । तेही सांगते निघाले ॥२०॥

दोन-तीन दिवसांवरी । तस्कर असती संगिकारी ।
एके दिवशी मार्गी रात्री । जात असता मार्गस्थ ॥२१॥

तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जाऊ कुरवपुरासी ।
श्रीपादवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ॥२२॥

ऐसे बोलती मार्गासी । तस्करी मारिले द्विजासी ।
शिर छेदूनिया परियेसी । द्रव्य घेतले सकळिक ॥२३॥

भक्तजनांचा कैवारी । श्रीपादराव कुरवपुरी ।
पातला त्वरित वेषधारी । जटामंडित भस्मांकित ॥२४॥

त्रिशूळ खट्‍वांग घेऊनि हाती । उभा ठेला तस्करांपुढती ।
वधिता झाला तयांप्रती । त्रिशूळेकरूनि तात्काळ ॥२५॥

समस्त तस्करा मारिता । एक तस्कर येऊनि विनविता ।
कृपाळुवा जगन्नाथा । निरपराधी आपण असे ॥२६॥

नेणे याते वधितील म्हणोनि । आलो आपण संगी होऊनि ।
तू सर्वोत्तमा जाणसी मनी । विश्वाची मनवासना ॥२७॥

ऐकोनि तस्कराची विनंती । श्रीपाद त्याते बोलाविती ।
हाती देऊनिया विभूति । विप्रावरी प्रोक्षी म्हणे ॥२८॥

मन लावूनि तया वेळा । मंत्रोनि लाविती विभूती गळा ।
सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा ऐकचित्ते ॥२९॥

इतुके वर्तता परियेसी । उदय जाहला दिनकरासी ।
श्रीपाद जाहले गुप्तेसी । राहिला तस्कर द्विजाजवळी ॥३०॥

विप्र पुसतसे तस्करासी । म्हणे तू माते का धरिलेसी ।
कवणे वधिले तस्करासी । म्हणोनि पुसे तया वेळी ॥३१॥

तस्कर सांगे द्विजासी । आला होता एक तापसी ।
जाहले अभिनव परियेसी । वधिले तस्कर त्रिशूळे ॥३२॥

मज रक्षिले तुजनिमित्ते । धरोनि बैसविले स्वहस्ते ।
विभूति लावूनि मग तूते । सजीव केला तव देह ॥३३॥

उभा होता आता जवळी । अदृश्य जाहला तत्काळी ।
न कळे कवण मुनि बळी । तुझा प्राण रक्षिला ॥३४॥

होईल ईश्वर त्रिपुरारि । भस्मांगी होय जटाधारी ।
तुझी भक्ति निर्धारी । म्हणोनि आला ठाकोनिया ॥३५॥

ऐकोनि तस्कराचे वचन । विश्वासला तो ब्राह्मण ।
तस्कराजवळिल द्रव्य घेऊन । गेला यात्रेसी कुरवपुरा ॥३६॥

नानापरी पूजा करी । ब्राह्मणभोजन सहस्त्र चारी ।
अनंतभक्ती प्रीतिकरी । पूजा करी श्रीपादुकांची ॥३७॥

ऐसे अनंत भक्तजन । मिळूनि सेविती श्रीपादचरण ।
कुरवपूर प्रख्यात जाण । अपार महिमा ॥३८॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरी तू मानसी ।
श्रीपाद आहेती कुरवपुरासी । अदृश्यरूप होऊनिया ॥३९॥

पुढे अवतार असे होणे । गुप्त असती याचि गुणे ।
म्हणती अनंतरूप नारायण । परिपूर्ण सर्वा ठायी ॥४०॥

ऐसी श्रीपादवल्लभमूर्ति । लौकिकी प्रगटली ख्याति ।
झाला अवतार पुढती । नृसिंहसरस्वती विख्यात ॥४१॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगत कथेचा विस्तारू ।
ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥४२॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं नाम दशमऽध्यायः ॥१०॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ॥ ओवीसंख्या ॥४२॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


गुरुचरित्र – अध्याय अकरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी ।
विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥१॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा ।
पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्‍त्रियेची ॥२॥

शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं ।
देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळीं ॥३॥

झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं ।
वाजसनीय शाखेसी । विप्रकुळीं जन्मली ॥४॥

जातक वर्तलें तियेसी । नाम 'अंबा-भवानी' ऐसी ।
आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरीं परियेसा ॥५॥

वर्धतां मातापित्यागृहीं । वाढली कन्या अतिस्नेही ।
विवाह करिती महोत्साहीं । देती विप्रासी तेचि ग्रामीं ॥६॥

शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया 'माधव' जाण ।
त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतींकरुनि ॥७॥

तया माधवविप्राघरीं । शुभाचारें होती नारी ।
वासना तिची पूर्वापरीं । ईश्वरपूजा करीतसे ॥८॥

पूजा करी ईश्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसीं ।
प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्कर ॥९॥

मंदवारीं त्रयोदशीसी । पूजा करिती अतिंविशेषीं ।
तंव वत्सरें झालीं षोडशीं । अंतर्वत्‍नी झाली ऐका ॥१०॥

मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी ।
उत्तम डोहाळे होती तियेसी । बह्मज्ञान बोलतसे ॥११॥

करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती ।
अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥१२॥

ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं ।
पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होतीं मातापिता ॥१३॥

जन्म होतांचि तो बाळक ।'ॐ' कार शब्द म्हणतसे अलोलिक ।
पाहूनि झाले तटस्थ लोक ।अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥१४॥

जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षिणा दान ।
ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥१५॥

सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषीं ।
कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥१६॥

याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्वासी ।
याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥१७॥

अष्‍टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं ।
नव निधि याच्या घरीं । राहती ऐक द्विजोत्तमा ॥१८॥

न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत ।
याचे दर्शनमात्रें पतित । पुनीत होतील परियेसीं ॥१९॥

होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरवंसीं ।
संदेह न धरावा मानसीं । म्हणोनि करिती नमस्कार ॥२०॥

म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर ।
याचेनि महादैन्य हरे । भेणें नलगे कळिकाळा ॥२१॥

तुमचे मनीं जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा ।
यातें करावें हो जतना । निधान आलें तुमचे घरा ॥२२॥

ऐसें जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन ।
जनक जननी संतोषोन । देती दान वस्त्राभरणें ॥२३॥

सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम ।
दृष्‍टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोंवाळिती ॥२४॥

व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिलें म्हणत ।
उपजतां बाळ 'ॐ' कार जपत । आश्चर्य म्हणती सकळ जन ॥२५॥

नगलोक इष्‍ट मित्र । पहावया येती विचित्र ।
दृष्‍टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥२६॥

मायामोहें जनकजननी । बाळासी दृष्‍टि लागेल म्हणोनि ।
आंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्‍णसुतें ॥२७॥

परमात्मयाचा अवतार । दृष्‍टि त्यासी केवीं संचार ।
लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥२८॥

वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी ।
नामकरण पुरःसरीं । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥२९॥

'शालग्रामदेव' म्हणत । जन्मनाम झालें ख्यात ।
नाम 'नरहरी' ऐसें म्हणत । उच्चार केला धर्मकर्मे ॥३०॥

ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं ।
माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥३१॥

पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडें बाळा ।
एखादी मिळवा कां अबळा । स्तनपान देववूं ॥३२॥

अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक ।
ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥३३॥

स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर ।
वस्त्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥३४॥

विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणीं ।
नमन करिती बाळकाचरणीं । माता होय खेळविती ॥३५॥

पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यंदें गाय अति हर्षी ।
न राहे बाळक पाळणेसीं । सदा खेळे महीवरी ॥३६॥

वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारीं ।
वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥३७॥

माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं ।
चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥३८॥

पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी ।
उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळीं ॥३९॥

सांगती जाण ज्योतिषी । आराधावें कुलदेवतेसी ।
अर्कवारीं अश्वत्थपर्णेसीं । अन्न घालावें तीनी वेळां ॥४०॥

एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावें बरव्या विवेकें ।
बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥४१॥

हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ ।
विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥४२॥

एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें ।
श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥४३॥

कांहीं केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता ।
पुत्रासी जाहलीं वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥४४॥

सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी ।
पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केंवी करावें म्हणोनियां ॥४५॥

विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा ।
उपनयनावें केवळा । अष्‍ट वरुषें होऊं नये ॥४६॥

मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं ।
मुका असे हा निश्चितीं । कैसें दैव झालें आम्हां ॥४७॥

कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्वरगौरी आराधिले ।
त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥४८॥

ईश्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु ।
न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंता शिवासी ॥४९॥

एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखों स्वप्नेसीं ।
वेष्‍टिलों होतों आम्ही आशीं । आमुतें रक्षील म्हणोनि ॥५०॥

नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष ।
काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥५१॥

ऐसें नानापरी देखा । जननी करी महादुःखा ।
जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥५२॥

घरांत जाऊनि तये वेळां । घेऊनि आला लोखंड सबळा ।
हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥५३॥

आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं ।
बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥५४॥

गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा ।
पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥५५॥

अमृतदृष्‍टीं पाहतां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमीं ।
विश्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥५६॥

मग पुत्रातें आलिंगोनि । विनविताति जनकजननी ।
तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥५७॥

तुझेनिं सर्वस्व लाधलें । बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें ।
अज्ञान-मायेनें विष्‍टिलें । भुकें ऐसें म्हणों तुज ॥५८॥

आमुचे मनींची वासना । तुंवा पुरवावी नंदना ।
तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥५९॥

हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां ।
कटीं दांवी मौंजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥६०॥

संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं ।
मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥६१॥

मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती ।
व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥६२॥

केली आयती बहुतांपरी । रत्‍नखचित अळंकारीं ।
मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥६३॥

चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती ।
इष्‍ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥६४॥

नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार ।
आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥६५॥

नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती ।
द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥६६॥

इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं ।
गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेवरी ॥६७॥

एक म्हणती हो कां भलतें । मिष्‍टान्न आम्हांसि मिळतें ।
देकार देतील हिरण्य वस्त्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥६८॥

ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक ।
मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥६९॥

चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी ।
पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥७०॥

मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त ।
सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥७१॥

भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकोभावें ।
मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥७२॥

गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केलें त्या बाळका ।
सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥७३॥

गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं ।
बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥७४॥

गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊन आली माता ।
वस्त्रभूषणें रत्‍नखचिता । देती झाली तया वेळीं ॥७५॥

पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी ।
बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी आचारधर्मे वर्ततसे ॥७६॥

पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं ।
'अग्निमीळे पुरोहितं' उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥७७॥

दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद 'इषेत्वा०।
लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥७८॥

तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां ।
'अग्नआयाहि०' गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥७९॥

सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं ।
मुकें बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥८०॥

यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार ।
म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥८१॥

इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक ।
तुंवा उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥८२॥

नव्हती बोल तुझे मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता ।
निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥८३॥

आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं ।
वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥८४॥

ऐकोनि पुत्राचें वचन । दुःखें दाटली अतिगहन ।
बाष्‍प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥८५॥

निर्जीव होऊनि क्षणेक । करिती झाली महाशोक ।
पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥८६॥

आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं ।
न बोलसी आम्हांसवें याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥८७॥

न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल ।
ईश्वरपूजा आलें फळ । म्हणोनि विश्वास केला आम्हीं ॥८८॥

ऐसें नानापरी देखा । पुत्रासि म्हणे ते बाळिका ।
आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥८९॥

ऐकोनि मातेचें वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान ।
नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणें तेंचि असे ॥९०॥

तुतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारीं ।
तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसीं ॥९१॥

तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार ।
म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जहालें जातिस्मरण ॥९२॥

पूर्वजन्मींचा वृत्तांत । स्मरतां जाहली विस्मित ।
श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपता । दिसतसे तो बाळक ॥९३॥

देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां ।
श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥९४॥

ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करीं वो गुप्‍ती ।
आम्ही संन्यासी असों यति । अलिप्‍त असों संसारीं ॥९५॥

याचिकारणें आम्ही आतां । हिंडूं समस्त तीर्थां ।
कारण असे पुढें बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥९६॥

येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं ।
पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥९७॥

पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्ही जरी जाल ।
आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥९८॥

धाकुटपणीं तुम्हां तापस- । धर्मी कवण आहे हर्ष ।
धर्मशास्त्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥९९॥

ब्रह्मचर्य वर्षे बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा ।
मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥१००॥

मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ ।
मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्त्र येणेंपरी ॥१॥

ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां ।
विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥२॥

यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया ।
येणेंविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥३॥

समस्त इंद्रियें संतुष्‍टवावीं । मनींची वासना पुरवावी ।
तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥४॥

ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू सांगती तत्त्वज्ञान ।
ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥५॥

गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून ।
तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्रविस्तार ॥६॥

पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका ।
महाराष्‍ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥१०७॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥११॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १०७ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय बारावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

श्रीगुरू म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी ।
अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥

श्लोक ॥ अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः ।
नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥

टीका ॥ एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी ।
अनित्य देह विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥३॥

देह म्हणिजे क्षणभंगुर । नाहीं राहिले कवण स्थिर ।
जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गे रहाटावें ॥४॥

जो असेल मृत्यूसी जिंकीत । त्याणें निश्चयावें शरीर नित्य ।
त्यासि तुझा उपदेश सत्य । म्हणे करीन धर्म पुढें ॥५॥

अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें ।
करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥६॥

अल्पोदकीं जैसा मत्स्य । तैसें मनुष्य अल्पायुष्य ।
जंववरी असे प्राणी सुरस । धर्म करावा परियेसा ॥७॥

जैसा सूर्याचा रथ चाले । निमिष होतां शीघ्रकाळें ।
बावीस सहस्त्र गांव पळे । तैसें आयुष्य क्षीण होय ॥८॥

पर्जन्य पडतां वृक्षावरी । उदक राहे पर्णाग्रीं ।
स्थिर नव्हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥९॥

तैसें शरीर नव्हे स्थिर । जीवित्वा मरण निर्धार ।
यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हें नश्य जाणा ॥१०॥

याचि कारणें देहासी । विश्वासूं नये परियेसीं ।
मृत्यु असे हा सहवासी । धर्म करावा तात्काळीं ॥११॥

पिकलें पान वृक्षीं जैसें । लागलें असें सूक्ष्मवेशें ।
तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥१२॥

एखादा नर कळंतरासी । द्रव्य देतो परियेसी ।
दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लक्षीतसे ॥१३॥

जैशा समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका ।
परतोनि न येती जन्मभूमिका । तैसें आयुष्‍य न परते ॥१४॥

अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्चयें जाणोन ।
पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥१५॥

जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं ।
तया यमासि करुणा नाहीं । करावें पुण्य तात्काळ ॥१६॥

पुत्र दारा धन गोधन । आयुष्‍य देह येणें-गुण ।
जे जन निश्चित म्हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥१७॥

जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं ।
तैसें या शरीरासी । वृद्धाप्य भक्षी अवधारा ॥१८॥

याकारणें तारुण्यपणीं । करावें पुण्य विद्वज्जनीं ।
आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥१९॥

जो यमाचा असेल इष्‍ट । त्याणें करावा आळस हट्ट ।
अमरत्वें असेल जो सुभट । त्याणें पुढें धर्म करावा ॥२०॥

संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्‍प असे मोगरी ।
सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥२१॥

जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अव्यक्त ।
तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥२२॥

ऐसें नानापरी देखा । बोधिता झाला जननीजनकां ।
विस्मय करिती सभालोक । बाळक केवीं तत्त्व सांगतो ॥२३॥

ऐकोनि पुत्राचें वचन । माता करीतसे नमन ।
देवा निरोपिलें ज्ञान । विनंति माझी परिसावी ॥२४॥

तुवां निरोपिलें आम्हांसी । पुत्र चवघे होतील ऐसी ।
विश्वास नव्हे गा मानसीं । कुळदेवता पुत्रराया ॥२५॥

जंववरी होय एक सुत । तंववरी रहावें समीपत ।
निरोप नेदीं तंववरी सत्य । म्हणोनि विनवी तयेवेळीं ॥२६॥

माझें वचन अव्हेरुनि । जरी जाशील निघोनि ।
प्राण देईन तत्क्षणीं । हा निश्चय अवधारीं ॥२७॥

पुत्र नव्हसी तूं आम्हांसी । आमुचें कुळदैवत होसी ।
सत्य करीं गा वचनासी । बोल आपुले दातारा ॥२८॥

ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू बोलती हांसोन ।
आमचे बोल सत्य जाण । तुझें वाक्य निर्धारीन पां ॥२९॥

तुतें होतांचि पुत्र दोनी । निरोप द्यावा संतोषोनि ।
मग न राहें ऐक जननी । बोल आपुले सत्य करीं ॥३०॥

संवत्सर एक तुझ्या घरीं । राहूं माते निर्धारीं ।
वासना पुरतील तुझ्या जरी । मग निरोप दे मज ॥३१॥

ऐसी करुनियां निगुती । राहिले श्रीगुरु अतिप्रीतीं ।
वेदाभ्यास शिकविती । शिष्यवर्गा बहुतांसी ॥३२॥

नगरलोक विस्मय करिती । अभिनव झालें ऐसें म्हणती ।
बाळ पहा हो वर्षे साती । वेद चारी सांगतसे ॥३३॥

विद्वानांहूनि विद्वान विद्यार्थी । तीनी वेद पढती ।
षट्‌शास्‍त्री जे म्हणविती । तेही येती शिकावया ॥३४॥

येणेंपरी तया घरीं । राहिले गुरु प्रीतिकरीं ।
माता झाली गरोदरी । महानंद करीतसे ॥३५॥

नित्य पूजिती पुत्रासी । ठेवूनि भाव कुळदैवत ऐसी ।
निधान लाधे एखाद्यासी । काय सांगों संतोष त्यांचा ॥३६॥

तंव नवमास जाहली अंतर्वत्‍नी । माता झाली प्रसूती ।
पुत्र झाले युग्‍म ख्याती । अतिसुंदर परियेसा ॥३७॥

पुत्र झाले उल्हास थोर । मातापित्या संतोष फार ।
आशीर्वचन असे गुरू । असत्य केवीं होईल ॥३८॥

याकारणें गुरुवचन । सत्य मानावें विद्वज्जनें ।
जैसें असेल अंतःकरण । तैसें होईल परियेसा ॥३९॥

ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक ।
खेळवीतसे माता ऐक । आले श्रीगुरू तयांजवळी ॥४०॥

जननी ऐक माझे वचना । झाली तुझी मनकामना ।
दोघे पुत्रनिधाना । पूर्णायुषी आहेति जाण ॥४१॥

आणखी होतील दोघे कुमारक । त्यानंतर कन्या एक ।
असाल नांदत अत्यंत सुख । वासना पुरतील तुझी जाणा ॥४२॥

आतां आमुतें निरोपावें । जाऊं आम्ही स्वभावें ।
संतोषरुपी तुम्हीं व्हावें । म्हणोनि निरोप घेती तयेवेळीं ॥४३॥

संतोषोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा ।
स्वामी आमुच्या कुळदेवता । अशक्‍य आम्ही बोलावया ॥४४॥

न कळे आम्हां स्वरुपज्ञान । तुझें स्वरुप नकळे कवणा।
मायामोहें वेष्‍टोन कामना । नेणोंचि महिमान तुझें ॥४५॥

मायाप्रपंचें वेष्‍टोनि । तुतें जरी सुत म्हणोनि ।
एके समयीं निष्‍ठुर बोलों वचनीं । क्षमा करणें स्वामिया ॥४६॥

सहभोजन-शयनासनीं । तुतें गांजों भुकेजोनि ।
कडे न घेंचि उबगोनि । क्षमा करीं गा देवराया ॥४७॥

तारक आमुचे वंशासी । बापा तूं अवतरलासी ।
प्रदोषपूजा फळासी । आली मातें स्वामिया ॥४८॥

आतां आम्हां काय गति । सांगा स्वामी कृपामूर्ती ।
जननमरण यातनयाती । कडे करावें दातारा ॥४९॥

सगरांवरी जैसी गंगा । तैसा तुवां आलासि चांगा ।
पावन केलेंसि माझे अंगा । उभयकुळें बेचाळीस ॥५०॥

आम्हां ठेविसी कवणेपरी । या धुरंधर संसारीं ।
तुझें दर्शन नोहे तरी । केवीं वांचों प्राणात्मजा ॥५१॥

ऐकोनि मातापितयांचें वचन । बोलती श्रीगुरू आपण ।
जे जे समयीं तुमचें मन । स्मरण करील आम्हांसी ॥५२॥

स्मरण करितां तुम्हांजवळी । असेन जननी मी तात्काळीं ।
न करावी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे ॥५३॥

आणिक कन्या पुत्र तीनी । होतील ऐक तूं भवानी ।
दैन्य नाहीं तुमच्या भुवनीं । सदा श्रीमंत नांदाल ॥५४॥

जन्मांतरीं परमेश्वरासी । पूजा केली तुवां प्रदोषीं ।
याची महिमा आहे ऐसी । जन्मोजन्मीं श्रियायुक्त ॥५५॥

इह सौख्य होय ऐक । देहांतीं जाणा परम लोक ।
पूजा करितां पिनाक । पुनर्जन्म तुम्हां नाहीं ॥५६॥

तुवां आराधिला शंकर । आम्हां करविला अवतार ।
वासना पुरेल तुझा भार । आम्हां निरोप दे आतां ॥५७॥

पुनर्दर्शन तुम्हांसी । होईल ऐका वर्षे-तीसीं ।
जावोनि बदरीवनासी । म्हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥

निरोप घेवोनि तये वेळां । श्रीगुरू निघाले अवलीळा ।
नगरलोक येती सकळा । मातापिता बोळविती ॥५९॥

म्हणती समस्त नगरनारी । तपासी निघाला ब्रह्मचारी ।
होईल पुरुष अवतारी । मनुष्यदेही दिसतसे ॥६०॥

एक म्हणती पहा हो नवल । तपासी निघाला असे बाळ ।
मातापिता सुखें केवळ । निरोप देती कौतुकें ॥६१॥

कैसें यांचें अंतःकरण । जैसा हो कां पाषाण ।
मन करुनि निर्वाण । बोळविताति पुत्रासी ॥६२॥

एक म्हणती नव्हे बाळ । होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ ।
अनुमान नव्हे हा निश्चळ । वेद केवीं म्हणतसे ॥६३॥

सात वर्षांचें बाळक देखा । वेद म्हणतो अखिल शाखा ।
मनुष्यमात्र नव्हे ऐका । ऐसें म्हणती साधुजन ॥६४॥

ऐसें म्हणोनि साधुजन । करिताति साष्‍टांगीं नमन ।
नानापरी स्तोत्रवचन । करिते झाले अवधारा ॥६५॥

नमन करोनि सकळिक । आले आपुले गृहांतिक ।
पुढें जाती जननीजनक । पुत्रासवें बोळवीत ॥६६॥

निजस्वरुप जननियेसी । दाविता झाला परियेसीं ।
श्रीपादश्रीवल्लभ-द्त्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥६७॥

त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर ।
निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥६८॥

जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
आमुचें पुण्य होतें थोरू । म्हणोनि देखिले तुमचे चरण ॥६९॥

तू तारक विश्वासी । आम्हां उद्धरिलें विशेषीं ।
पुनर्दर्शन आम्हांसी । द्यावें म्हणोनि विनविती ॥७०॥

ऐसें म्हणोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा ।
अलिंगिती श्रीगुरुनाथा । स्नेहभावेंकरुनियां ॥७१॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । आश्वास केला अतिप्रीतीं ।
पुनर्दर्शन हो निश्चितीं । देईन म्हणती तये वेळीं ॥७२॥

ऐसें तयां संभाषोनि । निरोप घेतला तत्क्षणीं ।
परतोनि आली जनकजननी । येती संतोषोनि मंदिरांत ॥७३॥

वरदमूर्ति श्रीगुरुराणा । निघाला जावया बदरीवना ।
पातला आनंदकानना । वाराणसी क्षेत्रासी ॥७४॥

अविमुक्त वाराणसी पुरी । क्षेत्र थोर सचराचरीं ।
विश्वेश्वर अवधारीं । अनुपम्य असे त्रिभुवनीं ॥७५॥

राहूनियां तया स्थानीं । अनुष्‍ठिती गुरुशिरोमणी ।
विश्वेश्वराचे दर्शनीं । पूजा करिती आत्मारामासी ॥७६॥

येणेंपरी तया स्थानीं । क्वचित्काळ श्रीगुरुमुनि ।
अष्‍टांगयोगेंकरुनि । तप करिती परियेसा ॥७७॥

तया काशीनगरांत । तापसी असती आणिक बहुत ।
संन्यासी यती अवधूत । तप करिती दारुण ॥७८॥

तयांत श्रीगुरू ब्रह्मचारी । योगाभ्यासधुरंधरीं ।
करिताति ; तपस्वी येरी । अभिनव करिती मनांत ॥७९॥

म्हणती पहा हो ब्रह्मचारी । तप करितो नानापरी ।
कैसें वैराग्य याचे उदरीं । निर्लिप्‍त असे परियेसा ॥८०॥

शरीरस्वार्थ नाहीं यासी । योग्य होय हा संन्यासीं ।
स्नान करितो त्रिकाळेसीं । मणिकर्णिका तीर्थांत ॥८१॥

ऐसें स्तोत्र नित्य करिती । समस्त संन्यासी येती ।
वृध्द होता एक यति । 'कृष्णसरस्वती' नामें ॥८२॥

तो केवळ ब्रह्मज्ञानी । तपस्वी असे महामुनि ।
सदा देखोनियां नयनीं । स्नेहभावें भावीतसे ॥८३॥

म्हणे समस्त यतीश्वरांसी । न म्हणा नर ब्रह्मचारीसी ।
अवतारपुरुष अतितापसी । विश्ववंद्य दिसतसे ॥८४॥

वयसा धाकुटा म्हणोनि । नमन न कराल तुम्ही मुनी ।
प्रख्यात मूर्ति हा त्रिभुवनीं । आम्हां वंद्य असे देखा ॥८५॥

वार्धक्यपणें आम्ही यासी । वंदितां दुःख सकळांसी ।
विशेष आम्ही संन्यासी । मूर्ख लोक निंदिती ॥८६॥

याकारणें आम्ही यासी । विनवूं, परोपकारासी ।
संन्यास देता, समस्तांसी । भक्ति होईल स्थिर मनीं ॥८७॥

लोकानुग्रहानिमित्त । हा होय गुरु समर्थ ।
याचे दर्शनमात्रें पुनीत । आम्ही परियेसा ॥८८॥

याकारणें बाळकासी । विनवूं आम्ही विनयेसीं ।
आश्रम घ्यावा संन्यासी । पूजा करुं एकभावें ॥८९॥

म्हणोनि आले तया जवळीं । विनविताति मुनी सकळी ।
ऐक तापसी स्तोममौळी । विनंति असे परियेसा ॥९०॥

लोकानुग्रहाकारणें । तुम्हीं आतां संन्यास घेणें ।
आम्हां समस्तां उद्धरणें । पूजा घेणें आम्हां करवीं ॥९१॥

या कलियुगीं संन्यास म्हणोन । निंदा करिती सकळै जन ।
स्थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥९२॥

श्लोक ॥ यज्ञदानं गवालंभं संन्यासं पलपैतृकम्‌ ।
देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत्‌ ॥९३॥

टीका ॥ यज्ञ दान गवालंभन । संन्यास घेतां अतिदूषण ।
पलपैतृक भ्रातांगना । करुं नये म्हणताति ॥९४॥

करितां कलियुगांत । निषिद्ध बोलती जन समस्त ।
संन्यासमार्ग सिद्धांत । वेदसंमत विख्यात ॥९५॥

पूर्वी ऐसें वर्तमानीं । निषेध केला सकळही जनीं ।
श्रीशंकराचार्य अवतारोनि । स्थापना केली परियेसा ॥९६॥

तयावरी इतुके दिवस । चालत आला मार्ग संन्यास ।
कलि प्रबळ होतां नाश । पुनरपि निंदा करिताती ॥९७॥

आश्रमाचा उद्धार । सकळ जनां उपकार ।
करावा कृपासागर । म्हणती सकळ मुनिजन ॥९८॥

ऐकोनि त्यांची विनंति । श्रीगुरुमुनि आश्रय घेती ।
वृद्ध कृष्णसरस्वती । तयापासूनि परियेसा ॥९९॥

ऐसें म्हणतां सिद्धमुनि । विनवीतसे नामकरणी ।
संदेह होतो माझे मनीं । कृपानिधि मुनिराया ॥१००॥

म्हणती श्रीगुरू तोचि जगद्गुरू । त्यातें झाला आणिक गुरु ।
त्रयमूर्तीचा अवतारु । कवणेपरी दिसतसे ॥१॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । सांगेन याची स्थिति कैसी ।
पूर्वी श्रीरघुनाथासी । झाला वसिष्‍ठ केवीं गुरु ॥२॥

आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी । सांदीपनी जाहला गुरु कैसी ।
अवतार होतांचि मानुषीं तयापरी रहाटावें ॥३॥

याकारणें श्रीगुरुमूर्ती । गुरु केला तो कृष्णसरस्वती ।
बहुकाळींचा होता यति । म्हणोनि त्यातें मानिलें ॥४॥

शिष्य म्हणे सिद्धासी । स्वामी कथा निरोपिलीसी ।
वृद्ध कृष्णसरस्वतीसी । गुरु केलें म्हणोनियां ॥५॥

समस्त यतीश्वरांहून । तयासि दिधला बहुमान ।
कृष्णसरस्वती तो पूर्वी कोण । कोण गुरुचें मूळपीठ ॥६॥

विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें कृपेसीं ।
त्याणें माझे मानसीं । संतोष होईल स्वामिया ॥७॥

ऐसें शिष्य विनवितां । तंव सांगे विस्तारता ।
मूळपीठ आद्यंता । गुरुसंतति परियेसा ॥८॥

आदिपीठ 'शंकर' गुरु । तदनंतर 'विष्णु' गुरु ।
त्यानंतर 'चतुर्वक्‍त्र' गुरु । हें मूळपीठ अवधारीं ॥९॥

तदनंतर 'वसिष्‍ठ' गुरु । तेथोनि 'शक्ति', 'पराशरु' ।
त्याचा शिष्य 'व्यास' थोरु । जो कां अवतार विष्णूचा ॥११०॥

तयापासूनि 'शुक' गुरु जाण । 'गौडपादाचार्य' सगुण ।
आचार्य 'गोविंद' तयाहून । पुढें आचार्य तो 'शंकर' जाहला ॥११॥

तदनंतर 'विश्वरुपाचार्य' । पुढें 'ज्ञानबोधीगिरिय' ।
त्याचा शिष्य 'सिंहगिरिय' । 'ईश्वरतीर्थ' पुढें झाले ॥१२॥

तदनंतर 'नृसिंहतीर्थ' । पुढें शिष्य 'विद्यातीर्थ' ।
'शिवतीर्थ', 'भारतीतीर्थ' । गुरुसंतति अवधारीं ॥१३॥

मग तयापासोनि । 'विद्यारण्य' श्रीपादमुनि ।
'विद्यातीर्थ' म्हणोनि । पुढें झाला परियेसा ॥१४॥

त्याचा शिष्य 'मळियानंद' । 'देवतीर्थसरस्वती' वृंद।
तेथोनि 'सरस्वतीयादवेंद्र' । गुरुपीठ येणेंपरी ॥१५॥

यादवेंद्र मुनीचा शिष्य । तोचि 'कृष्णसरस्वती' विशेष ।
बहुकाळींचा संन्यासी । म्हणोनि विशेष मानिती ॥१६॥

येणेंपरी श्रीगुरुनाथ । आश्रम घेती चतुर्थ ।
संन्यासमार्गस्थापनार्थ । श्रीनृसिंहसरस्वती ॥१७॥

समस्त वेदांचा अर्थ । सांगता झाला श्रीगुरुनाथ ।
म्हणोनि वंदिती समस्त । तया काशी नगरांत ॥१८॥

ख्याति केली अतिगहनी । तया वाराणसीभुवनीं ।
यति समस्त येऊनि । सेवा करिती श्रीगुरुची ॥१९॥

मग निघाले तेथोनि । बहुत शिष्य-समवेत मुनि ।
उत्तरतीर्थ बदरीवनीं । अनंत तीर्थे पहावया ॥१२०॥

सव्य घालूनि मेरुसी । तीर्थे नवखंड क्षितीसी ।
सांगतां विस्तार बहुवसी । ऐक शिष्या नामकरणी ॥२१॥

समस्त तीर्थे अवलोकीत । सवें शिष्य-यतींसहित ।
भूमिप्रदक्षिणा करीत । आले गंगासागरासी ॥२२॥

सिद्ध म्हणे नामांकिता । समस्त चरित्र सांगतां ।
विस्तार होईल बहु कथा । म्हणोनि तावन्मात्र सांगतों परियेसीं ॥२३॥

समस्त महिमा सांगावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
अनंत महिमा त्रैमूर्तीसी । गुरुचरित्र परियेसीं ॥२४॥

गंगासागरापासाव । तटाकयात्रा करीत देव ।
प्रयागस्थानीं गुरुराव । येते झाले परियेसा ॥२५॥

तया स्थानीं असतां गुरू । आला एक द्विजवरु ।
'माधव' नामें असे विप्रु । श्रीगुरुसी भेटला ॥२६॥

ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं ।
चतुर्थाश्रम तयासी । देते झाले परियेसा ॥२७॥

नाम 'माधवसरस्वती' । तया शिष्यातें ठेविती ।
तयावरी अतिप्रीती । शिष्यांमध्यें परियेसा ॥२८॥

सिद्ध म्हणे नामकरणी । शिष्य झाले येणेगुणीं ।
अखिल यतीनामकरणी । सांगेन ऐका एकचित्तें ॥२९॥

गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु ।
ऐकतां होय महाज्ञानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३०॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं-गुरुपरंपरा-कथनं नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय तेरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां ।
करसंपुट जोडूनि जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥

जय जया सिद्ध मुनी । तूं तारक या भवार्णी ।
सांगितलें ज्ञान प्रकाशोनि । स्थिर जाहलें मन माझें ॥२॥

गुरुचरित्रकथामृत । सेवितां तृष्णा अधिक होत ।
शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपानिधि ॥३॥

गुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुम्हीं विस्तारोनु ।
तृप्त नव्हे माझें मनु । आणखी अपेक्षा होतसे ॥४॥

क्षुधेंकरुनि पीडिलें ढोर । जैसें पावे तृणबिढार ।
त्यातें होय मनोहर । नवचे तेथोनि परतोनि ॥५॥

एखादा न देखे तक्र स्वप्नीं त्यासी मिळे क्षीरबरणी ।
नोहे मन त्याचे धणी । केवीं सोडी तो ठाव ॥६॥

तैसा आपण स्वल्पज्ञानी नेणत होतों गुरु-निर्वाणी ।
अविद्यामाया वेष्‍टोनि । कष्‍टत होतों स्वामिया ॥७॥

अज्ञानतिमिररजनीसी । ज्योतिस्वरुप तूंचि होसी ।
प्रकाश केलें गा आम्हांसी । निजस्वरुप श्रीगुरुचें ॥८॥

तुवां केले उपकारासी । उत्तीर्ण काय होऊं सरसी ।
कल्पवृक्ष दिल्हेयासी । प्रत्युपकार काय द्यावा ॥९॥

एखादा देतां चिंतामणी । त्यासी उपकार काय धरणीं ।
नाहीं दिधलें न ऐकों कानीं । कृपामूर्ति सिद्धराया ॥१०॥

ऐशा तुझिया उपकारासी । उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसीं ।
म्हणोनि लागतसे चरणांसी । एकोभावेंकरोनियां ॥११॥

स्वामींनीं निरोपिला धर्म-अर्थ । अधिक झाला मज स्वार्थ ।
उपजला मनीं परमार्थ । गुरुसी भजावें निरंतर ॥१२॥

प्रयागीं असतां गुरुमूर्ति । माधवसरस्वतीस दीक्षा देती ।
पुढें काय वर्तली स्थिति । आम्हांप्रती विस्तारावें ॥१३॥

ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्धमुनि संतोषोन ।
मस्तकीं हस्त ठेवून । आश्वासिती तया वेळीं ॥१४॥

धन्य धन्य शिष्या सगुण । तुज लाधले श्रीगुरुचरण ।
संसार तारक भवार्ण । तूंचि एक परियेसा ॥१५॥

तुवां ओळखिली श्रीगुरुची सोय । म्हणोनि पुससी भक्तिभावें ।
संतोष होतो आनंदमय । तुझ्या प्रश्नेंकरुनियां ॥१६॥

सांगेन ऐक एकचित्तें । चरित्र गुरुचें विख्यातें ।
उपदेश देऊनि माधवातें । होते क्वचित्काळ तेथेंचि ॥१७॥

असतां तेथें वर्तमानीं । प्रख्यात झाली महिमा सगुणी ।
शिष्य झाले अपार मुनि । मुख्य माधवसरस्वती ॥१८॥

तया शिष्यांचीं नामें सांगतां । विस्तार होईल बहु कथा ।
प्रख्यात असती नामें सात । सांगेन ऐक एकचित्तें ॥१९॥

बाळसरस्वती कृष्णसरस्वती । उपेंद्र-माधवसरस्वती ।
पांचवा असे आणीक यति । सदानंदसरस्वती देखा ॥२०॥

ज्ञानज्योतिसरस्वती एक । सातवा सिद्ध आपण ऐक ।
अपार होते शिष्य आणिक । एकाहूनि एक श्रेष्‍ठ पैं ॥२१॥

त्या शिष्यांसमवेत । श्रीगुरु निघाले दक्षिणपंथ ।
समस्त क्षेत्रें पावन करित । आले पुन्हा कारंजनगरासी ॥२२॥

भेटी झाली जनकजननी । येवोनि लागताति चरणीं ।
चतुर्वर्ग भ्राते भगिनी । समस्त भेटती स्वामिया ॥२३॥

देखानियां श्रीगुरुमूर्तीसी नगरलोक अत्यंत हर्षी ।
आले समस्त भेटीसी । पूजा करिती परोपरी ॥२४॥

घरोघरीं श्रीगुरुसी । पाचारिती भिक्षेसी ।
जाहले रुपें बहुवसी । घरोघरीं पूजा घेती ॥२५॥

समस्त लोक विस्मय करिती । अवतार हा श्रीविष्णु निश्चितीं ।
वेषधारी दिसतो यति । परमपुरुष होय जाणा ॥२६॥

यातें नर जे म्हणती । ते नर जाती नरकाप्रती ।
कार्याकारण अवतार होती । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥२७॥

जननीजनक येणें रीतीं । पूजा करिती भावभक्तीं ।
श्रीगुरू झाले श्रीपादयति । जातिस्मृति जननीसी ॥२८॥

देखोनि जननी तये वेळीं । माथा ठेवी चरणकमळीं ।
सत्यसंकल्प चंद्रमौळी । प्रदोषपूजा आली फळा ॥२९॥

पतीस सांगे तया वेळीं । पूर्वजन्माचें चरित्र सकळीं ।
विश्ववंद्य पुत्र प्रबळी । व्हावा म्हणोनि आराधिलें म्यां ॥३०॥

याचि श्रीपाद-ईश्वराचें । पूजन केलें मनोवाचें ।
प्रसिद्ध झालें जन्म आमुचें । साफल्य केलें परियेसा ॥३१॥

म्हणोनि नमिती दोघेजणीं । विनविताति कर जोडूनि ।
उद्धरावें या भवार्णी । जगन्नाथा यतिराया ॥३२॥

श्रीगुरू म्हणती तयांसी । एकादे काळीं परियेसीं ।
पुत्र होय संन्यासी । उद्धरील कुळें बेचाळीस ॥३३॥

त्यासी शाश्वत ब्रह्मलोक । अचळ पद असे देख ।
त्याचे कुळीं उपजतां आणिक । त्यासीही ब्रह्मपद परियेसा ॥३४॥

यमाचे दुःखें भयाभीत । नोहे त्याचे पितृसंततींत ।
पूर्वज जरी नरकीं असत । त्यांसी शाश्वत ब्रह्मपद ॥३५॥

याकारणें आम्हीं देखा । घेतला आश्रम विशेखा ।
तुम्हां नाहीं यमाची शंका । ब्रह्मपद असे सत्य ॥३६॥

ऐसें सांगोनि तयांसी । आश्वासीतसे बहुवसी ।
तुमचे पुत्र शतायुषी । अष्‍टैश्चर्ये नांदती ॥३७॥

त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही । पहाल सुखें तुमचे नयनीं ।
पावाल क्षेम काशीभुवनीं । अंतकाळीं परियेसा ॥३८॥

मुक्तिस्थान काशीपुर । प्रख्यात असे वेदशास्‍त्र ।
न करा मनीं चिंता मात्र । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥३९॥

त्यांची कन्या असे एक । नाम तिचें 'र‍त्‍नाई' विशेष ।
श्रीगुरुसी नमूनि ऐक । विनवीतसे परियेसा ॥४०॥

विनवीतसे परोपरी । स्वामी मातें तारीं तारीं ।
बुडोनि जात्यें भवसागरीं । संसारमाया वेष्‍टोनियां ॥४१॥

संसार-तापत्रयासी । आपण भीतसें परियेसीं ।
निर्लिप्‍त करीं गा आम्हांसी । आपण तपासी जाईन ॥४२॥

ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु निरोपिताति आपण ।
स्त्रियांसी पतिसेवाचरण । तेंचि तप परियेसा ॥४३॥

येणें या भावार्णवासी । कडे पडती परियेसीं ।
जैसा भाव असे ज्यासी । तैसें होईल परियेसा ॥४४॥

उतरावया पैल पार । स्‍त्रियांसी असे तो भ्रतार ।
मनें करोनि निर्धार । भजा पुरुष शिवसमानी ॥४५॥

त्यासी होय उद्धार गति । वेदपुराणें वाखाणिती ।
अंतःकरणीं न करीं खंती । तूतें गति होईल जाण ॥४६॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
श्रीगुरुमूर्ति ब्रह्मज्ञान । विनवीतसें अवधारीं ॥४७॥

तूं जाणसी भविष्यभूत । कैसें मातें उपदेशीत ।
माझें प्रालब्ध कवणगत । विस्तारावें मजप्रति ॥४८॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । तुझी वासना असे तपासी ।
संचित पाप असे तुजसी । भोगणें असे परियेसा ॥४९॥

पूर्वजन्मीं तूं परियेसीं । चरणीं लाथिलें धेनूसी ।
शेजारी स्‍त्रीपुरुषांसी । विरोधें लाविला कलह जाणा ॥५०॥

तया दोषास्तव देखा । तूतें बाधा असे अनेका ।
गायत्रीसी लाथिलें ऐका । तूं सर्वांगीं कुष्‍ठी होसील ॥५१॥

विरोध केला स्त्रीपुरुषांसीं । तुझा पुरुष होईल तापसी ।
तुतें त्यजील भरंवसीं । अर्जित तुझें ऐसें असे ॥५२॥

ऐकोनि दुःख करी बहुत । श्रीगुरुचरणीं असे लोळत ।
मज उद्धारावें गुरुनाथा त्वरित । म्हणोनि चरणीं लागली ॥५३॥

श्रीगुरू म्हणती ऐक बाळे । क्वचित्काळ असाल भले ।
अपरवयसा होतांचि काळें । पति तुझा यति होये ॥५४॥

तदनंतर तुझा देह । कुष्‍ठी होईल अवेव ।
भोगूनि स्वदेहीं वय । मग होईल तुज गति ॥५५॥

नासतां तुझा देह जाण । भेटी होईल आमुचे चरण ।
तुझें पाप होईल दहन । सांगेन क्षेत्र ऐक पां ॥५६॥

भीमातीर दक्षिण देशीं । असे तीर्थ पापविनाशी ।
तेथें जाय तूं भरंवसीं । अवस्था तुज घडलियावरी ॥५७॥

या भूमंडळीं विख्यात । तीर्थ असे अति समर्थ ।
गंधर्वपुर असे ख्यात । अमरजासंगम प्रसिद्ध जाण ॥५८॥

ऐसें सांगोनि तियेसी । श्रीगुरू निघाले दक्षिण देशीं ।
त्र्यंबक-क्षेत्रासी । आले, गौतमी-उद्धव जेथें ॥५९॥

शिष्यांसहित गुरुमूर्ति । आले नाशिकक्षेत्राप्रती ।
तीर्थमहिमा असे ख्याति । पुरणांतरीं परियेसा ॥६०॥

तीर्थमहिमा सांगतां । विस्तार होईल बहु कथा ।
संक्षेपमार्गे तुज आतां । सांगतसें परियेसीं ॥६१॥

त्या गौतमीची महिमा । सांगतां अपार असे आम्हां ।
बहिरार्णव-उदक उगमा । ब्रह्मांडाव्यतिरिक्त ॥६२॥

जटामुकुटीं तीर्थेश्वर । धरिली होती प्रीतिकर ।
मिळोनि समस्त ऋषीश्वर । उपाय केला परियेसा ॥६३॥

ब्रह्मऋषि गौतम देखा । तपस्वी असे विशेषा ।
व्रीहि पेरिले वृत्तीं ऐका । अनुष्‍ठानस्थानाजवळी ॥६४॥

पूर्वी मुनी सकळी । नित्य पेरुनि पिकविती साळी ।
ऐसे त्यांचे मंत्र बळी । महापुण्यपुरुष असती ॥६५॥

समस्त ऋषि मिळोनि । विचार करिती आपुले मनीं ।
ऋषिगौतम महामुनी । सर्वेश्वराचा मुख्य दास ॥६६॥

त्यासी घालितां सांकडें । गंगा आणील आपुलें चाडें ।
समस्तां आम्हां पुण्य घडे । गंगास्नानें भूमंडळीं ॥६७॥

श्र्लोक ॥ या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसाम्‌ ।
सा गतिः सर्वजंतूनां गौतमीतीरवासिनाम्‌ ॥६८॥

टीका ॥ ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी । कोटिवर्षे तपस्वियांसी ।
जे गति होय परियेसीं । ते स्नानमात्रें गौतमीच्या ॥६९॥

याकारणें गौतमीसी । आणावें यत्‍नें भूमंडळासी ।
सांकडें घालितां गौतमासी । आणितां गंगा आम्हां लाभ ॥७०॥

म्हणोनि रचिली माव एक । दुर्वेची गाय सवत्सक ।
करोनि पाठविली ऐक । गौतमाचे ब्रीहिभक्षणासी ॥७१॥

ऋषि होता अनुष्‍ठानीं । देखिलें धेनूसी नयनीं ।
निवारावया तत्क्षणीं । दर्भ पवित्र सोडिलें ॥७२॥

तेचि कुश जाहलें शस्‍त्र । धेनूसी लागलें जैसें वज्रास्त्र ।
पंचत्व पावली त्वरित । घडली हत्या गौतमासी ॥७३॥

मिळोनि समस्त ऋषिजन । प्रायश्चित्त देती जाण ।
गंगा भूमंडळीं आण । याविणें तुम्हां नाहीं शुद्धि ॥७४॥

याकारणें गौतमऋषीं । तप केलें सहस्त्र वर्षी ।
प्रसन्न झाला व्योमकेशी । वर माग म्हणितलें ॥७५॥

गौतम म्हणे सर्वेश्वरा । तुवां देशील मज वरा ।
उद्धरावया सचराचरा । द्यावी गंगा भूमंडळासी ॥७६॥

गौतमाचे विनंतीसी । निरोप दिधला गंगेसी ।
घेवोनि आला भूमंडळासी । पापक्षालनार्थ मनुष्यांचे ॥७७॥

ऐसी गंगाभागीरथी । कवणा वर्णावया सामर्थ्य।
याचि कारणें श्रीगुरुनाथ । आले ऐक नामधारका ॥७८॥

ऐशी गौतमीतटाकयात्रा । श्रीगुरू आपण आचरीत ।
पुढें मागुती लोकानुग्रहार्थ । आपण हिंडे परियेसा ॥७९॥

तटाकयात्रा करितां देख । आले श्रीगुरु मंजरिका ।
तेथें होता मुनि एक । विख्यात 'माधवारण्य' ॥८०॥

सदा मानसपूजा त्यासी । नरसिंहमूर्ति परियेसीं ।
देखता झाला श्रीगुरुसी । मानसमूर्ति जैसी देखे ॥८१॥

विस्मित होऊनि मानसीं । नमिता झाला श्रीगुरुमूर्तीसी ।
स्तोत्र करी बहुवसी । अतिभक्तीकरुनियां ॥८२॥

श्र्लोक ॥ यद्दिव्यपादद्वयमेवसाक्षाद्‌ , अधिष्‍ठितं देवनदीसमीपे ।
य उत्तरे तीरनिवासिरामो, लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यम्‌ ॥८३॥

ओंव्या ॥ येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी माधवारण्य हर्षी ।
श्रीगुरू म्हणती संतोषीं । तया माधवारण्यासी ॥८४॥

श्र्लोक ॥ अत्यंतमार्गस्थितिमार्गरुपं, अत्यंतयोगादधिकारतत्त्वम्‌ ।
मार्गं च मार्गं च विचिन्वतो मे, मार्गोदयं माधव दर्शये ते ॥८५॥

ओंव्या ॥ ऐसें श्रीगुरू तयासी आश्वासोनि म्हणती हर्षी ।
निजस्वरुप तयासी । दाविते झाले परियेसा ॥८६॥

श्रीगुरुचें स्वरुप देखोनि । संतोषी झाला तो मुनि ।
विनवीतसे कर जोडूनि । नानापरी स्तुति करी ॥८७॥

जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तीचा अवतारू ।
लोकां दिससी नरु । परमपुरुषा जगज्ज्योति ॥८८॥

तूं तारक विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी ।
कृतार्थ केलें आम्हांसी । दर्शन दिधलें चरण आपुले ॥८९॥

ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो तापसी ।
संतोष होऊन अति हर्षी । आश्वासिती तया वेळीं ॥९०॥

म्हणती श्रीगुरू तयासी । सिद्धि झाली तुझ्या मंत्रासी ।
तुज सद्गति भरंवसीं । ब्रह्मलोक प्राप्त होय ॥९१॥

नित्यपूजा तूं मानसीं । करिसी नृसिंहमूर्तीसी ।
प्रत्यक्ष होईल परियेसीं । न करीं संशय मनांत ॥९२॥

ऐसें सांगोनि तयासी । श्रीगुरू निघाले परियेसीं ।
आले वासरब्रह्मेश्वरासी । गंगातीर महाक्षेत्र ॥९३॥

तया गंगातटाकांत । श्रीगुरू समस्त शिष्यांसहित ।
स्नान करितां गंगेंत । आला तेथें विप्र एक ॥९४॥

कुक्षिव्यथा असे बहुत । तटाकीं असे लोळत ।
उदरव्यथा अत्यंत । त्यजूं पाहे प्राण देखा ॥९५॥

पोटव्यथा बहु त्यासी । नित्य करी तो उपवासासी ।
भोजन केलिया दुःख ऐसी । प्राणांतिक होतसे ॥९६॥

याकारणें द्विजवर । सदा करी फलाहार ।
अन्नासी त्यासी असे वैर । जेवितां प्राण त्यजूं पाहे ॥९७॥

पक्षमासां भोजन करी । व्यथा उठे त्याचे उदरीं ।
ऐसा किती दिवसवरी । कष्‍टत होता तो द्विज ॥९८॥

पूर्व दिवसीं तया ग्रामीं । आला सण महानवमी ।
जेविला मिष्‍टान्न मनोधर्मी । मासें एक पारणें केलें ॥९९॥

भोजन केलें अन्न बहुत । त्याणें पोट असे दुखत ।
गंगातीरीं असे लोळत । प्राण त्वरित त्यजूं पाहे ॥१००॥

दुःख करी द्विज अपार । म्हणे गंगेंत त्यजीन शरीर ।
नको आतां संसार । पापरुपें वर्तत ॥१॥

अन्न प्राण अन्न जीवन । कवण असेल अन्नावीण ।
अन्न वैरी झालें जाण । मरण बरवें आतां मज ॥२॥

मनीं निर्धार करोनि । गंगाप्रवेश करीन म्हणोनि ।
पोटीं पाषाण बांधोनि । गंगेमध्यें निघाला ॥३॥

मनीं स्मरे कर्पूरगौर । उपजलों आपण भूमिभार ।
केले नाहीं परोपकार । अन्नदानादिक देखा ॥४॥

न करीं पुण्य इह जन्मांत । जन्मांतरीं पूर्वी शत ।
पुण्यफळ असे दिसत । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥६॥

अपूर्ती पूजा ईश्वराची । केली असेल निंदा गुरुची ।
अवज्ञा केली मातापितयांची । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥७॥

अथवा पूर्वजन्मीं आपण । केलें असेल द्विजधिक्कारण ।
अतिथि आलिया न घालीं अन्न । वैश्वदेवसमयासी ॥८॥

अथवा मारिलें वोवरांसी । अग्नि घातला रानासी ।
वेगळें सांडूनि जनकजननींसी । स्त्रियेसहित मी होतों ॥९॥

मातापिता त्यजोनियां । असों सुखें जेवूनियां ।
पूर्वार्जवापासोनियां । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥११०॥

ऐसीं पापें आठवीत । विप्र जातो गंगेंत ।
तंव देखिलें श्रीगुरुनाथें । म्हणती बोलावा ब्राह्मणासी ॥११॥

आणा आणा त्या ब्राह्मणासी । प्राण त्यजितो कां सुखेसीं ।
आत्महत्या महादोषी । पुसों कवण कवणाचा ॥१२॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । गेले शिष्य धांवोनि ।
द्विजवरातें काढोनि । आणिलें श्रीगुरुसन्मुख ॥१३॥

अनाथासी कल्पतरु । दुःखिष्‍टासी कृपासागरू ।
पुसतसे श्रीगुरू । तया दुःखिष्‍ट विप्रासी ॥१४॥

श्रीगुरू म्हणती तयासी । प्राण कां गा त्यजूं पाहसी ।
आत्महत्या महादोषी । काय वृत्तांत सांग आम्हां ॥१५॥

विप्र म्हणे गा यतिराया । काय कराल पुसोनियां ।
उपजोनि जन्म वायां । भूमिभार जाहलों असें ॥१६॥

मास-पक्षां भोजन करितों । उदरव्यथेनें कष्‍टतों ।
साहूं न शकें प्राण देतों । काय सांगूं स्वामिया ॥१७॥

आपणासी अन्न वैरी असतां । केवीं वांचावें गुरुनाथा ।
शरीर सर्व अन्नगता । केवीं वांचूं जगद्गुरु ॥१८॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । तुझी व्यथा गेली परियेसीं ।
औषध असे आम्हांपासीं । क्षण एकें सांगों तुज ॥१९॥

संशय न धरीं आतां मनीं । भिऊं नको अंतःकरणीं ।
व्याधि गेली पळोनि । भोजन करी धणीवरी ॥१२०॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । स्थिर झाला अंतःकरणीं ।
माथा ठेवूनि श्रीगुरुचरणीं । नमन केलें तया वेळीं ॥२१॥

इतुकिया अवसरीं । तया ग्रामींचा अधिकारी ।
विप्र एक अवधारीं । आला गंगास्नानासी ॥२२॥

तंव देखिलें श्रीगुरुसी । येऊनि लागला चरणांसी ।
नमन केलें भक्तीसीं । मनोवाक्कायकर्मे ॥२३॥

आश्वासोनि तये वेळीं । पुसती श्रीगुरू स्तोममौळी ।
कवण नाम कवण स्थळीं । वास म्हणती तयासी ॥२४॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगतसे तो ब्राह्मण ।
गोत्र आपलें कौंडिण्य । आपस्तंब शाखेसीं ॥२५॥

नाम मज 'सायंदेव' असे । वास-स्थळ आपलें 'कडगंची'स ।
आलों असे उदरपूर्तीस । सेवा करितों यवनाची ॥२६॥

अधिकारपणें या ग्रामीं । वसों संवत्सर ऐका स्वामी ।
धन्य धन्य झालों आम्ही । तुमचे दर्शनमात्रेसीं ॥२७॥

तूं तारक विश्वासी । दर्शन दिधलें आम्हांसी ।
कृतार्थ झालों भरंवसीं । जन्मांतरींचे दोष गेले ॥२८॥

तुझा अनुग्रह होय ज्यासी । तरेल या भवार्णवासी ।
अप्रयत्‍नें आम्हांसी । दर्शन दिधलें स्वामिया ॥२९॥

श्र्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा ।
पापं तापं च दैन्यं च हरेच्छ्रीगुरुदर्शनम्‌ ॥१३०॥

टीका ॥ गंगा देखितांचि पापें जाती । चंद्रदर्शनें ताप नासती ।
कल्पतरुची ऐसी गति । दैन्यवेगळा करी जाण ॥३१॥

तैसे नव्हती तुमचे दर्शनगुण । पाप-ताप दैन्यहरण ।
देखिले आजि तुमचे चरण । चतुर्वर्गफल पावलों ॥३२॥

ऐशी स्तुति करुनि । पुनरपि लागला श्रीगुरुचरणीं ।
जगद्गुरु अश्वासोनि । निरोप देती तया वेळीं ॥३३॥

श्रीगुरू म्हणती तयासी । आमुचें वाक्य परियेसीं ।
जठरव्यथा ब्राह्मणासी । प्राणत्याग करीतसे ॥३४॥

उपशमन याचे व्याधीसी । सांगों औषध तुम्हांसी ।
नेवोनि आपुले मंदिरासी । भोजन करवीं मिष्‍टान्न ॥३५॥

अन्न जेवितां याची व्यथा । व्याधि न राहे सर्वथा ।
घेऊनि जावें आतां त्वरिता । क्षुधाक्रांत विप्र असे ॥३६॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
प्राणत्याग करितां भोजन । या ब्राह्मणासी होतसे ॥३७॥

जेविला काल मासें एका । त्याणें प्राण जातो ऐका ।
अन्न देतां आम्हांसी देखा । ब्रह्महत्या त्वरित घडेल ॥३८॥

श्रीगुरु म्हणती सायंदेवासी । आम्ही औषधी देतों यासी ।
अपूपान्न-माषेसीं । क्षीरमिश्रित परमान्न ॥३९॥

अन्न जेवितां त्वरितेसीं । व्याधि जाईल परियेसीं ।
संशय न धरीं तूं मानसीं । त्वरित न्यावें गृहासी ॥१४०॥

अंगीकारोनि तया वेळीं । माथा ठेवी चरणकमळीं ।
विनवीतसे करुणाबहाळी । यावें स्वामी भिक्षेसी ॥४१॥

अंगीकारोनि श्रीगुरुनाथ । निरोप देती हो कां त्वरित ।
सिद्ध म्हणे ऐक मात । नामधारक शिष्योत्तमा ॥४२॥

आम्ही होतों तये वेळीं । समवेत-शिष्य सकळीं ।
जठरव्यथेचा विप्र जवळी ; । श्रीगुरू गेले भिक्षेसी ॥४३॥

विचित्र झालें त्याचे घरीं । पूजा केली परोपरी ।
पतिव्रता त्याची नारी । 'जाखाई' म्हणिजे परियेसा ॥४४॥

पूजा करिती श्रीगुरुसी । षोडशोपचारें परियेसीं ।
तेणेंचि रीतीं आम्हांसी । शिष्यां सकळिकां वंदिलें ॥४५॥

श्रीगुरुपूजा-विधान । विचित्र केलें अतिगहन ।
मंडळ केलें रक्तवर्ण । एकेकासी पृथक्‌-पृथक्‌ ॥४६॥

पद्म रचूनि अष्‍टदळी । नानापरीचे रंगमाळी ।
पंचवर्ण चित्रमाळी । रचिली तियें परियेसा ॥४७॥

चित्रासन श्रीगुरुसी । तेणेंचिपरी सकळिकांसी ।
मंडळार्चनविधीसीं । करिती पुष्पगंधाक्षता ॥४८॥

संकल्पोनि विधीसीं । नमन केलें अष्‍टांगेसीं ।
माथा ठेवूनि चरणीं, न्यासी । पाद सर्वही अष्‍टांगीं ॥४९॥

षोडशोपचार विधीसीं । पंचामृतादि परियेसीं ।
रुद्रसूक्तमंत्रेसीं । चरण स्नापिले तये वेळीं ॥१५०॥

श्रीगुरुचरणीं अतिहर्षी । पूजा करीत षोडशी ।
तया विप्रा ज्ञान कैसी । चरणतीर्थ धरिता झाला ॥५१॥

तया चरणतीर्थासी । पूजा करीत भक्तीसीं ।
गीतवाद्यें आनंदेसीं । करी आरति नीरांजन ॥५२॥

अनुक्रमें श्रीगुरुपूजा । करिता झाला विधिवोजा ।
पुनरपि षोडशोपचारें पूजा । करीतसे भक्तीनें ॥५३॥

अक्षय वाणें आरति । श्रीगुरुसी ओंवाळिती ।
मंत्रघोष अतिभक्तीं । पुष्पांजळी करिता झाला ॥५४॥

अनेकपरी गायन करी । नमन करी प्रीतिकरीं ।
पतिव्रता असे नारी । पूजा करिती उभयवर्ग ॥५५॥

ऐसेपरी श्रीगुरुसी । पूजा केली परियेसीं ।
तेणेंचि विधीं शिष्यांसी । आम्हां समस्तांसी वंदिलें ॥५६॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । वर देती अतिप्रीतीं ।
तुझी संतती होईल ख्याति । गुरुभक्ति वंशोवंशीं ॥५७॥

तूं जाणसी गुरुचा वास । अभिवृद्धि होय वंशोवंश ।
पुत्रपौत्रीं नांदाल हर्षी । गुरुभक्ति येणेंपरी ॥५८॥

ऐसें बोलोनि द्विजासी । आशीर्वचन देती अतिहर्षी ।
नमन करुनि श्रीगुरुसी । ठाय घातले तये वेळीं ॥५९॥

नानापरीचें पक्क्वान्न । अपूपादि माषान्न ।
अष्‍टविध परमान्न । शर्करासहित निवेदिलें ॥१६०॥

शाक पाक नानापरी वाढताति सविस्तारीं ।
भोजन करिती प्रीतिकरीं । श्रीगुरुमूर्ति परियेसा ॥६१॥

जठरव्यथेच्या ब्राह्मणें । भोजन केलें परिपूर्ण ।
व्याधि गेली तत्क्षण । श्रीगुरूचे कृपादृष्‍टीनें ॥६२॥

परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय परियेसीं ।
दर्शन होतां श्रीगुरुसी । व्याधि कैंची सांग मज ॥६३॥

उदय जाहलिया दिनकरासी । संहार होतो अंधकारासी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैंचें तया घरीं ॥६४॥

ऐसेपरी श्रीगुरुनाथें । भोजन केलें शिष्यासहित ।
आनंद झाला तेथें बहुत । विस्मय करिती सकळै जन ॥६५॥

अभिनव करिती सकळ जन । द्विजासी वैरी होतें अन्न ।
औषध झालें तेंचि अन्न । व्याधि गेली म्हणताति ॥६६॥

सिद्ध म्हणे नामधारकास । श्रीगुरुकृपा होय ज्यास ।
जन्मांतरींचे जाती दोष । व्याधि कैंची त्याचे देहीं ॥६७॥

गंगाधराचा नंदन । सरस्वती सांगें विस्तारोन ।
गुरुचरित्र कामधेनु । ऐका श्रोते एकचित्तें ॥६८॥

जे ऐकती भक्तीनें । व्याधि नसती त्यांचे भुवना ।
अखिल सौख्य पावती जाणा । सत्यं सत्यं पुनः सत्यं ॥६९॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथानिरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १६९ ॥  ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय चौदावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका ।
प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥

जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा ।
पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥

उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं ।
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।
गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥

ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं ।
तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥

गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु ।
पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥

तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं ।
भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन ।
माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥

जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू ।
अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥

विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी ।
धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥

तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥

माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं ।
इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥

ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं ।
सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥

प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं ।
याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥

जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण ।
भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । अभयंकर आपुले हातीं ।
विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥

भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें ।
संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥

जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं ।
तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥

निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं ।
अखिलाभीष्‍ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥

तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं ।
अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥

ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण ।
जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥

कालांतक यम जैसा । यवन दुष्‍ट परियेसा ।
ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥

विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।
विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥२३॥।

कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्‍ट ॥२४॥

गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी ।
तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥

कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥

ज्याचे ह्रुदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण ।
काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥

ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय ।
श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥

ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन ।
सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥

ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं ।
प्राणांतक व्यथेसीं । कष्‍टतसे तये वेळीं ॥३०॥

स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई ।
छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥

स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी ।
लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥

येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि ।
वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥

संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र ।
गंगातीरीं असे वासर । श्रीगुरुचे चरणदर्शना ॥३४॥

देखोनियां श्रीगुरुसी । नमन करी तो भावेसीं ।
स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया द्विजा आश्वासिती ।
दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥

ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥

तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका ।
संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥

उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी ।
तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥

भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति ।
सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥

येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी विप्र भावेसीं ।
संतोषोनि विनयेसीं । श्रीगुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥

कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे ।
पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥

आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित ।
कलत्र पुत्र इष्‍ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥

न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्‍टें गेलीं दुःखें ।
म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥

ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरु निघाले तेथोनि ।
जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥

समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरु आले तीर्थे पहात ।
प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥

नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी।
होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥

गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु ।
सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥

पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु ।
मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या ४९ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय पंधरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

ऐक शिष्या नामकरणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली परियेसा ॥१॥

तूं मातें पुसतोसी । होत मन संतोषी ।
गौप्य व्हावया कारण कैसी । सांगेन ऐक एकचित्तें ॥२॥

महिमा प्रगट जाहली बहुत । तेणें भजती लोक अमित ।
काम्यार्थ व्हावे म्हणूनि समस्त । येती श्रीगुरुच्या दर्शना ॥३॥

साधु असाधु धूर्त सकळी । समस्त येती श्रीगुरुजवळी ।
वर्तमानीं खोटा कळी । सकळही शिष्य होऊं म्हणती ॥४॥

पाहें पां पूर्वी भार्गवराम अवतरोनि । निःक्षत्र केली मेदिनी ।
राज्य विप्रांसी देउनी । गेला आपण पश्चिमसमुद्रासी ॥५॥

पुनरपि जाती तयापासीं । तोही ठाव मागावयासी ।
याकारणें विप्रांसी । कांक्षा न सुटे परियेसा ॥६॥

उबगोनि भार्गवराम देखा । गेला सागरा मध्योदका ।
गौप्यरूपें असे ऐका । आणिक मागतील म्हणोनि ॥७॥

तैसे श्रीगुरुमूर्ति ऐक । राहिले गुप्त कारणिक ।
वर मागतील सकळिक । नाना याती येवोनियां ॥८॥

विश्वव्यापक जगदीश्वर । तो काय देऊं न शके वर ।
पाहूनि भक्ति पात्रानुसार । प्रसन्न होय परियेसा ॥९॥

याकारणें तया स्थानीं । श्रीगुरु होते गौप्यगुणीं ।
शिष्यां सकळांसि बोलावुनी । निरोप देती तीर्थयात्रे ॥१०॥

सकळ शिष्यां बोलावोनि । निरोप देती नृसिंहमुनि ।
समस्त तीर्थे आचरोनि । यावें भेटी श्रीशैल्या ॥११॥

ऐकोनि श्रीगुरुचे वचना । समस्त शिष्य धरिती चरणा ।
कृपामूर्ति श्रीगुरुराणा । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥१२॥

तुमचे दर्शनमात्रेंसी । समस्त तीर्थे आम्हांसी ।
आम्हीं जावें कवण ठायासी । सोडोनि चरण श्रीगुरुचे ॥१३॥

समस्त तीर्थे श्रीगुरुचरणीं । ऐसें बोलती वेदवाणी ।
शास्त्रींही तेंचि विवरण । असे स्वामी प्रख्यात ॥१४॥

जवळी असतां निधान । केवीं हिंडावें रानोरान ।
कल्पवृक्ष सांडून । केवीं जावें देवराया ॥१५॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । तुम्ही आश्रमी संन्यासी ।
राहूं नये पांच दिवशीं । एके ठायीं वास करीत ॥१६॥

चतुर्थाश्रम घेऊनि । आचरावीं तीर्थे भुवनीं ।
तेणें मनीं स्थिर होऊनि । मग रहावें एकस्थानीं ॥१७॥

विशेष वाक्य आमुचें एक । अंगीकारणें धर्म अधिक ।
तीर्थे हिंडूनि सकळिक । मग यावें आम्हांपाशीं ॥१८॥

'बहुधान्य' नाम संवत्सरासी । येऊं आम्ही श्रीशैल्यासी ।
तेथें आमुचे भेटीसी । यावें तुम्हीं सकळिक हो ॥१९॥

ऐसेंपरी शिष्यांसी । श्रीगुरु सांगती उपदेश ।
समस्त लागती चरणांस । ऐक शिष्या नामधारका ॥२०॥

शिष्य म्हणती श्रीगुरुस तुमचें वाक्य आम्हां परीस ।
जाऊं आम्ही भरंवसें । करुं तीर्थे भूमीवरी ॥२१॥

गुरुचें वाक्य जो न करी । तोचि पडे रौरव-घोरीं ।
त्याचें घर यमपुरीं । अखंड नरक भोगी जाणा ॥२२॥

जावें आम्हीं कवण तीर्था । निरोप द्यावा गुरुनाथा ।
तुझें वाक्य दृढ चित्ता । धरुनि जाऊं स्वामिया ॥२३॥

जे जे स्थानीं निरोप देसी । जाऊं तेथें भरंवसीं ।
तुझे वाक्येंचि आम्हांसी । सिद्धि होय स्वामिया ॥२४॥

ऐकोनि शिष्यांचें वचन । श्रीगुरुमूर्ति प्रसन्नवदन ।
निरोप देती साधारण । तीर्थयात्रे शिष्यांसी ॥२५॥

या ब्रह्मांडगोलकांत । तीर्थराज काशी विख्यात ।
तेथें तुम्हीं जावें त्वरित । सेवा गंगाभागीरथी ॥२६॥

भागीरथीतटाकयात्रा । साठी योजनें पवित्रा ।
साठी कृच्छ्र-फळ तत्र । प्रयाग गंगाद्वारीं द्विगुण ॥२७॥

यमुनानदीतटाकेसी । यात्रा वीस गांव परियेसीं ।
कृच्छ्र तितुकेचि जाणा ऐसी । एकोमनें अवधारा ॥२८॥

सरस्वती म्हणजे गंगा । भूमीवरी असे चांगा ।
चतुर्विशति गांवें अंगा । स्नान करावें तटाकीं ॥२९॥

तितुकेंचि कृच्छ्रफल त्यासी । यज्ञाचें फल परियेसीं ।
ब्रह्मलोकीं शाश्वतेसीं । राहे नर पितृसहित ॥३०॥

वरुणानदी कुशावर्ती । शतद्रू विपाशका ख्याती ।
वितस्ता नदी शरावती । नदी असती मनोहर ॥३१॥

मरुद्‌वृधा नदी थोर । असिक्री मधुमती येर ।
पयस्वी घृतवतीतीर । तटाकयात्रा तुम्ही करा ॥३२॥

देवनदी म्हणिजे एक । असे ख्याति भूमंडळीक ।
पंधरा गांवें तटाक । यात्रा तुम्हीं करावी ॥३३॥

जितुके गांव तितके कृच्छ्र । स्नानमात्रें पवित्र ।
ब्रह्महत्यादि पातकें नाश तत्र । मनोभावें आचरावें ॥३४॥

चंद्रभागा रेवतीसी । शरयू नदी गोमतीसी ।
वेदिका नदी कौशिकेसी । नित्यजला मंदाकिनी ॥३५॥

सहस्त्रवक्त्रा नदी थोर । पूर्णा पुण्यनदी येर ।
बाहुदा नदी अरुणा थोर । षोडश गांवें तटाकयात्रा ॥३६॥

जेथें नदीसंगम असती । तेथें स्नानपुण्य अमिती ।
त्रिवेणीस्नानफळें असतीं । नदीचे संगमीं स्नान करा ॥३७॥

पुष्करतीर्थ वैरोचनि । सन्निहिता नदी म्हणूनि ।
नदीतीर्थ असे सगुणी । गयातीर्थी स्नान करा ॥३८॥

सेतुबंध रामेश्वरीं । श्रीरंग पद्मनाभ-सरीं ।
पुरुषोत्तम मनोहरी । नैमिषारण्य तीर्थ असे ॥३९॥

बदरीतीर्थ नारायण । नदी असती अति पुण्य ।
कुरुक्षेत्रीं करा स्नान । अनंत श्रीशैल्ययात्रेसी ॥४०॥

महालयतीर्थ देखा । पितृप्रीति तर्पणें ऐका ।
द्विचत्वारि कुळें निका । स्वर्गासी जाती भरंवसीं ॥४१॥

केदारतीर्थ पुष्करतीर्थ । कोटिरुद्र नर्मदातीर्थ ।
मातृकेश्वर कुब्जतीर्थ । कोकामुखी विशेष असे ॥४२॥

प्रसादतीर्थ विजयतीर्थ । पुरी चंद्रनदीतीर्थ ।
गोकर्ण शंखकर्ण ख्यात । स्नान बरवें मनोहर ॥४३॥

अयोध्या मथुरा कांचीसी । द्वारावती गयेसी ।
शालग्रामतीर्थासी । शबलग्राम मुक्तिक्षेत्र ॥४४॥

गोदावरीतटाकेसी । योजनें सहा परियेसीं ।
तेथील महिमा आहे ऐसी । वांजपेय तितुकें पुण्य ॥४५॥

सव्यअपसव्य वेळ तीनी । तटाकयात्रा मनोनेमीं ।
स्नान करितां होय ज्ञानी । महापातकी शुद्ध होय ॥४६॥

आणिक दोनी तीर्थे असतीं । प्रयागसमान असे ख्याति ।
भीमेश्वर तीर्थ म्हणती । वंजरासंगम प्रख्यात ॥४७॥

कुशतर्पण तीर्थ बरवें । तटाकयात्रा द्वादश गांवें ।
गोदावरी-समुद्रसंगमें । षट्‌त्रिंशत कृच्छ्रफळ ॥४८॥

पूर्णा नदीतटाकेंसी । चारी गांवें आचरा हर्षी ।
कृष्णावेणीतीरासी । पंधरा गांवें तटाकयात्रा ॥४९॥

तुंगभद्रातीर बरवें । तटाकयात्रा वीस गांवें ।
पंपासरोवर स्वभावें । अनंतमहिमा परियेसा ॥५०॥

हरिहरक्षेत्र असे ख्याति । समस्त दोष परिहरती ।
तैसीच असे भीमरथी । दहा गांवें तटाकयात्रा ॥५१॥

पांडुरंग मातुलिंग । क्षेत्र बरवें पुरी गाणग ।
तीर्थे असती तेथें चांग । अष्टतीर्थे मनोहर ॥५२॥

अमरजासंगमांत । कोटि तीर्थे असतीं ख्यात ।
वृक्ष असे अश्वत्थ । कल्पवृक्ष तोचि जाणा ॥५३॥

तया अश्वत्थसन्मुखेंसी । नृसिंहतीर्थ परियेसीं ।
तया उत्तरभागेसी । वाराणसी तीर्थ असे ॥५४॥

तया पूर्वभागेसी । तीर्थ पापविनाशी ।
तदनंतर कोटितीर्थ विशेष । पुढें रुद्रपादतीर्थ असे ॥५५॥

चक्रतीर्थ असे एक । केशव देवनायक ।
ते प्रत्यक्ष द्वारावती देख । मन्मथतीर्थ पुढें असे ॥५६॥

कल्लेश्वर देवस्थान । असे तेथें गंधर्वभुवन ।
ठाव असे अनुपम्य । सिद्धभूमि गाणगापुर ॥५७॥

तेथें जे अनुष्‍ठान करिती । तया इष्‍टार्थ होय त्वरितीं ।
कल्पवृक्ष आश्रयती । कान नोहे मनकामना ॥५८॥

काकिणीसंगम बरवा । भीमातीर क्षेत्र नांवा ।
अनंत पुण्य स्वभावा । प्रयागासमान असे देखा ॥५९॥

तुंगभद्रा वरदा नदी । संगमस्थानीं तपोनिधी ।
मलापहारीसंगमीं आधीं । पापें जातीं शतजन्मांचीं ॥६०॥

निवृत्तिसंगम असे ख्याति । ब्रह्महत्या नाश होती ।
जावें तुम्हीं त्वरिती । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥६१॥

सिंहराशीं बृह्स्पति । येतां तीर्थे संतोषती ।
समस्त तीर्थी भागीरथी । येऊनियां ऐक्य होय ॥६२॥

कन्यागतीं कृष्णेप्रती । त्वरित येते भागीरथी ।
तुंगभद्रा तुळागतीं । सुरनदीप्रवेश परियेसा ॥६३॥

कर्काटकासी सूर्य येतां । मलप्रहरा कृष्णासंयुता ।
सर्व जन स्नान करितां । ब्रह्महत्या पापें जातीं ॥६४॥

भीमाकृष्णासंगमेसीं । स्नान करितां परियेसीं ।
साठ जन्म विप्रवंशीं । उपजे नर परियेसा ॥६५॥

तुंगभद्रासंगमीं देखा । त्याहूनि त्रिगुण अधिका ।
निवृत्तिसंगमीं ऐका । चतुर्गुण त्याहूनि ॥६६॥

पाताळगंगेचिये स्नानीं । मल्लिकार्जुनदर्शनीं ।
षड्‌गुण फल तयाहूनि । पुनरावृत्ति त्यासी नाहीं ॥६७॥

लिंगालयीं पुण्य द्विगुण । समुद्रकृष्णासंगमीं अगण्य ।
कावेरीसंगमीं पंधरा गुण । स्नान करा मनोभावें ॥६८॥

ताम्रपर्णी याचिपरी । पुण्य असंख्य स्नानमात्रीं ।
कृतमालानदीतीरीं । सर्व पाप परिहरे ॥६९॥

पयस्विनी नदी आणिक । भवनाशिनी अतिविशेष ।
सर्व पापें हरती ऐक । समुद्रस्कंधदर्शनें ॥७०॥

शेषाद्रिक्षेत्र श्रीरंगनाथ । पद्मनाभ श्रीमदनंत ।
पूजा करोनि जावें त्वरित । त्रिनामल्लक्षेत्रासी ॥७१॥

समस्त तीर्थांसमान । असे आणिक कुंभकोण ।
कन्याकुमारी-दर्शन । मत्स्यतीर्थीं स्नान करा ॥७२॥

पक्षितीर्थ असे बरवें । रामेश्वर धनुष्कोटी नावें ।
कावेरी तीर्थ बरवें । रंगनाथा संनिध ॥७३॥

पुरुषोत्तम चंद्रकुंडेसीं । महालक्ष्मी कोल्हापुरासी ।
कोटितीर्थ परियेसीं । दक्षिण काशी करवीरस्थान ॥७४॥

महाबळेश्वर तीर्थ बरवें । कृष्णाउगम तेथें पहावें ।
जेथें असे नगर 'बहें' । पुण्यक्षेत्र रामेश्वर ॥७५॥

तयासंनिध असे ठाव । कोल्हग्रामीं नृसिंहदेव ।
परमात्मा सदाशिव । तोचि असे प्रत्यक्ष ॥७६॥

भिल्लवडी कृष्णातीरीं । शक्ति असे भुवनेश्वरी ।
तेथें तप करिती जरी । तेचि ईश्वरीं ऐक्यता ॥७७॥

वरुणासंगमीं बरवें । तेथें तुम्ही मनोभावें ।
स्नान करा मार्कंडेय-नांवें । संगमेश्वरू पूजावा ॥७८॥

ऋषींचे आश्रम । कृष्णातीरीं असती उत्तम ।
स्नान करितां होय ज्ञान । तयासंनिध कृष्णेपुढें ॥७९॥

पुढें कृष्णाप्रवाहांत । अमरापुर असे ख्यात ।
पंचगंगासंगमांत । प्रयागाहूनि पुण्य अधिक ॥८०॥

अखिल तीर्थे तया स्थानीं । तप करिती सकळ मुनि ।
सिद्ध होय त्वरित ज्ञानी । अनुपम क्षेत्र परियेसा ॥८१॥

ऐसें प्रख्यात तया स्थानीं । अनुष्‍ठितां दिवस तीनी ।
अखिलाभीष्‍ट पावोनि । पावती त्वरित परमार्थी ॥८२॥

जुगालय तीर्थ बरवें । दृष्‍टीं पडतां मुक्त व्हावें ।
शूर्पालय तीर्थ बरवें । असे पुढें परियेसा ॥८३॥

विश्वामित्रऋषि ख्याति । तप 'छाया' भगवती ।
तेथें समस्त दोष जाती । मलप्रहरासंगमीं ॥८४॥

कपिलऋषि विष्णुमूर्ति । प्रसन्न त्यासि गायत्री ।
श्वेतशृंगीं प्रख्याति । उत्तरवाहिनी कृष्णा असे ॥८५॥

तया स्थानीं स्नान करितां । काशीहूनि शतगुणिता ।
एक मंत्र तेथें जपतां । कोटीगुणें फळ असे ॥८६॥

आणिक असे तीर्थ बरवें । केदारेश्वरातें पहावें ।
पीठापुरीं दत्तात्रेयदेव – । वास असे सनातन ॥८७॥

आणिक असे तीर्थ थोरी । प्रख्यात नामें मणिगिरि ।
सप्तऋषीं प्रीतिकरीं । तप केलें बहु दिवस ॥८८॥

वृषभाद्रि कल्याण नगरी । तीर्थे असतीं अपरंपारी ।
नव्हे संसारयेरझारी । तया क्षेत्रा आचरावें ॥८९॥

अहोबळाचें दर्शन । साठी यज्ञ पुण्य जाण ।
श्रीगिरीचें दर्शन । नव्हे जन्म मागुती ॥९०॥

समस्त तीर्थे भूमीवरी । आचरावीं परिकरी ।
रजस्वला होतां सरी । स्नान करितां दोष होय ॥९१॥

संक्रांति कर्काटक धरुनि । त्यजावे तुम्हीं मास दोनी ।
नदीतीरीं वास करिती कोणी । त्यांसी कांहीं दोष नाहीं ॥९२॥

तयांमध्यें विशेष । त्यजावें तुम्हीं तीन दिवस ।
रजस्वला नदी सुरस । महानदी येणेंपरी ॥९३॥

भागीरथी गौतमीसी । चंद्रभागा सिंधूनदीसी ।
नर्मदा शरयू परियेसीं । त्यजावें तुम्हीं दिवस तीनी ॥९४॥

ग्रीष्मकाळीं सर्व नदींस । रजस्वला दहा दिवस ।
वापी-कूट-तटाकांस । एक रात्र वर्जावें ॥९५॥

नवें उदक जया दिवसीं । येतां ओळखा रजस्वलेसी ।
स्नान करितां महादोषी । येणेंपरी वर्जावें ॥९६॥

साधारण पक्ष तुम्हांसी । सांगितलीं तीर्थे परियेसीं ।
जें जें पहाल दृष्‍टीसीं । विधिपूर्वक आचरावें ॥९७॥

ऐकोनि श्रीगुरुंचें वचन । शिष्य सकळ करिती नमन ।
गुरुनिरोप कारण । म्हणोनि निघती सकळिक ॥९८॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । निरोप घेऊनि श्रीगुरुसी ।
शिष्य गेले यात्रेसी । राहिले श्रीगुरू गौप्यरुपें ॥९९॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥१००॥

गुरुचरित्र कामधेनु । श्रोते होवोनि सावधानु ।
जे ऐकती भक्तजनु । लाधती चारी पुरुषार्थ ॥१॥

ब्रह्मरसाची गोडी । सेवितों आम्हीं घडोघडी ।
ज्यांसी होय आवडी । साधे त्वरित परमार्थ ॥१०२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे तीर्थयात्रा निरुपणं नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १०२ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥




गुरुचरित्र – अध्याय सोळावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे पुसत ।
सांगा स्वामी वृत्तांत । गुरुचरित्र विस्तारुनि ॥१॥

शिष्य समस्त गेले यात्रेसी । राहिले कोण गुरुपाशीं ।
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें दातारा ॥२॥

ऐकोनि शिष्याची वाणी । संतोषी झाले सिद्ध मुनि ।
धन्य धन्य शिष्या शिरोमणि । गुरुभक्ता नामधारका ॥३॥

अविद्यामायासुषुप्तींत । निजलें होतें माझें चित्त ।
तुजकरितां जाहलें चेत । ज्ञानज्योति-उदय मज ॥४॥

तूंचि माझा प्राणसखा । ऐक शिष्या नामधारका ।
तुजकरितां जोडलों सुखा । गुरुचरित्र आठवलें ॥५॥

अज्ञानतिमिरउष्णांत । पीडोनि आलों कष्‍टत ।
सुधामृतसागरांत । तुवां मातें लोटिलें ॥६॥

तुवां केले उपकारासी । संतुष्‍ट झालों मानसीं ।
पुत्रपौत्रीं तूं नांदसी । दैन्य नाहीं तुझे घरीं ॥७॥

गुरुकृपेचा तूं बाळक । तुज मानिती सकळ लोक ।
संदेह न करीं घे भाक । अष्‍टैश्चर्ये नांदसी ॥८॥

गुरुचरित्रकामधेनु । सांगेन तुज विस्तारुनु ।
श्रीगुरू राहिले गौप्य होऊन । वैजनाथसंनिधेसीं ॥९॥

समस्त शिष्य तीर्थेसी । स्वामीनिरोपें गेले परियेसीं ।
होतों आपण गुरुपाशीं । सेवा करीत अनुक्रमें ॥१०॥

संवत्सर एक तया स्थानीं । होते गौप्य श्रीगुरु मुनि ।
अंबा आरोग्यभवानी । स्नान बरवें मनोहर ॥११॥

असतां तेथें वर्तमानीं । आला ब्राह्मण एक मुनि ।
श्रीगुरुतें देखोनि । नमन करी भक्तिभावें ॥१२॥

माथा ठेवूनि चरणांवरी । स्तोत्र करी परोपरी ।
स्वामी मातें तारीं तारीं । अज्ञानसागरीं बुडालों ॥१३॥

तप करतों बहु दिवस । स्थिर नव्हे गा मानस ।
याचि कारणें ज्ञानास । न दिसे मार्ग आपणातें ॥१४॥

ज्ञानाविणें तापसा । वृथा होती सायास ।
तुम्हां देखतां मानसा । हर्ष जाहला आजि मज ॥१५॥

गुरुची सेवा बहुत दिवस । केली नाहीं सायासें ।
याचिकारणें मानस । स्थिर नव्हे स्वामिया ॥१६॥

तूं तारक विश्वासी । जगद्गुरू तूंचि होसी ।
उपदेश करावा आम्हांसी । ज्ञान होय त्वरितेसीं ॥१७॥

ऐकोनि मुनीचें वचन । श्रीगुरू पुसती हांसोन ।
जाहलासी तूं केवीं मुनि । गुरुविणें सांग मज ॥१८॥

ऐसें म्हणतां श्रीगुरुमूर्ति । मुनीच्या डोळां अश्रुपाती ।
दुःख दाटलें अपरमिति । ऐक स्वामी गुरुराया ॥१९॥

गुरु होता आपणासी एक । अतिनिष्‍ठुर त्याचें वाक्य ।
मातें गांजिलें अनेक । अकृत्य सेवा सांगे मज ॥२०॥

न सांगे वेदशास्त्र आपण । तर्कभाष्यादि व्याकरण ।
म्हणे तुझें अंतःकरण । स्थिर नव्हे अद्यापि ॥२१॥

म्हणोनि सांगे आणिक कांहीं । आपुलें मन स्थिर नाहीं ।
करी त्याचे बोल वायी । आणिक कोप करी मज ॥२२॥

येणेंपरी बहुत दिवशीं । होतों तया गुरुपाशीं ।
बोले मातें निष्‍ठुरेसीं । कोपोनि आलों तयावरी ॥२३॥

ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन ।
म्हणती ऐकें ब्राह्मणा । आत्मघातकी तूंचि होसी ॥२४॥

एखादा मूर्ख आपुले घरीं । मळ विसर्जी देव्हारीं ।
आपुलें अदृष्‍ट ऐसेपरी । म्हणोनि सांगे सकळिकां ॥२५॥

तैसें तुझें अंतःकरण । आपुलें नासिक छेदून ।
पुढिल्यातें अपशकुन । करुनि रहासी तूंचि एक ॥२६॥

न विचारिसी आपुले गुण । तूतें कैंचें होय ज्ञान ।
गुरुद्रोही तूंचि जाण । अल्पबुद्धि परियेसा ॥२७॥

आपुले गुरूचे गुणदोष । सदा उच्चार करिसी हर्षे ।
ज्ञान कैंचें होय मानस । स्थिर होय केवीं आतां ॥२८॥

जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु ।
गुरु असतां कामधेनू । वंचूनि आलासी आम्हांजवळी ॥२९॥

गुरुद्रोही कवण नर । त्यासी नाहीं इह पर ।
ज्ञान कैंचें होय पुरें । तया दिवांधकासी ॥३०॥

जो जाणे गुरुची सोय । त्यासी सर्व ज्ञान होय ।
वेदशास्‍त्र सर्व होये । गुरु संतुष्‍ट होतांचि ॥३१॥

संतुष्‍टवितां श्रीगुरुसी । अष्‍टसिद्धि आपुले वशी ।
क्षण न लागतां परियेसीं । वेदशास्‍त्र त्यासी साध्य ॥३२॥

ऐकोनि श्रीगुरूचें वचन । माथा श्रीगुरुचरणीं ठेवून ।
विनवीतसे कर जोडून । करुणावचनेंकरुनियां ॥३३॥

जय जया जगद्गुरु । निर्गुण तूं निर्विकारु ।
ज्ञानसागर अपरांपरु । उद्धरावें आपणातें ॥३४॥

अज्ञानमाया वेष्‍टोन । नेणे गुरु कैसा कवण ।
सांगा स्वामी प्रकाशोन । ज्ञान होय आपणासी ॥३५॥

कैसा गुरु ओळखावा । कोणेपरी आहे सेवा ।
प्रकाश करोनि सांगावा । विश्ववंद्य गुरुमूर्ति ॥३६॥

जेणें माझें मन स्थिरु । होऊनि ओळखे सोयगुरु ।
तैसा करणें उपकारु । म्हणोनि चरणीं लागला ॥३७॥

करुणावचन ऐकोनि । श्रीगुरुनाथ संतोषोनि ।
सांगताति विस्तारोनि । गुरुसेवाविधान ॥३८॥

श्रीगुरु म्हणती ऐक मुनि । गुरु म्हणजे जनकजननी ।
उपदेशकर्ता आहे कोणी । तोचि जाण परम गुरु ॥३९॥

गुरु विरिंचि हर जाण । स्वरुप तोचि नारायण ।
मन करुनि निर्वाण । सेवा करावी भक्तीनें ॥४०॥

यदर्थी कथा एक । सांगों आम्ही तत्पर ऐक ।
आदिपर्वी असे निक । गुरुसेवा भक्तिभावें ॥४१॥

द्वापारांतीं परियेसीं । विप्र एक धौम्यऋषी ।
तिघे शिष्य होते त्यासी । वेदाभ्यास करावया ॥४२॥

एक 'आरुणी' पांचाळ । दुसरा 'बैद' केवळ ।
तिसरा 'उपमन्यु' बाळ । सेवा करिती विद्येलागीं ॥४३॥

पूर्वी गुरुची ऐसी रीति । शिष्याकरवीं सेवा घेती ।
अंतःकरण त्याचें पहाती । निर्वाणवरी शिष्याचें ॥४४॥

पाहोनियां अंतःकरण । असे भक्ति निर्वाण ।
कृपा करिती तत्क्षण । मनकामना पुरविती ॥४५॥

ऐसा धौम्यमुनि भला । तया आरूणी-पांचाळा ।
एके दिवशीं निरोप दिल्हा । ऐक द्विजा एकचित्तें ॥४६॥

शिष्यासी म्हणे धौम्यमुनि । आजि तुवां जावोनि रानीं ।
वृत्तीसी न्यावें तटाकपाणी । जंववरी होय तृप्त भूमि ॥४७॥

असे वृत्ति तळें खालीं । तेथें पेरिली असे साळी ।
तेथें नेवोनि उदक घालीं । शीघ्र म्हणे शिष्यासी ॥४८॥

ऐसा गुरुचा निरोप होतां । गेला शिष्य धांवत ।
तटाक असे पाहतां । कालवा थोर वहातसे ॥४९॥

जेथें उदक असे वहात । अतिदरारा गर्जत ।
वृत्तिभूमि उन्नत । उदक केवीं चढों पाहे ॥५०॥

म्हणे आतां काय करुं । कोपतील मातें श्रीगुरु ।
उदक जातसे दरारू । केवीं बांधूं म्हणतसे ॥५१॥

आणूनियां शिळा दगड । बांधिता जाहला उदका आड ।
पाणी जातसे धडाड । जाती पाषाण वाहोनियां ॥५२॥

प्रयत्‍न करी नानापरी । कांहीं केलिया न चढे वारी ।
म्हणे देवा श्रीहरि । काय करुं म्हणतसे ॥५३॥

मग मनीं विचार करी । गुरूचे शेतीं न चढे वारी ।
प्राण त्यजीन निर्धारीं । गुरुचे वृत्तीनिमित्त ॥५४॥

निश्चय करुनि मानसीं । मनीं ध्याई श्रीगुरुसी ।
म्हणे आतां उपाय यासी । योजूनि यत्‍न करावा ॥५५॥

घालितां उदकप्रवाहांत । जाती पाषाण वहात ।
आपण आड पडों म्हणत । निर्धारिलें तया वेळीं ॥५६॥

दोन्ही हातीं धरीं दरडी । पाय टेकी दुसरेकडी ।
झाला आपण उदकाआड । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥५७॥

ऐसा शिष्यशिरोमणि । निर्वाण मन करितांक्षणीं ।
वृत्तीकडे गेलें पाणी । प्रवाहाचें अर्ध देखा ॥५८॥

अर्ध पाणी जैसें तैसें । वाहतसे नित्यसरिसें ।
तयामध्यें शिष्य संतोषें । बुडाला असे अवधारा ॥५९॥

ऐसा शिष्य तया स्थानीं । बुडाला असे प्रवाहपाणीं ।
गुरुची वृत्ति जाहली धणी । उदकपूर्ण परियेसा ॥६०॥

त्याचा गुरु धौम्यमुनि । विचार करी आपुले मनीं ।
दिवस गेला अस्तमानीं । अद्यापि शिष्य न ये म्हणे ॥६१॥

ऐसें आपण विचारीत । गेला आपुले वृत्तींत ।
जाहलें असे उदक बहुत । न देखे शिष्य तया स्थानीं ॥६२॥

म्हणे शिष्या काय जाहलें । किंवा भक्षिलें व्याघ्रव्याळें ।
उदकानिमित्त कष्‍ट केले । कोठें असे म्हणतसे ॥६३॥

ऐसें मनीं विचारीत । उंच स्वरें पाचारीत ।
अरे शिष्या सखया म्हणत । प्रेमभावें बोलावी ॥६४॥

येणेंपरी करुणावचनीं । पाचारीतसे धौम्यमुनि ।
शब्द पडे शिष्यकानीं । तेथूनि मग निघाला ॥६५॥

येवोनियां श्रीगुरुसी । नमन केलें भावेसीं ।
धौम्यमुनीं महाहर्षी । आलिंगोनि आश्वासिलें ॥६६॥

वर दिधला तया वेळीं । ऐक शिष्या स्तोममौळी ।
तूतें विद्या आली सकळी । वेदशास्त्रादि व्याकरण ॥६७॥

ऐसें म्हणतां तत्क्षणीं । झाला विद्यावंत ज्ञानी ।
लागतसे गुरुचरणीं । भक्तिभावेंकरुनियां ॥६८॥

कृपानिधि धौम्यमुनि । आपुले आश्रमा नेऊनि ।
निरोप दिल्हा संतोषोनि । विवाहादि आतां करीं म्हणे ॥६९॥

निरोप घेऊनि शिष्यराणा । गेला आपुले स्थाना ।
आणिक दोघे शिष्य जाणा । होते तया गुरुजवळी ॥७०॥

दुसरा शिष्‍य 'बैद' जाणा । गुरुची करी शुश्रूषणा ।
त्याचे पहावया अंतःकरणा । धौम्य गुरु म्हणतसे ॥७१॥

धौम्य म्हणे शिष्यासी । सांगेन एक तुजसी ।
तुवां जाऊनि अहर्निशीं । वृत्ति आमुची रक्षिजे ॥७२॥

रक्षूनियां वृत्तीसी । आणावें धान्य घरासी ।
ऐसें म्हणतां महाहर्षी । गेला तया वृत्तीकडे ॥७३॥

वृत्ति पिके जंववरी । अहोरात्रीं कष्‍ट करी ।
राशी होतां अवसरीं । आला आपुले गुरुपाशीं ॥७४॥

सांगता जाहला श्रीगुरुसी । म्हणे व्रीही भरले राशीं ।
आतां आणावें घरासी । काय निरोप म्हणतसे ॥७५॥

मग म्हणे धौम्यमुनि । बा रे शिष्या शिरोमणि ।
कष्‍ट केले बहुत रानीं । आतां धान्य आणावें ॥७६॥

म्हणोनि देती एक गाडा । तया जुंपोनि एक रेडा ।
गुरु म्हणे जावें पुढा । शीघ्र यावें म्हणतसे ॥७७॥

एकीकडे जुंपी रेडा । आपण ओढी दुसरीकडा ।
येणेंपरी घेवोनि गाडा । आला तया वृत्तीजवळी ॥७८॥

दोनी खंडी साळीसी । भरी शिष्य गाडियासी ।
एकीकडे रेडियासी । जुंपोनि ओढी आपण देखा ॥७९॥

रेडा चाले शीघ्रेंसीं । आपण न ये तयासरसी ।
मग आपुले कंठासी । बांधिता झाला जूं देखा ॥८०॥

सत्राणें तयासरसी । चालत आला मार्गासी ।
रुतला रेडा चिखलेंसीं । आपुले गळां ओढीतसे ॥८१॥

चिखलीं रुतला रेडा म्हणोनि । चिंता करी बहु मनीं ।
आपण ओढी सत्राणीं । गळां फांस पडे जैसा ॥८२॥

सोडूनियां रेडियासी । काढिलें शिष्यें गाडियासी ।
ओढितां आपुले गळां फांसी । पडूनि प्राण त्यजूं पाहे ॥८३॥

इतुकें होतां निर्वाणीं । सन्मुख पातला धौम्यमुनि ।
त्या शिष्यातें पाहोनि नयनीं । कृपा अधिक उपजली ॥८४॥

सोडूनियां शिष्यातें । आलिंगोनि करूणाभरितें ।
वर दिधला अभिमतें । संपन्न होसी वेदशास्त्रीं ॥८५॥

वर देतां तत्क्षणेसीं । सर्व विद्या आली त्यासी ।
निरोप घेऊनियां घरासी । गेला शिष्य परियेसा ॥८६॥

तिसरा शिष्य उपमन्यु । सेवेविषयीं महानिपुण ।
गुरुची सेवा-शुश्रूषण । बहु करी परियेसा ॥८७॥

त्यासी व्हावा बहुत आहार । म्हणोनि विद्या नोहे स्थिर
। त्यासी विचार करीत तो गुरु । यातें करावा उपाय एक ॥८८॥

त्यासी म्हणे धौम्यमुनि । तुज सांगतों म्हणोनि ।
नित्य गुरें नेऊनि रानीं । रक्षण करीं तृणचारें ॥८९॥

ऐसें म्हणतां गुरुमुनि । नमन करी त्याचे चरणीं ।
गुरें नेऊनियां रानीं । चारवीत बहुवस ॥९०॥

क्षुधा लागतां आपणासी । शीघ्र आणिलीं घरासी ।
कोपें गुरु तयासी । म्हणे शीघ्र येतोसि कां रे ॥९१॥

सूर्य जाय अस्तमानीं । तंववरी राखीं गुरें रानीं ।
येणेंपरी प्रतिदिनीं । वर्तावें तुवां म्हणतसे ॥९२॥

अंगीकारोनि शिष्यराणा । गुरें घेवोनि गेला राना ।
क्षुधाक्रांत होऊनि जाणा । चिंतीतसे श्रीगुरुसी ॥९३॥

चरती गुरें नदीतीरीं । आपण तेथें स्नान करी ।
तयाजवळी घरें चारी । असती विप्रआश्रम तेथें ॥९४॥

जाऊनियां तया स्थाना । भिक्षा मागे परिपूर्ण ।
भोजन करी सावधान । गोधन रक्षी येणेंपरी ॥९५॥

येणेंपरी प्रतिदिवशीं । रक्षूनि आणी गुरें निशीं ।
वर्ततां ऐसें येरे दिवशीं । पुसता झाला धौम्यमुनि ॥९६॥

गुरु म्हणे शिष्यासी । तूं नित्य उपवासी ।
तुझा देह पुष्‍टीसी । कवणेपरी होतसे ॥९७॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे शिष्य उपमन्य ।
भिक्षा करितों प्रतिदिन । विप्रांघरीं तेथें देखा ॥९८॥

भोजन करुनि प्रतिदिवसीं । गुरें घेवोनि येतों निशीं ।
श्रीगुरु म्हणती तयासी । आम्हां सांडूनि केवीं भुक्ती ॥९९॥

भिक्षा मागोनि घरासी । आणोनि द्यावी प्रतिदिवसीं ।
मागुती जावें गुरांपाशीं । घेऊन यावें निशिकाळीं ॥१००॥

गुरुनिरोपें येरे दिवशीं । गुरें नेऊनि रानासी ।
मागे भिक्षा नित्य जैसी । नेऊनि दिधली घरांत ॥१॥

घरीं त्यासी भोजन । कधीं नव्हे परिपूर्ण ।
पुनरपि जाई तया स्थाना । भिक्षा करुनि जेवीतसे ॥२॥

नित्य भिक्षा वेळां दोनी । पहिली भिक्षा देवोनि सदनीं ।
दुसरी आपण भक्षूनि । काळ ऐसा कंठीतसे ॥३॥

येणेंपरी किंचित्काळ । वर्ततां जाहला महास्थूळ ।
एके दिवशीं गुरु कृपाळ । पुसतसे शिष्यातें ॥४॥

शिष्य सांगे वृत्तांत । जेणें आपुली क्षुधा शमत ।
नित्य भिक्षा मागत । वेळ दोनी म्हणतसे ॥५॥

एक वेळ घरासी । आणोनि देतों प्रतिदिवसीं ।
भिक्षा दुसरे खेपेसी । करितों भोजन आपण ॥६॥

ऐसें म्हणतां धौम्यमुनि । तया शिष्यावरी कोपोनि ।
म्हणे भिक्षा वेळ दोनी । आणूनि घरीं देईं पां ॥७॥

गुरुनिरोप जेणेंपरी । दोनी भिक्षा आणूनि घरीं ।
देता जाहला प्रीतिकरीं । मनीं क्लेश न करीच ॥८॥

गुरेंसहित रानांत । असे शिष्य क्षुधाक्रांत ।
गोवत्स होतें स्तन पीत । देखता जाहला तयासी ॥९॥

स्तन पीतां वांसुरासी । उच्छिष्‍ट गळे संधींसी ।
वायां जातें भूमीसी । म्हणोनि आपण जवळी गेला ॥११०॥

आपण असे क्षुधाक्रांत । म्हणोनि गेला धांवत ।
पसरुनिया दोनी हात । धरी उच्छिष्‍ट क्षीर देखा ॥११॥

ऐसें क्षीरपान करीं । घेऊनि आपुलें उदर भरी ।
दोनी वेळ भिक्षा घरीं । देतसे भावभक्तीनें ॥१२॥

अधिक पुष्‍ट जाहला त्याणें । म्हणे गुरु अवलोकून ।
पहा हो याचें शरीरलक्षण । कैसा स्थूळ होतसे ॥१३॥

मागुती पुसे तयासी । कवणेपरी पुष्‍ट होसी ।
सांगे आपुले वृत्तांतासी । उच्छिष्‍ट क्षीर पान करितों ॥१४॥

ऐकोनि म्हणे शिष्यासी । मतिहीन होय उच्छिष्‍टेसीं ।
दोष असे बहुवसी । भक्षूं नको आजिचेनी ॥१५॥

भक्षूं नको म्हणे गुरू । नित्य नाहीं तया आहारु ।
दुसरे दिवशीं म्हणे येरु । काय करुं म्हणतसे ॥१६॥

येणेंपरी गुरेंसहित । जात होता रानांत ।
गळत होतें क्षीर बहुत । एका रुईचे झाडासी ॥१७॥

म्हणे बरवें असे क्षीर । उच्छिष्‍ट नव्हे निर्धार ।
पान करूं धणीवर । म्हणोनि तेथें बैसला ॥१८॥

पानें तोडूनि कुसरीं । तयामध्यें क्षीर भरी ।
घेत होता धणीवरी । तंव भरिलें अक्षियांत ॥१९॥

तेणें गेले नेत्र दोनी । हिंडतसे रानोवनीं ।
गुरें न दिसती नयनीं । म्हणोनि चिंता करीतसे ॥१२०॥

काष्‍ट नाहीं अक्षिहीन । करीतसे चिंता गोधना ।
गुरें पाहों जातां राना । पडिला एका आडांत ॥२१॥

पडोनियां आडांत । चिंता करी तो अत्यंत ।
आतां गुरें गेलीं सत्य । बोल गुरुचा आला मज ॥२२॥

पडिला शिष्य तया स्थानीं । दिवस गेला अस्तमानीं ।
चिंता करी धौम्यमुनि। अजूनि शिष्य न येचि कां ॥२३॥

म्हणोनि गेला रानासी । देखे तेथें गोधनासी ।
शिष्य नाहीं म्हणोनि क्लेशीं । दीर्घस्वरें पाचारी ॥२४॥

पाचारितां धौम्यमुनि। ध्वनि पडला शिष्यकानीं ।
प्रत्योत्तर देतांक्षणीं । जवळी गेला कृपाळू ॥२५॥

ऐकोनियां वृत्तांत । उपजे कृपा अत्यंत ।
अश्विनी देवा स्तवीं म्हणत । निरोप दिधला तये वेळीं ॥२६॥

निरोप देतां तये क्षणीं । अश्विनी देवता ध्याय मनीं ।
दृष्‍टि आली दोनी नयनीं । आला श्रीगुरुसन्मुखेसीं ॥२७॥

येवोनि श्रीगुरुसी । नमन केलें भक्तीसीं ।
स्तुति केली बहुवसी । शिष्योत्तमें तये वेळीं ॥२८॥

संतोषोनि धौम्यमुनी । तया शिष्या आलिंगोनि ।
म्हणे शिष्या शिरोमणी । तुष्‍टलों तुझ्या भक्तीसी ॥२९॥

प्रसन्न होऊनि शिष्यासी । हस्त स्पर्शी मस्तकेसी ।
वेदशास्त्रादि तत्क्षणेसीं । आलीं तया शिष्यातें ॥१३०॥

गुरु म्हणे शिष्यासी । जावें आपुले घरासी ।
विवाहादि करुनि सुखेसीं । नांदत ऐस म्हणतसे ॥३१॥

होईल तुझी बहु कीर्ति । शिष्य होतील तुज अत्यंती ।
'उत्तंक' नाम विख्याति । शिष्य तुझा परियेसीं ॥३२॥

तोचि तुझ्या दक्षिणेसी । आणील कुंडलें परियेसीं ।
जिंकोनियां शेषासी । कीर्तिवंत होईल ॥३३॥

जन्मेजय रायासी । तोच करील उपदेशी ।
मारवील समस्त सर्पांसी । याग करुनि परियेसा ॥३४॥

तोचि उत्तंक जाऊन । पुढें केला सर्पयज्ञ ।
जन्मेजयातें प्रेरुन । समस्त सर्प मारविले ॥३५॥

ख्याति जाहली त्रिभुवनांत । तक्षक आणिला इंद्रासहित ।
गुरुकृपेचें सामर्थ्य । ऐसें असे परियेसा ॥३६॥

जो नर असेल गुरुदूषक । त्यासी कैंचा परलोक ।
अंतीं होय कुंभीपाक । गुरुद्रोह-पातक्यासी ॥३७॥

संतुष्‍ट करितां गुरुसी । काय न साधे तयासी ।
वेदशास्त्र तयासी । लाघे क्षण न लागतां ॥३८॥

ऐसें तूं जाणोनि मानसीं । वृथा हिंडसी अविद्येसीं ।
जावें आपुले गुरुपाशीं । तोचि तुज तारील सत्य ॥३९॥

त्याचें मन संतुष्‍टवितां । तुज मंत्र साध्य तत्त्वता ।
मन करुनि सुनिश्चिता । त्वरित जाईं म्हणितलें ॥१४०॥

ऐसा श्रीगुरू निरोप देतां । विप्र जाहला अतिज्ञाता ।
चरणांवरी ठेवूनि माथा । विनवीतसे तया वेळीं ॥४१॥

जय जया गुरुमूर्ति । तूंचि साधन परमार्थी ।
मातें निरोपिलें प्रीतीं । तत्त्वबोध कृपेनें ॥४२॥

गुरुद्रोही आपण सत्य । अपराध घडले मज बहुत ।
गुरुचें दुखविलें चित्त । आतां केवीं संतुष्‍टवावें ॥४३॥

सुवर्णादि लोह सकळ । भिन्न होतां सांधवेल ।
भिन्न होतां मुक्ताफळ । केवीं पुन्हा ऐक्य होय ॥४४॥

अंतःकरण भिन्न होतां । प्रयास असे ऐक्य करितां ।
ऐसें माझें मन पतित । काय उपयोग जीवूनि ॥४५॥

ऐसें शरीर माझें द्रोही । काय उपयोग वांचून पाहीं ।
जीवित्वाची वासना नाहीं । प्राण त्यजीन गुरुप्रति ॥४६॥

ऐसेपरी श्रीगुरुसी । विनवितो ब्राह्मण हर्षी ।
नमूनि निघे वैराग्येसीं । निश्चय केला प्राण त्यजूं ॥४७॥

अनुतप्त जाहला तो ब्राह्मण । निर्मळ जाहलें अंतःकरण ।
अग्नि लागतां जैसें तृण । भस्म होय तत्क्षणीं ॥४८॥

जैसा कापूरराशीसी । वन्हि लागतां परियेसीं ।
जळोनि जाय त्वरितेसीं । तैसें तयासी जहालें ॥४९॥

याकारणें पापासी । अनुतप्त होतां मानसीं ।
क्षालण होय त्वरितेसीं । शतजन्मींचें पाप जाय ॥१५०॥

निर्वाणरुपें द्विजवर । निघाला त्यजूं कलेवर ।
ओळखोनियां जगद्गुरु । पाचारिती तयावेळीं ॥५१॥

बोलावोनि ब्राह्मणासी । निरोप देती कृपेसीं ।
न करीं चिंता तूं मानसीं । गेले तुझे दुरितदोष ॥५२॥

वैराग्य उपजलें तुझ्या मनीं । दुष्कृतें गेलीं जळोनि ।
एकचित्त करुनि मनीं । स्मरें आपुले गुरुचरण ॥५३॥

तये वेळीं श्रीगुरुसी । नमन केलें चरणासी ।
जगद्गुरु तूंचि होसी । त्रिमूर्तीचा अवतार ॥५४॥

तुझी कृपा होय जरी । पापें कैंचीं या शरीरीं ।
उदय होतां भास्करीं । अंधकार राहे केवीं ॥५५॥

ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो भक्तीसीं ।
रोमांचळ उठती हर्षी । सददित कंठा जाहला ॥५६॥

निर्मळ मानसीं तयावेळीं । माथा ठेवी चरणकमळीं।
विनवीतसे करुणाबहाळीं । म्हणे तारीं तारीं श्रीगुरुमूर्ति ॥५७॥

निर्वाण देखोनि अंतःकरण । प्रसन्न जाहला श्रीगुरु आपण ।
मस्तकीं ठेविती कर दक्षिण । तया ब्राह्मणासी परियेसा ॥५८॥

परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय बावनकसी ।
तैसें तया द्विजवरासी । ज्ञान जहालें परियेसा ॥५९॥

वेदशास्त्रादि तात्काळी । मंत्रशास्त्रें आलीं सकळीं ।
प्रसन्न जहाला चंद्रमौळी । काय सांगूं दैव त्या द्विजाचें ॥१६०॥

आनंद जाहला ब्राह्मणासी । श्रीगुरु निरोपिती तयासी ।
आमुचें वाक्य तूं परियेसीं । जाय त्वरित आपुले गुरुपाशीं ॥६१॥

जावोनियां गुरुपाशीं । नमन करीं भावेसीं ।
संतोषी होईल भरंवसीं । तोचि आपण सत्य मानीं ॥६२॥

ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया ब्राह्मणा संभाषिती ।
निरोप घेऊनियां त्वरिती । गेला आपल्या गुरुपाशीं ॥६३॥

निरोप देऊनि ब्राह्मणासी । श्रीगुरु निघाले परियेसीं ।
'भिल्लवडी' ग्रामासी । आले भुवनेश्वरी-संनिध ॥६४॥

कृष्णापश्चिमतटाकेसी । औदुंबर वृक्ष परियेसीं ।
श्रीगुरु राहिले गुप्तेसीं । एकचित्तें परियेसा ॥६५॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी ।
महिमा जाहली बहुवसी । प्रख्यात तुज सांगेन ॥६६॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥१६७॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे गुरुशुश्रूषणमाहात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १६७ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय सतरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

सिद्ध म्हणे नामकरणी । गुरुभक्तशिखामणि ।
तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली निर्धारीं ॥१॥

पर्जन्य येतां पुढारां । जैसा येतो सूचना वारा ।
तैसें तुझें दैन्य-हरा । ऐकसी गुरुचरित्र कथनभेद ॥२॥

ऐसें चरित्र कामधेनु । सांगेन तुज विस्तारोन ।
एकचित्त करुनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥३॥

कृष्णावेणीतटाकेसी । भुवनेश्वरी-पश्चिमेसीं ।
औदुंबर वृक्षेसीं । राहिले श्रीगुरु परियेसा ॥४॥

गौप्यरुप असती गुरु । ठाव असे अगोचरु ।
अनुष्‍ठान धुरंधरु । चातुर्मास येणेंपरी ॥५॥

सिद्धस्थान असे गहन । भुवनेश्वरीसंनिधान ।
विशेष श्रीगुरु राहिले म्हणोन । उत्कृष्‍ट जाहलें महिमान ॥६॥

ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन ।
परमात्मा श्रीगुरुराणा । कां रहावें गौप्यरुपें ॥७॥

त्यासी काय असे तपस । भिक्षा मागणें काय हर्ष ।
संदेह माझ्या मानसास । निवारावा दातारा ॥८॥

ऐक वत्सा नामधारका । भिक्षा मागतो पिनाका ।
आणिक सांगेन ऐका । दत्तात्रेय तैसाचि ॥९॥

दत्तात्रेय त्रयमूर्ति । भिक्षुकरुपी असे दिसती ।
भक्तजनानुग्रहार्थी । तीर्थयात्रे हिंडतसे ॥१०॥

अनुपम तीर्थे भूमीवरी । असती गौप्य अपरांपरीं ।
श्रीगुरुमूर्ति प्रीतिकरीं । प्रगटले भक्तांलागीं ॥११॥

भक्तजनोपकारार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ ।
गौप्य व्हावया कारणार्थ । समस्त येऊनि मागती वर ॥१२॥

लपवितां दिनकरासी । केवीं लपे तेजोराशी ।
कस्तूरी ठेवितां जतनेसी । वास केवीं गौप्य होय ॥१३॥

आणिक सांगेन तुज साक्षी । गुण कैसा कल्पवृक्षीं ।
जेथें राहे तया क्षितीकांक्षी । कल्पिलें फळ तेथें होय ॥१४॥

याकारणें तया स्थानीं । प्रगटले गुरुमुनि ।
सांगेन तुज विस्तारुनि । एकचित्तें परियेसा ॥१५॥

करवीरक्षेत्र नगरांत । ब्राह्मण एक वेदरत ।
शास्त्रपुराण विख्यात । सांगे सकळ विद्वज्जनां ॥१६॥

अग्रवेदी असे आपण । जाणे तर्क व्याकरण ।
आन्हिकप्रमाण आचरण । कर्ममार्गी रत होता ॥१७॥

त्यासी जाहला एक सुत । मूर्ख असे उपजत ।
दैववशें मातापिता मृत । असमाधान होऊनियां ॥१८॥

वर्धतां मातापित्याघरीं बाळ । वर्षे सात जाहलीं केवळ ।
व्रतबंध करिती निश्चळ । तया द्विजकुमरकासी ॥१९॥

न ये स्नानसंध्या त्यासी । गायत्रीमंत्र परियेसीं ।
वेद कैंचा मूर्खासी । पशूसमान जहाला असे ॥२०॥

जेथें सांगती अध्ययन । जाऊनि आपण शिकूं म्हणे ।
तावन्मात्र शिकतांचि क्षण । सवेंचि विस्मृति होय त्यासी ॥२१॥

त्या ग्रामींचे विद्वज्जन । निंदा करिती सकळै जन ।
विप्रकुळीं जन्मून । ऐसा मूर्ख उपजलासी ॥२२॥

तुझा पिता ज्ञानवंत । वेदशास्त्रादि अभिज्ञात ।
त्याचे पोटीं कैसा केत । उपजलासी दगडापरी ॥२३॥

जळो जळो तुझें जिणें । पित्याच्या नामा आणिलें उणें ।
पोटीं बांधूनि पाषाण । तळें विहीरी कां न करिसी ॥२४॥

जन्मोनियां संसारीं । वृथा जाहलासी सूकरापरी ।
तुज गति यमपुरीं । अनाचारें वर्तसी ॥२५॥

ज्यासी विद्या असे ऐका । तोचि मनुष्यांमध्यें अधिका ।
जेवीं द्रव्य असे निक्षेपिका । तैसी विद्या परियेसा ॥२६॥

ज्याचे ह्रदयीं असे विद्या । त्यासी अखिल भोग सदा ।
यशस्वी होय सुखसंपदा । समस्तांमध्यें पूज्य तोचि ॥२७॥

श्रेष्‍ठ असे वयें थोर । विद्याहीन अपूज्य नर ।
अश्रेष्‍ठ असे एखादा नर । विद्या असतां पूज्यमान ॥२८॥

ज्यासी नाहीं सहोदर । त्यासी विद्या बंधु-भ्रातर ।
सकळिकां वंद्य होय नर । विद्या असे ऐशागुणें ॥२९॥

एखादे समयीं विदेशासी । जाय नर विद्याभ्यासी ।
समस्त पूजा करिती त्यासी । विदेश होय स्वदेश ॥३०॥

ज्यासी विद्या असे बहुत । तोचि होय ज्ञानवंत ।
त्याचे देहीं देवत्व । पूजा घेई सकळांपाशीं ॥३१॥

एखाद्या राज्याधिपतीसी । समस्त वंदिती परियेसीं ।
ऐसा राजा आपण हर्षी । विद्यावंतासी पूजा करी ॥३२॥

ज्याचे पदरीं नाहीं धन । त्याचें विद्याच धन जाण ।
विद्या शिकावी याचिकारण । नेणता होय पशूसमान ॥३३॥

ऐकोनि ब्राह्मणांचें वचन । ब्रह्मचारी करी नमन ।
स्वामींनीं निरोपिलें ज्ञान । विद्याभ्यास करावया ॥३४॥

जन्मांतरीं पूर्वी आपण । केलें नाहीं विद्यादान ।
न ये विद्या याचि कारण । त्यासी काय करणें म्हणतसे ॥३५॥

ऐसा आपण दोषी । उद्धरावें कृपेसीं ।
जरी असेल उपाय यासी । निरोपावें दातारा ॥३६॥

परिहासकें ते ब्राह्मण । सांगताति हांसोन ।
होईल पुढें तुज जनन । तधीं येईल तुज विद्या ॥३७॥

तुज कैंचा विद्याभ्यासु । नर नव्हेसि तूं साच पशु ।
भिक्षा मागूनि उदर पोस । अरे मूर्खा कुळनाशका ॥३८॥

ऐसें नानापरी नीचोत्तरेसीं । बोलती द्विज लोक त्यासी ।
वैराग्य धरुनि मानसीं । निघाला बाळ अरण्यासी ॥३९॥

मनीं झाला खेदें खिन्न । म्हणे त्यजीन आपुला प्राण ।
समस्त करिती दूषण । काय उपयोग जीवूनियां ॥४०॥

जळो जळो आपुलें जिणें । पशु झालों विद्याहीन ।
आतां वांचोनि काय कारण । म्हणोनि निघाला वैराग्यें ॥४१॥

भिल्लवडीग्रामासी । आला ब्रह्मचारी परियेसीं ।
अन्नोदक नेघे उपवासी । पातला निशीं दैववशें ॥४२॥

जेथें असे जगन्माता । भुवनेश्वरी विख्याता ।
तेथें पातला त्वरिता । करी दर्शन तये वेळीं ॥४३॥

न करी स्नान संध्या देखा । अपार करीतसे दुःखा ।
देवद्वारासन्मुखा । धरणें घेतलें तया वेळीं ॥४४॥

येणेंपरी दिवस तीनी । निर्वाण मन करुनि ।
अन्नोदक त्यजूनि । बैसला तो द्विजकुमर ॥४५॥

नव्हे कांहीं स्वप्न त्यालागोनि । म्हणोनि कोपे बहु मनीं ।
म्हणे अंबा भवानी । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥४६॥

आक्रोशोनि तये वेळीं । शस्त्रें घेऊनियां प्रबळी ।
आपुली जिव्हा तात्काळी । छेदूनि वाहे देवीचरणीं ॥४७॥

जिव्हा वाहोनि अंबेसी । मागुती म्हणे परियेसीं ।
जरी तूं मज उपेक्षिसी । वाहीन शिर तुझे चरणीं ॥४८॥

ऐसें निर्वाण मानसीं । क्रमिता झाला तो निशी ।
स्वप्न जाहलें तयासी । ऐका समस्त श्रोते जन ॥४९॥

"ऐक बाळा ब्रह्मचारी । नको आक्रोशं आम्हांवरी ।
असे कृष्णापश्चिमतीरीं । त्वरित जाय तयाजवळी ॥५०॥

औदुंबरवृक्षातळीं । असे तापसी महाबळी ।
अवतारपुरुष चंद्रमौळी । तुझी वांछा पुरवील" ॥५१॥

ऐसें स्वप्न तयासी । जाहलें अभिनव परियेसीं ।
जागृत होतांचि हर्षी । निघाला त्वरित तेथोनि ॥५२॥

निघाला विप्र त्वरित । पोहत गेला प्रवाहांत ।
पैलतटा जाऊनि त्वरित । देखता जाहला श्रीगुरुसी ॥५३॥

चरणांवरी ठेवूनि माथा । करी स्तोत्र अत्यंता ।
श्रीगुरुमूर्ति संतोषतां । आश्वासिती तया वेळीं ॥५४॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । माथां हस्त ठेविती ।
ज्ञान जाहलें त्वरिती । जिव्हा आली तात्काळ ॥५५॥

वेद-शास्त्र-पुराण । तर्क भाषा व्याकरण ।
समस्त त्याचें अंतःकरण । पूर्ण जाहलें तात्काळीं ॥५६॥

जैसा मानससरोवरास । वायस जातां परियेस ।
जैसा होय राजहंस । तैसें झालें विप्रकुमरा ॥५७॥

चिंतामणि-संपर्केसीं । सुवर्ण होय लोह कैसी ।
मृत्तिका पडतां जांबूनदीसी । सुवर्ण होय जेवीं देखा ॥५८॥

तैसें तया ब्राह्मणासी । गुरुचरण होतां स्पर्शी ।
आली अखिल विद्या त्यासी । वेदशास्त्रादि तर्क भाषा ॥५९॥

सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसी ऐका ।
जे जे स्थानीं वास देखा । स्थानमहिमा ऐसी असे ॥६०॥

म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍ट साधती ॥६१॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भिल्लवडीस्थानमहिमावर्णनं-मंदमतिब्राह्मणवरप्रदानं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या ६१ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥



गुरुचरित्र – अध्याय अठरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी ।
सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥

गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन ।
कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥

ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी ।
कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥

येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी ।
माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥

शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि ।
सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥

ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥

तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं ।
गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥

भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा ।
पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥

क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि ।
प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥

वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत ।
श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥

पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत ।
पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥

अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर ।
प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥

कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण ।
पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥

कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण ।
तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥

पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर ।
पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥

शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्वती ।
' पंचगंगा' ऐसी ख्याति । महापातक संहारी ॥१६॥

ऐसी प्रख्यात पंचगंगा । आली कृष्णेचिया संगा ।
प्रयागाहूनि असे चांगा । संगमस्थान मनोहर ॥१७॥

अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम्य ।
जैसा प्रयागसंगम । तैसे स्थान मनोहर ॥१८॥

वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु ।
देव असे अमरेश्वर । तया संगमा षटकूळी ॥१९॥

जैसी वाराणसी पुरी । गंगाभागीरथी-तीरी ।
पंचनदींसंगम थोरी । तत्समान परियेसा ॥२०॥

अमरेश्वरसंनिधानी । आहेति चौसष्ट योगिनी ।
शक्तितीर्थ निर्गुणी । प्रख्यात असे परियेसा ॥२१॥

अमरेश्वरलिंग बरवे । त्यासी वंदुनि स्वभावे ।
पुजितां नर अमर होय । विश्वनाथ तोचि जाणा ॥२२॥

प्रयागी करितां माघस्नान । जें पुण्य होय साधन ।
शतगुण होय तयाहून । एक स्नाने परियेसा ॥२३॥

सहज नदीसंगमांत । प्रयागसमान असे ख्यात ।
अमरेश्वर परब्रह्म वस्तु । तया स्थानी वास असे ॥२४॥

याकारणें तिये स्थानी । कोटितीर्थे असती निर्गुणी ।
वाहे गंगो दक्षिणी । वेणीसहित निरंतर ॥२५॥

अमित तीर्थे तया स्थानी । सांगता विस्तार पुराणीं ।
अष्टतीर्थ ख्याति जीण । तया कृष्णातटाकांत ॥२६॥

उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिममुखा ।
'शुक्लतीर्थ' नाम ऐका । ब्रहम्हत्यापाप दूर ॥२७॥

औदुंबर सन्मुखेसी । तीनी तीर्थे परियेसी ।
एकानंतर एक धनुषी । तीर्थे असती मनोहर ॥२८॥

'पापविनाशी' 'काम्यतीर्थ' । तिसरें सिध्द ' वरदतीर्थ ।
अमरेश्वरसंनिधार्थ । अनुपम्य असे भूमंडळी ॥२९॥

पुढें संगम-षट्‍कुळांत । प्रयागतीर्थ असे ख्यात ।
' शाक्तितीर्थ' अमरतीर्थ' । कोटितीर्थ' परियेसा ॥३०॥

तीर्थे असती अपरांपर । सांगता असे विस्तार ।
याकारणें श्रीपादगुरु । राहिले तेथें द्वादशाब्दें ॥३१॥

कृष्णा वेणी नदी दोनी । पंचगंगा मिळोनी ।
सप्तनदीसंगम सगुणी । काय सांगू महिमा त्याची ॥३२॥

ब्रह्महत्यादि महापातकें । जळोनि जातीं स्नानें एकें ।
ऐसें सिध्द्स्थान निकें । सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥

काय सांगूं त्यांची महिमा । आणिक द्यावया नाहीं उपमा ।
दर्शनमातें होती काम्या । स्नानफळ काय वर्णू ॥३४॥

साक्षात् कल्पतरु । असे वृक्ष औदुबरु ।
गौप्य होऊन अगोचरु । राहिले श्रीगुरु तया स्थानी ॥३५॥

भक्तजनतारणार्थ । होणार असे ख्यात ।
राहिले तेथें श्रीगुरुनाथ । म्हणोनि प्रकट जाहले जाणा ॥३६॥

असता पुढें वर्तमानीं । भिक्षा करावया प्रतिदिनीं ।
अमरापुर ग्रामी । जाती श्रीगुरु परियेसा ॥३७॥

तया ग्रामी द्विज एक । असे वेदभ्यासक ।
त्याची भार्या पतिसेवक । पतिव्रतशिरोमणी ॥३८॥

सुक्षीण असे तो ब्राह्मण । शुक्लभिक्षा करी आपण ।
कर्ममार्गी आचरण । असे सात्विक वृत्तीनें ॥३९॥

तया विप्रमंदिरांत । असे वेल उन्नत ।
शेंगा निघती नित्य बहुत । त्याणे उदरपूर्ति करी ॥४०॥

एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी । वरो न मिळे परियेसीं ।
तया शेंगांते रांधोनि हर्षी । दिवस क्रमी येणेंपरी ॥४१॥

ऐसा तो ब्राह्मण दरिद्री । याचकारणें उदर भरी ।
पंचमहायज्ञ कुसरी । अतिथि पूजी भक्तीनें ॥४२॥

वर्तता श्रीगुरु एके दिवसीं । तया विप्रमंदिरासी ।
गेले आपण भिक्षेसी । नेलें विप्रे भक्तिनें ॥४३॥

भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । पूजा करी तो षोडशी ।
घेवडे-शेंगा बहुवसी । केली होती पत्र-शाका ॥४४॥

भिक्षा करून ब्राह्मणासी । आश्वासिती गुरु संतोषी ।
गेलें तुझे दरिद्र दोषी । म्हणोनी निघती तये वेळी ॥४५॥

तया विप्राचे गृहांत । जो का होता वेल उन्नत ।
घेवडा नाम विख्यात । आंगण सर्व वेष्टिलें असे ॥४६॥

तया वेलाचें झाडमूळ श्रीगुरुमूर्ति छेदिती तात्काळ ।
टाकोनि देती परिबळें । गेले आपण संगमासी ॥४७॥

विप्रवनिता तये वेळी । दु:ख करिती पुत्र सकळी ।
म्हणती पहा हो दैव बळी । कैसें अदृष्ट आपुलें ॥४८॥

आम्हीं तया यतीश्वरासी । काय उपद्रव केला त्यासी ।
आमुचा ग्रास छेदुनी कैसी । टाकोनि दिल्हा भूमीवरी ॥४९॥

ऐसेपरी ते नारी । दु:ख करी नानापरी ।
पुरुष तिचा कोप करी । म्हणे प्रारब्ध प्रमाण ॥५०॥

म्हणे स्त्रियेसी तये वेळी । जें जें होणार जया काळी ।
निर्माण करी चंद्रमोळी । तया आधीन । विश्व जाण ॥५१॥

विश्वव्यापक नारायण । उत्पत्तिस्थितिलया कारण ।
पिपीलिकादि स्थूळ-जीवन । समस्तां आहार पुरवीतसे ॥५२॥

'आयुरन्नं प्रयच्छति' । ऐसें बोले वेदश्रुति ।
पंचानन आहार हस्ती । केवी करी प्रत्यही ॥५३॥

चौर्‍यायशी लक्ष जीवराशी । स्थूल सूक्ष्म समस्तांसी ।
निर्माण केलें आहारासी । मग उत्पत्ति तदनंतरें ॥५४॥

रंकरायासी एक दृष्टी । करुनि निक्षेपण ।सकृत अथवा दुष्कृत्य जाण ।
आपुलें आपणचि भोगणें । पुढील्यावरी काय बोल ॥५६॥

आपुलें दैव असतां उणें । पुढिल्या बोलती मूर्खपणे ।
जे पेरिलें तोंचि भक्षणें । कवणावरी बोल सांगे ॥५७॥

बोल ठेविसी यतीश्वरासी । आपलें आर्जव न विचारिसी ।
ग्रास हरितला म्हणसी । अविद्यासागरी बुडोनि ॥५८॥

तो तारक आम्हांसी ।म्हणोनि आला भिक्षेसी ।
नेलें आमुचे दरिद्रदोषी । तोचि तारील आमुतें ॥५९॥

येणेंपरी स्त्रियेसी । संभाषी विप्र परियेसी ।
काढोनि वेलशाखेसी । टाकीता झाला गंगेत ॥६०॥

तया वेलाचें मूळ थोरी । जे कां होतें आपुले द्वारी ।
काढूं म्हणुनि द्विजवरी । खणिता झाला तया वेळीं ॥६१॥

काढितां वेलमूळासी । लाधला कुंभे निधानेसी ।
आनंद जाहला बहुवसी । घेऊनि गेला घरांत ॥६२॥

म्हणती नवल काय वर्तले । यतीश्वर आम्हां प्रसन्न्न झाले ।
म्हणोनि ह्या वेला छेदिलें । निधान लाधलें आम्हांसी ॥६३॥

नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरीअवतार ।
आम्हां भेटला दैन्यहर । म्हणती चला दर्शनासी ॥६४॥

जाऊनि संगमा श्रीगुरुसी । पूजा करिती बहुवसी ।
वृत्तांत सांगती तयासी । तये वेळी परियेसा ॥६५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुम्ही न सांगणें कवणासी ।
प्रकट करितां आम्हांसी । नसेल लक्ष्मी तुमचे घरी ॥६६॥

ऐसेपरी तया द्विजासी । सांगे श्रीगुरु परियेसी ।
अखंड लक्ष्मी तुमचे वंशी । पुत्रपौत्री नांदाल ॥६७॥

ऐसा वर लधोन । गेली वनिता तो ब्राह्मण ।
श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रे दैन्य हरे ॥६८॥

ज्यासी होय श्रीगुरुकृपा । त्यासी कैचें दैन्य पाप ।
कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा । दैन्य कैंचे तया घरी ॥६९॥

दैव उणा असेल जो नरु । त्याणें आश्रयावा श्रीगुरु ।
तोचि उतरेल पैलपारु । पूज्य होय सकळिकांई ॥७०॥

जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी लाधेल इह-परु ।
अखंड लक्ष्मी त्याचे घरी । अष्टैश्वर्ये नांदती ॥७१॥

सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा असे ऐसी ।
भजावे तुम्हीं मनोमानसीं । कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥

गंगाधराचा कुमर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।
पुढील कथामृतसार । ऐका श्रोते एकचित्तें ॥७३॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय: ॥ १८ ॥

॥ श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ शुभं भवतु ॥

॥ ओवी संख्या ७३ ॥



गुरुचरित्र – अध्याय एकोणीसावा

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिध्दाचिया चरणां ।
करसंपुट जोडून । विनवीतसे तया वेळी ॥१॥

जय जया सिध्द योगीश्वरा । तूंचि ज्योति अंधकारा ।
भक्तजनांच्या मनोहरा । भवसागरतारका ॥२॥

अज्ञानतिमिररजनींत । निजलों होतों मदोन्मत्त ।
गुरुचरित्र मज अमृत । प्राशन करविलें दातारा ॥३॥

त्याणें झालें मज चेत । ज्ञानसूर्यप्रकाश होत ।
तुझे कृपेने जागृत । जाहलों स्वामी सिध्दमुनि ॥४॥

पुढील कथाविस्तारा । निरोपावा योगीश्वरा ।
कृपा करी गा दातारा । म्हणोनि लागला चरणांसी ॥५॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला सिध्द आपण ।
सांगतसे विस्तारुन । श्रीगुरुमहिमा अनुपम्य ॥६॥

शिष्योत्तमा नामंकिता । सांगेन ऐके गुरुची कथा ।
औदुंबरतळी अतिप्रीता । होते श्रीगुरु परियेसा ॥७॥

ऐकोनी सिध्दाचें वचन । नामधारक करी प्रश्न ।
अनेक पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीति औदुंवरी ॥८॥

अश्वत्थ्वृक्ष असे थोर । म्हणोनि सांगती वेद शास्त्र ।
श्रीगुरुप्रीति औदुंबर । कवण कारण निरोपावें ॥९॥

सिध्द म्हणे नामंकिता । सांगेन याचिया वृतांता ।
जधीं नरसिंह अवतार होता । हिरण्यकश्यप विदारिला ॥१०॥

नखेंकरूनि दैत्यासी । विदारिलें कोपेसीं ।
आंतडीं काढूनियां हषीं । घालती माळ गळां नरहरीनें ॥११॥

त्या दैत्याचे पोटी विष होतें काळ्कूटी ।
जैसी वडवाग्नि मोठी तैसें विष परियेसा ॥१२॥

विदारण करितां दैत्यासी । वेधलें विष त्या नखांसी ।
तापली नखें बहुवसी । ऐक शिष्या एकचित्तें ॥१३॥

तये समयी महालक्ष्मी । घेऊनि आली अतिप्रेमी ।
औदुंबरफळ नामी । शांतीकारणें नखांसी ॥१४॥

तये वेळी शीतलार्थ । नखें रोविलीं औदुंबरात ।
विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ॥१५॥

शांत जाहला नृसिंहदेव । देता झाला लक्ष्मीसि खेंव ।
संतोषोनि उभय देव । वर देती तये वेळीं ॥१६॥

तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी ।
" सदा फळित तूं होसी । 'कल्पवृक्ष ' तुझे नाम ॥१७॥

जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं ।
तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥

जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक ।
फळ प्राप्त होय निके । पापावेगळा होय नर ॥१९॥

वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता ।
जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥

तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान ।
अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥

तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत ।
भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥

तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं ।
ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥

जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं ।
कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥

सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी " ।
म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥

ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु ।
नरसिंहमूर्ति होतां उग्र । शांत झाली तयापाशी ॥२६॥

याकारणे श्रीगुरुमूर्ति नृसिंहमंत्र उपासना करिती ।
उग्रत्वाची करावया शांति । औदुंबरी वास असे ॥२७॥

अवतार आपण तयाचे स्थान आपुलें असे साचें ।
शांतवन करावया उग्रत्वाचे । म्हणोनि वास औदुंबरी ॥२८॥

सहज वृक्ष तो औदुंवर । कल्पवृक्षसमान तरु ।
विशेषें वास केला श्रीगुरु । कल्पिली फळे तेथे होती ॥२९॥

तया कल्पद्रुमातळी । होते श्रीगुरुस्तोममौळी ।
ब्रह्मा-विष्णु-नेत्रभाळी । देह मानुषी धरोनियां ॥३०॥

भक्तजनां तारणार्थ । पावन करिती समस्त तीर्थ ।
अवतार त्रयमूर्ति गुरुनाथ । भूमीवरी वर्तत असे ॥३१॥

वृक्षातळी अहर्निशीं । श्रीगुरु असती गौप्येसी ।
माध्यान्हकळसमयासी । समारंभ होय तेथें ॥३२॥

अमरेश्वर्संनिधानीं । वसई चौसष्ट योगिनी ।
पूजा करावया माध्यान्ही । श्रीगुरुजवळी येती नित्य ॥३३॥

नमन करूनि श्रीगुरूसी । नेती आपुले मंदिरासी ।
पूजा करिती विधीसीं । गंधपरिमळ-कुसुमें ॥३४॥

आरोगोनि तयां घरी । पुनरपि येती औदुंबरी ।
एके समयी द्विजवरी । विस्मय करिती देखोनियां ॥३५॥

म्हणती अभिन याति कैसा । न क्री भिक्षा ग्रामांत ऐसा ।
असतो सदा अरण्यवासा । कवणेपरी काळ कंठी ॥३६॥

पाहूं याचें वर्तमान । कैसा क्रमितो दिनमान ।
एखादा नर ठेवून । पाहो अंत यतीश्वराचा ॥३७॥

ऐसं विचारूनि मानसी । गेले संगमस्थानासी ।
माध्यान्हसमयी तयांसी । भय उअपजलें अंत:करणीं ॥३८॥

पाहूं म्हणती श्रीगुरूचा अंत । तेचि जाती यमपंथ ।
ऐसे विप्र मदोन्मत्त । अधोगतीचे तेचि इष्ट ॥३९॥

उपजतां भय ब्राह्मणांसी । गेले आपुलें स्थानासी ।
गंगनुज थडियेसी । होता वृत्ति राखीत ॥४०॥

त्याणें देखिले श्रीगुरुसी । आल्या योगिनी पूजेसी ।
गंगेमध्ये येतां कैसी । मार्ग जाहला जळांत ॥४१॥

विस्मय करी तो नरु । म्हणे कैसा यतीश्वरु ।
द्विभाग झाला गंगापूरु । केवी गेले गंगेंत ॥४२॥

श्रीगुरुतें नेऊनि। पूजा केली त्या योगिनी।
भिक्षा तेथें करूनि आले मागुती बाहेर ॥४३॥

पहात होता गंगानुज । म्हणे कैसे जाहले चोज ।
अवतार होईल ईश्वरकाज । म्हणोनि पूजिती देवकन्या ॥॥४४॥

येरे दिवसीं मागुती । हाती घेऊन आरति ।
देवकन्या ओंवाळिती । श्रीगुरूतें नमूनियां ॥४५॥

पुन्हा गंगाप्रवाहांत । श्रीगुरु निघाले योगिनीसहित ।
हो कां नर होता पहात । तोही गेला सर्वेचि ॥४६॥

नदीतीरी जातां श्रीगुरु । द्विभार जाहलें गंगेत द्वारु ।
भीतरी दिसे अनुपम्य पुर । रत्नखचित गोपुरेसीं ॥४७॥

अमरावतीसमान नगर जैसी तेजें दिनकर ।
श्रीगुरु जातांचि समस्त पुर। घेऊनि आलें आरति ॥४८॥

ओवाळून आरति ।
नेलें आपुले मंदिराप्रति सिंहासन रत्नखचिती । बैसो घालिती तया समयीं ॥४९॥

पूजा करिती विधीसीं । जे कां उपचार षोडशी ।
अनेकापरी षड्रसेसीं । आरोगिलें तये वेळीं ॥५०॥

श्रीगुरु दिसती तया स्थानीं । त्रैमूर्ति जैसा शुलपाणि ।
पूजा घेऊनि तत्क्षणीं । मग परतले तयेवेळी ॥५१॥

देखोनियां तया नरासी । म्हणती तूं कां आलासी ।
विनवी तो नर स्वमियासी । सहज आलों दर्शनाते ॥५२॥

म्हणोनि लागला गुरुचरणीं । तल्लीन होवोनि अंत:करणीं ।
म्हणे स्वामी गिरिजारमणा । होसी त्रयमूर्ति तुंचि एक ॥५३॥

न कळे तुझें स्वरूपज्ञान । संसारमाया वेष्टून ।
तूं तारक या भवाणी । उध्दरावे स्वामिया ॥५४॥

तूं तारक विश्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी ।
अज्ञान म्हणिजे रजनीसी । ज्योति:स्वरूप तूंचि एक ॥५५॥

तुझें दर्शन होय ज्यासी । सर्वाभीष्ट फळ होय त्यासी ।
इहपर अप्रयासी । जोडे नरा न लागतां क्षण ॥५६॥

ऐशापरी तो देखा । स्तुति करितो नर ऐका ।
संतोषूनि गुरुनायकें । आश्वासिले तया वेळी ॥५७॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुझें दैन्य गेलें परियेसी ।
जें जें तूं इच्छिसी मानसी । सकळाभीष्ट पावशील ॥५८॥

येथील वर्तमान ऐसी । न सांगावे कवणासी ।
जया दिवशी प्रगट करिसी । तूतें हानी होईल जाण ॥५९॥

येणेंपरी तयासी । श्रीगुरु सांगती परियेसी ।
लाले औदुंबरापाशी । गंगानुज-समागमें ॥६०॥

श्रीगुरूचा निरोप घेऊन । गेला गंगानुज आपण ।
वृत्तिस्थानीं जातांचि क्षण । निधान त्यासी लाधलें ॥६१॥

ज्ञानवं तो झाला नरु । नित्य सेवा करी तो गुरु ।
पुत्रपौत्र श्रियाकर । महानंदे वर्ततसे ॥६२॥

भक्तिभावें श्रीगुरुसी । नमन करी प्रतिदिवसीं ।
सेवा करी कलत्रेंसी । एकोभावेंकरूनियां ॥६३॥

वर्तता ऐसे एके दिवसी । आली पौर्णिमा माघमासीं ।
नमन करूनि श्रीगुरूसी । विनवीतसे तो भक्त ॥६४॥

म्हणे स्वामी जगद्गुरु । माघस्नानी प्रयाग थोरु ।
म्हणोनि सांगती द्विजवरु । काशीपूर महाक्षेत्र ॥६५॥

कैसे प्रयाग गयास्थान । कैसें वाराणसी भुवन ।
नेणों आपण यातिहीन । कृपा करणें स्वामिया ॥६६॥

श्रीगुरु म्हणती तयासी । पंचगंगासंगमेंसी ।
' प्रयाग ' जाणावें भरंवसी । ' काशीपुर " तें जुगुळ ॥६७॥

दक्षिण ' गया' कोल्हापुर । त्रिस्थळी ऐसें मनोहर ।
जरी पहासी प्रत्यक्षाकार । दावीन तुज चाल आतां ॥६८॥

बैसले होते व्याघ्राजिनीं । धरी गा मागे दृढ करूनि ।
मनोवेगें तत्क्षणी । गेले प्रयागा प्रात:काळी ॥६९॥

तेथे स्नान करूनि । गेले काशीस माध्याह्निं ।
विश्वनाथा दाखवूनि सर्वेचि गेले गयेसी ॥७०॥

ऐसी त्रिस्थळी आचरोनि । आले परतोनि अस्तमानीं ।
येणेपरी । तयास्थानीं । देखता झाला तो नर ॥७१॥

विश्वनाटक श्रीगुरुमूर्ति । प्रकट झाली ऐसी किर्ति ।
श्रीगुरु मनीं विचारिती । आतां येथे गौप्य व्हावे ॥७२॥

ऐसेपरी तयास्थानीं ।
प्रकट झाले श्रीगुरुमुनि अमरेश्वरातें पुसोनि । निघत झाले तये वेळी ॥७३॥

श्रीगुरु निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी ।
निनविताति करूणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥७४॥

नित्य तुमचे दर्शनासी । तापत्रय हरती दोषी ।
अन्नपूर्णा तुम्हांपाशी । केवी राहुं स्वामिया ॥७५॥

येणेंपरी श्रीगुरुसी । योगिनी विनविती भक्तीसीं ।
भक्तवत्सलें संतोषीं । दिधला वर वेळीं ॥७६॥

श्रीगुरु म्हणती तयांसी। सदा असों औदुंबरेसी ।
प्रकटार्थ जाणे पूर्वेसी । स्थान आमुचें येथेचि असे ॥७७॥

तुम्ही रहावें येथें औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी ।
अन्नपूर्णा प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥७८॥

कल्पवृक्ष औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर ।
अमरापुर पश्चिम तीर । अमर स्थान हेंचि जाणा ॥७९॥

प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत ।
मनकामना होय त्वरित । तुम्हीं त्यांसी साह्य व्हावे ॥८०॥

तुम्हांसहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी ।
पूजा करिती जे तत्परी मनकामना पुरती जाणा ॥८१॥

येथे असे अन्नपूर्णा ।नित्य करिती आराधना ।
तेणें होय कामना । अतुर्विध पुरुषार्थ ॥८२॥

पापविनाशी काम्यतीर्थ । सिध्द्तीर्था स्नान करीत ।
सात वेळ स्नपन करीत तुम्हांसहित औदुंबरी ॥८३॥

साठी वर्षे वांझेसी । पुत्र होती शतायुषी ।
ब्रह्महत्या पाप नाशी । स्नानमात्रे त्या तीर्था ॥८४॥

सोमसूर्यग्रहणेसी । अथवा मास संक्रांतीसी ।
स्नान करिती फळें कैसी । ऐका श्रोते एकचित्तें ॥८६॥

श्रुंग-खूर-सुवर्णेसी । अलंकृत धेनूसी । सहस्त्र कपिला ब्राह्मणांसी ।
सुरनदीतीरी ऐका । भोजन दिल्हें फळ असे ॥८८॥

औदुंबरवृक्षातळीं । जप करिती जे मननिर्मळी ।
कोटिगुणें होती फळें । होम केलिया तैसेंचि ॥८९॥

रुद्र जपोनि एकादशी । पूजा करिती मनोमानसी ।
अतिरुद्र केले फळसदृशी । एकाचित्तें परियेसा ॥९०॥

मंदगती प्रदक्षिणा । करितां होय अनंत पुण्य ।
पदोपदीं वाजपेययज्ञ । फळ तेथें परियेसा ॥९१॥

नमन करितां येणेंपरीं। पुण्य असे अपरांपरी ।
प्रदक्षिणा दोन चारी । करूनी करणें नमस्कार ॥९२॥

कुष्ठ असेल अंगहीन । त्याणें करणें प्रदक्षिणा ।
लक्ष वेळ करितां जाणा । देवासमान देह होय ॥९३॥

ऐसे स्थान मनोहरु । सहज असे कल्पतरु ।
म्हणोनि सांगतति गुरु । चौसष्ठ योगिनींसी ॥९४॥

ऐसा निरोप देऊन । श्रीगुरु निघाले तेथून ।
जेथें होतें गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य ॥९५॥

विश्वरूप जगन्नाथ । अखिल ठायीं असे वसत ।
औदुंबरी प्रीति बहुत । नित्य तेथें वसतसे ॥९६॥

गौप्य राहोनी औदुंबरी । प्रकटरूपें गाणगापुरी ।
राहिले गुरु प्रीतिकरीं । प्रख्यात झाले परियेसा ॥९७॥

सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा आहे ऐसी ।
प्रकट झाले बहुवसी । गाणगापुरी परियेसा ॥९८॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार।
भक्तिपूर्वक ऐकती नर । लाभे चतुर्विध पुरुषार्थ ॥९९॥

गुरुचरित्र कामधेनु । जे ऐकती भक्तजनु ।
त्यांचे घरी निधानु । सकळाभीष्टें पावती ॥१००॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे औदुबरवृक्षमहिमानं – योगिनीप्रतिदिनदर्शनं तथा वरप्रदानं नाम एकोनविशोऽध्याय: ॥१९॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥  ॥  ॥  ॥

॥ ओवी संख्या १०० ॥



गुरुचरित्र – अध्याय विसावा

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिध्दचिया चरणा ।
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरूनि ॥१॥

पुसतसे तयावेळी । माथा ठेवोनि चरणकमळी ।
जय जया सिध्द-स्तोममौळी । विनंति एक अवधारा ॥२॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी ।
गौप्यरूपें अमरापुरासी । औदुंबरी असती म्हणतां ॥३॥

वर देऊनि योगिनींसी । आपण आले प्रकटेसी ।
पुढे तया स्थानी कैसी । विस्तार झाला तें निरोपावें ॥४॥

वृक्ष सांगसी औदुंबर । निश्चयें म्हणसी कल्पतरु ।
पुढे कवणा झाला वरु । निरोपावे दातारा॥५॥

शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिध्दमुनि ।
सांगतसे विस्तारुनि । औदुंबरास्थानमहिमा ॥६॥

सिध्द म्हणे ऐक बाळा । किती सांगूं गुरुची लीळा ।
औदुंबरी सर्वकाळ । वास आपण असे जाणा ॥७॥

जया नाम कल्पतरु । काय पुससी तयाचा वरु ।
जेथे वास श्रीगुरु॥ कल्पिलें फळ तेथें होय ॥८॥

अमित झाला तेथें महिमा । सांगावया अशक्य आम्हां ।
एखादा सांगो दृष्टांत तुम्हां । शिष्योत्तमा नामधारक ॥९॥

'शिरोळे' म्हणिजे ग्रामेसी । विप्र एक परियेसीं ।
'गंगाधर' नाम ऐसी । वेदरत होता जाणा ॥१०॥

त्याची भार्या पतिव्रता । शांत असे सुशीलता ।
तिसी पुत्र होती ते सर्वेचि मृत्युता । कष्टतसे येणेंपरी ॥११॥

पांच पुत्र तिसी झाले । सर्वेचि पंचत्व पावले ।
अनेक देव आराधिले । नव्हे कवणेपरी स्थिर ॥१२॥

दु:ख करी ते नारी । व्रत उपवास अपरांपरी ।
पूर्वकर्म असे थोरी । स्थिर नोहे पुत्र तिसी ॥१३॥

रहणी कर्मविपाकेसी । विचार करिती तिच्या दोषासी ।
पुत्रशोक व्हावयासी । सांगती पातकें तये वेळी ॥१४॥

सांगती विप्र विद्वज्जन । पुत्र न वांचती काय कारण ।
पूर्वजन्म-दोषगुण । विस्तार करिती तियेसी ॥१५॥

गर्भपात स्त्रियांसी । जे जन करिती तामसी ।
पावती वांझ-जन्मासी । झाले पुत्र मरती जाणे ॥१६॥

अश्ववध गोवध करी । वांझ होय सदा ज्वरी ।
एकदा परद्रव्य अपहारी । अपुत्री होय तो जाणा ॥१७॥

विप्र म्हणती तियेसी । तुझे पूर्वजन्म-दोषी ।
दिसतसे आम्हांसी । सांगूं ऐका एकचित्ते ॥१८॥

शोनेकगोत्री द्विजापाशीं । रीण घेतले द्रव्यासी ।
मागता तुवां न देसी । कष्टला बहुत तो ब्राह्मण ॥१९॥

लोभी होता तो ब्राह्मण । द्रव्यसंबंधे दिधला प्राण ।
आत्महत्या केलिया गुणें । तो पिशाच झाला असे ॥२०॥

गर्भपात करी तो तुज । जाहल्या मृत्यु करी तो द्विज ।
तुझें कर्म असे सहज । आपली जोडी भोगावी ॥२१॥

ऐकोनी ब्राह्मणाचे वचन । विप्रवनिता खेदे खिन्न ।
अनुतप्त होऊनि अंत:करण । द्विजचरणा लागली ॥२२॥

कर जोडोनि तये वेळी । विनवीतसे करुणाबहाळी ।
माथा ठेवूनि चरणकमळी । पुसतसे तयावेळी ॥२३॥

ऐसी पापिणी दुराचारी । बुडाल्यें पापाचे सागरी ।
स्वामी मातें तारी तारी । उपाय सांगणे म्हणतसे ॥२४॥

ऐसी पापें हळाहळी । अपत्ये भक्षिली चांडाळी ।
औषधी सांगा तुम्ही सकळी । म्हणोनी सभेसी विनवीतसे ॥२५॥

विप्र म्हणती तियेसी । तुवां केली ब्रह्महत्या दोषी ।
अपहारिलें द्रव्यासी । ब्राह्मण पिशाच जाहला असे ॥२६॥

जधी मेला द्विजवर । केली नाहीं क्रियाकर्म-पर ।
त्याचें द्रव्य तुवां सारें । भोगिलें असे जन्मांतरी ॥२७॥

त्यासी करणें उध्दारगति । सोळावें कर्म करावें रीतीं ।
द्रव्य द्यावें एकशती । तया गोत्रद्विजासी ॥२८॥

तेणें होय तुज बरवें । एकोभावें आचरावें ।
कृष्णतीरी वास करावें । एक मास उपवासी ॥२९॥

पंचगंगासंगमेसी । तीर्थे असती बहुवसी ।
औदुंबरवृक्षासी । आराधावें परियेसा ॥३०॥

पापविनाशी करुनी स्नान । वेळ सात औदुंबरस्नपन ।
अभिषेकोनि श्रीगुरुचरण । पुन्हा स्नान काम्यतीर्थी ॥३१॥

विधिपूर्वक श्रीगुरुचरणीं ।
पूजा करावी भावोनी॥ येणेंपरी भक्तीने । मास एक आचरावें ॥३२॥

स्थान असे श्रीगुरुचें । नरसिंहसरस्वतीचें ।
तुझे दोष जातील साचे । पुत्र होतील शतायुषी ॥३३॥

मास आचरोनी येणेंपरी । मग ब्राह्मणातें पाचारीं ।
द्रव्य द्यावें शौनकगोत्री । द्वीजवरासी एक शत ॥३४॥

त्याचेनि नामें कर्म सकळ । आचरावें मन निर्मळ ।
होतील तुझे कष्ट सफळ । श्रीगुरुनाथ तारील ॥३५॥

गुरुस्मरण करूनि मनीं । तूं पूजा करीं वो गुरुचरणीं ।
तुझें पाप होईल धुणी । ब्राह्मणसमंध परिहरेल ॥३६॥

ऐसें सांगतां द्विजवरीं । ऐकोनि सती चिंता करी ।
शतद्रव्य आमुच्या घरीं । कधीं न मिळे परियेसा ॥३७॥

कष्ट करीन आपुले देहीं । उपवासादि पूजा पाहीं ।
मासोपवास एकोभावीं । करीन आपण गुरुसेवा ॥३८॥

येणेंपरी तये नारी । सांगे आपुले निर्धारीं ।
ऐकोनियां द्विजवरीं । निरोप देती तये वेळी ॥३९॥

विप्र म्हणती ऐक बाळे । तूर्ते द्रव्य इतुकें न मिळे ।
सेवा करीं वो मननिर्मळें । श्रीगुरुचरणीं तूं आतां ॥४०॥

निष्कृति तुझिया पापासी ।श्रीगुरु करील परियेसीं।
औंदुबरसंनिधेंसी । वास असे निरंतर ॥४१॥

तो कृपाळू भक्तांसी । निवारील ब्रह्महत्यादोषासी ।
जितुकें येईल तुझ्या शक्तीसी । द्रव्य वेंची गुरुनिरोपें ॥४२॥

परिसोनि द्विजवचन । विप्रवनिता संतोषोन ।
गेली त्वरित ठाकोन । जेथें स्थान श्रीगुरूचें ॥४३॥

स्नान करूनि संगमासी । पापविनाशीं विधीसीं ।
सात वेळ स्नपनेसीं । करी औदुंबरी प्रदक्षिणा ॥४४॥

काम्यतीर्थी करूनि स्नान । पूजा करूनि श्रीगुरुचरण ।
प्रदक्षिणा करूनि नमन । करीतसे उपवास ॥४५॥

येणेंपरी दिवस तीनी । सेवा करितां ते ब्राह्मणी ।
आला विप्र तिच्या स्वप्नीं । द्रव्य मागे शत एक ॥४६॥

अद्यापि जरी न देसी । घेईन तुझे प्राणासी ।
पुढें तुझ्या वंशासी । वाढों नेदीं अवधारीं ॥४७॥

वायां करिसी तूं सायासी । पुत्र कैंचे तुझे वंशी ।
म्हणोनि कोपें मारावयासी । आला पिशाच स्वप्नांत ॥४८॥

भयचकित ते वनिता । औदुंबराआड रिघतां ।
तंव देखिलें श्रीगुरुनाथा । तयापाठीं रिघाली ॥४९॥

अभय देवोनि नारीसी । वारिता झाला ब्राह्मणासी ।
पुसती श्रीगुरु तयासी । कां मारिसी स्त्रियेसी ॥५०॥

विप्र विनवी श्रीगुरूसी । "जन्मांतरी आपणासी ।
अपहार केला द्रव्यासी । प्राण त्यजिला यास्तव ॥५१॥

स्वामी कृपाळू सर्वांसी । आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी ।
तुंही यतीश्वर तापसी । पक्षपात करूं नये " ॥५२॥

ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती कोपोन ।
"उपद्रव देसी भक्तजना । तूंतें शिक्षा करूं जाण ॥५३॥

आम्ही सांगों जेंणें रीती । जरी ऐकसी हितार्थी ।
तुज होईल सद्गति । पिशाचत्व परिहरेल ॥५४॥

जें काय देईल विप्रवनिता । तुवां अंगिकारावें सर्वथा ।
जरी न ये तुझ्या चित्ता । जाईं आतां येथोन ॥५५॥

राखीव माझिया भक्तांसी । वंशोवंशी अभिवृध्दीसीं ; ।
पुनरपि जरी पाहूं येसी । शिक्षा करूं " म्हणती गुरु ॥५६॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विप्र-पिशाच करी नमन ।
" स्वामी तुझे देखिले चरण । उध्दरावें आपणासी ॥५७॥

जेणेंपरी आपणासी । होय गति उध्दरावयासी ।
निरोप देसी करुणेसीं । अंगिकारूं स्वामिया " ॥५८॥

श्रीगुरु म्हणती तयासी । विप्रवनिता भावेसीं ।
करील कर्म दहा दिवशी । गति होईल तूतें जाणा ॥५९॥

येणेंपरी तयासी । निरोप देती स्त्रियेसी ।
जें असेल तुजपाशी । आचरीं कर्म तया नामीं ॥६०॥

अष्टतीर्थी स्नान करी । तया नामें अवधारीं ।
सात दिवस येणेंपरी । स्नपन करीं औदुंबरा ॥६१॥

ब्रह्महत्या तुझे दोषी । जातील त्वरित भरंवसी ।
कन्या पुत्र पूर्णायुषी । होतील म्हणती श्रीगुरु ॥६२॥

ऐसें देखोनि जागृतीं । विप्रवनिता भयचकिती ।
ज्ञाने पाहे श्रीगुरुमूर्ति । न विसंवे मनांत ॥६३॥

श्रीगुरुनिरोपें दहा दिवस । केलें आचरण परियेस ।
ब्रह्महत्या गेला दोष । गति झाली ब्राह्मणासी ॥६४॥

येरे दिवशी स्वप्नांत । प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ ।
नारिकेल दोन देत । भरली ओंटी तियेची ॥६५॥

म्हणे पारणें करीं वो तूं आतां । पुत्र होतील वेदरता ।
वाढे त्यांची संतति बहुता । चिंता न करीं अहो बाळे ॥६६॥

गुरुनिरोपें आराधन । करिती दंपती मन:पूर्ण ।
प्रकट झाला श्रीगुरुराणा । संपर्क लोह-परिसापरी ॥६७॥

गुरुनिरोपें आराधन । करिती दंपती मन:पूर्ण ।
प्रकट झाला श्रीगुरुराणा । संपर्क लोह परिसापरी ॥६८॥

पुढें तया नारीसी। पुत्रयुग्म सद्वंशी ।
झाले श्रीगुरुकृपेसीं । एकचित्तें परियेसा ॥६९॥

व्रतबंध करिती ज्येष्ठासी । समांरंभ अनंत हर्षी ।
चौलकर्म दुजियासी । करूं पहाती मातापिता ॥७०॥

समारंभ करी जननी । चौलकर्म करणें मनीं ।
पुत्रासी जाहली वर्षे तीन्ही । अत्योल्हास मानसीं ॥७१॥

समारंभ अतिप्रीतीं । करिती झाली आयती ।
पूर्व दिवसी मध्यरात्रीं । आली व्याधि कुमरासी ॥७२॥

व्याधि असती अष्टोत्तर । एकाहूनि एक थोर ।
तयामध्यें जो का तीव्र । धनुर्वात तयासी ॥७३॥

अवयव वांकोनि । दिसे भयानक नयनी ।
येणेपरी दिवस तीन्ही । कष्टातसे तो बाळ ॥७४॥

तया दिवशीं अस्तमानीं । पंचत्व पावला तत्क्षणी ।
शोक करिती जनक जननी । ऐका श्रोते एकचित्तें ॥७५॥

आक्रोशोनि भूमीसी । आफळी शिर सत्राणेसीं ।
पाषाण घेवोनि उरासी । घात करी ते नारी ॥७६॥

देह टाकी धरणीवरी । निर्जीव होवोनि क्षणभरी ।
आठवी दु:ख अपरांपरी । नयनीं वाहे पूर्ण जळ ॥७७॥

प्रेतपुत्रावरी लोळे । अलिंगोनि परिबळें ।
विष्टोनियां मायाजाळें । प्रलापीतसे ते नारी ॥७८॥

म्हणे ताता पुत्रराया । प्राणरक्षका माझ्या प्रिया ।
मातें केवी सोडूनियां । जासी कठोर मन करूनि ॥७९॥

कोठें गेलासी खेळावया । स्तनींचें क्षीर जातसे वायां ।
शीघ्र येई गा ठाकोनियां । पुत्रराया परियेसीं ॥८०॥

केवीं विसरूं तुझे गुण । माझा तूंचि निर्धान ।
तुझे गोजिरें बोलणें । केवीं विसरूं पुत्रराया ॥८१॥

तुझे रूपासारखा सुत । केवी देखों मी निश्चित ।
निधान देखत्यें स्वप्नांत । तैसें मज चाळ्विलें ॥८२॥

पुत्र व्यालें पांच आपण । त्यात तूं एक निधन ।
जधीं झालें गर्भधारण । तैपासाव संतोष ॥८३॥

डोहळे मज उत्तम होती । कधी नसे मी दुश्चिती ।
अत्योल्हास नवमासांतीं । पुत्र होईल म्हणोनि ॥८४॥

श्रीगुरूंनी दिधला मातें वर । पुत्र होईल निर्धार ।
त्याणें मज हर्ष फार । वरद पिंड म्हणोनि॥८५॥

जघीं तुज प्रसूत जाहल्यें । अनंत सौख्य मीं लाधलें ।
प्राणप्रिया तुज मीं पोसिलें । आमुतें रक्षिसी म्हणोनि ॥८६॥

मज भरंवसा तुझा बहुत । वृध्दाप्याचा पोषक म्हणत ।
आम्हांसी सांडूनि जातां उचित । धर्म नव्हे पुत्रराया ॥८७॥

दु:ख झालें मज बहुत ।विसरल्यें बाळा तुज देखत ।
तूं तारक आमुचा सत्य । म्हणोनि विश्वास केला जाण ॥८८॥

ऐंसें नानापरी देखा । दु:ख करी ते बाळिका ।
निवारण करिती सकळ लोक । वाया दु:ख तूं कां करिसी ॥८९॥

देवदानवऋषेश्वरांसी । होणार न चुके परियेसीं ।
ब्रह्मा लिही ललाटेंसी। तेचि अढळ जाण सत्य ॥९०॥

अवतार होताति हरिहर । तेही न राहती स्थिर ।
उम्ही तरी मनुष्य नर । काय अढळ तुम्हांसी॥९१॥

येणेंपरी सांगती जन । आणखी दु:ख आठवी मन ।
म्हणे मातें दिधलीं जाण । स्थिर म्हणोनि दोन्ही फळें ॥९२॥

श्रीगुरु-नरसिंहसरस्वती । भूमंडळीं महाख्याति ।
औदुंबरी सदा वसती । त्यांणी दिधले मज सुत ॥९३॥

त्याचे बोल केवी मिथ्या । मातें दिधला वर सत्या ।
त्यासी घडो माझी हत्या। पुत्रासवें देईन प्राण ॥९४॥

म्हणोनि आठवी श्रीगुरूसी । देवा मातें गांजिलेंसी ।
विश्वास केला मी तुम्हांसी । सत्य वाक्य तुझें म्हणत ॥९५॥

सत्यसंकल्प तूंचि होसी । म्हणोनि होत्यें विश्वासीं ।
घात केला गा आम्हांसी । विश्वासघातकी केवी न म्हणों ॥९६॥

त्रयमूर्तीचा अवतारु । तुंचि नरसिंहसरस्वती गुरू।
ध्रुवा विभीषणा दिधला वरु । केवीं सत्य म्हणों आतां ॥९७॥

विश्वास केला तुझे बोलें । आतां मातें उपेक्षिलें ।
माझ्या मनीं निश्चय केला । प्राण देईन तुम्हांवरी ॥९८॥

लोक येती तुझ्या स्थानीं । सेवा करिती निवसोनि ।
औदुंबरी प्रदक्षिणा करूनि । पुरश्चरणें करिताति ॥९९॥

आपण केलें पुरश्चरण । फळा आलें मज साधन ।
आतां तुजवरी देईन प्राण । काय विश्वास तुझ्या स्थानीं ॥१००॥

कीर्ति होईल सृष्टींत । आम्हां केला तुवां घात ।
पुढें तुज भजती भक्त । काय भरंवसा तयांसी ॥१॥

ब्रह्मस्वदोषें पीडोन । दृढ धरिले तुझे चरण ।
अंगीकारोनि मध्यें त्यजणें । कवण धर्म घडतसे ॥२॥

व्याघ्रातें धेनु भिऊन । जाय आणिकापाशीं ठासून ।
तोचि मारी तिचा प्राण । तयापरी झालें आपणासी ॥३॥

कीं एखादा पूजेसी । जाय देउळा संधीसी ।
तेंचि देऊळ तयासी । मृत्यु जोऊनि वर पडे ॥४॥

तयपरी आपणासी । जाहलें स्वामी परियेसीं ।
माझ्या प्राणसुतासी । न राखिसी देवराया ॥५॥

येणेंपरी अहोरात्री । दु:ख करीतसे ते नारी ।
उदय जाहला दिनकरीं । प्रात:काळीं परियेसा ॥६॥

द्विज ज्ञाते मिळोनि सकळी । येती तये स्त्रियेजवळी ।
वायां दु:ख सर्वकाळी । करिसी मूर्खपणें तूं ॥७॥

जे जे समयीं होणार गति । ब्रह्मादिकां न चुके ख्याति ।
चला जाऊं गंगेप्रती । प्रेतसंस्कार करूं आतां ॥८॥

ऐसें वचन ऐकोनि । महा आक्रोश करी मनी ।
आपणासहित घाला वन्ही । अथवा नेदी प्रेतासी ॥९॥

आपणासहित बाळासी । करा पां अग्निप्रवेशी ।
येरवी नेदीं प्रेतासी । म्हणोनि उरीं बांधी बाळा ॥११०॥

लोक म्हणती तियेसी । नव्हसी तूं स्त्री, कर्कशी ।
प्रेतासवें प्राण देसी । कवण धर्म सांग आम्हां ॥११॥

नाहीं देखिलें न ऐकों कानीं । पुत्रासवें देती प्राण कोणी ।
वायां बोलसी मूर्खपणीं । आत्महत्या महादोष ॥१२॥

नानापरी तियेसी । बोधिती लोक परियेसीं ।
निश्चय तिनें केला ऐसी । प्राण त्यजीन पुत्रासवें ॥१३॥

दिवस गेला दोन प्रहर । प्रेतासी करूं नेदी संस्कार ।
अथवा न ये गंगतीरा । ग्रामीं आकांत वर्तला ॥१४॥

इतुकिया अवसरीं । आला एक ब्रह्मचारी ।
सांगे तिसी सविस्तारीं । आत्मज्ञान तये वेळीं ॥१५॥

सिध्द म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
ब्रह्मचारी आला एका । बोधिता झाला ज्ञान तिसी ॥१६॥

बाळ नव्हे तोचि गुरु । आला नरवेषधारु ।
नरसिंहसरस्वती अवतारु । भक्तवत्सल परियेसा ॥१७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर सांगे गुरुचरित्राविस्तार ।
ऐकता होय मनोहर । शतायुषी पुरुष होय ॥१८॥

भक्तिपूर्वक ऐकती जरी । व्याधि नव्हती त्यांचे ।
पूर्णायुषी ते होती अमरी । सत्य माना माझा बोल ॥११९॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे ब्रह्मसमंधपरिहार-प्रेतजननीशोकनं नाम विशोऽध्याय: ॥२०॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओवीसंख्या ११९ ॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥




गुरूचरित्र – अध्याय एकविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका ।
उपदेशी ज्ञान निका । तये प्रेतजननीसी ॥१॥

ब्रह्मचारी म्हणे नारीसी । मूढपणे दुःख करिसी ।
कोण वाचला धरणीसी । या संसारी सांग मज ॥२॥

उपजला कोण मेला कोण । उत्पत्ति झाली कोठोन ।
जळात उपजे जैसा फेण । बुदबुद राहे कोठे स्थिर ॥३॥

जैसा देह पंचभूती । मिळोनि होय आकृति ।
वेगळी होता पंचभूती । अव्यक्त होय देह जाण ॥४॥

तया पंचभूतांचे गुण । मायापाशी वेष्टोन ।
भ्रांति लाविली मी देह म्हणोन । पुत्रमित्रकलत्रमिषे ॥५॥

सत्त्व रज तमोगुण । तया भूतांपासोन ।
वेगळाली केली लक्षण । होती ऐका एकचित्ते ॥६॥

देवत्व होय सत्त्वगुण । रजोगुण मनुष्य जाण ।
दैत्यांसी तमोगुण । गुणानुसारे कर्मे घडती ॥७॥

जेणे कर्मे आचरती । सुकृत अथवा दुष्कृति ।
तैशीच होय फळप्राप्ति । आपुले आपण भोगावे ॥८॥

जैसी गुणाची वासना । इंदिये तयाधीन जाणा ।
मायापाशी वेष्टोनि गहना । सुखदुःखे लिप्त करिती ॥९॥

या संसारवर्तमानी । उपजती जंतु कर्मानुगुणी ।
आपल्या आर्जवापासोनि । सुखदुःखादि भोगिती ॥१०॥

कल्पकोटी वरुषे ज्यांसी । असती आयुष्ये देवऋषि ।
न सुटे कर्म तयासी । मनुष्याचा कवण पाड ॥११॥

एखादा नर देहाधीन । काळ करी आपुले गुण ।
कर्म होय अनेक गुण । देहधारी येणेपरी ॥१२॥

जो असे देहधारी । तयासी विकार नानापरी ।
स्थिर नव्हे तो निर्धारी । आपुले पाप म्हणावया ॥१३॥

या कारणे ज्ञानवंत । संतोष न करी उपजत ।
अथवा नरा होय मृत्यु । दुःख आपण करू नये ॥१४॥

जधी गर्भसंभव होता । काय दिसे आकारता ।
अव्यक्त दिसे व्यक्तता । सवेचि होय अव्यक्त पै ॥१५॥

बुदबुद निघती जैसे जळी । सवेचि नष्ट तात्काळी ।
तैसा देह सर्वकाळी । स्थिर नव्हे सर्वथा ॥१६॥

जधी गर्भप्रसव झाले । विनाशी म्हणोनि जाणिले ।
कर्मानुबंधे जैसी फळे । तैसे भोगणे देहासी ॥१७॥

कोणी मरती पूर्ववयेसी । अथवा मरती वृद्धपणेसी ।
आपुले अर्जिती असती जैशी । तेणेपरी घडे जाण ॥१८॥

मायापाशी वेष्टोनि । म्हणती पिता सुत जननी ।
कलत्र मित्र तेणे गुणी । आपुले आपुले म्हणती मूढ ॥१९॥

निर्मळ देह म्हणो जरी । उत्पत्ति मांसरुधिरी ।
मळमूत्रांत अघोरी । उद्‌भव झाला परियेसा ॥२०॥

कर्मानुसार उपजतांची । ललाटी लिहितो विरंची ।
सुकृत अथवा दुष्कृतेची । भोग भोगणे म्हणोनि ॥२१॥

ऐसे कर्म काळासी । जिंकिले नाही परियेसी ।
या कारणे देहासी । नित्यत्व नाही परियेसा ॥२२॥

स्वप्नी निधान दिसे जैसे । कोणी धरावे भरवसे।
इंद्रजाल गारूड जैसे । स्थिर केवी मानिजे ॥२३॥

तुझे तूचि सांग वहिले । कोटी वेळा जन्म झाले ।
मनुष्य किंवा पशुत्व लाधले । पक्षी अथवा कृमिरूप ॥२४॥

जरी होतीस मनुष्ययोनी । कोण कोणाची होतीस जननी ।
कोण कोणाची होतीस गृहिणी । सांग तुझे त्वा निश्चये ॥२५॥

कवण तुझी मातापिता । जन्मांतरींची सांग आता ।
वाया दुःख करिसी वृथा । पुत्र आपुला म्हणोनि ॥२६॥

पंचभूतात्मक देह । चर्ममांस-अस्थि-मज्जा -समूह ।
वेष्टोनिया नव देह । मळबद्ध शरीर नावे ॥२७॥

कैचा पुत्र कोठे मृत्यु । वाया भ्रमोनि का रडत ।
सांडोनि द्यावे कैचे प्रेत । संस्कारिती लौकिकार्थ ॥२८॥

येणेपरी ब्रह्मचारी । सांगे तत्त्व विस्तारी ।
परिसोनिया विप्रनारी । विनवितसे तयासी ॥२९॥

विप्रवनिता तये वेळी । विनवीतसे करुणा बहाळी ।
स्वामी निरोपिले धर्म सकळी । परी स्थिर नव्हे अंतःकरण ॥३०॥

प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी । तरी का भजावा श्रीहरी ।
परीस संपर्क लोह जरी । सुवर्ण न होय कोण बोले ॥३१॥

आम्ही पहिले दैवहीन । म्हणोनि धरिले श्रीगुरुचरण ।
अभय दिधले नाही मरण । म्हणोनि विश्वासलो आम्ही ॥३२॥

एखाद्या नरा येता ज्वर । धुंडीत जाय वैद्यघर ।
औषध घेवोनि प्रतिकार । सवेचि करिती आरोग्यता ॥३३॥

एके समयी मनुष्यासी । आश्रय करिती करुणेसी ।
साह्य होय भरंवसी । आली आपदा परिहारी ॥३४॥

त्रयमूतीचा अवतार । श्रीनृसिंहसरस्वती असे नर ।
तेणे दिधला असे वर । केवी असत्य होय सांगे ॥३५॥

आराधिले म्या तयासी । वर दिधला गा मजसी ।
त्याचा भरवसा मानसी । धरोनि होते स्वस्थचित्त ॥३६॥

विश्वासुनी असता आपण । केवी केले निर्माण ।
कैसे झाले माझे मूर्खपण । म्हणोनि स्वामी निरोपिसी ॥३७॥

याकारणे आपण आता । प्राण त्यजीन तत्त्वता ।
देह समर्पीन श्रीगुरुनाथा । वाढो कीर्ति तयाची ॥३८॥

ऐकोनि तियेचे वचन । ओळखून भाव मन ।
सांगे बुद्धि तीस ज्ञान । उपाय यासी करी आता ॥३९॥

विश्वास केला श्रीगुरूसी । पुत्र लाधला पूर्णायुषी ।
जरी आला मृत्यु त्यासी । घेवोनि जाय गुरुस्थाना ॥४०॥

जेथे लाधला तुज वर । तेथे ठेवी कलेवर ।
पंचगंगाकृष्णातीर । औदुंबरवृक्षातळी ॥४१॥

ऐसे वचन ऐकोनि । विश्वास झाला तिचे मनी ।
पाठी शव बांधोनि । घेवोनि गेली औदुंबरा ॥४२॥

जेथे होत्या गुरुपादुका । आफळी शिर ते बालिका ।
रुधिरे भरल्या त्या पादुका । आक्रोशे रडे ती नारी ॥४३॥

समस्त शोकाहुनी अधिक । साहवेना पुत्रशोक ।
क्षयरोग तोचि एक । मातापितया मृत्युमूळ ॥४४॥

ऐसे करिता झाली निशी । विप्र मागती प्रेतासी ।
म्हणती आक्रोश का हो करिसी । संस्कारोनि जाऊ आता ॥४५॥

मनुष्य नाही अरण्यात । केवी राहू जाऊ म्हणत ।
जळू दे वो आता प्रेत । अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती ॥४६॥

काही केलिया नेदी प्रेत । आपणासवे जाळा म्हणत ।
पोटी बांधोनिया प्रेत । लोळतसे पादुकांवरी ॥४७॥

म्हणती विप्र ज्ञाती लोक । राहो नये रानी ऐक ।
तस्करबाधा होईल देख । जाऊ आता घरासी ॥४८॥

जाऊ स्नान करूनि । उपवास होय आजच्या दिनी ।
प्रातःकाळी येवोनि । दहन करू म्हणताती ॥४९॥

आजिचे रात्री प्रेतासी । सुटेल वास दुर्गंधीसी ।
देईल आपोआप दहनासी । त्रासून जाणा कर्कशा ॥५०॥

म्हणोनि निघती सकळ लोक । राहिले तेथे जननीजनक ।
प्रेत देखोनि करिती शोक । झाली रात्री परियेसा ॥५१॥

निद्रा नाही दिवस दोन्ही । शोक करिती जनकजननी ।
तीन याम होता रजनी । झोप आली तियेसी ॥५२॥

देखतसे सुषुप्तीत । जटाधारी भस्मोध्दूलित ।
व्याघ्रचर्मे परिधानित । रुद्राक्षमाळा सर्वांगी ॥५३॥

योगदंड त्रिशूळ हाती । आले औदुंबराप्रति ।
का हो शोक करिसी सती । आक्रोशोनि आम्हांवरी ॥५४॥

काय झाले तुझिया कुमारा । करू त्यासी प्रतिकारा ।
म्हणोनि दे तो अभय करा । भक्तवत्सला श्रीगुरु ॥५५॥

भस्म काढोनि प्रेतासी । लावीतसे सर्वांगासी ।
मुख पसरी म्हणे तिसी । वायुपूर करू म्हणे ॥५६॥

प्राण म्हणे वायु जाण । बाहेर गेला निघोन ।
घातला मागुती आणून । पुत्र तुझा जीवंत होय ॥५७॥

इतुके देखोनि भयचकित । झाली नारी जागृत ।
म्हणे आपणा कैसी भ्रांत । पडिली असे प्रेतावरी ॥५८॥

जे का वसे आपुले मनी । तैसेचि दिसे निद्रास्वप्नी ।
कैचा देव नृसिंहमुनि । भ्रांति आपणा लागलि असे ॥५९॥

आमुचे प्रारब्ध असे उणे । देवावरी बोल काय ठेवणे ।
अज्ञान आम्ही मूर्खपणे । श्रीगुरूवरी बोल काय ॥६०॥

येणेपरी चिंता करीत । तव प्रेतासी झाले चेत।
सर्वांगही उष्ण होत । सर्वसंधी जीव आला ॥६१॥

म्हणे प्रेता काय झाले । किंवा भूत संचारले ।
मनी भय उपजले । ठेवी काढोनि दूर परते ॥६२॥

सर्व संधीसी जीव आला । बाळ उठोनि बैसला ।
म्हणे क्षुधा लागली मला । अन्न दे की म्हणे माते ॥६३॥

रुदन करीतसे तये वेळी । आला कुमार मातेजवळी ।
स्तन घालिता मुखकमळी । क्षीर निघे बत्तीस धारा ॥६४॥

संतोश भय होऊनि तिसी । संदेह वाटे मानसी ।
कडे घेऊनि बाळकासी । गेली आपुल्या पतीजवळी ॥६५॥

जागृत करूनि पतीसी । सांगे वृत्तान्त तयासी ।
पति म्हणे तियेसी । ऐसे चरित्र श्रीगुरूचे ॥६६॥

म्हणोनि दंपत्य दोघे जाणा । करोनि औदुंबरी प्रदक्षिणा ।
साष्टांग नमुनी चरणा । नानापरी स्तोत्रे करिती ॥६७॥

जय जयाजी वरदमूर्ति । ब्रह्मा विष्णु शिवयती ।
भक्तवत्सला तुझी ख्याति । वासना पहासी भक्तांची ॥६८॥

तू तारक विश्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी ।
अशक्य तूते वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया ॥६९॥

बाळ जैसे कोपेसी । निष्ठुर बोले मातेसी ।
तैसे अविद्यामायापाशी । तुम्हा निष्ठुर बोलिलो ॥७०॥

सर्वस्वी आम्हा क्षमा करणे । म्हणोनि घालिती लोटांगणे ।
विनवोनिया करुणावचने । गेली स्नानासी गंगेत ॥७१॥

स्नान करोनि बाळकासहित । धुती झाली पादुकांचे रक्त ।
औदुंबरा स्नपन करीत । लाविती दीप तये वेळी ॥७२॥

पूजा करिती भक्तीसी । मंत्रपूर्वक विधींसी ।
शमीपत्र कुसुमेसी । पूजा करिती परियेसा ॥७३॥

नीरांजन तये वेळा । करिती गायन परिबळा ।
अतिसंतोषी ती अबला । भक्तिभावे स्तुति करीत ॥७४॥

इतुके होय तो गेली निशी । उदय झाला दिनकरासी ।
संस्कारू म्हणोनि प्रेतासी । आले विप्र ज्ञाती सकळ ॥७५॥

तव देखती कुमारासी । विस्मय झाला सकळिकांसी ।
समाधान करिती हर्षी । महा आनंद वर्तला ॥७६॥

ऐसा श्रीगुरुस्थानमहिमा । अखिल लोक लाधले कामा ।
एकेकाची सांगता महिमा । विस्तार होईल बहु कथा ॥७७॥

पुत्रप्राप्ति वांझेसी । श्रीप्राप्ति दारिद्र्यासी ।
आरोग्य होईल रोगियासी । अपमृत्यु न ये जाणा ॥७८॥

सिद्ध म्हणे नामधारका । स्थानमहिमा ऐशी ऐका ।
अपार असे सांगता देखा । साधारण निरोपिले ॥७९॥

तया औदुंबरातळी । श्रीगुरु वसे सर्वकाळी ।
काम्य होत तात्काळी । आराधिता नरहरीसी ॥८०॥

भाव असावा आपुले मनी । पूजा करावी श्रीगुरुचरणी ।
जी जी वासना ज्याचे मनी । त्वरित होय परियेसा ॥८१॥

ह्रदयशूळ गंडमाळ । अपस्मार रोग सकळ ।
परिहरती तात्काळ । श्रीगुरुपादुका अर्चिता ॥८२॥

जो असेल मंदमति । बधिर मुका चरण नसती ।
औदुंबरी सेवा करिती । सुदेह होय सत्य माना ॥८३॥

चतुर्विध पुरुषार्थ । तेथे होय निश्चित ।
प्रत्यक्ष वसे श्रीगुरुनाथ । औदुंबरी सनातन ॥८४॥

तया नाव कल्पतरू । प्रत्यक्ष झाणा औदुंबरू ।
जे जे मनी इच्छिती नरू । साध्य होय परियेसा ॥८५॥

किती वर्णू तेथील महिमा । सांगता अशक्य असे आम्हा ।
श्रीगुरुसरस्वती नामा । प्रख्यात असे परियेसा ॥८६॥

गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र विस्तारोन ।
भक्तिपूर्वक ऐकती जे जन । सकलाभीष्टे पावती ॥८७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सदा श्रीगुरुचरणी स्थिर ।
उतरवी पैलपार । इहसौख्य परगति ॥८८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । गुरुमाहात्म्यपरमामृत ।
विप्रपुत्रसंजीवनामृत । निरोपिले असे येथे ॥८९॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे बालसंजीवन नाम एकविंशोऽध्यायः ॥२१॥

॥ ओवीसंख्या ॥८९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥




गुरूचरित्र – अध्याय बाविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा ।
कर जोडोनिया जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥

जय जयाजी योगीश्वरा । शिष्यजनमनोहरा ।
तूचि तारक भवसागरा । अज्ञानतिमिराज्योती तू ॥२॥

तुझा चरणसंपर्क होता । झाले ज्ञान मज आता ।
परमार्थवासना तत्त्वतां । झाली तुझे प्रसादे ॥३॥

दाखविली गुरूची सोय । तेणे सकळ ज्ञान होय ।
तूचि तारक योगिराय । परमपुरुषा सिद्धमुनी ॥४॥

गुरुचरित्रकामधेनु । सांगितले मज विस्तारोनि ।
अद्यापि न धाय माझे मनु । आणिक आवडी होतसे ॥५॥

मागे तुम्ही निरोपिले । श्रीगुरु गाणगापुरी आले ।
पुढे कैसे वर्तले । विस्तारावे दातारा ॥६॥

ऐकोनि शिष्याचे वचन । सांगे सिद्ध संतोषोन ।
म्हणे शिष्या तू सगुण । गुरुकृपेच बाळक ॥७॥

धन्य धन्य तुझे जीवन । धन्य धन्य तुझे मन ।
होसी तूचि पूज्यमान । या समस्त लोकांत ॥८॥

तुवा प्रश्न केलासी । संतोष माझ्या मानसी ।
उल्हास होतो सांगावयासी । गुरुचरित्रकामधेनु ॥९॥

पुढे वाढला अनंत महिमा । सांगतां असे अनुपमा ।
श्रीगुरु आले गाणगाभुवनी । राहिले संगमी गुप्तरूपे ॥१०॥

भीमा उत्तरवाहिनीसी । अमरजासंगमविशेषी ।
अश्वत्थ नारायण परियेसी । महावरद स्थान असे ॥११॥

अमरजा नदी थोर । संगम झाला भीमातीर ।
प्रयागासमान असे क्षेत्र । अष्टतीर्थे असती तेतेह ॥१२॥

तया तीर्थांचे महिमान । अपार असे आख्यान ।
पुढे तुज विस्तारोन । सांगेन ऐक शिष्योत्तमा ॥१३॥

तया स्थानी श्रीगुरुमूर्ति । होती गौप्य अतिप्रीती ।
तीर्थमहिमा करणे ख्याति । भक्तजनतारणार्थ ॥१४॥

समस्त तीर्थे श्रीगुरुचरणी । ऐसे बोलती वेदपुराणी ।
त्यासी कायसे तीर्थ गहनी । प्रकाश करी क्षेत्रांसी ॥१५॥

भक्तजनतारणार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ ।
गौप्य होती कलियुगात । प्रकट केली गुरुनाथे ॥१६॥

तेथील महिमा अनुक्रमेसी । सांगो पुढे विस्तारेसी ।
प्रकट झाले श्रीगुरू कैसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥१७॥

ऐसा संगम मनोहर । तेथे वसती श्रीगुरुवर ।
त्रिमूर्तींचा अवतार । गौप्य होय कवणेपरी ॥१८॥

सहस्त्र किरणे सूर्यासी । केवी राहवेल गौप्येसी ।
आपोआप प्रकाशी । होय सहज गुण तयाचे ॥१९॥

वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ।
तया गाणगापुरासी । माध्याह्नकाळी परियेसा ॥२०॥

तया ग्रामी द्विजवर । असती एकशत घर ।
होते पूर्वी अग्रहार । वेदपाठक ब्राह्मण असती ॥२१॥

तया स्थानी विप्र एक । राहत असे सुक्षीण देख ।
भार्या त्याची पतिसेवक । पतिव्रताशिरोमणी ॥२२॥

वर्तत असता दरिद्रदोषी । असे एक वांझ महिषी ।
वेसण घातली तियेसी । दंतहीन अतिवृद्ध ॥२३॥

नदीतीरी मळियासी । क्षारमृत्तिका वहावयासी ।
नित्य द्रव्य देती त्यासी । मृत्तिका क्षार वहावया ॥२४॥

तेणे द्रव्ये वरो घेती । येणे रीती काळ क्रमिती ।
श्रीगुरुनाथ अतिप्रीती । येती भिक्षेसी त्याचे घरा ॥२५॥

विप्र लोक निंदा करिती । कैचा आला यति म्हणती ।
आम्ही ब्राह्मण असो श्रोती । न ये भिक्षा आमुचे घरी ॥२६॥

नित्य आमुचे घरी देखा । विशेष अन्न अनेक शाका ।
असे त्यजुनी यति ऐका । जातो दरिद्रियाचे घरी ॥२७॥

ऐसे बोलती विप्र समस्त । भक्तवत्सल श्रीगुरुनाथ ।
प्रपंचरहित परमार्थ । करणे असे आपुल्या मनी ॥२८॥

पाहे पा विदुराच्या घरा । प्रीती कैसी शार्ङगधरा ।
दुर्योधनराजद्वारा । कधी न वचे परियेसा ॥२९॥

सात्त्विकबुद्धी जे वर्तती । श्रीगुरूची त्यांसी अतिप्रीति ।
इह सौख्य अपरा गति । देतो आपल्या भक्तांसी ॥३०॥

ऐसा कृपाळू परम पुरुष । भक्तावरी प्रेम हर्ष ।
त्यासी दुर्बळ काय दोष । रंका राज्य देउ शके ॥३१॥

जरी कोपे एखाद्यासी । भस्म करील परियेसी ।
वर देता दरिद्रियासी । राज्य होय क्षितीचे ॥३२॥

ब्रह्मदेवे आपुल्या करे । लिहिली असती दुष्ट अक्षरे ।
श्रीगुरुचरणसंपर्के । दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥३३॥

ऐसे ब्रीद श्रीगुरुचे । वर्णू न शके माझे वाचे ।
थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे । श्रीगुरु जाती तया घरा ॥३४॥

वर्तत असता एके दिवसी । न मिळे वरू त्या ब्राह्मणासी ।
घरी असे वांझ महिषी । नेली नाही मृत्तिकेसी ॥३५॥

तया विप्रमंदिरासी । श्रीगुरु आले भिक्षेसी ।
महा उष्ण वैशाखमासी । माध्याह्नकाळी परियेसा ॥३६॥

ऐसे श्रीगुरुकृपामूर्ति । गेले द्विजगृहाप्रती ।
विप्र गेला याचकवृत्ती । वनिता त्याची घरी असे ॥३७॥

भिक्षा म्हणता श्रीगुरुनाथ । पतिव्रता आली धावत ।
साष्टांगी दंडवत । करिती झाली तये वेळी ॥३८॥

नमन करूनि श्रीगुरूसी । विनवीतसे भक्तीसी ।
आपला पती याचकवृत्तीसी । गेला असे अवधारा ॥३९॥

उत्कृष्ट धान्य घरी बहुत । घेवोनि येतिल पती त्वरित ।
तववरी स्वामी बैसा म्हणत । पिढे घातले बैसावया ॥४०॥

श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । बैसते झाले शुभासन ।
तिये विप्रस्त्रियेसी वचन । बोलती क्षीर का वो न घालिसी ॥४१॥

तुझे द्वारी असता महिषी । क्षीर काहो न घालिसी भिक्षेसी ।
आम्हाते तू का चाळविसी । नाही वरू म्हणोनिया ॥४२॥

श्रीगुरुवचन ऐकोन । विप्रवनिता करी नमन ।
वांझ महिषी दंतहीन । वृद्धत्व झाले तियेसी ॥४३॥

उपजतांची आमुचे घरी । वांझ झाली दगडापरी ।
गाभा न वाचे कवणेपरी । रेडा म्हणोनि पोशितो ॥४४॥

याचि कारणे तियेसी । वेसण घातली परियेसी ।
वाहताती मृत्तिकेसी । तेणे आमुचा योगक्षेम ॥४५॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । मिथ्या बोलसी आम्हांसी ।
त्वरित जावोनिया महिषीसी । दुहूनि आणी क्षीर आम्हा ॥४६॥

ऐसे वचन ऐकोनि । विश्वास झाला तिचे मनी ।
काष्ठपात्र घेवोनि । गेली ऐका दोहावया ॥४७॥

श्रीगुरुवचन ऐकोन । विप्रवनिता जाता क्षण ।
दुभली क्षीर संतोषोन । भरणे दोन तये वेळी ॥४८॥

विस्मय करी विप्रवनिता । म्हणे ईश्वर हा तत्त्वता ।
याचे वाक्य परिसता । काय नवल म्हणतसे ॥४९॥

क्षीर घेवोनि घरात । आली पतिव्रता त्वरित ।
तापविती झाली अग्नीत । सवेचि विनवी परियेसा ॥५०॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । घाली हो क्षीर भिक्षेसी ।
जाणे आम्हा स्वस्थानासी । म्हणोनि निरोपिती तये वेळी ॥५१॥

परिसोनि स्वामीचे वचन । घेवोनि आली क्षीरभरण ।
केले गुरुनाथे प्राशन । अतिसंतोषे करूनिया ॥५२॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । वर देती अतिप्रीती ।
तुझे घरी अखंडिती । लक्ष्मी राहे निरंतर ॥५३॥

पुत्रपौत्री श्रियायुक्त । तुम्ही नांदाल निश्चित ।
म्हणोनि निघाले त्वरित । संगमस्थानासी आपुल्या ॥५४॥

श्रीगुरु गेले संगमासी । आला विप्र घरासी ।
ऐकता झाला विस्तारेसी । महिमा श्रीगुरुमूर्तीचा ॥५५॥

म्हणे अभिनव झाले थोर । होईल ईश्वरी अवतार ।
आमुच्या दृष्टी दिसे नर । परमपुरुष तोचि सत्य ॥५६॥

विप्र म्हणे स्त्रियेस । आमुचे गेले दरिद्रदोष ।
भेट जाहली श्रीगुरुविशेष । सकळाभीष्टे साधली ॥५७॥

म्हणोनि मनी निर्धार करिती । भेटी जाऊ कैचा यति ।
हाती घेवोनि आरती । गेले दंपती संगमासी ॥५८॥

भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । गंधाक्षताधूपदीपेसी ।
नैवेद्यतांबूलप्रदक्षिणेसी । पूजा करिती सद्भावे ॥५९॥

येणेपरी द्विजवर । लाधता जाहला जैसा वर ।
कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर । पूर्ण आयुष्य झाले जाण ॥६०॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी ।
दैन्य कैसे त्या नरासी । अष्टैश्वर्यै भोगीतसे ॥६१॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकता होय मनोहर । दैन्यावेगळा होय त्वरित ॥६२॥

इतिश्रीगुरुचरित्रामृत । वंध्या महिषी दुग्ध देत ।
निश्चयाचे बळे सत्य । भाग्य आले विप्रासी ॥६३॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥२२॥

॥ ओवीसंख्या ॥६३॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरूचरित्र – अध्याय तेविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगीयाते पुसत ।
पुढील कथा विस्तारत । निरोपावी दातारा ॥१॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला ।
तोचि विप्रे प्रकट केला । जेणे वांझ महिषी दुभिली ॥२॥

तया ग्रामी येरे दिवसी । क्षारमृत्तिका वहावयासी ।
मागो आले तया महिषीसी । द्रव्य देऊ म्हणताती ॥३॥

विप्र म्हणे तयासी । नेदू दुभते महिषीसी ।
दावीतसे सकळिकांसी । क्षीरभरणे दोनी केली ॥४॥

करिती विस्मय सकळ जन । म्हणती वांझ दंतही ।
काल होती नाकी खूण । वेसणरज्जू अभिनव ॥५॥

नव्हती गर्भिणी वांझ महिषी । वत्स न होता दुभे कैसी ।
वार्ता फाकली विस्तारेसी । कळली तया ग्रामाधिपतीस ॥६॥

विस्मय करुनी तये वेळी । आला अधिपती तयाजवळी ।
नमोनिया चरणकमळी । पुसतसे वृत्तान्त ॥७॥

विप्र म्हणे तयासी । असे संगमी संन्यासी ।
त्याची महिमा आहे ऐसी । होईल ईश्वर अवतार ॥८॥

नित्य आमुच्या मंदिरासी । येती श्रीगुरु भिक्षेसी ।
वरो नव्हती त्या दिवशी । क्षीर आपणा मागितले ॥९॥

वांझ म्हणता रागावोनि । त्वरे क्षीर दोहा म्हणोनि ।
वाक्य त्याचे निघता क्षणी । कामधेनूपरी जाहली ॥१०॥

विप्रवचन परिसोनि । गेला राजा धावोनि ।
नमन केले साष्टांगेसी । एका भावे करोनिया ॥१२॥

जय जयाजी जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
तुझा महिमा अपरंपारु । अशक्य आम्हा वर्णिता ॥१३॥

नेणो आम्ही मंदमति । मायामोहअंधवृत्ति ।
तू तारक जगज्ज्योती । उद्धरावे आम्हांते ॥१४॥

अविद्यामायासागरी । बुडालो असो घोर दरी ।
विश्वकर्ता तारी तारी । म्हणोनि चरणी लागला ॥१५॥

विश्वकर्ता तूचि होसी । हेळामात्रे सृष्टो रचिसी ।
आम्हा तु दिसतोसी । मनुष्यरूप धरोनि ॥१६॥

वर्णावया तुझा महिमा । स्तोत्र करिता अशक्य आम्हा ।
तूचि रक्षिता केशव्योमा । चिन्मयात्मा जगद्गुरु ॥१७॥

येणेपरी श्रीगुरूसी । स्तोत्र करी बहुवसी ।
श्रीगुरुमूर्ति संतोषी । आश्वासिती तये वेळी ॥१८॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया रायाते पुसती ।
आम्ही तापसी असो यति । अरण्यवास करितसो ॥१९॥

या कारणे आम्हापासी । येणे तुम्हा संभ्रमेसी ।
पुत्रकलत्रसहितेसी । कवण कारण सांग म्हणती ॥२०॥

ऐकोनिया श्रीगुरुचे वचन । राजा विनवी कर जोडून ।
तू तारक भक्तजन । अरण्यवास कायसा ॥२१॥

उद्धरावया भक्तजना । अवतरलासी नारायणा ।
वासना जैसी भक्तजना । संतुष्टावे तेणेपरी ॥२२॥

ऐशी तुझी ब्रीदख्याति । वेदपुराणी वाखाणिती ।
भक्तवत्सला श्रीगुरुमूर्ति । विनंती माझी परिसावी ॥२३॥

गाणगापुर महास्थान । स्वामी करावे पावन ।
नित्य तेथे अनुष्ठान । वास करणे ग्रामात ॥२४॥

मठ करोनि तये स्थानी । असावे आम्हा उद्धरोनि ।
म्हणोनि लागे श्रीगुरुचरणी । भक्तिपूर्वक नरेश्वर ॥२५॥

श्रीगुरु मनी विचारिती । प्रगट होणे आली गति ।
क्वचित्काळ येणे रीती । वसणे घडे त्या स्थानी ॥२६॥

भक्तजनतारणार्थ । अवतार धरिती श्रीगुरुनाथ ।
राजयाचे मनोरथ । पुरवू म्हणती तये वेळी ॥२७॥

ऐसे विचारोनि मानसी । निरोप देती नराधिपासी ।
जैसी तुझ्या मानसी । भक्ति असे तैसे करी ॥२८॥

गुरुवचन ऐकोनि । संतोषोनि नृप मुनी ।
बैसवोनिया सुखासनी । समारंभे निघाला ॥२९॥

नानापरींची वाद्ये यंत्रे । गीतवाद्यमंगळतुरे ।
मृदंग टाळ निर्भरे । वाजताती मनोहर ॥३०॥

राव निघे छत्रपताकेसी । गजतुरंगश्रृंगारेसी ।
आपुले पुत्रकलत्रेसी । सवे यतीसी घेवोनि ॥३१॥

वेदघोष द्विजवरी । करिताती नानापरी ।
वाखाणिती बंदिकारी । ब्रीद तया मूर्तीचे ॥३२॥

येणेपरी ग्रामाप्रती । श्रीगुरु आले अतिप्रीती ।
अनेकपरी आरती । घेउनी आले नगरलोक ॥३३॥

ऐसा समारंभ थोर । करिता झाला नरेश्वर ।
संतोषोनि श्रीगुरुवर । प्रवेशले नगरात ॥३४॥

तया ग्रामपश्चिमदेशी । असे अश्वत्थ उन्नतेसी ।
ओस गृह तयापासी । असे एक भयंकर ॥३५॥

तया वृक्षावरी एक । ब्रह्मराक्षस भयानक ।
त्याचे भये असे धाक । समस्त प्राण्या भय त्याचे ॥३६॥

ब्रह्मराक्षस महाक्रूर । मनुष्यमात्र करी आहार ।
त्याचे भय असे थोर । म्हणोनि गृह ओस तेथे ॥३७॥

श्रीगुरुमूर्ति तये वेळी । आले तया वृक्षाजवळी ।
ब्रह्मराक्षस तात्काळी । येवोनि चरणी लागला ॥३८॥

कर जोडूनि श्रीगुरूसी । विनवीतसे भक्तीसी ।
स्वामी माते तारियेसी । घोरांदरी बुडालो ॥३९॥

तुझ्या दर्शनमात्रेसी । नासली पापे पूर्वार्जितेसी ।
तू कृपाळू सर्वांसी । उद्धरावे आपणाते ॥४०॥

कृपाळु ते श्रीगुरु । मस्तकी ठेविती करु ।
मनुष्यरूपे होवोनि येरु । लोळतसे चरणकमळी ॥४१॥

श्रीगुरु सांगती तयासी । त्वरित जावे संगमासी ।
स्नान करिता मुक्त होसी । पुनरावृत्ति नाही तुज ॥४२॥

गुरुवचन ऐकोन । राक्षस करी संगमी स्नान ।
कलेवरा सोडूनि जाण । मुक्त झाला तत्क्षणी ॥४३॥

विस्मय करिति सकळ लोक । म्हणती होईल मूर्ति येक ।
हरि अज पिनाक । हाचि सत्य मानिजे ॥४४॥

श्रीगुरु राहिले तया स्थानी । मठ केला श्रृंगारोनि ।
नराधिपशिरोमणी । भक्तिभावे पूजीतसे ॥४५॥

भक्तिभावे नरेश्वर । पूजा अर्पी अपरंपार ।
परोपरी वाद्यगजर । गीतवाद्येमंत्रेसी ॥४६॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जाती नित्य अनुष्ठानासी ।
नराधीश भक्तीसी । सैन्यासहित आपण जाय ॥४७॥

एखाद्या समयी श्रीगुरूसी । बैसविती आपुल्या आंदोलिकेसी ।
सर्व दळ सैन्येसी । घेवोनि जाय वनांतरा ॥४८॥

माध्याह्नकाळी परियेसी । श्रीगुरु येती मठासी ।
सैन्यासहित आनंदेसी । नमन करी नराधिप ॥४९॥

भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । भक्ताधीन आपण असती ।
जैसा संतोष त्याच्या चित्ती । तेणेपरी रहाटती ॥५०॥

समारंभ होय नित्य । ऐकती लोक समस्त ।
प्रगट झाले लोकांत । ग्रामांतरी सकळजनि ॥५१॥

कुमसी म्हणिजे ग्रामासी । होता एक तापसी ।
त्रिविक्रम भारती नामेसी । तीन वेद जाणतसे ॥५२॥

मानसपूजा नित्य करी । सदा ध्यायी नरहरी ।
त्याणे ऐकिले गाणगापुरी । असे नरसिंहसरस्वती ॥५३॥

ऐकता त्याची चरित्रलीला । मनी म्हणे दांभिक कळा ।
हा काय खेळ चतुर्थाश्रमाला । म्हणोनि निंदा आरंभिली ॥५४॥

ज्ञानमुर्ति श्रीगुरुनाथ । सर्वांच्या मनीचे जाणत ।
यतीश्वर निंदा आपुली करीत । म्हणोनि ओळखिले मनात ॥५५॥

सिद्ध म्हणे नामांकिता । पुढे अपूर्व असे कथा ।
मन करोनि निर्मळता । एकचित्ते परिस तु ॥५६॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकता होय मनोहर । सकळाभीष्ट पाविजे ॥५७॥

इति श्रीगुरुचरित्र । गाणगापुरी पवित्र ।
ब्रह्मराक्षसा परत्र । निजमोक्ष दीधला ॥५८॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे राक्षसमुक्तकरणं नाम त्रयोविंशोऽध्याः ॥२३॥

॥ ओवीसंख्या ॥५८॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरूचरित्र – अध्याय चोविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले देखा ।
विस्तारे कथाकौतुका । निरोपीन तुज आता ॥१॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्तारोनि आम्हांसी । निरोपावी दातारा ॥२॥

शिष्यवचन परिसोनि । सांगता झाला सिद्ध मुनि ।
ऐक तू वत्सा नामकरणी । गुरुचरित्र अभिनव ॥३॥

ऐसा त्रिविक्रम महामुनि । जो का होता कुमसीस्थानी ।
निंदा करी सर्व जनी । दांभिक संन्यासी म्हणोनि ॥४॥

ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ति । विश्वाच्या मनीचे ओळखती ।
नसधिपासी सांगती । निंदा करितो म्हणोनि ॥५॥

श्रीगुरु म्हणती तये वेळी । आजची निघावे तात्काळी ।
त्रिविक्रमभारतीजवळी । जाणे असे कुमसीस ॥६॥

ऐकोनि राजा संतोषला । नानालंकार करिता जाहला ।
हत्ती अश्वपायदळा । श्रृंगार केला तये वेळी ॥७॥

समारंभ केला थोरु । आंदोळी बैसले श्रीगुरु ।
नानापरी वाद्यगजरु । करूनिया निघाले ॥८॥

ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया कुमसी ग्रामा येती ।
त्रिविक्रमभारती । करीत होता मानसपूजा ॥९॥

मानसपूजा नरहरीसी । नित्य करी भावेसी ।
स्थिर न होय तया दिवसी । मानसमूर्ति नरकेसरी ॥१०॥

मनी चिंता करी यति । का पा न ये मूर्ति चित्ती ।
वृथा झाली तपोवृत्ति । काय कारण म्हणतसे ॥११॥

बहुत काळ आराधिले । का पा नरसिंहे उपेक्षिले ।
तपफळ वृथा गेले । म्हणोनि चिंता करीतसे ॥१२॥

इतुके होता त्या अवसरी । श्रीगुरुते देखिले दूरी ।
येत होते नदीतीरी । मानसपूजेच्या मूर्तिरूपे ॥१३॥

सर्व दळ दंडधारी । तयांत एकरूप हरी ।
भारती देखोनि विस्मय करी । नमन करीत निघाला ॥१४॥

साष्टांग नमन करोनि । जावोनि लागे श्रीगुरुचरणी ।
सर्वचि रूपे झाला प्राणी । दंडधारी यतिरूप ॥१५॥

समस्तरूप एकसरी । दिसताती दंडधारी ।
कवण लघु कवण थोरी । न कळे तया त्रिविक्रमा ॥१६॥

भ्रांत झाला तये वेळी । पुनरपि लागे चरण कमळी ।
ब्रह्मा विष्णु चंद्रमौळी । त्रिमूर्ति तू जगद्गुरु ॥१७॥

तुझे न कळे स्वरूपज्ञान । अविद्यामाया वेष्टोन ।
निजरूप होऊन । कृपा करणे दातारा ॥१८॥

तुझे स्वरूप अवलोकिता । आम्हा अशक्य गुरुनाथा ।
चर्मचक्षूकरूनि आता । पाहू न शके म्हणतसे ॥१९॥

तू व्यापक सर्वा भूती । नरसिंहमूर्ति झालासी यति ।
प्रगट नरसिंहसरस्वती । समस्त दिसती यतिरूप ॥२०॥

नमू आता सांग कवणा । कवणापुढे दाखवू करुणा ।
त्रिमूर्ति तू ओळखसी खुणा । निजरूपे रहावे स्वामिया ॥२१॥

तप केले बहुत दिवस । पूजा केली तुझी मानस ।
आजि आलि गा फळास । मूर्ति साक्षात भेटली ॥२२॥

तू तारक विश्वासी । उद्धराया आम्हांसी ।
म्हणोनि भूमी अवतरलासी । दावी स्वरूप चिन्मय ॥२३॥

ऐसेपरी श्रीगुरूसी । स्तुति केली भक्तीसी ।
श्रीगुरुमूर्ति संतोषी । झाली निजमूर्ति एक ॥२४॥

व्यक्त पाहे तये वेळी । दिसो लागले सैन्य सकळी ।
तयामध्ये चंद्रमौळी । दिसे श्रीगुरु भक्तवरद ॥२५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी ।
दांभिक नावे आमहंसी । पाचारिसी मंदमती ॥२६॥

या कारणे तुजपासी । आलो तुझ्या परीक्षेसी ।
पूजा करिसी तू मानसी । श्रीनृसिंहमूर्तीची ॥२७॥

दांभिक म्हणजे कवण परी । सांग आता विस्तारी ।
तुझे मनी वसे हरी । तोचि तुज निरोपी ॥२८॥

ऐकोनि श्रीगुरुचे वचन । यतीश्वर करी नमन ।
सद्गुरु स्वामी कृपा करून । अविद्यारूप नासावे ॥२९॥

तू तारक विश्वासी । त्रयमूर्ति-अवतार तूचि होसी ।
मी वेष्टोन । मायापाशी । अज्ञानपणे वर्ततो ॥३०॥

मायामोह-अंधकरी । बुडालो अज्ञानसागरी ।
न ओळखे परमार्थ विचारी । दिवांध झालो स्वामिया ॥३१॥

ज्योतिःस्वरूप तू प्रकाशी । स्वामी माते भेटलासी ।
क्षमा करावी बाळकासी । उद्धारावे दातारा ॥३२॥

अविद्यारूप-समुद्रात । होतो आपण वहात ।
न दिसे पैल अंत । बुडतसो स्वामिया ॥३३॥

ज्ञानतारवी बैसवोनि करुणावायु प्रेरूनि ।
पैलथडी निजस्थानी । पाववी स्वामी कृपासिंधु ॥३४॥

तुझी कृपा होय ज्यासी । दुःखदैन्ये कैचे त्यासी ।
तोचि जिंकील कळीकाळासी । परमार्थी ऐक्य होय ॥३५॥

पूर्वी कथा ऐकिली श्रवणी । महाभारत पुराणी ।
दाविले रूप अर्जुना नयनी । प्रसन्न होवोनि तयासी ॥३६॥

तैसे तुम्ही मजला आज । दाविले स्वरूप निज ।
अनंत महिमा तुझी चोज । भक्तवत्सला गुरुनाथा ॥३७॥

जय जयाजी जगद्गुरु । तू तारक भवसागरु ।
त्रयमूर्तीचा अवतारु । नरसिंहसरस्वती ॥३८॥

कृतार्थ झालो जी आपण । देखिले आजि तुमचे चरण ।
न करिता प्रयत्‍न । भेटला रत्‍नचिंतामणी ॥३९॥

जैसी गंगा सगरांवरी । कडे केले भवसागरी ।
जैसा विष्णु विदुराघरी । आला आपण कृपावंत ॥४०॥

भक्तवत्सला तुझी कीर्ति । आम्हा दाविली प्रचीति ।
वर्णावया नाही मति । अनंतमहिमा जगद्गुरु ॥४१॥

येणेपरी श्रीगुरूसी । करी स्तोत्र बहुवसी ।
श्रीगुरुमूर्ती संतोषी । दिधला वर तये वेळी ॥४२॥

वर दे तो त्रिविक्रमासी । तुष्टलो तुझ्या भक्तीसी ।
सद्‌गति होय भरवसी । पुनरावृत्ति नाही तुज ॥४३॥

तुज साधला परमार्थ । होईल ईश्वरी ऐक्यार्थ ।
ऐसे म्हणोनि गुरुनाथ । निघाले आपुल्या निजस्थाना ॥४४॥

वर देवोनि भारतीसी । राहविले तेथे कुमसीसी ।
क्षण न लागता परियेसी । आले गाणगापुरासी ॥४५॥

सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसा निका ।
त्रिमूर्ति तोचि ऐका । नररूपे वर्ततसे ॥४६॥

ऐसा परमपुरुष गुरु । त्याते जे कोणी म्हणती नरु ।
तेचि पावती यमपुरु । सप्तजन्मपर्यंत ॥४७॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु । गुरुचि होय गिरिजारमणु ।
वेदशास्त्रपुराणू । बोलती हे प्रसिद्ध ॥४८॥

या कारणे श्रीगुरूसी । शरण जावे निश्चयेसी ।
विश्वासावे माझ्या बोलासी । लीन व्हावे श्रीगुरुचरणी ॥४९॥

अमृताची आरवटी । घातली असे गोमटी ।
ज्ञानी जन प्राशिती घोटी । गुरुचरित्रकामधेनु ॥५०॥

गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र विस्तारोन ।
भक्तिपूर्वक ऐकती जन । लाधती पुरुषार्थ चतुर्विध ॥५१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रिविक्रमभारती विश्वरूपदर्शनं नाम चतुर्विशोऽध्यायः ॥२४॥

॥ ओवीसंख्या ॥५१॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरूचरित्र – अध्याय पंचविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी सिद्धमुनी । तूचि गुरुशिरोमणी ।
साक्षी येतसे अंतःकरणी । बोलिला माते परमार्थ ॥१॥
ऐसा कृपाळु परमेश्वर । आपण झाला अवतार ।
येरा दिसतसे नर । तेचि अज्ञानी प्रत्यक्ष ॥२॥
तया त्रिविक्रमभारतीसी । दाविले रूप प्रत्यक्षेसी ।
पुढे कथा वर्तली कैसी । निरोपावी दातारा ॥३॥
सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला ।
सांगता न सरे बहु काळा । साधारण मी सांगतसे ॥४॥
समस्त लीला सांगता । विस्तार होईल बहु कथा ।
या कारणे क्वचिता । निरोपीतसे बाळका ॥५॥
पुढे अपूर्व वर्तले एक । ऐक शिष्या नामधारक ।
विदुरा नामे नगर एक । होता राजा यवन तेथे ॥६॥
महाक्रूर ब्रह्मद्वेषी । सदा करी जीवहिंसी ।
चर्चा करवी ब्राह्मणांसी । वेद म्हणवी आपणापुढे ॥७॥
विप्रासी म्हणे यवन । जे का असती विद्वज्जन ।
आपुल्या सभेत येऊन । वेद सर्व म्हणावे ॥८॥
त्याते द्रव्य देईन बहुत । सर्वामध्ये मान्यवंत ।
जो का सांगेल वेदार्थ । विशेष त्याची पूजा करू ॥९॥
ऐसे ऐकूनि ज्ञानी जन । नेणो म्हणती वेद आपण ।
जे का असती मतिहीन । कांक्षा करिती द्रव्याची ॥१०॥
जावोनिया म्लेच्छापुढे । वेदशास्त्र वाचिती गाढे ।
म्लेच्छ मनी असे कुडे । ऐके अर्थ यज्ञकांडाचा ॥११॥
म्हणे विप्र यज्ञ करिती । पशुहत्या करणे रीती ।
आम्हा म्लेच्छाते निंदिती । पशु वधिती म्हणोनिया ॥१२॥
येणेपरी ब्राह्मणासी । निंदा करी बहुवसी ।
योग्यता पाहून द्विजवरांशी । अपार द्रव्य देतसे ॥१३॥
येणेपरी तो यवन । देतो द्रव्य म्हणोन ।
ऐकते झाले सकळ जन । देशोदेशी विप्रवर्ग ॥१४॥
वेदशास्त्री निपुण । द्रव्यावरी ठेवुनी मन ।
भेटीसी जाती ब्राह्मण । वेद म्हणती यवनापुढे ॥१५॥
ऐसे मंदमति विप्र । त्यांची जोडी यमपुर ।
मदोन्मत्त दुराचार । तेच इष्ट कलीचे ॥१६॥
येणेपरी वर्तमानी । वर्तत असता एके दिनी ।
मंदभाग्य विप्र दोनी । येवोनि भेटले राया ॥१७॥
वेदशास्त्र अभिज्ञाती । तीन वेद जाणो म्हणती ।
तया यवनापुढे किर्ति । आपली आपण सांगती ॥१८॥
विप्र म्हणती रायासी । कोणी नाही आम्हासरसी ।
वाद करावया वेदांसी । नसती चारी राष्ट्रांत ॥१९॥
असती जरी तुझ्या नगरी । त्वरित येथे पाचारी ।
आम्हासवे वेद चारी । चर्चा करावी द्विजांनी ॥२०॥
विप्रवचन ऐकोनि । राजा पडला अभिमानी ।
आपुल्या नगरचे विप्र आणोनि । समस्ताते पुसे तो ॥२१॥
राजा म्हणे समस्तांसी । चर्चा करावी तुम्ही यांसी ।
जे जिंकिती तर्केसी । त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे ॥२२॥
ऐकोनिया ज्ञानी जन । म्हणती म्लेच्छालागून ।
आम्हा योग्यता नाही जाण । या ब्राह्मणांते केवी जिंकू ॥२३॥
आम्हामध्ये हेचि श्रेष्ठ । विप्र दोघे महासुभट ।
याते करोनि प्रगट । मान द्यावा महाराज ॥२४॥
ऐसे म्हणती द्विज समस्त । ऐकोनि राजा मान देत ।
वस्त्रे भूषणे देई विचित्र । गजावरी आरूढविले ॥२५॥
आरूढवोनि हस्तीवरी । मिरवा म्हणे आपुल्या नगरी ।
नाही विप्र यांचे सरी । हेचि राजे विप्रांचे ॥२६॥
आपण राजा यवनांसी । हे दुजे राजे द्विजांसी ।
ऐसे भूसुर तामसी । म्लेच्छापुढे वेद म्हणती ॥२७॥
महातामसी ते ब्राह्मण । द्विजांते करूनिया दूषण ।
राजे म्हणविती आपण । तया यवनराज्यांत ॥२८॥
ऐसे असता वर्तमानी । विप्र मदांधे व्यापूनि ।
राजापुढे जावोनि । विनविताती परियेसा ॥२९॥
विप्र म्हणती रायासी । आम्हा योग्यता बहुवसी ।
न मिळे एखादा वादासी । वृथा झाले शिकोनिया ॥३०॥
आमुचे मनी बहु आर्ता । करणे वाद वेदशास्त्री ।
निरोप देई जाऊ आता । विचारू तुझ्या राष्ट्रात ॥३१॥
जरी मिळेल एखादा नरू । तयासवे चर्चा करू ।
न मिळे तैसा द्विजवरू । जयपत्र घेऊ ब्राह्मणाचे ॥३२॥
राजा म्हणे तयासी । जावे राष्ट्री त्वरितेसी ।
पराभवावे ब्राह्मणासी । म्हणोनि निरोप देता झाला ॥३३॥
यवनाचे आज्ञेसी । निघाले द्विजवर तामसी ।
पर्यटन करिता राज्यासी । गावोगावी विचारिती ॥३४॥
गावोगावी हिंडती । जयपत्रे लिहून घेती ।
ऐसी कवणा असे शक्ति । तयासन्मुख उभे रहावे ॥३५॥
समस्त नगरे हिंडत । पुढे गेले दक्षिणपंथ ।
भीमातीरी असे विख्यात । कुमसी ग्राम उत्तम ॥३६॥
तेथे होता महामुनि । त्रिविक्रमभारती म्हणुनी ।
त्यासी येती वेद तिन्ही । अनेकशास्त्री अभिज्ञ तो ॥३७॥
महामुनि कीर्तिमंत । म्हणोनि सांगती जन समस्त ।
ऐकती द्विज मदोन्मत्त । गेले तया मुनीपासी ॥३८॥
जावोनि म्हणती तयासी । त्रिवेदी ऐसे म्हणविसी ।
चर्चा करावी आम्हंसी । अथवा द्यावे हारिपत्र ॥३९॥
विप्रवचन ऐकोनि । म्हणतसे त्रिविक्रममुनि ।
आम्ही नेणो वेद तिन्ही । अथवा न ये वेद एक ॥४०॥
जरी जाणो वेदशास्त्र । तरी का होतो अरण्यपात्र ।
वंदन करिते राजे सर्वत्र । तुम्हांसारखे भोग करितो ॥४१॥
नेणो म्हणोनि अरण्यवासी । वेष घेतला मी संन्यासी ।
आम्ही भिक्षुक तापसी । तुम्हांसमान नव्हे जाणा ॥४२॥
हारी अथवा जिंकून । नाही तयाचा अभिमान ।
तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन । आम्हासवे काय वाद ॥४३॥
ऐकोनि मुनींचे वचन । तवका अले ते ब्राह्मण ।
आम्हासवे वाद कवण । घाली ऐसा त्रिभुवनी ॥४४॥
हिंडत आलो अवघे राष्ट्र । आम्हासमान नाही नर ।
म्हणोनि दाखविती जयपत्र । असंख्यात परियेसा ॥४५॥
येणेपरी आपणासी । जयपत्र द्यावे विशेषी ।
अभिमान असल्या मानसी । करी वाद म्हणताती ॥४६॥
अनेकपरी ब्राह्मणांसी । सांगे मुनि विनयेसी ।
ऐकती ना द्विज महाद्वेषी । मागती जयपत्र आपुले ॥४७॥
त्रिविक्रम महामुनि । आपुले विचार अंतःकरणी ।
याते न्यावे गाणगाभुवनी । शिक्षा करणे द्विजाते ॥४८॥
विप्र मदांधे व्यापिले । अनेक ब्राह्मण धिक्कारिले ।
त्याते करणे उपाय भले । म्हणोनि योजिले मनात ॥४९॥
त्रिविक्रम म्हणे विप्रासी ।
चला गाणगाभुवनासी तेथे देईन तुम्हांसी । जयपत्र विस्तारे ॥५०॥
तेथे असती आपुले गुरु । तयापुढे पत्र देईन निर्धारू ।
अथवा तुमच्या मनींचा भारू । शमन करू म्हणे देखा ॥५१॥
ऐशी निगुती करूनि । निघाला त्रिविक्रम महामुनि ।
सवे येती विप्र दोनी । आंद्लिके बैसोनिया ॥५२॥
मूढ ब्राह्मण अज्ञानी । यतीश्वरा चालवोनि ।
आपण बैसले सुखासनी । म्हणोनि अल्पायुषी झाले ॥५३॥
पावले तया गाणगापुरा । जे का स्थान गुरुवरा ।
रम्य स्थान भीमातीरा । वास नरसिंहसरस्वती ॥५४॥
नमन करूनि श्रीगुरूसी । विनवी मुनि भक्तीसी ।
कृपामूर्ति व्योमकेशी । भक्तवत्सला परमपुरुषा ॥५५॥
जय जयाजी जगद्गुरु । निर्गुण तूचि निर्विकारु ।
त्रयमूर्तीचा अवतारु । अनाथांचा रक्षक ॥५६॥
दर्शन होता तुझे चरण । उद्धरे संसारा भवार्ण ।
नेणती मूढ अज्ञानजन । अधोगतीचे ते इष्ट ॥५७॥
सद‌गदित कंठ झाला । रोमांच अंगी उठला ।
नेत्री बाष्प आनंद झाला । माथा ठेवी चरणावरी ॥५८॥
नमन करितांचि मनीश्वराते । उठविले श्रीगुरुनाथे ।
आलिंगोनि करुणावक्त्रे । पुसताती वृत्तान्त ॥५९॥
श्रीगुरु पुसती त्रिविक्रमासी । आलेत कवणे कार्यासी ।
विस्तारोनि आम्हांसी । निरोपावे मुनिवरा ॥६०॥
श्रीगुरुचे वचन ऐकोनि । सांगतसे त्रिविक्रममुनि ।
मदोन्मत्त विप्र दोनी । आले असती चर्चेसी ॥६१॥
वेदशास्त्रादि मीमांसे । म्हणती चर्चा करू हर्षे ।
वेद चारी जिव्हाग्री वसे । म्हणती मूढ विप्र दोनी ॥६२॥
जरी न करा चर्चेसी । पत्र मागती हारीसी ।
अनेकापरी तयांसी । सांगता न ऐकती उन्मत्त ॥६३॥
म्हणोनि आलो तुम्हांजवळी । तुम्ही श्रीगुरु चंद्रमौळी ।
तुमचे वाक्य असे बळी । तेणेपरी निरोपावे ॥६४॥
मुनिवचन ऐकोनि । श्रीगुरु म्हणती हास्यवदनी ।
आले होते विप्र दोनी । त्याते पुसती वृत्तान्त ॥६५॥
श्रीगुरु म्हणती विप्रांसी । कवण आलेती कार्यासी ।
वाद कायसा आम्हांसी । लाभ काय वादे तुम्हा ॥६६॥
आम्ही तापसी संन्यासी । आम्हा हारी कायसी ।
काय थोरी तुम्हांसी । जय होता यतीसवे ॥६७॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । बोलताती विप्र दोनी ।
आलो पृथ्वी हिंडोनि । समस्त विप्र जिंकीत ॥६८॥
नव्हे कोणी सन्मुख । वेदचर्चापराङ्‍मुख ।
म्हणोनि पत्रे अनेक । काढोनिया दाखविली ॥६९॥
येणेपरी आम्हांसी । पत्र देता का सायासी ।
कोप आला त्रिविक्रमासी । घेवोनि आला तुम्हांजवळी ॥७०॥
जरी असाल साभिमान । तुम्हांसहित दोघेजण ।
वेदशास्त्रादि व्याकरण । चर्चा करू म्हणती विप्र ॥७१॥
आम्ही जाणो वेद चारी । न होती कोणी आम्हांसरी ।
तुम्ही दोघे यतीश्वरी । काय जाणाल वेदान्त ॥७२॥
श्रीगुरु म्हणती विप्रांसी । गर्वे नाश समस्तांसी ।
देवदानवादिकांसी । गर्वे मृत्यु लाधला जाणा ॥७३॥
गर्वे बळीसी काय झाले । बाणासुरासी फळ आले ।
लंकानाथ कौरव गेले । वैवस्वतक्षेत्रासी ॥७४॥
कवण जाणे वेदान्त । ब्रह्मादिका न कळे अंत ।
वेद असती अनंत । गर्व वृथा तुम्ही करिता ॥७५॥
विचाराल आपुले हित । तरी सांडा सर्व भ्रांत ।
काय जाणता वेदान्त । चतुर्वेदी म्हणविता ॥७६॥
श्रीगुरूचे वचन ऐकोनि । गर्वे दाटले बहु मनी ।
जाणो आम्ही वेद तीन्ही । सांग संहिता परियेसा ॥७७॥
येणेपरी श्रीगुरूसी । बोलती ब्राह्मण परियेसी ।
सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व पुढे वर्तले ॥७८॥
वेद चारी आदि अंती । श्रीगुरु ब्राह्मणां निरोपिती ।
सांगेन ऐका एकचित्ती । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥७९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । त्रिविक्रममुनि विख्यात ।
विप्र जयपत्र मागत । ते चरित्र वर्णिले ॥८०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजप्रशंसा नाम पंचविशोऽध्यायः ॥२५॥
॥ ओवीसंख्या ॥८०॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥




गुरूचरित्र – अध्याय सव्विसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । नका भ्रमू युक्तीसी ।
वेदान्त न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद असती ॥१॥

वेदव्यासासारिखे मुनि । नारायण अवतरोनि ।
वेद व्यक्त करोनि । व्यास नाम पावला ॥२॥

तेणेही नाही पूर्ण केले । साधारण सांगितले ।
शिष्य होते चौघे भले । प्रख्यात नामे अवधारा ॥३॥

शिष्यांची नामे देखा । सांगेन विस्तारे ऐका ।
प्रथम पैल दुजा वैशंपायन निका । तिसरा नामे जैमिनी ॥४॥

चौथा सुमंतु शिष्य । करीन म्हणे विद्याभ्यास ।
त्यांसी म्हणे वेदव्यास । अशक्य तुम्हा शिकता ॥५॥

एक वेद व्यक्त शिकता । पाहिजे दिनकल्पांता ।
चारी वेद केवी वाचिता । अनंत वेद असे महिमा ॥६॥

ब्रह्मकल्प तिन्ही फिरले । वर्षोवर्षी वाचले ।
ब्रह्मचर्य आचरले । वेद पूर्ण शिको म्हणोनि ॥७॥

या वेदांचे आद्यंत । सांगेन ऐका एकचित्त ।
पूर्वी भारद्वाज विख्यात । ऋषि अभ्यास करीत होता ॥८॥

लवलेश आले त्यासी । पुनरपि करी तपासी ।
ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी । काय मागशील म्हणोनि ॥९॥

भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी । स्वामी मज प्रसन्न होसी ।
वेद शिकेन आद्यंतेसी । ब्रह्मचर्य आश्रमी ॥१०॥

वेदान्त मज दावावे । सर्व माते शिकवावे ।
ऐसे वरदान द्यावे । म्हणोनि चरणी लागला ॥११॥

ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी । मिती नाही वेदांसी ।
सर्व कैसा शिको म्हणसी । आम्हांसी वेद अगोचर ॥१२॥

तुज दावितो पहा सकळ । करोनि मन निर्मळ ।
शक्ति झालिया सर्व काळ । अभ्यास करी भारद्वाजा ॥१३॥

ऐसे म्हणोनि ऋषीसी । ब्रह्मा दावी वेदांसी ।
दिसताती तीन राशी । गिरिरूप होवोनि ॥१४॥

ज्योतिर्मय कोटिसूर्य । पाहता ऋषीस वाटे भय ।
वेदराशी गिरिमय । केवी शिकू म्हणतसे ॥१५॥

तिन्ही ब्रह्मकल्पांवरी । आचरले आश्रम चारी ।
वेद शिकले तावन्मात्री । एवढे गिरी केवी शिको ॥१६॥

म्हणोनि भयभीत झाला । ब्रह्मयाचे चरणी लागला ।
म्हणे स्वामी अशक्य केवळा । क्षमा करणे म्हणतसे ॥१७॥

या वेदाचा आद्यंत । आपण पहावया अशक्त ।
तूचि जाणसी जगन्नाथ । जे देशी ते घीन ॥१८॥

तू शरणागता आधार । माझे मनी वासना थोर ।
वेद शिकावे अपार । म्हणोनि आलो तुजपासी ॥१९॥

वेद देखोनि अमित । भय पावले चित्त ।
जे द्याल उचित । तेचि घेऊ परियेसा ॥२०॥

ऐसे वचन ऐकोन । ब्रह्मदेव संतोषोन ।
देता झाला मुष्टी तीन । अभ्यासावया ॥२१॥

तीन वेदांचे मंत्रजाळ । वेगळे केले तत्काळ ।
ऐसे चारी वेद प्रबळ । अभ्यासी भारद्वाजी ॥२२॥

अजून पुरते नाही त्यासी । केवी शिको पाहती वेदासी ।
सांगा तुम्ही परियेसी । चौघे वाचा चारी वेद ॥२३॥

पूर्ण एक एक वेदासी । शिकता प्रयत्‍न मोठा त्यासी ।
सांगेन थोडे तुम्हासी । व्यक्त करावया अभ्यास ॥२४॥

शिष्य म्हणती व्यासासी । एक एक वेद आम्हांसी ।
विस्तारावे आद्यंतेसी । शक्त्यनुसार अभ्यास करू ॥२५॥

ऐसे विनविती चौघेजण । नमुनी व्यासचरण ।
कृपा करावी जाण । आम्हांलागी व्यासमुनि ॥२६॥

करुणावचन ऐकोनि । व्यास सांगे संतोषोनि ।
पैल शिष्य बोलावोनि । ऋग्वेद निरोपित ॥२७॥

ऐक पैल शिष्योत्तमा । सांगेन ऋग्वेदमहिमा ।
पठण करी गा धर्मकर्मी । ध्यानपूर्वक करोनि ॥२८॥

पैल शिष्य म्हणे व्यासासी । बरवे विस्तारावे आम्हांसी ।
ध्यानपूर्वक लक्षणेसी । भेदाभेद निरोपावे ॥२९॥

त्यात जे अवश्य आम्हांसी । तेचि शिको भक्तीसी ।
तू कामधेनु आम्हांसी कृपा करी गा गुरुमूर्ती ॥३०॥

व्यास सांगे पैल शिष्यासी । ऋग्वेदध्यान परियेसी ।
वर्णरूप व्यक्ति कैसी । भेदाभेद सांगेन ॥३१॥

ऋग्वेदाचा उपवेद । असे प्रख्यात आयुर्वेद ।
अत्रि गोत्र असे शुद्ध । ब्रह्मा देवता जाणावी ॥३२॥

गायत्री छंदासी । रक्तवर्ण परियेसी ।
नेत्र पद्मपत्रसदृशी । विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ ॥३३॥

कुंचकेशी श्मश्रु प्रमाण । द्वयरत्‍नी दीर्घ जाण ।
ऋग्वेद असे रूपधारण । मूर्ति ध्यावी येणेपरी ॥३४॥

आता भेद सांगेन ऐका । प्रथम चर्चा श्रावका ।
द्वितीय चर्चा श्रवणिया ऐका । जटा शफट दोनी शाखा ॥३५॥

पाठक्रमशाखा दोनी । सातवा दण्ड म्हणोनि ।
भेद सप्त निर्गुणी । पाच भेद आणिक असती ॥३६॥

अश्वलायनी शांखायनी । शाकला बाष्कला दोनी ।
पांचवी माण्डूका म्हणोनि । असे भेद द्वादश ॥३७॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । व्यासे सांगितले शिष्यासी ।
ऐशिया ऋग्वेदासी । द्वादश भेद विस्तारे ॥३८॥

या कलियुगाभीतरी । म्हणविसी वेद चारी ।
कीर्ति मिरवा लोकांतरी । अध्यापक म्हणोनि ॥३९॥

तया द्वादश भेदांत । एक शाखा असे विख्यात ।
सुलक्षण रूप व्यक्त । कोण जाणे सांग मज ॥४०॥

नारायण व्यासमुनि । शाखा द्वादश विस्तारोनि ।
सांगितल्या संतोषोनि । पैल शिष्यासी ॥४१॥

ऋग्वेदाचे भेद असे । सांगितले वेदव्यासे ।
श्रीगुरु म्हणती हर्षे । मदोन्मत्त द्विजांसी ॥४२॥

यजुर्वेदविस्तार । सांगेन ऐका अपार ।
वैशंपायन शिष्य थोर । अभ्यास करी परियेसा ॥४३॥

व्यास म्हणे शिष्यासी । ऐक एकचित्तेसी ।
सांगतो यजुर्वेदासी । उपवेद धनुर्वेद ॥४४॥

भारद्वाज गोत्र जाणा । अधिदैवत विष्णु जाणा ।
त्रिष्टुप्‍ छंदासी तुम्ही म्हणा । आता ध्यान सांगेन ॥४५॥

कृशमध्य निर्धारी । स्थूल ग्रीवा कपाल जरी ।
कांचनवर्ण मनोहरी । नेत्र असती पिंगट ॥४६॥

शरीर ताम्र आदित्यवर्ण । पाच अरत्‍नी दीर्घ जाण ।
यजुर्वेदा ऐसे ध्यान । वैशंपायना निर्धारी ॥४७॥

ऐशिया यजुर्वेदासी । असती भेद शायसी ।
म्हणे व्यास शिष्यासी । सांगेन एकाचिपरी ॥४८॥

प्रथम चरका आहूरका । तिसरा नामकठा ऐका ।
प्राच्यकठा चतुर्थिका । कपिलकठा पाचवी पै ॥४९॥

सहावी असे अरायणीया । सातवी खुणी वार्तातवीया ।
श्वेत म्हणिजे जाण आठवीया । श्वेततर नवमी ॥५०॥

मैत्रायणी असे नाम । शाखा असे हो दशम ।
तिसी भेद उत्तम । असती सात परियेसा ॥५१॥

मानवा दुंदुभा दोनी । तिसरा ऐकेया म्हणोनि ।
वाराहा नाम चतुर्थपणी । भेद असे परियेसा ॥५२॥

हरिद्रवेया जाण पाचवा । श्याम म्हणिजे सहावा ।
सातवा श्यामायणीया जाणावा । दशम शाखा परियेसा ॥५३॥

वाजसनेया शाखेसी । भेद असती अष्टादशी ।
नामे सांगेन परियेसी । श्रीगुरु म्हणती तयांसी ॥५४॥

वाजसनेया नाम एका । द्वितीया जाबला निका ।
बहुधेया नामे तृतीयका । चतुर्थ कण्व परियेसा ॥५५॥

माध्यंदिना पाचवेसी । शापिया नाम षष्ठेसी ।
स्थापायनी सप्तमेसी । कापाला अष्टम विख्यात ॥५६॥

पौड्रवत्सा विख्यात । आवटिका नावे उन्नत ।
परमावटिका परम ख्यात । एकादश भेद जाणा ॥५७॥

पाराशर्या द्वादशी । वैद्येया नामे त्रयोदशी ।
चतुर्दश भेद पुससी । वैनेया म्हणती तयाते ॥५८॥

औंधेया नामे विशेषी । जाण शाखा पंचदशी ।
गालवा म्हणिजे षोडशी । बैजवा नाम सप्तदशी ॥५९॥

कात्यायनी विशेषी । जाण शाखा अष्टादशी ।
वाजसनीय शाखेसी । भेद असती अष्टादश ॥६०॥

तैत्तिरीय शाखा भेद दोनी । व्यास सांगे विस्तारोनि ।
औख्या काण्डिकेया म्हणोनि । यासी भेद पाच असती ॥६१॥

आपस्तंबी असे थोर । शाखा असे मनोहर ।
यज्ञादि कर्मे आचार । विज्ञान असे तयात ॥६२॥

दुसरा जाण बौधायनी । सत्याषाढी अघनाशिनी ।
हिरण्यकेशी म्हणोनि । चौथा भेद परियेसा ॥६३॥

औंधेयी म्हणोनि नाव । भेद असे पाचवा ।
अनुक्रमे पढावा । म्हणे व्यास शिष्यासी ॥६४॥

षडंगे असती विशेषे । नामे तयांची सांगेन ऐके ।
शिक्षा व्याकरण कल्पे । निरुक्त छंद ज्योतिष ॥६५॥

याते उपांगे असती माणिक । आणि त्यांची नामे तू ऐक ।
प्रतिपद अनुपद देख । छंद तिसरा परियेसा ॥६६॥

भाषाधर्म पंचम । मीमांसा न्याय सप्तम ।
कर्मसंहिता अष्टम । उपांगे ही जाणावी ॥६७॥

परिशिष्टे अष्टाविंश । असती ऐका विशेष ।
विस्तार करुनी परियेस । व्यास सांगे शिष्यासी ॥६८॥

पूर्वी होत्या वेदराशी । शिकता अशक्य मानवांसी ।
म्हणोनि लोकोपकारासी । ऐसा केला विस्तार ॥६९॥

शाखाभेदी येणेपरी । विस्तार केला प्रकारी ।
जितके मति उच्चारी । तितुके शिको म्हणोनि ॥७०॥

येणेपरी विस्तारी । सांगे व्यास परिकरी ।
वैशंपायन अवधारी । विनवीतसे त्याजवळी ॥७१॥

यजुर्वेद विस्तारेसी । निरोपिला आम्हांसी ।
शाखाभेद क्रमेसी । वेगळाले करोनि ॥७२॥

संदेह होतो आम्हासी । मूळ शाखा कोण कैसी ।
विस्तारोनि प्रीतीसी । निरोपावे स्वामिया ॥७३॥

व्यास म्हणे शिष्यासी । बरवे पुसिले आम्हांसी ।
या यजुर्वेदासी । मूळ तुम्हां सांगेन ॥७४॥

मंत्र ब्राह्मण संहिता । मिळोनि पढता मिश्रिता ।
तोचि मूळ प्रख्याता । यजुर्वेद जाणिजे ॥७५॥

आणिक असे एक खूण । संहिता मिळोनि ब्राह्मण ।
तोचि यजुर्वेद मूळ जाण । वरकड शाखा पल्लव ॥७६॥

यज्ञादि कर्मक्रियेसी । हे मूळ गा परियेसी ।
अभ्यास करी गा निश्चयेसी । म्हणे व्यास शिष्याते ॥७७॥

ऐकोनिया व्यासवचन । वैशंपायन म्हणे कर जोडून ।
यजुर्वेदमूळ विस्तारोन । निरोपावे स्वामिया ॥७८॥

व्यास म्हणे शिष्यासी । सांगेन ऐक विस्तारेसी ।
ग्रंथत्रय असती ज्यासी । अभ्यास करी म्हणतसे ॥७९॥

सप्त अष्टक संहितेसी । एकाएकाचे विस्तारेसी ।
सांगेन तुज भरवसी । म्हणे व्यास शिष्याते ॥८०॥

प्रथम इषेत्वा प्रश्नासी । अनुवाक असती चतुर्दशी ।
आठ अधिक विसांसी । पन्नासा असती ॥८१॥

अपऊर्ध्व प्रश्नासी । अनुवाक असती चतुर्दशी ।
चारी अधिक तिसांसी । प्रन्नासा तुम्ही जाणाव्या ॥८२॥

देवस्यत्वा प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी ।
एक अधिक तिसांसी । पन्नासा असती ॥८३॥

आददेनामा प्रश्न चतुर्थ । षट्‍चत्वारिंशत्‍ अनुवाक विख्यात ।
पन्नासा जाण तयात । वेदाधिक पन्नास ॥८४॥

देवासुर नामक प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी ।
असती एकावन्न पन्नासी । पंचम प्रश्नांत अवधारा ॥८५॥ ’

संत्वासिंचा’ इति प्रश्न । द्वादश अनुवाक असती पूर्ण ।
पन्नासा असती एकावन्न । असती सहावे प्रश्नासी ॥८६॥

पाकयज्ञ नामक प्रश्न । त्रयोदशी अनुवाकी संपन्न ।
पन्नासा असती एकावन्न । सप्तम प्रश्न विस्तार ॥८७॥

अनुमत्य इति प्रश्नासी । अनुवाक जाणा द्वाविशंती ।
द्विचत्वारिशत पन्नासा असती । प्रथम अष्टक येणेपरी ॥८८॥

प्रथम अष्टक परियेसी । संख्या सांगेन संहितेसी ।
अनुवाक असती ख्यातीसी । एकचित्ते परियेसा ॥८९॥

एकशत आणि चत्वारिंशत वरी । अधिक त्यावरी तीन निर्धारी ।
अनुवाक असती परिकरी । अंतःकरणी धरावे ॥९०॥

पन्नासा असती त्यासी । त्रिशताधिक बेचाळिसी ।
प्रथम अष्टकी परियेसी । म्हणोनि सांगे व्यासमुनि ॥९१॥

द्वितीय अष्टकाचा विचार । सांगेन तो परिकर ।
प्रथम प्रश्नाचे नाम थोर । वायव्य असे म्हणावे ॥९२॥

प्रथम प्रश्नांत विशेश । अनुवाक जाण एकादश ।
पंचषष्टि असती पन्नास । एकचित्ते परियेसा ॥९३॥

पुढे असे द्वितीय प्रश्न । नाम असे प्रजापतिगुहान्‍ ।
द्वादश अनुवाक असती जाण । एकसप्तति पन्नासा ॥९४॥

आदित्य नामक प्रश्नास । अनुवाक जाणा चतुर्दश ।
षट्‍ अधिक पंचाशत । पन्नासा तुम्ही पढाव्या ॥९५॥

पुढील प्रश्न देवामनुष्या । अनुवाक जाणा चतुर्दशा ।
अष्ट अधिक चत्वारिंशा । पन्नासा तुवा जाणिजे ॥९६॥

म्हणता जाय महापाप । प्रश्न असे विश्वरूप ।
द्वादश अनुवाक स्वरूप । चारी अधिक सप्तति पन्नासा ॥९७॥

समिधा नाम प्रश्नास । निरुते अनुवाक द्वादश ।
सप्तति पन्नासा असती त्यास । एकचित्ते परियेसा ॥९८॥

ऐसे द्वितीय अष्टकासी । षष्ठ प्रश्न परियेसी ।
पाच अधिक सप्ततीसी । अनुवाक तुम्ही जाणावे ॥९९॥

पन्नासांची गणना । सांगेन तुज विस्तारोन ।
तीन शतांवरी अशीति जाण । अष्ट अधिक परियेसा ॥१००॥

तिसरा अष्टक सविस्तर । सांगेन तुम्हा परिकर ।
वैशंपायन शिष्य थोर । गुरुमुखे ऐकतसे ॥१॥

तिसर्‍या अष्टकाचा प्रश्न प्रथम । नाम ’प्रजापतिरकाम’ ॥
अनुवाक त्या एकादशोत्तम । द्विचत्वारिंशत पन्नासा त्यासी ॥२॥

द्वितीय प्रश्नास असे जाण । नाम ’यो वै पवमान’ ।
एकादश अनुवाक जाण । षट्‍चत्वारिशंत्‍ पन्नासा त्यासी ॥३॥

तृतीय प्रश्ना बरवीयासी । नाम असे ’अग्ने तेजस्वी’ ।
अनुवाकांची एकाद्शी । षट्‍चत्वारिंशत पन्नासा त्यासी ॥४॥

चौथा प्रश्न ’विवाएत’ । एकादश अनुवाक ख्यात ।
षट्‍चत्वारिशत पन्नासा त्यांत । एकचित्ते परियेसा ॥५॥

पुढे असे प्रश्न पंचम । म्हणावे नाम पूर्णा प्रथम ।
अनुवाक अकरा उत्तम । षड्‌विंशति पन्नासा त्यासी ॥६॥

ऐसे तृतीयाष्टकासी । अनुवाक पंचपंचाशत्‍ त्यासी ।
द्विशत अधिक सहा त्यासी । पन्नासा असती अवधारा ॥७॥

चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न । नामे असे युंजान ।
एकादश अनुवाक खूण । षट्‍चत्वारिंशत पन्नासा ॥८॥

प्रश्नास संज्ञा विष्णोः क्रम ऐसी । एकादश अनुवाक परियेसी ।
अष्ट अधिक चत्वारिंशतीसी । पन्नासा त्यात विस्तार ॥९॥

तिसरे प्रश्ना उत्तम । जाणा तुम्ही आपांत्वा नाम ।
त्रयोदश अनुवाक उत्तम । षट्‌त्रिंशत पन्नासा त्यासी ॥११०॥

चौथा प्रश्न रश्मिरसी । अनुवाक असती द्वादशी ।
सप्ताधिक त्रिंशत्‍ त्यासी । पन्नासा असती तुम्ही जाणा ॥११॥

नमस्ते रुद्र उत्तम । प्रश्न होय जाण पंचम ।
एकादश अनुवाक जाण । सप्ताधिक वीस पन्नासा ॥१२॥

’अश्मन्नूर्ज’ प्रश्नास । नव अनुवाक परियेस ।
षट्‍चत्वारिंशत पन्नासा त्यास । एकचित्ते परियेसा ॥१३॥

प्रश्न ’अग्नाविष्णू’सी । अनुवाकांची जाण पंचदशी ।
एक न्यून चाळिसांसी । पन्नासा त्यासी विस्तारे ॥१४॥

ऐसे चतुर्थ अष्टकासी । सप्त प्रश्न परियेसी ।
अनुवाक असती ब्यायशी । द्विशतांवर एक उण्या अशीति पन्नासा ॥१५॥

पंचमाष्टका प्रथम प्रश्न । नामे ’सावित्राणि’ जाण ।
पन्नासा षष्टि एका ऊण । एकादश अनुवाक ख्याति ॥१६॥

विष्णुमुखा प्रश्नासी । अनुवाक असती द्वादशी ।
चतुषष्टि पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती द्विजाते ॥१७॥

तिसरा प्रश्न उत्सन्नयज्ञ । अनुवाक द्वादश धरा खूण ।
पन्नासांसी द्वय न्यून । पन्नासा असती परियेसी ॥१८॥

चौथा प्रश्न देवासुरा । अनुवाक असती त्यासी बारा ।
षष्टीत दोन उण्या करा । पन्नासा असती परियेसा ॥१९॥

यदेके नामे प्रश्न । चतुर्विशति अनुवाक खूण ।
दोन अधिक षष्टि जाण । पन्नासा असती परियेसा ॥१२०॥

हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न । त्रयोविंशति अनुवाक जाण ।
षष्टीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥२१॥

यो वा आ यथा नामे प्रश्न । षड्‌विंशति अनुवाक जाण ।
षष्टीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥२२॥

पंचमाष्टक संहितेसी । सप्त प्रश्न परियेसी ।
अनुवाक एकशत त्यासी । वीस अधिक विस्तारे ॥२३॥

त्रीणि अधिक चतुःशत । पन्नासा असती जाणा विख्यात ।
मन करूनि सावचित्त । ऐका म्हणे तये वेळी ॥२४॥

षष्ठाष्टक संहितेसी । प्रथम प्रश्न परियेसी ।
प्राचीनवंश नाम त्यासी । एकादश अनुवाक जाणा ॥२५॥

अधिक सहा सप्ततीसी । पन्नासा त्यासी परियेसी ।
विस्तार करूनि शिष्यासी । सांगतसे व्यासदेव ॥२६॥

’यदुभौ’ नाम प्रश्नासी । अनुवाक जाणा एकादशी ।
एक उणा षष्ठीसी । पन्नासा असती परियेसी ॥२७॥

तिसरा प्रश्न चात्वाल । एकादशी अनुवाकी माळ ।
पन्नासा षष्ठीवरी द्वय स्थूळ । तिसरा प्रश्न परियेसी ॥२८॥

चवथा प्रश्न यज्ञेन । एकादश अनुवाक जाण ।
पन्नासा एक अधिक पंचाशत पूर्ण । एकचित्ते परियेसा ॥२९॥

’इंद्रोवृत्र’ नाम प्रश्न । एकादश अनुवाक जाण ।
द्विचत्वारिंशत्‍ पन्नासा खूण । पंचम प्रश्नी परियेसा ॥१३०॥

’सुवर्गाय’ नाम प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी ।
त्रीणि अधिक चत्वारिंशती । पन्नासा असती परियेसा ॥३१॥

सहावे अष्टकी परिपूर्ण । त्यासी सहा अधिक असती पूर्ण ।
षष्टि अनुवाक असती जाण । त्रयस्त्रिंशदधिकत्रिशत पन्नासा ॥३२॥

सप्तमाष्टकाचा प्रश्न । नामे असे प्रजनन ।
अनुवाक वीस असती खूण । द्विपंचाशत पन्नासा त्यास ॥३३॥

साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न । विंशती अनुवाक जाण ।
पन्नास पन्नासा परिपूर्ण । एकचित्ते परियेसा ॥३४॥

’प्रजवं वा’ नाम प्रश्नासी । अनुवाक वीस परियेसी ।
द्विचत्वारिंशत्‍ पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती तयांसी ॥३५॥

’बृहस्पती’ नामक प्रश्न । द्वाविंशति अनुवाक जाण ।
त्रीण्यधिक पन्नासा खूण । पन्नासा असती अवधारा ॥३६॥

प्रश्न असे पाचवा जाण । ’गावो’ वा नामे उत्तम ।
पंचविंशति अनुवाक पूर्ण । चतुःपंचाशत्‍ पन्नासा त्यासी ॥३७॥

सप्तमाष्टक संहितेसी । अनुवाक असती परियेसी ।
एकशत सप्त त्यासी । अनुवाक असती विस्तार ॥३८॥

द्विशतावरी अधिकेसी । एकावन्न असती पन्नासी ।
सप्तमाष्टक असे सुरसी । एकचित्ते परियेसी ॥३९॥

अष्टमाष्टक संहितेसी । षट्‍ शताधिक अष्टचत्वारिंशतीसी ।
मुख्य प्रश्न चत्वारिंशत्‍ भरवसी । अनुवाक असती विस्तारे ॥१४०॥

द्विउणे शतद्वय सहस्त्र दोनी । पन्नासा तू जाण मनी ।
पठण करा म्हणोनी । व्यास सांगे शिष्यासी ॥४१॥

तीन अष्टक ब्राह्मणांत । असती जे जाण विख्यात ।
सांगेन ऐक एकचित्त । म्हणे व्यास शिष्यासी ॥४२॥

प्रथमाष्टक ब्राह्मणासी । प्रश्न आठ परियेसी ।
नामे त्याची ऐका ऐशी । एकचित्ते परियेसा ॥४३॥

प्रथम प्रश्न संधत्त । नाम असे विख्यात ।
अनुवाक दहा विस्तृत । अशीति दशक मनोहर ॥४४॥

उद्धन्य नाम दुसरा प्रश्न । सहा अनुवाक दशक पन्नास जाण ।
वाजपेय अनुसंधान । देवासुरा प्रश्न तिसरा ॥४५॥

त्यासी दशक अनुवाक जाण । पंच अधिक षष्टि दशक जाण ।
चौथा उभय नाम प्रश्न । दश अनुवाक मनोहर ॥४६॥

सवत्सरगणित सहा अधिका । त्यासी जाणा तुम्ही दशका ।
पाचवा नामे अग्नेकृत्तिका । प्रश्न असे अवधारा ॥४७॥

त्यासी अनुवाक द्वादश । सांगेन ऐका दशक ।
दोन अधिक षष्टि विशेष । एकचित्ते परियेसा ॥४८॥

सहावा प्रश्न अनुमत्य । अनुवाक दहा प्रख्यात ।
पाच अधिक सप्ततिक । दशक त्यासी अवधारा ॥४९॥

सप्तम प्रश्ना धरी खूण । नाम त्या एकद्वाब्राह्मण ।
दश अनुवाक आहेत जाण । चतुःषष्टि दशक त्यासी ॥१५०॥

आठवा वरुणस्य नाम प्रश्न । अनुवाक त्यासी दहा जाण ।
सप्त अधिक तीस खूण । दशक त्यासी मनोहर ॥५१॥

प्रथम अष्टक ब्राह्मणासी । प्रश्न आठ परियेसी ।
अष्टसंप्तति अनुवाक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥५२॥

एक उणे पाचशत । दशक आहेत विख्यात ।
वैशंपायन ऐकत । गुरुमुखेकरोनि ॥५३॥

दुसरा अष्टक ब्राह्मणास । प्रथम प्रश्न आंगिरस ।
अनुवाक जाणा एकादश । साठी दशक मनोहर ॥५४॥

प्रजापतिरकांड । प्रश्न दुसरा हा गोड ।
एकादश अनुवाक दृढ । त्रिसप्तति दशक त्यासी ॥५५॥

कांड ब्रह्मवादिन । एकादश अनुवाक जाण ।
दशक आहे तो पन्नास पूर्ण । एकचित्ते परियेसा ॥५६॥

’जुष्टो’ नाम प्रश्न ऐक । त्यासी अनुवाक अष्टाद्शक ।
वैशंपायन शिष्यक । गुरुमुखे ऐकतसे ॥५७॥

प्रश्न ’प्राणो रक्षति’ । अष्ट अनुवाक त्यासी ख्याति ।
पंच अधिक चत्वारिंशति । दशक तुम्ही ओळखिजे ॥५८॥

’स्वाद्वीत्वा’ नामे षष्ठम । प्रश्न असे उत्तम ।
अनुवाक असती वीस खूण । षट्‍ अधिक अशीति दशक त्यासी ॥५९॥

सप्तम प्रश्न त्रिवृत्तास । अनुवाक असती अष्टादश ।
सहा अधिक षष्ठीस । दशक त्यासी मनोहर ॥१६०॥

अष्टम प्रश्न ’पीवोअन्न’ । अनुवाक असती नऊ जाणा ।
अशीतीसि एक उणा । दशक त्यासी मनोहर ॥६१॥

द्वितीय अष्टक ब्राह्मणासी । आठ प्रश्न परियेसी ।
वेद उणे शतक त्यासी । अनुवाक असती मनोहर ॥६२॥

चार शतां उपरी । तीन उणे सप्तति निर्धारी ।
दशक आहेती विस्तारी । एकचित्ते परियेसा ॥६३॥

तृतीयाष्टक ब्राह्मणासी । प्रश्न असती द्वादशी ।
नामे त्यांची परियेसी । एकचित्ते अवधारा ॥६४॥

प्रथम प्रश्न विख्यातु । नाम ’अग्निर्नः पातु’ ।
सहा अनुवाक विख्यातु । एक अधिक षष्ठी दशक ॥६५॥

’तृतीयस्य’ द्वितीय प्रश्न । अनुवाक असती दहा जाण ।
पंचाशीतिक दशक खूण । एकचित्ते परियेसा ॥६६॥

तिसरा प्रश्न प्रत्युष्ट । अनुवाक असती एकादश ।
एका उणे ऐशी दशक । एकचित्ते अवधारा ॥६७॥

चौथा प्रश्न ’ब्राह्मणेसि’ । अनुवाक एका परियेसी ।
एका उणे विसांसी । दशक त्यांसी मनोहर ॥६८॥

पंचम प्रश्न नाम सत्य । चतुर्दश अनुवाक विख्यात ।
एक उणे तीस दशक । एकचित्ते परियेसा ॥६९॥

सहावा प्रश्न ’अंजंति’ । पंचदश अनुवाक ख्याति ।
सात अधिक त्रिंशती । दशक त्यासी जाणावे ॥१७०॥

अच्छिद्रसर्वान्वा नाम प्रश्न । चतुर्दश अनुवाक जाण ।
तीस अधिक शत खूण । दशक त्यासी मनोहर ॥७१॥

प्रश्न अश्वमेधासी । सांग्रहण्य ख्यातीसी ।
अनुवाक असती त्रयोदशी । एक्याण्णव दशक ॥७२॥

प्रजापतिरकाम । अश्वमेध असे उत्तम ।
त्रयोविंशति अनुवाक नेम । चारी अधिक अशीति दशक त्यासी ॥७३॥

संज्ञान म्हणती काठक । अनुवाक दहांशी एक अधिक ।
एका उणे पन्नास दशक । एकचित्ते परियेसा ॥७४॥

दुसरा ’लोकोसि’ काठक । दश अनुवाक असती ऐक ।
तयांमध्ये दोनी अधिक षष्ठी दशक । व्यास म्हणे शिष्यासी ॥७५॥

द्वादश प्रश्न तुभ्यासी । अनुवाक नव परियेसी ।
सहा अधिक पन्नासासी । दशक त्यासी मनोहर ॥७६॥

तिसरे अष्टक ब्राह्मणासी । सप्त चत्वारिंशत एक शत अनुवाकासी ।
सात शत द्‌व्यशीति दशकासी । विस्तार असे परियेसा ॥७७॥

तिनी अष्टक ब्राह्मणासी । प्रश्न सांगेन परियेसी ।
अष्ट अधिक विसांसी । एकचित्ते अवधारा ॥७८॥

त्रीणि शत विसांसी । एक अधिक परियेसी ।
अनुवाक आहेती विस्तारेसी । परत ब्राह्मणासी परियेसा ॥७९॥

दशक संख्या विस्तार । सप्तशत अधिक सहस्त्र ।
अष्टचत्वारिंशति उत्तर । अधिक असती परियेसा ॥१८०॥

आता सांगेन अरण । त्यासी असती दहा प्रश्न ।
विस्तारोनिया सांगेन । एकचिते अवधारा ॥८१॥

अरणाचा भद्रनाम प्रथम प्रश्न । द्वात्रिशत् अनुवाक असे खूण ।
एक शतक तीस जाण । दशक त्यासी मनोहर ॥८२॥

स्वाधाय ब्राह्मणासी । अनुवाक वीस परियेसी ।
चतुर्विंशति दशक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥८३॥

चित्ती म्हणिजे प्रश्नासी । अनुवाक जाण एकविंशतीसी ।
दोन अधिक पन्नासासी । दशक त्यासी विस्तार ॥८४॥

ऐसा थोर चवथा प्रश्न । नाम तया मंत्रब्राह्मण ।
द्विचत्वारिम्शत अनुवाक जाण । द्विषष्ठी दशक त्यासी ॥८५॥

श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी । अनुवाक जाण द्वादशी ।
आठ अधिक शतासी । दशक तुम्ही जाणावे ॥८६॥

पितृभेद असे प्रश्न । द्वादश अनुवाक परिपूर्ण ।
सप्तविंशती दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥८७॥

’शिक्षा’ नाम प्रश्नासी । अनुवाक असती द्वादशी ।
तीन अधिक विसांसी । दशक त्यासी मनोहर ॥८८॥

ब्रह्मविदा असे प्रश्न । अनुवाक त्यासी नऊ जाण ।
दशक चतुर्दश असे खूण । व्यास म्हणे शिष्यांसी ॥८९॥

भुगुर्वै असे प्रश्न । अनुवाक त्यासी दहा जाण ।
पंचदश दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥१९०॥

दशम प्रश्न नारायण । अनुवाक तीस असती खूण ।
एकशत वेद जाण । दशक त्यासी परियेसा ॥९१॥

दहा प्रश्न अरणासी । अनुवाक जाण परियेसी ।
दोनी पूर्ण द्विशतासी । संख्या असे परियेसा ॥९२॥

पंचशता उपरी । नवपंचाशत विस्तारी ।
दशक जाणा मनोहरी । म्हणे व्यास शिष्याते ॥९३॥

ऐसे ग्रंथ तयांसी । प्रश्न असती ब्यायशी ।
नव षष्ठी अधिक एकशत सहस्त्रासी । अनुवाक जाण मनोहर ॥९४॥

पन्नासी दशक विस्तार । सांगेन तुम्हा प्रकार ।
द्वयशत दोनो सहस्त्र । द्वय उणे पन्नास जाण ॥९५॥

द्वयसहस्त्र त्रय शत । सप्त अधिक उन्नत ।
दशकी जाण विख्यात । ग्रंथत्रय परिपूर्ण ॥९६॥

ऐशीया यजुर्वेदासी । भेद असती शायशी ।
त्यात एक भेदासी । एवढा असे विस्तार ॥९७॥

येणेपरी व्यासमुनि । वैशंपायना विस्तारोनि ।
सांगता झाला म्हणोनि । श्रीगुरु म्हणती द्विजांसी ॥९८॥

तिसरा शिष्य जैमिनी । त्यास सांगे व्यासमुनि ।
सामवेद विस्तारोनि । निरोपित अवधारा ॥९९॥

उपवेद गांधर्व अत्र । काश्यपाचे असे गोत्र ।
रुद्र देवता परम पवित्र । जगती छंद म्हणावा ॥२००॥

नित्यस्त्रग्वी असे जाणा । शुचि वस्त्र प्रावरणा ।
मन शांत इंद्रियदमना । शमीदण्ड धरिला असे ॥१॥

कांचननयन श्वेतवर्ण । सूर्यासारखे किरण ।
षड्‌रत्‍नी दीर्घ जाण । सामवेद रूप असे ॥२॥

याच्या भेदा नाही मिती । अखिल सहस्त्र बोलती ।
ऐसी कोणा असे शक्ति । सकळासी शिकू म्हणावया ॥३॥

एका नारायणावांचोनि । समस्त भेद नेणे कोणी ।
ऐक शिष्या जैमिनी । सांगे तुज किंचित ॥४॥

प्रथम आसुरायणीया । दुसरे वासुरायणीय़ा ।
वातान्तरेया म्हणोनिया । तिसरा भेद परियेसा ॥५॥

प्रांजली असे भेद एक । ऋज्ञग्वैनविधा एक ।
आणि प्राचीन योग्यशाखा । असे सहावा परियेसा ॥६॥

ज्ञानयोग सप्तम । राणायणीया असे ज्या नाम ।
यासी भेद दश जाण । आहेत ऐका एकचित्ते ॥७॥

राणायणीया सांख्यायनी । तिसरा शाठ्या म्हणोन ।
मुग्दल नाम जाणोनि । चौथा भेद परियेसा ॥८॥

खल्वला महाखल्वला । सप्तम नामे लाङ्‌गला ।
अष्ट भेद कैथुमा । गौतमा म्हणे परियेसा ॥९॥

दशम शाखा जैमिनी । ऐसे भेद विस्तारोनि ।
सांगितले व्यासमुनी । श्रीगुरु म्हणति द्विजांसी ॥२१०॥

पूर्ण सामवेदासी । कोण जाणे क्षितीसी ।
तीनवेदी म्हणविसी । मदोन्मत्त होवोनिया ॥११॥

सूत म्हणे शिष्यांसी । सांगे व्यास अतिहर्षी ।
अथर्वण वेदांसी । निरोपिले परियेसा ॥१२॥

अथर्वण वेदासी । उपवेद असे परियेसी ।
मंत्रशास्त्र निश्चयेसी । वैतान असे गोत्र ॥१३॥

आधिदैवत इंद त्यासी । अनुष्टुप्‍ छंदेसी ।
तीक्ष्ण चंड क्रूरेसी । कृष्ण वर्ण असे जाण ॥१४॥

कामरूपी क्षुद्र कर्म । स्वदार असे त्यासी नाम ।
विश्वसृजक साध्यकर्म । जलमूर्ध्नीगालव ॥१५॥

ऐसे रूप तयासी । भेद नव परियेसी ।
सुमंतु नाम शिष्यासी । सांगतसे श्रीव्यास ॥१६॥

पैप्पला भेद प्रथम । दुसरा भेद दान्ता नाम ।
प्रदांत भेद सूक्ष्म । चौथा भेद स्तोता जाण ॥१७॥

औता नाम असे ऐका । ब्रह्मदा यशदा शाखा ।
सातवा भेद शाखा ऐका । शौनकी म्हणती ॥१८॥

अष्टम वेददर्शा भेदासी । चरणविद्या नवमेसी ।
पाच कल्प परियेसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥१९॥

ऐसे चौघा शिष्यास । सांगत असे वेदव्यास ।
प्रकाश केला क्षितीस । भरतखंडी परियेसा ॥२२०॥

या भरतखंडत । पूर्वी होते पुण्य बहुत ।
वर्णाश्रमधर्म आचर । होते लोक परियेसा ॥२१॥

या कलियुगाभीतरी । कर्म सांडिले द्विजवरी ।
लोपले वेद निर्धारी । गुप्त जाहले क्षितीसी ॥२२॥

कर्मभ्रष्ट झाले द्विज । म्लेच्छा सांगती वेदबीज ।
सत्त्व गेले सहज । मंदमती झाले जाण ॥२३॥

पूर्वी होते महत्त्व । ब्राह्मणासी देवत्व ।
वेदबळे नित्यत्व । भूसुर म्हणती त्या काजा ॥२४॥

पूर्वी राजे याच कारणी । पूजा करती विप्रचरणी ।
सर्व देता दक्षिणादानी । ते अंगिकार न करिती ॥२५॥

वेदबळे विप्रांसी । त्रिमूर्ति वश होते त्यांसी ।
इंद्रादि सुरवरांसी । भय होते विप्रांचे ॥२६॥

कामधेनु कल्पतरू । विप्रवाक्ये होत थोरू ।
पर्वत करिती तृणाकारू । तृणा पर्वत परत्वे ॥२७॥

विष्णु आपण परियेसी । पूजा करी विप्रांसी ।
आपुले दैवत म्हणे त्यांसी । वेदसत्त्वे करोनिया ॥२८॥

श्लोक ॥ देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं ।
ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम्‍ ॥२९॥

ऐसे महत्त्व द्विजांसी । पूर्वी होते परियेसी ।
वेदमार्ग त्यजोनि सुरसी । अज्ञानमार्गे रहाटती ॥२३०॥

हीन यातीपुढे ऐका । वेद म्हणती मूर्ख देखा ।
त्यांच्या पाहू नये मुखा । ब्रह्मराक्षस होताती ॥३१॥

तेणे सत्त्व भंगले । हीन यातीते सेविले ।
अद्यापि क्रय करिती मोले । वेद भ्रष्ट करिताती ॥३२॥

ऐशा चारी वेदांसी । शाखा असती परियेसी ।
कोणे जाणावे क्षितीसी । सकळ गौप्य होऊनि गेले ॥३३॥

चतुर्वेदी म्हणविसी । लोकांसवे चर्चा करिसी ।
काय जाणसी वेदांसी । अखिल भेद आहेत जाण ॥३३४॥

ऐशामध्ये काय लाभ । घेऊ नये द्विजक्षोभ ।
कोणी केला तूते बोध । जाई म्हणती येथून ॥३५॥

आपुली आपण स्तुति करिसी । जयपत्रे दाखविसी ।
त्रिविक्रम यतीपासी । पत्र मागसी लिहुनी ॥३६॥

आमुचे बोल ऐकोनि । जावे तुम्ही परतोनि ।
वाया गर्वे भ्रमोनि । प्राण आपुला देऊ नका ॥३७॥

ऐसे श्रीगुरु विप्रांसी । सांगती बुद्धि हितासी ।
न ऐकती विप्र तामसी । म्हणती चर्चा करू ॥३८॥

चर्चा जरी न करू येथे । हारी दिसेल आम्हांते ।
सांगती लोक राजयाते । महत्त्व आमुचे उरे केवी ॥३९॥

सिद्ध म्हणे नामांकिता । ऐसे विप्र मदोमन्ता ।
नेणती आपुले हिता । त्यासी मृत्यु जवळी आला ॥२४०॥

गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु ।
वेदविवरण ऐकता साधनु । होय समाधान श्रोते जना ॥४१॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । चारी वेदांचा मथितार्थ ।
उकलोनि दाविला यथार्थ । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥२४२॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वेदविस्तारकथनं नाम षड्‍विंशोऽध्यायः ॥२६॥

॥ ओवीसंख्या ॥२४२॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥




गुरूचरित्र – अध्याय सत्ताविसावा

श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्यराणा ।
लागे सिद्धाचिया चरणा विनवीतसे वचना । ऐका श्रोते एकचित्ते ॥१॥

जयजयाजी सिद्ध योगी । तू तारक आम्हा जगी ।
ज्ञानप्रकाश करणेलागी । दिले दर्शन चरणांचे ॥२॥

चतुर्वेद विस्तारेसी । श्रीगुरु निरोपिती विप्रांसी ।
पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥३॥

शिष्यवचन ऐकोनि । सांगता झाला विस्तारोनि ।
ऐक शिष्या नामकरणी । अनुपम महिमा श्रीगुरूची ॥४॥

किती प्रकारे विप्रांसी । श्रीगुरु सांगती हितासी ।
न ऐकती द्विज तामसी । म्हणती वाद का पत्र देणे ॥५॥

ऐसे उत्तर ऐकोनि कानी । कोप करिती श्रीगुरु मनि ।
जैसे तुमचे अंतःकरणी । तैसे सिद्धी पाववू म्हणती ॥६॥

सर्पाचे पेटारियासी । कोरू जाता मूषक कैसी ।
जैसा पतंग दीपासी । करी आपुला आत्मघात ॥७॥

तैसे विप्र मदोन्मत्त । श्रीगुरु न ओळखत ।
बळे आपुले प्राण देत । दिवांधवत्‍ द्विज देखा ॥८॥

इतुके वर्तता ते अवसरी । श्रीगुरु देखती नरासी दूरी ।
शिष्यासी म्हणती पाचारी । कवण जातो मार्गस्थ ॥९॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । गेले सेवक धावोनि ।
त्या नराते पाचारोनि । आणिला गुरुसन्मुख ॥१०॥

गुरु पुसती त्यासी । जन्म कवण जातीसी ।
तो वृत्तान्त सांग मजसी । म्हणोनि पुसती तये वेळी ॥११॥

श्रीगुरुवचन ऐकोन । सांगे आपण जातिहीन ।
मातंग नाम म्हणोन । स्थान आपुले बहिर्ग्रामी ॥१२॥

तू कृपाळू सर्वा भूती । म्हणोनि पाचारिले प्रीती ।
आपण झालो उद्धारगति । म्हणोनि दंडवत नमन करी ॥१३॥

ऐसे कृपाळू परमपुरुष । दृष्टि केली सुधारस ।
लोहासी लागता परिस । सुवर्ण होता काय वेळ ॥१४॥

तैसे तया पतितावरी । कृपा केली नरहरी ।
दंड देवोनि शिष्या करी । रेखा सप्त काढविल्या ॥१५॥

श्रीगुरु म्हणती पतितासी । एक रेखा लंघी रे ऐसी ।
आला नर वाक्यासरसी । आले ज्ञान आणिक तया ॥१६॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कवणे कुळी जन्मलासी ।
पतित म्हणे किरातवंशी । नाम आपुले वनराखा ॥१७॥

दुसरी रेका लंघिता । ज्ञान झाले मागुता ।
बोलू लागला अनेक वार्ता । विस्मय करिती तये वेळी ॥१८॥

तिसरी रेखा लंघी म्हणती । त्यासी झाली ज्ञातिस्मृति ।
म्हणे गंगापुत्र निश्चिती । वास तटी गंगेच्या ॥१९॥

लंघिता रेखा चवथी । म्हणे आपण शूद्रजाती ।
जात होतो आपुले वृत्ती । स्वामी माते पाचारिले ॥२०॥

लंघिता रेखा पांचवेसी । झाले ज्ञान आणिक तयासी ।
जन्म झाला वैश्यवंशी । नाम आपुले सोमदत्त ॥२१॥

सहावी रेखा लंघितां । म्हणे आपण क्षत्रिय ख्याता ।
नाम आपुले विख्याता । गोदावरी म्हणोनि ॥२२॥

सातवी रेखा लंघिताक्षण । अग्रजाती विप्र आपण ।
वेदशास्त्रादि व्याकरण । अध्यापक नाम आपुले ॥२३॥

श्रीगुरु म्हणती तयासी । वेदशास्त्री अभ्यास म्हणसी ।
आले विप्र चर्चेसी । वाद करी त्यांसवे ॥२४॥

अभिमंत्रोनी विभूति । त्याचे सर्वांगी । प्रोक्षिती ।
प्रकाशली ज्ञानज्योती । त्या नरा परियेसा ॥२५॥

जैसे मानससरोवरास । वायस जाता होती हंस ।
तैसा गुरुहस्तस्पर्श । पतित झाला ज्ञानराशी ॥२६॥

नरसिंहसरस्वती जगद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारु ।
अज्ञानी लोक म्हणती नरु । तेचि जाती अधःपाता ॥२७॥

येणेपरी पतितासी । ज्ञान झाले आसमासी ।
वेदशास्त्र सांगेसी । म्हणो लागला तये वेळी ॥२८॥

जे आले चर्चेस विप्र । भयचकित झाले फार ।
जिव्हा तुटोनि झाले बधिर । ह्रदयशूळ तात्काळी ॥२९॥

विप्र थरथरा कापती । श्रीगुरुचरणी लोळती ।
आमुची आता काय गति । जगज्ज्योती स्वामिया ॥३०॥

श्रीगुरुद्रोही झालो जाण । धिक्कारिले ब्राह्मण ।
तू अवतार गौरीरमण । क्षमा करणे स्वामिया ॥३१॥

वेष्टोनिया मायापाशी । झालो आपण महातामसी ।
नोळखो तुझ्या स्वरूपासी । क्षमा करणे स्वामिया ॥३२॥

तू कृपाळु सर्वा भूती । आमुचे दोष नाणी चित्ती ।
आम्हा द्यावी उद्धारगति । म्हणोनि चरणी लागती ॥३३॥

एखादे समयी लीलेसी । पर्वत करसी तृणासरसी ।
पर्वत पाहसी कोपेसी । भस्म होय निर्धारी ॥३४॥

तूचि सृष्टि स्थापिसी । तूचि सर्वांचे पोषण करिसी ।
तूचि कर्ता प्रळयासी । त्रिमूर्ति जगद्गुरु ॥३५॥

तुझा महिमा वर्णावयासी । मति नाही आम्हांसी ।
उद्धरावे दीनासी । शरणागता वरप्रदा ॥३६॥

ऐसे विप्र विनविती । श्रीगुरु त्यासी निरोप देती ।
तुम्ही क्षोभविला भारती । त्रिविक्रम महामुनि ॥३७॥

आणिक केले बहुत दोषी । निंदिले सर्व विप्रांसी ।
पावाल जन्म ब्रह्मराक्षसी । आपुली जोडी भोगावी ॥३८॥

आपुले आर्जव आपणापासी । भोगिजे पुण्यपापासी ।
निष्कृति न होता क्रियमाणासी । गति नाही परियेसा ॥३९॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । लागती विप्र दोघे चरणी ।
कधी उद्धरो भवार्णवी । म्हणोनिया विनविती ॥४०॥

श्रीगुरुनाथ कृपामूर्ति । त्या विप्रांते निरोप देती ।
ब्रह्मराक्षस व्हाल प्रख्याति । संवत्सर बारापर्यंत ॥४१॥

अनुतप्त झालिया कारण । शांतिरूप असाल जाण ।
जो का शुकनारायण । प्रथम वाक्य म्हणतसा ॥४२॥

तुमचे पाप शुद्ध होता । द्विज येईल पर्यटता ।
पुढील वाक्य तुम्हा सांगता । उद्धारगति होईल ॥४३॥

आता जावे गंगेसी । स्थान बरवे बैसावयासी ।
म्हणोनि निरोपिती त्यासी । गेले विप्र ते वेळी ॥४४॥

निघता ग्रामाबाहेरी । ह्रदयशूल अपरंपारी ।
जाता क्षण नदीतीरी । विप्र पंचत्व पावले ॥४५॥

आपण केल्या कर्मासी । प्रयत्‍न नाही आणिकासी ।
ऐसे विप्र तामसी । आत्मघातकी तेचि जाणा ॥४६॥

श्रीगुरुवचन येणेपरी । अन्यथा नव्हे निर्धारी ।
झाले राक्षस द्विजवरी । बारा वर्षी गति पावले ॥४७॥

विप्र पाठविले गंगेसी । मागे कथा वर्तली कैसी ।
नामधारक शिष्यासी । सिद्ध सांगे अवधारा ॥४८॥

पतित झाला महाज्ञानी । जातिस्मरण सप्तजन्मी ।
पूर्वापार विप्र म्हणोनि । निर्धार केला मनात ॥४९॥

नमन करूनि श्रीगुरूसी । विनवी पतित भक्तीसी ।
अज्ञानमाया तिमिरासी । ज्योतिरूप जगद्गुरु ॥५०॥

विप्र होतो पूर्वी आपण । केवी झालो जातिहीन ।
सांगावे जी विस्तारोन । त्रिकाळज्ञान अंतरसाक्षी ॥५१॥

जन्मांतरी आपण देख । पाप केले महादोष ।
की विरोधिले विनायक । नृसिंहसरस्वती सांग पा ॥५२॥

ऐसे वचन ऐकोनि । सांगती गुरु प्रकाशूनि ।
म्हणोनि सांगती सिद्धमुनि । नामधारक शिष्यासी ॥५३॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
पुढील कथा ऐकता नर । पतित होय ब्रह्मज्ञानी ॥५४॥

ऐसी पुण्यपावन कथा । ऐकता उद्धार अनाथा ।
पावे चतुर्विध पुरुषार्था । निश्चयेसी जाण पा ॥५५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मदोन्मत्तविप्रशापकथनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥२७॥

॥ओवीसंख्या ॥५५॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरुचरित्र – अध्याय अठ्ठाविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांग आम्हांसी ।
उल्हास माझे मानसी । गुरुचरित्र अतिगोड ॥१॥

सिद्ध म्हणे नामधारका । कथा असे अतिविशेष ।
ऐकता जाती सर्व दोष । ज्ञानज्योतिप्रकाशे ॥२॥

श्रीगुरु म्हणती पतितासी । आपुले पूर्वजन्म पुससी ।
सांगेन ऐक परियेसी । चांडालजन्म होणार गति ॥३॥

पुण्यपापांची गति । आपुले आर्जव भोगिती ।
कर्मविपाकी असे ख्याति । नीचश्रेष्ठकर्मानुसारी ॥४॥

विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण । यांचेपासाव चांडाल वर्ण ।
उपजला असता ज्ञातिहीन । जातिविभाग कर्मापरी ॥५॥

विप्रस्त्रियेपासी देखा । शूद्र जाय व्यभिचारिका ।
पिंड उपजे तो चांडालिका । सोळावी जाती चांडाल ॥६॥

हे मूळ उत्पत्तीचे लक्षण । नाना दोषांचे आचरण ।
तेणे हीन जन्म घेणे । विप्रादि चारी वर्णांसी ॥७॥

या दोषाचा विस्तार । सांगतो की सविस्तर ।
विप्रे करिता अनाचा । जन्म हीनजाती पावे ॥८॥

गुरु अथवा मातापिता । सांडोनि जाय तत्त्वतां ।
चांडालजन्म होय निरुता । सोडिता कुलस्त्रियेसी ॥९॥

कुलदेवता सोडोनि एका । पूजा करी आणिका ।
तो होय चांडाल देखा । सदा अनृत बोले नर ॥१०॥

सदा जीवहिंसा करी । कन्याविक्रय मनोहरी ।
लटिकेचि आपण प्रमाण करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥११॥

शूद्रहस्ते करी भोजन । अश्वविक्रय करी ब्राह्मण ।
तोही चांडाल होय जाण । सदा शूद्रसंपर्कै ॥१२॥

शूद्रस्त्रीसी सदा संग । नित्य असे दासीयोग ।
गृहभांड अतळती त्याग । तेणे देवपितृकर्मे करी ॥१३॥

तोही पावे हीनयोनी । जो का अग्नि-घाली रानी ।
गायवासरांसी विघडोनि । वेगळी करी तोही । होय चांडाल ॥१४॥

सोडी आपुल्या जननीते । आणि मारी लेकराते ।
वेगळी करी आपुल्या सत्ते । तोही जन्मे चांडाल ॥१५॥

बैलावरी विप्र बैसे । शूद्रान्न जेवी हर्षे ।
चांडाल होय भरवसे । ऐसे म्हणती श्रीगुरु ॥१६॥

विप्र तीर्थास जावोन । श्राद्धादि न करी जाण ।
परान्न प्रतिग्रह घेणे । तो होय चांडाल ॥१७॥

षट्‍कर्मेरहित विप्र देखा । कपिला गाईचे दुग्ध ऐका ।
न करिता अभिषेका । क्षीरपान जो करी ॥१८॥

तोही पावे चांडालयोनी । तुळसीपत्रे ओरपोनि ।
पूजा करी देवांलागोनि । शालिग्राम शूद्रे भजलिया ॥१९॥

न सेवीच मातापिता । त्यजी त्यासी न प्रतिपाळिता ।
चांडाल होय जन्मता । सप्तजन्मी कृमि होय ॥२०॥

पहिली एक स्त्री असता । दुजी करोनि तिसी त्यजिता ।
होय जन्म त्यासी पतिता । आणिक सांगेन एक नवल ॥२१॥

श्रमोनि अतिथी आला असता । वेद म्हणवोनि अन्न घालिता ।
जन्म पावे हा तत्त्वता । चांडालयोनी परियेसा ॥२२॥

योग्य विप्रांते निंदिती । आणिक जाती पूजिती ।
चांडालयोनी जाती । वृत्तिलोप केलिया ॥२३॥

तळी विहिरी फोडी मोडी । शिवालयी पूजा तोडी ।
ब्राह्मणांची घरे मोडी । तोही जन्मे पतितकुळी ॥२४॥

स्वामिस्त्रियेसी । शत्रुमित्रविश्वासस्त्रीसी ।
जो करी व्याभिचारासी । तोही जन्मे पतितागृही ॥२५॥

दोघी स्त्रिया जयासी । त्यात ठेवी प्रपंचेसी ।
अतिथि आलिया अस्तमानासी । ग्रास न दे तोही पतित होय ॥२६॥

त्रिसंध्यासमयी देखा । जो विप्र जेवी अविवेका ।
भाक देउनी फिरे निका । तो जन्मे चांडालयोनी ॥२७॥

राजे देती भूमिदान । आपण घेती हिरोन ।
संध्याकाली करी शयन । तोही होय चांडाल ॥२८॥

वैश्वदेवकालि अतिथीसी । जो करी दुष्टोत्तरेसी ।
अन्न न देई तयासी । कुक्कुटजन्म होवोनि उपजे ॥२९॥

गंगातीर्थांची निंदा करी । एकादशी भोजन करी ।
स्वामीस सोडी समरी । चांडालयोनी तया जन्म ॥३०॥

स्त्री संभोगी पर्वणीसी । अथवा हरिहरादिवशी ।
वेद शिकवी शूद्रासी । चांडालयोनी जन्म पावे ॥३१॥

मृत्युदिवसी न करी श्राद्ध । केले पुण्य सांगे प्रसिद्ध ।
वाटेकरांसी करी भेद । चांडालयोनी जन्म पावे ॥३२॥

ग्रीष्मकाली अरण्यात । पोई घालिती ज्ञानवंत ।
तेथे विघ्न जो करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥३३॥

नाडीभेद न कळता वैद्यकी । जाणोनि औषधे दे आणिकी ।
तो होय महापातकी । चांडालयोनीत संभवे ॥३४॥

जारण मारण मोहनादि । मंत्र जपती कुबुद्धि ।
जन्म चांडाल होय त्रिशुद्धी । वेदमार्ग त्यजिता विप्रे ॥३५॥

श्रीगुरुसी नर म्हणे कोण । हरिहराते निंदे जाण ।
अन्य देवतांचे करी पूजन । तो नर पतित होय ॥३६॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । आपुले कर्म त्यजूनि मंद ।
आणिक कर्म आचरे सदा । तोही होय चांडाल ॥३७॥

शूद्रापासूनी मंत्र शिके । त्यासी घडती सर्व पातके ।
गंगोदक क्षीरोदके । श्वानचर्मी घातले परी ॥३८॥

विधवा स्त्रीशी संग करी । शिव्या देऊन अतिथि जेववी घरी ।
श्राद्धदिनी पिंड न करी । चांडालयोनी तो जन्मे ॥३९॥

माता पिता गुरु द्वेषी । तो जन्मे चांडालयोनीसी ।
आणिक जन्म पापवंशी । उपजोनि येती परियेसा ॥४०॥

गुरूची निंदा करी हर्षी । सदा असे विप्रद्वेषी ।
वेदचर्चा करी बहुवशी । तो होय ब्रह्मराक्षस ॥४१॥

भजे आपण एक दैवत । दुजे देव निंदा करीत ।
तो होय अपस्मारित । दरिद्ररूपे पीडतसे ॥४२॥

माता पिता गुरु वर्जोन । वेगळा होय स्त्री आपण ।
बेरडाचे पोटी उपजोन । रोगी होऊन राहतसे ॥४३॥

सदा वेद दूषी आपण । अवमानीत ब्राह्मण ।
कर्मभ्रष्ट होय आपण । मूत्रकृच्छ्ररोगी होय ॥४४॥

लोकांचे वर्मकर्म आपण । सदा करी उच्चारण ।
ह्रदयरोगी होय जाण । महाकष्ट भोगीतसे ॥४५॥

गर्भपात करी स्त्रियेसी । वांझ होवोनि उपजे परियेसी ।
पुत्र झालिया मरती त्वरेसी । गर्भपात करू नये ॥४६॥

धर्मशास्त्रादि पुराण । सांगता नायके जाण ।
आणिक जेविता दृष्टि आपण । बहिरट होवोनि उपजे ॥४७॥

पतितासवे करी इष्टती । गर्दभजन्म पावती ।
त्यासी रस औषध घेती । मृगयोनी जन्मे तो ॥४८॥

ब्रह्महत्या केली जरी । क्षयरोगी होय निर्धारी ।
सुरापानी ओळखा परी । श्यामदंत उपजेल ॥४९॥

अश्ववध गोवध करिता । वांझ ज्वरी होय निश्चिता ।
सवेचि होय अनुतप्तता । दोष काही नाही त्यासी ॥५०॥

विश्वासघातकी नरासी । जन्म होय ऐसा त्यासी ।
अन्न जेविता वांति उर्वशी । अन्नवैरी तो होय ॥५१॥

सेवक एकाचा चाळवोन । घेवोनि जाती जे जन ।
त्यासी होय जाण बंधन । कारागृह भोगीतसे ॥५२॥

सर्पजाती मारी नर । सर्पयोनी पुढे निर्धार ।
ऐसे दोष अपार । आता तस्कर प्रकरण सांगेन ॥५३॥

स्त्रियांते चोरूनि घेऊनि जाय । मतिहीन जन्म होय ।
सदा क्लेशी आपण होय । अंती जाय नरकासी ॥५४॥

सुवर्णचोरी करी नर । प्रमेहव्याधि होय निर्धार ।
पुस्तक चोरिता नर । अंध होउनि उपजे देखा ॥५५॥

वेस्त्रचोरी करी जरी । श्वित्री रोगी होय निर्धारी ।
गणद्रव्यचोरी घरी । ब्रह्मांडपुराणी बोलिले असे ॥५७॥

परद्रव्य-अपहार देखा । परदत्तापहार विशेषा ।
परद्वेषी नर ऐका । धान्य अपुत्री होउनि उपजे ॥५८॥

अन्नचोरी केलिया देखा । गुल्मव्याधि होय ऐका ।
धान्य करील तस्करिका । रक्तांग होय दुर्गंध शरीर ॥५९॥

का एखादा तैल चोरी । तोही दुर्गंधी पावे शरीरी ।
परस्त्रीब्रह्मस्व अपहारी । ब्रह्मराक्षसजन्म पावे ॥६०॥

मोती माणिक रत्‍ने देखा । चोरी करी नर ऐका ।
हीनजातीसी जन्म निका । पावे नर अवधारा ॥६१॥

पत्रशाखादि फळे चोरी । खरूजी होय अपरंपारी ।
रक्तांगी होय निर्धारी । गोचिड होय तो नर ॥६२॥

कांस्य लोह कर्पास लवण । तस्करिता नरा जाण ।
श्वेतकुष्ठ होय निर्गुण । विचारोनि रहाटावे ॥६३॥

देवद्रव्यापहारी देखा । देवकार्यनाश अपहार देखा ।
पंडुरोगी तो निका । फळचोरी विद्रूपी ॥६४॥

परनिक्षेपचोरी करी देखा । करिता होय सदा शोका ।
धनतस्कर उंष्ट्र ऐका । जन्म पावे अवधारा ॥६५॥

फलचोरी होय वनचर । जलचोरही होय कावळा थोर ।
गृहोपकरणे तस्कर । काकजन्म तो पावे ॥६६॥

मधुतस्कर अवधारी । जन्म पावे होय घारी ।
गोरस करी चोरी । कुष्ठी होय परियेसा ॥६७॥

श्रीगुरु म्हणती पतितासी । जन्म पावे ऐसिया दोषी ।
आता सांगेन व्यभिचारप्रकरणेसी । शांतिपर्वी बोलिले असे ॥६८॥

परस्त्री आलिंगिया देखा । शतजन्म श्वान निका ।
पुढे मागुती सप्तजन्मिका । भोगी दुःखा अवधारा ॥६९॥

परस्त्रीयोनी पाहे दृष्टीने । जन्मे तो अंधत्वपणे ।
बंधुभार्यासंपर्क करणे । गर्दभजन्म तो पावे ॥७०॥

तोही जन्म सोडोनि । निघोनि जाय सर्पयोनी ।
पुन्हा नरकी जावोनि । नाना कष्ट भोगीतसे ॥७१॥

सखीभार्यासवे ऐका । मातुलस्त्री असे विशेखा ।
येखादा करी संपर्का । श्वानयोनी जन्म पावे ॥७२॥

परस्त्रियांचे वदन । न करावे कदा अवलोकन ।
कुबुद्धी करिता निरीक्षण । चक्षुरोगी होऊनि उपजे ॥७३॥

आपण असे शूद्रजाति । विप्रस्त्रीशी करी रति ।
ती दोघेही कृमि होती । हे निश्चित अवधारा ॥७४॥

सदा शूद्रसंपर्क करी । याची स्त्री व्यभिचारी ।
जन्म पावे हो कुतरी । महादोष बोलिलासे ॥७५॥

ऐसे तया पतिताप्रती । श्रीगुरु आपण निरोपिती ।
ऐकत होता त्रिविक्रमभारती । प्रश्न केला श्रीगुरूसी ॥७६॥

स्वामी निरोपिले धर्म सकळ । ऐकता होय मन निर्मळ ।
जरी घडले एक वेळ । पाप जाय कवणेपरी ॥७७॥

श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । प्रायश्चित्त असे पापासी ।
पश्चात्ताप होय ज्यासी । पाप नाही सर्वथा ॥७८॥

पाप असे थोर केले । अंतःकरणी असे खोचले ।
त्यासी प्रायश्चित्त भले । कर्मविपाकी बोलिले ॥७९॥

प्रायश्चित्तांची विधाने । सांगेन ऐका स्थिर मने ।
अनेक ऋषींची वचने । ती सांगेन ऐका तुम्ही ॥८०॥

प्रथम व्हावा ब्रह्मदंड । तेणे होय पापखंड ।
गोदाने सालंकृत अखंड । अशक्त तरी द्रव्य द्यावे ॥८१॥

निष्क अथवा अर्धनिष्क । सूक्ष्म पाप पाव निष्क ।
स्थूलसूक्ष्म असेल पातक । तेणे विधीं द्रव्य द्यावे ॥८२॥

अज्ञानकृत पापासी । पश्चात्तापे शुद्धि परियेसी ।
गुरुसेवा तत्परेसी । केलिया गुरु निवारी ॥८३॥

नेणता पाप केलियासी । प्रायश्चित्त असे परियेसी ।
प्राणायाम द्विशतेसी । पुण्यतीर्थी दहा स्नाने ॥८४॥

तीन गुंजा सुवर्ण द्यावे । नदी आचरावे दोन गावे ।
सौम्य पातक याचि भावे । जाती पापे परियेसी ॥८५॥

स्त्रीपुरुष दोघांत एक । करिती पुण्यपाप दोष ।
दोघेही पडती दोषात । दोघे आचरावे प्रायश्चित्त ॥८६॥

आणिक एक असे प्रकार । जेणे पाप होय दूर ।
गायत्रीजप दहा सहस्त्र । करावा तेणे वेदमंत्र ॥८७॥

याचे नाव गायत्रीकृच्छ । महादोषी करी पवित्र ।
ऐसे करावे विचित्र । श्रीगुरु सांगती त्रिविक्रमासी ॥८८॥

प्राजापत्यकृच्छ्र देखा । असे विधि अतिविशेषा ।
भोजन करावे मुक्त एका । अथवा अयाचित भिक्षा ॥८९॥

उपवास करावे तीन दिवस । स्मरावे गुरुचरणास ।
येणे जाती सौम्य दोष । जे आपणासी सामान्य ॥९०॥

’अतिकच्छ्र’ असे एक । एकचित्ते मुनि ऐक ।
दोष असतील सामान्यक । अज्ञानेचि केलिया ॥९१॥

अन्न घ्यावे सप्तविंशति ग्रास । सकाळी बारा रात्री पंचदश ।
अथवा दोनी अष्ट ग्रास । अयाचित अन्न द्यावे ॥९२॥

ऐसे सौम्य पातकासी । विधि असती परियेसी ।
मास एक नेमेसी । अंजुली एक जेवावे ॥९३॥

उपवास तीन करावे देखा । प्रकार सांगेन आणिका ।
तीन दिन उपोषका । घृतपारणे करावे ॥९४॥

तीन दिवस घृत घेवोनि । क्षीर घ्यावे दिवस तीनी ।
तीन दिवस वायु भक्षोनि । पुनः क्षीर एक दिवस ॥९५॥

एखादा असेल अशक्त । तयासी असे एक व्रत ।
तीळ गुळ लाह्या पीठ । उपवास एक करावा ॥९६॥

पूर्णकृच्छ्र करा ऐसी । पर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी ।
करावे तितके उपवासी । पश्चात्तापे प्राशन कीजे ॥९७॥

कमल बिल्व अश्वत्थ । कुशोदक बिंदु नित्य ।
पान करावे सत्य । पर्णकृच्छ्र परियेसा ॥९८॥

आणिक एक प्रकार । करी चांद्रायण-आचार ।
कुक्कुटांडप्रमाण आहार । ग्रास घ्यावे वर्धमानी ॥९९॥

अमावास्येसी एक ग्रास । पौर्णिमेसी पंचदश ।
कृष्णपक्षी उतरत । दुसरे मासी हविष्यान्न ॥१००॥

आपले पाप प्रगटूनि । उच्चारावे सभास्थानी ।
पश्चात्तापे जळूनि । पाप जाय अवधारा ॥१॥

आता सांगेन तीर्थकृच्छ्र । यात्रा करावी पवित्र ।
वाराणसी श्वेतपर्वत । स्नानमात्रे पापे जाती ॥२॥

वरकड तीर्थी गेलियासी । गायत्रीजप सहस्त्रेसी ।
पाप जाय त्वरेसी । अगस्तीवचन बोलिले असे ॥३॥

समुद्रसेतुबंधेसी । स्नान केलिया परियेसी ।
भ्रूणहत्यापाप नाशी । कृतघ्नादि पातके ॥४॥

विधिपूर्वक शुचीसी । जप कोटी गायत्रीसी ।
ब्रह्महत्यापाप नाशी । ऐके त्रिविक्रम एकचित्ते ॥५॥

लक्ष गायत्री जप केलिया । सुरापानपाप जाय लया ।
सुवर्णचोरी केलिया । सात लक्ष जपावे ॥६॥

अष्ट लक्ष गुरुतल्पगासी । गायत्री जपता पाप नाशी ।
आता सांगेन परियेसी । वेदाक्षरे पाप दूर ॥७॥

पवमानसूक्त चत्वारी । पठण करिता ब्रह्महत्या दूरी ।
इंद्रमित्र अवधारी । एक मास जपावे ॥८॥

सुरापानादि पातके । जातील येणे सूक्तके ।
शुनःशेपा नाम सूक्ते । सुवर्णहरा पाप जाय ॥९॥

पवमानशन्नसूक्त । पठण करिता हविष्योक्त ।
मास एक पठत । गुरुतल्पगादिक हरती ॥११०॥

पंच मास सहा मास । मिताहर करुनी पुरुष ।
पुरुषसूक्ते कर्मनाश । पंचमहापापे नासती ॥११॥

त्रिमधु म्हणेजे मंत्रसूक्त । सुवर्णात्रीनास मंत्र ।
जपावे नाचिकेत । समस्त पातके प्रायश्चित्त ॥१२॥

नारायणपन्न देखा । जपावे भक्तिपूर्वका ।
नाशी पंच महापातका । प्रीतिपूर्वक जपावे ॥१३॥

त्रिपदा नाम गायत्रीसी । जपती जे भक्तीसी ।
अघमर्षण त्रिरावृत्तेसी । सप्त जन्म पाप जाय ॥१४॥

अपांमध्य पन्नासी । तद्विष्णो नाम सूक्तेसी ।
जपती जे जन भक्तीसी । सप्त जन्म पाप जाय ॥१५॥

आणिक असे विधान देखा । अज्ञानकृत दोषादिका ।
अनुतप्त होवोनि विशेषा । पंचगव्य प्राशन कीजे ॥१६॥

गोमूत्र गोमय क्षीर । दधि घृत कुशसार ।
विधिमंत्रे घ्यावे निर्धार । पहिले दिनी उपवास ॥१७॥

नीलवर्ण गोमूत्र । कृष्णगोमय पवित्र ।
ताम्र गायत्रीचे क्षीर । श्वेतधेनूचे दधि घ्यावे ॥१८॥

कपिला गाईचे तूप बरवे । ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे ।
एकेकाचे क्लप्त भावे । सांगेन सर्व अवधारा ॥१९॥

गोमूत्र घ्यावे पावशेर। अंगुष्ठपर्व गोमय पवित्र ।
क्षीर पावणे दोन शेर । दधि तीन पाव घ्यावे ॥१२०॥

घृत घ्यावे पाव शेर । तितुकेचि मिळवावे कुशनीर ।
घेता मंत्र उच्चार । विस्तारोनि सांगेन ॥२१॥

कुशांसहित सहा रसे । एकेकासी मंत्र पृथक्‍ असे ।
प्रथम मंत्र इरावती असे । इदं विष्णु दुजा देख ॥२२॥

मानस्तोक मंत्र तिसरा । प्रजापति चतुर्थ अवधारा ।
पंचम गायत्री उच्चारा । सहावी व्याह्रति प्रणवपूर्वका ॥२३॥

ऐसे मंत्रोनि पंचगव्य । प्यावे अनुतप्त एकभाव ।
अस्थिगत चर्मगत पूर्व । पापे जाती अवधारा ॥२४॥

गाई न मिळता इतुके जिन्नसी । कपिला गाय मुख्य परियेसी ।
दर्शनमात्रे दोष नाशी । कपिला गाई उत्तम ॥२५॥

पंचमहापातक नावे । ब्रह्महत्या सुरापान जाणावे ।
स्वर्णस्तेय गुरुतल्पग जाणावे । पाचवा त्यासवे मिळालेला ॥२६॥

चौघे पातकी देखा । पाचवा तया मिळता देखा ।
त्यासहित पंचमहापातका । आहेती पापे परियेसा ॥२७॥

सुरापानी ब्रह्मघातकी । सुवर्णस्तेय गुरुतल्पकी ।
पाचवा महाघातकी । जो सानुकूळ मिळे तो ॥२८॥

ऐसे पातक घडे त्यासी । प्रायश्चित्त परियेसी ।
श्रीगुरुसंतोषी । अनुग्रहे पुनीत ॥२९॥

एखादा मिळेल शास्त्रज्ञ । स्वधर्माचारे अभिज्ञ ।
त्याच्या अनुग्रहे पापघ्न । पुनीत होय अवधारा ॥१३०॥

ऐसे श्रीगुरु त्रिक्रमासी । प्रायश्चित्त सांगती परियेसी ।
सकल विप्र संतोषी । ज्ञानप्रकाशे होती ॥३१॥

श्रीगुरु म्हणती पतितासी । पूर्वी तू विप्र होतासी ।
माता पिता गुरु दूषी । तेणे होय चांडालजन्म ॥३२॥

आता सांगतो ऐक । स्नानसंगमी मास एक ।
केलिया दोष जाती निःशंक । पुनः विप्रजन्म होसी ॥३३॥

पतित म्हणे स्वामीसी । तव दर्शन जाहले आम्हांसी ।
कावळा जाता मानसासी । राजहंस तो होतसे ॥३४॥

तैस तव दर्शनमात्रे । पवित्र झाली सकळ गात्रे ।
तारावे आता त्वा कृपापात्रे । शरणागतासी ॥३५॥

परिस लागता लोखंडासी । सुवर्ण होय तत्क्षणेसी ।
सुवर्ण मागुती लोहासी । केवी मिळे स्वामिया ॥३६॥

तव दर्शनसुधारसी । आपण झालो ज्ञानराशी ।
अभिमंत्रोनि आम्हांसी । विप्रांमध्ये मिळवावे ॥३७॥

ऐकोनि तयाचे वचन । गुरु बोलती हासोन ।
तव देह जातिहीन । विप्र केवी म्हणतील ॥३८॥

पतिताच्या गृहासी । उपजोनि तू वाढलासी ।
ब्रह्मत्व केवी पावसी । विप्र निंदा करितील ॥३९॥

पूर्वी ऐसा विश्वामित्र । क्षत्रियवंशी गाधिपुत्र ।
तपोबळे म्हणवी पवित्र । म्हणे तो विप्र आपणा ॥१४०॥

ब्रह्मयाची शत वर्षे । तप केले महाक्लेशे ।
त्याचे बळे म्हणवीतसे । ब्रह्मऋषी आपणा ॥४१॥

इंद्रादि सुरवरांसी । विनविता झाला परियेसी ।
आपणाते ब्रह्मर्षि । म्हणा ऐसे बोलतसे ॥४२॥

देव म्हणती तयासी । आम्हा गुरु वसिष्ठ ऋषि ।
जरी तो बोले ब्रह्मऋषि । तरी आम्ही अंगिकारू ॥४३॥

मग त्या वसिष्ठासी । विनवी विश्वामित्र ऋषि ।
विप्र म्हणा आपणासी । केले तप बहुकाळ ॥४४॥

वसिष्ठ म्हणे विश्वामित्र । क्षत्रिय तपास अपात्र ।
देह टाकोनि मग पवित्र । विप्रकुळी जन्मावे ॥४५॥

मग तुझा होईल व्रतबंध । होईल गायत्रीप्रबोध ।
तधी तुवा होसी शुद्ध । ब्रह्मऋषि नाम तुझे ॥४६॥

काही केल्या न म्हणे विप्र । मग कोपला विश्वामित्र ।
वसिष्ठाचे शत पुत्र । मारिता झाला तये वेळी ॥४७॥

ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषि । नव्हे कदा तामसी ।
अथवा न म्हणे ब्रह्मऋषि । तया विश्वामित्रासी ॥४८॥

वर्तता ऐसे एके दिवसी । विश्वामित्र कोपेसी ।
हाती घेउनी पर्वतासी । घालू आला वसिष्ठावरी ॥४९॥

विचार करीत मागुती मनी । जरी वधीन वसिष्ठमुनि ।
आपणाते न म्हणे कोणी । ब्रह्मऋषि म्हणोनिया ॥१५०॥

इंद्रादि देव समस्त ऋषि । म्हणती वसिष्ठवाक्यासरसी ।
आपण म्हणो ब्रह्मऋषि । अन्यथा नाही म्हणोनिया ॥५१॥

ऐशा वसिष्ठमुनीस । मारिता यासी फार दोष ।
म्हणोनि टाकी गिरिवरास । भूमीवरी परियेसा ॥५२॥

अनुतप्त झाला अंतःकरणी । वसिष्ठे ते ओळखूनि ।
ब्रह्मऋषि म्हणोनि । पाचारिले तये वेळी ॥५३॥

संतोषोनि विश्वामित्र । म्हणे बोल बोलिला पवित्र ।
म्हणे घरी अन्नमात्र । तुम्ही घ्यावे स्वामिया ॥५४॥

संतोषोनि वसिष्ठ । तयालागी बोलत ।
म्हणे शरीर हे निभ्रांत । सूर्यकिरणी पचवावे ॥५५॥

विश्वामित्रे अंगिकारिले । सूर्यकिरणे देहा जाळिले ।
सहस्त्रकिरणी तापले । देह सर्व भस्म झाला ॥५६॥

विश्वामित्र महामुनि । अतिसामर्थ्य अनुष्ठानी ।
पहिला देह जाळोनि । नूतन देह धरियेला ॥५७॥

ब्रह्मर्षि तेथोन । विश्वामित्र झाला जाण ।
सकळांसी मान्य । महाराज ॥५८॥

मग म्हणती सकळ मुनि । विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ।
ब्रह्मऋषी म्हणोनि । झाला त्रिभुवनी प्रख्यात ॥५९॥

या कारणे तव देह । विसर्जावा जन्म इह ।
अनुतप्त तव भाव । ब्रह्मकुल भाविसी ॥१६०॥

ऐसे त्या पतितासी । बोधिता गुरु परियेसी ।
लाधले सुख त्यासी । त्याच्या मानसी न ये काही ॥६१॥

निधान सापडे दरिद्र्यासी । तो का सांडील संतोषी ।
अमृत सापडता रोग्यासी । का सांडील जीवित्व ॥६२॥

एखादे ढोर उपवासी । पावे तृणबिढारासी ।
तेथोनि जावया त्यासी । मन नव्हे सर्वथा ॥६३॥

तैसे त्या पतितासी । लागले ध्यान गुरूसी ।
न जाय आपुल्या मंदिरासी । विप्र आपणा म्हणतसे ॥६४॥

इतुके होता ते अवसरी । आली त्यांची पुत्रनारी ।
म्हणो लागले अपस्मारी । म्हणोनि आलो धावत ॥६५॥

जवळ येता स्त्रियेसी । स्पर्शो नको म्हणे तिसी ।
कोपेकरोनि मारावयासी । जात असे तो पतित ॥६६॥

दुःख करी ती भार्या । दुरुनी नमे गुरुपाया ।
पति माते सोडोनिया । जातो आता काय करू ॥६७॥

कन्या पुत्र मज बहुत । तया कोण पाळित ।
आम्हा सांडोनि जातो किमर्थ । सांगा तयासी स्वामिया ॥६८॥

जरी न सांगाल स्वामी त्यासी । त्यजीन प्राण पुत्रासरसी ।
येरवी आपणाते कोण पोषी । अनाथ मी स्वामिया ॥६९॥

ऐकोनि तियेचे वचन । गुरु बोलती हासोन ।
त्या नराते बोलावून । सांगताती परियेसा ॥१७०॥

गुरु म्हणती पतितासी । जावे आपुल्या घरासी ।
पुत्रकलश क्षोभता दोषी । तूते केवी गति होय ॥७१॥

या संसारी जन्मोनिया । संतोषवावे इंद्रिया ।
मग पावे धर्मकाया । तरीच तरे भवार्णव ॥७२॥

या कारणे पूर्वीच जाणा । न करावी आपण अंगना ।
करोनि तिसी त्यजिता जाणा । महादोष बोलिजे ॥७३॥

सूर्य-भूमी-साक्षीसी । तुवा वरिले स्त्रियेसी ।
तीस त्यागिता महादोषी । तूते नव्हे गति जाण ॥७४॥

श्रीगुरुवचन ऐकोन । विनवीतसे कर जोडून ।
केवी होऊ जातिहीन । ज्ञान होवोनि मागुती ॥७५॥

श्रीगुरु मनी विचारिती । याचे अंगी असे विभूति ।
प्रक्षाळावे लुब्धका-हाती । अज्ञानत्व पावेल ॥७६॥

ऐसे मनी विचारूनि । सांगती शिष्यासी बोलावोनि ।
एका लुब्धका पाचारोनि । आणा अतित्वरेसी ॥७७॥

तया ग्रामी द्विज एक । करी उदीम वाणिक ।
तयाते पाचारिती ऐक । तया पतितासन्निध ॥७८॥

श्रीगुरु म्हणती त्यासी । उदक घेवोनि हस्तेसी ।
स्नपन करी गा पतितासी । होय आसक्त संसारी ॥७९॥

आज्ञा होता ब्राह्मण । आला उदक घेऊन ।
त्यावरी घालिता तत्‌क्षण । गेली विभूति धुवोनि ॥८०॥

विभूति धूता पतिताचे । झाले अज्ञान मन त्याचे ।
मुख पाहता स्त्री-पुत्रांचे । धावत गेला त्याजवळी ॥८१॥

आलिंगोनिया पुत्रासी । भ्रांति म्हणे त्यासी ।
का आलो या स्थळासी । तुम्ही आला कवण कार्या ॥८२॥

ऐसा मनी विस्मय करीत । निघोनि घरा गेला पतित ।
सांगितला वृत्तान्त । विस्मय सर्व करिताती ॥८३॥

इतुके झाले कौतुक । पहाती नगरलोक ।
विस्मय करिती सकळिक । म्हणती अभिनव काय झाले ॥८४॥

त्रिविक्रमभारती मुनि । जो का होता गुरुसन्निधानी ।
पुसतसे विनवोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥८५॥

त्रिविक्रम म्हणे श्रीगुरूसी । होतो संदेह मानसी ।
निरोप द्यावा कृपेसी । विनंती एक अवधारा ॥८६॥

महापतित जातिहीन जाण । तयाते दिधले दिव्यज्ञान ।
अंग धुता तत्‌क्षण । गेले ज्ञान केवी त्याचे ॥८७॥

विस्तारोनि आम्हांसी । निरोपावे कृपेसी ।
म्हणोनि लागला चरणांसी । भावभक्ति करोनिया ॥८८॥

ऐसे पुत्र त्रिविक्रम यति । श्रीगुरु तया निरोपिती ।
त्याचे अंगाची विभूति । धुता गेले ज्ञान त्याचे ॥८९॥

ऐसे विभूतीचे महिमान । माहात्म्य असे पावन ।
सांच होय ब्रह्म पूर्ण । भस्ममहिमा अपार ॥१९०॥

गुरुवचन ऐकोनि । विनवीतसे त्रिविक्रम मुनि ।
देव गुरुशिरोमणि । भस्ममहिमा निरोपावा ॥९१॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । भस्ममहिमा परियेसी ।
गुरु सांगता विस्तारेसी । एकचित्ते अवधारा ॥९२॥

म्हणोनि सरस्वतिगंगाधर । गुरुचरित्रविस्तार ।
ऐकता होय मनोहर । सकळाभीष्टे साधती ॥९३॥

पुढील कथा पावन । सांगे सिद्ध विस्तारोन ।
महाराष्ट्रभाषेकरून । सांगे सरस्वती गुरुदास ॥९४॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कर्मविपाककथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥२८॥

॥ ओवीसंख्या ॥१९५॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥






गुरूचरित्र – अध्याय एकोणतिसावा

। श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

नामधारक विनवी सिद्धासी । मागे कथा निरोपिलीसी ।
भस्ममाहात्म्य श्रीगुरूसी । पुसिले त्रिविक्रमभारतीने ॥१॥

पुढे कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्री ।
निरोप द्यावा सविस्तारी । सिद्धमुनि कृपासिंधु ॥२॥

ऐसे विनवी शिष्य राणा । ऐकोनि सिद्ध प्रसन्नवदना ।
सांगतसे विस्तारून । भस्ममाहात्म्य परियेसा ॥३॥

श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । भस्ममाहात्म्य मज पुससी ।
एकचित करूनि मानसी । सावधान ऐक पा ॥४॥

पूर्वापरी कृतयुगी । वामदेव म्हणिजे योगी ।
प्रसिद्ध गुरु तो जगी । वर्तत होता भूमीवरी ॥५॥

शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी । गृह-सारादि वर्जूनि ।
कामक्रोधादि त्यजूनि । हिंडत होता महीवरी ॥६॥

संतुष्ट निःस्पृह असे मौनी । भस्म सर्वांगी लावोनि ।
जटाधारी असे मुनि । वल्कल-वस्त्र व्याघ्राजिन ॥७॥

ऐसा मुनि भूमंडळात । नाना क्षेत्री असे हिंडत ।
पातला क्रौचारण्यात । जेथे नसे संचार मनुश्यमात्राचा ॥८॥

तया स्थानी असे एक । ब्रह्मराक्षस भयानक ।
मनुष्यादि जीव अनेक । भक्षीतसे परियेसा ॥९॥

ऐशा अघोर वनात । वामदेव गेला हिंडत ।
ब्रह्मराक्षस अवलोकित । आला घावोनि भक्षावया ॥१०॥

ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत । आला असे भक्षू म्हणत ।
करकरा दात खात । मुख पसरूनि जवळी आला ॥११॥

राक्षस येता देखोनि । वामदेव निःशंक धीर मनी ।
उभा असे महाज्ञानी । पातला राक्षस तयाजवळी ॥१२॥

राक्षस मनी संतोषत । ग्रास बरवा लाधला म्हणत ।
भक्षावया कांक्षा बहुत । येवोनि धरिला आलिंगोनि ॥१३॥

आलिंगिता मुनीश्वरासी । भस्म लागले राक्षसासी ।
जाहले ज्ञान तयासी । जातिस्मरण जन्मांतरीचे ॥१४॥

पातक गेले जळोनि । राक्षस झाला महाज्ञानी ।
जैसा लागता चिंतामणि । लोह सुवर्ण केवी होय ॥१५॥

जैसा मानससरोवरास । वायस जाता होय हंस ।
अमृत पाजिता मनुष्यास । देवत्व होय परियेसा ॥१६॥

जैसे का जंबूनदीत । घालिता मृत्तिका कांचन त्वरित ।
तैसा जाहला पापी पुनीत । मुनीश्वराचे अंगस्पर्श ॥१७॥

समस्त मिळती कामना । दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन ।
स्पर्श होता श्रीगुरुचरण । पापावेगळा होय नर ॥१८॥

ब्रह्मराक्षस भयानक । काय सांगो त्याची भूक ।
गजतुरग मनुष्यादिक । नित्य आहार करी सकळ ॥१९॥

इतुए भक्षिता तयासी । न वचे भूक परियेसी ।
तृषाक्रांत समुद्रासी । प्राशन करिता न वचे तृषा ॥२०॥

ऐसा पापिष्ट राक्षस । होता मुनीचा अंगस्पर्श ।
गेली क्षुधा-तृषा-आक्रोश । झाला ज्ञानी परियेसा ॥२१॥

राक्षस ज्ञानी होऊनि । लागला मुनीश्वराचे चरणी ।
त्राहि त्राहि गुरुशिरोमणि । तू साक्षात ईश्वर ॥२२॥

तारी तारी मुनिवरा । बुडालो अघोर सागरा ।
उद्धरावे दातारा । कृपासिंधु जगदीशा ॥२३॥

तुझ्या दर्शनमात्रेसी । जळत्या माझ्या पापराशी ।
तू कृपाळू भक्तांसी । तारी तारी जगद्गुरु ॥२४॥

येणेपरी मुनिवरास । विनवीतसे राक्षस ।
वामदेव कृपासुरस । पुसतसे तये वेळी ॥२५॥

वामदेव म्हणे तयासी । तुवा कवणाचा कवण वंशी ।
ऐसा अघोर ठायी वससी । मनुष्य मात्र नसे ते ठायी ॥२६॥

ऐकोनि मुनीचे वचन । ब्रह्मराक्षस करी नमन ।
विनवीतसे कर जोडोन । ऐक त्रिविक्रम मुनिराया ॥२७॥

म्हणे राक्षस तये वेळी । आपणासी ज्ञान जहाले सकळी ।
जातिस्मरण अनंतकाळी । पूर्वापरीचे स्वामिया ॥२८॥

तयामध्ये माझे दोष । उत्कृष्ट जन्म पंचवीस ।
दिसतसे प्रकाश । ऐक स्वामी वामदेवा ॥२९॥

पूर्वजन्मे पंचविसी । होया राजा यवन-देशी ।
’दुर्जय’ नाम आपणासी । दुराचारी वर्तलो जाण ॥३०॥

म्या मारिले बहुत लोक । प्रजेसी दिधले दुःख ।
स्त्रिया वरिल्या अनेक । राज्यमदे करूनिया ॥३१॥

वरिल्या स्त्रियांव्यतिरिक्त । बलात्कारे धरिल्या अमित ।
एक दिवस देवोनि रति । पुनरपि न भोगी तयासी ॥३२॥

एके दिवशी एकीसी । रति देऊनि त्यजी तिसी ।
ठेविले अंतर्गृहासी । पुनरपि तीते न देखे नयनी ॥३३॥

ऐसे अनेक स्त्रियांसी । ठेविले म्या अंतर्गृहासी ।
माते शापिती अहर्निशी । दर्शन नेदी म्हणोनिया ॥३४॥

समस्त राजे जिंकोनिया । आणि स्त्रिया धरोनिया ।
एकेक दिवस भोगूनिया । त्याते ठेविले अंतर्गृहासी ॥३५॥

जेथे स्त्रिया सुरूपे असती । बळे आणोन देई मी रति ।
ज्या न येती संतोषवृत्ती । तया द्रव्य देऊनि आणवी ॥३६॥

विप्र होते माझे देशी । ते जाऊनि राहिले आणि देशी ।
जाऊनि आणी त्यांचे स्त्रियांसी । भोगी आपण उन्मत्तपणे ॥३७॥

पतिव्रता सुवासिनी । विधवा मुख्य करोनि ।
त्याते भोगी उन्मत्तपणी । रजस्वला स्त्रियांसी देखा ॥३८॥

विवाह न होता कन्यांसी । बलात्कारे भोगी त्यांसी ।
येणेपरी समस्त देशी । उपद्रविले मदांधपणे ॥३९॥

ब्राह्मणस्त्रिया तीन शते । शतचारी क्षत्रिया ते ।
वैश्यिणी वरिल्या षट्‍शत । शूद्रस्त्रिया सहस्त्र जाण ॥४०॥

एक शत चांडाळिणी । सहस्त्र वरिल्या पुलदिनी ।
पाच शत स्त्रिया डोंबिणी । रजकिणी वरिल्या शत चारी ॥४१॥

असंख्यात वारवनिता । भोगिल्या म्या उन्मत्तता ।
तथापि माझे मनी तृप्तता । नाही झाली स्वामिया ॥४२॥

इतुक्या स्त्रिया भोगून । संतुष्ट नव्हे माझे मन ।
विषयासक्त मद्यपान । करी नित्य उन्मत्ते ॥४३॥

वर्तता येणेपरी देखा । व्याधिष्ठ झालो यक्ष्मादिका ।
परराष्ट्रराजे चालोनि ऐका । राज्य हिरतले स्वामिया ॥४४॥

ऐसेपरी आपणासी । मरण जाहले परियेसी ।
नेले दूती यमपुरासी । मज नरकामध्ये घातले ॥४५॥

देवांसी सहस्त्र वर्षे देखा । दहा वेळ फिरविले ऐका ।
पितृसहित आपण देखा । नरक भोगिले येणेपरी ॥४६॥

पुढे जन्मलो प्रेतवंशी । विद्रूप देही परियेसी ।
सहस्त्र शिश्ने अंगासी । लागली असती परियेसी ॥४७॥

येणेपरी दिव्य शत वर्षे । कष्टलो बहु क्षुधार्थै ।
पुनरपि पावलो यमपंथ । अनंत कष्ट भोगिले ॥४८॥

दुसरा जन्म आपणासी । व्याघ्रजन्म जीवहिंसी ।
अजगर जन्म तृतीयेसी । चवथा जाहलो लांडगा ॥४९॥

पाचवा जन्म आपणासी । ग्रामसूकर परियेसी ।
सहावा जन्म जाहलो कैसी । सरडा होऊनि जन्मलो ॥५०॥

सातवा जन्म झालो श्वान । आठवा जंबुक मतिहीन ।
नवम जन्म रोही-हरण । दहावा झालो ससा देखा ॥५१॥

मर्कट जन्म एकादश । घारी झालो मी द्वादश ।
जन्म तेरावा मुंगूस । वायस जाहलो चतुर्दश ॥५२॥

जांबुवंत झालो पंचादश । रानकुक्कुट मी षोडश ।
जन्म जाहलो परियेस । पुढे येणेपरी अवधारी ॥५३॥

सप्तदश जन्मी आपण । गर्दभ झालो अक्षहीन ।
मार्जारयोनी । संभवून । आलो स्वामी अष्टादशेसी ॥५४॥

एकुणिसावे जन्मासी । मंडूक झालो परियेसी ।
कासवजन्म विशतीसी । एकविसावा मस्त्य झालो ॥५५॥

बाविसावा जन्म थोर । झालो तस्कर उंदीर ।
दिवांध झालो मी बधिर । उलूक जन्म तेविसावा ॥५६॥

जन्म चतुर्विशतीसी । झालो कुंजर तामसी ।
पंचविंशति जन्मासी । ब्रह्मराक्षस आपण देखा ॥५७॥

क्षुधाक्रांत अहर्निशी । कष्टतसे परियेसी ।
निराहारी अरण्यावासी । वर्ततसे स्वामिया ॥५८॥

तुम्हा देखता अंतःकरणी । वासना झालो भक्षीन म्हणोनि ।
यालागी आलो धावोनि । पापरूपी आपण देखा ॥५९॥

तुझा अंगस्पर्श होता । जातिस्मरण झाले आता ।
सहस्त्र जन्मीचे दुष्कृत । दिसतसे स्वामिया ॥६०॥

माते आता जन्म पुरे । तुझ्या अनुग्रहे मी तरे ।
घोरांधार संसार । आता यातना कडे करी ॥६१॥

तू तारक विश्वासी । म्हणोनि माते भेटलासी ।
तुझी दर्शनमहिमा कैसी । स्पर्श होता ज्ञान झाले ॥६२॥

भूमीवरी मनुष्य असती । तैसा रूप दिससी यति ।
परि तुझी महिमा ख्याति । निरुपम असे दातारा ॥६३॥

महापापी दुराचारी । आपण असे वनांतरी ।
तुझे अंगस्पर्शमात्री । ज्ञान जाहले अखिल जन्मांचे ॥६४॥

कैसा महिमा तुझ्या अंगी । ईश्वर होशील की जगी ।
आम्हा उद्धारावयालागी । आलासी स्वामी वामदेवा ॥६५॥

ऐसे म्हणता, राक्षसासी । वामदेव सांगे संतोषी ।
भस्ममहिमा आहे ऐशी । माझे अंगीची परियेसा ॥६६॥

सर्वांग माझे भस्मांकित । तुझे अंगा लागले क्वचित ।
त्याणे झाले तुज चेत । ज्ञानप्रकाश शत जन्मांतरीचे ॥६७॥

भस्ममहिमा अपरांपर । परि ब्रह्मादिका अगोचर ।
याचिकारणे कर्पूरगौर । भूषण करी सर्वांगी ॥६८॥

ईश्वरे वंदिल्या वस्तूसी । वर्णिता अशक्य आम्हांसी ।
तोचि शंकर व्योमकेशी । जाणे भस्ममहिमान ॥६९॥

जरी तू पुससी आम्हांसी । सांगेन दृष्टांत परियेसी ।
आम्ही देखिले दृष्टीसी । अपार महिमा भस्माचा ॥७०॥

विप्र एक द्रविडदेशी । आचारहीन परियेसी ।
सदा रत शूद्रिणीसी । कर्मभ्रष्ट वर्तत होता ॥७१॥

समस्त मिळोनि विप्रयाति । तया द्विजा बहिष्कारिती ।
मातापिता दाईज गोती । त्यजिती त्यासी बंधुवर्ग ॥७२॥

येणेपरी तो ब्राह्मण । प्रख्यात झाला आचारहीन ।
शूद्रिणीते वरून । होता काळ रमूनिया ॥७३॥

ऐसा पापी दुराचारी । तस्करविद्येने उदर भरी ।
आणिक स्त्रियांशी व्यभिचारी । उन्मत्तपणे परियेसा ॥७४॥

वर्तता ऐसे एके दिवसी । गेला होता व्यभिचारासी ।
तस्करविद्या करिता निशी । वधिले त्यासी एके शूद्र ॥७५॥

वधूनिया विप्रासी । ओढोनि नेले तेचि निशी ।
टाकिले बहिर्ग्रामेसी । अघोर स्थळी परियेसा ॥७६॥

श्वान एक तये नगरी । बैसला होता भस्मावरी ।
क्षुधाक्रांत अवसरी । गेला हिंडत प्रेतघ्राणी ॥७७॥

देखोनि तया प्रेतासी । गेला श्वान भक्षावयासी ।
प्रेतावरी बैसून हर्षी । क्षुधानिवारण करीत होता ॥७८॥

भस्म होते श्वानाचे पोटी । लागले प्रेताचे ललाटी ।
वक्षःस्थळी बाहुवटी । लागले भस्म परियेसा ॥७९॥

प्राण त्यजिता द्विजवर । नेत होते यमकिंकर ।
नानापरी करीत मार । यमपुरा नेताति ॥८०॥

कैलासपुरीचे शिवदूत । देखोनि आले ते प्रेत ।
भस्म सर्वांगी उद्धूलित । म्हणती याते कवणे नेले ॥८१॥

याते योग्य शिवपुर । केवी नेले ते यमकिंकर ।
म्हणोनि धावती वेगवक्त्रे । यमकिंकरा मारावया ॥८२॥

शिवदूत येता देखोनि । यमदूत जाती पळोनि ।
तया द्विजाते सोडूनि । गेले आपण यमपुरा ॥८३॥

जाऊनि सांगती यमासी । गेलो होतो भूमीसी ।
आणीत होतो पापियासी । अघोररूपेकरूनिया ॥८४॥

ते देखोनि शिवदूत । धावत आले मारू म्हणत ।
हिरोनि घेतले प्रेत । वधीत होते आम्हांसी ॥८५॥

आता आम्हा काय गति । कधी न वचो त्या क्षिती ।
आम्हांसी शिवदूत मारिती । म्हणोनि विनविती यमासी ॥८६॥

ऐकोनि दूतांचे वचन । यम निघाला कोपून ।
गेला त्वरित ठाकून । शिवदूताजवळी देखा ॥८७॥

यम म्हणे शिवदूतांसी । का मारिले माझ्या किंकरासी ।
हिरोनि घेतले पापियासी । केवी नेता शिवमंदिरा ॥८८॥

याचे पाप असे प्रबळ । जितकी गंगेत असे वाळू ।
तयाहूनि अधिक केवळ । अघोररूप असे देखा ॥८९॥

नव्हे योग हा शिवपुरासी । याते बैसवोनि विमानेसी ।
केवी नेता मूढपणेसी । म्हणोनि कोपे यम देखा ॥९०॥

ऐकोनि यमाचे वचन । शिवदूत सांगती विस्तारून ।
प्रेतकपाळी लांछन । भस्म होते परियेसा ॥९१॥

वक्षःस्थळी ललाटेसी । बाहुमूळी करकंकणेसी ।
भस्म लाविले प्रेतासी । केवी आतळती तुझे दूत ॥९२॥

आम्हा आज्ञा ईश्वराची । भस्मांकित तनु मानवाची ।
जीव आणावा त्या नराचा । कैलासपदी शाश्वत ॥९३॥

भस्म कपाळी असत । केवी आतळती तुझे दूत ।
तात्काळी होतो वधित । सोडिले आम्हा धर्मासी ॥९४॥

पुढे तरी आपुल्या दूता । बुद्धि सांगा तुम्ही आता ।
जे नर असती भस्मांकिता । त्याते तुम्ही न आणावे ॥९५॥

भस्मांकित नरासी । दोष न लागती परियेसी ।
तो योग्य होय स्वर्गासी । म्हणोनि सांगती शिवदूत ॥९६॥

शिवदूत वचन ऐकोन । यमधर्म गेला परतोन ।
आपुले दूता पाचारून । सांगतसे परियेसा ॥९७॥

यम सांगे आपुले दूता । भूमीवरी जाऊनि आता ।
जे कोण असतील भस्मांकित । त्याते तुम्ही न आणावे ॥९८॥

अनेकपरी दोष जरी । केले असतील धुरंधरी ।
त्याते न आणावे आमुचे पुरी । त्रिपुंड टिळक नरासी ॥९९॥

रुद्राक्षमाळा ज्याचे गळा । असेल त्रिपुंड्र टिळा ।
त्याते तुम्ही नातळा । आज्ञा असे ईश्वराची ॥१००॥

वामदेव म्हणे राक्षसासी । या विभूतीचा महिमा असे ऐशी ।
आम्ही लावितो भक्तीसी । देवादिका दुर्लभ ॥१॥

पाहे पा ईश्वर प्रीतीसी । सदा लावितो भस्मासी ।
ईश्वरे वंदिल्या वस्तूसी । कवण वर्णू शके सांग मज ॥२॥

ऐकोनि वामदेवाचे वचन । ब्रह्मराक्षस करी नमन ।
उद्धारावे जगज्जीवना । ईश्वर तूचि वामदेवा ॥३॥

तुझे चरण मज भेटले । सहस्त्र जन्मीचे ज्ञान जाहाले ।
काही पुण्य होते केले । त्याणे गुणे भेटलासी ॥४॥

आपण जधी राज्य करिता । केले पुण्य स्मरले आता ।
तळे बांधविले रानात । दिल्ही वृत्ति ब्राह्मणांसी ॥५॥

इतुके पुण्य आपणासी । घडले होते परियेसी ।
वरकड केले सर्व दोषी । राज्य करिता स्वामिया ॥६॥

जधी नेले यमपुरासी । यमे पुसिले चित्रगुप्तासी ।
माझे पुण्य त्या यमासी । चित्रगुप्ते सांगितले ॥७॥

तघी माते यमधर्मे आपण । सांगितले होते हे पुण्य ।
पंचविशति जन्मी जाण । फळासी येईल म्हणोनि ॥८॥

तया पुण्यापासोन । भेटी जाहली तुझे चरण ।
करणे स्वामी उद्धारण । जगद्गुरु वामदेवा ॥९॥

या भस्माचे महिमान । कैसे लावावे विघान ।
कवण मंत्र-उद्धारण । विस्तारूनि सांग मज ॥११०॥

वामदेव म्हणे राक्षसासी । विभूतीचे धारण मज पुससी ।
सांगेन आता विस्तारेसी । एकचित्ते ऐक पा ॥११॥

पूर्वी मंदरगिरिपर्वती । क्रीडेसी गेले गिरिजापति ।
कोटि रुद्रादिगणसहिती । बैसले होते वोळगेसी ॥१२॥

तेहतीस कोटी देवांसहित । देवेंद्र आला तेथे त्वरित ।
अग्नि वरुण यमसहित । कुबेर वायु आला तेथे ॥१३॥

गंध्र्व यक्ष चित्रसेन । खेचर पन्नग विद्याधरण ।
किंपुरुष सिद्ध साध्य जाण । आले गुह्यक सभेसी ॥१४॥

देवाचार्य बृहस्पति । वसिष्ठ नारद तेथे येती ।
अर्यमादि पितृसहिती । तया ईश्वर-वोळगेसी ॥१५॥

दक्षादि ब्रह्मा येर सकळ । आले समस्त ऋषिकुळ ।
उर्वश्यादि अप्सरामेळ । आले त्या ईश्वरसभेसी ॥१६॥

चंडिकासहित शक्तिगण देखा । आदित्यादि द्वादशार्का ।
अष्ट वसू मिळोन ऐका । आले ईश्वराचे सभेसी ॥१७॥

अश्विनी देवता परियेसी । विश्वेदेव मिळून निर्दोषी ।
आले ईश्वरसभेसी । ऐके ब्रह्मराक्षसा ॥१८॥

भूतपति महाकाळ । नंदिकेश्वर महानीळ ।
काठीकर दोघे प्रबळ । उभे पार्श्वी असती देखा ॥१९॥

वीरभद्र शंखकर्ण । मणिभद्र षट्‍कर्ण ।
वृकोदर देवमान्य । कुंभोदर आले तेथे ॥१२०॥

कुंडोदर मंडोदर । विकटकर्ण कर्णधार ।
घारकेतु महावीर । भुतनाथ तेथे आला ॥२१॥

भृंगी रिटी भूतनाथ । नानारूपी गण समस्त ।
नानावर्ण मुखे ख्यात । नानावर्ण-शरीर-अवयवी ॥२२॥

रुद्रगणाची रूपे कैसी । सांगेन ऐका विस्तारेसी ।
कित्ये कृष्णवर्णैसी । श्वेत-पीत-धूम्रवर्ण ॥२३॥

हिरवे ताम्र सुवर्ण । लोहित चित्रविचित्र वर्ण ।
म्डूकासारिखे असे वदन । रुद्रगण आले तेथ ॥२४॥

नानाआयुधे-शस्त्रेसी । नाना वाहन भूषणेसी ।
व्याघ्रमुख कित्येकांसी । किती सूकर-गजमुखी ॥२५॥

कित्येक नक्रमुखी । कित्येक श्वान-मृगमुखी ।
उष्ट्रवदन कित्येकी । किती शरभ-शार्दूलवदने ॥२६॥

कित्येक भैरुंडमुख । सिंहमुख कित्येक ।
दोनमुख गण देख । चतुर्मुख गण कितीएक ॥२७॥

चतुर्भुज गण अगणिक । कितीएका नाही मुख ।
ऐसे गण तेथे येती देख । ऐक राक्षसा एकचित्ते ॥२८॥

एकहस्त द्विहस्तेसी । पाच सहा हस्तकेसी ।
पाद नाही कितीएकांसी । बहुपादी किती जाणा ॥२९॥

कर्ण नाही कित्येकांसी । एककर्ण अभिनव कैसी ।
बहुकर्ण परियेसी । ऐसे गुण येती तेथे ॥१३०॥

कित्येकांसी नेत्र एक । कित्येका चारी नेत्र विचित्र ।
किती स्थूळ कुब्जक । ऐसे गण ईश्वराचे ॥३१॥

ऐशापरीच्या गणांसहित । बैसला शिव मूर्तिमंत ।
सिंहासन रत्‍नखचित । सप्त प्रभावळीचे ॥३२॥

आरक्त एक प्रभावळी । तयावरी रत्‍ने जडली ।
अनुपम्य दिसे निर्मळी । सिंहासन परियेसा ॥३३॥

दुसरी एक प्रभावळी । हेमवर्ण पिवळी ।
मिरवीतसे रत्‍ने बहळी । सिंहासन ईश्वराचे ॥३४॥

तिसरिये प्रभावळीसी । नीलवर्णे रत्‍ने कैसी ।
जडली असती कुसरीसी । सिंहासन ईश्वराचे ॥३५॥

शुभ्रचतुर्थ प्रभावळी । रत्‍नखचित असे कमळी ।
आरक्तवर्ण असे जडली । सिंहासन शंकराचे ॥३६॥

वैडूर्यरत्‍नखचित । मोती जडली असती बहुत ।
पाचवी प्रभावळी ख्यात । सिंहासन ईश्वराचे ॥३७॥

सहावी भूमि नीलवर्ण । भीतरी रेखा सुवर्णवर्ण ।
रत्‍ने जडली असती गहन । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥३८॥

सातवी ऐसी प्रभावळी । अनेक रत६ने असे जडली ।
जे का विश्वकर्म्याने रचिली । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥३९॥

ऐशा सिंहासनावरी । बैसलासे त्रिपुरारि ।
कोटिसूर्य तेजासरी । भासतसे परियेसा ॥१४०॥

महाप्रळयसमयासी । सप्तार्णव-मिळणी जैसी ।
तैसिया श्वासोच्छ्‌वासेसी । बैसलासे ईश्वर ॥४१॥

भाळनेत्र ज्वाळमाळा । संवर्ताग्नि जटामंडळा ।
कपाळी चंद्र षोडशकळा । शोभतसे सदाशिव ॥४२॥

तक्षक देखा वामकर्णी । वासुकी असे कानी दक्षिणी ।
तया दोघांचे नयन । नीलरत्‍नापरी शोभती ॥४३॥

नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण ।
सर्पाचेचि करी कंकण । मुद्रिकाही देखा सर्पाचिया ॥४४॥

मेखला तया सर्पाचे । चर्मपरिधान व्याघ्राचे ।
शोभा घंटी दर्पणाचे । ऐसेपरी दिसतसे ॥४५॥

कर्कोटक-महापद्म । केली नूपुरे पाईंजण ।
जैसा चंद्र-संपूर्ण । तैसा शुभ्र दिसतसे ॥४६॥

म्हणोनि कर्पूरगौर म्हणती । ध्यानी ध्याईजे पशुपति ।
ऐसा भोळाचक्रवर्ती । बैसलासे सभेत ॥४७॥

रत्‍नमुकुट असे शिरी । नागेंद्र असे केयूरी ।
कुंडलांची दीप्ति थोरी । दिसतसे ईश्वर ॥४८॥

कंठी सर्पाचे हार । नीलकंथ मनोहर ।
सर्वांगी सर्पाचे अलंकार । शोभतसे ईश्वर ॥४९॥

शुभ्र कमळे अर्चिला । की चंदने असे लेपिला ।
कर्पूरकेळीने पूजिला । ऐसा दिसे ईश्वर ॥१५०॥

दहाभुजा विस्तारेसी । एकेक हाती आयुधेसी ।
बैसलासे सभेसी । सर्वेश्वर शंकर ॥५१॥

एके हाती त्रिशूळ देखा । दुसरा डमरू सुरेखा ।
येरे हाती खड्ग तिखा । शोभतसे ईश्वर ॥५२॥

पानपात्र एका हाती । धनुष्य-बाणे कर शोभती ।
खट्वांग फरश येरे हाती । अंकुश करी मिरवीतसे ॥५३॥

मृग धरिला असे करी देखा । ऐसा तो हा पिनाका ।
दहाभुजा दिसती निका । बैसलासे सभेत ॥५४॥

पंचवक्त्र सर्वेश्वर । एकेक मुखाचा विस्तार ।
दिसतसे सालंकार । सांगेन ऐका श्रोतेजन ॥५५॥

कलंकाविणे चंद्र जैसा । किंवा क्षीरफेन ऐसा ।
भस्मभूषणे रूपे कैसा । दिसे मन्मथाते दाहोनिया ॥५६॥

सूर्य-चंद्र अग्निनेत्र । नागहार कटिसूत्र ।
दिसे मूर्ति पवित्र । सर्वेश्वर परियेसा ॥५७॥

शुभ्र टिळक कपाळी । बरवा शोभे चंद्रमौळी ।
हास्यवदन केवळी । अपूर्व देखा श्रीशंकर ॥५८॥

दुसरे मुख उत्तरेसी । शोभतसे विस्तारेसी ।
ताम्रवर्णाकार कमळेसी । अपूर्व दिसे परियेसा ॥५९॥

जैसे दाडिंबाचे फूल । किंवा प्रातःरविमंडळ ।
तैसे मिरवे मुखकमळ । ईश्वराचे परियेसा ॥१६०॥

तिसरे मुख पूर्वदिशी । गंगा अर्धचंद्र शिरसी ।
जटाबंदन केली कैसी । सर्पवेष्टित परियेसा ॥६१॥

चवथे मुख दक्षिणेसी । मिरवे नीलवर्णेसी ।
विक्राळ दाढा दारुणेसी । दिसतसे तो ईश्वर ॥६२॥

मुखांहूनि ज्वाला निघती । तैसा दिसे तीव्रमूर्ति ।
रुंडमाळा शोभती । सर्पवेष्टित परियेसा ॥६३॥

पाचवे असे ऐसे वदन । व्यक्ताव्यक्त असे जाण ।
साकार निराकार सगुण । सगुण निर्गुण ईश्वर ॥६४॥

सलक्षण निर्लक्षण । ऐसे शोभतसे वदन ।
परब्रह्म वस्तु तो जाण । सर्वेश्वर पंचमुखी ॥६५॥

काळ व्याळ सर्प बहुत । कंठी माळ मिरवे ख्यात ।
चरण मिरविती आरक्त । कमळापरी ईश्वराचे ॥६६॥

चंद्रासारिखी नखे देखा । मिरवे चरणी पादुका ।
अळंकार-सर्प ऐका । शोभतसे परमेश्वर ॥६७॥

व्याघ्रांबर पांघरुण । सर्प बांधले असे आपण ।
गाठी बांधिली असे जाण । नागबंधन करूनिया ॥६८॥

नाभी चंद्रावळी शोभे । ह्रदयी कटाक्ष रोम उभे ।
परमार्थमूर्ति लाभे । भक्तजना मनोहर ॥६९॥

ऐसा रुद्र महाभोळा । सिंहासनी आरूढला ।
पार्वतीसहित शोभला । बैसलासे परमेश्वर ॥१७०॥

पार्वतीचे श्रृंगार । नानापरीचे अलंकार ।
मिरवीतसे अगोचर । सर्वेश्वरी परियेसा ॥७१॥

कनकचाफे गोरटी । मोतियांचा हार कंठी ।
रत्‍नखचित मुकुटी । नागबंदी दिसतसे ॥७२॥

नानापरीच्या पुष्पजाति । मुकुटावरी शोभती ।
तेथे भ्रमर आलापिती । परिमळालागी परियेसा ॥७३॥

मोतियांची थोर जाळी । मिरवीतसे मुकुटाजवळी ।
रत्‍ने असती जडली । शोभायमान दिसतसे ॥७४॥

मुख दिसे पूर्णचंद्र । मिरवतसे हास्य मंद ।
जगन्माता विश्ववंद्य । दिसतसे परमेश्वरी ॥७५॥

नासिक बरवे सरळ । तेथे म्रिअवे मुक्ताफळ ।
त्यावरी रत्‍ने सोज्ज्वळ । जडली असती शोभायमान ॥७६॥

अधर पवळवेली दिसे । दंतपंक्ति रत्‍न जैस ।
ऐसी माता मिरवतसे । जगन्माता परियेसा ॥७७॥

कानी तानवडे भोवरिया । रत्‍नखचित मिरवलिया ।
अलंकार महामाया । लेइली असे जगन्माता ॥७८॥

पीतवर्ण चोळी देखा । कुच तटतटित शोभे निका ।
एकावेळी रत्‍ने अनेका । शोभतसे कंठी हार ॥७९॥

कालव्याल सर्प थोर । स्तनपान करिती मनोहर ।
कैसे भाग्य दैव थोर । त्या सर्पाचे परियेसा ॥१८०॥

आरक्त वस्त्र नेसली । जैसे दाडिंब पुष्पवेली ।
किंवा कुंकुमे डवरिली । गिरिजा माता परियेसा ॥८१॥

बाहुदंड सुरेखा । करी कंकण मिरवे देखा ।
रत्‍नखचित मेखळा देखा । लेईली असे अपूर्व जे ॥८२॥

चरण शोभती महा बरवे । असती नेपुरे स्वभावे ।
ऐसे पार्वती-ध्यान ध्यावे । म्हणती गण समस्त ॥८३॥

अष्टमीच्या चंद्रासारिखा । मिरवे टिळक काअळी कैसा त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा ।
मोतियांचा परियेसा ॥८४॥

नानापरीचे अलंकार । अनेकपरीचे श्रृंगार ।
कवण वर्णू शके पार । जगन्माता अंबिकेचा ॥८५॥

ऐसा शंभु उमेसहित । बैसलासे सभेत ।
तेहतीस कोटि परिवारसहित । इंद्र उभा वोळगेसी ॥८६॥

उभे समस्त सुरवर । देवऋषि सनत्कुमार ।
आले तेथे वेगवक्त्रे । तया ईश्वरसभेसी ॥८७॥

सनत्कुमार तये वेळी । लागतसे चरणकमळी ।
साष्टांग नमन बहाळी । विनवीतसे शिवासी ॥८८॥

जय जया उमाकांता । जय जया शंभु विश्वकर्ता ।
त्रिभुवनी तूचि दाता । चतुर्विध पुरुषार्थ ॥८९॥

समस्त धर्म आपणासी । स्वामी निरोपिले कृपेसी ।
भवार्णवी तरावयासी । पापक्षयाकारणे ॥१९०॥

आणिक एक आम्हा देणे । मुक्ति होय अल्पपुण्ये ।
चारी पुरुषार्थ येणे गुणे । अनायासे साधिजे ॥९१॥

एर्‍हवी समस्त पुण्यासी । करावे कष्त असमसहासी ।
हितार्थ सर्व मानवांसी । निरोपावे स्वामिया ॥९२॥

ऐसे विनवी सनत्कुमा । मनी संतोषोनिया ईश्वर ।
सांगता झाला कर्पूरगौर । सनत्कुमार मुनीसी ॥९३॥

ईश्वर म्हणे तयेवेळी । ऐका देव ऋषि सकळी ।
घडे धर्म तात्काळी । ऐसे पुण्य सांगेन ॥९४॥

वेदशास्त्रसंमतेसी । असे धर्म परियेसी ।
अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी । भस्मांकित परियेसा ॥९५॥

ऐकोनि विनवी सनत्कुमार । कवणे विधी लाविजे नर ।
कवण ’स्थान’, ’द्रव्य’ परिकर । ’शक्ति’ ’देवता’ कवण असे ॥९६॥

कवण ’कर्तृ’ किं ’प्रमाण’ । कोण ’मंत्रे’ लाविजे आपण ।
स्वामी सांगा विस्तारून । म्हणोनि चरणी लागला ॥९७॥

ऐसी विनंती ऐकोनि । सांगे शंकर विस्तारोनि ।
गोमय द्रव्य, देवता-अग्नि । भस्म करणे परियेसा ॥९८॥

पुरातनीचे यज्ञस्थानी । जे का असे मेदिनी ।
पुण्य बहुत लाविताक्षणी । भस्मांकिता परियेसा ॥९९॥

सद्योजाता’दि मंत्रेसी । घ्यावे भस्म तळहस्तासी ।
अभिमंत्रावे भस्मासी । ’अग्निरित्या’दि मंत्रेकरोनि ॥२००॥

’मानस्तोके’ ति मंत्रेसी । संमदावे अंगुष्ठेसी ।
त्र्यंबकादि मंत्रेसी । शिरसी लाविजे परियेसा ॥१॥

’त्र्यायुषे’ ति मंत्रेसी । लाविजे ललाटभुजांसी ।
त्याणेची मंत्रे परियेसी । स्थानी स्थानी लाविजे ॥२॥

तीनी रेखा एके स्थानी । लावाव्या त्याच मंत्रांनी ।
अधिक न लाविजे भ्रुवांहुनी । भ्रूसमान लाविजे ॥३॥

मध्यमानामिकांगुळेसी । लाविजे पहिले ललाटेसी ।
प्रतिलोम-अंगुष्ठेसी । मध्यरेषा काढिजे ॥४॥

त्रिपुंड्र येणेपरी । लाविजे तुम्ही परिकरी ।
एक एक रेखेच्या विस्तारी । सांगेन ऐका एकचित्ते ॥५॥

नव देवता विख्यातेसी । असती एकेक रेखेसी ।
’अ’ कार गार्हपत्यासी । भूरात्मा रजोगुण ॥६॥

ऋग्वेद आणि क्रियाशक्ति । प्रातःसवन असे ख्याति ।
महादेव-देव म्हणती । प्रथम रेखा येणेपरी ॥७॥

दुसरे रेखेची देवता । सांगेन ऐका विस्तारता ।
’उ’ कार दक्षिणाग्नि देवता । नभ सत्त्व जाणावे ॥८॥

यजुर्वेद म्हणिजे त्यासी । मध्यंदिन-सवन परियेसी ।
इच्छाशक्ति अंतरात्मेसी । महेश्वर-देव जाण ॥९॥

तिसरी रेखा मधिलेसी । ’म’ कार आहवनीय परियेसी ।
परमात्मा दिव हर्षी । ज्ञानशक्ति तमोगुण ॥२१०॥

तृतीयसवन परियेसी । सामवेद असे त्यासी ।
शिवदैवत निर्धारेसी । तीनि रेखा येणेविधि ॥११॥

ऐसे नित्य नमस्कारूनि । त्रिपुंड्र लाविजे भस्मेनि ।
महेश्वराचे व्रत म्हणोनि । वेदशास्त्रे बोलताति ॥१२॥

मुक्तिकामे जे लाविती । त्यासी पुनरावृत्ति ।
जे जे मनी संकल्पिती । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३॥

ब्रह्मचारी-गृहस्थासी । वानप्रस्थ-यतीसी ।
समस्ती लाविजे हर्षी । भस्मांकित त्रिपुंड्र ॥१४॥

महापापी असे आपण । उपपातकी जरी जाण ।
भस्म लाविता तत्क्षण । पुण्यात्मा तोचि होय ॥१५॥

क्षत्रिय-वैश्य-शूद्र-स्त्रीवध्यासी । गोहत्यादि-पातकासी ।
वीरहत्या-आत्महत्येसी । शुद्धात्मा करी भस्मांकित ॥१६॥

विधिपूर्वक मंत्रेसी । जे लाविती भक्तीसी ।
त्यांची महिमा अपारेसी । वंद्य होय देवलोकी ॥१७॥

जरी नेणे मंत्रासी । त्याणे लाविजे भावशुद्धीसी ।
त्याची महिमा अपारेसी । एकचित्ते परियेसा ॥१८॥

परद्रव्यहारक देखा । परस्त्रीगमन ऐका असेल पापी परनिंदका ।
तोही पुनीत होईल जाणा ॥१९॥

परक्षेत्रहरण देखा । परपीडक असेल जो का ।
सस्य आराम तोडी का । ऐसा पातकी पुनीत होई ॥२२०॥

गृहदाहादि केला दोष । असत्यवादी परियेस ।
पैशून्यपण पापास । वेदविक्रय पाप जाणा ॥२१॥

कूटसाक्षी व्रतत्यागी । कौटिल्य करी पोटालागी ।
ऐसी पाप सदा भोगी । तोही पुनीत होय जाणा ॥२२॥

गाई-भूमि-हिरण्यदान । म्हैषी-तीळ-कंबळदान ।
घेतले असेल वस्त्रान्न । तोही पुनीत होय जाणा ॥२३॥

धान्यदान जलादिदान । घेतले असेल नीचापासून ।
त्याणे करणे भस्मधारण । तोही पुनीत होय जाणा ॥२४॥

दासी-वेश्या-भुजंगीसी । वृषलस्त्री-रजस्वलेसी ।
केले असती जे का दोषी । तोही पुनीत जाणा ॥२५॥

कन्या विधवा अन्य स्त्रियांशी । घडला असेल संग जयासी ।
अनुतप्त होऊनि परियेसी । भस्म लाविता पुनीत होईल ॥२६॥

रस-मांस-लवणादिका । केला असेल विक्रय जो का ।
पुनीत होय भस्मसंपर्का । त्रिपुंड्र लाविता परियेसा ॥२७॥

जाणोनि अथवा अज्ञानता । पाप घडले असंख्याता ।
भस्म लाविता पुनीता । पुण्यात्मा होय जाणा ॥२८॥

नाशी समस्त पापांसी । भस्ममहिमा आहे ऐशी ।
शिवनिंदक पापियासी । न करी पुनीत परियेसा ॥२९॥

शिवद्रव्य अपहारकासी । निंदा करी शिवभक्तांसी ।
न होय निष्कृति त्यासी । पापावेगळा नव्हे जाणा ॥२३०॥

रुद्राक्षमाळा जयाचे गळा । लाविला असेल त्रिपुंड्र टिळा ।
अन्य पापी होय केवळा । तोही पूज्य तीही लोकी ॥३१॥

जितुकी तीर्थे भूमीवरी । असतील क्षेत्रे नानापरी ।
स्नान केले पुण्य-सरी । भस्म लाविता परियेसा ॥३२॥

मंत्र असती कोटी सात । पंचाक्षरादि विख्यात ।
अनंत आगम असे मंत्र । जपिले फळ भस्मांकिता ॥३३॥

पूर्वजन्म-सहस्त्रांती । सहस्त्र जन्म पुढे होती ।
भस्मधारणे पापे जाती । बेचाळीस वंशादिक ॥३४॥

इहलोकी अखिल सौख्य । होती पुरुष शतायुष्य ।
व्याधि न होती शरीरास । भस्म लाविता नरासी ॥३५॥

अष्टैश्वर्यै होती त्यासी । दिव्य शरीर परियेसी ।
अंती ज्ञान होईल निश्चयेसी । देहांती तया नरा ॥३६॥

बैसवोनि दिव्य विमानी । देवस्त्रिया शत येऊनि ।
सेवा करिती येणे गुणी । घेऊनि जाती स्वर्गभुवना ॥३७॥

विद्याधर सिद्धजन । गंधर्वादि देवगण ।
इंद्रादि लोकपाळ जाण । वंदिती समस्त तयासी ॥३८॥

अनंतकाळ तया स्थानी । सुखे असती संतोषोनि ।
मग जाती तेथोनि । ब्रह्मलोकी शाश्वत ॥३९॥

एकशत कल्पवरी । रहाती ब्रह्मलोकी स्थिरी ।
तेथोनि जाती वैकुंठपुरी । विष्णुलोकी परियेसा ॥२४०॥

ब्रह्मकल्प तीनवरी । रहाती नर वैकुंठपुरी ।
मग पावती कैलासपुरी । अक्षय काळ तेथे रहाती ॥४१॥

शिवसायुज्य होय त्यासी । संदेह सोडोनिया मानसी ।
लावा त्रिपुंड्र भक्तीसी । सनत्कुमारादि सकळिक हो ॥४२॥

वेदशास्त्रदि उपनिषदार्थ । सार पाहिले मी अवलोकित ।
चतुर्विध पुरुषार्थ । भस्मधारणे होय जाणा ॥४३॥

ऐसे त्रिपुंड्रमहिमान । सांगितले ईश्वरे विस्तारून ।
लावा तुम्ही सकळ जन । सनत्कुमारादि ऋषीश्वर हो ॥४४॥

सांगोनि सनत्कुमारासी । गेला ईश्वर कैलासासी ।
सनत्कुमार महाहर्षी । गेला ब्रह्मलोकाप्रती ॥४५॥

वामदेव महामुनि । सांगती ऐसे विस्तारोनि ।
ब्रह्मराक्षसे संतोषोनि । नमन केले चरणकमलासी ॥४६॥

वामदे म्हणे राक्षसासी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी ।
माझे अंगस्पर्शेसी । ज्ञान तुज प्रकाशिले ॥४७॥

ऐसे म्हणोनि संतोषी अभिमंत्रोनि भस्मासी ।
देता झाला राक्षसासी । वामदेव तया वेळी ॥४८॥

ब्रह्मराक्षस तया वेळी । लाविता त्रिपुंड्र कपाळी ।
दिव्यदेह तात्काळी । तेजोमूर्ति जाहला परियेसा ॥४९॥

दिव्य अवयव झाले त्यासी । जैसा सूर्यसंकाशी ।
झाला आनंदरूप कैसी । ब्रह्मराक्षस तया वेळी ॥२५०॥

नमन करूनि योगीश्वरासी । केली प्रदक्षिणा भक्तीसी ।
विमान आले तत्‌क्षणेसी । सूर्यसंकाश परियेसा ॥५१॥

दिव्य विमानी बैसोनि । गेला स्वर्गासी तत्क्षणी ।
वामदेव महामुनी । दिधला तयासी परलोक ॥५२॥

वामदेव महादेव । मनुष्यरूप दिसतो स्वभाव ।
प्रत्यक्ष जाणा तो शांभव । हिंडे भक्त तारावया ॥५३॥

त्रयमूर्तीचा अवतारु । वामदेव तोचि गुरु ।
करावया जगदोद्धारु । हिंडत होता भूमीवरी ॥५४॥

भस्ममाहात्म्य असे थोरु । विशेष हस्तस्पर्श गुरु ।
ब्रह्मराक्षसासी दिधला वरु । उद्धार गति परियेसा ॥५५॥

समस्त मंत्र असती । गुरूविणे साध्य नव्हती ।
वेदशास्त्रे वाखाणिती । ’नास्ति तत्त्वं गुरोः परम’ ॥५६॥

सूत म्हणे ऋषेश्वरांसी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी ।
गुरुहस्ते असे विशेषी । तस्माद्‍ गुरुचि कारण ॥५७॥

येणेपरी त्रिविक्रमासी । सांगती श्रीगुरु विस्तारेसी ।
त्रिविक्रमभारती हर्षी । चरणांवरी माथा ठेवित ॥५८॥

नमन करूनि श्रीगुरूसी । निघाला आपुले स्थानासी ।
झाले ज्ञान समस्तांसी । श्रीगुरूच्या उपदेशे ॥५९॥

येणेपरी सिद्धमुनि । सांगते झाले विस्तारूनि ।
ऐकतो शिष्य नामकरणी । भक्तिभावेकरूनिया ॥२६०॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
भक्तिभावे ऐकती नर । लाघे चारी पुरुषार्थ ॥२६१॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भस्ममहिमावर्णन नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ (ओवीसंख्या २६१)





गुरूचरित्र – अध्याय तिसावा

। श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा ।
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेकरूनिया ॥१॥

जय जया सिद्धमुनि । तूचि तारक भवार्णी ।
अज्ञानतिमिर नासोनि । ज्योतिःस्वरूप तूचि होसी ॥२॥

अविद्यामायासागरी । बुडालो होतो महापुरी ।
तुझी कृपा जाहली तरी । तारिले माते स्वामिया ॥३॥

तुवा दाविला निज-पंथ । जेणे जोडे परमार्थ ।
विश्वपालक गुरुनाथ । तूचि होसी स्वामिया ॥४॥

गुरुचरित्र सुधारस । तुवा पाजिला आम्हांस ।
तृप्त न होय गा मानस । तृषा आणिक होतसे ॥५॥

तुवा केलिया उपकारासी । उत्तीर्ण नव्हे मी वंशोवंशी ।
निजस्वरूप आम्हांसी । दाविले तुम्ही सिद्धमुनि ॥६॥

मागे कथा निरोपिलीसी । अभिनव जाहले सृष्टीसी ।
पतिताकरवी ख्यातीसी । वेद चारी म्हणविले ॥७॥

त्रिविक्रम महामुनेश्वरासी । बोधिले ज्ञान प्रकाशी ।
पुढे कथा वर्तली कैशी । विस्तारावे दातारा ॥८॥

ऐकोनि शिष्याचे वचन । संतोषला सिद्ध आपण ।
प्रेमभावे आलिंगोन । आश्वासीतसे तये वेळी ॥९॥

धन्य धन्य शिष्यमौळी । तुज लाधले अभीष्ट सकळी ।
गुरूची कृपा तात्काळी । जाहली आता परियेसा ॥१०॥

धन्य धन्य तुझी वाणी । वेध लागला श्रीगुरुचरणी ।
तूचि तरलासी भवार्णी । सकळाभीष्टे साधतील ॥११॥

तुवा पुसिला वृत्तांत । संतोष झाला आजि बहुत ।
श्रीगुरुमहिमा असे ख्यात । अगम्य असे सांगता ॥१२॥

एकेक महिमा सांगता । विस्तार होईल बहु कथा ।
संकेतमार्गे तुज आता । निरोपीतसे परियेसी ॥१३॥

पुढे असता वर्तमानी । तया गाणगग्रामभुवनी ।
महिमा होतसे नित्यनूतनी । प्रख्यातरूप होऊनिया ॥१४॥

त्रयमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर ।
महिमा त्याची अपरंपारु । सांगता अगम्य परियेसा ॥१५॥

महिमा तया त्रयमूर्तीची । सांगता शक्ति आम्हा कैची काया धरूनि मानवाची ।
चरित्र केले भूमीवरी ॥१६॥

तया स्थानी असता गुरु । ख्याति झाली अपरांपरु ।
प्रकाशत्व चारी राष्ट्र । समस्त येती दर्शना ॥१७॥

येती भक्त यात्रेसी । एकोभावे भक्तीसी ।
श्रीगुरुदर्शनमात्रेसी । सकळाभीष्ट पावती ॥१८॥

दैन्य पुरुष होती श्रियायुक्त । वांझेसी पुत्र होय त्वरित ।
कुष्ठे असेल जो पीडित । सुवर्ण होय देह त्याचा ॥१९॥

अक्षहीना अक्ष येती । बधिर कर्णी ऐकती ।
अपस्मारादि रोग जाती । श्रीगुरुचरणदर्शनमात्रे ॥२०॥

परीस लागता लोहासी । सुवर्ण होय नवल कायसी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । सकळाभीष्ट पाविजे ॥२१॥

ऐसे असता वर्तमानी । उत्तर दिशे माहुरस्थानी ।
होता विप्र महाघनी । नाम तया ’गोपीनाथ’ ॥२२॥

तया पुत्र होऊनि मरती । करी दुःख अनेक रीती ।
दत्तात्रेया आराधिती । स्त्रीपुरुष दोघेजण ॥२३॥

पुढे जाहला आणिक सुत । तया नाम ठेविती ’दत्त’ ।
असती आपण धनवंत । अति प्रीती वाढविले ॥२४॥

एकचि पुत्र तया घरी । अति प्रीति तयावरी ।
झाला पाच संवत्सरी । व्रतबंध केला तयासी ॥२५॥

वर्षे बारा होता तयासी । विवाह करिती प्रीतीसी ।
अतिसुंदर नोवरीसी । विचारूनि प्रीतिकरे ॥२६॥

मदनाचे रतीसरसी । रूप दिसे नोवरीसी ।
अति प्रीति सासूश्वशुरासी । महाप्रेमे प्रतिपाळिती ॥२७॥

दंपती एकचि वयेसी । अति प्रिय महा हर्षी ।
वर्धता झाली षोडशी । वर्षे तया पुत्रासी ॥२८॥

दोघे सुंदर सुलक्षण । एकापरीस एक प्राण ।
न विसंबिती क्षण क्षण । अतिप्रिय परियेसा ॥२९॥

ऐसी प्रेमे असता देखा । व्याधि आली त्या पुरुषा ।
अनेक औषधे देता ऐका । आरोग्य नोहे तयासी ॥३०॥

नवचे अन्न तयासी । सदा राहे उपवासी ।
त्याची भार्या प्रीतीसी । आपण न घे सदा अन्न ॥३१॥

पुरुषावरी आपुला प्राण । करी नित्य उपोषण ।
पतीस देता औषधे जाण । प्राशन करी परियेसा ॥३२॥

येणेपरी तीन वर्षी । झाली व्याधि-क्षयासी ।
पतिव्रता स्त्री कैसी । पुरुषासवे कष्टतसे ॥३३॥

पुरुषदेह क्षीण झाला । आपण तयासरसी अबला ।
तीर्थ घेऊनि चरणकमळा । काळ क्रमी तयाजवळी ॥३४॥

दुर्गंधि झाले देह त्याचे । जवळी न येती वैद्य साचे ।
पतिव्रता सुमन तिचे । न विसंबेचि क्षणभरी ॥३५॥

जितुके अन्न पतीसी । तितुकेचि ग्रास आपणासी ।
जैसे औषध देती त्यासी । आपण घेतसे परियेसा ॥३६॥

मातापिता दायाद गोती । समस्त तिसी वारिती ।
पतिव्रता ज्ञानवंती । न ऐके बोल कवणाचे ॥३७॥

दिव्यवस्त्रादि आभरणे । त्यजिली समस्त भूषणे ।
पुरुषावरी आपुला प्राण । काय सुख म्हणतसे ॥३८॥

उभयतांची मातापिता । महाधनिक श्रीमंता ।
पुत्रकन्येसी पाहता । दुःख करिती परियेसा ॥३९॥

अनेक जपानुष्ठान । मंत्रविद्या महाहवन ।
अपरिमित ब्राह्मणभोजन । करविताति अवधारा ॥४०॥

अनेक परीचे वैद्य येती । दिव्य रस-औषधे देती ।
शमन नव्हे कवणे रीती । महाव्याधीने व्यापिले ॥४१॥

पुसती जाणत्या ज्योतिष्यासि । पूजा करिती कुळदेवतांसी ।
काही केलिया पुत्रासी । आरोग्य नोहे सर्वथा ॥४२॥

वैद्य म्हणती तये वेळी । नव्हे बरवे त्यासी अढळी ।
राखील जरी चंद्रमौळी । मनुष्ययत्‍न नव्हे आता ॥४३॥

ऐसे ऐकोनि मातापिता । दुःखे दाटली करिती चिंता ।
जय जया जगन्नाथा । दत्तात्रेया गुरुमूर्ति ॥४४॥

आराधोनिया तुम्हांसी । पुत्र लाधलो संतोषी ।
पापरूप आपणासी । निधान केवी राहो पाहे ॥४५॥

एकचि पुत्र आमचे वंशी । त्याते जरी न राखिसी ।
प्राण देऊ तयासरसी । दत्तात्रेया स्वामिया ॥४६॥

ऐसे नानापरी देखा । दुःख करिती जननीजनका ।
वारीतसे पुत्र ऐका । मातापिता आलिंगोनि ॥४७॥

म्हणे आपुले भोग सरले । जितुके ऋण तुम्हा दिधले ।
अधिक कैचे घेऊ भले । ऋणानुबंध न चुकेचि ॥४८॥

ऐसे ऐकोनि मातापिता । दोघे जाहली मूर्च्छागता ।
पुत्रावरी लोळता । महादुःखे दाटोनिया ॥४९॥

म्हणती ताता पुत्रराया । आमुचीआशा झाली वाया ।
पोषिसी आम्हा म्हणोनिया । निश्चय केला होता आपण ॥५०॥

उबगोनिया आम्हांसी । सोडूनि केवी जाऊ पाहसी ।
वृद्धाप्यपणी आपणांसी । धर्म घडे केवी तुज ॥५१॥

ऐकोनि मातापितावचन । विनवीतसे आक्रंदोन ।
करणी ईश्वराधीन । मनुष्ययत्‍न काय चाले ॥५२॥

मातापित्यांचे ऋण । पुत्रे करावे उत्तीर्ण ।
तरीच पुत्रत्व पावणे । नाही तरी दगडापरी ॥५३॥

मातेने केले मज पोषण । एके घडीचे स्तनपान ।
उत्तीर्ण नव्हे भवार्ण । जन्मांतरी येऊनिया ॥५४॥

आपण जन्मलो तुमचे उदरी । कष्ट दाविले अतिभारी ।
सौख्य न देखा कवणेपरी । ऐसा आपण पापी देखा ॥५५॥

आता तुम्ही दुःख न करणे । परमार्थी दृष्टी देणे ।
जैसे काही असेल होणे । ब्रह्मादिका न सुटेचि ॥५६॥

येणेपरी जननीजनका । संभाषीतसे पुत्र निका ।
तेणेपरी स्त्रियेसी देखा । सांगतसे परियेसा ॥५७॥

म्हणे ऐक प्राणेश्वरी । झाले आमुचे दिवस सरी ।
मजनिमित्ते कष्टलीस भारी । वृथा गेले कष्ट तुझे ॥५८॥

पूर्वजन्मीचे वैरपण । तुजसी होता माझा शीण ।
म्हणोनि तूते दिधले जाण । जन्मांतरीचे कष्ट देखा ॥५९॥

तू जरी रहासी आमुचे घरी । तुज पोशितील परिकरी ।
तुज वाटेल कष्ट भारी । जाई आपुले माहेरा ॥६०॥

ऐसे तुझे सुंदरीपण । न लाधे आपण दैवहीन ।
न राहे तुझे अहेवपण । माझे अंग स्पर्शता ॥६१॥

ऐकोनि पतीचे वचन । मूर्च्छा आली तत्क्षण ।
माथा लावूनिया चरणा । दुःख करी तये वेळी ॥६२॥

म्हणे स्वामी प्राणेश्वरा । तुम्ही मज न अव्हेरा ।
तुहांसरी दातारा । आणिक नाही गति आपणा ॥६३॥

जेथे असे तुमचा देह । सवेचि असे आपण पाहे ।
मनी न करा संदेह । समागमी तुमची आपण ॥६४॥

ऐसे दोघांचिया वचनी । ऐकोनिया जनकजननी ।
देह टाकोनिया धरणी । दुःख करिती तयेवेळी ॥६५॥

उठवूनिया श्वशुरासी । संबोखीतसे सासूसी ।
न करा चिंता, हो भरवसी । पति आपुला वाचेल ॥६६॥

विनवीतसे तये वेळी । आम्हा राखेल चंद्रमौळी ।
पाठवा एखाद्या स्थळी । पति आपुला वाचेल ॥६७॥

सांगती लोक महिमा ख्याति । नरसिंहसरस्वती श्रीगुरुमूर्ति ।
गाणगापुरी वास करिती । तया स्वामी पहावे ॥६८॥

त्याचे दर्शनमात्रेसी । आरोग्य होईल पतीसी ।
आम्हा पाठवा त्वरितेसी । म्हणोनि चरणा लागली ॥६९॥

मानवली गोष्ट समस्तांसी । मातापिताश्वशुरांसी ।
निरोप घेऊनि सकळिकांसी । निघती झाली तये वेळी ॥७०॥

तया रोगिया करोनि डोली । घेवोनि निघाली ते बाळी ।
विनवीतसे तये वेळी । आपले सासूश्वशुरांसी ॥७१॥

स्थिर करूनि अंतःकरण । सुखे रहावे दोघेजण ।
पति असे माझा प्राण । राखील माझे कुळदैवत ॥७२॥

म्हणोनि सासूश्वशुरांसी । नमन करी प्रीतीसी ।
आशीर्वाद देती हर्षी । अहेवपण स्थिर होय ॥७३॥

तुझे दैवे तरी आता । आमुचा पुत्र वाचो वो माता ।
म्हणोनि निघाले बोळवीत । आशीर्वाद देताति ॥७४॥

येणेपरी पतीसहित । निघती झाली पतिव्रता ।
क्वचित्काळ मार्ग क्रमिता । आली गाणगापुरासी ॥७५॥

मार्ग क्रमिता रोगियासी । अधिक जाहला त्रिदोषी ।
उतरता ग्रामप्रदेशी । अतिसंकट जाहले पै ॥७६॥

विचारिता श्रीगुरूसी गेले होते संगमासी ।
जावे म्हणोनि दर्शनासी । निघती झाली तये वेळी ॥७७॥

पतिव्रता तये वेळ । आली आपुले पतीजवळ ।
पहाता जाहला अंतकाळ । प्राण गेला तत्क्षणी ॥७८॥

आकांत करी ते नारी । लोळतसे धरणीवरी ।
भोसकूनि घ्यावया घेता सुरी । वारिती तियेसी ग्राम लोक ॥७९॥

आफळी शिरे भूमीसी । हाणी उरी पाषाणेसी ।
केश मोकळे आक्रोशी । प्रलापीतसे परियेसा ॥८०॥

हा हा देवा काय केले । का मज गाईसी गांजिले ।
आशा करूनि आल्ये । राखिसी प्राण म्हणोनि ॥८१॥

पूजेसी जाता देउळात । पडे देऊळ करी घात ।
ऐशी कानी न ऐको मात । दृष्टांत झाला आपणासी ॥८२॥

उष्णकाळी तापोनि नरु । ठाकोनि जाय एखादा तरु ।
वृक्षचि पडे आघात थोरु । तयापरी झाले मज ॥८३॥

तृषेकरूनि पीडित । जाय मनुष्य गंगेत ।
संधी सुसरी करी घात । तयापरी मज झाले ॥८४॥

व्याघ्रभये पळे धेनु । जाय आधार म्हणोनु ।
तेथेचि वधिती यवनु । तयापरी झाले मज ॥८५॥

ऐसी पापी दैवहीन । आपुले पतीचा घेतला प्राण ।
मातापितरांसी त्यजून । घेवोनि आल्ये विदेशी ॥८६॥

येणेपरी दुःख करीत । पाहू आले जन समस्त ।
संभाषिताति दुःखशमता । अनेकपरीकरूनिया ॥८७॥

वारिताति नारी सुवासिनी । का वो दुःख करिसी कामिनी ।
विचार करी अंतःकरणी । होणार न चुके सकळिकांसी ॥८८॥

ऐसे म्हणता नगरनारी । तिसी दुःख झाले भारी ।
आठवीतसे परोपरी । आपुले जन्मकर्म सकळ ॥८९॥

ऐका तुम्ही मायबहिणी । आता कैची वाचू प्राणी ।
पतीसी आल्ये घेऊनि । याची आशा करोनिया ॥९०॥

आता कवणा शरण जावे । राखेल कोण मज जीवे ।
प्राणेश्वरा त्यजूनि जीवे । केवी वाचू म्हणतसे ॥९१॥

बाळपणी गौरीसी । पूजा केली शंकरासी ।
विवाह होता परियेसी । पूजा केली मंगळागौरी ॥९२॥

अहेवपणाचे आशेनी । पूजा केली म्या भवानी ।
सांगती माते सुवासिनी । अनेकपरी व्रतादिके ॥९३॥

जे जे सांगती माते व्रत । केली पूजा अखंडित ।
समस्त जाहले आता व्यर्थ । रुसली गौरी आपणावरी ॥९४॥

आता माझिये हळदीसी । चोर पडले गळेसरीसी ।
सर्वस्व दिधले वन्हीसी । कंकण-कंचुकी परियेसा ॥९५॥

कोठे गेले माझे पुण्य । वृथा पूजिला गौरीरमण ।
कैसे केले मज निर्वाण । ऐका मायबहिणी हो ॥९६॥

केवी राहू आता आपण । पति होता माझा प्राण ।
लोकांसरिसा नोहे जाण । प्राणेश्वर परियेसा ॥९७॥

ऐसे नानापरी देखा । करी पतिव्रता दुःखा ।
पतीच्या पाहूनिया मुखा । आणिक दुःख अधिक करी ॥९८॥

आलिंगोनि प्रेतासि । रोदन करी बहुवसी ।
आठवी आपुले पूर्व दिवसी । पूर्वस्नेह तये वेळी ॥९९॥

म्हणे पुरुषा प्राणेश्वरा । कैसे माझे त्यजिले करा ।
उबग आला तुम्हा थोरा । म्हणोनि माते उपेक्षिले ॥१००॥

कैसी आपण दैवहीन । तटाकी खापर लागता भिन्न ।
होतासि तू निधान । आयुष्य तुझे उणे जहाले ॥१॥

तुमचे मातापितयांसी । सांडूनि आणिले परदेशी ।
जेणेपरी श्रावणासी । वधिले राये दशरथे ॥२॥

तैसी तुमची जनकजननी । तुम्हा आणिले त्यजूनि ।
तुमची वार्ता ऐकोनि । प्राण त्यजितील दोघेजण ॥३॥

तीन हत्या भरवसी । घडल्या मज पापिणीसी ।
वैरिणी होय मी तुम्हांसी । पतिघातकी आपण सत्य ॥४॥

ऐशी पापिणी चांडाळी । निंदा करिती लोक सकळी ।
प्राणे घेतला मीचि बळी । प्राणेश्वरा दातारा ॥५॥

स्त्री नव्हे मी तुमची वैरी । जैसी तिखट शस्त्र सुरी ।
वेधिली तुमचे शरीरी । घेतला प्राण आपणचि ॥६॥

मातापिता बंधु सकळी । जरी असती तुम्हाजवळी ।
मुख पाहती अंतकाळी । त्यांसि विघ्न आपण केले ॥७॥

माझ्या वृद्ध सासूसासर्‍यात । होती तुमची आस ।
पुरला नाही त्यांचा सोस । त्याते सांडोनि केवी जाता ॥८॥

एकचि उदरी तुम्ही त्यासी । उबगलेति पोसावयासी ।
आम्हा कोठे ठेवूनि जासी । प्राणेश्वरा दातारा ॥९॥

आता आपण कोठे जावे । कवण माते पोसील जीवे ।
न सांगता आम्हांसी बरवे । निघोनि गेलासी प्राणेश्वरा ॥११०॥

तू माझा प्राणेश्वरु । तुझे ममत्व केवी विसरू ।
लोकासमान नव्हसी नरु । प्रतिपाळिले प्रीतिभावे ॥११॥

कधी नेणे पृथक्‌शयन । वामहस्त-उसेवीण ।
फुटतसे अंतःकरण । केवी वाचो प्राणेश्वरा ॥१२॥

किती आठवू तुझे गुण । पति नव्हसी माझा प्राण ।
सोडोनि जातोसि निर्वाण । कवणेपरी वाचू मी ॥१३॥

आता कवण थार्‍य जाणे । कवण घेतील मज पोसणे ।
’बालविधवा’ म्हणोनि जन । निंदापवाद ठेविती ॥१४॥

एकही बुद्धि मज न सांगता । त्यजिला आत्मा प्राणनाथा ।
कोठे जावे आपण आता । केशवपन करूनि ॥१५॥

तुझे प्रेम होते भरल्ये । मातापितयाते विसरल्ये ।
त्यांचे घरा नाही गेल्ये । बोलावनी नित्य येती ॥१६॥

केवी जाऊ त्यांच्या घरा । उपेक्षितील प्राणेश्वरा ।
दैन्यवृत्ती दातारा । चित्तवृत्ति केवी धरू ॥१७॥

जववरी होतासी तू छत्र । सर्वा ठायी मी पवित्र ।
मानिती सकळ इष्टमित्र । आता निंदा करतील ॥१८॥

सासूश्वशुरापाशी जाणे । मज देखता त्याही मरणे ।
गृह जहाले अरण्य । तुम्हाविणे प्राणेश्वरा ॥१९॥

घेवोनि आल्ये आरोग्यासी । येथे ठेवूनि तुम्हांसी ।
केवी जाऊ घरासी । राक्षसी मी पापीण ॥१२०॥

ऐसे नानापरी ते नारी । दुःख करी अपरांपरी ।
इतुके होता अवसरी । आला तेथे सिद्ध एक ॥२१॥

भस्मांकित जटाधारी । रुद्राक्षमाळाभूषण-अळंकारी ।
त्रिशूळ धरिला असे करी । येऊनि जवळी उभा ठेला ॥२२॥

संभाषीतसे तया वेळी । का वो प्रलापिसी स्थूळी ।
जैसे लिहिले कपाळी । तयापरी होतसे ॥२३॥

पूर्वजन्मीचे तपफळ । भोगणे आपण हे अढळ ।
वाया रडसी निर्फळ । शोक आता करू नको ॥२४॥

दिवस आठ जरी तू रडसी । न ये प्राण प्रेतासी ।
जैसे लिहिले ललाटेसी । तयापरी घडेल जाण ॥२५॥

मूढपणे दुःख करिसी । समस्ता मरण तू जाणसी ।
कवण वाचला असे धरित्रीसी । सांग आम्हा म्हणतसे ॥२६॥

आपुला म्हणसी प्राणेश्वरु । कोठे उपजला तो नरु ।
तुझा जन्म झाला येरु । कवण तुझी मातापिता ॥२७॥

पूर येता गंगेत । नानापरीची काष्ठे वाहत ।
येऊनि एके ठायी मिळत । फाकती आणिक चहूकडे ॥२८॥

पाहे पा एका वृक्षावरी । येती पक्षी अपरांपरी ।
क्रमोनि प्रहर चारी । जाती मागुती चहूकडे ॥२९॥

तैसा हा संसार जाण नारी । कवण वाचला असे स्थिरी ।
मायामोहे कलत्रपुत्री । पति म्हणसी आपुला ॥१३०॥

गंगेमध्ये जैसा फेन । तेणेपरी देह जाण ।
स्थिर नोहे याचि कारण । शोक वृथा करू नको ॥३१॥

पंचभूतात्मक देह । तत्संबंधी गुण पाहे ।
आपुले कर्म कैसे आहे । तैसा गुण उद्भवे ॥३२॥

गुणानुबंधे कर्मे घडती । कर्मासारिखी दुःख-प्राप्ति ।
मायामोहाचिया रीती । मायामयसंबंधे ॥३३॥

मायासंबंधे मायागुण । उपजे सत्त्व-रज-तमोगुण ।
येणेचि तीन्हि देह जाण । त्रिगुणात्मक देह हा ॥३४॥

हा संसार वर्तमान । समस्त कर्माचे अधीन ।
सुखदुःख आपुले गुण । भोगिजे आपुले आर्जव ॥३५॥

कल्पकोटी दिवसवरी । देवास आयुष्य आहे जरी ।
त्यासी काळ न चुके सरी । मनुष्याचा कवण पाड ॥३६॥

काळ समस्तांसी कारण । कर्माधीन देह-गुण ।
स्थिर कल्पिता साधारण । पंचभूत देहासी ॥३७॥

काळ-कर्म-गुणाधीन । पंचभूतात्मक देह जाण ।
उपजता संतोष नको मना । मेलिया दुःख न करावे ॥३८॥

जधी गर्भ होता नरु । जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्यात थोरु ।
त्याचे जैसे गुणकर्म-विवरु । तैसे मरण जन्म परियेसा ॥३९॥

कोणा मृत्यु पूर्ववयसी । कवणा मृत्यु वृद्धाप्येसी ।
जैसे आर्जव असे ज्यासी । तयापरी घडे जाणा ॥१४०॥

पूर्वजन्मार्जवासरसी । भोगणे होय सुखदुःखअंशी ।
कलत्र-पुत्र-पति हर्षी । पापपुण्यांशे जाणा ॥४१॥

आयुष्य सुखदुःख जाणा । समस्त पापवश्य-पुण्य ।
ललाटी लिहिले असे ब्रह्माने । अढळ जाण विद्वज्जना ॥४२॥

एखादे समयी कर्मासी । लंघिजेल पुण्यवशी ।
देवदानवमनुष्यांसी । काळ न चुके भरवसे ॥४३॥

संसार म्हणजे स्वप्नापरी । इंद्रजाल-गारुडीसरी ।
मिथ्या जाण तयापरी । दुःख आपण करू नये ॥४४॥

शतसहस्त्रकोटि जन्मी । तू कवणाची कोण होतीस गृहिणी ।
वाया दुःख करिसी झणी । मूर्खपणेकरूनिया ॥४५॥

पंचभूतात्मक शरीर । त्वचा मांस शिरा रुधिर ।
मेद मज्जा अस्थि नर । विष्ठा-मूत्र-श्र्लेष्मसंबंधी ॥४६॥

ऐशा शरीरअघोरात । पाहता काय असे स्वार्थ ।
मल मूत्र भरले रक्त । तयाकारणे शोक का करिसी ॥४७॥

विचार पाहे पुढे आपुला । कोणेपरी मार्ग असे भला ।
संसारसागर पाहिजे तरला । तैसा मार्ग पाहे बाळे ॥४८॥

येणेपरी तियेसी । बोधिता झाला तापसी ।
ज्ञान झाले तियेसी । सांडी शोक तयावेळी ॥४९॥

कर जोडोनि तये वेळी । माथा ठेविनि चरणकमळी ।
विनवीतसे करुनाबहाळी । उद्धरी स्वामी म्हणोनिया ॥१५०॥

कवण मार्ग आपणासी । जैसा स्वामी निरोप देसी ।
जनक जननी तू आम्हासी । तारी तारी म्हणतसे ॥५१॥

कवणेपरी तरेन आपण । हा संसार भवार्ण ।
तुझा निरोप करीन । म्हणोनि चरणा लागली ॥५२॥

ऐकोनि तियेचे वचन । सांगे योगी प्रसन्नवदन ।
बोलतसे विस्तारून । आचरण स्त्रियांचे ॥५३॥

म्हणोनि सरस्वती गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकता समस्त पाप दूर । सकळाभीष्टे साधती ॥१५४॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ (ओवीसंख्या १५४)





गुरुचरित्र – अध्याय एकतिसावा

॥ श्रीगणेशाय नम: ॥

सिध्द म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे धर्म सकळ ॥१॥

योगेश्वर म्हणती स्त्रियेसी । आचार स्त्रियांचे पुससी ।
सांगेन तुज विस्तारेंसी । भवसागर तरावया ॥२॥

पति असतां कवण धर्म । अथवा मेलिया काय कर्म ।
उभयपक्षी विस्तारोन । सांगेन ऐकचित्ते ॥३॥

कथा स्कंदपुराणांत । काशीखंडीं विस्तृत ।
स्त्रियांचे धर्म बहुत । एकचित्तें ऐकावे ॥४॥

अगस्ति ऋषि महामुनि । जो का काशीभुवनीं ।
लोपमुद्रा महाज्ञानी । त्याची भार्या परियेसा ॥५॥

पतिव्रताशिरोमणि। दुजी नव्हती आणिक कोणी ।
असतां तेथें वर्तमानी । झाले अपूर्व परियेसा ॥६॥

त्या अगस्तिच्या शिष्यांत । विंध्य नामें असे विख्यात ।
पर्वतरूपें असे वर्तत । होता भूमीवर देखा ॥७॥

विध्याचळ म्हणिजे गिरी । अपूर्व वनें त्यावरी ।
शोभायमान महाशिखरी । बहु रम्य परियेसा ॥८॥

ब्रह्मर्षि नारदमुनि । हिंडत गेला तये स्थानीं ।
संतोष पावला पाहोनि । स्तुति केली तये वेळी ॥९॥

नारद म्हणे विंध्यासी । सर्वात श्रेष्ठ तूं होसी ।
सकळ वृक्ष तुजपासीं । मनोरम्य स्थळ तुझें ॥१०॥

परी एक असे उणें । मेरुसमान नव्हेसी जाणें स्थळ स्वल्प या कारणें ।
महत्व नाहीं परियेसा ॥११॥

ऐसें म्हणतां नारदमुनि । विंध्याचळ कोपोनि ।
वाढता झाला ते क्षणी । मेरुपरी होईन म्हणे ॥१२॥

वाढे विंध्याचळ देखा । सूर्यमंडळासंमुखा ।
क्रमांतरें वाढतां ऐका । गेला स्वर्गभुवनासी ॥१३॥

विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी । अंधकार अहर्निशीं ।
सूर्यरश्मी न दिसे कैशीं । यज्ञादि कर्मे राहिलीं ॥१४॥

ऋषि समस्त मिळोनि । विनवूं आले इंद्रभुवनी ।
विध्याद्रीची करणी । सांगते झाले विस्तारें ॥१५॥

इंद्र कोपे तये वेळी । गेला तया ब्रह्मयाजवळी ।
सांगितला वृत्तान्त सकळी । तया विंध्य पर्वताचा ॥१६॥

ब्रह्मा म्हणे इंद्रासी । आहे कारण आम्हांसी ।
अगस्ति असे पुरीं काशी । त्यासी दक्षिण दिशे पाठवावें ॥१७॥

दक्षिण दिशा भुमीसी । अंधार पडिला परियेसी ।
या कारणें अगस्तीसी । दक्षिण दिशे पाठवावें ॥१८॥

अगस्तीचा शिष्य देखा । विंध्याचल आहे जो कां ।
गुरु येतां संमुखा । नमितां होई दंडवत ॥१९॥

सांगेल अगस्ति शिष्यासी । वाढों नको म्हणेल त्यासी ।
गमन करितां शिखरेसी । भूमीसमान करील ॥२०॥

या कारणें तुम्ही आतां । काशीपुरा जावें तत्त्वतां ।
अगस्तीतें नमतां । दक्षिणेसी पाठवावें ॥२१॥

येणेंपरी इंद्रासी । सांगे ब्रह्मदेव हर्षी ।
निरोप घेऊन वेगेंसी । निघता झाला अमरनाथ ॥२२॥

देवासहित इंद्र देखा । सवें बृहस्पति ऐका ।
सकळ ऋषि मिळोनि देखा । आले काशी भुवनासी ॥२३॥

अगस्तीच्या आश्रमासी । पातले समस्त इंद्र ऋषि ।
देवगुरु महाऋषि । बृहस्पति सवें असे ॥२४॥

देखोनिया अगस्ति मुनि । सकळांतें अभिवंदोनि ।
अर्ध्यपाद्य देउनी । पूजा केली भक्तीनें ॥२५॥

देव आणि बृहस्पति । अगस्तीची करिती स्तुति ।
आणिक सवेंचि आणिती । लोपामुद्रा पतिव्रता ॥२६॥

देवगुरु बृहस्पति । सांगे पतिव्रताख्याति ।
पूर्वी पतिव्रता बहुती । लोपमुद्रासरी नव्हती ॥२७॥

अरुंधती सावित्री सती । अनुसया पतिव्रती ।
शांडिल्याची पत्नी होती । पतिव्रता विख्यात ॥२८॥

लक्ष्मी आणि पार्वती । शांतरूपा स्वयंभुपत्नी ।
मेनिका अतिविख्याती । हिमवंताची प्राणेश्वरी ॥२९॥

सुनीती ध्रुवाची माता । संज्ञादेवी सुर्यकांता ।
स्वाहादेवी विख्याता । यज्ञपुरुषप्राणेश्वरी ॥३०॥

यांहूनि आणिक ख्याता । लोपामुद्रा पतिव्रता ।
ऐका समस्त देवगण म्हणतां । बृहस्पति सांगतसे ॥३१॥

पतिव्रतेचें आचरण । सांगे गुरु विस्तारोन ।
पुरुष जेवितां प्रसाद जाण । मुख्य भोजन स्त्रियेसी ॥३२॥

आणिक सेवा ऐशी करणें । पुरुष देखोनि उभें राहणें ।
आज्ञेविण बैसों नेणे । अवज्ञा न करणें पतीची ॥३३॥

दिवस अखंड सेवा करणे अतिथि येतां पूजा करणें ।
पतिनिरोपावीण न जाणें । दानधर्म न करावा ॥३४॥

पतीची सेवा निरंतरीं । मनीं भाविजे हाचि हरि ।
शयनकाळी सर्व रात्रीं । सेवा करावी भक्तींसी ॥३५॥

पति निद्रिस्त झाल्यावरी । आपण शयन कीजे नारी ।
चोळी तानवडे ठेवावीं दुरी । तेणें पुरुषशरीर स्पर्शू नये ॥३६॥

स्पर्शे चोळी पुरुषासी । हानि होत आयुष्यासी ।
घेऊं नये नांव त्यासी । पति-आयुष्य उणें होय ॥३७॥

जागृत न होतां पति ऐका । पुढें उठीजे सती देखा ।
करणें सडासंमार्जन निका । करणें निर्मळ मंगलप्रद ॥३८॥

स्नान करूनि त्वरित । पूजूनि घ्यावें पतितीर्थ ।
चरणी मस्तक ठेवोनि यथार्थ । शिवासमान भावावें ॥३९॥

असतां ग्रामीं गृहीं पुरुष । सर्व शृंगार करणें हर्ष ।
ग्रामा गेलिया पुरुष । शृंगार आपण करुं नये ॥४०॥

पति निष्ठुर बोले जरी । आपण कोप कदा न करी ।
क्षमा म्हणोनी चरण धरी । राग न धरी मनांत ॥४१॥

पति येतां बाहेरुनी । सामोरी जाय तेक्षणी ।
सकळ कामें त्यजूनि । संमुख जाय पतिव्रता ॥४२॥

काय निरोप म्हणोनि । पुसावें ऐसें वंदोनि ।
जें वसे पतीच्या मनीं । त्याचपरी रहाटे ॥४३॥

पतिव्रतेचें ऐसें लक्षण । सांगेन ऐका देवगण ।
बहिर्द्वारी जातां जाण । अनेक दोष परियेसा ॥४४॥

बहिर्द्वारीं जाणें जरी । पाहूं नये नरनारीं ।
सवेंचि परतावें लवकरी । आपुले गुही असावें ॥४५॥

जरी पाहे बहिद्वारीं । उलूकयोनी जन्मे नारी ।
याच प्रकारे निर्धारी । पातिव्रत्य लोपामुद्रेचें ॥४६॥

लोपामुद्रा पतिव्रता । बाहेर न वचे सर्वथा ।
प्रात:काळ जो का होता । सडासंमार्जन करीतसे ॥४७॥

देवउपकरणी उजळोनि । गंधाक्षतांदि करूनि ।
पुष्पवाती पंचवर्णी । रंगमाळा देवांसी ॥४८॥

अनुष्ठानाहूनि पति येतां । सकळ आयती करी तत्त्वतां ।
धरोनि पतीच्या चित्ता । पतीसवें रहाटे ती ॥४९॥

पुरुषाचें उच्छिष्ट भोजन । मनोभावें करणें आपण ।
नसतां पुरुष ग्रामीं जाण । घ्यावा अतिथिधेनुप्रसाद ॥५०॥

अतिथीसी घालावे अन्न । अथवा धेनूतें पूजोन ।
भोजन करावें सगुण । पतिव्रता परियेसा ॥५१॥

गृह निर्मळ निरंतर करी । निरोपावेगळा धर्म न करी ।
व्रतोपवास येणेपरी । निरोपावेगळे न करी जाणा ॥५२॥

उत्साह होता नगरात । कधी पाहू न म्हणत ।
तीर्थयात्राविवाहार्थ । कधीही न वचे परियेसा ॥५३॥

पुरुष संतोषी असता जरी । दुश्चित नसावी त्याची नारी ।
पुरुष दुश्चित असता जरी । आपण संतोषी असो नये ॥५४॥

रजस्वला झालिया देखा । बोलो नये मौन्य निका ।
नायकावे वेद ऐका । मुख पुरुषा दाखवू नये ॥५५॥

ऐसे चारी दिवसांवरी । आचरावे तिये नारी ।
सुस्नात होता ते अवसरी । पुरुषमुख अवलोकिजे ॥५६॥

जरी नसे पुरुष भवनी । त्याचे रूप ध्यावे मनी ।
सूर्यमंडळ पाहोनि । घरात जावे पतिव्रते ॥५७॥

पुरुषआयुष्यवर्धनार्थ । हळदीकुंकुम लाविजे ख्यात ।
सेंदूर काजळ कंठसूत्र । फणी माथा असावी ॥५८॥

तांबूल घ्यावे सुवासिनी । असावी तिचे माथा वेणी ।
करी कंकणे तोडर चरणी । पुरुषासमीप येणेपरी ॥५९॥

न करी इष्टत्व शेजारणीशी । रजकस्त्रीकुंटिणीसी ।
जैनस्त्रीद्रव्यहीनेसी । इष्टत्व करिता हानि होय ॥६०॥

पुरुषनिंदक स्त्रियेसी । न बोलावे तियेसी ।
बोलता दोष घडे तिसी । पतिव्रतालक्षण ॥६१॥

सासू श्वशुर नणंद वहिनी । दीरभावाते त्यजुनी ।
राहता वेगळेपणी । श्वानजन्म पावती ॥६२॥

अंग धुवो नये नग्नपणे । उखळमुसळावरी न बैसणे ।
पाई विवरल्यावीण जाणे । फिरू नये पतिव्रते ॥६३॥

जाते उंबर्‍यावरी देखा । बैसो नये वडिलांसमुखा ।
पतिव्रतालक्षण ऐका । येणेपरी असावे ॥६४॥

पतीसवे विवाद । करिता पावे महाखेद ।
पतिअंतःकरणी उद्वेग । आपण कदा करू नये ॥६५॥

जरी असे अभाग्य पुरुष । नपुसक जरी असे देख ।
असे व्याधिष्ठ अविवेक । तरी देवासमान मानावा ॥६६॥

तैसा पुरुष असेल जरी । तोचि मानावा हरि ।
त्याचे बोलणे रहाटे तरी । परमेश्वरा प्रिय होय ॥६७॥

पतीचे मनी जी आवडी । तैसीच ल्यावी लेणी लुगडी ।
पति दुश्चित्त असता घडी । आपण श्रृंगार करू नये ॥६८॥

सोपस्कार पाहिजे जरी । न सांगावे आपण नारी ।
असता कन्या पुत्र जरी । तयामुखी सांगावे ॥६९॥

जरी नसेल जवळी कोण । वस्तूची दाखवावी खूण ।
अमुक पाहिजे म्हणोन । निर्धार करोनि न सांगिजे ॥७०॥

जितुके मिळाले पतीसी । संतुष्ट असावे मानसी ।
समर्थ पाहोनि कांक्षेसी । पतिनिंदा करू नये ॥७१॥

तीर्थयात्रे जाती लोक । म्हणूनि न गावे कौतुक ।
पुरुषाचे पादोदक । तेचि तीर्थ मानावे ॥७२॥

भागीरथीसमान देख । पतिचरणतीर्थ अधिक ।
पतिसेवा करणे मुख । त्रयमूर्ति संतुष्टती ॥७३॥

व्रत करणे असेल मनी । ते पुरुषा करावे पुसोनि ।
आत्मबुद्धी करिता कोणी । पति-आयुष्य उणे होय ॥७४॥

आणिक जाय नरकाप्रती । पति घेवोनि सांगाती ।
ऐसे बोलती वेदश्रुति । बृहस्पति सांगतसे ॥७५॥

पतीस क्रोधे उत्तर देती । श्वानयोनी जन्म पावती ।
जंबुक होवोनि भुंकती । ग्रामासन्निध येऊन ॥७६॥

नित्य नेम करणे नारी । पुरुष-उच्छिष्ट भोजन करी ।
पाद प्रक्षालोनि तीर्थधारी । घेवोनि तीर्थ जेवावे ॥७७॥

पति प्रत्यक्ष शंकर । काम्य होती मनोहर ।
पावे ती वैकुंठपुर । पतिसहित स्वर्गभुवना ॥७८॥

जावो नये वनभोजनासी । अथवा शेजारीगृहासी ।
इष्टसोयरे म्हणोनि हर्षी । प्रतिदिनी न जावे ॥७९॥

आपुला पुरुष दुर्बल किती । समर्थाची न करावी स्तुति ।
पति असता अनाचाररीती । आपण निंदा करू नये ॥८०॥

कैसा तरी आपुला पति । आपण करावी त्याची स्तुति ।
तोचि म्हणावा लक्ष्मीपति । एकभावे करोनिया ॥८१॥

सासूश्वशुर पुरुषांपुढे । नेटे बोलो नये गाढे ।
हासो नये त्यांपुढे । पति-आयुष्य उणे होय ॥८२॥

सासूश्वशुर त्यजून आपण । वेगळे असू म्हणे कवण ।
ऋक्षयोनी जन्मोन । अरण्यात हिंडेल ॥८३॥

पुरुष कोपे मारी जरी । मनी म्हणे हा मरो नारी ।
जन्म पावेल योनी व्याघ्री । महाघोर अरण्यात ॥८४॥

पर पुरुषाते नयनी पाहे । उपजता वरडोळी होय ।
पुरुषा वंचूनि विशेष खाय । ग्रामसूकर होय ती ॥८५॥

तोही जन्मी सोडोनि । उपजे वाघुळाचे योनी ।
आपुली विष्ठा आपण भक्षुनी । वृक्षावरी लोंबतसे ॥८६॥

पतिसंमुख निष्ठुर वचनी । उत्तर देती कोपोनि ।
उपजे मुकी होऊनि । सप्तजन्म दरिद्री ॥८७॥

पुरुष दुजी पत्‍नी करी । तिसी आपण वैर धरी ।
सप्त जन्मांवरी । दुर्भाग्यता होय अवधारा ॥८८॥

पुरुषावरी दुसरिया । दृष्टि ज्या करिती आवडिया ।
पतिता घरी जन्म पावोनिया । दुःखे सदा दारिद्र्य भोगिती ॥८९॥

पुरुष येता बाहेरुनी । संमुख जावे भामिनी ।
उदके पाद प्रक्षालुनी । विंझणा वारिजे श्रमहार ॥९०॥

पादसंवाहन भक्तीसी । मृदु वाक्य बोलिजे पतीसी ।
पुरुष होता संतोषी । त्रिमूर्ति संतोषती ॥९१॥

काय देती माता पिता । नेदी इष्टवर्ग बंधु भ्राता ।
इहपराची जोडी देता । पुरुष नारीचा देव जाण ॥९२॥

गुरु देव तीर्थे समस्ती । सर्व जाणावा आपुला पति ।
ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती । पतिव्रता त्याचि जाणा ॥९३॥

जीव असता शरीरासी । पवित्र होय समस्तांसी ।
जीव जाता क्षणे कैसी । कदा प्रेता नातळती ॥९४॥

तैसा पति प्राण आपला । पति नसता अशुचि तिला ।
या कारणे पतिच सकळा । प्राण आपुला जाणावा ॥९५॥

पति नसता स्त्रियेसी । सर्व अमंगळ परियेसी ।
विधवा म्हणजे प्रेतासरसी । अपत्य नसता अधिक जाण ॥९६॥

ग्रामास जाता परियेसी । विधवा भेटता संमुखेसी ।
मरण सांगे सत्य त्यासी । पुत्रासी अशुभ नव्हे जाणा ॥९७॥

माता विधवा असे जरी । पुत्रासी मंगळ शकुन करी ।
पुत्राविण विधवा नारी । नमन तिसी करू नये ॥९८॥

तिच्या आशीर्वादे आपण । मंगळ न होय सत्य जाण ।
तिचा हो का शाप मरण । तिसी कोणी बोलू नये ॥९९॥

या कारणे पतिव्रता । बरवे पुरुषासवे जाता ।
सर्व वैभव देहासहिता । केवी जाई परियेसा ॥१००॥

चंद्रासवे चांदणी जैसी । मेघासवे वीज कैसी ।
मावळता सवेचि जातसे । पतीसवे तैसे जावे ॥१॥

सहगमन करणे मुख्य जाण । थोर धर्मश्रुतीचे वचन ।
पूर्वज बेचाळीस उद्धरण । पतिव्रताधर्माने ॥२॥

पुरुष प्रेत झालियावरी । सहगमना जाता ते नारी ।
एकेक पाउली निर्धारी । अश्वमेघसहत्रपुण्य ॥३॥

पापी पुरुष असेल जाण । त्यासी आले जरी मरण ।
यमदूत नेती बांधून । नरकाप्रती परियेसा ॥४॥

पतिव्रता त्याची नारी । जरी सहगमन करी ।
जैसी सर्पासी नेती घारी । तैसी पतीते स्वर्गा नेई ॥५॥

सहगमन केलियावरी । पाहूनि यमदूत पळती दूरी ।
पतीसी सोडोनि सत्वरी । जाती यमदूत आपले पुरासी ॥६॥

पतिव्रताशिरोमणी । बैसविती विमानी ।
पावविती स्वर्गभुवनी । देवांगना ओवाळिती ॥७॥

यमदूत त्वरे पळती । काळाची न चाले ख्याती ।
पतिव्रता देखताचि चित्ती । भय वाटे म्हणताती ॥८॥

सूर्य भितो देखून तियेसी । तपतो तेजे मंदेसी ।
अग्नि भिउनी शांतीसी । उष्ण तिसी होऊ न शके ॥९॥

नक्षत्रे भिती पाहता तियेसी । आपुले स्थान घेईल ऐसी ।
जाय स्वर्गभुवनासी । पतीसहित परियेसा ॥११०॥

येणेपरी स्वर्गभुवनी । जाय नारी संतोषोनि ।
आपुले पतीस घेऊनि । राहे स्वर्गी निरंतर ॥११॥

तीन कोटि रोम तिसी । स्वदेह देता अग्नीसी ।
त्याची फळे असती कैशी । एकचित्ते ऐकावे ॥१२॥

एकेक रोम रोमासी । स्वर्गी राहे शतकोटि वर्षी ।
पुरुषासवे स्वानंदेसी । पतिव्रता राहे तेथे ॥१३॥

ऐसे पुण्य सहगमनासी । कन्या व्हावी ऐशी वंशी ।
बेचाळीस कुळे कैसी । घेऊन जाय स्वर्गाते ॥१४॥

धन्य तिची मातापिता । एकवीस कुळे उद्धरिता ।
धन्य पुरुषवंश ख्याता । बेचाळीस उद्धरिले ॥१५॥

ऐसे पुण्य सहगमनासी । पतिव्रतेच्या संगतीसी ।
आणिक सांगेन विस्तारेसी । देवगुरु म्हणतसे ॥१६॥

असेल नारी दुराचारी । अथवा व्याभिचारकर्म करी ।
त्याचे फळ अतिघोरी । एकचित्ते परियेसा ॥१७॥

उभय कुळे बेचाळिस । जरी असतील स्वर्गास ।
त्यासी घेउनि नरकास । प्रेमे जाय परियेसा ॥१८॥

अंगावरी रोम किती । तितुकी कोटि वर्षे ख्याती ।
नरकामध्ये पंचे निरुती । तिचे फळ ऐसे असे ॥१९॥

भूमिदेवी ऐसे म्हणे । पतिव्रतेच्या पवित्र चरणे ।
आपणावरी चालता क्षणे । पुनीत मी म्हणतसे ॥१२०॥

सूर्य चंद्र ऐसे म्हणती । आपली किरणे ज्योती ।
जरी पतिव्रतेवरी पडती । तरी आपण पावन होऊ ॥२१॥

वायु आणि वरुण । पतिव्रतेचिया स्पर्शाकारणे ।
पावन होऊ म्हणोन । स्पर्शे पुनीत होती ते ॥२२॥

घरोघरी स्त्रिया असती । काय करावी लावण्यसंपत्ति ।
जिचेनि वंश उद्धरती । तैसी स्त्री असावी की ॥२३॥

ज्याचे घरी पतिव्रता । दैवे आगळा तो तत्त्वता ।
करावे सुकृत जन्मशता । तरीच लाभे तैशी सती ॥२४॥

चतुर्विध पुरुषार्थ देखा । स्त्रियेच्या संगती लाघे लोका ।
पतिव्रता सती अधिका । पुण्यानुसार लाभे जना ॥२५॥

ज्याचे घरी नाही सती । पुण्ये त्यासी काही न घडती ।
यज्ञादि कर्मे ख्याति । सती असता होती जाण ॥२६॥

सती नसे ज्याचे घरी । त्यासी अरण्य नाही दूरी ।
वृथा जन्मोनि संसारी । कर्मबाह्य तोचि जाणा ॥२७॥

ऐसी सती मिळे ज्यासी । समस्त पुण्य होय त्यासी ।
पुत्रसंतान परलोकासी । साधन होय सतीचेनि ॥२८॥

स्त्रियेवीण असेल नर । तयासी न साधे कर्माचार ।
कर्महीन देव पितर । कर्मार्ह नव्हे कदा ॥२९॥

पुण्य जोदे गंगास्नानी । त्याहूनि पतिव्रतादर्शनी ।
महापापी होय पावन । सप्त जन्म पुनीत ॥१३०॥

पतिव्रतेचा आचार । सांगे पतिव्रतेसी योगेश्वर ।
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे बृहस्पति देवगुरु ॥३१॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र पुण्यराशी ।
ऐकता पावती सद्गतीसी । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥३२॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । पतिव्रतानिरूपण विख्यात ।
ऐकता होय पुनीत । जे जे चिंतिले पाविजे ॥३३॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे पतिव्रताख्यानं नाम एकत्रिंशोऽध्यायः ॥३१॥

॥ ओवीसंख्या ॥१३३॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरुचरित्र – अध्याय बत्तिसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

पतिव्रतेचिया रिति । सांगे देवा बृहस्पति ।
सहगमनी फलश्रुति । येणेपरी निरोपिली ॥१॥

विधवापणाचा आचारू । सांगता झाला देववरू ।
पुसताती ऋषेश्वरू । ऐका श्रोते एकचित्ते ॥२॥

जवळी नसता आपुला पति । त्याते मरण झालिया प्राप्ति ।
काय करावे त्याचे सती । सहगमन केवी करावे ॥३॥

अथवा असेल गरोदरी । असे तीते कन्याकुमरी ।
काय करावे तिये नारी । म्हणून विनविती गुरूसी ॥४॥

ऐकोनि देवांचे वचन । सांगता जाला विस्तारोन ।
एकचित्ते करून । ऐका श्रोते सकळ ॥५॥

पति जवळी असे जरी । सहगमनी जावे तिये नारी ।
असता आपण गरोदरी । करू नये सहगमन ॥६॥

स्तनपानी असता कुमारू । तिणे करिता पाप थोरू ।
पुरुष मेला असेल दुरू । सहगमन करू नये ॥७॥

तिणे असावे विधवापणे । विधिपूर्वक आचरणे ।
सहगमासमाने । असे पुण्य परियेसा ॥८॥

विधवापणाचा आचारू । करिता असे पुण्य थोरू ।
निवर्तता आपुला भ्रतारू । केशवपन करावे ॥९॥

ज्या का विधवा केश राखिती । त्यांची ऐका फलश्रुति ।
केश पुरुषासी बाधिती । नरकापरी परियेसा ॥१०॥

यास्तव करणे केशवपण । करावे तिणे नित्य स्नान ।
एक वेळा भोजन । करावे तिणे परियेसा ॥११॥

एक धान्याचे अन्न । करावे तिणे भोजन ।
तीन दिवस उपोषण । करावे तिणे भक्तीने ॥१२॥

पाच दिवस पक्षमासास । करावा तिणे उपवास ।
अथवा चांद्रायणग्रास । भोजन करणे परियेसा ॥१३॥

चंद्रोदय बीजेसी । एक ग्रास तया दिवसी ।
चढते घ्यावे पंधरा दिवसी । पौर्णिमेसी भोजन ॥१४॥

कृष्णपक्षी येणेपरी । ग्रास घ्यावे उतरत नारी ।
अमावास्या येता जरी । एक ग्रास जेवावा ॥१५॥

शक्ति नाही जियेसी । एकान्न जेवावे परियेसी ।
अथवा फल-आहारेसी । अथवा शाका-आहार देखा ॥१६॥

अथवा घ्यावे क्षीर मात्र । कधी न घ्यावे अपवित्र ।
जेणे राहे प्राण मात्र । श्वासोच्छ्वास चाले ऐसे ॥१७॥

शयन करिता मंचकावरी । पुरुष घाली रौरव घोरी ।
भोगी नरक निरंतरी । पतीसहित परियेसा ॥१८॥

करू नये मंगलस्नान । अथवा देहमर्दन ।
गंध परिमल तांबूल जाण । पुष्पादि तिणे वर्जावे ॥१९॥

पुत्रावीण असे नारी । करणे तर्पण पुत्रापरी ।
तीळ दर्भ कुशधारी । गोत्रनाम उच्चारावे ॥२०॥

विष्णुपूजा करावी नित्य । आपुला पुरुष हा निश्चित ।
पुरुष आठवोनि चित्त । विष्णुस्थानी मानिजे ॥२१॥

पुरुष असता जेणेपरी । पतिनिरोपे आचार करी ।
तेणेचि रीती विष्णु अवधारी । त्याचे निरोपे आचरावे ॥२२॥

तीर्थयात्रा उपासव्रत । विष्णुनिरोपे करावे निश्चित ।
अथवा गुरु द्विज विख्यात । त्यांचे निरोपे आचरावे ॥२३॥

आपण असता सुवासिनी । ज्या वस्तूची प्रीति अंतःकरणी ।
तैशी वस्तु द्यावी धणी । विद्वज्जनविप्रांसी ॥२४॥

वैशाख माघ कार्तिकमास । अनेक स्नानी आचारविशेष ।
माघस्नान तीर्थास । विष्णुस्मरणे करावे ॥२५॥

वैशाखी जळकुंभदान । कार्तिकी दीपआराधन ।
ब्राह्मणा द्यावे घृतदान । यथाशक्त्या दक्षिणेसी ॥२६॥

माघमासी तिळघृतेसी । द्यावे दान विप्रांसी ।
अरण्यात वैशाखमासी । पोई घालिजे निर्मळोदके ॥२७॥

शिवालयी ईश्वरावरी । गळती ठेविजे निर्मळ वारी ।
गंध परिमळ पूजा करी । तेणे पुण्य अगाध ॥२८॥

विप्राचिया घरोघरी । उदक घालिजे शक्त्यानुसारी ।
अन्न द्यावे निर्धारी । अतिथिकाळी परियेसा ॥२९॥

तीर्थयात्रे जात्या लोका । त्याते द्याव्या छत्रपादुका ।
येता आपल्या गृहांतिका । पादप्रक्षालन करावे ॥३०॥

वारा घालावा विझणेसी । वस्त्र द्यावे परिधानासी ।
गंध तांबूल परिमळासी । कर्पूरवेलादि परियेसा ॥३१॥

जलपात्र द्यावे शक्तीसी । गुडपान आम्रपानेसी ।
द्राक्षे कर्दळीफळेसी । ब्राह्मणा द्यावे मनोहर ॥३२॥

जे जे दान द्यावे द्विजा । पतीच्या नावे अर्पिजे वोजा ।
संकल्पून पुरुषकाजा । धर्म करणे येणेपरी ॥३३॥

कार्तिकमासी जवान्न । अथवा जेविजे एकान्न ।
वृताक माष मसूर लवण । तैलादि मधु वर्जावे ॥३४॥

वर्जावे कास्यपात्र । आणिक वर्जावे द्विदलमात्र ।
मनी असावे पवित्र । एकाग्रेसी परियेसा ॥३५॥

पलाशपात्री भोजन करावे । शुचि उद्यापन करावे ।
जे जे व्रत धराते । त्याते उजवावे तत्त्वता ॥३६॥

घृतभरित कास्यपात्र । विप्रा द्यावे पवित्र ।
भूमिशयन केले व्रत । मंचक द्यावा विप्रासी ॥३७॥

जे जे वस्तु त्यजिली आपण । ते ते द्यावी ब्राह्मणालागून ।
रसद्रव्ये एक मास जाण । त्याग करावी परियेसा ॥३८॥

त्यजूनिया दधि क्षीर । उद्यापन आचार मनोहर ।
असलिया शक्त्यनुसार । धेनु द्यावी सालंकृत ॥३९॥

विशेषे असे आणिक व्रत । दीपदान असे ख्यात ।
वर्णिता महिमा अनंत । देवांसी म्हणे बृहस्पति ॥४०॥

दीपदान भाग सोळा । वरकड नसती धर्म सकळा ।
या कारणे अनंतफळा । दीपदान करावे ॥४१॥

माघस्नान माघमासी । करणे सूर्योदयासी ।
येणेपरी एक मासी । आचरावे भक्तीने ॥४२॥

लाडू तिळ खर्जुरेसी । करूनि पक्वान्ने ब्राह्मणांसी ।
द्यावी तिणे भक्तीसी । दक्षिणेसहित जाणा ॥४३॥

शर्करा मिरे एळेसी । तळून अपूप घृतेसी ।
दान द्यावे यतीसी । भोजन द्यावे अतीता ॥४४॥

हेमंतऋतु होता जाण । व्हावया शीतनिवारण ।
काष्ठे द्यावी विप्राकारणे । वस्त्रे द्यावी द्विजांसी ॥४५॥

पर्यंक द्यावा सुषुप्तीसी । एखाद्या भल्या ब्राह्मणासी ।
चित्र रक्त वस्त्रेसी । कंबळ द्यावे विप्रवर्गा ॥४६॥

व्हावया शीतनिवारण । औषध द्यावे उष्ण उष्ण ।
तांबूलदान परिपूर्ण । द्यावे एळाकर्पूरेसी ॥४७॥

गृहदान द्यावे विप्रासी । सांवत्सरिक ग्रामेसी ।
जाता तीर्थयात्रेसी । पादरक्षा देईजे ॥४८॥

गंध परिमळ पुष्पेसी । पूजा करावी केशवासी ।
रुद्राभिषेक विधींसी । अभिषेकावा गौरीहर ॥४९॥

धूप दीप नैवेद्यसी । पूजा करावी षोडशी ।
प्रीति बहु शंकरासी । दीपमाळा उजळिता ॥५०॥

आणिक सुगंध गंधेसी । तांबूलदान विधींसी ।
कर्पूरलवंगादि विविधेसी । भक्तिभावे अर्पिजे ॥५१॥

आपला पुरुष ध्यावोनि मनी । नारायण तो म्हणोनि ।
पूजा करावी एके मनी । भक्तिभावे परियेसा ॥५२॥

नेमे असावे तिये नारी । न बैसावे बैलावरी ।
लेवू नये चोळी करी । श्वेतवस्त्र नेसावे ॥५३॥

रक्त कृष्ण चित्र वस्त्र । लेता जाण दोष बहुत ।
आणिक असे व्रत । पुत्राचे बोल वर्तावे ॥५४॥

’आत्मा वै पुत्र नाम’ । म्हणून बोलती वेदागम ।
पतीपासून पुत्रजन्म । पुत्रआज्ञेत असावे ॥५५॥

ऐसा आचार विधवेसी । असे शास्त्रपुराणेसी ।
जरी आचरती भक्तीसी । सहगमनाचे फळ असे ॥५६॥

पापी जरी पति असला । असेल पूर्वी निवर्तला ।
नरकामध्ये वास्ल केला । पापरूपे भुंजत ॥५७॥

विधवापणे येणेपरी । आचरण करी जे नारी ।
मरण होता अवसरी । घेवोनि पति स्वर्गी जाय ॥५८॥

जितुक्या परी बृहस्पति । सांगे समस्त देवांप्रती ।
लोपामुद्रेची केली स्तुति । पतिव्रताशिरोमणि ॥५९॥

जितुक्या पतिव्रता नारी । समस्त भागीरथी सरी ।
त्यांचे पुरुष शंकरापरी । पूजा करावी दोघांची ॥६०॥

ऐसे बृहस्पतीचे वचन । सांगितले मनी विस्तारोन ।
ऐक बाळे तव मन । ज्यावरी प्रीति तेचि करी ॥६१॥

दुःख सकळ त्यजोनि । मम बोल ठेवी मनी ।
सांगितले तुजलागोनि । परलोकसाधन ॥६२॥

धैर्य जरी असेल तुजसी । सहगमन करी पतीसरसी ।
विधवापणे आचार करिसी । तेही पुण्य तितुकेची ॥६३॥

जे आवड तुझे मनी । सांग माये विस्तारोनि ।
हस्त मस्तकी ठेवूनि । पुसतसे प्रेमभावे ॥६४॥

ऐकोनि तया अवसरी । केले नमन तिये नारी ।
विनवीतसे करुणोत्तरी । भक्तिभावे करूनिया ॥६५॥

जय जयाजी योगीश्वरा । तूचि पिता सहोदरा ।
माझा प्राण मनोहरा । जनक जननी तूचि होसी ॥६६॥

आल्ये आपण परदेशात । जवळी नाही बंधुभ्रात ।
भेटलेती तुम्ही परमार्थ । अंतकाळी सोयरा ॥६७॥

सांगितले तुम्ही आचार दोनी । कष्ट बहु विधवापणी ।
अशक्य आम्हा न-टाके स्वामी । असाधारण असे दातारा ॥६८॥

तारुण्यपण मजसी । लावण्य असे देहासी ।
निंदापवाद शरीरासी । घडेल केवी वर्तमान ॥६९॥

संतोष होतो माझे मनी । पुण्य अपार सहगमनी ।
पतीसवे संतोषोनि । जाईन स्वामी निर्धारे ॥७०॥

म्हणूनि मागुती नमस्कारी । माथा ठेवी चरणांवरी ।
स्वामी माते तारी तारी । भवसागरी बुडतसे ॥७१॥

करुणाकृपेचा सागर । उठवीतसे योगेश्वर ।
देता झाला अभयकर । म्हणे पतीसवे जावे ॥७२॥

तोचि ठाव पुरुषासी । जाय माते सांगतेसी ।
सांगेन तुज विशेषी । ऐक माते एकचित्ते ॥७३॥

आलात तुम्ही दर्शनी । श्रीगुरुभेटीलागोनि ।
आरोग्य होईल म्हणोनि । भक्तिभावेकरूनिया ॥७४॥

होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी जिंकिले नाही कोणी ।
जैशी ईश्वरनिर्वाणी । तैसेपरी होतसे ॥७५॥

ब्रह्मलिखित न चुके जाण । जे जे भोगणे असेल आपण ।
घडे तैसे श्रुतिवचन । दुःख कोणी करू नये ॥७६॥

हरिश्चंद्र राजा देख । डोंबाघरी वाहे उदका ।
बळी अजिंक्य ऐका । तोही गेला पाताळा ॥७७॥

सहस्त्रकोटि वर्षे ज्यासी । आयुष्य असे रावणासी ।
काळ तयाप्रति ग्रासी । दुर्योदह्ना काय झाले ॥७८॥

भीष्मदेव इच्छारमनी । तेही पडले रणांगणी ।
परीक्षिती सर्पाभेणी । लपता काय झाले तया ॥७९॥

अनंत अवतार येणेपरी । होऊनि गेले संसारी ।
देव दानव येणेपरी । सकळ काळाआधीन ॥८०॥

या कारणे काळासी । कोणी जिंकिले नाही क्षितीसी ।
सकळ देवदानवांसी । काळ जिंकी निर्धारे ॥८१॥

काळा जिंकिता नाही कोणी । एका श्रीगुरुवाचोनि ।
भाव असे ज्याचे मनी । त्यासी प्रत्यक्ष असे जाणा ॥८२॥

आता तुम्ही ऐसे करणे । जावे त्वरित सहगमने ।
अंतकाळ होता क्षणे । श्रीगुरुदर्शना जाय म्हणे ॥८३॥

म्हणोनि भस्म तये वेळी । लाविता झाला कपाळी ।
रुद्राक्ष चारी तत्काळी । देता जहाला तये वेळी ॥८४॥

योगी बोले तियेसी । रुद्राक्ष बांधी कंठासी ।
दोनी प्रेतकर्णासी । बांधोनि दहन करावे ॥८५॥

आणिक एक सांगेन तुज । गुरुदर्शना जाई सहज ।
रुद्रसूक्त म्हणती द्विज । गुरुचरण प्रक्षाळिता ॥८६॥

तेचि तीर्थ घेवोनि । आपुला देह प्रोक्षोनि ।
प्रेतावरी आणोनि । प्रोक्षण करावे भक्तीने ॥८७॥

मग जावे सहगमनेसी । वाणे द्यावी सुवासिनींसी ।
अनेक द्रव्ये वेचूनि हर्षी । विप्रा तोषवावे बहुत ॥८८॥

ऐशा परी तियेसी । सांगोनि गेला तापसी ।
पतिव्रता भावेसी । करी आयती त्या वेळी ॥८९॥

भले ब्राह्मण बोलावूनि । षोडश कर्मे आचरोनि ।
प्रेतासी प्रायश्चित्त देवोनि । औपासन करविताती ॥९०॥

सुस्नात होवोनि आपण । पीतांबर नेसोन ।
सर्वाभरणे लेवोन । हळदी कुंकू लावितसे ॥९१॥

औपासन प्रेतासी । करविताती विधींसी ।
प्रेत बांधोनि काष्ठेसी । घेवोनि गेले गंगेत ॥९२॥

अग्नि घेऊनि तळहातेसी । निघाली पतिव्रता कैसी ।
आनंद बहु मानसी । प्रेतापुढे जातसे ॥९३॥

सोळा वरुषांचे तारुण्यपण । सुंदर रुप लावण्य ।
ल्याइलीसे आभरणे । लक्ष्मीसरसी दिसतसे ॥९४॥

मिळोनिया नगरनारी । पाहो आल्या सहस्त्र चारी ।
माथा तुकविती सकळी । पतिव्रता म्हणोनिया ॥९५॥

एक म्हणती काय नवल । पूर्ववयेसी असे बाळ ।
काय दैव पूर्वफळ । पतीसवे जातसे ॥९६॥

देखिले नाही पतीचे मुख । नाही जहाले की बाळक ।
कैसा जीव झाला एक । आनंदरूपे जातसे ॥९७॥

म्हणती शिकवा इसी । वाया का हो जीव देसी ।
परतूनि जाई माहेरासी । आपुल्या मातापित्याजवळी ॥९८॥

एक म्हणती ज्ञानवंता । सत्य नारी पतिव्रता ।
बुद्धि दे गा जगन्नाथा । सकळ स्त्रिया ऐसीच ॥९९॥

धन्य इची मातापिता । बेचाळीस उद्धरले आता ।
प्रेतापुढे चालता । एकैक पाउला अश्वमेधफळ ॥१००॥

येणेपरी नदीतीरासी । गेली नारी पतीसरसी ।
कुंड केले अग्नीसी । काष्ठे शेणी अपरिमित ॥१॥

अग्निकुंडसन्निधेसी । ठेविले तया प्रेतासी ।
बोलावोनि सुवासिनींसी । देई झाली वाण देखा ॥२॥

सुपे चोळी कुंकुमेसी । हळदी काजळ परियेसी ।
तोडर कंठसूत्रेसी । सुवासिनींसी देतसे ॥३॥

गंधपुष्पादि परिमळेसी । पूजा केली सुवासिनींसी ।
द्रव्य दिधले अपारेसी । समस्त ब्राह्मणा तये वेळी ॥४॥

नमन करोनि समस्तांसी । निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी ।
लोभ असो द्यावा म्हणतसे ॥५॥

माझा पिता शूलपाणी । उमा गौरी अंतःकरणी ।
आम्हा बोलाविले सगुणी । प्रेमभावे करूनिया ॥६॥

आली श्रावणी दिपवाळी । आम्ही जातो मातेजवळी ।
पतीसहित मने निर्मळी । जाते लोभ असो द्यावा ॥७॥

समागमे लोक आपुले । होते जे का सवे आले ।
त्यांसी सांगतसे बाळे । परतोनि जावे ग्रामासी ॥८॥

पुसता श्वशुरमामेसी । त्याते न सांगावे परियेसी ।
प्राण देतील आम्हांसी । हत्या तुम्हा घडेल ॥९॥

त्यासी तुम्ही सांगावे ऐसे । क्षेम आहे तीर्थवासे ।
भीमातीरस्थान ऐसे । श्रीगुरूचे सन्निधानी ॥११०॥

आलो श्रीगुरुदर्शनासी । आरोग्य झाले पतीसी ।
राहिलो आपण संतोषी । म्हणोनि सांगा घरी आमुचे ॥११॥

ऐसे सांगा श्वशुरमामींसी । आमुचे मातापितयादिकांसी ।
इष्टजन सोयरियांसी । सांगा येणेपरी तुम्ही ॥१२॥

ऐसे वचन ऐकोन । दुःख पावले सकळ जन ।
आपण असे हास्यवदन । प्रेताजवळी उभी देखा ॥१३॥

अग्निकुंडी तये क्षणी । घालिताती काष्ठ शेणी ।
तो आठवण झाली झणी । योगेश्वराचा उपदेश ॥१४॥

मग रुद्राक्ष काढोनिया दोनी । बांधिले प्रेताचिया श्रवणी ।
कंठसूत्री दोन ठेवोनि । पुसतसे ब्राह्मणांसी ॥१५॥

विनवीतसे द्विजांसी । संकल्प केला म्या मानसी ।
श्रीगुरुमूर्ति आहे कैसी । आपल्या दृष्टी पाहीन ॥१६॥

दृष्टी देखोनिया स्वामीसी । त्वरित येईन अग्निकुंडापासी ।
आज्ञा झालिया वेगेसी । त्वरित येईन म्हणतसे ॥१७॥

ऐकोनि तियेचे वचन । बोलताती विद्वज्जन ।
दहन होता अस्तमान । त्वरित जाउनी तुम्ही यावे ॥१८॥

पुसोनिया विप्रांसी । निघाली नारी संगमासी ।
जेथे होता ह्रषीकेशी । श्रीनरसिंहसरस्वती ॥१९॥

सर्व येती नरनारी । विप्रमेळा नानापरी ।
कौतुक पाहती मनोहरी । पतिव्रता स्त्रियेची ॥१२०॥

जाता मार्गी स्तोत्र करी । म्हणे स्वामी नरकेसरी ।
अभाग्य आपुले पूर्वापरी । म्हणोनि आम्हा अव्हेरिले ॥२१॥

तूचि दाता सर्वेश्वर । शरणागतांचा आधार ।
ऐसे तुझे ब्रीद थोर । कामी आपण न लाधेची ॥२२॥

हेळामात्रे त्रिभुवनासी । रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी ।
सत्त्वगुणे सृष्टीसी । प्रतिपाळिसी तूचि स्वामी ॥२३॥

तमोगुणे निश्चयेसी । प्रलय समस्त जीवांसी ।
त्रिगुण तूचि होसी । त्रिमूर्ति तूचि देवा ॥२४॥

तुजपाशी सर्व सिद्धि । ओळंघिती तव विधी ।
देखिली आमुची कुडी बुद्धि । जाणोनि माते अव्हेरिली ॥२५॥

एखादा नर बाधा करी । जाणोनि सांगती राजद्वारी ।
क्षण न लागता अवसरी । राजा साह्य करी तयांचे ॥२६॥

रोग होता मनुष्यासी । जाऊनिया वैद्यापासी ।
औषध करी तात्काळेसी । आरोग्य तया होतसे ॥२७॥

तू त्रिमूर्तीचा अवतार । ख्याति झाली अपरंपार ।
सर्व भक्तजना आधार । म्हणोनि सेविती सकळ जन ॥२८॥

अपराध आपण काय केले । भेटीसी वीस गावे आले ।
मातापिता विसरले । तुझ्या ध्याने स्वामिया ॥२९॥

होसी तूचि मातापिता । म्हणोनि आल्ये धावता ।
भेटी होता आरोग्यता । पतीस व्हावी म्हणोनिया ॥१३०॥

आपुले समान असती नारी । त्या नांदता पुत्रपौत्री ।
आपण झाल्ये दगडापरी । पुत्र नाही आपणासी ॥३१॥

पति आपुला सदा रोगी । कैचा पुत्र आपणालागी ।
तरी याचि काम्यालागी । निघोनि आल्ये स्वामिया ॥३२॥

आरोग्य होईल पतीसी । पुत्र होतील आपणासी ।
आशा धरून मानसी । आल्ये स्वामी कृपासिंधु ॥३३॥

पुरले माझे मनोरथ । आरोग्य झाला प्राणनाथ ।
पुत्र झाले बहुत । नवल झाले स्वामिया ॥३४॥

मनोरथ पावला सिद्धीसी । म्हणोनि आल्ये पुसावयासी ।
जाते आता परलोकासी । कीर्ति तुझी घेवोनि ॥३५॥

ऐशा परी ध्यान करीत । आली अमरजासंगमी त्वरित ।
वृक्ष असे अश्वत्थ । देखती झाली स्वामिया ॥३६॥

उभी ठाकोनिया दुरी । तया साष्टांग नमन करी ।
श्रीगुरु म्हणे त्या अवसरी । सुवासिनी होय ध्रुव ॥३७॥

ऐसे म्हणता मागुती । नमन करी एकभक्ती ।
पुनरपि स्वामी तेणेच रीती । अष्टपुत्रा होय म्हणतसे ॥३८॥

ऐसे ऐकोनिया वचन । हास्य करिती सकळ जन ।
सांगताती विस्तारोन । गुरूलागी सत्वर ॥३९॥

विप्र म्हणती स्वामीसी । इचा पति पंचत्वासी ।
पावला परंधामासी । सुवासिनी केवी होय ॥४०॥

प्रेत नेले स्मशानासी । ही आली सहगमनासी ।
निरोप घ्यावया तुम्हापासी । आली असे स्वामिया ॥४१॥

तुमचा निरोप घेवोनि । अग्निकुंडा जावोनि ।
समागमे पतिशयनी । दहन करणे तियेसी ॥४२॥

ऐकोनि त्याचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन ।
इचे स्थिर अहेवपण । मरण केवी घडे इसी ॥४३॥

गुरु म्हणती जा वेळी । आणा प्रेत आम्हाजवळी ।
प्राण गेला कवणे वेळी । पाहू म्हणती अवधारा ॥४४॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । आमुचे बोल जहाले इसी ।
अहेवपण स्थिर इसी । संदेह न धरावा मनात ॥४५॥

या बोलाचा निर्धारू । करील आता कर्पूरगौरू ।
नका प्रेत संस्कारू । आणा प्रेत आम्हांजवळी ॥४६॥

श्रीगुरूचा निरोप होता । आणो गेले धावत प्रेता ।
पहाती लोक कौतुका । अभिनव म्हणताती ॥४७॥

इतुके होता ते अवसरी । आले विप्र तेथवरी ।
पूजा करिती मनोहरी । श्रीगुरुची भक्तीने ॥४८॥

रुद्रसूक्त म्हणोनि । अभिषेक करिती श्रीगुरुचरणी ।
षोडशोपचारी विस्तारोनि । पूजा करिती भक्तीने ॥४९॥

तीर्थपूजा नानापरी । पूजा करिती उपचारी ।
इतुकीया अवसरी । घेउनी आले प्रेतासी ॥१५०॥

प्रेत आणोनिया देखा । ठेविले श्रीगुरुसंमुखा ।
श्रीगुरु म्हणती विप्रलोका । सोडा वस्त्र दोर त्याचे ॥५१॥

चरणतीर्थ त्यावेळी । देती तया विप्रांजवळी ।
प्रोक्षा म्हणती तात्काळी । प्रेत सर्वांगी स्नपन करा ॥५२॥

श्रीगुरुनिरोपे ब्राह्मण । प्रेतासी करिती तीर्थस्नपन ।
अमृतदृष्टीसी आपण । पाहती प्रेत अवधारा ॥५३॥

पाहता सुधादृष्टीकरून । प्रेत झाले संजीवन ।
उठोनि बैसे तत्क्षण । अंग मुरडीत परियेसा ॥५४॥

नग्न म्हणुनी लाजत । प्रेत झाले सावचित्त ।
नवे वस्त्र नेसत । येवोनि बैसे एकीकडे ॥५५॥

बोलावोनि स्त्रियेसी । पुसतसे विस्तारेसी ।
कोठे आणिले मजसी । यतीश्वर कोण सांगे ॥५६॥

इतुके लोक असता का । का वो तू न करसी चेता ।
निद्रा आली मदोन्मत्ता । म्हणोनि सांगे स्त्रियेसी ॥५७॥

ऐकून पतीचे वचन । सांगती झाली विस्तारून ।
उभी राहून दोघेजण । नमन करिती श्रीगुरूसी ॥५८॥

चरणी माथा ठेवून । स्तोत्र करिती दोघेजण ।
पहाती लोक सर्व जन । महा आनंद प्रवर्तला ॥५९॥

म्हणती पापरूपी आपण । पाप केले दारुण ।
पापापासाव अनुसंधान । जन्म जहालो परियेसी ॥१६०॥

दुर्बुद्धीने वर्तलो । पापसागरी बुडालो ।
तुझे चरण विसरलो । त्रयमूर्ती जगद्‍गुरु ॥६१॥

सकळ जीवमात्रांसी । रक्षिता शंकर तू होसी ।
ख्याति तव त्रिभुवनासी । शरणागता रक्षिसी ॥६२॥

त्राहि त्राहि जगद्‍गुरु । विश्वमूर्ति परात्परु ।
ब्रह्मा विष्णु शंकरु । सच्चिदानंदस्वरूप तू ॥६३॥

त्राहि त्राहि विश्वकर्ता । त्राहि त्राहि जगद्‍भर्ता ।
कृपासागरा जगन्नाथा । भक्तजनविश्रामा ॥६४॥

जय जयाजी गुरुमूर्ति । जटाजूट पशुपति ।
अवतरलासी तू क्षिती । मनुष्यदेह धरूनिया ॥६५॥

त्राहि त्राहि पिनाकपाणि । त्राहि देवा तू शिरोमणि ।
भक्तजन पाळोनि । रक्षितोसी निरंतर ॥६६॥

सर्वा भूती तूचि वससी । नमन तुझे चरणांसी ।
मज ऐसे गमलासी । मातारूप वर्तत तू ॥६७॥

त्रिभुवनी तव करणी । माथा ठेविला तुझे चरणी ।
निश्चय केला माझे मनी । पुनर्जन्म नव्हे आता ॥६८॥

विश्वकारण करिसी । हेळामात्रे सृष्टि रचिसी ।
मज ऐसे गमलासी । अज्ञानरूपे वर्तत ॥६९॥

तुझे न ऐके एखादा जरी । कोपसी त्वरित त्यावरी ।
माझे मनी येणेपरी । निष्कलंक तू दिसतोसी ॥१७०॥

क्रोध नाही तुझे मनी । आनंदमूर्ति तूचि सहस्त्रगुणी ।
भक्तजना संरक्षणी । कृपासागर स्वामिया ॥७१॥

जीवमात्रा कृपा करिसी । शरणागताते रक्षिसी ।
इहपर सौख्याते देसी । चतुर्विध पुरुषार्थ ॥७२॥

तूचि करुणेचा सागरू । चिन्मात्रा अगोचरू ।
श्रीनरसिंहसरस्वती गुरु । क्षमा करणे स्वामिया ॥७३॥

ऐसी नानापरीसी । स्तोत्रे केली श्रीगुरूसी ।
श्रीगुरुमूर्ति संतोषी । आश्वासिती तये वेळी ॥७४॥

अष्ट पुत्र पूर्णायुषी । होतील सत्य तुजसी ।
हो का श्रीमंत अतिहर्षी । गेले तुमचे पूर्वदोष ॥७५॥

चतुर्विध पुरुषार्थ । लभ्य झाले तुम्हांसी यथार्थ ।
सांडोनि संदेह त्वरित । सुखे असा म्हणती गुरु ॥७६॥

इतुके होता ते अवसरी । मिळाल्या होत्या नरनारी ।
जयजयकार अपरंपारी । प्रवर्तला तये वेळी ॥७७॥

नमन करिती सकळ जन । स्तोत्र करिताती गायन ।
करिताती नीरांजन । जयजयकार प्रवर्तला ॥७८॥

तयामध्ये विप्र एक । होता धूर्त कुबुद्धिक ।
आपुले मनी आणोनि तर्क । श्रीगुरूसी पुसतसे ॥७९॥

विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंती स्वामी परियेसी ।
संशय आमुचे मानसी । होत आहे स्वामिया ॥१८०॥

वेदशास्त्रे पुराणे । बोलताती सनातने ।
ब्रह्मलिखित सत्य जाणे । म्हणोनि वाक्य निर्धारी पा ॥८१॥

घडला नाही अपमृत्यु यासी । दिवामरण परियेसी ।
आला कैसा जीव यासी । ब्रह्मलिखित सत्य मिथ्या ॥८२॥

न कळे याच्या अभिप्राया । निरोपावे गुरुराया ।
गुरु म्हणती हासोनिया । तया मूर्ख ब्राह्मणासी ॥८३॥

गुरु म्हणती तयासी । सांगेन तुज विस्तारेसी ।
पुढील जन्माच्या आयुष्यासी । उसने घेतले परियेसा ॥८४॥

आम्ही तया बह्मदेवासी । मागून घेतले करुणेसी ।
पुढले जन्मी परियेसी । वर्षे तीस संख्या पै ॥८५॥

भक्तजन रक्षावयासी । मागून घेतले ब्रह्मदेवासी ।
म्हणून सांगती विस्तारेसी । तया विप्रवर्गाते ॥८६॥

तटस्थ झाले सकळ जन । साष्टांग करिती नमन ।
गेले आपुलिया भुवना । ख्याति झाली चहू राष्ट्रा ॥८७॥

पतिव्रतेने पतीसहित । स्नान केले संगमात ।
अंतःकरणी संतोष बहुत । पूजा करिती भक्तीसी ॥८८॥

अपार द्रव्य वेचोनि । विप्र तोषवोनि आराधनी ।
सूर्य जाता अस्तमानी । येती गुरूच्या मठासी ॥८९॥

स्त्रीपुरुष नमस्कार । करिताती वारंवार ।
पूजासामग्री उपचार । आरती करिती श्रीगुरूसी ॥१९०॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले ते ऐका ।
कथा असे अपूर्व देखा । सांगेन ऐका एकचित्ते ॥९१॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार ।
ऐकता पावन मनोहर । सकळाभीष्टे पावती ॥९२॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । उठविले विप्राचे प्रेत ।
सौभाग्य देवोनि अद्‌भुत । परम तयासी तोषविले ॥१९३॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ओवीसंख्या १९३ ॥






गुरुचरित्र – अध्याय तेहेतिसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा ।
विनवीतसे भाकूनि करुणा । भक्तिभावेकरोनि ॥१॥

म्हणे स्वामी सिद्धमुनि । पूर्वकथानुसंधानी ।
पतीसह सुवासिनी । आली श्रीगुरुसमागमे ॥२॥

श्रीगुरु आले मठासी । पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्तारोनि कृपेसी । निरोपावी स्वामिया ॥३॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । दुजे दिनी प्रातःकाळी ।
दंपत्ये दोघे गुरूजवळी । येवोन बैसती वंदोन ॥४॥

विनविताती कर जोडोनि । आम्हा शोक घडल्या दिनी ।
एके यतीने येवोनि । बुद्धिवाद सांगितला ॥५॥

रुद्राक्ष चारी आम्हासी । देता बोलिला परियेसी ।
कानी बांधोनि प्रेतासी । दहन करा म्हणितले ॥६॥

आणिक एक बोलिले । रुद्रसूक्त असे भले ।
अभिषेकिती विप्रकुळे । ते तीर्थ आणावे ॥७॥

आणोनिया प्रेतावरी । प्रोक्षा तुम्ही भावे करी ।
दर्शना जावे सत्वरी । श्रीनृसिंहसरस्वती स्वामीचे ॥८॥

ऐसे सांगोनि आम्हांसी । आपण गेला परियेसी ।
रुद्राक्ष राहिले मजपासी । पतिश्रवणी स्वामिया ॥९॥

ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरु सांगती हासोन ।
रुद्राक्ष दिल्हे आम्ही जाण । तव भक्ति देखोनिया ॥१०॥

भक्ति अथवा अभक्तीसी । रुद्राक्ष धारण करणारासी ।
पापे न लागती परियेसी । उंच अथवा नीचाते ॥११॥

रुद्राक्षांचा महिमा । सांगितला अनुपमा ।
सांगेन विस्तारून तुम्हा । एकचित्ते परियेसा ॥१२॥

रुद्राक्षधारणे पुण्य । मिति नाही अगण्य ।
आणिक नाही देवास मान्य । श्रुतिसंमत परियेसा ॥१३॥

सहस्त्रसंख्या जो नर । रुद्राक्षमाळा करी हार ।
स्वरूपे होय तोचि रुद्र । समस्त देव वंदिती ॥१४॥

सहस्त्र जरी न साधती । दोही बाही षोडशती ।
शिखेसी एक ख्याति । चतुर्विशति दोही करी ॥१५॥

कंठी बांधा बत्तीस । मस्तकी बांधा चत्वारिंश ।
श्रवणद्वयी द्वादश । धारण करावे परियेसा ॥१६॥

कंठी अष्टोत्तरशत एक । माळा करा सुरेख ।
रुद्रपुत्रसमान ऐक । येणे विधी धारण केलिया ॥१७॥

मोती पोवळी स्फटिकेसी । रौप्य वैडूर्य सुवर्णेसी ।
मिळोनि रुद्राक्षमाळेसी । करावे धारण परियेसा ॥१८॥

याचे फळ असे अपार । रुद्राक्षमाला अति थोर ।
जे मिळती समयानुसार । रुद्राक्ष धारण करावे ॥१९॥

ज्याचे गळा रुद्राक्ष असती । त्यासी पापे नातळती ।
तया होय सद्गति । रुद्रलोकी अखंडित ॥२०॥

रुद्राक्षमाळा धरोनि । जप करिती अनुष्ठानी ।
अनंत फळ असे जाणी । एकचित्ते परियेसा ॥२१॥

रुद्राक्षाविणे जो नर । वृथा जन्म जाणा घोर ।
ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र । जन्म वाया परियेसा ॥२२॥

रुद्राक्ष बांधोनि मस्तकेसी । अथवा दोन्ही श्रवणांसी ।
स्नान करिता नरासी । गंगास्नानफळ असे ॥२३॥

रुद्राक्ष ठेवोनि पूजेसी । अभिषेक करावा श्रीरुद्रेसी ।
लिंगपूजा समानेसी । फळ असे निर्धारा ॥२४॥

एकमुख पंचमुख । एकादश असती मुख ।
चतुर्दशादि कौतुक । मुखे असती परियेसा ॥२५॥

हे उत्तम मिळती जरी । अथवा असती नानापरी ।
धारण करावे प्रीतिकरी । पावे चतुर्विध पुरुषार्थ ॥२६॥

यांचे पूर्वील आख्यान । विशेष असे अति गहन ।
ऐकता पापे पळोन । जाती त्वरित परियेसा ॥२७॥

राजा काश्मीरदेशासी । भद्रसेन नामे परियेसी ।
त्याचा पुत्र सुधर्म नामेसी । प्रख्यात असे अवधारा ॥२८॥

त्या राजाचा मंत्रीसुत । नाम तारक विख्यात ।
दोघे कुमार ज्ञानवंत । परमसखे असति देखा ॥२९॥

उभयता एके वयासी । एके स्थानी विद्याभ्यासी ।
क्रीडा विनोद अति प्रीतींसी । वर्तती देखा संतोषे ॥३०॥

क्रीडास्थानी सहभोजनी । असती दोघे संतोषोनि ।
ऐसे कुमार महाज्ञानी । शिवभजक परियेसा ॥३१॥

सर्वदेहा अलंकार । रुद्राक्षमाळा सुंदर ।
भस्मधारण त्रिपुंड्र । टिळा असे परियेसा ॥३२॥

रत्‍नाभरणे सुवर्ण । लेखिती लोहासमान ।
रुद्रमाळावाचून । न घेती देखा अलंकार ॥३३॥

मातापिता बंधुजन । आणोनि देती रत्‍नाभरण ।
टाकोनि देती कोपोन । लोह पाषाण म्हणती त्यांसी ॥३४॥

वर्तता ऐसे एके दिवशी । तया राजमंदिरासी ।
आला पराशर ऋषि । जो का त्रिकाळज्ञ असे देखा ॥३५॥

ऋषि आला देखोन । राजा संमुख जाऊन ।
साष्टांगी नमन करून । अभिवंदिला तये वेळी ॥३६॥

बैसवोनि सिंहासनी । अर्घ्य पाद्य देवोनि ।
पूजा केली विधानी । महानंदे तये वेळी ॥३७॥

कर जोडोनि मुनिवरासी । विनवी राव भक्तीसी ।
पिसे लागले पुत्रांसी । काय करावे म्हणतसे ॥३८॥

रत्‍नाभरणे अलंकार । न घेती भुषण परिकर ।
रुद्राक्षमाळा कंठी हार । सर्वाभरणे तीच करिती ॥३९॥

शिकविल्या नायकती । कैचे यांचे मती ।
स्वामी त्याते बोधिती । तरीच ऐकती कुमार ॥४०॥

भूतभविष्यावर्तमानी । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि ।
यांचा अभिप्राय विस्तारोनि । निरोपावा दातार ॥४१॥

ऐकोनि रायाचे वचन । पराशरा हर्ष जाण ।
निरोपितसे हासोन । म्हणे विचित्र असे देखा ॥४२॥

तुझ्या आणि मंत्रिसुताचे । वृत्तान्त असती विस्मयाचे ।
सांगेन ऐक विचित्र साचे । म्हणोनि निरोपी तया वेळी ॥४३॥

पूर्वी नंदीनाम नगरी । अति लावण्य सुंदरी ।
होती एक वेश्या नारी । जैसे तेज चंद्रकांति ॥४४॥

जैसा चंद्र पौर्णिमेसी । तैसे छत्र असे तिसी ।
सुखासन सुवर्णैसी । शोभायमान असे देखा ॥४५॥

हिरण्यमय तिचे भुवन । पादुका सुवर्णाच्या जाण ।
नानापरी आभरणे । विचित्र असती परियेसा ॥४६॥

पर्यंक रत्‍नखचित देखा । वस्त्राभरणे अनेका ।
गोमहिषी दास्यादिका । बहुत असती परियेसा ॥४७॥

सर्वाभरणे तीस असती । जैसी दिसे मन्मथरति ।
नवयौवना सोमकांति । अतिसुंदर लावण्य ॥४८॥

गंध कुंकुम कस्तुरी । पुष्पे असती नानापरी ।
अखिल भोग तिच्या घरी । ख्याति असे तया ग्रामी ॥४९॥

धनधान्यादि संपत्ति । कोटिसंख्या नाही मिति ।
ऐशियापरी नांदती । वारवनिता तये नगरी ॥५०॥

असोनि वारवनिता । म्हणवी आपण पतिव्रता ।
धर्म करी असंख्याता । अन्नवस्त्रे ब्राह्मणांसी ॥५१॥

नाट्यमंडप तिचे द्वारी । रत्‍नखचित नानापरी ।
उभारिला अतिकुसरी । सदा नृत्य करी तेथे ॥५२॥

सखिवर्गासह नित्य । नृय करी मनोरथ ।
कुक्कुट मर्कट विनोदार्थ । बांधिले असती मंडप्पी ॥५३॥

तया मर्कटकुक्कुटांसी । नृत्य शिकवी विनोदेसी ।
रुद्राक्षमाळाभूषणेसी । गळा रुद्राक्ष बांधिले ॥५४॥

तया मर्कटकुक्कुटांसी । नामे ठेविली सदाशिव ऐसी ।
वर्तता एके दिवसी । अभिनव झाले परियेसा ॥५५॥

शिवव्रत म्हणजे एक । वैश्य झाला महाधनिक ।
रुद्राक्षमाळा-भस्मांकित । प्रवेशला तिचे घरी ॥५६॥

त्याचे सव्य करी देखा । रत्‍नखचित लिंग निका ।
तेजे फाके चंद्रार्का । विराजमान दिसतसे ॥५७॥

तया वैश्यासी देखोनि । नेले वेश्ये वंदूनि ।
नाट्यमंडपी बैसवोनि । उपचार केले नानापरी ॥५८॥

तया वैश्याचे करी । जे का होते लिंग भारी ।
रत्‍नखचित सूर्यापरी । दिसतसे तयाचे ॥५९॥

देखोनि लिंग रत्‍नखचित । वारवनिता विस्मय करीत ।
आपुल्या सखीस म्हणत । ऐसी वस्तु पाहिजे आम्हा ॥६०॥

पुसावे तया वैश्यासी । जरी देईल मौल्येसी ।
अथवा देईल रतीसी । होईन कुलस्त्री तीन दिवस ॥६१॥

ऐकोन तियेचे वचन । पुसती वैश्यासी सखी जाण ।
जरि का द्याल लिंगरत्‍न । देईल रति दिवस तीनी ॥६२॥

अथवा द्याल मौल्येसी । लक्षसंख्यादि द्रव्यासी ।
जे का वसे तुमचे मानसी । निरोपावे वेश्येप्रती ॥६३॥

ऐकोनि सखियांचे वचन । म्हणे वैश्य हासोन ।
देईन लिंग मोहन । रतिकांक्षा करुनी ॥६४॥

तुमची मुख्य वारवनिता । जरी होईल माझी कांता ।
दिवस तीन पतिव्रता । होवोनि असणे मनोभावे ॥६५॥

म्हणोनिया मुख्य वनितेसी । पुसतसे वैश्य तिसी ।
व्यभिचारिणी नाम तुजसी । काय सत्य तुझे बोल ॥६६॥

तुम्हा कैचे धर्म कर्म । बहु पुरुषांचा संगम ।
पतिव्रता कैचे नाम । तुज असे सांग मज ॥६७॥

प्रख्यात तुमचा कुळाचार । सदा करणे व्यभिचार ।
नव्हे तुमचे मन स्थिर । एका पुरुषासवे नित्य ॥६८॥

ऐकोनि वैश्याचे वचन । वारवनिता बोले आपण ।
दिनत्रय सत्य जाण । होईन तुमची कुलस्त्री ॥६९॥

द्यावे माते लिंगरत्‍न । रतिप्रसंगी तुमचे मन ।
संतोषवीन अतिगहन । तनमनधनेसी ॥७०॥

वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावे आम्हांसी ।
दिनत्रय दिवानिशी । वागावे पत्‍नीधर्मकर्मे ॥७१॥

तये वेळी वारवनिता । लिंगावरी ठेवी हाता ।
चंद्र सूर्य साक्षी करिता । झाली पत्‍नी तयाची ॥७२॥

इतुकिया अवसरी । लिंग दिले तियेचे करी ।
संतोष जहाली ती नारी । करी कंकण बांधिले ॥७३॥

लिंग देवोनि वेश्येसी । बोले वैश्य परियेसी ।
माझ्या प्राणासमानेसी । लिंग असे जाण तुवा ॥७४॥

या कारणे लिंगासी । जतन करणे परियेसी ।
हानि होता यासी । प्राण आपुला देईन ॥७५॥

ऐसे वैश्याचे वचन ऐकोन । अंगिकारिले आपण ।
म्हणे लिंग करीन जतन । प्राणापरी परियेसा ॥७६॥

ऐसी दोघे संतोषित । बैसले होते मंडपात ।
दिवस जाता अस्तंगत । म्हणती जाऊ मंदिरा ॥७७॥

संभोगसमयी लिंगासी । न ठेवावे जवळिकेसी ।
म्हणे वैश्य तियेसी । तये वेळी परियेसा ॥७८॥

ऐकोनि वैश्याचे वचन । मंडपी ठेविले लिंगरत्‍न ।
मध्यस्तंभी बैसवोन । गेली अंतर्गृहात ॥७९॥

क्रीडा करिती दोघेजण । होते ऐका एक क्षण ।
उठिला अग्नि दारुण । तया नाट्यमंडपी ॥८०॥

अग्नि लागता मंडप । भस्म झाला जैसा धूप ।
वैश्य करितसे प्रलाप । देखोनि तये वेळी ॥८१॥

म्हणे हा हा काय झाले । माझे प्राणलिंग गेले ।
विझविताती अतिप्रबळे । नगरलोक मिळोनि ॥८२॥

विझवूनिया पहाती लिंगासी । दग्ध झाले परियेसी ।
अग्नी कुक्कुटमर्कटांसी । दहन जहाले परियेसा ॥८३॥

वैश्य देखोनि तये वेळी । दुःख करी अतिप्रबळी ।
प्राणलिंग गेले जळोनि । आता प्राण त्यजीन म्हणे ॥८४॥

म्हणोनिया निघाला बाहेरी । आयती केली ते अवसरी ।
काष्ठे मिळवोन अपारी । अग्नि केला परियेसा ॥८५॥

लिंग दग्ध झाले म्हणत । अग्निप्रवेश केला त्वरित ।
नगरलोक विस्मय करीत । वेश्या दुःख करीतसे ॥८६॥

म्हणे हा हा काय झाले । पुरुषहत्यापाप घडले ।
लिंग मंडपी ठेविले । दग्ध जहाले परियेसा ॥८७॥

वैश्य माझा प्राणेश्वर । तया हानि जहाली निर्धार ।
पतिव्रताधर्मे सत्वर । प्राण त्यजीन म्हणतसे ॥८८॥

बोलाविले विप्रांसी । संकल्पिले संपदेसी ।
सहगमन करावयासी । दानधर्म करीतसे ॥८९॥

वस्त्रे भूषणे भांडारा । देती झाली विप्रवरा ।
चंदनकाष्ठभारा । चेतविले अग्नीसी ॥९०॥

आपुल्या बंधुवर्गासी । नमोनि पुसे तयासी ।
निरोप द्यावा आपणासी । पतीसवे जातसे ॥९१॥

ऐकोनि तियेचे वचन । दुःख पावले बंधुजन ।
म्हणती तुझी बुद्धि हीन । काय धर्म करीतसे ॥९२॥

वेश्येच्या मंदिरासी । येती पुरुष रतीसी ।
मिती नाही तयांसी । केवी जहाला तुझा पुरुष ॥९३॥

कैचा वैश्य कैचे लिंग । वाया जाळिसी आपुले अंग ।
वारवनिता धर्म चांग । नूतन पुरुष नित्य घ्यावा ॥९४॥

ऐसे वैश्य किती येती । त्यांची कैशी होसी सती ।
हासती नगरलोक ख्याति । काय तुझी बुद्धि सांगे ॥९५॥

येणेपरी सकळ जन । वारिताती बंधुजन ।
काय केलिया नायके जाण । कवणाचेही ते काळी ॥९६॥

वेश्या म्हणे तये वेळी । आपुला पति वैश्य अढळी ।
प्रमाण केले तयाजवळी । चंद्र सूर्य साक्षी असे ॥९७॥

साक्षी केली म्या हो क्षिति । दिवस तीन अहोरात्री ।
धर्मकर्म त्याची पत्‍नी । जाहले आपण परियेसा ॥९८॥

माझा पति जाहला मृत । आपण विनवीतसे सत्य ।
पतिव्रता धर्म ख्यात । वेदशास्त्र परियेसा ॥९९॥

पतीसवे जे नारी । सहगमन हाय प्रीतिकरी ।
एकेक पाउली भूमीवरी । अश्वमेधफळ असे ॥१००॥

आपुले माता पिता उद्धरती । एकवीस कुळे पवित्र होती ।
पतीची जाण तेच रीती । एकवीस कुळे परियेसा ॥१॥

इतुके जरी न करिता । पातिव्रत्यपणा वृथा ।
केवी पाविजे पंथा । स्वर्गाचिया निश्चये ॥२॥

ऐसे पुण्य जोडिती । काय वाचूनि राहणे क्षिती ।
दुःख संसारसागर ख्याति । मरणे सत्य कधी तरी ॥३॥

म्हणोनि विनवी सकळांसी । निघाली बाहेर संतोषी ।
आली अग्निकुंडापासी । नमन करी तये वेळी ॥४॥

स्मरोनिया सर्वेश्वर । केला सूर्यासी नमस्कार ।
प्रदक्षिणे उल्हास थोर । करिती झाली तये वेळी ॥५॥

नमुनी समस्त द्विजांसी । उभी ठेली अग्निकुंडासी ।
उडी घातली वेगेसी । अभिनव जहाले तये वेळी ॥६॥

सदाशिव पंचवक्त्र । दशभुजा नागसूत्र ।
हाती आयुधे विचित्र । त्रिशूळ डमरू जाण पा ॥७॥

भस्मांकित जटाधारी । बैसला असे नंदीवरी ।
धरिता झाला वरचेवरी । वेश्येशी तये वेळी ॥८॥

तया अग्निकुंडात । न दिसे अग्नि असे शांत ।
भक्तवत्सल जगन्नाथ । प्रसन्न झाला तये वेळी ॥९॥

हाती धरुनी तियेसी । कडे काढी व्योमकेशी ।
प्रसन्न होउनी परियेसी । वर माग म्हणतसे ॥११०॥

ईश्वर म्हणे तियेसी । आलो तुझे परीक्षेसी ।
धर्मधैर्य पाहावयासी । येणे घडले परियेसा ॥११॥

झालो वैश्य आपणची । रत्‍नलिंग स्वयंभूची ।
मायाअग्नि केला म्यांची । नाट्यमंडप दग्ध केला ॥१२॥

तुझे मन पहावयासी । जहालो अग्निप्रवेशी ।
तूची पतिव्रता सत्य होशी । सत्य केले व्रत आपुले ॥१३॥

संतोषलो तुझे भक्तीसी । देईन वर जो मागसी ।
आयुरारोग्यश्रियेसी । जे इच्छिसी ते देईन ॥१४॥

म्हणे वेश्या तये वेळी । नलगे वर चंद्रमौळी ।
स्वर्ग भूमि पाताळी । न घे भोग ऐश्वर्य ॥१५॥

तुझे चरणकमळी भृंग । होवोनि राहीन महाभाग्य ।
माझे इष्ट बंधुवर्ग । सकळ तुझे सन्निधेसी ॥१६॥

दासदासी माझे असती । सकळा न्यावे स्वर्गाप्रति ।
तव सन्निध पशुपति । सर्वदा राहो सर्वेश्वरा ॥१७॥

न व्हावी पुनरावृत्ती । न लागे संसार यातायाती ।
विमोचावे स्वामी त्वरिती । म्हणोनि चरणी लागली ॥१८॥

ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला गौरीरमण ।
सकळा विमानी बैसवोन । घेऊन गेला स्वर्गाप्रती ॥१९॥

तिचे नाट्यमंडपात । जो का झाला मर्कटघात ।
कुक्कुटसमवेत । दग्ध जहाले परियेसा ॥१२०॥

म्हणोनि पराशर ऋषि । सांगतसे रायासी ।
मर्कटजन्म त्यजूनि हर्षी । तुझे उदरी जन्मला ॥२१॥

तुझे मंत्रियाचे कुशी । कुक्कुट जन्मला परियेसी ।
रुद्राक्षधारणफळे ऐसी । राजकुमार होऊन आले ॥२२॥

पूर्वसंस्काराकरिता । रुद्राक्षधारण केले नित्या ।
इतके पुण्य घडले म्हणता । जहाले तुझे कुमार हे ॥२४॥

आता तरी ज्ञानवंती । रुद्राक्ष धारण करिताती ।
त्याच्या पुण्या नाही मिती । म्हणोनि सांगे पराशरऋषि ॥२५॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । येणेपरी रायासी ।
सांगता झाला महाऋषि । पराशर विस्तारे ॥२६॥

ऐकोनि ऋषीचे वचन । राजा विनवी कर जोडून ।
प्रश्न केला अतिगहन । सांगेन ऐका एकचित्ते ॥२७॥

म्हणोनि सिद्ध विस्तारेसी । सांगे नामधारकासी ।
अपूर्व जहाले परियेसी । पुढील कथा असे ऐका ॥२८॥

गंगाधराचा नंदनु । सांगे श्रीगुरुचरित्रकामधेनु ।
ऐका श्रोते सावधानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥२९॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । रुद्राक्षमहिमा येथ ।
सांगितले निभ्रांत । पुण्यात्मक पावन जे ॥१३०॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रुद्राक्षमाहात्म्य नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३३॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ओवीसंख्या १३० ॥




गुरुचरित्र – अध्याय चौतिसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐसा पराशर ऋषि ।
तया काश्मीर राजासी । रुद्राक्षमहिमा निरोपी ॥१॥

तया राजकुमाराचे । विस्तारोनि सुधावाचे ।
सांगितले पूर्वजन्माचे । चरित्र सर्व ॥२॥

संतोषोनि तो राजा । लागला त्याचे पादांबुजा ।
कर जोडोनिया वोजा । विनवीतसे परियेसा ॥३॥

राजा म्हणे ऋषीश्वरासी । स्वामी निरोपिले आम्हांसी ।
पुण्य घडले आत्मजासी । रुद्राक्षधारणे करोनिया ॥४॥

पूर्वजन्मी अज्ञानेसी । रुद्राक्ष बांधिले तिणे वेश्यी ।
त्या पुण्ये दशा ऐशी । प्राप्त झाली स्वामिया ॥५॥

ज्ञानवंत आता जाण । करिती रुद्राक्षधारण ।
पुढे यांचे लक्षण । कवणेपरी वर्ततील ॥६॥

भूतभविष्य-वर्तमानी । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि ।
सांगा स्वामी विस्तारोनि । माझेनि मंत्रिकुमराचे ॥७॥

ऐकोनि रायाचे वचन । सांगे ऋषि विस्तारोन ।
दोघा कुमारकांचे लक्षण । अपूर्व असे परियेसा ॥८॥

ऋषि म्हणे रायासी । पुत्रभविष्य पुससी ।
ऐकोनि दुःख पावसी । कवणेपरी सांगावे ॥९॥

राव विनवी तये वेळी । निरोपावे सकळी ।
उपाय करिसी तात्काळी । दुःखावेगळा तूचि करिसी ॥१०॥

ऐकोनिया ऋषीश्वर । सांगता झाला विस्तार ।
ऐक राजा तुझा कुमार । बारा वर्षे आयुष्य असे ॥११॥

तया बारा वर्षात । राहिले असती दिवस सात ।
आठवे दिवसी येईल मृत्यु । तुझ्या पुत्रासी परियेसा ॥१२॥

ऐकोनि ऋषीचे वचन । राजा मूर्च्छित जाहला तत्क्षण ।
करिता झाला रुदन । अनेकपरी दुःख करित ॥१३॥

ऐकोनि राजा तये वेळी । लागला ऋषीच्या चरणकमळी ।
राखे राखे तपोबळी । शरणागत मी तुझा ॥१४॥

नानापरी गहिवरत । मुनिवराचे चरण धरित ।
विनवीतसे स्त्रियांसहित । काय करावे म्हणोनिया ॥१५॥

दयानिधि ऋषीश्वरु । सांगता झाला विचारु ।
शरण रिघावे जगद्गुरु । उमाकांत शिवासी ॥१६॥

मनीचे भय त्यजुनी । असावे आता शिवध्यानी ।
तो राखील शूलपाणी । आराधावे तयाते ॥१७॥

जिंकावया काळासी । उपाय असे परियेसी ।
सांगेन तुम्हा विस्तारेसी । एकचित्ते अवधारा ॥१८॥

स्वर्ग मृत्य पाताळासी । देव एक व्योमकेशी ।
निष्कलंक परियेसी । चिदानंदस्वरूप देखा ॥१९॥

ऐसा देव मूर्तिमंत । रजोरूपे ब्रह्मा सृजत ।
सृष्टि करणार समर्थ । वेद चारी निर्मिले ॥२०॥

तया चतुर्वेदांसी । दिधले तया विरंचीसी ।
आत्मतत्त्वसंग्रहासी । ठेविली होती उपनिषदे ॥२१॥

भक्तवत्सल सर्वेश्वर । तेणे दिधले वेदसार ।
रुद्राध्याय सुंदर । दिधला तया विरंचीसी ॥२२॥

रुद्राध्यायाची महिमा । सांगता असे अनुपमा ।
याते नाश नाही जाणा । अव्यय असे परियेसा ॥२३॥

पंचतत्त्व शिवात्मक । रुद्राध्याय असे विशेष ।
ब्रह्मयाने चतुर्मुख । विश्व सृजिले वेदमते ॥२४॥

तया चतुर्मुखी देखा । वेद चारी सांगे निका ।
वदन दक्षिण कर्ण एका । यजुर्वेद निरूपिला ॥२५॥

तया यजुर्वेदांत । उपनिषदसार ख्यात ।
रुद्राध्याय विस्तारत । सांगे ब्रह्मा मुनिवरांसी ॥२६॥

समस्त देवऋषींसी । मरीचि अत्रि परियेसी ।
आणिक सकळ देवांसी । सांगे ब्रह्मा तये वेळी ॥२७॥

तेचि ऋषि पुढे देखा । शिकविती आपुले शिष्यादिका ।
त्यांचे शिष्य पुढे ऐका । आपुल्या शिष्या शिकविले ॥२८॥

पुढे त्यांचे पुत्रपौत्री । विस्तार झाला जगत्री ।
शिकविले ऐका पवित्री । रुद्राध्याय भूमीवरी ॥२९॥

त्याहूनि नाही आणिक मंत्र । त्वरित तप साध्य होत ।
चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा ॥३०॥

नानापरीची पातके । केली असती अनेके ।
रुद्रजाप्ये सम्यके । भस्म होती परियेसा ॥३१॥

आणिक एक नवल केले । ब्रह्मदेव सृष्टि रचिले ।
वेदतीर्थ असे भले । स्नानपान करावे ॥३२॥

त्याणे कर्मे परिहरती । संसार होय निष्कृति ।
जे जन श्रीगुरु भजती । ते तरती भवसागर ॥३३॥

सुकृत अथवा दुष्कृत । जे जे कीजे आपुले हीत ।
जैसे पेरिले असे शेत । तेचि उगवे परियेसा ॥३४॥

सृष्टिधर्मप्रवृत्तीसी । ब्रह्मे रचिले परियेसी ।
आपुले वक्षपृष्ठेसी । धर्माधर्म उपजवी ॥३५॥

जे जन धर्म करिती । इह पर सौख्य पावती ।
जे अधर्मे रहाटती । पापरूपी तेचि जाणा ॥३६॥

काम क्रोध लोभ जाण । मत्सर दंभ परिपूर्ण ।
अधर्माचे सुत जाण । इतुके नरकनायक ॥३७॥

गुरुतल्पगसुरापानी । कामुक जे परिपुर्णी ।
पुल्कस्वरूप अंतःकरणी । तेचि प्रधान नरकाचे ॥३८॥

क्रोधे पितृवधी देखा । मातृवधी असती जे का ।
ब्रह्महत्यादि पातका । कन्याविक्रयी जे जन ॥३९॥

इतुके क्रोधापासूनि । उद्‌भव झाले म्हणोनि ।
पुत्र जहाले या कारणी । क्रोधसुत तया म्हणती ॥४०॥

देवद्विजस्वहरण देखा । ब्रह्मस्व घेवोनि नेदी जो का ।
सुवर्णतस्कर ऐका । लोभपुत्र तया नाव ॥४१॥

ऐशा पातकांसी । यमे निरोपिले परियेसी ।
तुम्ही जावोनि मृत्युलोकासी । रहाटी करणे आपुले गुणे ॥४२॥

तुम्हासवे भृत्य देखा । देईन सर्व उपपातका ।
सकळ पाठवावे नरका । जे जन असती भूमीवरी ॥४३॥

यमाची आज्ञा घेवोनि । आली पातके मेदिनी ।
रुद्रजपत्याते देखोनि । पळोनि गेली परियेसा ॥४४॥

जावोनिया यमाप्रती । महापातके विनविती ।
गेलो होतो आम्ही क्षिती । भयचकित होउनी आलो ॥४५॥

जय जयाजी यमराया । आम्ही पावलो महाभया ।
किंकर तुमचे म्हणोनिया । प्रख्यात असे त्रिभुवनी ॥४६॥

आम्ही तुमचे आज्ञाधारी । निरोपे गेलो धरित्री ।
पोळलो होतो वह्निपुरी । रुद्रजप ऐकोनि ॥४७॥

क्षितीवरी रहावयासी । शक्ति नाही आम्हांसी ।
पाहता रुद्रजपासी । पोळलो आम्ही स्वामिया ॥४८॥

ग्रामी खेटी नदीतीरी । वसती द्विज महानगरी ।
देवालयी पुण्यक्षेत्री । रुद्रजप करिताती ॥४९॥

कवणेपरी आम्हा गति । जाऊ न शको आम्ही क्षिती ।
रुद्रजप जन करिताती । तया ग्रामा जाऊ न शको ॥५०॥

आम्ही जातो नरापासी । वर्तवितो पातकासी ।
होती नर महादोषी । मिति नाही परियेसा ॥५१॥

प्रायश्चित्तसहस्त्रेसी जो का नव्हे पुण्यपुरुषी ।
तैसा द्विज परियेसी । पुण्यवंत होतसे ॥५२॥

एखादे समयी भक्तीसी । म्हणती रुद्राध्यायासी ।
तो होतो पुण्यराशि । पाहता त्यासी भय वाटे ॥५३॥

तैसा पापी महाघोर । पुण्यवंत होतो नर ।
भूमीवरी कैसे आचार । आम्हा कष्ट होतसे ॥५४॥

काळकूट महाविष । रुद्रजाप्य आम्हा दिसे ।
शक्ति नाही आम्हांसी । भूमीवरी जावया ॥५५॥

रुद्रजाप्यविषासी । शमन करावया शक्त होसी ।
रक्ष गा रक्ष गा आम्हांसी । विनविताती पातके ॥५६॥

इतुके बोलती पातके । ऐकोनि यममाथा तुके ।
कोपे निघाला तवके । ब्रह्मलोका तये वेळी ॥५७॥

जाऊनिया ब्रह्मयापासी । विनवी यम तयासी ।
जय जयाजी कमळवासी । सृष्टिकारी चतुर्मुखा ॥५८॥

आम्ही तुझे शरणागत । तुझे आज्ञे कार्य करित ।
पापी नराते आणित । नरकालयाकारणे ॥५९॥

महापातकी नरांसी । आणू पाठवितो भृत्यांसी ।
पातकी होय पुण्यराशि । रुद्रजप करूनिया ॥६०॥

समस्त जाती स्वर्गासी । महापातकी अतिदोषी ।
नाश केला पातकांसी । शून्य जहाले नरकालय ॥६१॥

नरक शून्य झाले सकळ । माझे राज्य निष्फळ ।
समस्त जहाले कैवल्य । उत्पत्ति राहिली स्वामिया ॥६२॥

याते उपाय करावयासी । देवा तू समर्थ होसी ।
राखे राखे आम्हांसी । राज्य गेले स्वामिया ॥६३॥

तुम्ही होउनी मनुष्यासी । स्वामित्व दिधले भरवसी ।
रुद्राध्यायानिधानेसी । कासया साधन दिधलेत ॥६४॥

याकारणे मनुष्य लोकी । नाही पापलेश ।
रुद्रजपे विशेष । पातके जळती अनेक ॥६५॥

येणेपरी यम देखा । विनविता झाला चतुर्मुखा ।
प्रत्युत्तर देतसे ऐका । ब्रह्मदेव यमासी ॥६६॥

अभक्तीने दुर्मदेसी । रुद्रजप करिती यासी ।
अज्ञानी लोक तामसी । उभ्यानी निजूनी पढती नर ॥६७॥

त्याते अधिक पापे घडती । ते दंडावे तुवा त्वरिती ।
जे का भावार्थे पढती । ते त्वा सर्वदा वर्जावे ॥६८॥

बाधू नका तुम्ही ऐका । सांगावे ऐसे पातका ।
रुद्रजपे पुण्य विशेखा । जे जन पढती भक्तीसी ॥६९॥

पूर्वजन्मी पापे करिती । अल्पायुषी होऊनि उपजती ।
तया पापा होय निष्कृति । रुद्रजपेकरूनिया ॥७०॥

तैसे अल्पायुषी नरे । रुद्रजप करिता बरे ।
पापे जाती निर्धारे । दीर्घायु होय तो देखा ॥७१॥

तेजो वर्चस्‍ बल धृति । आयुरारोग्य ज्ञान संपत्ति ।
रुद्रजपे वर्धती । ऐक यमा एकचित्ते ॥७२॥

रुद्रजपमंत्रेसी । स्नान करविती ईश्वरासी ।
तेचि उदक भक्तीसी । जे जन करिती स्नानपान ॥७३॥

त्याते मृत्युभय नाही । आणिक एक नवल पाही ।
रुद्रजपे पुण्य देही । स्थिर जीव पुण्य असे ॥७४॥

अतिरुद्र जपोनि उदकासी । स्नान केल्या वरांसी ।
भीतसे मृत्यु त्यासी । तेही तरती भवार्णवी ॥७५॥

शतरुद्र अभिषेकासी । पूजा करिती महेशासी ।
ते जन होती शतायुषी । पापनिर्मुक्त परियेसा ॥७६॥

ऐसे जाणोनि मानसी । सांगे आपुले दूतासी ।
रुद्र जपता विप्रांसी । बाधू नको म्हणे ब्रह्मा ॥७७॥

ऐकोनि ब्रह्मयाचे वचना । यम आला आपुले स्थाना ।
म्हणोनि पराशरे जाणा । निरोपिले रायासी ॥७८॥

आता तुझ्या कुमारासी । उपाय सांगेन परियेसी ।
दशसहस्त्र रुद्रेसी । स्नपन करी शिवाते ॥७९॥

दहा सहस्त्र वर्षांवरी । तव पुत्र राज्य करी ।
इंद्रासमान धुरंधरी । कीर्तिवंत अपार ॥८०॥

त्याचे राज्याश्रियेसी । अपाय नसे निश्चयेसी ।
अकंटक संतोषी । राज्य करी तुझा सुत ॥८१॥

बोलवावे शत विप्रांसी । जे का विद्वज्जन परियेसी ।
लावावे ज्ञानी अनुष्ठानासी । तात्काळ तुवा रुद्राच्या ॥८२॥

ऐशा विप्राकरवी देखा । शिवासीकरी अभिषेका ।
आयुष्य वर्धेल कुमारका । सद्यःश्रेय होईल ॥८३॥

येणेपरी रायासी । सांगे पराशर ऋषि ।
राये महा आनंदेसी । आयुष्य वर्धना आरंभ केला ॥८४॥

ऐसा ऋषि पराशर । उपदेशितांची द्विजवर ।
बोलावोनिया सर्व संभार । पुरवीतसे ब्राह्मणांसी ॥८५॥

शतसंख्याक कलशांसी । विधिपूर्वक शिवासी ।
पुण्यवृक्षतळेसी । अभिषेक करवितसे ॥८६॥

त्याचिया जळे पुत्रासी । स्नान करवी प्रतिदिवसी ।
सप्त दिन येणे विधींसी । आराधिला ईश्वर ॥८७॥

अवधी जहाली दिवस सात । बाळ पडिला निचेष्टित ।
पराशरे येवोनि त्वरित । उदकेसी सिंचिले ॥८८॥

तये वेळी अवचित । वाक्य जहाले अदृश्यत ।
सवेचि दिसे अद्‌भुत । दंडहस्त महापुरुष ॥८९॥

महादंष्ट्र भयचकित । आले होते यमदूत ।
समस्त द्विजवर रुद्र पढत । मंत्राक्षता देताती ॥९०॥

मंत्राक्षता ते अवसरी । घातलिया कुमारावरी ।
दूत पाहती राहूनि दूरी । जवळ येऊ न शकती ॥९१॥

होते महापाश हाती । कुमारावरी टाकू येती ।
शिवदूत दंडहस्ती । मारू आले यमदूता ॥९२॥

भये चकित यमदूत । पळोनि गेले धावत ।
पाठी लागले शिवदूत । वेदपुरुषरूप देखा ॥९३॥

येणेपरी द्विजवर । तेणे रक्षिला राजकुमार ।
आशीर्वाद देती थोर । वेदश्रुति करूनिया ॥९४॥

इतुकियावरी राजकुमार । सावध झाला मन स्थिर ।
राजयासी आनंद थोर । समारंभ करीतसे ॥९५॥

पूजा करोनि द्विजांसी । देता झाला भोजनासी ।
तांबूलादि दक्षिणेसी । संतोषविले द्विजवर ॥९६॥

संतोषोनि महाराजा । सभा रचित महावोजा ।
बैसवोनि समस्ता द्विजा । महाऋषीते सिंहासनी ॥९७॥

राजा आपुले स्त्रियेसहित । घालिता झाला दंडवत ।
येवोनिया बैसला सभेत । आनंदित मानसी ॥९८॥

त्या समयी ब्रह्मसुत । नारद आला अकस्मात ।
राजा धावोनि चरण धरीत । सिंहासनी बैसवी ॥९९॥

पूजा करोनि उपचारी । राजयाते नमस्कारी ।
म्हणे स्वामी या अवसरी । कोठोनि येणे झाले पै ॥१००॥

राजा म्हणे देवऋषी । हिंडता तुम्ही त्रिभुवनासी ।
काय वर्तले विशेषी । आम्हालागी निरोपिजे ॥१॥

नारद म्हणे रायासी । गेलो होतो कैलासासी ।
येता देखिले मार्गासी । अपूर्व झाले परियेसा ॥२॥

महामृत्यु दूतांसहित । न्यावया आला तुझे सुत ।
सवेचि येऊनि शिवदूत । तयालागी पराभविले ॥३॥

यमदूत पळोनि जाती । यमापुढे सर्व सांगती ।
आम्हा मारिले शिवदूती । कैसे करावे क्षितीत ॥४॥

यम कोपोनि निघाला । वीरभद्रापासी गेला ।
म्हणे दूता का मार दिला । निरपराधे स्वामिया ॥५॥

निजकर्मानुबंधेसी । राजपुत्र गतायुषी ।
त्याते आणिता दूतांसी । कासया शिवदूती मारिले ॥६॥

वीरभद्र अतिक्रोधी । म्हणे झाला रुद्रविधि ।
दहा सहस्त्र वर्षे अवधि । आयुष्य असे राजपुत्रा ॥७॥

न विचारिता चित्रगुप्ता । वाया पाठविले दूता ।
वोखटे केले शिवदूता । जिवे सोडिले म्हणोनि ॥८॥

बोलावोनि चित्रगुप्ता । आयुष्य विचारीन त्वरिता ।
म्हणोनि पाठवी दूता । चित्रगुप्त पाचारिला ॥९॥

पुसताति चित्रगुप्तासी । काढोनि पाहे पुत्रासी ।
बारा वर्षे आयुष्य परियेसी । राजकुमारा लिहिले असे ॥११०॥

तेथेचि लिहिले होते आणिक । दशसहस्त्र वर्षे लेख ।
पाहोनि यम साशंकित । म्हणे अपराध आमुचा ॥११॥

वीरभद्राते वंदून । यमधर्म गेला परतोन ।
आम्ही आलो तेथोन । म्हणोनि सांगे नारद ॥१२॥

रुद्रजपे पुण्य करिता । आयुष्य वर्धले तुझे सता ।
मृत्यु जिंकिला तत्त्वता । पराशरगुरुकृपे ॥१३॥

ऐसे नारद सांगोनि । निघोनि गेला तेथोनि ।
पराशर महामुनि । निरोप घेतला रायाचा ॥१४॥

समस्त गेले द्विजवर । राजा हर्षे निर्भर ।
राज्य भोगिले धुरंधर । पुत्रपौत्री महीवरी ॥१५॥

ऐसा रुद्राध्यायमहिमा । पूजा करावी गुरुब्रह्मा ।
भिणे नलगे काळमहिमा । श्रीगुरु म्हणती दंपतीसी ॥१६॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कथा विस्तारेसी ।
श्रीगुरु सांगे दंपतीसी । प्रेमभावेकरोनिया ॥१७॥

या कारणे श्रीगुरूसी । प्रीति थोर रुद्राध्यायासी ।
पूजा करावी भक्तीसी । रुद्राध्यायेकरोनिया ॥१८॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकता तरे भवसागर । लाधे चारी पुरुषार्थ ॥१९॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । रुद्राभिषेकमाहात्म्य तेथ ।
वर्णिले असे अद्‌भुत । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥१२०॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रुद्राध्यायमहिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥३४॥

॥ ओवीसंख्या ॥१२०॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरुचरित्र – अध्याय पस्तीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक सिद्धासी । विनवीतसे परियेसी ।
रुद्राध्याय विस्तारेसी । दंपतीसी सांगितला ॥१॥

पुढे काय वर्तले । विस्तारोनि सांगा वहिले ।
मन माझे वेधले । गुरुचरित्र ऐकावया ॥२॥

सिद्ध म्हणे ऐक ताता । अपूर्व असे पुढे कथा ।
तेचि जाण पतिव्रता । श्रीगुरूते विनवीत ॥३॥

कर जोडोनि गुरूसी । विनवीतसे भक्तीसी ।
आम्हा गति पुढे कैसी । कवणेपरी असावे ॥४॥

या कारणे आपणासी । एखादा मंत्र उपदेशी ।
जेणे होय स्थिर जीवासी । चरणस्मरण सनातन ॥५॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । स्त्रियांसी मंत्र उपदेशी ।
पतिभक्तीविणे त्यांसी । उपदेशासी देऊ नये ॥६॥

देता उपदेश स्त्रियांसी । विघ्न असे मंत्रासी ।
पूवी शुक्राचार्यासी । झाले असे परियेसा ॥७॥

ऐसे ऐकता गुरुवचन । विनवीतसे कर जोडून ।
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥

विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥

श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ।
युद्ध देवदैत्यांसी । सदैव होय अवधारा ॥१०॥

दैत्यसैन्य पडे रणी । शुक्र जपे संजीवनी ।
सकळ सैन्य उठवूनि । पुनरपि युद्धा पाठवीत ॥११॥

इंद्र वज्रे असुर मारी । शुक्र अमृत जप करी ।
सवेचि येती निशाचरी । देवसैन्य मारावया ॥१२॥

ऐसे होता एके दिवसी । इंद्र गेला कैलासासी ।
सांगे स्थिति शिवासी । शुक्राचार्याची मंत्रकरणी ॥१३॥

कोपोनिया ईश्वर । नंदीस सांगे उत्तर ।
तुवा जावोनि वेगवक्त्र । शुक्राचार्या धरोनि आणी ॥१४॥

स्वामीचे वचन ऐकोनि । नंदी गेला ठाकोनि ।
होता शुक्र तपध्यानी । मुखी धरिला नंदीने ॥१५॥

नंदी नेत शिवापासी । आकांत वर्तला दैत्यांसी ।
ईश्वरे प्राशिले शुक्रासी । अगस्ती सिंधूचियापरी ॥१६॥

ऐसा कित्येक दिवसांवरी । होता शुक्र शिवाचे उदरी ।
निघूनि गेला मूत्रद्वारी । विसर पडला शिवासी ॥१७॥

पूर्वी होते शुक्र नाव । ईश्वर-उदरी झाला उद्‍भव ।
नाव पावला भार्गव । पुनः संजीवनी जपे तो ॥१८॥

इंद्र मनी विचारी । पुरोहितासी पाचारी ।
कैसा शुक्र जिवंत करी । पुनः दैत्यजनांसी ॥१९॥

त्यासी विघ्न करावे एक । तू पुरोहित विवेकयुक्त ।
बुद्धि विचारी अनेक । बृहस्पति गुरुराया ॥२०॥

पाहे पा दैत्यांचे दैव कैसे । शुक्रासारिखा गुरु विशेषे ।
देतो जीवासी भरवसे । दैत्य येती युद्धासी ॥२१॥

तैसा तू नव्हेस आम्हांसी । आम्हाते का उपेक्षिसी ।
देवगुरु तू म्हणविसी । बुद्धि करी शीघ्र आता ॥२२॥

तू पूज्य सकळ देवांसी । जरी आम्हा कृपा करिसी ।
शुक्राचार्य काय विशेषी । तुजसमान नव्हे जाणा ॥२३॥

ऐसे नानापरी देख । इंद्र अमरनायक ।
पूजा करी उपचारिक । बृहस्पति संतोषला ॥२४॥

गुरु म्हणे इंद्रासी । यासी ऐक तू उपायासी ।
षट्‍कर्णी करावे मंत्रासी । सामर्थ्य राहील शुक्राचे ॥२५॥

एखादा पाठवावा शुक्रापासी । विद्यार्थी करून त्वरेसी ।
मंत्र शिकेल भरवसी । विद्यार्थिरूपेकरूनिया ॥२६॥

आपुला पुत्र कच असे । त्याते पाठवू विद्याभ्यासे ।
मंत्र शिकेल आहे कैसी । संजीवनी अवधारा ॥२७॥

कचाते आणूनि बुद्धियुक्ति । सांगतसे बृहस्पति ।
तुवा जावे शुक्राप्रती । विद्यार्थिरूप धरोनि ॥२८॥

आमुची निंदा तेथे करी । मनोभावे सेवा करी ।
संजीवनी कवणेपरी । मंत्र शिके पुत्रराया ॥२९॥

इंद्रादिक देवतांचा । निरोप घेऊनि पितयाचा ।
शुक्राप्रति गेला कचा । विद्यार्थिरूप धरोनि ॥३०॥

नमन केले साष्टांगी । उभा राहिला करुणांगी ।
शुक्र पुसतसे वेगी । कवण कोठूनि आलासी ॥३१॥

बोले आपण द्विजकुमार । तुझी कीर्ति ऐकिली थोर ।
विद्याभ्यासीन मनोहर । म्हणोन आलो सेवेसी ॥३२॥

सेवक होईन तुमचे चरणी । आलो इच्छेसी धरूनि ।
तू भक्तवत्सलशिरोमणि । अनाथांचा प्रतिपालक ॥३३॥

बोलोनि ऐसे कचवचन । विनवीतसे कर जोडून ।
शुक्रकन्या जवळी येऊन । पितयालागी विनवित ॥३४॥

पितयासी म्हणे देवयानी । विप्र भला दिसे नयनी ।
याते तुम्ही शिष्य करूनि । विद्याभ्यास सांगावा ॥३५॥

कच सुंदर सुलक्षण । जैसा दिसे की मदन ।
देवयानी करी चिंतन । ऐसा पति व्हावा म्हणे ॥३६॥

ऐसी वासना धरुनी । पितयाते विनवुनी ।
शिष्य केला कच सगुणी । शुक्राचार्य विद्या सांगे ॥३७॥

ऐसा विद्याभ्यास करीत । दैत्यकुळी म्हणती निश्चित ।
देवगणी आले सत्य । कपटवेषे करूनि ॥३८॥

शिकूनिया विद्येसी । जाऊनि शिकवील देवांसी ।
कुडे होईल आम्हांसी । तेणे मनी चिंतावले ॥३९॥

काळ क्रमिता एके दिवसी । कच पाठविला समिधांसी ।
दैत्य जाती साह्येसी । तया कचाचे अवधारा ॥४०॥

रानी जाउनी समागमेसी । दैत्य मारिले कचासी ।
समिधा घेवोनि घरासी । दैत्य आपण येते झाले ॥४१॥

शुक्राचार्यांची कन्या । पितयासी परम मान्या ।
पितयासी विनवी धन्या । कच कैसा नाही आला ॥४२॥

कच आलियावाचूनी । भोजन न करी देवयानी ।
ऐसे ऐकता निर्वाणी । शुक्राचार्य चिंतावला ॥४३॥

ज्ञानी पाहे मानसी । मृत्यु झाला असे तयासी ।
मंत्र जपूनि संजीवनीसी । त्वरित घरी आणिला ॥४४॥

आणिक होता बहुत दिवस । दैत्य करिती अतिद्वेष ।
गेला होता वनवास । पुनरपि तयासी वधियेले ॥४५॥

मागुती वाचेल म्हणोनि । चूर्ण करिती छेदोनि ।
दाही दिशा टाकुनी । आले घरा पुनरपि ॥४६॥

दिवस गेला अस्तमानी । पुसतसे देवयानी ।
कच न दिसे म्हणोनि । पितयाते विनवीत ॥४७॥

कच माझा प्राणसखा । ना आणिशी जरी खाईन विखा ।
दावी मज तयाचे मुखा । म्हणोनि प्रलाप करीतसे ॥४८॥

कन्येवरी ममत्व बहुत । तेणे शुक्र ज्ञाने पहात ।
छिन्नभिन्न केले म्हणत । मंत्र जपला संजीवनी ॥४९॥

धन्य मंत्राचे सामर्थ्य । कच आला घरा त्वरित ।
देवयानी संतोषत । पितयाने आलिंगिली ॥५०॥

दैत्य मनी विचार करिती । काय केल्या न मरे म्हणती ।
गुरुकन्येसी याची प्रीति । म्हणुनि गुरु वाचवितो ॥५१॥

आता उपाय करू यासी । उदईक येईल एकादशी ।
मारूनि मिळवू पानेसी । गुरुमुखी पाजावे ॥५२॥

ऐशी निगुती करोनि । आली एकादशी दिनी ।
कचाते बाहेर नेवोनि । मारते जहाले दैत्य शिष्य ॥५३॥

प्राशन करविती गुरूसी । मिळवूनिया मद्यरसी ।
स्निग्ध मिळवूनिया बहुवसी । शुक्रगुरूसी देत झाले ॥५४॥

मागुती पुसे देवयानी । पितयाते विनवुनी ।
कचासी आणी म्हणोनि । रुदन करी आक्रोशे ॥५५॥

शुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी ।
खेद करीतसे मनी । कन्यालोभेकरोनिया ॥५६॥

विचार करिता सर्वा ठायी । दिसू लागला आपुले देही ।
संदेह पडला शक्रासी पाही । कैसे करावे म्हणोनि ॥५७॥

कन्येसी म्हणे शुक्र देखा । कच न ये आता ऐका ।
माझे उदरी असे निका । कैसा काढू तयासी ॥५८॥

यासी काढिता आपणासी । मृत्यु होईल परियेसी ।
काय अभिलाष असे त्यासी । म्हणोनि कन्येसी पुसतसे ॥५९॥

पितया विनवी देवयानी । अभिलाष होता माझे मनी ।
भार्या त्याची होउनी । दोघे राहू तुजपासी ॥६०॥

हाचि व्हावा माझा पति । ऐसे संकल्पिले चित्ती ।
न उठे जरी पुढती । तरी प्राण त्यागीन ॥६१॥

संदेह पडला शुक्रासी । बोधिता झाला कन्येसी ।
त्यास उठविता आपणासी । मृत्यू होईल अवधारी ॥६२॥

कन्या म्हणे पितयासी । सकळा तू वाचविसी ।
आपुला प्राण जाईल म्हणसी । हे आश्चर्य वाटतसे ॥६३॥

शुक्र म्हणे देवयानी । मंत्र असे संजीवनी ।
मजवाचोनि नेणे कोणी । माते कोण उठवील ॥६४॥

मंत्र सांगो नये कवणा । षट्‍कर्णी होता जाईल गुणा ।
कचाकरिता माझा प्राण । जाईल देखा अवधारी ॥६५॥

न ऐके कन्या देवयानी । पित्याचे चरण धरोनि ।
विनवीतसे कर जोडोनि । मंत्र आपणाते शिकवावा ॥६६॥

कचासी तू सजीव करी । तुज येईल मृत्यू जरी ।
मी मंत्र जपोनि निर्धारी । सजीव करीन तुजलागी ॥६७॥

शुक्र म्हणे कन्येसी । मंत्र सांगू नये स्त्रियांसी ।
दोष असता परियेसी । वेदशास्त्रसंमत असे ॥६८॥

स्त्रियांसी मंत्र पतिभक्ति । जपू नये मंत्रयुक्ति ।
सांगता दोष आम्हा घडती । मंत्रसामर्थ्य जाईल ॥६९॥

पितयासी म्हणे देवयानी । सुखे असा मंत्र जपोनि ।
प्राण जातो म्हणोन । मूर्च्छागत पडली ते ॥७०॥

शुक्राची कन्येवरी प्रीति । उठवूनि तिसी आलिंगिती ।
मंत्र तिसी सांगती । संजिवनी अवधारा ॥७१॥

आपुल्या पोटी कच होता । तोही होय ऐकता ।
मंत्र जहाला षट्‍कर्णता । मग जपला कचानिमित्त ॥७२॥

शुक्राचे पोटातुनी । कच निघाला फोडुनी ।
मंत्र जपे ती देवयानी । पितयाते उठविले ॥७३॥

तीन वेळा मंत्र जपता । कचे पाठ केला तत्त्वता ।
संतोष करी मनी बहुता । कार्य साधले म्हणोनि ॥७४॥

शुक्राचार्याते नमुनी । कच विनवी कर जोडुनी ।
माते दैत्य मारिती म्हणोनि । निरोप द्यावा मजलागी ॥७५॥

स्वामीचेनि विद्या शिकलो । तुझे कृपेने पूर्ण जहालो ।
देवकार्यार्थ संतोषलो । म्हणूनि चरणी लागला ॥७६॥

शुक्राचार्ये हर्षोनि । निरोप दिधला त्यालागोनी ।
पदर धरी देवयानी । पति व्हावे म्हणोनिया ॥७७॥

तूते मारिले तीन वेळी । मी वाचविले त्या काळी ।
विद्या शिकलासी पित्याजवळी । अवश्य वरावे मजलागी ॥७८॥

कच म्हणे ऐक बाळे । गुरुकन्या भगिनी बोले ।
तुवा आमुते वाचविले । माता होसी निर्धारी ॥७९॥

वरिता दोष आपणासी । दूषण ठेवितील सर्व ऋषि ।
भगिनी तू आमुची होसी । कैसी वरू म्हणे तो ॥८०॥

देवयानी कोपोनि । शाप दिधला ते क्षणी ।
वृथा विद्या होईल मानी । समस्त विसरे तात्काळी ॥८१॥

माझे अंतःकरणीची आशा । वृथा केली निराशा ।
विद्या न ये तुज लवलेशा । म्हणूनि शाप दिधला ॥८२॥

कच म्हणे तियेसी । वाया शापिले आम्हांसी ।
पुरुष वरील तुजसी । ब्रह्मकुळाव्यतिरिक्त ॥८३॥

तुझा पिता ब्रह्मज्ञानी । जाणे अमृतसंजीवनी ।
तुज शिकविले म्हणोनि । पुढे मंत्र न चाले ॥८४॥

ऐसा शाप देउनी । कच गेला निघुनी ।
संतोष झाला इंद्रभुवनी । दैत्यजीवन नव्हेची ॥८५॥

शुक्राचा संजीवनी मंत्र । कामा न ये झाला अपात्र ।
स्त्रियांसी न सांगावा मंत्र । म्हणोनि श्रीगुरु निरूपिती ॥८६॥

स्त्रियांलागी पतिसेवा । याची कारणे मंत्र न द्यावा ।
व्रतोपवास करावा । गुरु-पुरुष-निरोपाने ॥८७॥

सावित्री विनवी श्रीगुरूसी । व्रत आचरले बहुवसी ।
तुझे वाक्य आम्हांसी । व्रत एखादे निरोपावे ॥८८॥

तुजवरी माझा विश्वास । तुजवाचोनि नेणू आणिकास ।
व्रत तूचि आम्हांस । व्रत तुझी चरणसेवा ॥८९॥

भक्ति राहे तुझे चरणी । ऐसा निरोप द्यावा मुनि ।
म्हणुनी लागली चरणी । कृपा करी म्हणोनिया ॥९०॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । सांगेन तुज व्रत ऐसी ।
स्थिर होय अहेवपणासी । राज्य पावे तुझा पति ॥९१॥

दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुझे वाक्य कारण आम्हासी ।
जैसा तू निरोप देसी । तेणे रीती रहाटू ॥९२॥

जो गुरुवाक्य न करी । तो पडे रौरवघोरी ।
तुझे वाक्य आम्हा शिरी । म्हणूनि चरणी लागली ॥९३॥

भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । सांगता जहाला अतिप्रीत ।
विस्तारोनि समर्थ । व्रत तिसी सांगतसे ॥९४॥

सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरु म्हणती कौतुका ।
ऐकताती दंपती निका । अतिप्रीतिकरोनिया ॥९५॥

श्रीगुरु म्हणती तयांसी । सांगेन व्रत इतिहासी ।
ऋषि पुसती सूतासी । व्रत बरवे निरोपावे ॥९६॥

सूत म्हणे ऋषीश्वरा । व्रत सांगेन मनोहरा ।
स्त्रिया अथवा पुरुषा बरा । व्रत असे अवधारा ॥९७॥

नित्यानंद असे शांत । निर्विकल्प विख्यात ।
ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित । सकळाभीष्टे पाविजे ॥९८॥

संसारसागरात । विषयातुर आचरत ।
तेही पूजिता पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥९९॥

विरक्त अथवा संसाररत । विषयातुर आसक्त ।
जे पूजिती पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥१००॥

तेणे पाविजे पैलपार । ऐसे बोलती वेदशास्त्र ।
स्वर्गापवर्गा अधिकार । त्यासी होय परियेसा ॥१॥

विशेष व्रत असे ऐक । सोमवार व्रतनायक ।
ईश्वरार्चन करा विवेक । सकळाभीष्टे पाविजे ॥२॥

नक्त भोजन उपवासी । जितेंद्रिय करा विशेषी ।
वैदिक तांत्रिक पूजेसी । विधिपूर्वक सकळिक ॥३॥

गृहस्थ अथवा ब्रह्मचारी । सुवासिनी कन्याकुमारी ।
भर्तृविण विधवा नारी । व्रत करावे अवधारा ॥४॥

याचे पूर्वील आख्यान । सांगेन ऐका अतिगहन ।
ऐकता करी पावन । सकळासही परियेसा ॥५॥

स्कंदपुराणींची कथा । सर्व साद्यंत ऐका ।
पूर्वयुगी आर्यावर्तका । राजा एक अवधारा ॥६॥

चित्रवर्मा नाम त्यासी । धर्मात्मा राजा परियेसी ।
धर्ममार्ग आचरे हर्षी । अधर्माते शिक्षा करी ॥७॥

अखिल पुण्ये त्याणे केली । सकल संपत्ति वाढविली ।
समस्त पृथ्वी जिंकिली । पराक्रमेकरूनिया ॥८॥

सहपत्‍नी धर्म करिती । पुत्रकाम्ये शिवाप्रती ।
ऐसा किती काळ क्रमिती । कन्या झाली तयाते ॥९॥

अतिसुंदर सुलक्षण । पार्वतीरूपासमान ।
तेज फाके सूर्यकिरण । अतिलावण्य न वर्णवे ॥११०॥

वर्तावया जातकासी । बोलाविले ज्योतिषी ।
द्विज मिळाले अपारेसी । वर्तविती जातक ॥११॥

म्हणती कन्या सुलक्षण । नामे सीमंतिनी जाण ।
उमेसारखे मांगल्यपण । किंवा दमयंतीस्वरूप होय ॥१२॥

भागीरथीऐसी रूपासी । लक्ष्मीसारिखी गुणराशी ।
ज्ञाने देवमतासरसी । जानकीसमान पतिव्रता ॥१३॥

सूर्यासारिखी होईल कांति । चंद्रासमान मनशांति ।
दहा सहस्त्र वरुषे ख्याति । पतीसह राज्य करील ॥१४॥

जातक वर्तवले तिसी । राव पावला अतिहर्षी ।
अखिल दाने विप्रांसी । देता जाहला अवधारा ॥१५॥

असता राव सभेसी । द्विज एक परियेसी ।
भय न धरिता वाक्यासी । बोलतसे अवधारा ॥१६॥

ऐक राया माझे वचन । कन्यालक्षण मी सांगेन ।
चवदावे वर्षी विधवापण । होईल इयेसी जाण पा ॥१७॥

ऐसे वाक्य परिसोनि । राव पडिला मूर्छा येवोनि ।
चिंता वर्तलि बहु मनी । विप्रवाक्य परिसता ॥१८॥

ऐसे सांगोनि ब्राह्मण । गेला निघोनि तत्क्षण ।
सर्व दुःखाते पावून । तळमळीत तेधवा ॥१९॥

ऐसे बालपण क्रमिता । सप्त वर्षे जाती तत्त्वता ।
चिंतीत होती मातापिता । वर्‍हाड केवी करावे ॥१२०॥

चवदावे वर्षी विधवापण । म्हणोनि बोलिला ब्राह्मण ।
तेणे व्याकुळ अंतःकरण । राजा-राजपत्‍नीचे ॥२१॥

कन्या खेळे राजांगणी । सवे सखयाते घेवोनि ।
बोलता ऐकिले विप्रवचनी । चौदावे वर्षी विधवत्व ॥२२॥

ऐसे ऐकोनि वचन । कन्या करीतसे चिंतन ।
वर्तता आली एक दिन । तया घरी ब्रह्मस्त्री देखा ॥२३॥

याज्ञवल्क्याचिया पत्‍नी । मैत्रेयी म्हणोनि ।
घरी आली देखोनि । चरण धरीत तेधवा ॥२४॥

भावे साष्टांग नमूनि । करसंपुट जोडोनि ।
विनवी करुणावचनी । माते प्रतिपाळी म्हणतसे ॥२५॥

सौभाग्य स्थिर होय जेणे । उपाय सांगे मजकारणे ।
चंचळ असे अंतःकरणे । म्हणूनि चरणी लागली ॥२६॥

कन्या विनवी तियेसी । ऐसे व्रत सांग आम्हांसी ।
आम्हा जननी तूचि होसी । व्रत सांग म्हणतसे ॥२७॥

ऐकोनि कन्येच्या वचना । बोले मैत्रेयी जाणा ।
शरण रिघावे उमारमणा । अहेवपण स्थिर होय ॥२८॥

सोमवार परियेसी । व्रत आचरी नेमेसी ।
पूजा करावी शिवासी । उपवास करुनी अवधारा ॥२९॥

बरवे सुस्नात होवोनि । पीतांबर नेसोनि ।
मन स्थिर करोनि । पूजा करावी गौरीहरा ॥१३०॥

अभिषेके पापक्षय । पीठ पूजिता साम्राज्य ।
गंधाक्षता पुष्पमाल्य । सौभाग्यसौख्य पाविजे ॥३१॥

सौगंध होय धूपाने । कांति पाविजे दीपदाने ।
भोग नैवेद्यार्पणे । तांबूलदाने लक्ष्मी स्थिर ॥३२॥

चतुर्विध पुरुषार्थ । नमस्कारिता त्वरित ।
अष्टैश्वर्यै नांदत । ईश्वरजप केलिया ॥३३॥

होमे सर्व कोश पूर्ण । समृद्धि होतसे जाण ।
करिता ब्राह्मणभोजन । सर्व देवता तृप्त होती ॥३४॥

ऐसे सोमवार व्रत । कन्ये करी वो निश्चित ।
भव आलिया दुरित । परिहरती महाक्लेश ॥३५॥

गौरीहरपूजा करिता । समस्त दुरिते जाती तत्त्वता ।
ऐकोनि सीमंतिनी तत्त्वता । अंगिकारिले व्रत देखा ॥३६॥

सोमवारचे व्रत । आचरे सीमंतिनी त्वरित ।
पिता देखोनि निश्चित । विवाहायोग्य म्हणोनि ॥३७॥

राजा विचारी मानसी । वर्‍हाड करावे कन्येसी ।
जैसे प्राक्तन असेल तिसी । तैसे घडो म्हणतसे ॥३८॥

विचारोनि मंत्रियांसी । पाठविता झाला राष्ट्रांसी ।
दमयंतीनळवंशी । इंद्रसेनाचा कुमारक ॥३९॥

चंद्रांगद वर बरवा । जैसा तेज चंद्रप्रभा ।
बोलाविले विवाहशोभा । कन्या दिधली संतोषे ॥१४०॥

राजे भूमांडलिक देखा । समस्त आले वर्‍हाडिका ।
वर्‍हाड झाले अतिकौतुका । महोत्साह नानापरी ॥४१॥

नाना द्रव्यालंकार । वर्‍हाडिका देई नृपवर ।
अखिल दाने देकार । विप्रालागी देता झाला ॥४२॥

पाठवणी केली सकळिका । जामात ठेविला कौतुका ।
कन्यास्नेह अनेका । म्हणोनि राहविले राजपुत्रा ॥४३॥

राजपुत्र श्वशुरगृही । स्त्रिया प्रीति अतिस्नेही ।
काळ क्रमिता एके समयी । जलक्रीडेसी निघाला ॥४४॥

कालिंदी म्हणिजे नदीसी । राजपुत्र परियेसी ।
सर्व दळ समागमेसी । गेला नदीसी विनोदे ॥४५॥

राजपुत्र निघे नदीत । सवे निघाले लोक बहुत ।
विनोदे असे पोहत । अतिहर्षे जलक्रीडा ॥४६॥

पोहता राजकुमार देखा । बुडाला मध्ये गंगोदका ।
आकांत झाला सकळिका । काढा काढा म्हणताती ॥४७॥

सवे सैन्य लोक सकळ । होते नावेकरी प्रबळ ।
उदकी पाहताती तये वेळ । न दिसे कोठे बुडाला ॥४८॥

उभय तटी सैन्यातून । धावत गेले राजसदना ।
व्यवस्था सांगती संपूर्ण । जामात तुमचा बुडाला ॥४९॥

कालिंदी नदीच्या डोहात । संगतीने होते पोहत ।
अदृश्य झाला त्वरित । न दिसे कुमार बुडाला ॥१५०॥

ऐकोनि राजा पडे धरणी । मूर्च्छना येऊनि तत्क्षणी ।
कन्या ऐकताच श्रवणी । त्यजू पाहे प्राणाते ॥५१॥

राजा कन्येसी संबोखित । आपण गेला धावत ।
राजस्त्रिया शोक करीत । कन्यादुःखे अतिबहु ॥५२॥

सीमंतिनी करी शोका । म्हणे देवा त्रिपुरांतका ।
शरण रिघालिया देखा । मरण कैसे न आले मज ॥५३॥

मृत्यु चवदा वर्षी जाण । म्हणोनि धरिले तुमचे चरण ।
वृथा गेले व्रताचरण । सोमवार शिवाचे ॥५४॥

तव देणे अढळ सकळा । मज उपेक्षिले जाश्वनीळा ।
अपकीर्ति तुज केवळा । शरणागता रक्षिसी ॥५५॥

स्मरण करी श्रीगुरूसी । याज्ञवल्क्यपत्‍नीसी ।
सांगितले व्रत आम्हांसी । सौभाग्य स्थिर म्हणोनिया ॥५६॥

तिचिया वाक्ये करूनि । पूजिली शिवभवानी ।
वृथा झाली माझे मनी । शीघ्र विनवी शिवासी ॥५७॥

ऐसे दुःखे प्रलापत । सीमंतिनी जाय रडत ।
गंगाप्रवेश करीन म्हणत । निघाली वेगे गंगेसी ॥५८॥

पिता देखोनि नयनी । धरावया गेला धावोनी ।
कन्येते आलिंगोनी । दुःख करी अत्यंत ॥५९॥

सकळ मंत्री पुरोहित । सर्व सैन्य दुःख करीत ।
बोलाविले नावेकरी त्वरित । पहा म्हणती गंगेत ॥१६०॥

गंगा सकळ शोधिती । न दिसे कुमार कवणे गती ।
शोक करीतसे सीमंती । राजा संबोखी तियेसी ॥६१॥

राजकुमाराचे सेवक । करू लागले बहु दुःख ।
सांगो गेले पुत्रशोक । इंद्रसेनाकारणे ॥६२॥

ऐकोनिया इंद्रसेन । दुःख करी अतिगहन ।
भार्येसहित धावून । आला तया मृत्युस्थळा ॥६३॥

दोघे राव मिळोन । शोक करिती दारुण ।
हा हा कुमारा म्हणोन । ऊर शिर पिटताती ॥६४॥

हा हा पुत्रा ताता म्हणत । राजा गडबडा असे लोळत ।
मंत्री राजकुळ समस्त । नगरलोक दुःख करिती ॥६५॥

कोठे गेला राजसुत । म्हणोनि सीमंतिनी रडत ।
खिन्न झाले समस्त । मातापितर श्वशुरादि ॥६६॥

कोणे स्थानी पति गेले । म्हणोनि सीमंतिनी लोळे ।
ललाट हस्ते पिटिले । पार नाही शोकासी ॥६७॥

सीमंतिनी म्हणे पितयासी । प्राण त्यजीन पतिसरसी ।
वाचूनिया संसारासी । वैधव्य कोण भोगील ॥६८॥

पुसे सकळ द्विजासी । करावे की सहगमनासि ।
विप्र सांगती रायासी । प्रेतावेगळे करू नये ॥६९॥

प्रेत शोधावे नदीत । दहन करावे कन्येसहित ।
न दिसे बुडाला गंगेत । केवी सहगमन होईल ॥१७०॥

आता इसी ऐसे करणे । प्रेत सापडे तववरी राखणे ।
ऐकोनिया द्विजवचने । राजा कन्ये विनवीतसे ॥७१॥

ऐसे व्याकुळ दुःखे करिती । मंत्री पुरोहित म्हणती ।
जे असेल होणार गती । ब्रह्मादिका चुकेना ॥७२॥

होणार जहाली देवकरणी । काय कराल दुःख करोनी ।
ऐसे मंत्री संबोखुनी । रायाते चला म्हणती ॥७३॥

निघाले राजे उभयता । मंदिरा पावले दुःख करिता ।
इंद्रसेन अति दुःखिता । न विसरे कधी पुत्रशोक ॥७४॥

राज्य-व्यापार सोडूनि । दुःख करी पुत्रचिंतनी ।
गोत्रजी राज्य हिरूनी । कपटे घेतले तयाचेच ॥७५॥

सहभार्या रायासी । ठेविते झाले कारागृहासी ।
पुत्रशोके बहु त्यासी । राज्यभोग चाड नाही ॥७६॥

चित्रवर्मा राव देखा । कन्या ठेविली ममत्विका ।
प्राण त्यजू पाहे निका । लोक निंदितील म्हणोनि ॥७७॥

राव म्हणे कन्येसी । पुत्र नाही आमुचे वंशी ।
कन्या एक तू आम्हांसी । पुत्रापरी रहाटावे ॥७८॥

लोक निंदितील आम्हांसी । वैधव्य आले परियेसी ।
वर्ष एक क्रमिलियासी । पुढे आचार करी वो बाळे ॥७९॥

पित्याचे वचन ऐकोनी । करीतसे बहु चिंतनी ।
म्हणे देवा शूळपाणि । केवी माते गांजिले ॥१८०॥

ऐसे विचारुनी मानसी । व्रत आचरे तत्परेसी ।
सोमवार उपवासासी । ईश्वरपूजा करीतसे ॥८१॥

इकडे तो राजकुमार । बुडाला होता गंगापूर ।
गेला जेथे पाताळनगर । वासुकी जेथे राज्य करी ॥८२॥

नागलोकीचिया नारी । आल्या होत्या नदीतीरी ।
राजकुमार आला पुरी । नदीतटाकी वहातसे ॥८३॥

देखोनिया नागकन्या । काढिती संतोषे करोनिया ।
अमृता शिंपिती आणुनिया । सावध केला तयाते ॥८४॥

कन्या मिळूनि त्यासी । घेवोनि जाती तक्षकापासी ।
विचित्र नगर परियेसी । राजपुत्र पहात असे ॥८५॥

पाहे पाताळनगर-रचना । जैसी शोभा इंद्रभुवना ।
गोपुरे दिसती महारत्‍ना । विद्युल्लतेपरी ॥८६॥

इंद्रनीळ वैडुर्यैसी । मानिके मुक्ताफळांसी ।
महारम्य पुरी जैसी । सूर्यकांति मिरवत ॥८७॥

चंद्रकांतिसरसी भूमि । महाद्वारे कपाट हेमी ।
अनेक रत्‍ने नाही उपमी । ऐशा मंदिरा प्रवेशला ॥८८॥

पुढे देखिली सभा थोर । समस्त बैसले सर्पाकार ।
आश्चर्य करी राजकुमार । असंख्य सर्प दिसताती ॥८९॥

सभेमध्ये अतिशोभित । मध्ये बैसला पन्नगनाथ ।
जैशी सूर्यकांति फाकत । अति उन्नत बैसला ॥१९०॥

अनेक शत फणा दिसती । जैशी वीज लखलखती ।
पीतांबरे सज्योती । रत्‍नकुंडलमंडित ॥९१॥

अनेकरत्‍नखचित देखा । मुकुट मिरवती सहस्त्र एका ।
सहस्त्रफणी मिरवे तक्षका । ऐसा सभे बैसला असे ॥९२॥

रूपयौवन नागकन्या । नानापरी भरणे लेवोनिया ।
अनेक सहस्त्र येवोनिया । सेवा करिती तक्षकाची ॥९३॥

ऐशा सभास्थानी देख । राव बैसला तक्षक ।
देखोनिया राजकुमारक । नमन करी साष्टांगी ॥९४॥

तक्षक पुसे नागकन्यांसी । कैचा कुमार आणिलासी ।
सुलक्षण दिसतो कैसी । कोठे होता म्हणे तया ॥९५॥

नागकन्या म्हणती त्यासी । नेणो नाम याचे वंशी ।
वहात आला यमुनेसी । घेऊन आलो तुम्हांजवळी ॥९६॥

तक्षक पुसे राजकुमारासी । नाम कवण कवणे वंशी ।
काय कारणे आलासी । कवण देशी वास तुझा ॥९७॥

सांगे राजकुमार देख । आम्ही भूमंडळनायका ।
नैषध राजपति ऐका । नळनामे पुण्यश्लोक ॥९८॥

त्याचा पुत्र इंद्रसेन । जन्म आमुचा त्यापासून ।
चंद्रांगद नामे आपण । गेलो होतो श्वशुरागृहा ॥९९॥

जलक्रीडा करावयासी । गेलो होतो यमुनेसी ।
विधिवशे आम्हांसी । बुडालो नदी अवधारा ॥२००॥

वहात आलो नदीत । नागकन्या मज देखत ।
घेवोनि आल्या तुम्हांप्रत । पूर्वभाग्ये करूनि ॥१॥

पूर्वार्जित पुण्यवंशी । भेटी झाली चरणांसी ।
धन्य माझे जीवित्वासी । कृतार्थ झालो म्हणतसे ॥२॥

करुणावचन ऐकोनि । तक्षक बोले संतोषोनि ।
नको भिऊ म्हणोनि । धैर्य तया दिधले ॥३॥

शेष म्हणे रे बाळा । तू आहेसी मन निर्मळा ।
तुमचे घरी सर्वकाळा । दैवत कोण पूजितसा ॥४॥

ऐसे ऐकोनि राजकुमार । हर्षे जहाला निर्भर ।
सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर ॥५॥

सकळ देवांचा देव । नाम ज्याचे सदाशिव ।
वामांगी उमा अपूर्व । त्यालागी पूजू निरंतर ॥६॥

ज्यापासोनि जनित ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपमा ।
तो सदाशिव आम्हा । निज दैवत निर्धारे ॥७॥

तयाच्या सत्त्वगुणेसी । विष्णु उपजला परियेसी ।
प्रतिपाळक लोकांसी । तो सदाशिव आराधितो ॥८॥

ज्याच्या तामसगुणे जाण । एकादश रुद्रगण ।
उपजले असती याकारण । प्रलयकर्ता या नाव ॥९॥

धाता विधाता आपण । उत्पत्तिस्थितिलयाकारण ।
तेजासी तेज असे जाण । तैसा ईश्वर पूजितसो ॥२१०॥

पृथ्वी आप तेजासी । जो पूर्ण वायु आकाशी ।
तैसा पूजितसो शिवासी । म्हणे राजकुमार देखा ॥११॥

सर्वां भूती असे संपूर्ण । चिन्मय आपण निरंजन ।
जो रूपे असे अचिंतन । तो ईश्वर पूजितसो ॥१२॥

ज्याची कथा वेद जहाले । तक्षक शेष ज्याची कुंडले ।
त्रिनेत्री असे चंद्र मोळे । तैसा शंकर पूजितसो ॥१३॥

ऐसे ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन ।
राजकुमारा आलिंगोन । तुष्टलो तुष्टलो म्हणतसे ॥१४॥

तक्षक बोले तये वेळी । तुज देईन राज्य सकळी ।
तुवा रहावे पाताळी । आनंदे भाग्य भोगीत ॥१५॥

माझ्या लोकी जे जे रत्‍न । ते ते देईन तुजकारण ।
पावोनिया समाधान । सुखे येथे रहावे ॥१६॥

पाताळ लोकीची रचना । पहावी तुवा अनुपमा ।
कल्पवृक्ष मनोरमा । आहेत माझ्या नगरात ॥१७॥

अमृत न देखती स्वप्नी कोणी । ते भरले असे जैसे पाणी ।
तळी बावी पोखरणी । अमृताच्या माझ्या घरात ॥१८॥

नाही मरण तव येथे । रोगपीडादि समस्ते ।
नेणती कोणी स्वप्नावस्थे । ऐसे नगर माझे असे ॥१९॥

सुखे रहावे येथे स्वस्थ । तक्षक कुमारक सांगत ।
राजपुत्र असे विनवीत । करुणावचने ॥२२०॥

राजपुत्र विनवी तक्षकासी । मी एकलाची पितयाचे कुशी ।
भार्या चतुर्दश वर्षी । शिवपूजनी रत सदा ॥२१॥

नूतन झाले माझे पाणिग्रहण । गुंतले तेथे अंतःकरण ।
पाहीन मातापिताचरण । तेणे सर्वस्व पावलो ॥२२॥

आपण बुडालो नदीत । पिता माता दुःख करीत ।
पत्‍नी जीव त्यागील सत्य । हत्या पडे मस्तकी ॥२३॥

देखिले तव चरण आपण । तेणे झालो धन्य धन्य ।
रक्षिला आपण माझा प्राण । दर्शन करा मातापिता ॥२४॥

तक्षक झाला संतोषित । नाना रत्‍ने त्यासी देत ।
अमृत पाजिले बहुत । आण्क दिधले स्त्रियेसी ॥२५॥

कल्पवृक्षफळे देती । अपूर्व वस्तु आभरणे त्यासी ।
जे अपूर्व असे क्षिती । अमोल्य वस्तु देता जहाला ॥२६॥

इतुके देवोनि कुमारकासी । तक्षक बोले परियेसी ।
जे जे काळी आम्हा स्मरसी । तव कार्य सिद्धि पावेल ॥२७॥

आणिक संतोषोनि चित्ती । वस्त्रे वाहने मागुती ।
तुरंग दिधले मनोगती । सवे दे कुमार आपुला ॥२८॥

चंद्रांगदकुमारासी । इतके दिधले आनंदेसी ।
निरोप दिधला परियेसी । वाहन तुरंग मनोहर ॥२९॥

तक्षका नमूनि त्वरित । वारूवरी आरूढ राजसुत ।
मनोवेगे मार्ग क्रमित । नागकुमार सवे जाणा ॥२३०॥

जिये स्थानी बुडाला होता । तेथे पावला क्षण न लागता ।
निघाला बाहेर वारूसहिता । नदीतटाकी उभा असे ॥३१॥

सोमवार त्या दिवशी । सीमंतिनी आली स्नानासी ।
सवे होत्या सखी सेवेसी । नदीतीरी उभी असे ॥३२॥

सीमंतिनी म्हणे सखियासी । आश्चर्य वाटे मानसी ।
उदकातुनी निघाला परियेसी । सवे असे नागपुत्र ॥३३॥

राक्षस होई की वेषधरू । रूप धरिले असे नरू ।
दिसतसे मनोहरू । तुरंगारूढ जाहला असे ॥३४॥

कैसे पहा हो रूप यासी । जेवी सूर्य प्रकाशी ।
दिव्यमालांबरे कैसी । सुगंध असे परिमळा ॥३५॥

दश योजनेपर्यंत । सुवास येतसे अमित ।
पूर्वी देखिला असे रूपवंत । भासे त्यासी पाहिला ॥३६॥

स्थिर स्थिर भयभीता । त्याचिया पहाती स्वरूपता ।
आपुला पतीसादृश्य म्हणता । रूप आठवी तये वेळी ॥३७॥

राजपुत्र पाहे तियेसी । म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी ।
गळसरी न दिसे कंठासी । हार नसे मुक्ताफळ ॥३८॥

अवलोकितसे अंगखूण । न दिसे हळदी करी कंकण ।
चित्ती व्याकुळ रूपहीन । सदृश दिसे प्राणेश्वरी ॥३९॥

मनी विचरी मागुता । रूप तिचे आठविता ।
तुरंगावरूनि उतरता । नदीतीरी बैसला असे ॥२४०॥

बोलावोनि तियेसी । पुसतसे अति प्रेमेसी ।
तुझा जन्म कवणे वंशी । पुरुष तुझा कोण सांगे ॥४१॥

का कोमाइलीस बाळपणी । दिससी शोके म्लान लक्षणी ।
सांगावे मज विस्तारोनि । अति स्नेहे पुसतसे ॥४२॥

ऐकोनि सीमंतिनी देखा । आपण न बोले लज्जे ऐका ।
सखियांसी म्हणे बालिका । वृत्तान्त सांगा समस्त ॥४३॥

सखिया सांगती तयासी । हे सीमंतिनी नाम परियेसी ।
चंद्रांगदाची महिषी । चित्रवर्म्याची हे कन्या ॥४४॥

इचा पति अतिसुंदर । चंद्रांगद नामे थोर ।
जळक्रीडा करिता फार । येथे बुडाला नदीत ॥४५॥

तेणे शोक करिता इसी । वैधव्य आले परियेसी ।
दुःख करीत तीन वर्षी । लावण्य इचे हरपले ॥४६॥

सोमवारव्रत करीत । उपवास पूजादि आचरत ।
आज स्नानानिमित्त । आली असे नदीसी ॥४७॥

इच्या श्वशुराची स्थिति देखा । पुत्रशोके विकळ ऐका ।
राज्य घेतले दायादिका । कारागृही घातले ॥४८॥

या कारणे सीमंतिनी । नित्य पूजी शूलपाणि ।
सोमवार उपोषणी । म्हणोनि करिती परियेसा ॥४९॥

इतके सख्या सांगती । मग बोले आपण सीमंती ।
किमर्थ पुसता आम्हांप्रती । आपण कोण कंदर्परूपी ॥२५०॥

गंधर्व किंवा तुम्ही देव । किन्नर अथवा सिद्ध गंधर्व ।
नररूप दिसता मानव । आमुते पुसता कवण कार्या ॥५१॥

स्नेह्भावे करोनी । पुसता तुम्ही अति गहनी ।
पूर्वी देखिले होते नयनी । न कळे खूण म्हणतसे ॥५२॥

आप्तभाव माझ्या मनी । स्वजन तसे दिसता नयनी ।
नाम सांगा म्हणोनि । आठवी रूप पतीचे ॥५३॥

आठवोनि पतीचे रूप । करू लागली अति प्रलाप ।
धरणी पडली रुदितबाष्प । महादुःख करीतसे ॥५४॥

तियेचे दुःख देखोनि नयनी । कुमार विलोकी तटस्थपणी ।
मुहूर्त एक सावरोनि । आपण दुःख करीतसे ॥५५॥

दुःख करोनिया देखा । प्रक्षाळिले आपुल्या मुखा ।
उगी राहे म्हणे ऐका । आमुचे नाम सिद्ध म्हणे ॥५६॥

सीमंतिनी करिता शोक अपार । जवळी आला राजकुमार ।
हाती धरली सत्वर । संबोखीतसे प्रेमभावे ॥५७॥

एकांती सांगे तियेसी । म्हणे तुझ्या भ्रतारासी ।
देखिले आम्ही दृष्टीसी । सुखी आता असावे ॥५८॥

तव व्रतपुण्ये करोनी । पति शीघ्र पहासी नयनी ।
चिंता करून नको म्हणोनी । तृतीय दिनी भेटेल ॥५९॥

तव पति माझा सखा । प्राण तोचि ऐका ।
संदेह न करी वो बालिका । आण शिवचरणाची ॥२६०॥

ऐसे एकांती सांगून । प्रगट न करी म्हणून ।
दुःख आठवले ऐकून । सीमंतिनी बाळिकेसी ॥६१॥

सुटल्या धारा लोचनी । प्रेमे रडे स्फुंदोनी ।
विचार करी सीमंतिनी । हाचि होय मम पति ॥६२॥

पतीसारिखे मुखकमळ । नयन सुंदर अति कोमळ ।
ध्वनि बोलता ज्याची मंजुळ । अति गंभीर बोलतसे ॥६३॥

मृदु वाणी पतीसरसी । तैसाची बोले तो हर्षी ।
धरिता माझिया करासी । अति मृदु लागले ॥६४॥

माझे पतीचे लक्षण । मी जाणे सर्व खूण ।
हाचि होय माझा प्राण । समस्त चिन्हे असती ॥६५॥

यास देखोनि नयनी । धारा सुटल्या प्रेमे जीवनी ।
नवलपरी विचारूनी । मागुती अनुमान करीत ॥६६॥

दैवहीन असे आपण । कैसा पति येईल म्हणोन ।
बुडाला नदीत जाऊन । मागुती कैसी भ्रांति म्हणे ॥६७॥

मेला पति मागुती येता । ऐशी न ऐकिली कानी कथा ।
स्वप्न देखिले की भ्रांता । काय कळते माझे मना ॥६८॥

धूर्त होय की वेषधारा । राक्षस यक्ष किंवा किन्नरी ।
कपटे प्रगटला नदीतीरी । म्हणोनि कल्पना करीतसे ॥६९॥

किंवा पावला शिवव्रते । की धाडिला गिरिजानाथे ।
संकट जाणोनि आमुच्या येथे । मैत्रेयीकारणे धाडिला ॥२७०॥

ज्यास प्रसन्न शंकर । त्यास कैचा दुःखविकार ।
चिंतिले पाहिजे निर्धारे । ऐसे चिंती सीमंतिनी ॥७१॥

ऐसे होता राजकुमार । आरूढला वारूवर ।
निरोप मागे प्रीतिकर । सीमंतिनी नारीसी ॥७२॥

निघाला अश्व मनोवेगे । पातला नगरा अतिशीघ्रे ।
वासुकीपुत्र होता संगे । तया पाठवी नगरांत ॥७३॥

त्वा जावोनि वैरियांसी । इष्टती सांगा वादीयासी ।
न ऐकता तव बोलासी । संहारीन बोलावे ॥७४॥

ऐसे वचन ऐकोनि । त्वरित पावला राजभुवनी ।
उभा राहोनि कठोर वचनी । बोलतसे नगराधिपतीसी ॥७५॥

चला शीघ्र कुटुंबेसी । चंद्रांगदाचे भेटीसी ।
तक्षकाचे दर्शनासी । गेला होता पाताळी ॥७६॥

कालिंदीये नदीत । बुडाला हे ऐकोनिया मात ।
तुम्ही केला स्वामीघात । राज्य घेतले इंद्रसेनाचे ॥७७॥

आता सांगेन तुम्हांसी । चाड असे जरी प्राणासी ।
शरण जावे तयासी । इंद्रसेना स्थापोनी ॥७८॥

तक्षकासारखा मैत्र जोडला । दिधले नवनागसहस्त्रबळा ।
शीघ्र लागा चरणकमळा । चंद्रांगदाचे जाऊनी ॥७९॥

न ऐकाल माझ्या वचना । तरी आताचि घेतो प्राणा ।
तक्षके पाठविले आपणा । पारिपत्याकारणे हो ॥२८०॥

ऐसे वचन ऐकोनी । शत्रु भयाभीत मनी ।
हीन बुद्धि केली जाणोनी । आता शरण रिघावे ॥८१॥

जरी करू बलात्कार । तक्षक करील संहार ।
लोकात होई निंदा फार । प्राण जाईल आपुला ॥८२॥

ऐसे विचारूनि मानसी । बाहेर आणिती इंद्रसेनासी ।
नाना वस्त्रे आभरणेसी । सिंहासनी बैसविला ॥८३॥

सकळ विनविती त्यासी । अपराध घडला आम्हांसी ।
प्राण राखा वेगेसी । म्हणोनि चरणी लागले ॥८४॥

राया इंद्रसेनासी । तक्षकपुत्र सांगे त्यासी ।
तुमचा पुत्र आला परियेसी । वासुकी भेटी गेला होता ॥८५॥

ऐकोनि राव संतोषी त्यासी । आठवोनि अधिक दुःखासी ।
मूर्छा येवोनि धरणीसी । पत्‍नीसहित पडियेला ॥८५॥

नागकुमरे उठविले त्यासी । दुःख कासया करावे हर्षी ।
येईल पुत्र भेटीसी । त्वरे करोनि आतांची ॥८६॥

मग राव अतिहर्षी । बोलावित मंत्रियांसी ।
नगर श्रृंगारावयासी । निरोप दिधला तये वेळी ॥८७॥

ऐसा निरोप देऊन । भेटी निघाला आपण ।
सकळ दायाद स्वजन । राणीवसा आदिकरूनि ॥८९॥

मंत्रीपुरोहितासहित । निघाले लोक समस्त ।
कौतुक पाहो म्हणत । मेला पुत्र कैसा आला ॥२९०॥

आनंद झाला सकळिका । राव मानि महाहरिखा ।
पाहीन म्हणे पुत्रमुखा । अति आवडीने अवधारा ॥९१॥

सवे वाजंत्र्यांचे गजर । नगरलोका संतोष थोर ।
करिताती जयजयकार अति उल्हास करिताती ॥९२॥

ऐसे जाऊनि पुत्रासी । भेटी झाली रायासी ।
चंद्रांगद पितयासी । नमस्कारी साष्टांगे ॥९३॥

अति प्रेमे पुत्रासी । आलिंगी राव त्वरेसी ।
सद्गदित कंठेसी । नेत्री सुटल्या अश्रुधारा ॥९४॥

पुत्रासी म्हणे इंद्रसेन । आलासी बाळा माझा प्राण ।
श्रमलो होतो तुजविण । म्हणोनि सांगे दुःख आपुले ॥९५॥

मातेते आलिंगोन । दुःख करी ती अतिगहन ।
विनवीत तिये संबोखोन । मजनिमित्त कष्टलिसी ॥९६॥

पुत्र नव्हे मी तुमचा शत्रु । जाऊनि आपुले सुखार्थु ।
तुम्हा दुखविले की बहुतु । नेदीच सुख तुम्हाते ॥९७॥

आपण जावोनि पाताळी । राहिलो सुखे शेषाजवळी ।
तुम्ही कष्टलीत बहुतकाळी । मजनिमित्त अहोरात्र ॥९८॥

काष्ठासरी अंतःकरण । माझे असे की सत्य जाण ।
माताजीव जैसे मेण । पुत्रानिमित्त कष्ट बहुत ॥९९॥

मातापितयांचे दुःख । जो नेणे तोचि शतमूर्ख ।
उत्तीर्ण व्हावया अशक्य । स्तनपान एक घडीचे ॥३००॥

मातेवीण देव देखा । पुत्रासि नाही विशेखा ।
कवण उत्तीर्ण नव्हे ऐका । माता केवळ मृडानी ॥१॥

दुःख देत जननीसी । तो जाय यमपुरासी ।
पुत्र नव्हे त्याचे वंशी । सप्तजन्मी दरिद्री ॥२॥

ऐसे मातेसि विनवूनी । भेटतसे तो भाऊबहिणी ।
इष्ट सोयरे अखिल जनी । प्रधानासमवेत नागरिका ॥३॥

इतुकिया अवसरी । प्रवेश केला नगराभीतरी ।
समारंभ केला अति थोरी । पावले निजमंदिरा ॥४॥

तक्षकाचे पुत्रासी । गौरविले सन्मानेसी ।
वस्त्रे भूषणे रत्‍नेसी । इंद्रसेने अतिप्रीती ॥५॥

चंद्रांगद सांगे पितयासी । तक्षक उपकार विस्तारेसी ।
प्राण वाचविला आम्हासी । द्रव्य दिधले अपार ॥६॥

सुंदर वस्त्रे आभरणे । दिधली होती तक्षकाने ।
पिता देखोनि संतोषाने । म्हणे धन्य तक्षक ॥७॥

निरोप दिधला नागपुत्रासी । बोळविले तयासी ।
भृत्य पाठविले वेगेसी । चित्रवर्म्याचे नगरात ॥८॥

राव म्हणे तये वेळी । सून माझी दैवे आगळी ।
तिचे धर्मै वाचला बळी । पुत्र माझा अवधारा ॥९॥

तिणे आराधिला शंकर । तेणे कंकण चुडे स्थिर ।
तेणे वाचला माझा कुमर । सौभाग्यवती सून माझी ॥३१०॥

म्हणोनि पाठविले वेगेसी । लिहोनिया वर्तमानासी ।
चित्रवर्मरायासी । इंद्रसेन रायाने ॥११॥

हेर निघाले सत्वरी । चित्रवर्म्याचिये नगरी ।
व्यवस्था सांगितली कुसरी । चंद्रांगदशुभवार्ता ॥१२॥

संतोषे राजा ऐकोनि देखा । करिता झाला महासुखा ।
दाने दिधली अपार ऐका । रत्‍ने भूषणे हेरांसी ॥१३॥

इंद्रसेन राजा सत्वर । पुनरपि करावया वर्‍हाड थोर ।
चंद्रांगद बडिवार । सेना घेवूनि निघाला ॥१४॥

महोत्साह झाला थोर । वर्‍हाड केले धुरंधर ।
चंद्रांगद प्रीतिकर । सीमंतिनीसी भेटला ॥१५॥

पाताळींची अमोल्य वस्तु । प्राणेश्वरीसी अर्पित ।
पाजिता झाला अमृत । महानंद प्रवर्तला ॥१६॥

कल्पवृक्षफळ देखा । देवोनि तोषविला नायका ।
अमोल्य वस्त्राभरणी देखा । दश योजने तेज फाके ॥१७॥

ऐसा उत्साह विवाह केला । आपुले पुरीसी निघाला ।
सीमंतिनीचे वैभवाला । जोडा नसे त्रिभुवनी ॥१८॥

मग जावोनि नगरासी । राज्यी स्थापिला पुत्रासी ।
दहा सहस्त्र पूर्ण वर्षी । राज्य केले चद्रांगदे ॥१९॥

सीमंतिनी करी व्रतासी । उपवास सोमवारासी ।
पूजिले गौरीहरासी । म्हणोनि पावली इष्टार्थ ॥३२०॥

ऐसे विचित्र असे व्रत । म्हणोनि सांगे श्रीगुरुनाथ ।
ऐक सुवासिनी म्हणत । अति प्रीती निरूपिले ॥२१॥

ऐसे करी वो आता व्रत । चुडे कंकणे अखंडित ।
कन्या पुत्र होती बहुत । आमुचे वाक्य अवधारी ॥२२॥

दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुमची चरणसेवा आम्हांसी ।
पुरविती मनोरथासी । आम्हा व्रत कायसे ॥२३॥

आमचा तू प्राणनायक । तुजवाचोनि नेणो आणिक ।
तव स्मरणमात्रे असे निक । म्हणोनि चरणी लागली ॥२४॥

श्रीगुरु म्हणती तयासी । आमुचे निरोपे करा ऐसी ।
व्रत आचरा सोमवारासी । तेचि सेवा आम्हा पावे ॥२५॥

निरोप घेऊनि श्रीगुरूचा । नेम धरिला सोमवाराचा ।
भेटीलागी तयाच्या । मातापिता पावली ॥२६॥

ऐकोनिया कन्यापुत्रवार्ता । संतोषली त्याची माता ।
द्रव्य वेचिले अपरिमिता । समाराधना ब्राह्मणांसी ॥२७॥

पूजा करिती श्रीगुरूसी । आनंद अति मानसी ।
समारंभ दिवानिशी । बहुत करिती भक्तीने ॥२८॥

ऐशापरी वंदोनी । श्रीगुरूचा निरोप घेउनी ।
गेली ग्रामा परतोनी । ख्याती झाली चहू राष्ट्री ॥२९॥

पुढे त्या दंपतीसी । पाच पुत्र शतायुषी ।
झाले आशीर्वादेसी । श्रीगुरूरायाच्या ॥३३०॥

प्रतिवर्षी दर्शनासी । दंपती येती भक्तीसी ।
ऐसे शिष्य परियेसी । श्रीगुरूचे माहात्म्य ॥३१॥

ऐसे श्रीगुरुचरित्र । सिद्ध सांगे पवित्र ।
नामधारक अतिप्रीती । ऐकतसे अवधारा ॥३२॥

गंगाधराचा कुमर । सरस्वती विनवी गुरुकिंकर ।
स्वामी माझा पारंपार । श्रीनृसिंहसरस्वती ॥३३॥

ऐसा वरदमूर्ति देखा । सकळ जन तुम्ही ऐका ।
प्रसन्न होईल तात्काळिका । न धरावा संदेह मानसी ॥३४॥

साखर स्वादु म्हणावयासी । उपमा द्यावी कायसी ।
मनगटीचे कंकणासी । आरसा कासया पाहिजे ॥३५॥

प्रत्यक्ष पाहता दृष्टान्तेसी । प्रमाण कासया परियेसी ।
ख्याती असे भूमंडळासी । कीर्ति श्रीगुरुयतीची ॥३६॥

ऐका हो जन समस्त । सांगतो मी उत्तम होत ।
सेवा करिता श्रीगुरुनाथ । त्वरित होय मनकामना ॥३७॥

अमृताची आरवटी । घातली असे गोमटी ।
पान करा हो तुम्ही घोटी । धणीवरी सकळिक ॥३८॥

श्रीगुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय पतित पावनु ।
नाम ज्याचे कामधेनु । तो चिंतिले पुरवित ॥३९॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सीमंतिनी आख्यान विख्यात ।
पंचत्रिशत्‍ अध्यायात । कथासार सांगितली ॥३४०॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सीमंतिन्याख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ।

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ओवीसंख्या ३४० ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरुचरित्र – अध्याय छत्तिसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचे चरणी ।
विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावे करूनिया ॥१॥

जय जयाजी सिद्ध मुनि । तूचि तारक भवार्णी ।
तूचि होसी ब्रह्मज्ञानी । अविद्यातिमिरभास्कर ॥२॥

मायामोहरजनीत । होतो आपण निद्रिस्त ।
कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत केले आम्हांसी ॥३॥

तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी गुरु ।
कडे केले भवसागरु । चिन्मयात्मा सिद्ध मुनि ॥४॥

ऐसे म्हणोनि सिद्धासी । विनवी भावभक्तीसी ।
गुरुमूर्ति संतोषी । अभयकर देतसे ॥५॥

पुढे चरित्र केवी झाले । विस्तारावे स्वामी वहिले ।
आमुते स्वामी कृतार्थ केले । ज्ञानामृत प्राशवून ॥६॥

कथामृत ऐकता श्रवणी । तृप्ति न होय अंतःकरणी ।
निरोपावे विस्तारोनि म्हणोनि चरणी लागला ॥७॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढील कथा झाली निका ।
एकचित्ते तुम्ही ऐका । ज्ञान होय समस्तांसी ॥८॥

गाणगापुरी असता श्रीगुरु । महिमा वाढली अपरंपारु ।
बोलता असे विस्तारु । तावन्मात्र सांगतसो ॥९॥

महिमा एकेक सांगता । विस्तार होईल बहु कथा ।
अवतार श्रीहरी साक्षाता । कवण शके वर्णावया ॥१०॥

तया गाणगापुरात । होता विप्र वेदरत ।
विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गे वर्ततसे ॥११॥

न घेतला प्रतिग्रह त्याणे । परान्नासी न वचे नेणे ।
मिथ्या वाचे नेणे । अनुवाद आपण न करीच ॥१२॥

नित्य शुष्क भिक्षा करी । तेणे आपुले उदर भरी ।
तयाची नारी असे घरी । क्रोधवंत परियेसा ॥१३॥

याचकवृत्ति तो ब्राह्मण । कंठी संसार सामान्यपणे ।
अतीत- अभ्यागताविणे । न घेई अन्न प्रत्यही ॥१४॥

तया ग्रामी प्रतिदिवसी । विप्र येती समाराधनेसी ।
सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । मिष्टान्न घालिती परियेसा ॥१५॥

समस्त जावोनि भोजन करिती । तया विप्रवनितेप्रती ।
येऊनि गृही स्तुति करिती । अनेक परीची पक्वान्ने ॥१६॥

ऐकोनि तया विप्रनारी । नानापरी दुःख करी ।
परमेश्वरा श्रीहरी । म्हणोनि चिंती मनात ॥१७॥

कैसे दैव आपुले हीन । नेणे स्वप्नी ऐसे अन्न ।
दरिद्री पतीसी वरून । सदा कष्ट भोगितसे ॥१८॥

पूर्वजन्मीचे आराधन । तैसा आपणासी पति हीन ।
सदा पाहे दरिद्रपण । वर्ततसो देवराया ॥१९॥

समस्त विप्र स्त्रियांसहित । नित्य परान्नभोजन करीत ।
पूर्वजन्मीचे सुकृत । केले होते समस्ती ॥२०॥

आपुला पति दैवहीन । कदा नेणे परान्नभोजन ।
काय करावे नारायण । म्हणोनि चिंती मनात ॥२१॥

वर्तता ऐसे तया स्थानी । आला विप्र महाधनी ।
अपरपक्ष करणे मनी । म्हणोनि आला परियेसी ॥२२॥

तया स्थानी विप्रासी । क्षण दिले परियेसी ।
सवे त्यांच्या स्त्रियांसी । आवंतिले तिही परियेसा ॥२३॥

देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी आली त्वरिता ।
सांगती झाली विस्तारता । आमंत्रण ब्राह्मणाचे ॥२४॥

अनेक परीची पक्वान्ने । देताती वस्त्रे परिधाने ।
अपार दक्षिणाद्रव्यदाने । देताती ऐके प्राणेश्वरा ॥२५॥

याते स्वामी अंगीकारणे । अथवा आपण निरोप देणे ।
कांक्षा करिते माझे मन । अपूर्व अन्न जेवावे ॥२६॥

ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत ब्राह्मण ।
सुखे जावे करी भोजन । आपणा न घडे म्हणतसे ॥२७॥

निरोप घेउनी तये वेळी । गेली तया गृहस्थाजवळी ।
आपण येऊ भोजनकाळी । म्हणोनि पुसे तयासी ॥२८॥

विप्र म्हणे तियेसी । आम्ही सांगू दंपतीसी ।
बोलावी आपुल्या पतीसी । तरीच आमुच्या गृहा यावे ॥२९॥

ऐकोनि तयाचे वचन । झाली नारी खेदे खिन्न ।
विचार करी आपुले मन । काय करावे म्हणोनिया ॥३०॥

म्हणे आता काय करणे । कैसे दैव आपुले उणे ।
बरवे अन्न स्वप्नी नेणे । पतीकरिता आपणासी ॥३१॥

विचारोनि मानसी । आली नृसिंहगुरूपासी ।
नमन करी साष्टांगेसी । अनेकापरी विनवीतसे ॥३२॥

म्हणे स्वामी काय करणे । बरवे अन्न कधी नेणे ।
आपुले पतीसी सांगणे । आवंतणे बरवे येतसे ॥३३॥

सांगू म्हणती दंपतीसी । माझा पति नायके वचनासी ।
न वचे कधी परान्नासी । काय करू म्हणतसे ॥३४॥

स्वामी आता कृपा करणे । माझ्या पतीते सांगणे ।
बरवी येताती आमंत्रणे । अन्नवस्त्र देताती ॥३५॥

ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन ।
बोलावूनिया तत्क्षण । सांगती तया द्विजासी ॥३६॥

श्रीगुरु म्हणती तयासी । जावे तुम्ही आवंतणेसी ।
तुझे स्त्रियेचे मानसी । असे मिष्टान्न जेवावे ॥३७॥

तिचे मनींची वासना जाण । तुवा पुरवावी कारण ।
सदा दुश्चित अंतःकरण । कुलस्त्रियेचे असो नये ॥३८॥

ऐकोनि श्रीगुरूचे वचन । नमन करी तो ब्राह्मण ।
विनवीतसे कर जोडून । परान्न आपणा नेम असे ॥३९॥

गुरुवचन जो न करी । तोचि पडे रौरवघोरी ।
निरोप तुमचा माझ्या शिरी । जाईन त्वरित म्हणतसे ॥४०॥

पुसोनिया श्रीगुरूसी । आले दंपत्य आवंतणेसी ।
आनंद झाला बहुवसी । तया विप्रस्त्रियेते ॥४१॥

पितृनाम उच्चारोन । संकल्प करी तो ब्राह्मण ।
अनेक परीचे मिष्टान्न । वाढिती तया दंपतीसी ॥४२॥

भोजन करिता समयासी । दिसे विपरीत तियेसी ।
श्वान सूकर येउनी हर्षी । समागमे जेविताती ॥४३॥

कंटाळले तिचे मन । उठली आपण त्यजुनी अन्न ।
जे जेवीत होते ब्राह्मण । तया समस्तांसी सांगतसे ॥४४॥

ऐसेपरी पतीसहित । आली नारी चिंताक्रांत ।
पतीस सांगे वृत्तान्त । श्वानउच्छिष्ट जेविलेती ॥४५॥

स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण । तुझे नि आपुले दैव हीन ।
घडले आपणासी परान्न । उच्छिष्ट श्वानसूकरांचे ॥४६॥

ऐसे म्हणोनि स्त्रियेसी । आली दोघे श्रीगुरुपासी ।
नमन केले परियेसी । ऐका श्रोते एकचित्ते ॥४७॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसे सुख परान्नासी ।
सदा दुखविसी पतीसी । पुरले तुझे मनोरथ ॥४८॥

ऐसे वचन ऐकोनि । लागे नारी श्रीगुरुचरणी ।
विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणे स्वामिया ॥४९॥

मंदमति आपणासी । दोष घडविले पतीसी ।
नेले आपण परान्नासी । क्षमा करणे स्वामिया ॥५०॥

चिंता करी द्विजवरू । म्हणे स्वामी काय करू ।
दोष घडला अपारू । व्रतभंग झाला म्हणोनि ॥५१॥

परान्न न घ्यावे म्हणोनि । संकल्प होता माझे मनी ।
मिळाली सती वैरिणी । दोष आपणा घडविला ॥५२॥

ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन ।
पुरविली स्त्रियेची वासना । आता तिचे मन धाले ॥५३॥

कधी न वचे परान्नासी । वर्तेल तुझ्या वाक्यासरसी ।
न करी चिंता मानसी । दोष तुज नाही जाण ॥५४॥

आणिक एक सांगे तुज । जेणे धर्म घडती सहज ।
अडला असेल एखादा द्विज । देवपितृकर्माविणे ॥५५॥

कोणी न मिळती विप्र त्यासी । जावे तेथे भोजनासी ।
जरी तेथे तू न जासी । अनंत दोष असे जाण ॥५६॥

श्रीगुरूचे वचन ऐकोन । साष्टांगी करी नमन ।
विनवीतसे कर जोडून । विनंति माझी परियेसा ॥५७॥

अन्न घ्यावे कवणा घरी । घडतील दोष कवणेपरी ।
जाऊ नये कवणा घरी । निरोपावे स्वामिया ॥५८॥

विप्रवचन ऐकोन । श्रीगुरु सांगती विस्तारोन ।
सावधान करून मन । ऐका श्रोते सकळिक ॥५९॥

श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न घ्यावया घरे पुससी ।
गुरुभुवनादिकी हर्षी । जेवावे शिष्यवर्गा घरी ॥६०॥

वैदिकादि विद्वज्जन । मातुळ आपुला श्वशुर जाण ।
सहोदरादि साधुजन । तया घरि जेवावे ॥६१॥

अडला विप्र ब्राह्मणाविण । त्याचे घरी घ्यावे अन्न ।
करावे गायत्रीजपन । दोष जाती अवधारा ॥६२॥

विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंत माझी परियेसी ।
निषिद्ध अन्न आम्हासी । कवण्या घरी जेवू नये ॥६३॥

श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । अन्नवर्जित घरे ऐसी ।
अपार असे स्मृति चंद्रिकेसी । ऋषिसंमते सांगेन ॥६४॥

नित्य मातापितयांसी । सेवा घेती अतिदोषी ।
जाऊ नये तया घरांसी । धनलोभिष्ठ द्विजांघरी ॥६५॥

कलत्र पुत्र कष्टवोनि । धर्म करी विप्रालागोनि ।
अन्ननिषेध तया भुवनी । दोष घडती जेविल्या ॥६६॥

गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी । विप्र जाण मल्लयुद्ध करी ।
वीणा वाद्य ज्याचे घरी । न घ्यावे अन्न ब्राह्मणाने ॥६७॥

बहिष्कारी विप्राघरी । याचकवृत्तीने उदर भरी ।
अन्न वर्जावे तया घरी । आत्मस्तुति परनिंदक ॥६८॥

बहुजन एक अन्न करिती । पृथक्‌ वैश्वदेव न करिती ।
वर्जावी अन्ने विप्रजाती । महादोष बोलिजे ॥६९॥

गुरु म्हणोनि समस्तांसी । आपण मंत्र उपदेशी ।
शिष्य रहाटे दुर्वृत्तींसी । त्या गुरुघरी जेवू नये ॥७०॥

क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे ।
स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे । जेवू नये तया घरी ॥७१॥

धनगर्वी तामसाघरी । कृपण निर्द्रव्य व्यभिचारी ।
दांभिक दुराचारी विप्राघरी । अन्न तुम्ही वर्जावे ॥७२॥

पुत्रा पतीते सोडोनि । वेगळी असे जे ब्राह्मणी ।
वर्जावे अन्न साधुजनी । महादोष बोलिजे ॥७३॥

स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र सुवर्णाकार करी ।
सदा बहु याचक जरी । तया घरी न जेवावे ॥७४॥

खळ राजसेवकाघरी । लोह काष्ठ छेदन करी ।
वस्त्रधुत्या रजकाघरी । दान विप्रे घेऊ नये ॥७५॥

मद्यपान नराघरी । याचने उदरपूर्ति करी ।
वेश्मी सहजार असे नारी । दान विप्रे न घ्यावे ॥७६॥

तस्करविद्या असे ज्यासी । द्वारपाळकाघरी परियेसी ।
न घ्यावे अन्न कुटिलासी । महादोष बोलिजे ॥७७॥

द्रव्य घेउनी शूद्राकरी । अध्ययन सांगे द्विजवरी ।
अन्न वर्जावे तया घरी । घोडी विकी जो ब्राह्मण ॥७८॥

भागवतकीर्तन नाही घरी । द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी ।
स्नानावीण भोजन करी । तया घरी जेवू नये ॥७९॥

न करी संध्या सायंकाळी । दान न करी कदा काळी ।
पितृकर्म वर्जिता कुळी । तया घरी न जेवावे ॥८०॥

दंभार्थाने जो जप करी । अथवा कापट्यरूपे जरी ।
द्रव्य घेवोनि जप करी । तया घरी जेवू नये ॥८१॥

ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी परियेसी ।
द्रव्य सांची कलत्रेसी । तया घरी जेवू नये ॥८२॥

विश्वासघातकी नराघरी । अनीति पक्षपात करी ।
स्वधर्म सांडी दुराचारी । पूर्वजमार्ग सोडिल्या घरी ॥८३॥

विद्वज्जन ब्राह्मण साधूसी । एखादा करी अति द्वेषी ।
अन्न वर्जावे तुम्ही हर्षी । तया घरी जेवू नये ॥८४॥

कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय जो परता ।
आपुलाले गुरूसी निंदिता । जेवू नये तया घरी ॥८५॥

गोब्राह्मणवध करी । स्त्रीवधु नर असे जरी ।
अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु म्हणती विप्रासी ॥८६॥

आशाबद्ध सदा नरु । धरूनि राहे एका द्वारु ।
दान देता वर्जी जरु । जेवू नये तया घरी ॥८७॥

समस्त जातीस करी शरण । तोचि चांडाळ होय जाण ।
घेऊ नये त्याचे अन्न । नमन न करी विप्रासी ॥८८॥

आपुल्या कन्याजामातेसी । क्रोधे करून सदा दूषी ।
न घ्यावे अन्न त्या घरासी । निपुत्राचे घरी देखा ॥८९॥

पंचमहायज्ञ करी आपण । जेवी आणिकाचे घरी अन्न ।
परपाक करी तया नाम जाण । तया घरी जेवू नये ॥९०॥

विवाह झाला असता आपण । पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण ।
स्थालीपाकनिवृत्ति नव जाणे । न जेवावे तया घरी ॥९१॥

घरचे अन्न दूषण करी । परान्नाची स्तुति करी ।
अन्न वर्जावे तया घरी । श्वपच नाम तयाचे ॥९२॥

भाणसपणे उदर भरी । अन्न घेता तया घरी ।
डोळे जाती अवधारी । आंधळा होय अल्पायुषी ॥९३॥

बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेघा जाय जाण ।
धृतिशक्ति जाय जाण । माणसाचे घरी जेवू नये ॥९४॥

गृहस्थधर्मे असे आपण । दानधर्म न करी जाण ।
अद्वैतशास्त्र बोलू जाणे । तया घरी जेवू नये ॥९५॥

परगृही वास आपण । परान्न जेवी जो ब्राह्मण ।
त्याचे जितुके असे पुण्य । यजमानासी जाय देखा ॥९६॥

तया यजमानाचे दोष । लागती त्वरित भोजनस्पर्श ।
त्याचिकारणे निषिद्ध असे । परान्न तुम्ही वर्जावे ॥९७॥

भूदान गोदान सुवर्णदान । गजवाजीरत्‍नदान ।
घेता नाही महादूषण । अन्नदाना अतिदोष असे ॥९८॥

समस्त दुष्कृत परान्नासी । घडती देखा ब्राह्मणासी ।
तैसेचि जाणा परस्त्रियेसी । संग केलिया नरक होय ॥९९॥

परगृही वास करिता । जाय आपुली लक्ष्मी त्वरिता ।
अमावास्येसी परान्न जेविता । मासपुण्य जाय देखा ॥१००॥

अगत्य जाणे परान्नासी । न बोलाविता जाय संतोषी ।
जाता होती महादोषी । शूद्रे बोलाविता जाऊ नये ॥१॥

आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊ नये भोजनासी ।
पुत्र झालिया कन्येसी । सुखे जावे अवधारा ॥२॥

सूर्यचंद्रग्रहणेसी । दान घेऊ नये परियेसी ।
जात अथवा मृतसूतकेसी । जाऊ नये परियेसा ॥३॥

ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे द्विजवर ।
तैसे जरी करिती नर । त्यासी कैचे दैन्य असे ॥४॥

समस्त देव त्याचे होती । अष्ट महासिद्धि साधती ।
ब्राह्मणकर्मै आचरती । कामधेनु तया घरी ॥५॥

विप्र मदांधे व्यापिले । आचारकर्मे सांडिले ।
याचिकारणे दरिद्री झाले । स्वधर्म नष्ट होऊनिया ॥६॥

विप्र विनवी स्वामीसी । आमुची विनंति परियेसी ।
सकळ आचारधर्मासी । निरोपावे दातारा ॥७॥

श्रीगुरुमूर्ति कृपासागरु । त्रिमूर्तीच्या अवतारु ।
भक्तजनांच्या आधारु । निरोपावे आचार ब्राह्मणाचे ॥८॥

श्रीगुरु म्हणती तयासी । ब्राह्मणाचा आचार पुससी ।
सांगेन ऐक विस्तारेसी । पूर्वी ऋषि आचरले जे ॥९॥

नैमिषारण्यी समस्त ऋषि । तप करिती बहु दिवसी ।
आला पराशर ऋषि । म्हणोनि समस्त वंदिती ॥११०॥

समस्त ऋषि मिळोन । विनविताती कर जोडून ।
ब्राह्मणाचे आचरण । केवी करावे म्हणती ते ॥११॥

आता आम्ही आचार करितो । तेणे संशय मनी येतो ।
ब्रह्मऋषि तुम्ही म्हणूनि पुसतो । तुमचा उपदेश आम्हा व्हावा ॥१२॥

गुरुमुखेवीण मंत्र । ग्राह्य नव्हे हो पवित्र ।
तैसा श्रीगुरु तू सत्पात्र । आचार आम्हा सांगावे ॥१३॥

पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार तुम्हासी ।
जेणे होय अप्रयासी । सर्व सिद्धि पावती ॥१४॥

ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि ।
मग ध्याव्या मूर्ति तिन्ही । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥१५॥

मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह ।
सनत्कुमार-सनक-सनंदन-सह । स्मरावे तये वेळी ॥१६॥

सह-नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी देखा ।
सप्त समुद्र असती जे का । स्मरावे सप्त पितृदेवता ॥१७॥

सप्त ऋषीते स्मरोनि । सप्त द्वीपे सप्त भुवनी ।
समस्त नामे घेऊनि । ऐसे म्हणावे प्रातःस्मरण ॥१८॥

मग उठावे शयनस्थानी । आचमन करोनि दोनी ।
लघुशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावे ॥१९॥

पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमनविधीसी ।
सांगतसे विस्तारेसी । जे जे समयी करणे ऐका ॥१२०॥

स्नानापूर्वी अपर दोनी । उदक प्राशिता येणेचि गुणी ।
निजता उठता समयी दोनी । आचमने करावी ॥२१॥

अधोवायुशब्द झालिया । वोखटे दृष्टी देखिलिया ।
दोन्ही वेळा आचमूनिया । शुचि व्हावे परियेसा ॥२२॥

भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया शिंकलिया दोनी ।
लघुशंकाशौची दोनी । आचमन करावे ॥२३॥

जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी ।
स्पर्श करावा अक्ष श्रोत्री । येणे पवित्र परियेसा ॥२४॥

ब्राह्मणाचे उजवे कानी । सप्त देवता असती निर्गुणी ।
त्यासी स्पर्शिता तत्क्षणी । आचमनफळ असे देखा ॥२५॥

श्लोक । अग्निरापश्च चंद्रश्च वरुणार्कैद्रवायवः ।
विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं तिष्ठन्ति देवताः ॥२६॥

टीका । त्या देवतांची नावे ऐका । सांगेन ऋषि सकळिका ।
अग्नि आप वरुणार्का । वायु इंद्र चंद्र असती ॥२७॥

लघुशंकाचमन करोनि । तूष्णीम स्नान करा सुमनी ।
बैसावे शुचि आसनी । अरुणोदय होय तव ॥२८॥

गायत्रीमंत्रजपाव्यतिरिक्त । वरकड जपावे पवित्र ।
प्रगट होता अरुणोदित । बहिर्भूमीसी जाईजे ॥२९॥

यज्ञोपवीत कानी ठेवोनि । डोईल पालव घालूनि ।
नैऋत्य दिशे जाऊनि । अधोमुखी बैसावे ॥१३०॥

दिवसा बसावे उत्तरमुखी । रात्री बैसावे दक्षिणमुखी ।
मौन असावे विवेकी । चहूकडे पाहू नये ॥३१॥

सूर्यचंद्रनक्षत्रांसी । पाहू नये नदी-आकाशी ।
स्त्रीजन लोक परियेसी । पाहू नये कवणाते ॥३२॥

शौचाविणे कांस घाली । कांस न काढी लघुशंकाकाळी ।
त्यासी होय यमपुरी अढळी । नरक भोगी अवधारा ॥३३॥

अगत्य घडे उदकावीण । करूनिया गंगास्मरण ।
मृत्तिकेने शौच करणे । भक्षणादि वर्जावे ॥३४॥

बर्हिर्भूमि जावयासी । ठाऊ कैसा परियेसी ।
ऐका समस्त तत्परेसी । म्हणे पराशर सर्वाते ॥३५॥

न बैसावे भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी ।
हिरवी पर्णे करावी दुरी । वाळल्या पानी बैसावे ॥३६॥

जे ब्राह्मण उभ्या मुतती । त्यांसी ऐका कवण गति ।
त्यांचे रोमे अंगी किती । तावत्काळ वर्षे नरकी पडती ॥३७॥

मळविसर्जन करूनि । उठावे हाती शिश्न धरूनि ।
जळपात्रापासी जाऊनि । शौच करावे परियेसा ॥३८॥

मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी ।
वारुळ मूषकगृह परियेसी । नदीमधील आणु नये ॥३९॥

ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती ।
देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥१४०॥

वापी कूप तडागात । मृत्तिका आणिता पुण्य बहुत ।
उदक करी घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्यावी शौचासी ॥४१॥

आवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानी एक लावावे ।
अपानद्वारी पाच स्वभावे । एकैका हस्तासी तीन सप्ते ॥४२॥

एकैक पायासी सात वेळ । मृत्तिका लावावी सकळ ।
आणिक सांगेन समय केवळ । ऋषि समस्त परियेसा ॥४३॥

या मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण ।
बहुर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥४४॥

आणिक प्रकार असे देखा । करावे येणेप्रमाणे ऐका ।
जितुके करणे गृहस्थ लोका । द्विगुण करावे ब्रह्मचारी ॥४५॥

त्रिगुण करावे वानप्रस्थे । चतुर्गुण करावे यती समस्ते ।
न्यून पूर्ण करावे यापरते । धर्मसिद्धि होय देखा ॥४६॥

येणे प्रकारे करा दिवसी । रात्री याच्या अर्धैसी ।
संकटसमयी या अर्धैसी । मार्गस्थे अर्ध त्याहुनी ॥४७॥

व्रतबंध झालिया ब्राह्मणासी । हाच आचार परियेसी ।
हाचि उपदेश चहू वर्णासी । शौचविधि बोलिला ॥४८॥

शौच केलियानंतरी । चूळ भरावे परिकरी ।
ब्राह्मणे आठ भरी । क्षत्रिये सहा परियेसा ॥४९॥

वैश्ये चार शूद्रे दोनी वेळ । येणे विधि भरा चूळ ।
अधिक न करावे केवळ । म्हणे पराशर ऋषि ॥१५०॥

चूळ भरावे आठ वेळा । आचमावे तीन वेळा ।
शुचिस्थानी बैसून निर्मळा । कुळदेवता स्मरावी ॥५१॥

तूष्णीम्‍ आचमन करावे । नाम घेता चोवीस ठावे ।
आतळावे पुनः आचमावे । त्याचा विधी सांगेन ॥५२॥

विप्रदक्षिणतळहाती । पाच तीर्थे विख्यात असती ।
जे बोलिले असे श्रुती । सांगेन तीर्थ अवधारा ॥५३॥

अंगुष्ठमूळ तळहातेसी । अग्निब्रह्मतीर्थ परियेसी ।
तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी । पितृतीर्थ असे जाण ॥५४॥

चतुर्थ अंगुलीचे वरी । देवतीर्थ अवधारी ।
कनिष्ठिका भागोत्तरी । ऋषितीर्थ परियेसा ॥५५॥

तर्पण देवापितृऋषि । जे स्थानी तीर्थै करावी हर्षी ।
आचमन ब्रह्मतीर्थेसी । करा ब्राह्मण विद्वज्जन ॥५६॥

ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही । केशव नारायण माधव म्हणोनि ।
देवतीर्थ उदक सांडोनि । गोविंद नाम उच्चारावे ॥५७॥

विष्णु मधुसूदन हस्त धुवोनि दोन्ही । त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनि ।
बिंबोष्ठ तळहस्ते स्पर्शोनि । श्रीधर नाम उच्चारावे ॥५८॥

पुनरपि हस्त ह्रषीकेशी । पद्मनाभ पादद्वय स्पर्शी ।
सव्य हस्त पंचांगुलीसी । दामोदर शिखास्थानी ॥५९॥

चतुरंगुलि पृष्ठदेशी । संकर्षण घ्राणेसी ।
तर्जनी आणि अंगुष्ठेसी । म्हणावा वासुदेव प्रद्युम्न ॥१६०॥

अंगुष्ठ अनामिकेसी । नेत्रस्पर्श श्रोत्रेसी ।
कनिष्ठिका अंगुष्ठेसी । अच्युत नाभी म्हणावे ॥६१॥

पंचांगुली उपेंद्र देखा । हरी श्रीकृष्ण भुजा एका ।
पाच अंगुली विधिपूर्वका । येणे विधी स्पर्शावे ॥६२॥

विधी संध्याकाळी । आणिक करावे वेळोवेळी ।
अशौच अथवा संकटकाळी । असती विधाने ती ऐका ॥६३॥

देवतीर्थे तिन्ही घ्यावे । हस्त प्रक्षाळा गोविंद नावे ।
मुख प्रक्षाळोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेपरी ॥६४॥

विधान आणिक सांगेन । देवतीर्थे तिनी घेऊन ।
गोविंदनामे हस्त धुवून । चक्षु श्रोत्र स्पर्शावे ॥६५॥

शूद्रादि ओवाळियासी । स्पर्श होता परियेसी ।
आचमनविधि ऐसी । गुरु म्हणती ब्राह्मणाते ॥६६॥

भिजोनि आलिया पाउसात । द्विराचमने होय पुनीत ।
स्नान भोजनी निश्चित । द्विराचमन करावे ॥६७॥

फलाहार भक्षण करिता । अथवा आपण उदक घेता ।
आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमने शुद्ध होय ॥६८॥

उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी ।
आणिक असे एक परी । तूष्णीम आचमन करावे ॥६९॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी ।
जे करिती भक्तीसी । दैन्य कैचे तया घरी ॥१७०॥

आता सांगेन विधान । करावया दंतधावन ।
समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥७१॥

न करावे नवमीद्वादशीसी । शनयर्कमंगळवारेसी ।
श्राद्धकाळी विवाहदिवसी । करू नये दंतधावन ॥७२॥

कंटकवृक्षशाखेसी । ताडमाडकेतकीसी ।
खर्जूरनारिकेलशाखेसी । केलिया जन्म चांडाळयोनी ॥७३॥

खदिरकरंजाआघाडेसी । औदुंबरार्कवटशाखेसी ।
अथवा वृक्ष करवंदेसी । पुण्य वृक्ष ऐका तुम्ही ॥७४॥

विप्रे द्वादशांगुलेसी । नवांगुले क्षत्रियासी ।
षडांगुले वैश्यशूद्रांसी । दंतधावन काष्ठ आणावे ॥७५॥

दंतधावन काष्ठेसी । तोडिता म्हणावे मंत्रासी ।
आयुः प्रज्ञा नाम परियेसी । म्हणोनि काष्ठ तोडावे ॥७६॥

दंतधावन करोनि ऐसे । काष्ठ टाकावे नैऋत्य दिशे ।
चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावे ॥७७॥

मग करावे प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन ।
तेजोबलाआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥७८॥

प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवते होती वश ।
सौभाग्य सुख होती हर्ष । प्रातःस्नान केलिया ॥७९॥

यती तापसी संन्यासी । त्रिकाळ करावे स्नानासी ।
ब्रह्मचारी विधींसी । एक वेळ करावे ॥१८०॥

नित्य केलिया पापनाश असे । करावे याचि कारणे हर्षे ।
गृहस्थे वानप्रस्थे विशेषे । प्रातर्मध्याह्नी करावे ॥८१॥

अशक्य संकट आले जरी । अथवा न मिळे निर्मल वारि ।
स्नान करावयाचि परी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥८२॥

अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावे वायुस्नान ।
करा विधीने मंत्रस्नान । आपोहिष्ठा मंत्राने ॥८३॥

आणिक स्नानफळे असती । ज्यास असेल भावभक्ति ।
गुरुदेवता दर्शनमात्री । तीर्थस्नानफळ असे ॥८४॥

अथवा दर्शन मातापिता । चरणतीर्थ भक्तीने घेता ।
अंगावरी प्रोक्षिता । तीर्थस्नानफळ असे ॥८५॥

अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत ।
किंवा बैसावे गोधुळीत । स्नानफळ असे देखा ॥८६॥

स्पर्श चांडाळा होता । जलस्नाने होय शुचिता ।
शूद्राचा स्पर्श होता । उपस्नान करावे ॥८७॥

दृढ असे तनु आपुले । स्नान मुख्य करावे जले ।
संधि-विग्रह-साकडे पडले । उषःस्नान करावे ॥८८॥

प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसी ।
अशक्तता असेल देहासी । उष्णोदके करावे ॥८९॥

स्वभावे पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क ।
पवित्र झाले उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥१९०॥

उष्णोदके स्नान करिता । शीतोदक करा मिश्रित ।
मध्ये करावे आचमन तत्त्वता । संकल्प तेथे म्हणावा ॥९१॥

घरी स्नान करिता देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका ।
वस्त्रे पिळू नये ऐका । आपुले हस्ते करूनिया ॥९२॥

पुत्रोत्साह संक्रांतीसी । श्राद्धकाळ मृतदिवसी ।
न करावे स्नान उष्णोदकेसी । अमावास्या पौर्णिमा ॥९३॥

स्नान करिता बांधा शिखा । दर्भहस्ती सूर्याभिमुखा ।
मौन असावे विवेका । कवणासवे न बोलावे ॥९४॥

आपोहिष्ठा मंत्रेसी । गायत्री तीन म्हणा सुरसी ।
येणेपरी स्नानोदकासी । अभिमंत्रावे ब्राह्मणे ॥९५॥

प्रथम शीतोदक घेऊनि । पश्चात उष्णोदक मिळवोनि ।
स्नान करावे प्रतिदिनी । गृहस्थांनी घरी देखा ॥९६॥

अवधूत मंत्र म्हणत । वस्त्र उकलावे त्वरित ।
उद्यंत मंत्र जपत । वस्त्र सूर्यासी दाखवावे ॥९७॥

आचमन करूनि आपण देवस्यत्व मंत्र जपोन ।
धूत वस्त्र नेसून । आणिक मंत्र जपावे ॥९८॥

आवहंती वितन्वती मंत्रे । वस्त्रे नेसावी पवित्र ।
द्विराचमन करावे तंत्रे । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥९९॥

आता मंत्रस्नान करणे । सांगेन त्याची विधाने ।
आपोहिष्ठादि मंत्राने । प्रोक्षावे शरीरावरी ॥२००॥

पाद मुर्ध्नी ह्रदयस्थानी । मूर्ध्नीं ह्रदय पाद प्रोक्षोनि ।
करावे तुम्ही मार्जनी । आपोहिष्ठा मंत्रेसी ॥१॥

ऐसे स्नान करोनि । पुनः आचमन करोनि ।
मानसस्नान विधींनी । करावे ऐका भक्तीने ॥२॥

नारायण विष्णूमूर्तीसी । स्नान करावे भक्तीसी ।
चतुर्भुज अलंकारेसी । ध्यान केलिया मानसन्मान ॥३॥

अपवित्रः पवित्रो वा । येणे मंत्रे हरि ध्यावा ।
उदके देहे प्रोक्षावा । स्नानफळ अवधारा ॥४॥

मंगलस्नानविधा । सांगेन ऐका ब्राह्मण ।
रविवारी निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥५॥

नदीतीरी असे नरु । अशक्त असे शरीरु ।
गंगास्मरणे निर्धारु । आर्द्रवस्त्रे अंग पुसावे ॥६॥

कांतिहानि सोमवारासी । मंगळवारी मृत्यु परियेसी ।
लक्ष्मी पावे बुधवारेसी । धनहानि गुरुवारी ॥७॥

शुक्रवारी पुत्रघात । शनिवारी अखिल संपत ।
जाणा ऐसे निश्चित । मंगलस्नान करावे ॥८॥

नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःसूर्याभिमुखी ।
संध्याकाळी पश्चिममुखी । स्नान करावे अवधारा ॥९॥

स्नान करिता नदीसी । अघमर्षण करावे परियेसी ।
नमोऽग्नयेऽप्सुमते मंत्रेसी । नदीस्नान करावे ॥२१०॥

यदपांक्रूर मत्रेंसी । उदक लोटावे द्विहस्तेसी ।
तीन वेळा लोटोनि हर्षी । इमं मे गंगे जपावे ॥११॥

ऋतं च सत्यं च मंत्र जपत । स्नान करावे गंगेत ।
नदीस्नानविधि ख्यात । करा तुम्ही विप्रवर्ग ॥१२॥

रोदनांती वमनांती । मैथुनदुःस्वप्नदर्शनांती ।
स्नानावेगळे शुद्ध न होती । स्नान करावे अवधारा ॥१३॥

आता वस्त्रावे विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
ओले वस्त्रे कासेवीण । नेसू नये गृहस्थाने ॥१४॥

रक्तादि वस्त्र जीर्ण धोत्र । नेसूनि जे जन जप करीत ।
ते पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥१५॥

श्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसी ।
उपवस्त्र वहिर्वासी । उत्तरवस्त्र म्हणिजे तया ॥१६॥

धोत्र नेसलिया नंतरी । विभूति लावावी परिकरी ।
मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावे ॥१७॥

भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावावे परी ।
द्वारावती मुख्य धरी । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥१८॥

न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका ।
ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तया ॥१९॥

पुष्टिकाम असे ज्यासी । लावावे तेणे अंगुष्ठेसी ।
ज्यासी काम असे आयुधी । मध्यांगुली लावावे ॥२२०॥

अन्नकाम अनामिएसी । तर्जनी काम्य मुक्तीसी ।
जे लाविती नखेसी । महापातक घडे तया ॥२१॥

उत्तम रुंदी दशांगुली । मध्यम नव आष्ट अंगुली ।
सप्त सहा पंचागुली । शूर्पाकार लावावे ॥२२॥

चतुर्थ त्रीणि द्वयांगुली । अधम पक्ष असे बोली ।
द्वादश नामे करा भली । विष्णुनाम उच्चारित ॥२३॥

केशव म्हणावे ललाटस्थानी । नाभी नारायण म्हणोनि ।
माधवनामे ह्रदयस्थानी । कमळपुष्पाकार देखा ॥२४॥

गोविंदनामे कंठेसी । विष्णुनामे कटिप्रदेशी ।
दक्षिणभुजा मधुसूदनेसी । नाभी उत्तर त्रिविक्रम ॥२५॥

वामन नामे बाहु देखा । श्रीधर दक्षिणकर्णिका ।
ह्रषीकेश वामकर्णिका । पद्मनाभ दक्षिणकटी ॥२६॥

दामोदर शिरस्थान । ऐका ऊर्ध्वपुंड्रविधान ।
पापे जाती जळोन । गोपीचंदन लाविता ॥२७॥

द्वारावती लावोनि । लावा भस्म त्रिपुंड्रांनी ।
हरिहर संतोषोनि । साधे भुक्ति मुक्ति देखा ॥२८॥

विवाहादि शोभन दिवसी । देवताकृत्य श्राद्धदिवसी ।
अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन वर्जावे ॥२९॥

ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन विस्तारेसी ।
आहेत दश प्रकारेसी । नामे सांगेन विख्यात ॥२३०॥

दूर्वा उशीर कुश काश । सकुद गोधूम व्रीहि मौजीष ।
नागरमोथा दर्भ परियेसा । दश दर्भ मुख्य असती ॥३१॥

नित्य आणावे दूर्वैसी । जरी न साधे आपणासी ।
श्रावण भाद्रपदमासी । संग्रह संवत्सरी करावा ॥३२॥

चारी दूर्वा विप्रासी । त्रीणि क्षत्रिय-वैश्यासी ।
एक नेमिली शूद्रासी । चतुर्वर्णी धरावे ॥३३॥

या दूर्वेची महिमा । सांगता असे अनुपमा ।
अग्रस्थानी असे ब्रह्मा । मूळी रुद्र मध्ये हरि ॥३४॥

अग्रभागी चतुरंगुल । ग्रंथी मूळी द्वयांगुल ।
धारण करावे ब्रह्मकुळे । याची महिमा थोर असे ॥३५॥

चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य पराभवी ऐका ।
ईश्वर त्रिशूल धरिता देखा । राक्षसांतक केवी होय ॥३६॥

इंद्र वज्रायुध धरिता । दैत्यगिरी विभांडी तत्त्वता ।
तैसे ब्राह्मण दूर्वा धरिता । पापदुरिते पराभवती ॥३७॥

जैसे तृणाचे बणवीसी । अग्निस्पर्श होता नाशी ।
तेवी आलिया पापराशि । दर्भस्पर्शै जळती देखा ॥३८॥

ब्रह्मयज्ञ जपसमयी । ग्रंथि बांधावी कुशाग्री ।
वर्तुळाकार भोजनसमयी । धरावी ब्राह्मणे भक्तीने ॥३९॥

कर्म आचरता दूर्वैसी । ग्रंथि बांधावी परियेसी ।
अग्निस्पर्श कर्पूराशी । पाप नाशी येणेपरी ॥२४०॥

एकादशांगुल प्रादेशमात्र । द्विदल असावे पवित्र ।
नित्य-कर्मासी हेच पवित्र । द्विदल जाणा मुख्य असे ॥४१॥

जपहोमादि दानासी । स्वाध्याय पितृकर्मासी ।
सुवर्णरजतमुद्रिकेसी । कुशावेगळे न करावे ॥४२॥

देवपितृकर्मासी देख । रजत करावे सुवर्णयुक्त ।
तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । सुवर्ण धरावे अनामिकेसी ॥४३॥

मुद्रिका असावी खड्‍गपात्री । कनिष्ठिकांगुली पवित्री ।
ग्राह्य नव्हे जीवंतपित्री । तर्जनांगुली मुद्रिका ॥४४॥

योगपट उत्तरी देखा । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका ।
पायी न घालाव्या पादुका । गयाश्राद्ध न करावे ॥४५॥

नवर‍त्‍न मुद्रिका ज्याचे हाती । पापे त्यासी न लागती ।
एखादे रत्‍न असता हाती । मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥४६॥

प्रातःसंध्येच विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
नक्षत्र असतांचि प्रारंभून । अर्घ्य सूर्योदयी द्यावे ॥४७॥

सूर्योदय होय तव । जप करीत उभे असावे ।
उदयसमयी अर्घ्य द्यावे । तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ॥४८॥

ऋषि पुसती पराशरासी । संध्या करावया विधि कैसी ।
विस्तारोनि आम्हांसी । सांगावे जी स्वामिया ॥४९॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । सांगेन संध्याविधिसी ।
ऐका तुम्ही तत्परेसी । पराशरस्मृतीसी असे ॥२५०॥

गायत्रीमंत्र जप करिता । शिखा बांधावी तत्त्वता ।
आसन घालावे निरुता । दर्भपाणि होउनी ॥५१॥

देवतीर्थे द्विराचमन । विष्णुनाम स्मरोन ।
प्राणायाम विस्तारोन । न्यासपूर्वक करावे ॥५२॥

प्रणवाचा परब्रह्म ऋषि । गायत्री नाम छंदासी ।
परमात्मा देवता परियेसी । म्हणा प्राणायामे विनियोगः ॥५३॥

ॐ व्याह्रति सत्यज्ञानिया । नाभि ह्रदय मूर्ध्नी स्पर्शावया ।
व्याह्रति सप्त अतिशया । प्रत्येक देवता ऋषि सांगेन ॥५४॥

व्याह्रति सप्तस्थानासी । ऐका असे प्रजापति ऋषि ।
प्रत्येक देवता परियेसी । सप्त नामे देवांची ॥५५॥

अग्निर्वायु गुरुः सूर्य । वरुणेंद्र विश्वदेव ।
सप्त व्याह्रति सप्त देव । छंद सप्त सांगेन ॥५६॥

गायत्री आणि उष्णिका । अनुष्टुप्‍ बृहती पंक्ति पंचम ऐका ।
त्रिष्टुप्‍ जगती छंद विशेखा । प्राणायामे विनियोगः ॥५७॥

ॐ भूः पादन्यास ।  भुवः जानु स्वः गुह्य ।
 महः नाभि स्थान स्पर्शा । जनो ह्रदय तपो कंठ ॥॥५८॥॥

ॐ भू र्ह्रदयाय नम इति ।  भुवः शिरसे स्वाहेति ।
 स्वः शिखायै वषडिति ।  तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुं ॥२६०॥

ॐ भर्गोदेवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोषट्‍ । धियोयोनः प्रचोदयात्‍ अस्त्राय फट्‍ ।
 भूर्भु०इति दिग्बंधः । ऐसे षडंग करावे ॥६१॥

प्राणायामे विनियोगः म्हणुनि । आपोस्तन स्पर्शोनि ।
ज्योतिर्नेत्रस्पर्शस्थानी । रसो जिव्हामृतललाटे ॥६२॥

प्राणायाम करावयासी । प्रजापति म्हणती ऋषि ।
देवतानामे परियेसी । ब्रह्माग्निवायु सूर्य असे ॥६३॥

ब्रह्मभूर्भुवःस्वः म्हणुनि । प्राणायाम करा तिन्ही ।
त्रिपदा गायत्री जप कोणी । जपणारासी सर्व सिद्धि ॥६४॥

गायत्रीची अधिदेवता । ब्रह्माग्निवायु सविता ।
ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्त लोकन्यास सांगेन ॥६५॥

पादन्यास भुर्लोक । भुवः जानु अतिविशेख ।
स्वः गुह्य असे लोक । नाभिन्यास महर्लोक ॥६६॥

जनो ह्रदय तपो ग्रीवे । भ्रुवोर्ललाटे सत्यलोक म्हणावे ।
ऐसे शिरस्थान बरवे । सत्यलोक म्हणती तयासी ॥६७॥

गायत्रीची प्रार्थना करूनि । प्राणायाम करा विधींनी ।
ब्रह्मचारी गृहस्थानी । पंचांगुली धरा परमेष्ठी ॥६८॥

वानप्रस्थ संन्यासी यती । अनामिकाकनिष्ठिकांगुष्ठेसी ।
ओंकारादि वायुपूरकेसी । दक्षिणनासापुटे चढवावे ॥६९॥

वामनासापुटी विसर्जोनि । करा प्राणायाम तिन्ही ।
येणेचि विधी करा मुनि । त्रिकालसंध्या कर्मै ॥२७०॥

आता करावे मार्जनेसी । सांगेन ऐका समस्त ऋषि ।
जैसे अति स्मृतिचंद्रिकेसी । तेणे विधी सांगतो ॥७१॥

आपोहिष्ठेति सूक्तेसी । सिंधुद्वीप ऋषि गायत्री छंदेसी ।
आपोदेवता मार्जनासी । हा म्हणावा विनियोग ॥७२॥

येणे मंत्रे म्हणोन । कुशपवित्रे करा मार्जन ।
यस्य क्षयाय मंत्रे जाण । आपुले पाद प्रोक्षावे ॥७३॥

आपोजनयथा मंत्रेसी । प्रोक्षावे आपुल्या शिरसी ।
सूर्यश्चेति मंत्रेसी । उदक प्राशन करावे ॥७४॥

हिरण्यवर्णसूक्तेसी । मार्जन करावे परियेसी ।
द्रुपदादिवेति मंत्रेसी । घ्राणोनि उदक सोडावे ॥७५॥

आचमने करोनि दोन । मार्जनविधान सांगेन ।
वामहस्ती पात्र धरून । मार्जन करा विशेषी ॥७६॥

औदुंबर सुवर्ण रजत । काष्ठाचेही असे पवित्र ।
ऐसे असे निर्मळ पात्र । वामहस्ती उदक बरवे ॥७७॥

मृण्मय अथवा द्विमुख पात्र । भिन्न पात्र ते जाण अपवित्र ।
ते अग्राह्य देवपितरा । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥७८॥

मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसी अष्ट पादे नवका ।
यस्य क्षयाय स्नान भुमिका । येणेपरी मार्जन ॥७९॥

आपः पुनन्तु मंत्रेसी । प्राशनोदक माध्याह्नेसी ।
अग्निश्चेति मंत्रेसी । सायंसंध्या करावी ॥२८०॥

प्राशनांती तुम्ही ऐका । द्विराचमन करा निका ।
आघ्राण करुनी सांडिजे ऐका । एक आचमन करावे ॥८१॥

अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
गोश्रृंगाइतुके आकारोन । अर्घ्य द्यावे मनोभावे ॥८२॥

गायत्रीमंत्र जपोनि । सायंप्रातर्द्यावी तिन्ही ।
हंसःशुचिषेति माध्याह्नी । अर्घ्य द्यावे अवधारा ॥८३॥

प्रातर्माध्याह्नी उभे बरवे । सायं अर्घ्य बैसोनि द्यावे ।
आचमन त्रिवारी करावे । करी प्रदक्षिणा असावादित्य ॥८४॥

अर्घ्य द्यावयाचे कारण । सांगेन कथा विस्तारोन ।
राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि आहेती देखा ॥८५॥

सूर्यासवे युद्धासी। नित्य येतीपरियेसी ।
संदेह पडे देवांसी । सूर्या होईल अपजय ॥८६॥

अपजय येता सूर्यासी । उदयास्तमान न होय परियेसी ।
कर्मै न चालती ब्राह्मणांसी । स्वाहास्वधाकार न चाले ॥८७॥

स्वाहास्वधाकार रहाती । समस्त देवांस उपवास होती ।
सृष्टि राहिली न होय उत्पत्ति । म्हणोनि उपाय रचियेला ॥८८॥

याचि कारणे अर्घ्य देती । तीचि वज्रायुधे होती ।
जावोनि दैत्यांसी लागती । पराभविती प्रतिदिवसी ॥८९॥

दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी वधिलिया घडती दोष ।
प्रदक्षिणा करिता होय नाश । असावादित्य म्हणोनिया ॥२९०॥

ब्रह्महत्येचिया पातकासी । भूमिप्रदक्षिणा दोष नाशी ।
चार पावले फिरता कैसी । भूमिप्रदक्षिणा पुण्य असे ॥९१॥

संध्या करावयाचे स्थान । सांगेन ऐका फलविधान ।
घरी करिता प्रतिदिन । एकचि फळ अवधारा ॥९२॥

दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस केलिया शताधिका ।
पुष्करतीरी सहस्त्र ऐका । गंगासुरनदी कोटिफल ॥९३॥

सुरापान दिवा मैथुन । अनृतादि वाक्ये पापे जाण ।
संध्या बाहेर करिता क्षण । जळती दोष तात्काळी ॥९४॥

स्थाने असती जप करावयासी । विस्तारे सांगेन तुम्हासी ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । एकचित्ते परियेसा ॥९५॥

जप केलिया घरी ऐका । एकचि फल असे देखा ।
बाहेर द्विगुणी फल अधिका । नदीतीरी त्रिगुण फल ॥९६॥

गोस्थळ वृंदावन देखा । दशगुण फल अधिका ।
अग्निहोत्रस्थानी निका । शतगुणफल अधिक असे ॥९७॥

तीर्थदेवता सन्निधानी । सहस्त्रफल असे निर्गुणी ।
शतकोटि फल हरिसन्निधानी । ईश्वरसंनिधानी अनंत फल ॥९८॥

जप करिता आसनासी । विधिनिषेध आहे परियेसी ।
सांगेन ऐका तत्परेसी । पुण्य पाप बोलिले असे ॥९९॥

काष्ठासनी बैसोनि जरी । जप करिता मनोहरी ।
दुःख भोगी निरंतरी । अभागी पुरुष तो होय ॥३००॥

पल्लवशाखांसी बसता । सदा होय दुश्चिता ।
वस्त्रासनी दरिद्रता । पाषाणासनी व्याधि होय ॥१॥

भस्मासनी व्याधिनाश । कंबलासनी सुखसंतोष ।
कृष्णाजिनी ज्ञानप्रकाश । व्याघ्रचर्मी मोक्षश्री ॥२॥

कुशासनी वशीकरण । सर्व रोगांचे उपहरण ।
पापे जाती पळोन । आयुःप्रज्ञा अधिक होय ॥३॥

ओ इत्येक्षारकमंत्री । जपावा तुम्ही पवित्री ।
ध्यान करावे गायत्री । समस्त पापे हरती देखा ॥४॥

गायत्रीचे स्वरूप आता । अभिवन असे वर्णिता ।
रक्तांगी वास रक्ता । हंस वाहन असे देखा ॥५॥

अकार ब्रह्मा अधिदेवता । चतुर्भुजा चतुर्वक्त्रा ।
कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला असे करी ॥६॥

ऋग्वेद असे समागमी । अग्निहोत्रफल आवाहयामि ।
मग आयातु वरदा देवी । म्हणावे ऐका ब्राह्मणाने ॥७॥

त्या मंत्रासी ऋषि देवता । गायत्रीसदृश असे ख्याता ।
प्रातःसंध्या तुम्ही करिता । विधि तुम्हा सांगेन ॥८॥

गायत्री देवता गायत्री अनुष्टुप छंदः ।  आदित्य देवता देवा ।
हे प्रातःसंध्या म्हणता भेद । गायत्री देवता गायत्री छंदः ॥९॥

गायत्री आवाहने विनियोगः । ही माध्याह्नसंध्या म्हणावी ।
सविता देवता गायत्री छंदः । सरस्वती आवाहने विनियोगः ॥३१०॥

प्रातःसंध्येचे ध्यान । सांगेन ऐका तुम्ही गहन ।
रक्तांगी रक्तवसन । हंसासनी आरूढ असे ॥११॥

चतुर्बाहु चतुर्मुखी । कमंडलु धरिला विशेखी ।
अक्षसूत्र चाटु हस्तकी । ऋग्वेदसहित अग्निहोत्र ॥१२॥

ऐसे ध्यान करोनि । मग म्हणावे अक्षरज्ञानी ।
एकचित्ते असा ध्यानी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥

ओंकार शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामी ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥१४॥

ऐसे म्हणोनि प्रातःकाळी । संध्या करावी सुवेळी ।
आता सांगेन माध्याह्नकाळी । ध्यान आवाहनपूर्वक ॥१५॥

अभिभुरो सावित्रीध्यान । यौवनस्था माध्याह्न ।
सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्ते परियेसा ॥१६॥

श्वेतांगी श्वेतवस्त्र । वाहन असे वृषभ पवित्र ।
उकार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे देखा ॥१७॥

वरद अभयहस्त देखा । रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका ।
यजुर्वेद असे देखा । अग्निष्टोम फल जाणा ॥१८॥

ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । ह्रियमावाहयामि ॥१९॥

आता सायंसंध्या ध्यान । सांगेन ऐका विधान ।
एकचित्ते ऐका वचन । ध्यानपूर्वक सांगेन ॥३२०॥

अभिभूरो सरस्वती वृद्धा । जाणावी तुम्ही सायंसंध्या ।
कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधाना । गरुडवाहन असे देखा ॥२१॥

मकार विष्णुदेवता । चतुर्भुज शंखचक्रधृता ।
गदापद्मधारणहस्ता । सामवेदसहित जाणा ॥२२॥

वाजपेयफल जाण । सायंसंध्या असे ध्यान ।
करावे ऐका तुम्ही ब्राह्मण । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥२३॥

ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥२४॥

पंचशीर्षोपनयने विनियोगः । प्रणवस्य परब्रह्म ऋषिः ।
परमात्मा देवता । गायत्री छंदः ॥२५॥

उदात्तस्वरित स्वरः अग्निर्वायुः सूर्यदेवता । गायत्री त्रिष्टुप्‍ जगती छंदः ।
ब्रह्माविष्णुमहेश्वरादेवताः । ऋग्यजुःसामानि स्वरूपाणि ॥२६॥

आहवनीयाग्निगार्हपत्य । दक्षिणाग्निउपस्थानानि ।
पृथिव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि । उदात्तानुदात्तस्वरितस्वराः ॥२७॥

पीतविद्युतश्वेतवर्णी । प्रातर्मध्याह्नतृतीयसवनानि ।
विश्वतजसप्राज्ञस्वरूपिणी । जागृतीस्वपन्सुषुप्त्यवस्था ॥२८॥

ऐसे त्रिपदा गायत्रीसी । सांगितले त्रिविध ध्यानासी ।
आता विधान जपासी । सांगेन ऐका एकचित्ते ॥२९॥

ममोपात्तदुरितक्षयद्वारा । श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः ।
 अं नाभौ । वं ह्रदये मं कंठे ॥३३०॥

भूः अक्षरमंत्रासी । गायत्री असे छंदेसी ।
अग्निर्देवता परिएय्सी । विश्वामित्र ऋषि देखा ॥३१॥

षड्‍ज स्वर श्वेत वर्ण । पादस्पर्श उच्चारोन ।
प्राणायामे विनियोगून । दुसरी व्याह्रति म्हणावी ॥३२॥

भुवः अक्षरमंत्रासी । उष्णिक्‍ नाम छंदासी ।
वायुर्देवता परियेसी । भृगु ऋषि असे जाण ॥३३॥

असे रूप श्यामवर्ण । पादस्पर्श रूप उच्चारोन ।
करा तुम्ही ऐसे ध्यान । जानूमध्ये न्यासावे ॥३४॥

प्राणायाम विनियोग म्हणोनि । न्यास करावे भक्तिभावनी ।
स्वः व्याह्रति म्हणोनि । ध्यान करा भक्तीने ॥३५॥

स्वः व्याह्रतिमंत्रासी । म्हणा अनुष्टुप्‍ छंदासी ।
सविता देवता परियेसी । भारद्वाज ऋषि जाण ॥३६॥

स्वर गांधार पीतवर्णा । कंठी स्पर्शोन मंत्र म्हणा ।
प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय व्याह्रतिमंत्रासी ॥३७॥

ॐ महः मंत्रासी । बृहती छंदासी ।
बृहस्पति देवता परियेसी । वसिष्ठ ऋषि निर्धारे ॥३८॥

मध्यम स्वर पिशंग वर्ण । ऐसे करा तुम्ही ध्यान ।
वेगे म्हणा नाभी स्पर्शोन । प्राणायामे विनियोगः ॥३९॥

जन मंत्र उच्चारासी । म्हणा पंक्ति छंदासी ।
वरुण देवता गौतम ऋषि । पंचम स्वर असे जाण ॥३४०॥

रूप असे नीलवर्ण । करा न्यास ह्रदयस्थान ।
प्राणायामे विनियोगून । जनः पंच न्यास ऐसे ॥४१॥

तपः मंत्र न्यासासी । त्रिष्टुप्‍ छंद परियेसी ।
ईश्वर देवता कश्यप ऋषि । धैवत स्वर परियेसा ॥४२॥

असे आपण लोहवर्ण । स्पर्श करावे कंठस्थान ।
प्राणायामे विनियोगून । न्यास करावा ब्राह्मणहो ॥४३॥

सत्यं म्हणतसे मंत्रासी । करावे जगती छंदासी ।
विश्वेदेव अंगिरस ऋषि । निषाद स्वर जाणावा ॥४४॥

रूप असे कनकवर्ण । भ्रुवोर्ललाटा स्पर्शून ।
प्राणायामे विनियोगून । न्यास करावा भक्तीने ॥४५॥

इतुके न्यास करोनि । हस्त ठेवा शिरस्थानी ।
ध्यान करा विधानी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥४६॥

शिरस्थान स्पर्शासी । म्हणा अनुष्टुप्‍ छंदासी ।
उच्चार प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाण ॥४७॥

प्राणायामे विनियोगून । मग करावे गायत्रीध्यान ।
 आपोज्योति म्हणोन । मंत्र म्हणा भक्तीने ॥४८॥

ॐ आपोज्योतिरसोमृतं । ब्रह्मभूर्भुवःस्वरो ।
शिरसी येणे विधी । अंगन्यास करावे ॥४९॥

चोवीस अक्षरे मंत्रासी । न्यास सांगेन एकाएकासी ।
एकचित्ते परियेसी । म्हणे पराशर ऋषि तो ॥३५०॥

या त्रिपदा गायत्रीसी । असे विश्वामित्र ऋषि ।
देवी गायत्री छंदेसी । वर्ण देवता सांगेन ॥५१॥

ऐसे त्रिपदा गायत्रीमंत्रासी । चोवीस अक्षरे परियेसी ।
पृथक्‍ न्यास परियेसी । सांगेन ऐक द्विजोत्तमा ॥५२॥

तवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
अग्नि देवता परियेसी गायत्री छंद म्हणावा ॥५३॥

अतसीपुष्पे वर्णै जैसी । तद्रूप वर्ण असे परियेसी ।
वायव्य कोण स्थान त्यासी । गुल्फन्यास करावा ॥५४॥

त्सवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि ।
वायुदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५५॥

जंघस्थानी असे न्यास । सौम्यरूप पिवळे सुरस ।
सर्व पापे दहती परियेस । त्सवर्णाचे लक्षण ॥५६॥

विवर्णनाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५७॥

न्यास करावया जानुस्थान । इंद्रनील विद्युद्वर्ण ।
ऐसे अक्षरविधान । महारोग हरती देखा ॥५८॥

तुवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि ।
विद्युद्देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५९॥

न्यास करा जानुस्थानी । दीप्ति असे जैसा वह्नि ।
रूप असे सौम्यपणी । भ्रूणहत्यापाप नाशी ॥३६०॥

र्ववर्ण अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि ।
सोम देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६१॥

सुवर्णस्फटिककांति । गुह्यस्थानी न्यास बोलती ।
समस्त अघौघ नाशती । रूपार्ववर्णस्थाना उत्तम ॥६२॥

रेवर्ण नाम अक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि ।
वरुण देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६३॥

णिकार वृषणस्थान जाणा । विद्युत्प्रकाशरूपधारणा ।
बार्हस्पत्यनाम खुणा । अभक्ष्यपापक्षालन ॥६४॥

णिवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
बृहस्पति देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६५॥

यं कटिस्थान शांताकारवर्ण । देहहत्यापापज्वलन ।
न्यास करावे सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा ॥६६॥

यं अक्षर म्हणावयासी । असे विश्वामित्र ऋषि ।
तारका दैवत परियेसी । देवी गायत्री छंद असे ॥६७॥

भकारा नाभी करा न्यास । कृष्णमेघवर्ण सुरस ।
पर्जन्य देवता संकाश । गुरुहत्यापाप नाशी ॥६८॥

भवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि ।
पर्जन्य देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥६९॥

र्गो अक्षरा उदर न्यास । ध्यान रक्तवर्ण सुरस ।
इंद्र देवता परियेस । गोहत्येचे पाप जाय ॥३७०॥

गोवर्ण नाम अक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि ।
इंद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७१॥

देकारन्यास स्तनासी । गंधर्व नाम देव परियेसी ।
स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्ते परियेसा ॥७२॥

देवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
गंधर्व देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥७३॥

वकार ह्रदयस्थानन्यास । शुक्ल रूप वर्ण परियेस ।
पूषा देवता असे त्यास । वाणीजातपाप नाशी ॥७४॥

ववर्णाक्षर मंत्रासी । जाणावा विश्वामित्र ऋषि ।
रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७५॥

स्य अक्षरा कंठन्यास । कांचनवर्ण रूप सुरस ।
मित्र देवता परियेस । मार्जारकुक्कुटपाप जाय ॥७६॥

स्यवर्ण अक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि ।
मित्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७७॥

धीकाराक्षरमंत्र दंती न्यास । शुक्लकुमुदसंकाश ।
त्वष्टा देवता परियेस । पितृहत्यापाप जाय ॥७८॥

धीवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाण ॥७९॥

मकारन्यास तालुस्थान । पद्म तेजोमय जाण ।
वासुदेव असे खूण । सर्वजन्मपाप जाय ॥३८०॥

मकार वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि ।
वासुदेव देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८१॥

हिकार नासिकी करा न्यास । शंखवर्ण असे त्यास ।
वासुदेव देवता परियेस । सर्व पाप हरण होय ॥८२॥

हिवर्ण नाम मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
मेरु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८३॥

धिकारा नेत्रस्थानी न्यास । पांडुरभास संकाश ।
सोम देवता परियेस । पाणिग्रहणपाप नाशी ॥८४॥

धिवर्ण नाम मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि ।
सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८५॥

योकाराक्षर मंत्रासी । भुवोर्मध्ये न्यासिजे त्यासी ।
रक्तगौरवर्ण रूपेसी । प्राणिवधपाप जाय ॥८६॥

योकाराक्षर नामाक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
यमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८७॥

योकार ललाटस्थानी न्यास । रूप रुक्मांभसंकाश ।
सर्व पाप होय नाश । भक्तिपूर्वक न्यासावे ॥८८॥

योवर्णाक्षर मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि ।
विश्वे देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८९॥

नकारा उदित प्राङ्‌मुखा । सूर्यासमान तेज देखा ।
आश्विनौ देवता असे निका । विराजमान परियेसा ॥३९०॥

नकाराक्षर वर्णासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
अश्विनौ देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९१॥

प्रकाराक्षरन्यास करोनि दक्षिणे । रूप असे नीलवर्ण ।
प्रजापति देवता जाण । विष्णुसायुज्य पाविजे ॥९२॥

प्रवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि ।
प्रजापति देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९३॥

चोकार वर्ण मंत्रासी । न्यासिजे तया पश्चिम भागासी ।
कुंकुमरूपवर्ण त्यासी । सर्वदेवपदवी पाविजे ॥९४॥

चोकार वर्ण मंत्राक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि ।
सर्व देवता परियेसी । गायत्री देवी छंद जाणा ॥९५॥

दकाराक्षराचा उत्तरे न्यास । शुक्लवर्ण रूप सुरस ।
करावे तुम्ही ऐसे न्यास । कैलासपद पाविजे ॥९६॥

दकाराक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९७॥

याकार मूर्धास्थानी न्यास । सुवर्णरूप सुरस ।
ब्रह्मस्थाना होय वास । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥९८॥

यावर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि ।
ब्रह्म देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९९॥

तकार न्यास शिखास्थानी । निरुपम वैष्णवभुवनी ।
विष्णुरूप धरोनि । वैकुंठवास होय जाणा ॥४००॥

तकार वर्णाक्षरमंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि ।
विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥१॥

ऐसे चोवीस अक्षरमंत्रासी । न्यास करावे विधींसी ।
हस्त ठेवोनिया शिरासी । आणिक न्यास करावे ॥२॥

शिरस्थानी न्यासासी । म्हणावे अनुष्टुप्‍ छंदासी ।
ख्याति प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाणा ॥३॥

प्राणायामे विनियोग म्हणोनि । ओं आपोस्तन स्पर्शोनि ।
ज्योतिर्नेत्र स्पर्शोनि । रसोजिह्वा न्यासावे ॥४॥

अमृतेति ललाटेसी । मूर्घ्नि स्पर्शोनि ऐसी ।
ब्रह्मभूर्भुवःस्वरोमासी । न्यास करा येणे विधी ॥५॥

इतुके न्यास करोनि । गायत्री त्रिवार म्हणोनि ।
व्यापक न्यास करोनि । करशुद्धि करा तीन वेळा ॥६॥

भुः० स्वः० विन्यसोनि । गायत्रीच्या दश पदांनी ।
दशांगुली न्यासोनि । पादप्रमाण करावे ॥७॥

अंगुष्ठमूल धरोनि । कनिष्ठिका स्पर्शोनि ।
उभय हस्त न्यासोनि । दशपादांगुली न्यासावे ॥८॥

चोवीस अक्षरमंत्रासी । अंगुलिन्यास करा हर्षी ।
तर्जनीमूलादारभ्येसी । कनिष्ठिकापर्यंत ॥९॥

द्वादशाक्षरी अकैक हस्त । करावे न्यास सुनिश्चित ।
षडंगन्यास समस्त । प्रणवासहित करावे ॥४१०॥

ॐ भूः हिरण्यात्मने । अंगुष्ठाभ्यां नमः ।
 भुवः प्रजापत्यात्मने । तर्जनीभ्यां नमः ॥११॥

ॐ स्वः सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः ।
 महः ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः ।

ॐ जनः,  तपः  सत्यं, कनिष्ठिकाभ्यां नमः ।
प्रचोदयात्‍ करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥१२॥

ॐ तत्सवितुः अंगुष्ठाभ्यां ह्रदयाय नमः ।
वरेण्यं तर्जनीभ्यां शिरसे स्वाहा ।

भर्गोदेवस्य मध्यमाभ्यां शिखायै वषट्‍ ।
धीमहि अनामिकाभ्यां कवचाय हुं ॥१३॥

धियोयोनः कनिष्ठिकाभ्यां नेत्रत्रयाय वौषट्‍ ।
प्रचोदयात्‍ करतलकरपृष्ठाभ्यां अस्त्राय फट्‍ ।
उभयहस्तांगुलिन्यासं कुर्यात्‍ ।
अथ षडंगन्यासः ॥१४॥

ॐ भूः हिरण्यात्मने ह्रदयाय नमः ।  भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा ।
 स्वः सूर्यात्मने शिखायै वौषट्‍ ।  महः ब्रह्मात्मने कवचाय हुं ॥१५॥

ॐ जनः,  तपः,  सत्यं, सोमात्मने । नेत्रत्रयाय वौषट्‍ ।
प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट्‍ ।  तत्स० ह्रदयाय नमः ॥१६॥

ॐ वरेण्यं शिरसे स्वाहा ।भर्गोदेवस्य शिखायै वौषट्‍ । धीमहि कवचाय हुं ।
धियोयोनः नेत्रत्रयाय वौषट्‍ । प्रचोदयात अस्त्राय फट्‍ ॥१७॥

षडंगन्यास करोनि । अंगन्यास दशस्थानी ।
त्यांची नावे सांगेन कानी । एकचित्ते अवधारा ॥१८॥

पादजानुकटिस्थानी । नाभिह्रदयकंठभुवनी ।
तालुनेत्र स्पर्शोनि । ललाटशिरी दशस्थान ॥१९॥

गायत्रीमंत्राच्या दहा पदांसी । दशस्थान अंगन्यासासी ।
तत्सवितुर्वरेण्येसी । भर्गोदेवस्य पंचम स्थान ॥४२०॥

धीमहि म्हणजे षष्ठ स्थान । धियो सप्तम स्थान जाण ।
योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥२१॥

नकार नवम मंत्रस्थान । प्रचोदयात्‍ दहावे जाण ।
अंगन्यास येणे गुण । करा तुम्ही द्विजोत्तमा ॥२२॥

चतुर्विशति अक्षरांसी । करावे अंगन्यासासी ।
पादांगुष्ठस्पर्श हर्षी । शिखादारभ्य न्यासावे ॥२३॥

अंगुष्ठाभ्यां नमः । त्सं गुल्फयोर्नमः ।
विं जंघर्योर्नमः । तुं जानुभ्यां नमः ॥२४॥

व ऊरुभ्यां नमः । रें गुह्याय नमः ।
णीं वृषणाय नमः । यं कटिभ्यां नमः ॥२५॥

भं नाभ्यै नमः । र्गौ उदराय नमः ।
दें स्तनाभ्यां नमः । वं ह्रदयाय नमः ॥२६॥

स्यं कंठाय नमः । धीं दंतेभ्यो नमः ।
मं तालवे नमः । हिं नासिकायै नमः ॥२७॥

धिं नेत्राभ्यां नमः । यों भ्रुवोर्मध्याय नमः ।
यों ललाटाय नमः । नः प्राङ्‍मुखाय नमः ॥२८॥

प्रं दक्षिणमुखाय नमः । चों पश्चिममुखाय नमः ।
दं उत्तरमुखाय नमः । यां मूर्ध्ने नमः । तं शिखायै वषट्‍ ॥२९॥

ऐसे न्यास करोनि । पुनः पादांगुष्ठ धरोनि ।
कटिपर्यंत न्यासोनि । ऊर्ध्वन्यास करावे ॥४३०॥

तकारा अंगुष्ठस्थान । त्सकार गुल्फ असे स्थान ।
विकार जंघास्थान । ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु ॥३१॥

तुकार जानूर्वकार ऊरवे । वकार गुह्यपूर्वक स्पर्श ।
णिकारा वुषणस्थान बरवे । तुकार कटिस्थान न्यास ॥३२॥

शिखा धरोनि पादपर्यंत । करावे न्यास उतरत ।
त्याते सांगेन आदिअंत । एकचित्ते परियेसा ॥३३॥

तं नमः शिकायै विन्यस्य । यां नमः मुर्ध्नि विन्यस्य ।
दं नमः उत्तरशिखायां न्यस्य । चो नमः पश्चिमशिखायां ॥३४॥

प्रं नमः दक्षिणशिखायां । नं नमः प्राङ्‍मुखे ।
यो नमः ललाटे । यो नमः भ्रुवोर्मध्यी ॥३५॥

धिं नमः नेत्रत्रये । हिं नमः नासिकयोः ।
मं नमः तालौ । धी नमः दंतेषु ॥३६॥

स्यं नमः कंठे । वं नमः ह्र्दये । दें नमः स्तनयोः ।
र्गौ नमः उदरे । भं नमः नाभौ ॥३७॥

प्रणवादि नमोत न्यास करावे । आकार नाभी उकार ह्रदये ।
मकार मुखे नकार ललाटे । मकर शिरसि हस्तेन नमस्कृत्वा ॥३८॥

अथ मुद्रासंपुटप्रकारी । चतुर्विशति अवधारी ।
सांगेन त्यांचा विस्तार परी । ऐका ब्राह्मण एकचित्ते ॥३९॥

श्लोक । सुमुखं संपुटं चैव विततं विस्तृतं तथा ।
द्विमुखं त्रिमुखं चैव चतुःपंचमुखं तथा ॥४४०॥

षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं तथा ।
शकटं यमपाशं च ग्रंथितं चोल्मुकोल्मुकम ॥४१॥

प्रलंबं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकम्‍ ।
सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा ॥४२॥

एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फला भवेत्‍ ।
एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता ॥४३॥

अस्यार्थः । सुमुखं ॥१॥ संपुटं ॥२॥ विततं ॥३॥
विस्तृतं ॥४॥ द्विमुखं ॥५॥ त्रिमुखं ॥६॥

चतुर्मुखं ॥७॥ पंचमुखं ॥८॥ षण्मुखं ॥९॥
अधोमुखं ॥१०॥ व्यापकांजलिकं ॥११॥

शकटं ॥१२॥ यमपाशं च ॥१३॥ ग्रंथितं ॥१४॥
चोल्मुकोल्मुकं ॥१५॥ प्रलंबं ॥१६॥

मुष्टिकं ॥१७॥ मत्स्यः ॥१८॥
कूर्मः ॥१९॥ वराहः ॥२०॥

सिंहाक्रांतं ॥२१॥ महाक्रांतं ॥२२॥
मुद्गरं ॥२३॥ पल्लवं ॥२४॥

मुद्राविण गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ ।
या कारणे करावे पात्र । मुद्रापूर्वक जप करावा ॥४४॥

गौप्प्य करावा मुद्रायुक्त । प्राणायाम करा निश्चित ।
समस्त पापक्षयार्थ । म्हणोनि अष्टोत्तरीय संकल्पावे ॥४५॥

या गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ऋग्वेद असे ऋषि ।
भूमितत्त्व परियेसी । ब्रह्मा देवता त्रिष्टुप्‍ छंद ॥४६॥

द्वितीयपाद गायत्रीसी । यजुर्वेद असे ऋषि ।
रुद्रदेवता प्राणापानव्यालतत्त्वेसी । जगती म्हणा अहर्निशी ॥४७॥

गायत्री तृतीयपादासी । ऋग्यजुः सामतत्त्व परियेसी ।
विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी । समस्तपापक्षयार्थ विनियोग ॥४८॥

भूमिस्तंभ परियेसी । गायत्री छंदासी ।
म्हणावे ब्रह्मपदासी । ब्रह्मा दैवत जाणावे ॥४९॥

गायत्रीचे ध्यान । सांगेन तुम्हा विधान ।
एकचित्ते करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४५०॥

श्लोक । मुक्ताविदुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्‍ ।
गायत्री वरदाभयांकुशकशां शुभ्रं कपालं गदां शंखं चक्रमथारविदयुगलं हस्तैर्वहन्ती भजे ॥५१॥

ऐसे ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्रनयनी ।
अंती षडंग न्यासोनि । जप करा येणेपरी ॥५२॥

गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्ते परियेसा ।
मंत्रनाम असे विशेषा । अक्षरे दोनी पाप हरे ॥५३॥

मकार म्हणजे आपुले मन । त्रकार नाम आपुला प्राण ।
मन प्राण एकवटोन । जप करावा एकचित्ते ॥५४॥

जप म्हणजे अक्षरे दोनी । प्रख्यात असती त्रिभुवनी ।
जकार जन्म विच्छेदोनि । पकारे जन्मपाप दुरी ॥५५॥

चारी वेदांस मूळ एका । गायत्रीनाम नाशी पातका ।
याचि कारणे करावा निका । वेदपठणफळ असे ॥५६॥

ऐसा मंत्र न जरी जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर ।
जप करा हो निर्धार । चिंतिले फल पाविजे ॥५७॥

न करावा उदकी बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन ।
याचि कारणे सांगेन विस्तारोन । अग्नि तीनि विप्रमुखी ॥५८॥

आहवनीय गार्हपत्य । दक्षिणाग्नि तिसरा विख्यात ।
अग्निउदकसंपर्कै त्वरित । तेजत्व जाय अग्नीचे ॥५९॥

या कारणे उदक वर्जोनि । बैसिजे उत्तम आसनी ।
हस्तस्पर्शी नाभिस्थानी । जपावा माळ धरोनिया ॥४६०॥

उभेनी जपावा प्रातःकाळी । बैसोनि कीजे माध्याह्नकाळी ।
अथवा उभा ठाकोनि । उभय पक्षी करावा ॥६१॥

माध्याह्नी ह्रदयस्थानी । जपावा माळ धरोनि ।
हस्त मुखे स्पर्शोनि । सायंकाळी जपावा ॥६२॥

बैसोनि जपावा सायंकाळी । पहावा वृक्ष निर्मळी ।
जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्रानयनी जपावा ॥६३॥

ब्रह्मचारी गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी ।
वानप्रस्थ संन्यासी यासी । सहस्त्र मुख्य करावा ॥६४॥

संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति तरी करी ।
अशक्ति होय जरी । दहा वेळ जपावा ॥६५॥

उत्तम पक्ष मानसी । मध्यम गौप्य सुमुखेसी ।
अक्षरे प्रगट वाक्येसी । कनिष्ठ पुकार परियेसा ॥६६॥

त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसी ।
म्हणता होय महादोषी । महानरक अवधारा ॥६७॥

पृथक करोनि त्रिपदासी । जपा मंत्र अतिहर्षी ।
ब्रह्महत्यादि पापे नाशी । अनंत पुण्य लाधिजे ॥६८॥

अंगुष्ठजपे एक पुण्य । पर्वांगुलीने दशगुण ।
शंखमणीने होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥६९॥

स्फटिकमणि दहासहस्त्र । मौक्तिके पुण्य लक्षाधिक ।
पद्माक्षी निर्गुण जप । दशलक्ष पुण्य असे ॥४७०॥

कोटुगुणे सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला ।
जप करा नित्य काळा । गौप्यमाला धरोनिया ॥७१॥

गौप्यमाला करकमळी । जप करा निश्चली ।
सौख्य पावे अनंत फळी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥७२॥

जप करिता नुल्लंघिजे मेरु । उल्लंघिता पाप बोलिले अपारु ।
प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरुलंघनपाप जाय ॥७३॥

गायत्रीजप तीन दिवस । प्रत्यही करावा एकादश ।
सर्व पातके होती नाश । त्रिरात्रीचे पाप जाय ॥७४॥

अष्टोत्तरशत जप करिता । अघोर पातक जाय त्वरिता ।
करोनि सहस्त्र जप एकाग्रता । उपपातके नासती ॥७५॥

महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसी ।
जे जे कर्म इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥७६॥

जप करावा मन दृढे । न पहावे मागे पुढे ।
शूद्रादिक यातीकडे । संभाषण न करावे ॥७७॥

द्रव्य घेवोनि एखाद्यासी । जपता होय अनंतदोषी ।
चांडाळयोनीत भरवसी । जन्म पावे परियेसा ॥७८॥

कंडू नये शरीर आपुले । नेणता जरी इतुके घडले ।
श्रोत्राचमन करा वहिले । दोष नाही अवधारा ॥७९॥

ब्राह्मणाचे दक्षिणकर्णी । सप्त देवता ऐका निर्गुणी ।
स्पर्श करिता तत्क्षणी । पापे जाती परियेसा ॥४८०॥

दृष्टी पडता चांडाळासी । द्विराचमने शुद्ध होसी ।
संभाषण झालिया पतितासी । आचमनस्नान करावे ॥८१॥

जपता निद्रा येई जरी । अधोवायु जांभई आलियावरी ।
क्रोधरूपे जपता जरी । पापरूपे अवधारा ॥८२॥

मौन्य करावे हे उत्तमी । अगत्ये बोलिजे संधिविषयी ।
तद्विष्णो मंत्र जपता कर्मीं । पापे जाती सकळिक ॥८३॥

नेणता घडे इतुके जरी । आचमन करावे श्रोत्री ।
अग्नि सूर्यधेनुदर्शन करी । विष्णुमंत्र जपावा ॥८४॥

ऐसा जप करावा विधीने । मनकामना होय पूर्ण ।
ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥८५॥

गायत्री जपावी ऐशी । प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषि ।
उदुत्यं मंत्र माध्याह्नेसी । इमं मे वरुण सायंकाळी ॥८६॥

शाखापरत्वे मंत्र असती । म्हणावे विधि जैसे असती ।
गोत्र प्रवर म्हणा भक्ती । वृद्धाचाराप्रमाणे ॥८७॥

चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी ।
गोत्र प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥८८॥

ऐसी संध्या करून । मग करावे औपासन ।
सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥८९॥

साय्म्प्रातवेला दोन्ही । औपासन करावे सगुणी ।
मिळोनि न करावे द्विजजनी । सर्वांनी पृथक्‍ पृथक्‍ हेचि जाणा ॥४९०॥

न करावे वेळणी आळंद्यात । भूमीवरी न करा नित्य ।
स्थंडिली करावे विहित । अथवा उदके सारवावे ॥९१॥

कुंडी स्थापोनि अग्नीसी । करावे नित्य उपासनेसी ।
वारा घालो नये त्यासी । हाते पर्णी आणि सुपे ॥९२॥

व्याधिष्ठ पर्णवाते होय । सुपे दरित्र धनक्षय ।
मुखे फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूली होय मृत्यु ॥९३॥

फुंकणी अथवा विंझण्यासी । वायु घालावा अग्नीसी ।
काष्ठे समृद्धि परियेसी । ज्वलित असावा अग्नि देखा ॥९४॥

ज्वाला निघती जये स्थानी । आहुति घालावी तया वदनी ।
समिधा आणाव्या ब्राह्मणी । शूद्रहस्ते घेऊ नये ॥९५॥

समिधा पुष्पे दूर्वा देखा । आणो नये शूद्रे ऐका ।
होमद्रव्ये होती विशेखा । सांगेन नावे परियेसा ॥९६॥

साळी सावे नीवार । तंदुल असती मनोहर ।
गोधूम जव निर्धार । यावनाळ मुख्य असे ॥९७॥

साठी दाणे मिति प्रमाण । आहुति मुख्य कारण ।
अधिक न कीजे अथवा न्यून । घृतसंपर्क करावे ॥९८॥

घृत नसेल समयासी । तिल पवित्र होमासी ।
तिळांचे तैल परियेसी । तेही पवित्र असे देखा ॥९९॥

औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ तर्पण करी ।
सांगेन विधि अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥५००॥

मुख्य सकळ प्रातःकर्म सारोनि । ब्रह्मयज्ञ करावा माध्याह्नी ।
उपासनादि कर्मै करोनि । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥१॥

उदकसन्निध मुख्य स्थानी । करावे तर्पण ब्राह्मणी ।
प्राणायाम तीन करोनि । विद्युदसि मंत्र जपावा ॥२॥

दूर्वा घेऊनि दक्षिण करी । पूर्वमुख अथवा उत्तरी ।
बसावे वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥३॥

उभयहास्तसंपुटेसी । ठेवावे दक्षिण जानुवासी ।
म्हणावे तीन प्रणवांसी । मग म्हणावे ऋचाक्षर ॥४॥

ॐ भू० ऐसे म्हणोनि । त्रिपदा गायत्री उच्चारोनि ।
तत्स० म्हणोनि । मग जपावी दश वेळा ॥५॥

स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसी ।
अनध्याय होय तया दिवसी । एक ऋचा म्हणा पन्नासा ॥६॥

तोही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषी ।
नमो ब्रह्मणे मंत्रासी । तीन वेळा जपावा ॥७॥

वृष्टिरासि मंत्रासी । जपोनि स्पर्शावे उदकासी ।
तर्पण करावे परियेसी । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥८॥

ब्रह्मयज्ञ करावयासी । द्रव्य दर्भ परियेसी ।
वसुरुद्रआदित्यांसी । तृप्त समस्त देव पितर ॥९॥

एखादे दिवसी न घडे जरी । अथवा होय समय रात्री ।
जप करावा गायत्री । वेदपठण फल असे ॥५१०॥

देवतर्पण कुशाग्रेसी । मध्यस्थाने तृप्त ऋषि ।
मुळे पितृवर्गासी । तर्पण करावे परियेसा ॥११॥

न करावे तर्पण पात्रात । करावे आपण उदकात ।
भूमीवरी घरी नित्य । निषिद्ध असे करू नये ॥१२॥

दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करावे अवधारी ।
विधियुक्त भक्तिपुरःसरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥

तीळ धरोनि आपुल्या करी । तर्पण करावे अवधारी ।
ठेवो नये शिळेवरी । भूमी काष्ठपात्री देखा ॥१४॥

रोमकूपादि स्थानी देखा । तीळ ठेविता पावती दुःखा ।
तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोलली स्थाने पाच ॥१५॥

घरी तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसी ।
करावे आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥१६॥

श्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी ।
कृष्णवर्ण पितरांसी । तीळतर्पण करावे ॥१७॥

यज्ञोपवीती सव्ये देवांसी । निवीती करावी ऋषींसी ।
अपसव्य पितरांसी । तर्पण करावे येणे रीती ॥१८॥

देवासी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक ।
पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसे करावे ॥१९॥

स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त बंधूसी एक ।
सपत्‍नी आचार्य नामिका । द्वयांजुलि करावे ॥५२०॥

देवब्रह्मऋषीश्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी ।
कृष्णतिलतर्पण पितरांसी । अनंत पुण्ये परियेसा ॥२१॥

आदित्य शुक्रवारेसी । प्रतिपदा मघा नक्षत्रासी ।
षष्ठी नवमी एकादशीसी । तिलतर्पण करू नये ॥२२॥

अथवा विवाह उपनयनासी । जन्मनक्षत्र जन्मदिवसी ।
आपुल्या घरी शुभदिवसी । तिलतर्पण करू नये ॥२३॥

जधी न करी तिलतर्पण । उदके मुख्य करा जाण ।
मुद्रिका हस्ती सुवर्ण । दर्भपवित्रे करावे ॥२४॥

पाय न धुता मंगलस्नान । तिलावीण करिता तर्पण ।
श्राद्ध करी दक्षिणेविण । निष्फल असे अवधारी ॥२५॥

निषिद्ध बोलिले ज्या दिवसी । तर्पण करावे उदकेसी ।
दिपवाळी चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसा ॥२६॥

अंगारक कृष्ण चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसी ।
यमाचे नावे विधींसी । यज्ञोपवीत सव्याने ॥२७॥

एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि ।
यमाचे नाव उच्चारोनि । तर्पण करावे भक्तीने ॥२८॥

यमाची नावे त्रयोदशी । सांगेन ऐका विस्तारेसी ।
यम धर्मराजा परियेसी । मृत्यु अंतक चौथा जाणा ॥२९॥

वैवस्वत काल देखा । सर्वभूतक्षय ऐका ।
आठवा औदुंबरनामिका । नीलाय परमेष्ठी दहा जाणा ॥५३०॥

वृकोदर चित्ररेखा । चित्रगुप्त त्रयोदशिका ।
प्रत्येक नामे म्हणोनि एकेका । नदीत द्यावे परियेसा ॥३१॥

समस्त पातके नासती । रोगराई न पीडिती ।
अपमृत्यु कधी न येती । ग्रहपीडा न बाधे ॥३२॥

शुक्लपक्षी माघमासी । तर्पण करावे अष्टमीसी ।
भीष्मनामे परियेसी । वर्षपातके परिहरती ॥३३॥

ऐसे तर्पण करोनि । सूर्यनामे अर्घ्यै तिन्ही ।
द्यावी समस्त द्विजजनी । म्हणे नृसिंहसरस्वती ॥३४॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति स्वामी कर्मविधिसी ।
सांगता झाला ब्राह्मणासी । येणेपरी विहिताचार ॥३५॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । ऐसा ब्राह्मणांचा आचार ।
वर्तता होय मनोहर । सर्वाभीष्टे साधतील ॥३६॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । नामधारक शिष्य संवादत ।
वेदोपनिषदमतितार्थ । आचारनिरूपणाध्याय हा ॥५३७॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्‍त्रिंशोऽध्यायः ॥३६॥

॥ ओवीसंख्या ॥५३७॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥




गुरुचरित्र – अध्याय सदतीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी ।
श्रीगुरु सांगती विस्तारेसी । काय निरूपिले यानंतर ॥१॥

ऐक नामधारका सगुणा । श्रीगुरु अवतार नारायणा ।
जाणे सर्व आचारखुणा । सांगतसे कृपेसी ॥२॥

त्रैमूर्तीच्या अवतारास । आचार सांगता काय प्रयास ।
ज्ञान देउनी पतितास । वेद म्हणविले कवणेपरी ॥३॥

ऐसे गुरुमूर्ति दातारु । भक्तजनकल्पतरु ।
सांगते झाले आचारु । कृपा करोनि विप्रासी ॥४॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । गृहरक्षणार्थ कारणासी अग्निमंथनकाष्ठासी ।
संपादावे कृष्णामार्जार ॥५॥

श्रीखंडादि मणिघृते । तिळ कृष्णाजिन छागवस्त्रे ।
इतुकी असावी पवित्रे । दुरिते बाधा करू न शकती ॥६॥

शुक्लपक्ष सारसासी । पोसावे घरी परियेसी ।
समस्तपापविनाशी । धेनु असावी आपुले घरी ॥७॥

देवपूजेचे विधान । सांगेन ऐका एक मन ।
गृह बरवे संमार्जन । देवगुह असावे ॥८॥

हिरण्य रौप्य ताम्रेसी । अथवा मृत्तिका पात्रेसी ।
संमार्जन करावे विधींसी । निषिद्ध पात्रे सांगेन ॥९॥

कास्यपात्री कन्यकाहस्ती । नोवरी अथवा शूद्र जाती ।
न करावे वस्त्र धरोनि वामहस्ती । दक्षिण हस्ती सारवावे ॥१०॥

प्रारंभ करावा नैऋत्यकोनी । रात्री न करावे उदक घेउनी ।
अगत्य करणे घडे मनी । भस्मे करोनि सारवावे ॥११॥

रंगमाळिका घालोनि निर्मळ । असावे देवताभुवनी ।
मग बैसोनि शुभासनी । देवपूजा करावी ॥१२॥

जैसी संध्या ब्राह्मणासी । देवपूजा करावी तैसी ।
त्रिकाल करावे अर्चनासी । एकचित्ते मनोभावे ॥१३॥

त्रिकाळी न घडे ज्यासी । प्रातःकाळी करावी हर्षी ।
तेही न साधे परियेसी । माध्याह्नकाळी करावे ॥१४॥

सायंकाळी मंत्रेसी । पुष्पे वाहोनि भक्तीसी ।
ऐसे न साधे जयासी । भोजनकाळी करावे ॥१५॥

देवपूजा न करी नर । पावे त्वरित यमपुर ।
नरक भोगी निरंतर । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥१६॥

विप्रकुळी जन्म जयासी । पूजा न करिता जेवी हर्षी ।
तोचि होय यमग्रासी । वैश्वदेव न करी नर ॥१७॥

देवपूजा करावयासी । सहा प्रकार परियेसी ।
उदकनारायण विशेषी । पूजिता तृप्ति जगन्नाथा ॥१८॥

दुसरा प्रकार सांगेन ऐका । अग्निदेवपूजा अधिका ।
मानसपूजा अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१९॥

सूर्यपूजा करिता जाण । संतुष्ट होय नारायण ।
सामान्यपक्षे स्थंडिली जाण । प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि ॥२०॥

ज्ञाता असेल बुद्धिमंत । यज्ञपुरुषपूजा त्वरित ।
स्वर्गापवर्गा पूजा देत । यज्ञपुरुषपूजा मुख्य जाण ॥२१॥

अथवा पूजावे धेनूसी । ब्राह्मणपूजा विशेषी ।
गुरुपूजा मनोभावेसी । प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ति ॥२२॥

गुरु त्रैमूर्ति म्हणोनि । बोलती समस्त श्रुतिवचनी ।
सकळाभीष्टे तयापासूनी । पाविजे चारी पुरुषार्थ ॥२३॥

कलिप्रवेश होता नरू । न करिता अंतःकरण स्थिरू ।
उत्पत्ति केली शाङर्गधरू । समस्त कलि उद्धारावया ॥२४॥

शालिग्रामचक्रांकितेसी । प्रकाश केला ह्रषीकेशी ।
तीर्थ घेता परियेसी । समस्त पापे नासती ॥२५॥

आज्ञा घेऊनि श्रीगुरूची । पूजा करावी प्रतिमेची ।
वेदोक्त मंत्र करोनी वाची । विधिपूर्वक पूजावे ॥२६॥

स्त्रीजनादि शूद्रांसी । न म्हणावे वेदमंत्रेसी ।
आगमोक्तमार्गैसी गुरुनिरोपे करावे ॥२७॥

श्रीगुरूचे निरोपाने । पूजिजे काष्ठे पाषाणे ।
तेचि होती देव जाणे । होती प्रसन्न परियेसा ॥२८॥

शुचि आसनी बैसोनी । करावे प्राणायाम तिन्ही ।
येभ्योमाता म्हणोनि । चेतन करावा परमात्मा ॥२९॥

प्रणव मंत्रोनि द्वादशी । उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी ।
संकल्प करोनि अंगन्यासी । कलशपूजा करावी ॥३०॥

देवाच्या दक्षिण भागेसी । कलश ठेवावा परियेसी ।
पूजा करोनि भक्तीसी । शंखपूजा करावी ॥३१॥

निर्माल्य काढोनि विनयेसी । टाकावे ते नैऋत्यदिशी ।
धौत वस्त्र हांतरोनि हर्षी । दीप प्रज्वलित करावा ॥३२॥

स्मरावे मनी श्रीगुरूसी । मनोवाक्कायकर्मैसी ।
अर्चन करावे पीठासी । विधिपूर्वक अवधारा ॥३३॥

चारी द्वारे पूजोनि । दिशा पूजाव्या अर्चुनी ।
शांताकार करा ध्यानी । मग आवाहनावे मंत्रोक्त ॥३४॥

सहस्त्रशीर्षेति आवाहनोनि । पुरुषएवेदं आसनी ।
एतावानस्य म्हणोनि । पाद्य द्यावे अवधारा ॥३५॥

मंत्र म्हणोनि त्रिपादूर्ध्व ऐसा । अर्घ्य द्यावे परियेसा ।
तस्माद्विराड म्हणा ऐसा । देवासी आचमन समर्पावे ॥३६॥

यत्पुरुषेण मंत्रेसी । स्नपन करा देवासी ।
दुग्धादि पंचामृतासी । स्नपनपूजा करावी ॥३७॥

पुरुषसूक्तादि रुद्रेसी । श्रुतिमार्गै करोनि न्यासासी ।
स्नपन करावे परियेसी । एकचित्ते अवधारा ॥३८॥

स्नपन करूनि देवासी । बैसवावे शूभासनेसी ।
तयज्ञमिति मंत्रेसी । वस्त्रे द्यावी परियेसा ॥३९॥

तस्माद्यज्ञेति मंत्रेसी । यज्ञोपवीत द्यावे देवासी ।
येणेचि मंत्रे गंधाक्षतेसी । वहावे अनन्यभक्तीने ॥४०॥

तस्मादश्वा अजायन्त । ऐसा तुम्ही मंत्र म्हणत ।
पुष्पे वहावी एकचित्त । मनःपूर्वक देवासी ॥४१॥

पुष्पे वहावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
आपण पेरिली कुसुमे सगुण । उत्तम पक्ष परियेसा ॥४२॥

पुष्पे असती अरण्यात । ती मध्यम प्रकार बोलिजेत ।
क्रय करूनि घेता विकत । अधम पुष्पे जाणिजे ॥४३॥

उत्तम न मिळता घ्यावी विकत । उत्तम पक्ष पुष्पे श्वेत ।
रक्त मध्यम अधम पीत । कृष्णचित्र अधमाधम ॥४४॥

वर्जावी शिळी पुष्पे देख । सच्छिद्र अथवा कृमिभक्षक ।
भूमीवरी पडे ऐक । पुष्प त्यजावे देवासी ॥४५॥

शिळी नव्हेती द्रव्ये जाणा । बिल्वपत्रे तुळसी आणा ।
सहस्त्रपत्रे कमळे नाना । सदा ग्राह्य देवांसी ॥४६॥

शतपत्रे बकुलचंपकासी । पाटले कमले पुन्नागेसी ।
मल्लिका जाती करवीरेसी । कल्हारपुष्पे अर्पावी ॥४७॥

विष्णुपूजा करावयासी । वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी ।
धत्तूर अर्क करवीरेसी । रक्त पुष्पे वर्जावी ॥४८॥

गिरिकर्णिका निर्गुडेसी । सेवगा कपित्थ करंजेसी ।
अमलपत्र कुष्मांडेसी । पुष्पे विष्णूसी वर्जावी ॥४९॥

ही वाहिल्या होय दोषी । सांगेन ऐका समस्त ऋषि ।
पुजा करिती विष्णुसी । त्यजावी याचि कारणे ॥५०॥

अर्कपुष्प वाहिल्यासी । विनाश होय आपणासी ।
धत्तूरपुष्पे प्रज्ञानासी । कोविदारे दरिद्रता ॥५१॥

श्रीकर्णिकापुष्पे वाहता । कुळक्षय होय त्वरिता ।
कंटुकारीपुष्पे वाहता । शोक होय परियेसा ॥५२॥

कंदपुष्पे होय दुःख । शाल्मलीपुष्पे रोग ऐक ।
त्याची कारणे करूनि विवेक । पुष्पे वहावी विष्णूसी ॥५३॥

वर्जा पुष्पे ईश्वरासी । सांगेन नावे परियेसी ।
कपित्थ केतकी शशांकेसी । श्यामपुष्पे वर्जावी ॥५४॥

काष्ठ पिंपळ करंज देखा । बकुल दाडिंब केतका ।
घातकी निंबादि पंचका । माधवीपुष्पे वर्जावी ॥५५॥

चूत कुंद यूथिका जाती । रक्त पुष्पे वर्जावी निरुती ।
ईश्वरार्चने दोष घडती । श्वेतपुष्पे मुख्य देखा ॥५६॥

पूजा करिता गणेशासी । वर्ज करा तुम्ही तुलसी ।
नित्यपूजा करा दूर्वैसी । दूर्वा वर्ज शक्तिदेवीते ॥५७॥

येणे विधी पुष्पे वाहता । काम्य होय तुम्हा त्वरिता ।
चतुर्विध पुरुषार्था । लाधाल तुम्ही अवधारा ॥५८॥

यत्पुरुषेति मंत्रेसी । सुगंध धूपादि परिमळेसी ।
ब्राह्मणोस्येति मंत्रेसी । एकार्तिक्य करावे ॥५९॥

चंद्रमामनसो इति मंत्रेसी । नैवेद्य अर्पावा देवासी ।
तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी । नाभ्याआसीदिति ऐसा ॥६०॥

सुवर्णपुष्पे नीरांजन । सप्तास्येति मंत्रे करून ।
पुष्पांजलि घेऊन । देवा यज्ञेति मंत्रे अर्पावी ॥६१॥

धातापुरस्तात्‍ मंत्रेसी । नमस्कारावे देवासी ।
अति संमुख पृष्ठदेशी । गर्भगृही करू नये ॥६२॥

नमस्काराचे विधान । सांगेन ऐका विद्वज्जन ।
सव्य देवप्रदक्षिणा । करूनि नमन करावे ॥६३॥

आपुला गुरु माता पिता । संमुख जावे बाहेरूनि येता ।
अथवा उत्तम द्विज देखता । संमुख जावोनि वंदावे ॥६४॥

सभा असेल द्विजांची । नमस्कार करा तुम्ही एकची ।
देवार्चनी तैसेची । नमस्कार पावे समस्ता ॥६५॥

माता पिता श्रीगुरूसी । नमस्काराची रीति ऐसी ।
उभय हस्ते कर्णस्पर्शी । एकभावे वंदावे ॥६६॥

सव्य पादावरी देखा । सव्य हस्त स्पर्शोनि निका ।
वामहस्ती वामपादुका । धरूनि नमन करावे ॥६७॥

गुरुस्थानांची नावे । सांगेन ऐका भावे ।
विचारोनिया बरवे । नमस्कारावे येणे विधी ॥६८॥

माता पिता गुरु धाता । भयहर्ता अन्नदाता ।
व्रतबंध केल्या पुरोहिता । सापत्‍नी ते गुरुस्थानी ॥६९॥

ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता । सापत्‍न असेल ज्याची माता ।
वय अधिक इष्टमित्रा । नमस्कारावे तयांसी ॥७०॥

निषिद्ध स्थाने नमावयासी । सांगेन ऐका तुम्हासी ।
उणे असेल वय ज्यासी । नमू नये विद्वज्जनी ॥७१॥

अग्नि समिधा पुष्पे कुशा । धरिला असेल अक्षतांकुशा ।
स्वहस्ती परहस्ती असता दोषा । अशस्त्रवध होईजे नमस्कारिता ॥७२॥

जप अथवा होम करिता । दूर देखिला द्विज येता ।
स्नान करिता जळी असता । नमन करिता दोष घडे ॥७३॥

एखादा विप्र असे धावत । नेणता अथवा धनगर्वित ।
क्रोधवंत किंवा मंगलस्नान करित । नमस्कार करू नये ॥७४॥

एकहस्ते ब्राह्मणासी । नमू नये परियेसी ।
सूतकिया मूर्ख जनांसी । करू नये नमस्कार ॥७५॥

गीतवाद्यादि नृत्येसी । संतुष्टावे देवासी ।
प्रार्थना करावी भक्तीसी । मग अर्चावे सनकादिका ॥७६॥

पूजा अपूर्व देवासी । हस्त ठेवूनि पीठेसी ।
उत्तरपूजा करावी हर्षी । मग करावे उद्वासन ॥७७॥

ऐसेपरी देवपूजा । करावी भक्तीने ऐका द्विजा ।
संस्कृत अन्न व्हावया काजा । वैश्वदेव करावा ॥७८॥

अग्नि अलंकार करूनि । अन्न अग्निकुंडी दाखवूनि ।
घृतसंमिश्रित करूनि । पंच भाग करावे ॥७९॥

एक भागाच्या दहा आहुति । दुसरा बळिहरणी योजिती ।
अग्रदान तिसरा करिती । चौथ्या मागे पितृयज्ञ ॥८०॥

मनुष्ययज्ञ पांचव्यासी । वैश्वदेव करावा मंत्रेसी ।
अन्न नाही ज्या दिवसी । तंदुलांनी करावा ॥८१॥

वैश्वदेव समयासी । अतिथि आलिया घरासी ।
चोर चांडाल होय हर्षी । पूजा करावी मनोभावे ॥८२॥

यम सांगे दूतासी । वैश्वदेव करिता नरासी ।
जाऊ नको तयापासी । विष्णुआज्ञा आम्हा असे ॥८३॥

मातापिताघातकियांसी । शुनि श्वपचचांडासांसी ।
अतिथि आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा ॥८४॥

न विचारावे गोत्रकुळ । अन्न घालावे तात्काळ ।
विन्मुख झालिया पितृकुळ । वर्षै सोळा न येती घरासी ॥८५॥

प्रवासी असेल आपण जरी । औषधि घृत दधि क्षीरी ।
कंदमूळे फळे तरी । देवयज्ञ करावा ॥८६॥

अन्नाविणे अग्रदान । करू नये साधुजन ।
पंचमहायज्ञ करू ब्राह्मण । चांद्रायण आचरावे ॥८७॥

न होता वैश्वदेव आपुल्या घरी । भिक्षेसि आला नर जरी ।
भिक्षा घालिता पाप दूरी । वैश्वदेवफल असे ॥८८॥

बळिहरण घालोनि काडःई आपण । त्याणे आचरावे चांद्रायण ।
आपं काढिता दोष जाण । आणिकाकरवी काढवावे ॥८९॥

बळिहरण न काढिता जेवी जरी । सहा प्राणायाम त्वरित करी ।
तेणे होय पाप दूरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥९०॥

गृहपूजा करूनि देखा । गोग्रास द्यावा विशेखा ।
नित्य श्राद्ध करणे ऐका । करूनि अन्न समर्पावे ॥९१॥

स्वधाकार पिंडदान । करू नये अग्नौकरण ।
ब्रह्मचारियासी तांबूलदान । दक्षिणा वर्ज परियेसा ॥९२॥

वैश्वदेव झालियावरी । उभा राहोनि आपुल्या द्वारी ।
अतिथिमार्ग पहावा निर्धारी । आलिया पूजन करावे ॥९३॥

श्रमोनि आलिया अतिथिसी । पूजा करावी भक्तीसी ।
अथवा अस्तमानसमयासी । आलिया पूजन करावे ॥९४॥

वर्णाना ब्राह्मणो गुरुः । ऐसे बोलती वेदशास्त्रु ।
अतिथि जाण सर्व गुरु । वैश्वदेवसमयासी ॥९५॥

वैश्वदेवसमयी अतिथिसी । पूजा करिता परियेसी ।
ती पावे देवांसी । तुष्टे ब्रह्मा इंद्र वह्नि ॥९६॥

वायुगण अर्यमादि देव । तृप्ति पावे सदाशिव ।
पूजा करावी एकभाव । सर्व देवता संतुष्टती ॥९७॥

अतिथीपाद प्रक्षाळिती । पितर सकळ तृप्त होती ।
अन्नदाने ब्रह्मा तृप्ति । विष्णुमहेश्वरा अवधारा ॥९८॥

यतीश्वरादि ब्रह्मचारी । जे समयी येती आपुल्या घरी ।
अन्न द्यावे निर्धारी । महापुण्य असे देखा ॥९९॥

ग्रासमात्र दिधला एक । मेरूसमान पुण्य अधिक ।
बरवे द्यावे त्यासी उदक । समुद्रासमान दान असे ॥१००॥

अतिथि आलिया घरासी । जेवी आपण त्यजूनी त्यासी ।
श्वानयोनी पावे हर्षी । गर्दभयोनी पुढे उपजे ॥१॥

ऐसे अतिथि पूजोन । मग करावे भोजन आपण ।
सर्वथा न करावे अन्न भिन्न । प्रपंच करिता दोष असे ॥२॥

सायंप्रातर्गृहस्थासी । भोजन करणे संतोषी ।
प्रक्षालन करोनि पादांसी । ओले पायी असावे ॥३॥

ओली असावी पाच स्थाने । हस्त पाद उभय जाणे ।
मुख ओले पंचम स्थाने । शतायुषी पुरुष होय ॥४॥

पूर्वाभिमुख बैसोन । भोजनसमयी धरा मौन ।
पाद उभय जोडोन । बैसावे ऐका एकचित्ते ॥५॥

मंडल करावे चतुष्कोनी । वरी भस्म प्रोक्षोनि ।
क्षत्रियास मंडल त्रिकोनी । वर्तुळ वैश्यासी परियेसा ॥६॥

शूद्रे अर्धचंद्राकार । मंडल करावे परिकर ।
आवाहनावे सुरवर । आदित्य वसु रुद ब्रह्मा ॥७॥

पितामहादि देवता । तया मंडली उपजविता ।
याचि कारणे तत्त्वता । मंडलाविणे जेवू नये ॥८॥

न करिता मंडल जेवी जरी । अन्न नेती निशाचरी ।
पिशाच असुर राक्षस परी । अन्नरस नेती अवधारा ॥९॥

उत्तम पूर्वाभिमुखी देख । पश्चिम मध्यम ऐक ।
पितृकार्या उत्तरमुख । सदा दक्षिण वर्जावी ॥११०॥

धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्रपात्र ।
पद्मअपात्र पालाशपात्र । पुण्यपात्र परियेसा ॥११॥

जेविता वर्जावे गृहस्थांनी ताम्रपात्र । यतींनी सुवर्ण अथवा रजत ।
ताम्रशुक्तिशंखज पात्र । स्फटिक पाषाण यतीसी ॥१२॥

कर्दलीगर्भपत्रेसी । पद्मपत्रजळे स्पर्शी ।
वल्लीपालाशपत्रेसी । जेविता चांद्रायण आचरावे ॥१३॥

वट अश्वत्थ अर्क पटोल । कदंब कोविदारपर्णे कोमळ ।
भोजन करिता तात्काळ । चांद्रायण आचरावे ॥१४॥

लोहपात्र आपुले करी । ताम्र मृण्मय पृष्ठपर्णावरी ।
कार्पासपत्री वस्त्रावरी । जेविता नरकाप्रती जाय ॥१५॥

कास्यपात्री जेविल्यासी । यश बळ प्रज्ञा आयुष्यासी ।
वढे नित्य अधिकेसी । गृहस्थांनी नित्य कास्यपात्र ॥१६॥

असावे पात्र पाच शेर । नसावे उने अधिक थोर ।
उत्तमोत्तम षट्‍ शेर । सुवर्णपात्रासमान देखा ॥१७॥

कास्यपात्रीचे भोजन । तांबूलासहित अभ्यंगन ।
यती ब्रह्मचारी जाण । विधवा स्त्रियांनी वर्जावे ॥१८॥

श्वानाच्या चर्माहुनी । निषेध असे एरंडपानी ।
निषेध अधिक त्याहुनी । आणिक जेविल्या भिन्नताटी ॥१९॥

फुटके कास्यपात्रेसी । जेविता होय महादोषी ।
संध्याकाळी जेविता हर्षी । महापातकी होय जाणा ॥१२०॥

जवळी असता पतित जरी । जेवू नये अवधारी ।
शूद्र जेविल्या शेषावरी । जेवू नये ब्राह्मणाने ॥२१॥

सवे घेउनी बाळासी । जेवू नये श्राद्धदिवसी ।
आसन आपुले आपणासी । घालू नये ब्राह्मणाने ॥२२॥

आपोशन आपुले हाती । घेऊ नये मंदमती ।
तैल घालुनी स्वहस्ती । आपण अभ्यंग करू नये ॥२३॥

भोजनकाळी मंडळ देखा । करू नये स्वहस्तका ।
आयुष्यक्षय पुत्रघातका । म्हणिजे नाम तयासी ॥२४॥

नमस्कारावे वाढिता अन्न । अभिधारावे पहिलेचि जाण ।
प्राणाहुति घेता क्षण । घृत घालावे स्वहस्ताने ॥२५॥

उदक घेऊनि व्याह्रति मंत्री । प्रोक्षोनि अन्न करा पवित्री ।
परिषिंचावे तेचि रीती । मग नमावे चित्रगुप्ता ॥२६॥

बळी घालोनि चित्रगुप्तासी । काढवावे सवेचि परियेसी ।
वाम हस्तक धुवोनि सरसी । पात्र दृढ धरावे ॥२७॥

अंगुष्ठतर्जनीमध्यमांगुलीसी । धरावे पात्र वामहस्तेसी ।
आपोशन करावे सव्यकरेसी । आणिकाकरवी घालावे ॥२८॥

आपोशन उदक सोडोनि जरी । आणिक घेती उदक तरी ।
श्वानमूत्र घेतल्यापरी । एकचित्ते परियेसा ॥२९॥

धरिले आपोशन ब्राह्मणासी । नमस्कारिता महादोषी ।
आशीर्वाद घेऊ नये तयापासी । उभयतांसी दोष घडे ॥१३०॥

मौन असावे ब्राअह्मणे देख । बोलू नये शब्दादिक ।
आपोशन घ्यावे मंत्रपूर्वक । मग घ्याव्या प्राणाहुति ॥३१॥

आपोशनाविण भोजन करी । पापविमोचन करा तरी ।
अष्टोत्तरशत मंत्र गायत्री । जपता दोष परिहरे ॥३२॥

प्राणाहुतीचे विधान । सांगेन ऐकिजे ब्राह्मण ।
प्राणाग्निहोत्र करिता जाण । समस्त पापे जाती देखा ॥३३॥

जैसा कार्पासराशीची । अग्नि लागता परियेसी ।
जळोनि जाय त्वरितेसी । तैसी पापे नासती ॥३४॥

प्राणाहुतीचे लक्षण । चतुर्विध पुरुषार्थ जाण ।
अन्न स्पर्शोनि मंत्र म्हणे । गीताश्लोक प्रख्यात ॥३५॥

श्लोक ॥ अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‍ ॥३६॥

टीका ॥ अन्नं ब्रह्म रसो विष्णु । भोक्ता देव गिरिजारमणु ।
ऐसा तुम्ही मंत्र म्हणोनु । अग्निरस्मि मंत्र जपावा ॥३७॥

मग घ्याव्या प्राणाहुति । आहेति पंच मंत्र प्रख्याति ।
तर्जनी मध्यम अंगुष्ठधृती । प्राणाय स्वाहा म्हणावे ॥३८॥

मध्यम अनामिका अंगुष्ठेसी । अपानाय स्वाहा म्हणा हर्षी ।
व्यानाय स्वाहा म्हणा यांसी । कनिष्ठिकाअनामिकाअंगुष्ठेसी ॥३९॥

अंगुष्ठतर्जनीकनिष्ठिकेसी । उदानाय स्वाहा म्हणा हर्षी ।
पंचांगुलीने परियेसी । समानाय स्वाहा म्हणावे ॥१४०॥

प्राणाहुती घेतल्या अन्न । दंता स्पर्शो नये जाण ।
जिव्हे गिळावे तक्षण । मग धरावे मौन देखा ॥४१॥

मौन धरावयाची स्थाने । सांगेन ऐका अतिउत्तमे ।
स्नानासमयी धरा निर्गुणे । न धरिता फल असेना ॥४२॥

होम करिता न धरी मौन । लक्ष्मी जाय तत्क्षण ।
जेविता मौन न धरिता आपण । अपमृत्यु घडे त्यासी ॥४३॥

अशक्य असेल मौन जरी । प्राणाहुति घेई तववरी ।
मौन धरावे अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४४॥

पिता जिवंत असे ज्यासी । अथवा ज्येष्ठ बंधु परियेसी ।
धरू नये मौनासी । श्राद्धान्न जेविता धरावे ॥४५॥

पंच प्राणाहुति देता । सर्वांसी मौन ग्राह्यता ।
असेल पिता वडील भ्राता । मौन धरिल्या अधःपात ॥४६॥

जेविता प्रथम मधुरान्न । भोजन करावे नरे जाण ।
भक्षून पूर्वी द्रवान्न । कठिणांश परियेसा ॥४७॥

भोजनांती समयासी । जेवू नये द्रवान्नांसी ।
बळ जाय परियेसी । शीघ्र भोजन करावे ॥४८॥

धेनूसी उदक प्यावयासी । जितुका वेळ होय त्यासी ।
भोजन करावे परियेसी । शीघ्र भोजन मुख्य जाणा ॥४९॥

भोजन करावयाची स्थिति । सांगेन ऐका ग्रासमिति ।
संन्यासी-मुनि-यती । अष्ट ग्रास ध्यावे जाण ॥१५०॥

षोडश ग्रास अरण्यवासी । द्वात्रिशत गृहस्थासी ।
मिति नाही ब्रह्मचार्‍यासी । एकचित्ते परियेसा ॥५१॥

जितुका मावेल आपुल्या मुखी । तितुका ग्रास घ्यावा विशेखी ।
अधिक घेता ग्रास मुखी । उच्छिष्ठ भक्षिले फळ देखा ॥५२॥

अर्धा ग्रास भक्षूनि । उरले ठेविती आपुल्या भाणी ।
चांद्रायण आचरावे त्यांनी । उच्छिष्ठ भोजन तया नाव ॥५३॥

न बैसावे सहभोजनासी । इष्टसोयरे इत्यादिकांसी ।
व्रतबंधाविणे पुत्रासी । कन्याकुमारांसी दोष नाही ॥५४॥

सांडू नये अन्न देखा । घृत पायस विशेष ऐका ।
सांडावे थोडे ग्रास एका । जेवू नये सर्व अन्न ॥५५॥

भोजन संपेपर्यंत । पात्री धरावा वामहस्त ।
जरी सोडील अजाणत । अन्न वर्जोनि उठावे ॥५६॥

या कारणे द्विजजना । सोडू नये पात्र जाणा ।
अथवा न धरावे पूर्वीच जाणा । दोष नाही परियेसा ॥५७॥

वस्त्र गुंडाळोनि डोयीसी । अथवा संमुख दक्षिणेसी ।
वामपादावरी हस्तेसी । जेविता अन्न राक्षस नेती ॥५८॥

वामहस्त भूमीवरी । ठेवूनि नर भोजन करी ।
रोग होय शरीरी । अंगुली सोडोनि जेवू नये ॥५९॥

अंगुली सोडूनि जेवी जरी । दोष गोमांस भक्षिल्यापरी ।
दोष असती नानापरी । स्थाने असती भोजनासी ॥१६०॥

अश्वगजारूढ होऊनि । अथवा बैसोनि स्मशानी ।
देवालयी शयनस्थानी । जेवू नये परियेसा ॥६१॥

निषिद्ध जेवण करपात्रेसी । ओले नेसोनि आर्द्रकेशी ।
बहिर्हस्त बहिःकेशी । जेविता दोष परियेसी ॥६२॥

यज्ञोपविताच्या उपवीतीसी । भोजन करावे परियेसी ।
जेविता आपुल्या संमुखेसी । पादरक्षा असू नये ॥६३॥

ग्रास उदक कंद मूळ । इक्षुदंडादि केवळ ।
भक्षोनि पात्री ठेविता सकळ । उच्छिष्ट होय अवधारा ॥६४॥

भोजन करी स्नानाविणे । न करिता होम जेवी कवणे ।
अन्न नव्हे कृमि जाणे । म्हणे पराशर ऋषि ॥६५॥

पर्णपृष्ठावरी रात्रीसी । दीपेविण जेविल्यासी ।
महादोष असे तयासी । कृमि भक्षिल्यासमान होय ॥६६॥

दीप जाय भोजन करिता । पात्र धरावे स्मरोनि सविता ।
पुनरपि आणोनि लाविता । मग भोजन करावे ॥६७॥

पात्री असेल जितुके अन्न । तितुकेचि जेवावे परिपूर्ण ।
आणिक घेता दोष जाण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥६८॥

स्पर्शो नये जेविता केश । कथा सांगता महादोष ।
दिसू नये व्योम आकाश । अंधकारी जेवू नये ॥६९॥

न ठेविता शेष स्त्रियेसी । जेविता होय अत्यंत दोषी ।
ठेविले न जेविता स्त्रिया दोषी । महापातके घडती जाणा ॥१७०॥

शून्यदेवदेवालयी । देवस्थान आपुले गृही ।
जलसमीप संध्यासमयी । जेवू नये परियेसा ॥७१॥

पात्रे ठेवूनि दगडावरी । जेवू नये अवधारी ।
अवलोकू नये मुखावरी । स्त्रीजनाचे परियेसी ॥७२॥

न करावे सहभोजन । जेविता होय उच्छिष्टभक्षण ।
कुलस्त्रियेसी करिता भोजन । निर्दोष असे परियेसा ॥७३॥

प्राशन शेष उदकासी । घेऊ नये उच्छिष्टासी ।
अगत्य घडे संधीसी । किंचित्‍ सांडूनि घेईजे ॥७४॥

वस्त्रोदक घेतल्यासी । अपार दोष घडती तयासी ।
जन्म पावे श्वानयोनीसी । पडे मागुती नरकात ॥७५॥

शब्द होय उदक घेता । अथवा क्षीर घृत सेविता ।
आपोशनोदक प्राशिता । सुरापानसमान असे ॥७६॥

महाजळी रिघोनि । उदक घेती मुखांतुनी ।
अथवा जे घेती उभ्यानी । सुरापानसमान जाणा ॥७७॥

द्वयहस्तांजुळि करूनि । घेऊ नये उदक ज्ञानी ।
घ्यावे एक हस्ते करूनि । वाम हस्त लावू नये ॥७८॥

सभे बैसोनि एकासनी । अथवा आपुले हातुरणी ।
प्राशन करू नये पाणी । महादोष परियेसा ॥७९॥

वाढावे भिन्न पात्रेसी । पाहू नये आणिक यातीसी ।
रजस्वला स्त्रियांसी । चांडाळ श्वान पाहू नये ॥१८०॥

दृष्टि पडे इतुकियासी । ध्वनि ऐकता कर्णासी ।
त्यजावे अन्न त्वरितेसी । जेविता दोष परियेसी ॥८१॥

कलहशब्द कांडण दळण । ऐकता जेवू नये अन्न ।
अपशब्द स्पृष्टास्पृष्ट जाण । त्यजावे अन्न परियेसा ॥८२॥

नेणते लोक पंक्तीसी । घेऊ नये परियेसी ।
अगत्य घडे संधीसी । उदके भस्मे करा पृथक ॥८३॥

अथवा स्तंभ असेल मध्य । द्वारमार्ग असेल शुद्ध ।
उदके वेष्टिता आपुले परिघ । दोष नाही परियेसा ॥८४॥

कृष्ण वस्त्र नेसोनि आपण । जेविता दोष अपार जाण ।
स्त्रीजन वाढिती कांसेविण । उच्छिष्टसमान परियेसा ॥८५॥

ऐसा विचार करूनि मनी । करावे भोजन द्विजजनी ।
विकिरिद विलोहित म्हणोनि । अभिमंत्रावे शेष अन्न ॥८६॥

विकिरीदे इति मंत्रासी । म्हणावा अघोर ऋषि ।
रुद्रदेवता परियेसी । अन्नाभिमंत्रणे विनियोग ॥८७॥

ऐसा मंत्र जपोन । हाती घ्यावे शेषान्न ।
यमाच्या नावे बळी घालोन । उत्तरापोशन मग घ्यावे ॥८८॥

उच्छिष्ट सर्व पात्रीचे । घेऊनि हाती म्हणा वाचे ।
रौरवमंत्र असे त्याचे । पात्राजवळी ठेवावे ॥८९॥

उठोनि जावे प्रक्षालनासी । गंडूष करोनि मग हस्त स्पर्शी ।
न करित गंडूष प्रक्षाली हस्तासी । आत्मघातकी तोचि जाणा ॥१९०॥

मुख प्रक्षाळिता परियेसी । मध्यमांगुली दात घासी ।
तर्जनी अंगुष्ठे महादोषी । रौरव नरकी परियेसा ॥९१॥

बरवे हस्तप्रक्षालन । करावे दंतशोधन ।
हातीचे पवित्र सोडून । टाकावे नैऋत्य दिशे ॥९२॥

अंगुष्ठमात्र पुरुषा । म्हणावा मंत्र परियेसा ।
हस्त घासोनि चक्षुषा । उदक लावावे अवधारा ॥९३॥

ऐसा जरी न म्हणा मंत्र । चक्षुरोग होय त्वरित ।
या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता ॥९४॥

द्विराचमन करोनि । आयंगौ मंत्र म्हणोनि ।
दुपदादिवेन्मुमुचा म्हणोनि । पादप्रक्षालन करावे ॥९५॥

ऐसा तुम्ही मंत्र जपता । भोजनठायी जाऊनि बैसता ।
द्विराचमन करूनि निगुता । नासिकास्पर्श मग करावा ॥९६॥

स्मरावे मग अगस्त्यासी । कुंभकर्ण वडवाग्नीसी ।
वृकोदर शनैश्चरासी । इल्वल वातापि जीर्य म्हणावे ॥९७॥

हस्त दाखवावे अग्निसी । आणिक सांगेन परियेसी ।
बंधुवर्ग असती जयासी । पुसू नये वस्त्रे कर ॥९८॥

मग स्मरावे श्रीगुरूसी । आणिक स्मरावे कुळदेवतेसी ।
येणेपरी विधीसी । भोजन करावे द्विजोत्तमे ॥९९॥

विप्र विनवी श्रीगुरूसी । भोजनप्रकार सांगितला आम्हासी ।
विधिनिषिद्ध अन्नै कैसी । निरोपावी दातारा ॥२००॥

विप्रवचन ऐकोनि । निरोपिती श्रीगुरु संतोषोनि ।
ऐक ब्राह्मणा म्हणोनि । अतिप्रेमे निरोपिती ॥१॥

म्हणे सरस्वती गंगाधरु । ब्राह्मणपणाचा आचारु ।
निरोपिला गुरुनाथे समग्रु । म्हणोनि विनवी संतोषे ॥२॥

वैश्वदेवाविणे अन्न । अथवा गणान्न परिपुर्ण ।
घातले असेल बहु लवण । बहुमिश्रितान्न जेऊ नये ॥३॥

लशुन गाजर कंद मुळा । वृंताक श्वेत जो असे भोपळा ।
छत्राकार शाखा सकळा । वर्जाव्या तुम्ही परियेसा ॥४॥

धेनुअजामहिषीक्षीर । प्रसूतीचे । वर्जावे । दशरात्र ।
नूतनोदक पर्जन्य पूर । त्रिरात्रीचे वर्जावे ॥५॥

कूष्मांड डोरली पडवळेसी । मुळा बेल आवळेसी ।
न भक्षावे प्रतिपदेसी । भक्षिता पाप परियेसा ॥६॥

स्वर्गापवर्ग चाड ज्यासी । अष्टमी वर्जावी औदुंबरासी ।
अमलकफळ रात्रीसी । वर्जावे भानुवासर सप्तमी ॥७॥

बेलफळ वर्ज शुक्रवारी । शमीफळ मंदवारी ।
भक्षिता लक्ष्मी जाय दुरी । वर्जावे ते दिवसी परियेस ॥८॥

धात्रीफळ रात्रीसी । भक्षिता हानि प्रज्ञेसी ।
नाश करी वीर्यासी । धात्रीफळ वर्जावे ॥९॥

नख केश पडिलिया अन्ना । स्पर्श केलिया मार्जार जाणा ।
वायस घारी कुक्कुट जाणा । स्पर्श केलिया अन्न त्यजावे ॥२१०॥

धेनुमूषक मुखस्पर्शे । अथवा स्पर्शे अधःकेशे ।
त्यजावे अन्न भरवसे । असेल उच्छिष्ट अन्नाजवळी ॥११॥

एक हाती वाढले अन्न । शिळे असेल शीत जाण ।
वर्जावे तुम्ही ब्राह्मण । निषिद्ध बोलिले आचार्य ॥१२॥

घृततैलमिश्रित । शिळे अन्न अपवित्र ।
तळिले असेल सर्वत्र । शिळे नव्हे सर्वथा ॥१३॥

विप्र विकिती गोरस । घृत क्षीर परियेस ।
घेता घडती महादोष । साक्षात वह्निपक्व जेवू नये ॥१४॥

माषान्नाचे वटक देखा । शिळे न होती कधी ऐका ।
जैसे लाह्यापीठ देखा । शिळे नव्हे परियेसा ॥१५॥

कंदमूळादि सुरान्न । जवांचे असेल परमान्न ।
गुडयुक्त असेल अन्न । शिळे नव्हे परियेसा ॥१६॥

ऐशा शिळ्या अन्नासी । दोष नाही परियेसी ।
विटाळ होता महादोषी । शुचि स्थानी असावे ॥१७॥

भोजन केलिया नंतर । तांबूल घ्यावे परिकर ।
क्रमुकचूर्ण पर्ण सत्वर । घ्यावे द्यावे ब्राह्मणी ॥१८॥

तिळमिश्रित भक्ष्यासी । जेवु नये रात्रीसी ।
जेविता होय महादोषी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥१९॥

क्रमुक एक सुखारोग्य । द्वय देता निश्चळ आरोग्य ।
त्रीणि द्यावी महा भाग्य । चतुर्थे दुःख होय जाणा ॥२२०॥

पाच क्रमुक देता जरी । आयुष्य प्रज्ञा वाढे भारी ।
देऊ नये सहा सुपारी । मरण सांगे परियेसा ॥२१॥

पर्ण अग्र मूल न काढी जरी । व्याधि संभवे अवधारी ।
अग्र भक्षिता पाप भारी । चूर्णपर्णे आयुष्य क्षीण ॥२२॥

पर्णपृष्ठी बुद्धिनाश । द्विपर्ण खाता महादोष ।
ऐश्वर्याचा होय विनाश । ऋषिसंमत असे जाणा ॥२३॥

पर्णैविण क्रमुक मुखी । घालिता आपण होय असुखी ।
सप्त जन्म दरिद्री दुःखी । अज्ञानी होय अंतकाळी ॥२४॥

यतीश्वरादिब्रह्मचारी । रजस्वला स्त्री विधवा जरी ।
तांबूल भक्षिता मांसपरी । रस त्याचा सुरापानसम ॥२५॥

तांबूल भक्षिल्यानंतर । सायंसंध्या करावी विप्रे ।
सूर्यअर्धमंडळ उतरे । अर्घ्यै द्यावी परियेसा ॥२६॥

बैसोनि द्यावी अर्घ्यै तिन्ही । चारी द्यावी काळ क्रमूनि ।
गायत्री मंत्र जपूनि । इमंमेवरुण म्हणावा ॥२७॥

गोत्रप्रवर उच्चारोन । मग करावे औपासन ।
करावे निशि भोजन । क्षीरमिश्रित मुख्य असे ॥२८॥

रात्री करिता परिसिंचना । ऋतंत्वा सत्यं मंत्र म्हणा ।
येणे विधी करा भोजना । पूर्वी जैसे बोलिले असे ॥२९॥

भोजन झालियानंतर । वेदाभ्यास एक प्रहर ।
मग जावे शयनावर । येणे विधी आचरावे ॥२३०॥

शयन करावयाचे विधान । सांगेन ऐका विद्वज्जन ।
पराशर सांगे वचन । तेचि विधान सांगतसे ॥३१॥

खट्‍वा असावी निर्मळ जाण । वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण ।
औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण । न करावी खट्‍वा परियेसा ॥३२॥

निषिद्ध जांबूळ काष्ठाची । वर्जावी प्रेतगजदंताची ।
भिन्नकाष्ठ त्यजावी साची । बरवी असावी खट्‍वा देखा ॥३३॥

सुमुहूर्तै विणावी खट्‍वा देखा । धनिष्ठा भरणी मृगशीर्षी दूषका ।
वार सांगेन विशेखा । शूभाशुभफळ असे ॥३४॥

आदित्यवारी लाभ देखा । चंद्रवारी महामुखा ।
भौमवारी पाविजे दुःखा । बुधवारी सांगे महापीडा ॥३५॥

गुरुवारी विणल्यासी । सहा पुत्र होती त्यासी ।
शुक्रवारी अतिविशेषी । मृत्यु पावे मंदवारी ॥३६॥

स्वगृही शयन पूर्वशिरेंसी । श्वशुरालयी दक्षिणेसी ।
प्रवासकाळी पश्चिमेसी । शयन करावे परियेसा ॥३७॥

सदा निषिद्ध उत्तर दिशा । वर्जले फळ सांगितली दिशा ।
विप्रे आचरावा ऐसा । ऋषिमार्ग शुभाचार ॥३८॥

पूर्ण कुंभ ठेऊनि उशी । मंगळ द्रव्य घालावे बहुवशी ।
रात्रिसूक्त म्हणावे हर्षी । विष्णुस्मरण करावे ॥३९॥

मग स्मरावा अगस्त्यऋषि । माधव मुचुकुंद परियेसी ।
आस्तिक कपिल महाऋषि । सर्पस्तुति करावी ॥२४०॥

निषिद्ध स्थाने निजावयासी । सांगेन सर्व परियेसी ।
जीर्ण देवालयी स्मशानासी । एक वृक्षातळी वर्जावे ॥४१॥

चारी बिदी चोहाटेसी । ईश्वरस्थान परियेसी ।
मातापिता निजले स्थळासी । निजू नये परियेसा ॥४२॥

वर्जावे वारुळाजवळी । आणि तळ्याचे पाळी ।
नदीतीरी नसता जवळी । घोर स्थळी निजू नये ॥४३॥

वर्जावे शयन धान्यावरी । निजू नये मोडके घरी ।
वडील खाली निजतील तरी । खट्‍वा वर्जावी त्यापुढे ॥४४॥

नेसून ओले अथवा नग्न । निजू नये शिर वेष्टून ।
आकाशाखाली वर्जावे शयन । दीप असता निजू नये ॥४५॥

पूर्वरात्री अपरात्रीसी । निजू नये परियेसी ।
असू नये स्त्रियेपासी । रजस्वला चतुर्थदिनी ॥४६॥

असावे जानवे उपवीतीसी । दृष्टी न पडावी योनीसी ।
आयुष्य क्षीण परियेसी । दीप वर्जावा या कारणे ॥४७॥

नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी । करिता संग परियेसी ।
पुत्र उपजे चांडाळेसी । शुभ्र वस्त्र विशेष ॥४८॥

रजस्वला न होता स्त्रियेसी । न करावा संग परियेसी ।
संग करिता महादोषी । आणिक प्रकार एक असे ॥४९॥

दश वर्षे होता कन्येसी । रजस्वला सर्वत्रांसी ।
ऐका तुम्ही सर्व ऋषि पराशर सांगतसे ॥२५०॥

ऋतुकाळ असता स्त्रियेसी । गावासी जाता परियेसी ।
भ्रूणहत्या होय दोषी । प्रख्यात असे परियेसा ॥५१॥

वृद्ध अथवा वांझेसी ।असती पुत्र जिसी ।
बहु कन्या होती जियेसी । चुकता ऋतुकाळ दोष नाही ॥५२॥

ऋतु देता चतुर्थ दिवसी । पुत्र उपजे अल्पायुषी ।
कन्या होय पाचवे दिवसी । सहावे दिनी पुत्र परियेसा ॥५३॥

विषम दिवसी कन्या जाण । सम दिवसी पुत्र सगुण ।
दहा दिवस ऋतुकाळ खूण । चंद्रबळ असावे ॥५४॥

मूळ मघा रेवती दिवसी । संग न करावा परियेसी ।
कोप नसावा उभयतांसी । संतोषरूपे असावे ॥५५॥

ऋतुकाळी स्त्रीपुरुषांसी । जे जे असेल मानसी ।
सत्त्वरजतमोगुणेसी । तैसा पिंड उपजे देखा ॥५६॥

ऐसा ब्राह्मणाचा आचार । सांगता झाला पराशर ।
ऐकोनि समस्त ऋषीश्वर । येणेपरी आचरती ॥५७॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । ऐसा आचार परियेसी ।
जे आचरती विधींसी । दैन्य कैचे तया घरी ॥५८॥

ते वंद्य होत देवांसी । कामधेनु येईल घरासी ।
लक्ष्मी राहे अखंडेसी । पुत्रपौत्री नांदती ॥५९॥

होय आपण शतायुषी । न घडती दोष काही त्यासी ।
तो न भिई कळिकाळासी । ब्रह्मज्ञानी होय जाणा ॥२६०॥

काळमृत्यु चुके देखा । अपमृत्यु घडे कैचा ऐका ।
ऐसा आचार आहे निका । नित्य रहाटावे येणेपरी ॥६१॥

ऐसे ऐकोनिया वचना । विप्र लागे श्रीगुरुचरणा ।
झाला उपदेश उद्धारणा । कृपासागर गुरुमूर्ति ॥६२॥

भक्तजन तारावयासी । अवतरलासी ह्रषीकेशी ।
परिहरिले अंधकारासी । ज्ञानज्योती प्रकाशली ॥६३॥

ऐसे विनवोनि ब्राह्मण । पुनरपि धरिले श्रीगुरुचरण ।
श्रीगुरुमुर्ति संतोषोन । प्रसन्न झाले तये वेळी ॥६४॥

म्हणती श्रीगुरु तयासी । आचार सांगितला तुज हर्षी ।
नव जावे आता भिक्षेसी । आचार करूनि सुखी असे ॥६५॥

जे जे इच्छिसी कामना । होईल निरुती सत्य जाणा ।
कन्या पुत्र नांदती सगुणा । संदेह न धरावा मानसी ॥६६॥

ऐसा वर लाधोनि । विप्र गेला संतोषोनि ।
होता तैसा आचरोनि । सकळाभीष्टे लाधला ॥६७॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसे परियेसी ।
ऐकता ज्ञान समस्तांसी । मूढ होय ब्रह्मज्ञानी ॥६८॥

अज्ञानतिमिरअंधकारासी । ज्योतिप्रकाश कथा सुरसी ।
जे जे इच्छिले मानसी । पाविजे त्वरित अवधारा ॥६९॥

म्हणे सरस्वतीगंगाधरु । श्रीगुरुचरित्र असे सुरतरु ।
ऐकता होय संतोष फारु । सकळाभीष्टे साधती ॥२७०॥

इति श्रीगुरुचरित्र । नामधारका शिष्य सांगत ।
आचार जो का समस्त । निरोपिला श्रीगुरुनाथे ॥२७१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निककर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥

॥ ओवीसंख्या ॥२७१॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरूचरित्र – अध्याय अडतीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी ।
विस्तारावें कृपेंसीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१॥

आर्त झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा ।
चरित्र सांगें श्रीगुरुचें । माझें मन निववीं वेगीं ॥२॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । तूं जें जें मज पुससी ।
संतोष होतो आम्हांसी । गुरुचरित्र आठवितां ॥३॥

तुजकरितां आम्हांसी । लाभ जोडे परियेसीं ।
आठवली कथा सुरसी । विचित्र एक झालें असे ॥४॥

मागें कथन सांगितलें । जें भक्तीं द्रव्य आणिलें ।
स्वामीं अंगीकार नाहीं केलें । समाराधना करावी म्हणोनि ॥५॥

नित्य समाराधना देख । करीत होते भक्त अनेक ।
कधीं नाहीं आराणूक । नाहीं ऐसा दिवस नाहीं ॥६॥

ऐसें होतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।
असे काश्यप-गोत्रेंसीं । नाम तया 'भास्कर ' ॥७॥

अति सुक्षीण ब्राह्मण । आला आपण दर्शना म्हणोन ।
साष्‍टांगीं नमस्कारुन । भक्तिपूर्वक विनविलें ॥८॥

ते दिवसीं भक्तजन । करीत होते आराधन ।
उठवितात तया ब्राह्मणा । भोजन करीं म्हणोनियां ॥९॥

संकल्प करोनि तो ब्राह्मण । श्रीगुरुसी भिक्षा करवीन आपण ।
सवें सोपस्कार घेऊन । आला होता परियेसा ॥१०॥

त्रिवर्गाच्या पुरते देखा । सवें असे तंडुल-कणिक ।
वरकड पदार्थ त्या पूर्तिका । सोपस्कार असे त्यापाशीं ॥११॥

सर्व असे वस्त्रीं बांधिलें । नेऊनि मठांत ठेविलें ।
भक्तें आणिक त्यासी बोलाविलें । गेला तो ब्राह्मण भोजनासी ॥१२॥

भोजन करितां झाली निशी । आपण आला मठासी ।
गांठोडी ठेवी आपुले उशीं । मग निद्रा करी देखा ॥१३॥

नित्य घडे ऐसेंचि त्यासी । भक्त लोक येती आराधनेसी ।
आराणूक नव्हे त्यासी । नित्य जेवी समाराधनीं ॥१४॥

समस्त त्यास हांसती । पहा हो समाराधनेची आयती ।
घेऊनि आला असे भक्तीं । आपण जेवी नित्य समाराधनीं ॥१५॥

एकासी नव्हे पुरें अन्न । श्रीगुरुशिष्य बहु जन ।
केवीं करील हा ब्राह्मण । समाराधना करीन म्हणतो ॥१६॥

लाज नये त्यासी कैसी । समाराधना म्हणायासी ।
दे कां स्वयंपाक आम्हांसी । तूं करीं आजि माधुकरी ॥१७॥

ऐसें नाना प्रकारें त्यासी । विनोद करिती ब्राह्मण परियेसीं ।
ऐशा प्रकारें तीन मासी । क्रमिले त्या ब्राह्मणें तेथेंचि ॥१८॥

नित्य होतसे आराधन । त्यांचे घरीं जेवी आपण ।
गांठोडी उशाखालीं ठेवून । निद्रा करी प्रतिदिवसीं ॥१९॥

मास तीन क्रमिल्यावरी । समस्त मिळोनि द्विजवरीं ।
परिहास करिती अपारी । श्रीगुरुमूर्तिं ऐकिलें ॥२०॥

बोलाविती त्या ब्राह्मणासी । आजि भिक्षा करावी आम्हांसी ।
स्वयंपाक करीं वेगेंसी । म्हणती श्रीगुरु कृपासिंधु ॥२१॥

ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । संतोष अपार द्विजा झाला ।
चरणावरी माथा ठेविला । हर्षे गेला आइतीसी ॥२२॥

आणिलें द्वय शेर घृत । शाका दोनी त्यापुरत ।
स्नान करुनि शुचिर्भूत । स्वयंपाक केला तये वेळीं ॥२३॥

समस्त ब्राह्मण तये वेळीं । मिळोन आले श्रीगुरुजवळी ।
म्हणती आजि आमुची पाळी । यावनाळ-अन्न घरीं ॥२४॥

नित्य होतें समाराधन । आम्ही जेवितों मिष्‍टान्न ।
कैंचा हा आला ब्राह्मण । आजि राहिली समाराधना ॥२५॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । नका जाऊं घरांसी ।
शीघ्र जावें आंघोळीसी । येथेंचि जेवा तुम्ही आजि ॥२६॥

ब्राह्मण मनीं विचारिती । मठीं असे सामग्री आयती ।
स्वयंपाक आतां करविती । आम्हांसी निरोपिती याचिगुणें ॥२७॥

समस्त गेले स्नानासी । श्रीगुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी ।
शीघ्र करीं गा होईल निशी । ब्राह्मण अपार सांगितले ॥२८॥

स्वयंपाक झाला तत्क्षण । सांगतसे श्रीगुरुसी ब्राह्मण ।
निरोप देती जा धांवोन । ब्राह्मण समस्त पाचारीं ॥२९॥

ब्राह्मण गेला गंगेसी । बोलावीतसे ब्राह्मणांसी ।
स्वामीनें बोलाविलें तुम्हांसी । शीघ्र यावें म्हणोनियां ॥३०॥

ब्राह्मण म्हणती तयासी । स्वयंपाक व्हावया होईल निशी ।
तुवां शीघ्र श्रीगुरुसी । भिक्षा करावी जाय वेगीं ॥३१॥

ऐसें ऐकोनि तो ब्राह्मण । गेला श्रीगुरुजवळी आपण ।
ब्राह्मण न येती ऐसें म्हणे । आपण जेवूं अपरात्रीं ॥३२॥

श्रीगुरु म्हणती तयासी । नेम असे आजि आम्हांसी ।
सहपंक्तीनें ब्राह्मणांसी । जेवूं आम्ही निर्धारीं ॥३३॥

ब्राह्मणांसहित आम्हांसी । जेवूं वाढीं गा तूं परियेसीं ।
जरी अंगीकार न करिसी । न जेवूं तुझे घरीं आम्ही ॥३४॥

ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी । जो निरोप द्याल आपणासी ।
तोचि निरोप माझे शिरसीं । ब्राह्मणांसहित जेवूं वाढीन ॥३५॥

ब्राह्मण मनीं विचारी । श्रीगुरु असती पुरुषावतारी ।
न कळे बोले कवणेंपरी । आपुलें वाक्य सत्य करील ॥३६॥

मग काय करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून ।
मज न येती ब्राह्मण । विनोद करिती माझ्या बोला ॥३७॥

श्रीगुरु आणिक शिष्यासी । निरोपिती जा वेगेंसीं ।
बोलावूनि आणीं ब्राह्मणांसी । भोजन करा म्हणोनि ॥३८॥

शिष्य गेला धांवत । समस्त ब्राह्मणांतें बोलावीत ।
स्नानें करोनि आले त्वरित । श्रीगुरु-मठाजवळिक ॥३९॥

श्रीगुरु निरोपिती तयांसी । पत्रावळी करा वेगेंसीं ।
जेवा आजि सहकुटुंबेसीं । ब्राह्मण करितो आराधना ॥४०॥

चारी सहस्त्र पत्रावळी । कराव्या तुम्हीं तात्काळीं ।
उभा होता ब्राह्मण जवळी । त्यासी स्वामी निरोपिती ॥४१॥

या समस्त ब्राह्मणांसी । विनंति करावी तुवां ऐसी ।
तुम्हीं यावें सहकुटुंबेसीं । आपण करितों आराधना ॥४२॥

श्रीगुरुचा निरोप घेऊन । विनवीतसे तो ब्राह्मण ।
द्विज म्हणती त्यासी हांसोन । काय जेवा म्हणतोस आम्हां ॥४३॥

आम्हां इतुके ब्राह्मणांसी । एकेक शित न ये वांटयासी ।
आमंत्रण सांगावया न लाजसी । नमस्कारितोसि घडीघडी ॥४४॥

वृद्ध ब्राह्मण ऐसें म्हणती । निंदा न करा श्रीगुरु ऐकती ।
जैसें श्रीगुरु निरोपिती । तैसें बोलतो ब्राह्मण ॥४५॥

हो कां बरवें बरवें म्हणती । सकळ पत्रावळी करिती ।
ब्राह्मण श्रीगुरुपूजा त्वरिती । करिता झाला उपचारें ॥४६॥

त्रिकरणपूर्वक करी भक्ति । बरवी केली मंगळारती ।
तेणें श्रीगुरु संतोषती । ठाय घाला म्हणती वेगें ॥४७॥

स्वयंपाक आणूनि आपणाजवळी । ठेवीं म्हणती तये वेळीं ।
आणोनियां तात्काळीं । श्रीगुरुजवळी ठेविला ॥४८॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आमुचें वस्त्र घेऊनि अन्नासी ।
झांकोनी ठेवीं आम्हांपाशीं । म्हणोनि वस्त्र देती तये वेळीं ॥४९॥

झांकिलें वस्त्र अन्नावरी । कमंडलुउदक घेऊनि करीं ।
श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळीं ॥५०॥

बोलावूनि म्हणती ब्राह्मणासी । उघडों नको अन्नासी ।
काढूनि नेऊनि समस्तांसी । वाढीं वेगीं म्हणोनियां ॥५१॥

तूप घालूनि घटांत । ओतूनि घे आणिकांत ।
वाढीं वेगीं ऐसें म्हणत । निरोप देती श्रीगुरु ॥५२॥

ठाय घातले समस्तांसी । वाढीतसे ब्राह्मण परियेसीं ।
लोक पहाती तटस्थेसीं । महदाश्चर्य म्हणताति ॥५३॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । वाढों लागा या द्विजासी ।
आणिक उठिले बहुतेसी । वाढूं लागले तये वेळीं ॥५४॥

भरोनि नेती जितुकें अन्न । पुनः मागुती परिपूर्ण ।
घृत भरलें असे पूर्ण । घट ओतूनि नेताति ॥५५॥

वाढिलें समस्त पंक्तीसी । सहपंक्तीं श्रीगुरुसी ।
जेवताति अतिहर्षी । द्विजवर पुसतसे ॥५६॥

जो जो मागाल तो पदार्थ । वाढूं वेगें ऐसें म्हणत ।
भागलेति क्षुधाक्रांत । क्षमा करणें म्हणतसे ॥५७॥

घृत असे आपुले करीं । वाढीतसे महापुरीं ।
विप्र म्हणती पुरे करीं । आकंठवरी जेविलों ॥५८॥

भक्ष्य परमान्न पत्रशाका । ब्राह्मण वाढिताति अनेका ।
शर्करा दधि लवणादिका । अनेक परी जेविले ॥५९॥

तृप्त जाहले ब्राह्मण देखा । हस्तप्रक्षालन करिती मुखा ।
उच्छिष्टें काढिती तात्काळिका । आश्चर्य म्हणती तये वेळीं ॥६०॥

तांबूलादि देती समस्तांसी । श्रीगुरु बोलावूनि तयांसी ।
बोलवा म्हणती आपुले कलत्रपुत्रांसी । समस्त येऊनि जेवितील ॥६१॥

आलें विप्रकुळ समस्त । जेवून गेलें पंचामृत ।
श्रीगुरु मागुती निरापित । शूद्रादि ग्रामलोक बोलावा ॥६२॥

त्यांचे स्त्रियापुत्रांसहित । बोलावीं शीघ्र ऐसें म्हणत ।
पाचारितां आले समस्त । जेवूनि गेले तये वेळीं ॥६३॥

श्रीगुरु पुसती ब्राह्मणांसी । आतां कोण राहिले ग्रामवासी ।
ते सांगती स्वामियासी । अत्यंज आहेति उरले ॥६४॥

बोलावा त्या समस्तांसी । अन्न द्यावें वाढून त्यांसी ।
जितुकें मागती तृप्तीसी । तितुकें द्यावें अन्न वेगीं ॥६५॥

तेही तृप्त झाले देखा । प्राणिमात्र नाहीं भुका ।;
सांगताति श्रीगुरुनायक । डांगोरा पिटा ग्रामांत ॥६६॥

कोणी असती क्षुधाक्रांत । त्यांसी बोलवावें त्वरित ।
ऐसें श्रीगुरु निरोपित । हिंडले ग्रामीं तये वेळीं ॥६७॥

प्राणिमात्र नाहीं उपवासी । सर्व जेवले परियेसीं ।
मग निरोपित त्या द्विजासी । भोजन तुवां करावें ॥६८॥

श्रीगुरुनिरोपें भोजन केलें । मागुति जाऊनि अन्न पाहिलें ।
आपण जितुकें होतें केलें । तितुकें उरलें असे अन्न ॥६९॥

श्रीगुरु म्हणती तयासी । घेऊनि जावें अन्न त्वरितेसीं ।
घालावें जळांत जळचरांसी । तृप्त होती तेही जीव ॥७०॥

ऐसें तया दिवसीं विचारिती । सहस्त्र चारी झाली मिति ।
भूमीवरी झाली ख्याति । लोक म्हणती आश्चर्य ॥७१॥

इतुकें झालियावरी । श्रीगुरु त्या द्विजातें पाचारी ।
वर देती दरिद्र दुरी । पुत्रपौत्र होती तुज ॥७२॥

समस्त जाहले तटस्थ । देखिलें अति कौतुक म्हणत ।
अन्न केलें होतें किंचित । चारी सहस्त्र केवीं जेविले ॥७३॥

एक म्हणती श्रीगुरुकरणी । स्मरली असेल अन्नपूर्णी ।
अवतारपुरुष असे धणी । श्रीनृसिंहसरस्वती ॥७४॥

एक म्हणती अपूर्व देखिलें । पूर्वीं कथानक होतें ऐकिलें ।
पांडवाघरीं दुर्वास गेले । ऋषीश्वरांसमवेत ॥७५॥

सत्त्वभंग होईल म्हणोन । श्रीकृष्ण आला ठाकून ।
तेणें केलें अन्न पूर्ण । दुसरें आजि देखिलें ॥७६॥

नर दिसतो दंडधारी । सत्य त्रैमूर्ति-अवतारी ।
न कळे महिमा असे अपारी । म्हणती लोक अनेक ॥७७॥

यातें नर जे म्हणती । ते जाती अधोगतीं ।
वर्णावया नाहीं मति । म्हणती हाचि परब्रह्म ॥७८॥

नव्हे हा जरी ईश्वर । केवीं केलें अन्नपूर ।
होतें तीन अडीच शेर । चारी सहस्त्र जेविले केवीं ॥७९॥

आणिक एक नवल झालें । आम्हीं समस्तीं देखिलें ।
प्रेतातें जीव आणिलें । शुष्क काष्‍ठासी पल्लव ॥८०॥

आणिक ऐका याची महिमा । कोणासी देऊं आतां साम्या ।
कुमसीं होता त्रिविक्रमा । त्यासी दाखविलें विश्वरुप ॥८१॥

ग्रामांत होती वांझ महिषी । क्षीर काढविलें आपुले भिक्षेसी ।
वेद म्हणविले पतितामुखेंसी । अभिमंत्रितां श्रीगुरुमूर्तीं ॥८२॥

आणिक जाहलें एक नवल । कुष्‍ठी आला विप्र केवळ ।
दर्शनमात्रें झाला निर्मळ । आम्हीं देखिलें दृष्‍टीनें ॥८३॥

विणकरी होता एक भक्त । त्यासी दाखविला श्रीपर्वत ।
काशीक्षेत्र क्षण न लागत । एका भक्तासी दाखविलें ॥८४॥

आणिक अपार चरित्रता । अमित असे हो सांगतां ।
क्षितीवरी समस्त दैवतें । तयांचें नव्हे सामर्थ्य ॥८५॥

समस्त देवांतें आराधितां । आलास्यें होय मनकाम्यता ।
दर्शनमात्रें श्रीगुरुनाथा । सकळाभीष्टें होताति ॥८६॥

ऐसें म्हणती विप्रलोक । अपूर्व जाहलें कवतुक ।
ख्याति ऐकती समस्त देख । श्रीगुरुचें चरित्र ॥८७॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं ।
याचि निमित्य बहुवसीं । शिष्य जाहले श्रीगुरुचे ॥८८॥

नाना राष्‍ट्रींचे भक्त येती । श्रीगुरुची सेवा करिती ।
अंतःकरणीं एकचित्तीं । भजणारांसी प्रसन्न ॥८९॥

गंगाधराचा नंदन । सरस्वती विनवी नमून ।
ऐका तुम्ही समस्त जन । भजा भजा हो श्रीगुरुसी ॥९०॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अन्नपूर्तिकद्विजचतुः-सहस्त्रभोजनं नाम

अष्‍टात्रिंशत्तमोऽध्यायः ॥३८॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या ९०)






गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व वर्तलें ऐका ।
साठी वर्षे वांझेसी एका । पुत्र झाला परियेसा ॥१॥

आपस्तंब-शाखेसी । ब्राह्मण एक परियेसीं ।
शौनकगोत्र -प्रवरेसी । नाम तया 'सोमनाथ' ॥२॥

'गंगा' नामें त्याची पत्‍नी । पतिव्रताशिरोमणि ।
वेदशास्त्रें आचरणी । आपण करी परियेसा ॥३॥

वर्षें साठी झालीं तिसी । पुत्र नाहीं तिचे कुशीं ।
वांझ म्हणोनि ख्यातेसी । होती तया गाणगापुरीं ॥४॥

पतिसेवा निरंतर । करी भक्तिपुरस्सर ।
नित्य नेम असे थोर । गुरुदर्शना येत असे ॥५॥

नीरांजन प्रतिदिवसीं । आणोनि करी श्रीगुरुसी ।
येणेंपरी बहुत दिवसीं । वर्तत होती परियेसा ॥६॥

ऐसें असतां वर्तमानीं । संतुष्‍ट झाले श्रीगुरुमुनि ।
पृच्छा करिती हांसोनि । तया द्विजस्त्रियेसी ॥७॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । काय अभीष्‍ट असे मानसीं ।
आणित्येसी प्रतिदिवसीं । नीरांजन परोपरी ॥८॥

तुझ्या मनींची वासना । सांगे त्वरित विस्तारुन ।
सिद्धि पाववील नारायण । गौरीरमण गुरुप्रसादें ॥९॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । करी साष्‍टांगीं नमन ।
विनवीतसे कर जोडून । ' अपुत्रस्य लोको नास्ति' ॥१०॥

पुत्राविणें स्त्रियांसी । पाहों नये मुखासी ।
पापरुपी महादोषी । म्हणती मातें स्वामिया ॥११॥

जिचे पोटीं नाहीं बाळ । तिचा जन्म निर्फळ ।
वाट पाहती उभयकुळ । बेचाळीस पितृलोकीं ॥१२॥

पितृ चिंतिती मनांत । म्हणती एखादी सती वंशांत ।
पुत्र व्यालिया आम्हां हित । तो उद्धरील सकळांतें ॥१३॥

पुत्राविणें जें घर । तें सदा असे अघोर ।
अरण्य नाहीं त्यासी दूर । 'यथारण्य तथा गृह' ॥१४॥

नित्य गंगास्नानासी । आपण जात्यें परियेसीं ।
घेऊनि येती बाळकांसी । समस्त स्त्रिया कवतुकें ॥१५॥

कडे घेऊनियां बाळा । खेळविताति स्त्रिया सकळा ।
तैसें नाहीं माझे कपाळा । मंदभाग्य असें देखा ॥१६॥

जळो माझें वक्षस्थळ । कडे घ्यावया नाहीं बाळ ।
जन्मोनियां संसारीं निष्फळ । नव्हें पुरुष अथवा सती ॥१७॥

पुत्रपौत्र असती जयांसी । परलोक साधे तयांसी ।
अधोगति निपुत्रिकासी । लुप्तपिंड होय स्वामिया ॥१८॥

आतां पुरे जन्म मज । साठी वर्षें जाहलीं सहज ।
आम्हां आतां वर दीजे । पुढें उत्तम जन्म होय ॥१९॥

पुत्रवंती व्हावें आपण । अंतःकरण होय पूर्ण ।
ऐसा वर देणें म्हणोन । विनवीतसे तये वेळीं ॥२०॥

ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
पुढील जन्म जाणेल कवण । तूतें स्मरण कैंचें सांग ॥२१॥

नित्य आरति आम्हांसी । भक्तिपूर्वक भावेंसीं ।
करितां जाहलों संतोषी । कन्या-पुत्र होतील तुज ॥२२॥

इहजन्मीं तूतें जाण । कन्या पुत्र सुलक्षण ।
होतील निगुतीं म्हणोन । श्रीगुरु म्हणती तियेसी ॥२३॥

श्रीगुरुवचन ऐकोनि । पालवीं गांठी बांधी ज्ञानी ।
विनवीतसे कर जोडूनि । ऐका स्वामी कृपासिंधु ॥२४॥

साठी वर्षें जन्मासी । जाहलीं स्वामी परियेसीं ।
होत नाहीं विटाळसी । मातें कैंचे पुत्र होती ॥२५॥

नाना व्रत नाना तीर्थ । हिंडिन्नल्यें पुत्रार्थ ।
अनेक ठायीं अश्वत्थ- । पूजा केली स्वामिया ॥२६॥

मज म्हणती सकळै जन । करीं वो अश्वत्थप्रदक्षिणा ।
तेणें पुरतील मनकामना । होतील पुत्र म्हणोनि ॥२७॥

अश्वत्थसेवा बहुकाळ । करितां माझा जन्म गेला ।
विश्वास म्यां बहु केला । होतील पुत्र म्हणोनि ॥२८॥

साठी वर्षें येणेंपरी । कष्‍ट केले अपरांपरी ।
सेवा करित्यें अद्यापिवरी । अश्वत्थाची प्रदक्षिणा ॥२९॥

पुत्र न होती इह जन्मीं । पुढें होतील ऐसे कामीं ।
सेवा करितसें स्वामी । अश्वत्थाची परियेसा ॥३०॥

आतां स्वामी प्रसन्न होसी । इहजन्मीं पुत्र देसी ।
अन्यथा नोहे बोलासी । तुमच्या स्वामी नरहरी ॥३१॥

स्वामींनीं दिधला मातें वर । माझे मनीं हा निर्धार ।
हास्य न करी स्वामी गुरु । शकुनगांठी बांधिली म्यां ॥३२॥

पुढील जन्म-काम्यासी । करित्यें सेवा अश्वत्थासी ।
स्वामी आतांचि वर देसी । इहजन्मीं कन्या-पुत्र ॥३३॥

अश्वत्थसेवा बहु दिवस । करितां झाले मज प्रयास ।
काय देईल आम्हांस । अश्वत्थ सेवित्यें मूर्खपणें ॥३४॥

ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
अश्वत्थसेवा महापुण्य । वृथा नोहे परियेसा ॥३५॥

निंदा न करीं अश्वत्थासी । अनंत पुण्य परियेसीं ।
सेवा करीं वो आम्हांसरसी । तूतें पुत्र होतील ॥३६॥

आतां आमचे वाक्येंकरी । नित्य जावें संगमातीरीं ।
अमरजा वाहे निरंतरीं । भीमरथीसमागमांत ॥३७॥

तेथें अश्वत्थ असे गहन । जातों आम्ही अनुष्‍ठाना ।
सेवा करीं वो एकमनें । आम्हांसहित अश्वत्थाची ॥३८॥

अश्वत्थाचें महिमान । सांगतसें परिपूर्ण ।
अश्वत्थनाम-नारायण । आमुचा वास तेथें असे ॥३९॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे ते अंगना ।
अश्वत्थवृक्षाचें महिमान । स्वामी मातें निरोपावें ॥४०॥

कैसी महिमा असे त्यासी । स्वामी सांगावें मजसी ।
स्थिर होईल माझें मानसी । सेवा करीन भक्तीनें ॥४१॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । अश्वत्थवृक्षासी निंदा करिसी ।
महिमा असे अपार त्यासी । समस्त देव तेथें वसती ॥४२॥

अश्वत्थाचें महिमान । असे ब्रह्मांडपुराणीं निरुपण ।
नारदमुनीस विस्तारोन । ब्रह्मदेवानें सांगितलें ॥४३॥

ब्रह्मकुमर नारदमुनि । नित्य गमन त्रिभुवनीं ।
ब्रह्मयासी पुसोनि । आला ऋषि-आश्रमासी ॥४४॥

नारदातें देखोनि । अर्घ्यपाद्य देवोनि ।
पूजा केली उपचारोनि । पुसते झाले तयेवेळीं ॥४५॥

ऋषि म्हणती नारदासी । विनंति एक परियेसीं ।
अश्वत्थमहिमा असे कैसी । विस्तारावें स्वामिया ॥४६॥

ऋषिवचन ऐकोनि । सांगता जाहला नारदमुनि ।
गेलों होतों आजिचे दिनीं । ब्रह्मलोकीं हिंडत ॥४७॥

आपण पुसे स्वभावेंसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी ।
समस्त मानिती तयासी । विष्णुस्वरुप म्हणोनियां ॥४८॥

ऐसा वृक्ष असे जरी । सेवा करणें कवणेपरी ।
कैसा महिमा सविस्तारीं । निरोपावें स्वामिया ॥४९॥

ब्रह्मा सांगे आम्हांसी । अश्वत्थमुळीं आपण वासी ।
मध्यें वास ह्रुषीकेशी । अग्रीं रुद्र वसे जाणा ॥५०॥

शाखापल्लवीं अधिष्‍ठानीं । दक्षिण शाखे शूलपाणि ।
पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी । आपण उत्तरे वसतसें ॥५१॥

इंद्रादि देव परियेसीं । वसती पूर्वशाखेसी ।
इत्यादि देव अहर्निशीं । समस्त शाखेसी वसती जाणा ॥५२॥

गोब्राह्मण समस्त ऋषि । वेदादि यज्ञ परियेसीं ।
समस्त मूळांकुरेसी । असती देखा निरंतर ॥५३॥

समस्त नदीतीर्थें देखा । सप्त-सागर लवणादिका ।
वसती जाणा पूर्व शाखा । ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा ॥५४॥

अ-कारशब्द मूळस्थान । स्कंध शाखा उ-कार जाण ।
फळ पुष्प म-कारवर्ण । अश्वत्थमुख अग्निकोणीं असे ॥५५॥

एकादश रुद्रादिक । अष्‍ट वसु आहेत जे का ।
जे स्थानीं त्रैमूर्तिका । समस्त देव तेथें वसती ॥५६॥

ऐसा अश्वत्थनारायण । महिमा वर्णावया शक्त कवण ।
कल्पवृक्ष याचि कारण । ब्रह्मा म्हणे नारदासी ॥५७॥

नारद सांगे ऋषेश्वरांसी । त्रयमूर्ति वास ज्या वृक्षाशीं ।
काय महिमा सांगों त्यासी । भजतां काय सिद्धि नोहे ? ॥५८॥

ऐसें ऐकोनि समस्त ऋषि । विनविताति नारदासी ।
आचारावया विधि कैसी । कवणें रीतीनें भजावें ॥५९॥

पूर्वीं आम्हीं एके दिवसीं । पुसिलें होतें आथर्वणासी ।
त्याणें सांगितलें आम्हांसी । अश्वत्थसेवा एक रीतीं ॥६०॥

तूं नारद ब्रह्मऋषि । समस्त धर्म ओळखसी ।
विस्तार करोनि आम्हांसी । विधिपूर्वक निरोपावें ॥६१॥

नारद म्हणे मुनिवरा । त्या व्रताचिया विस्तारा ।
सांगेन ऐका तत्परा । विधान असे ब्रह्मवचनीं ॥६२॥

आषाढ-पौष-चैत्रमासीं । अस्तंगत गुरुशुक्रेसीं ।
चंद्रबळ नसते दिवसीं । करुं नये प्रारंभ ॥६३॥

याव्यतिरिक्त आणिक मासीं । बरवे पाहोनियां दिवसीं ।
प्रारंभ करावा उपवासीं । शुचिर्भूत होऊनि ॥६४॥

भानुभौमवारेसीं । आतळूं नये अश्वत्थासी ।
भृगुवारीं संक्रांतिदिवसीं । स्पर्शूं नये परियेसा ॥६५॥

संधिरात्रीं रिक्तातिथीं । पर्वणीसी व्यतीपातीं ।
दुर्दिनादि वैधृतीं । अपराण्हसमयीं स्पर्शूं नये ॥६६॥

अनृत-द्यूतकर्मभेषीं । निंदा-पाखांड-वर्जेसीं ।
प्रातर्मौनी होवोनि हर्षीं । आरंभावें परियेसा ॥६७॥

सचैल स्नान करुनि । निर्मळ वस्त्र नेसोनि ।
वृक्षाखालीं जाऊनि । गोमयलिप्त करावें ॥६८॥

स्वस्तिकादि शंखपद्मेसीं । घालावी रंगमाळा परियेसीं ।
पंचवर्ण चूर्णेसीं । भरावें तेथें पद्मांत ॥६९॥

मागुती स्नान करुनि । श्वेत वस्त्र नेसोनि ।
गंगा यमुना कलश दोनी । आणोनि ठेवणें पद्मांवरी ॥७०॥

पूजा करावी कलशांसी । पुण्याहवाचनकर्मेंसीं ।
संकल्पावें विधींसीं । काम्यार्थ आपुलें उच्चारावें ॥७१॥

मग कलश घेवोनि । सात वेळां उदक आणोनि ।
स्नपन करावें जाणोनि । अश्वत्थ वृक्षासी अवधारा ॥७२॥

पुनरपि करुनियां स्नान । मग करावें वृक्षपूजन ।
पुरुषसूक्त म्हणोन । पूजा करावी षोडशोपचारें ॥७३॥

मनीं ध्यावी विष्णुमूर्ति । अष्‍टभुजा आहेति ख्याती ।
शंख-चक्र-वरद-हस्तीं । अभय-हस्त असे जाणा ॥७४॥

खड्ग-खेटक एके करीं । धनुष्य-बाण सविस्तारीं ।
अष्‍टभुजी येणेंपरी । ध्यावा विष्णु नारायण ॥७५॥

पीतांबर पांघरुण । सदा लक्ष्मी-सन्निधान ।
ऐसी मूर्ति ध्याऊन । पूजा करणें वृक्षासी ॥७६॥

त्रैमूर्तीचें असें स्थान । शिवशक्तीविणें नाहीं जाण ।
समस्तांतें आवाहनोन । षोडशोपचारें पूजावें ॥७७॥

वस्त्रें अथवा सुतेसीं । वेष्टावें तया वृक्षासी ।
पुनरपि संकल्पेसीं । प्रदक्षिणा कराव्या ॥७८॥

मनसा-वाचा-कर्मणेसीं । भक्तिपूर्वक भावेंसीं ।
प्रदक्षिणा कराव्या हर्षीं । पुरुषसूक्त म्हणत देखा ॥७९॥

अथवा सहस्त्रनामेंसीं । कराव्या प्रदक्षिणा हर्षीं ।
अथवा कराव्या मौन्येंसीं । त्याचें फळ अमित असे ॥८०॥

चाले जैसी स्त्री गर्भिणी । उदककुंभ घेउनी ।
तैसे मंद गतींनीं । प्रदक्षिणा कराव्या शुद्धभावें ॥८१॥

पदोपदीं अश्वमेध । पुण्य जोडे फळप्रद ।
प्रदक्षिणासमाप्तमध्य । नमस्कार करावा ॥८२॥

ब्रह्महत्यादि पापांसी । प्रायश्चित्त नाहीं परियेसीं ।
प्रदक्षिणा द्विलक्षांसीं । ब्रह्महत्या पाप जाय ॥८३॥

त्रिमूर्ति वसती जया स्थानीं । फल काय सांगूं प्रदक्षिणीं ।
समस्त पापा होय धुणी । गुरुतल्पादि पाप जाय ॥८४॥

नाना व्याधि हरती दोष । प्रदक्षिणा करितां होय सुरस ।
कोटि ऋण असे ज्यास । परिहरत परियेसा ॥८५॥

जन्म मृत्यु जरा जाती । संसारभय नाश होती ।
ग्रहदोष बाधों न शकती । सहस्त्र प्रदक्षिणा केलिया ॥८६॥

पुत्रकाम्य असे ज्यासी । त्यातें फल होय भरंवसीं ।
मनोवाक्कायकर्मेंसीं । एकोभावें करावें ॥८७॥

चतुर्विध पुरुषार्थ । देता होय तो अश्वत्थ ।
पुत्रकाम्य होय त्वरित । न करा अनुमान ऋषी हो ॥८८॥

शनिवारीं वृक्ष धरोनि । जपावें मृत्युंजय-मंत्रानीं ।
काळमृत्यु जिंकोनि । राहती नर अवधारा ॥८९॥

त्यासी अपमृत्यु न बाधती । पूर्णायुषी होती निश्चितीं ।
शनिग्रह न पीडिती । प्रार्थावें अश्वत्थासी ॥९०॥

शनिनाम घेवोनि । उच्चारावें आपुले जिव्हेनीं ।
बभ्रु-पिंगळ म्हणोनि । कोणस्थ-कृष्ण म्हणावें ॥९१॥

अंतक-यम-महारौद्री । मंद-शनैश्वर-सौरि ।
जप करावा येणेंपरी । शनिपीडा न होय ॥९२॥

ऐसें दृढ करोनि मना । अश्वत्थ सेवितां होय कामना ।
पुत्रकाम्य तत्क्षणा । होय निरुतें अवधारा ॥९३॥

अमावस्या-गुरुवारेंसी । अश्वत्थछाया-जळेंसीं ।
स्नान करितां नरासी । ब्रह्महत्या पाप जाय ॥९४॥

अश्वत्थतळीं ब्राह्मणासी । अन्न देतां एकासी ।
कोटि ब्राह्मणां परियेसीं । भोजन दिल्हें फळ असे ॥९५॥

अश्वत्थतळीं बैसोन । एकदां मंत्र जपतां क्षण ।
फळें होतील अनेकगुण । वेदपठण केलियाचें ॥९६॥

नर एखादा अश्वत्थासीं । स्थापना करी भक्तींसीं ।
आपुले पितृ-बेचाळिसी । स्वर्गीं स्थापी परियेसा ॥९७॥

छेदितां अश्वत्थवृक्षासी । महापाप परियेसीं ।
पितृसहित नरकासी । जाय देखा तो नर ॥९८॥

अश्वत्थातळीं बैसोन । होम करितां महायज्ञ ।
अक्षय सुकृत असे जाण । पुत्रकाम्य त्वरित होय ॥९९॥

ऐसा अश्वत्थमहिमा । नारदाप्रति सांगे ब्रह्मा ।
म्हणोनि ऐकती ऋषिस्तोम । तया नारदापासोनि ॥१००॥

नारद म्हणे ऋषेश्वरासी । प्रदक्षिणेच्या दहावे अंशीं ।
हवन करावें विशेषीं । आगमोक्त विधानपूर्वक ॥१॥

हवनाचे दहावे अंशीं । ब्राह्मणभोजन करावें हर्षीं ।
ब्रह्मचर्य हविष्यान्नेंसीं । व्रत आपण करावें ॥२॥

येणेंपरी आचरोन । मग करावें उद्यापन ।
शक्त्यनुसार सौवर्ण । अश्वत्थवृक्ष करावा ॥३॥

तो द्यावा ब्राह्मणासी । विधिपूर्वक परियेसीं ।
श्वेतधेनु सवत्सेंसीं । ब्राह्मणातें दान द्यावी ॥४॥

वृक्षातळीं तिळराशी । करावी यथानुशक्तीसीं ।
श्वेतवस्त्र झांकोनि हर्षीं । सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावें ॥५॥

ऐसें अश्वत्थविधान । सांगे नारद ऋषिजना ।
येणेंपरी आचरोन । सकळाभीष्‍ट लाधले ॥६॥

श्रीगुरु म्हणती वांझ सतीसी । अश्वत्थमहिमा आहे ऐसी ।
भावभक्ति असे ज्यासी । त्यातें होय फलश्रुति ॥७॥

आचार करीं वो येणेंपरी । संशय अंतःकरणीं न धरीं ।
वृक्ष असे भीमातीरीं । जेथें अमरजासंगम ॥८॥

तेंचि आमुचें असे स्थान । सेवा करीं वो एकोमनें ।
होईल तुझी मनकामना । कन्या पुत्र तुज होतील ॥९॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । नमन करी ते अंगना ।
विनवीतसे कर जोडूनि । भावभक्तीकरोनियां ॥११०॥

आपण वांझ वर्षें साठी । कैंचे पुत्र आपुले पोटीं ।
वाक्य असे तुमचें शेवटीं । म्हणोनि आपण अंगीकारीन ॥११॥

गुरुवाक्य म्हणजे कामधेनु । ऐसें बोलती वेदपुराण ।
आतां नाहीं अनुमान । करीन सेवा स्वामिया ॥१२॥

चाड नाहीं अश्वत्थासी । निर्धार तुमचे बोलासी ।
सेवा करीन तुमची ऐसी । म्हणोनि चरणीं लागली ॥१३॥

ऐसा निरोप घेवोनि । जावोनि वनिता संगमस्थानीं ।
षट्‌कूलांत न्हाऊनि । सेवा करी अश्वत्थाची ॥१४॥

श्रीगुरुनिरोप जेणेंपरी । तैसी सेवा करी ते नारी ।
येणेंपरी तीन रात्रीं । आराधिलें परियेसा ॥१५॥

श्रीगुरुसहित अश्वत्थासी । पूजा करितां तिसरे दिवसीं ।
स्वप्न जाहलें तियेसी । सांगेन ऐका एकचित्तें ॥१६॥

स्वप्नामध्यें विप्र एक । येवोनि देतो तिसी भाक ।
काम्य झालें तुझें ऐक । सांगेन एक करीं म्हणे ॥१७॥

जाऊनि गाणगापुरांत । तेथें असे श्रीगुरुनाथ ।
प्रदक्षिणा करीं हो सात । नमन करीं तूं भक्तींसीं ॥१८॥

जें काय देतील तुजसी । भक्षण करीं वो वेगेंसीं ।
निर्धार धरुनि मानसीं । त्वरित जावें म्हणे विप्र ॥१९॥

ऐसें देखोनि सुषुप्तींत । सवेंचि झाली ते जागृत ।
कल्पवृक्ष असे अश्वत्थ । कल्पिलें फळ त्वरित होय ॥१२०॥

सेवा करुनि चवथे दिवशीं । आली आपण मठासी ।
प्रदक्षिणा करुनि हर्षीं । नमन केलें तये वेळीं ॥२१॥

हांसोनियां श्रीगुरुमुनि । फळें देती तिसी दोनी ।
भक्षण करीं वो संतोषोनि । काम्य झालें आतां तुझें ॥२२॥

भोजन करीं वो तूं आतां त्वरित । काम्य होईल तुझें सत्य ।
कन्या-पुत्र दोघे तूतें । दिल्हे आजि परियेसा ॥२३॥

पारणें करोनि विधीसीं । मग भक्षावें या फलांसी ।
दान द्यावें ब्राह्मणांसी । जें काय पूर्वीं निरोपिलें ॥२४॥

व्रत संपूर्ण करोनि । केलें दान ते भामिनीं ।
तेचि दिवशीं अस्तमानी । झाली आपण विटाळशी ॥२५॥

मौन दिवस तीनवरी । भोजन करी हिरवे खापरीं ।
श्वेत वस्त्र नेसोनि नारी । कवणाकडे न पाहेचि ॥२६॥

येणेंपरी तिन्ही निशी । क्रमिल्या नारीनें परियेसीं ।
सुस्नात होवोनि चवथे दिवशीं । आली श्रीगुरुचे दर्शना ॥३७॥

पतीसमवेत येऊनि । पूजा करी ती एकाग्रमनीं ।
श्रीगुरु म्हणती संतोषोनि । पुत्रवंती व्हावें तुम्हीं ॥२८॥

ऐसें नमूनि श्रीगुरुसी । आली आपुल्या मंदिरासी ।
ऋतु दिधला पांचवे दिवसीं । म्हणोनि कन्या परियेसा ॥२९॥

येणेंपरी ते नारी । जाहली ऐका गरोदरी ।
ग्राम सकळ विस्मय करी । काय नवल म्हणतसे ॥१३०॥

म्हणती पहा नवल वर्तलें । वांझेसी गर्भधारण केवीं झालें ।
सोमनाथ विप्र भले । करीतसे आनंद ॥३१॥

सातवे मासीं ओटी भरिती । अक्षय वाणें ओंवाळिती ।
श्रीगुरुसी विनोदावरी प्रीति । वाणें देवविती कौतुकें ॥३२॥

आठवे मासीं तो ब्राह्मण । करी सीमंतविधान ।
गुरुनिरोपें संतोषोन । देती वाणें ग्रामांत ॥३३॥

अभिनव करिती सकळही जन । म्हणती वांझेसी गर्भधारण ।
पांढरे केश म्हातारपण वाणें देती कौतुकें ॥३४॥

एक म्हणती श्रीगुरुप्रसाद । श्रीनृसिंहमूर्ति भक्तवरद ।
त्याची सेवा करितां आनंद । लाधे चारी पुरुषार्थ ॥३५॥

त्रैमूर्तींचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर ।
भक्तजनां मनोहर प्रगटला भूमंडळीं ॥३६॥

ऐसें नानापरी देखा । स्तोत्र करिती गुरुनायका ।
वाणें देत ते बालिका । अत्योल्हास तिच्या मनीं ॥३७॥

वाणें देऊनि समस्तांसी । येऊनि नमी ती श्रीगुरुसी ।
भक्तवत्सल परियेसीं । अशीर्वचन देतसे ॥३८॥

संतोषोनि विप्रवनिता । करी साष्‍टांग दंडवता ।
नानापरी स्तोत्र करितां । विनवीतसे परियेसा ॥३९॥

जय जया परमपुरुषा । तूंचि ब्रह्मा विष्णुमहेशा ।
तुझें वाक्य जाहलें परीस । सुवर्ण केला माझा देह ॥१४०॥

तूं तारावया विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी ।
त्रैमूर्ति तूंचि होसी । अन्यथा नव्हे स्वामिया ॥४१॥

तुझी स्तुति करावयासी । अशक्य आपुले जिव्हेसी ।
अपार तुझ्या महिमेसी । नाहीं साम्य कृपासिंधु ॥४२॥

येणेंपरी स्तोत्र करुनि । श्रीगुरुचरण वंदूनि ।
गेली निरोप घेऊनि । आपुले गृहा परियेसा ॥४३॥

ऐसे नवमास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं ।
समस्त ज्योतिषी येवोनि । वर्तविती जातकातें ॥४४॥

ज्योतिषी म्हणती तये वेळीं । होईल कन्या मन निर्मळी ।
अष्‍टपुत्रा वाढेल कुळी । पुत्रपौत्रीं नांदेल ॥४५॥

येणेंपरी ज्योतिषीं । जातक वर्तविलें परियेसीं ।
सोमनाथ आनंदेंसीं । दानधर्म करिता जाहला ॥४६॥

दहा दिवस क्रमोनि । सुस्नात झाली ते भामिनी ।
कडिये बाळक घेवोनि । आली श्रीगुरुदर्शनासी ॥४७॥

बाळक आणोनि भक्तींसीं । ठेविलें श्रीगुरुचरणापाशीं ।
नमन करी साष्‍टांगेंसीं । एकभावेंकरोनियां ॥४८॥

आश्वासोनि श्रीगुरुमूर्ति । उठीं बाळे पुत्रवंती ।
बहुतपरी संतोषविती । प्रेमभावेंकरोनियां ॥४९॥

उठोनि विनवी ती श्रीगुरुसी । पुत्र नाहीं आमुचे कुशीं ।
सरस्वती आली घरासी । बोल आपुला सांभाळावा ॥१५०॥

ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
न करीं मनीं अनमान । तूतें पुत्र होईल ॥५१॥

म्हणोनि तिये कुमारीसी । कडिये घेती प्रीतींसीं ।
सांगताति समस्तांसी । तये कन्येचें लक्षण ॥५२॥

पुत्र होतील बहु इसी । होईल आपण शतायुषी ।
पुत्राचे पौत्र नयनेंसीं । पाहील आपण अहेवपणें ॥५३॥

होईल इसी ज्ञानी पति । त्यातें चारी वेद येती ।
अष्‍टैश्चर्यें नांदती । प्रख्यात होवोनि भूमंडळीं ॥५४॥

आपण होईल पतिव्रता । पुण्यशील धर्मरता ।
इची ख्याति होईल बहुता । समस्ता इसी वंदिती ॥५५॥

दक्षिणदेशीं महाराजा । येईल इचे दर्शनकाजा ।
आणिक पुत्र होईल तुज । म्हणोनि श्रीगुरु बोलती ॥५६॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । कन्यालक्षण सांगती ।
विप्रवनिता विनयवृत्तीं । म्हणे पुत्र व्हावा मज ॥५७॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । पुत्र व्हावा तुज कैसी ।
योग्य पाहिजे वर्षें तीसी । अथवा शतायुषी मूर्ख पैं ॥५८॥

ऐकोनि श्रीगुरुच्या वचना । विनवीतसे ते अंगना ।
योग्य पाहिजे पुत्र आपणा । तयासी पांच पुत्र व्हावे ॥५९॥

भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । वर देती तेणें रीतीं ।
संतोषोनि घरा जाती । महानंद दंपतीसी ॥१६०॥

पुढें तिसी पुत्र झाला । वेदशास्त्रीं विख्यात भला ।
पांच पुत्र तो लाधला । नामकरणी श्रीगुरुचा ॥६१॥

कन्यालक्षण श्रीगुरुमूर्ती । निरोपिलें होतें जेणें रीतीं ।
प्रख्यात झाली सरस्वती । महानंद प्रवर्तला ॥६२॥

यज्ञ करी तिचा पति । प्रख्यात नाम 'दीक्षिती' ।
चहूं राष्‍ट्रीं त्याची ख्याती । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥६३॥

साठी वर्षें वांझेसी । पुत्र जाहला परियेसीं ।
सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कृपा श्रीगुरुची ॥६४॥

निर्धार असे ज्याचे मनीं । त्यासी वर देती तत्क्षणीं ।
एकोभावें याकारणीं । भक्ति करावी श्रीगुरुची ॥६५॥

म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
भजा भजा हो श्रीगुरु । सकळाभीष्‍ट लाधे तुम्हां ॥६६॥

जो भजेल श्रीगुरुसी । एकोभावें भक्तींसीं ।
त्यासी दैन्य कायसी । जें जें मागेल तें देईल सत्य ॥६७॥

गुरुभक्ति म्हणजे कामधेनु । अंतःकरणीं नको अनुमानु ।
जें जें इच्छीत भक्तजनु । समस्त देईल परियेसा ॥१६८॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्यासंतानप्राप्ति नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या १६८ )





गुरुचरित्र – अध्याय चाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका ।
वृक्ष होता काष्ठ शुष्का । विचित्र कथा ऐक पा ॥१॥

गाणगापुरी असता श्रीगुरु । आला एक कुष्ठी द्विजवरु ।
आपस्तंब भार्गवगोत्रु । नाम तयाचे नरहरि ॥२॥

येवोनिया श्रीगुरुमूर्तीसी । नमन करी भक्तीसी ।
करी स्तोत्र बहुवसी । करसंपुट जोडोनिया ॥३॥

जय जयाजी गुरुमुर्ति । ऐकोनि आलो तुझी कीर्ति ।
भक्तवत्सला परंज्योती । परमपुरुषा जगद्गुरु ॥४॥

आपण जन्मोनि संसारी । वृथा झालो दगडापरी ।
निंदा करिताती द्विजवरी । कुष्ठी म्हणोनि स्वामिया ॥५॥

वाचिला वेद यजुःशाखा । निंदा करिताती माझी लोका ।
ब्राह्मणार्थी न सांगती देखा । अंगहीन म्हणोनिया ॥६॥

प्रातःकाळी उठोनि लोक । आफती माझे मुख ।
तेणे होते मनात दुःख । जन्म पुरे आता मज ॥७॥

पाप केले आपण बहुत । जन्मांतरी असंख्यात ।
तेणे हा भोग भोगित । आता न साहे स्वामिया ॥८॥

नाना तीर्थ नाना व्रत । हिंडोनि आलो आचरत ।
म्या पूजिले देव समस्त । माझी व्याधि न वचेची ॥९॥

आता धरोनि निर्धारु । आलो स्वामीजवळी जगद्गुरु ।
तुझा न होता कृपावरु । प्राण आपुला त्यजीन ॥१०॥

म्हणोनिया निर्वाणेसी । विनवीतसे श्रीगुरूसी ।
एकभावे भक्तीसी । करुणा भाकी द्विजवर ॥११॥

म्हणोनि मागुती नमस्कारी । नानापरी स्तुति करी ।
लोहपरिसा भेटीपरी । तुझ्या दर्शनमात्रेसी ॥१२॥

करुणावचनी ऐकोनि । भक्तवत्सल श्रीगुरु मुनि ।
निरोप देती कृपा करोनि । ऐक शिष्या नामधारका ॥१३॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । पूर्वजन्मी महादोषासी ।
तुवा केले बहुवसी । म्हणोनि कुष्ठी झालास ॥१४॥

आता सांगेन ते करी । तुझी पापे जाती दुरी ।
होशील दिव्यशरीरी । एकभावे आचरावे ॥१५॥

इतुकिया अवसरी । काष्ठ एक औदुंबरी ।
शुष्क होते वर्षे चारी । घेवोनि आले सर्पणासी ॥१६॥

ते देखिले श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
एकभावे करोनि चित्ती । घेई काष्ठ झडकरी ॥१७॥

काष्ठ घेवोनि संगमासी । त्वरित जाय भावेसी ।
संगमनाथपूर्वभागेसी । भीमातीरी रोवी पा ॥१८॥

तुवा जावोनिया संगमात । स्नान करोनिया त्वरित ।
पूजा करोनि अश्वत्थ । पुनरपि जाय स्नानासी ॥१९॥

हाती धरोनिया कलश दोनी । आणी उदक तत्क्षणी ।
शुष्क काष्ठा वेळ तिन्ही । स्नपन करी मनोभावे ॥२०॥

ज्या दिवसी काष्ठासी । पर्णै येतील संजिवेसी ।
दोष गेले तुझे परियेसी । अंग तुझे होय बरवे ॥२१॥

येणेपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रासी निरोप देती ।
विश्वास झाला त्याचे चित्ती । धावत गेला काष्ठाजवळी ॥२२॥

काष्ठ उचलोनि डोईवरी । घेवोनि आला भीमातीरी ।
संगमेश्वरासमोरी । रोविता झाला द्विजवर ॥२३॥

जेणे रीती श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
आचरतसे एकचित्ती । भावभक्ति करोनिया ॥२४॥

येणेपरी सात दिवस । द्विजे केले उपवास ।
तया काष्ठा दोनी कलश । भरोनि घाली वेळोवेळी ॥२५॥

देखोनि म्हणती सकळजन । तया विप्रा बोलावोन ।
सांगताती विवंचून । गुरुनिरोपलक्षण ॥२६॥

म्हणती तूते काय झाले । शुष काष्ठ का रोविले ।
याचे तुवा संजीवन योजिले । मग तूते काय होय ॥२७॥

याते तू सजीव करिसी । मागुती काय येतीपल्लव यासी ।
ऐसे पाहिले नाही भूमिसी । श्रीगुरूची इच्छा कळेना ॥२८॥

श्रीगुरुमूर्ति क्रुपासिंधु । भक्तजना असे वरदु ।
त्याची कृपा असे अगाधु । समस्ताते कृपा करी ॥२९॥

नसेल निष्कृति तुझिया पापा । म्हणोनि दिधले काष्ठ बापा ।
वाया कष्ट करिसी का पा । तूते श्रीगुरूंनी निरोपिले ॥३०॥

ऐकोनि तयांचे वचन । विप्रवर करी नमन ।
गुरुवाक्य मज कामधेनु । अन्यथा केवी होईल ॥३१॥

सत्यसंकल्प श्रीगुरुनाथ । त्याचे वाक्य न होय मिथ्य ।
माझे मनी निर्धार सत्य । होईल काष्ठ वृक्ष जाणा ॥३२॥

माझ्या मनी निर्धारु । असत्य न होय वाक्यगुरु ।
प्राण वेचीन साचारु । गुरुवाक्य कारण आपणा ॥३३॥

येणेपरी समस्तांसी । विप्र सांगे परियेसी ।
सेवा करितो भक्तीसी । तया शुष्क काष्ठासी ॥३४॥

एके दिवशी गुरुमूर्तीसी । शिष्य सांगती परियेसी ।
स्वामींनी निरोपिले द्विजासी । शुष्क काष्ठा भजे म्हणोनि ॥३५॥

सात दिवस उपवासी । सेवा करितो काष्ठासी ।
एकभावे भक्तीसी । निर्धार केला गुरुवचनी ॥३६॥

किती रीती आम्ही त्यासी । सांगितले सर्व हितासी ।
वाया का गा कष्ट करिसी । मूर्खपणे म्हणोनि ॥३७॥

विप्र आम्हाते ऐसे म्हणे । चाड नाही काष्ठाविणे ।
गुरुवाक्य मजकारणे । करील आपुले बोल साच ॥३८॥

निर्धार धरोनि मानसी । सेवा करितो काष्ठासी ।
सात दिवस उपवासी । उदक मुखी घेत नाही ॥३९॥

ऐकोनि शिष्यांचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण ।
जैसा असे भाव अंतःकरण । तैसी सिद्धि पावेल ॥४०॥

गुरुवाक्य शिष्यासी कारण । सर्वथा न होय निर्वाण ।
जैसे भक्ताचे अंतःकरण । तैशी सिद्धि पावेल ॥४१॥

याकारणे तुम्हांसी । सांगेन कथा इतिहासी ।
सांगे सूत ऋषीश्वरांसी । स्कंदपुराणी परियेसा ॥४२॥

गुरुभक्तीचा प्रकार । पुसती सूतासी ऋषीश्वर ।
सांगे सूत सविस्तर । तेचि कथा सांगतसे ॥४३॥

सूत म्हणे ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति असे विशेषी ।
तारावया संसारासी । आणिक नाही उपाय ॥४४॥

अयोग्य अथवा ज्ञानवंत । म्हणोनि न पाहिजे अंत ।
गुरुमूर्ति मनी ध्यात । सेवा करणे भक्तिभावे ॥४५॥

दृढ भक्ति असे जयापासी । सर्व धर्म साधती त्यासी ।
संदेह न धरावा मानसी । एकचित्ते भजावे ॥४६॥

श्रीगुरु नर ऐसा न म्हणावा । त्रैमूर्ति तोचि जाणावा ।
गुणदोष न विचारावा । म्हणावा तोचि ईश्वर ॥४७॥

येणेपरी धरोनि मनी । जे जे भजती श्रीगुरुचरणी ।
प्रसन्न होय शूलपाणि । तात्काळिक परियेसा ॥४८॥

श्लोक ॥ मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेषजे गुरौ ।
यादृशी भावनां कुर्यात्‍ सिद्धिर्भवति तादृशी ॥४९॥

टीका ॥ मंत्रतीर्थद्विजस्थानी । देवभक्ती औषधगुणी ।
गुरूसी पाहे शिवसमानी । भाविल्यासारखे फल होय ॥५०॥

म्हणे सूत ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी ।
सांगेन साक्ष तुम्हांसी । अपूर्व एक वर्तलेसे ॥५१॥

पूर्वी पांचाल नगरात । होता राजा सिंहकेत ।
तयासी होता एक सुत । नाम तयाचे धनंजय ॥५२॥

एके दिवसी राजसुत । गेला पारधीसी अरण्यात ।
तेथे नसती मनुष्यमात्र । उदकवर्जित स्थळांसी ॥५३॥

राजकुमार तृषाक्रांत । हिंडतसे अरण्यात ।
संगे होत शबरसुत । श्रमले बहुत अवधारा ॥५४॥

तेथे एक शबरसुत । हिंडत होता वनात ।
देखता झाला अवचित । जीर्ण एक शिवालय ॥५५॥

भिन्नलिंग तया स्थानी । पडिले होते मेदिनी ।
शबरे घेतले उचलोनि । म्हणे लिंग बरवे असे ॥५६॥

हाती घेवोनि लिंगासी । पहात होता शबर हर्षी ।
राजसुत तया संधीसी । आला तया जवळिक ॥५७॥

राजकुमार म्हणे तयासी । भिन्न लिंग काय करिसी ।
पडिली असती भुमीसी । लिंगाकार अनेक ॥५८॥

शबर म्हणे राजसुताते । माझ्या मनी ऐसे येते ।
लिंगपूजा करावयाते । म्हणोन घेतले परियेसा ॥५९॥

ऐकोनि तयाचे वचन । राजपुत्र सुहास्यवदन ।
म्हणे पूजी एकमने । लिंग बरवे असे सत्य ॥६०॥

ऐसे म्हणता राजकुमार । तयासी करी नमस्कार ।
कोण विधि पूजाप्रकार । निरोपावे म्हणतसे ॥६१॥

तुवा व्हावे माते गुरु । मी तव असे शबरु ।
नेणे पूजेचा प्रकारु । विस्तारावे म्हणतसे ॥६२॥

राजपुत्रे म्हणे तयासी । न्यावा पाषाण घरासी ।
पूजा करावी भक्तीसी । पत्रपुष्पे अर्चोनिया ॥६३॥

दंपत्ये दोघेजण । पूजा करणे मने पूर्ण ।
हेचि लिंग गिरिजारमण । म्हणोनि मनी निर्धारी पा ॥६४॥

नानापरी पुष्पजाती । आणाव्या तुवा शिवाप्रती ।
धूप दीप नैवेद्य आरती । नैवेद्यासी भस्म जाण ॥६५॥

भस्म असेल जे स्मशानी । आणावे तुवा प्रतिदिनी ।
द्यावा नैवेद्य सुमनी । प्रसाद आपण भक्षावा ॥६६॥

आणिक जे जे जेवी आपण । तोही द्यावा नैवेद्य जाण ।
ऐसे आहे पूजाविधान । म्हणोनि सांगे राजकुमारु ॥६७॥

येणेपरी राजकुमारु । तया शबरा झाला गुरु ।
विश्वासे केला निर्धारु । शबरे आपुले मनात ॥६८॥

संतोषोनि शबर देखा । नेले लिंग गृहांतिका ।
स्त्रियेसी सांगे कौतुका । म्हणे लिंग प्रसन्न झाले ॥६९॥

गुरुनिरोप जेणे रीती । पूजा करीन एकचित्ती ।
चिताभस्म अतिप्रीती । आणोनि नैवेद्या देतसे ॥७०॥

क्वचित्काळ येणेपरी । पूजा करी शबरशबरी ।
एके दिवशी तया नगरी । चिताभस्म न मिळेचि ॥७१॥

हिंडोनि पाहे गावोगावी । चिताभस्म न मिळे काही ।
येणेपरी सात गावी । हिंडोनि आला घरासी ॥७२॥

चिंता लागली शबरासी । पुसता झाला स्त्रियेसी ।
काय करू म्हणे तिसी । प्राण आपुला त्यजीन म्हणे ॥७३॥

पूजा राहिली लिंगासी । भस्म न मिळे नैवेद्यासी ।
हिंडोनि आलो दाही दिशी । चिताभस्म न मिळेचि ॥७४॥

जैसे गुरूंनी आज्ञापिले । त्या विधीने पाहिजे अर्चिले ।
नाही तरी वृथा गेले । शिवपूजन परियेसा ॥७५॥

गुरूचे वाक्य जो न करी । तो पडेल रौरवघोरी ।
तयाते पाप नाही दूरी । सदा दरिद्री होय नर ॥७६॥

त्यासी होय अधोगति । अखंड नरकी तया वस्ती ।
जो करी गुरूची भक्ति । तोचि तरेल भवार्णवी ॥७७॥

सकळ शास्त्रे येणेपरी । बोलताती वेद चारी ।
याचि कारणे ऐक हो शबरी । प्राण आपुला त्यजीन ॥७८॥

ऐकोनि पतीचे वचन । बोले शबरी हासोन ।
चिंता करिता किंकारण । चिताभस्म देईन मी ॥७९॥

मज घालोनि गृहांत । अग्नि लावा तुम्ही त्वरित ।
काष्ठे असती बहुत । दहन करा आपणासी ॥८०॥

तेचि भस्म ईश्वरासी । उपहारावे तुम्ही हर्षी ।
व्रतभंग न करावा भरवसी । संतोषरूपे बोलतसे ॥८१॥

कधी तरी शरीरासी । नाश असे परियेसी ।
ऐसे कार्यकारणासी । देह आपुला समर्पीन ॥८२॥

ऐकोनि स्त्रियेचे वचन । शबर झाला मनी खिन्न ।
प्राणेश्वरी तुझा प्राण । केवी घ्यावा म्हणतसे ॥८३॥

रूपे दिससी रतीसरसी । अद्यापि तू पुर्ववयासी ।
पुत्रअपत्य न देखिलेसी । या संसारासी येउनी ॥८४॥

मन नाही तुझे धाले । संसारसुख नाही देखिले ।
तुझे मातापित्याने मज निरविले । प्राणप्रिया रक्ष म्हणोनि ॥८५॥

चंद्रसूर्यसाक्षीसी । तुज वरिले म्या संतोषी ।
प्राण रक्षीन म्हणोनी हर्षी । घेवोनि आलो मंदिरात ॥८६॥

आता दहन करिता तूते । घडती पापे असंख्याते ।
स्त्रीहत्या महादोषाते। केवी करू म्हणतसे ॥८७॥

तू माझी प्राणेश्वरी । तूते मारू कवणेपरी ।
कैसा तुष्टेल त्रिपुरारि । पुण्य जावोनि पाप घडे ॥८८॥

दुःखे तुझी मातापिता । माते म्हणती स्त्रीघाता ।
अजूनि तुझी लावण्यता । दिसतसे प्राणप्रिये ॥८९॥

नाना व्रते नाना भक्ति । या शरीरालागी करिती ।
दहन करू कवणे रीती । पापे माते घडतील ॥९०॥

ऐकोनि पतीचे वचन । विनवीतसे सती आपण ।
कैसे असे तुम्हा अज्ञान । मिथ्या बोल बोलतसा ॥९१॥

शरीर म्हणे स्वप्नापरी । जैसा फेण गंगेवरी ।
स्थिर न राहे क्षणभरी । मरणे सत्य परियेसा ॥९२॥

आमुचे मायबापे जाण । तुम्हा दिधले माते दान ।
तुमची अर्धांगी मी पूर्ण । भिन्नभावना कोठे दिसे ॥९३॥

मी म्हणजे तुमचा देहे । विचार करोनि मनी पाहे ।
आपुले अर्ध शरीर आहे । काय दोष दहन करिता ॥९४॥

जे जे उपजे भूमीवरी । ते ते नाश पावे निर्धारी ।
माझे देहसाफल्य करी । ईश्वराप्रती पावेल ॥९५॥

संदेह सोडोनि आपणासी । दहन करी वो वेगेसी ।
आपण होवोनि संतोषी । निरोप देते परियेसा ॥९६॥

नानापरी पतीसी । बोधी शबरी परियेसी ।
घरात जावोनि पतीसी । म्हणे अग्नि लावी आता ॥९७॥

संतोषोनि तो शबर । बांधिता झाला गृहाचे द्वार ।
अग्नि लाविता थोर । ज्वाळा व्यापिती गगनासी ॥९८॥

दहन झाले शबरीसी । भस्म घेतले परियेसी ।
पूजा करोनि शिवासी । नैवेद्य दिधला अवधारा ॥९९॥

पूजा करिता ईश्वरासी । आनंद झाला बहुवसी ।
स्त्री दिधली हुताशी । स्मरण ऐसे त्यास नाही ॥१००॥

ऐसी भक्तिभावेसी । पूजा केली महेश्वरासी ।
प्रसाद घेवोनि हस्तेसी । पाचारिले स्त्रियेते ॥१॥

जैसी पूजा नित्य करोन । प्रसाद हाती घेऊन ।
आपुले स्त्रियेते बोलावून । देत असे तो शबर ॥२॥

तया दिवसी त्याचपरी । आपल्या स्त्रियेते पाचारी ।
कृपासागरी त्रिपुरारि । प्रसन्न झाला परियेसा ॥३॥

तेचि शबरी येवोनि । उभी ठेली सुहास्यवदनी ।
घेतला प्रसाद मागोनि । घेवोनि गेली घरात ॥४॥

जैसे तैसेचि घर दिसे । शबर विस्मय करीतसे ।
म्हणे दग्ध केले स्त्रियेसरिसे । घर कैसे दिसताहे ॥५॥

बोलावोनि स्त्रियेसी । शबर पुसतसे तियेसी ।
दहन केले मी तुजसी । पुनरपि कैसी आलीस ॥६॥

शबरी सांगे पतीसी । आपणास आठवण आहे ऐसी ।
अग्नि लाविता घरासी । निद्रिस्थ झाल्ये परियेसा ॥७॥

महाशीते पीडित । आपण होत्ये निद्रिस्थ ।
तुमचे बोल ऐकोन सत्य । उठोनि आल्ये परिय्सा ॥८॥

हे होईल देवकरणी । प्रसन्न झाला शूलपाणि ।
ऐसे म्हणता तत्क्षणी । निजस्वरूपी उभा ठाकला ॥९॥

नमन करिती लोटांगणी । धावोनि लागती दोघे चरणी ।
प्रसन्न झाला शूलपाणि । मागा वर म्हणतसे ॥११०॥

होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी ।
गति होईल त्यानंतरी । कल्पकोटि स्वर्गवास ॥११॥

येणेपरी ऋषीश्वरांसी । सूत सांगे विस्तारेसी ।
गुरुचरणी विश्वास असे ज्यासी । तैसे फळ होय जाणा ॥१२॥

म्हणोनि श्रीगुरु शिष्यासी । सांगते झाले परियेसी ।
विश्वासे करोनि द्विज हर्षी । शुष्क काष्ठ सेवितसे ॥१३॥

जैसा भाव तैसी सिद्धि । होईल सत्य हे त्रिशुद्धि ।
श्रीगुरुनाथ कृपानिधि । सहज निघाले संगमासी ॥१४॥

जावोनि करिती अनुष्ठान । पहावया येती ते ब्राह्मण ।
देखोनि त्याचे अंतःकरण । प्रसन्न झाले तत्क्षणी ॥१५॥

होता कमंडलु करकमळी । भरला सदा गंगाजळी ।
उचलोनिया हस्तकमळी । घालिती उदक काष्ठासी ॥१६॥

तेचि क्षणी काष्ठासी । पल्लव आले परियेसी ।
औंदुबर वृक्ष जनासी । दिसतसे समस्ता ॥१७॥

जैसा चिंतामणिस्पर्श । सुवर्ण करी लोहास ।
तैसा श्रीगुरु सुधारस । काष्ठ झाला औदुंबर ॥१८॥

काष्ठ दिसे औदुंबर । सुदेही झाला तो विप्र ।
दिसे सुवर्णकांति नर । गेले कुष्ठ तात्काळी ॥१९॥

संतोषोनि द्विजवर । करी साष्टांग नमस्कार ।
करिता झाला महास्तोत्र । श्रीगुरूचे तये वेळी ॥१२०॥

श्लोक ॥ इंदुकोटितेज-करुणासिंधु-भक्तवत्सलम् ।
नंदनात्रिसूनुदत्त, इंदिराक्ष-श्रीगुरुम् ।
गंधमाल्यअक्षतादिवृंददेववंदितम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२१॥

मोहपाशअंधकारछायदूरभास्करम् ।
आयताक्ष, पाहि श्रियावल्लभेशनायकम् ।
सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२२॥

चित्तजादिवर्गषट्‍कमत्तवारणांकुशम् ।
तत्त्वसारशोभितात्मदत्त-श्रियावल्लभम् ।
उत्तमावतार-भूतकर्तृ-भक्तवत्सलम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२३॥

व्योमवायुतेज-आपभूमिकर्तृमीश्वरम् ।
कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् ।
कामितार्थदातृभक्तकामधेनु-श्रीगुरुम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२४॥

पुंडरीक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् ।
चंडुदुरितखंडनार्थ – दंडधारि-श्रीगुरुम् ।
मंडलीकमौलि-मार्तंडभासिताननं ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२५॥

वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् ।
नादबिंदुकलातीत-कल्पपादसेव्ययम् ।
सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२६॥

अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्टज्ञानवारिधिम ।
कृष्णावेणितीरवासपंचनदीसंगमम् ।
कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२७॥

नारसिंहसरस्वती-नामअष्टमौक्तिकम् ।
हारकृत्यशारदेन गंगाधर आत्मजम् ।
धारणीकदेवदीक्षगुरुमूर्तितोषितम् ।
परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥२८॥

नारसिंहसरस्वतीय-अष्टकं च यः पठेत् ।
घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् ।
सारज्ञानदीर्घआयुरारोग्यादिसंपदम् ।
चारुवर्गकाम्यलाभ, वारंवारं यज्जपेत ॥२९॥

स्तोत्र केले येणेपरी । आणिक विनवी परोपरी ।
म्हणे देवा श्रीहरी । कृपा केली स्वामिया ॥१३०॥

म्हणोनि मागुती नमस्कारी । श्रीगुरुनाथ अभयकरी ।
उठविता झाला अवधारी । ज्ञानराशि म्हणोनिया ॥३१॥

समस्त लोक विस्मय करिती । श्रीगुरूते नमस्कारिती ।
नानापरी स्तोत्रे करिती । भक्तिभावेकरोनिया ॥३२॥

मग निघाले मठासी । समस्त शिष्यादि द्विजांसरसी ।
ग्रामलोक आनंदेसी । घेऊनि येती आरत्या ॥३३॥

जावोनि बैसती मठात । शिष्यांसहित श्रीगुरुनाथ ।
समाराधना असंख्यात । झाली ऐका ते दिनी ॥३४॥

तया विप्रा बोलावोनि । सद्गुरु म्हणती संतोषोनि ।
कन्यापुत्रगोधनी । तुझी संतति वाढेल ॥३५॥

तुझे नाम योगेश्वर । आम्ही ठेविले निर्धार ।
समस्त शिष्यांमाजी थोर । तूचि आमुचा भक्त जाण ॥३६॥

वेदशास्त्री संपन्न । तुझ्या वंशोवंशी जाण ।
होतील पुरुष निर्माण । म्हणोनि देती निरोप ॥३७॥

श्रीगुरु म्हणती तयासी । जावोनि आणि कलत्रासी ।
तुम्ही रहावे आम्हापासी । येचि ग्रामी नांदत ॥३८॥

म्हणोनि तया द्विजासी । श्रीगुरु मंत्र उपदेशी ।
विद्यासरस्वती या मंत्रासी । उपदेशिले परियेसा ॥३९॥

तूते होतील तिघे सुत । एकाचे नाव योगी विख्यात ।
आमुची सेवा करील बहुत । वंशोवंशी माझे दास ॥१४०॥

जैसे श्रीगुरूंनी निरोपिले । तयापरी त्यासी झाले ।
म्हणोनि सिद्धे सांगितले । नामधारकशिष्यासी ॥४१॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।
उतरावया पैल पार । कथा ऐका एकचित्ते ॥४२॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । कुष्ठी उद्धरिला भक्त ।
गुरुमहिमा अत्यद्‍भुत । प्रकट झाला येणेपरी ॥१४३॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शुष्ककाष्ठसंजीवन नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४०॥

॥ओवीसंख्या ॥१४३॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥





गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा ।
कर जोडुनी कौतुका । नमन करी साष्‍टांगीं ॥१ ॥

जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी ।
नाना धर्म विस्तारोनि । गुरुचरित्र निरोपिलें ॥२॥

तेणें धन्य झालों आपण । प्रकाश केलें महाज्ञान ।
सुधारस गुरुस्मरण । प्राशविला दातारा ॥३॥

एक असे माझी विनंती । निरोपावें मजप्रती ।
आमुच्या पूर्वजें कवणें रीतीं । सेवा केली श्रीगुरुची ॥४॥

तुम्ही सिद्ध महाज्ञानी । होतां श्रीगुरुसन्निधानीं ।
शिष्य झाले कवणे गुणीं । निरोपावें दातारा ॥५॥

ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्ध सांगे विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥६॥

पूर्वीं कथानक सांगितलें । जे कां श्रीगुरुशीं भेटले ।
वोसरग्रामीं एक होते भले । पूर्वज तुमचे परियेसा ॥७॥

तयाचें नाम सायंदेव । केली पूजा भक्तिभाव ।
त्यावरी प्रीति अतिस्नेह । आमुचे श्रीगुरुमूर्तीचा ॥८॥

तेथून आले दक्षिणदिशीं । गाणगापुरीं परियेसीं ।
ख्याति झाली दश दिशीं । कीर्ति वाढली बहुवस ॥९॥

ऐकोनि येती सकळ जन । करिती श्रीगुरुदर्शन ।
जें मनीं करिती चिंतन । पूर्ण होय तयांचें ॥१०॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते गाणगापुरा वस्ती ।
नाम श्रीनृसिंहसरस्वती । भक्तवत्सल निर्धारीं ॥११॥

तुमचा पूर्वज जो का होता । सायंदेव भक्त विख्याता ।
त्याणें ऐकिलें वृत्तान्ता । महिमा श्रीगुरु यतीचा ॥१२॥

भक्तिपूर्वक वेगेंसी । आला गाणगापुरासी ।
आनंद बहु मानसीं । हर्षे निर्भर होउनी ॥१३॥

दुरुनि देखिलें गाणगाभुवन । आपण घाली लोटांगण ।
करी दंडप्राय नमन । ऐशापरी चालिला ॥१४॥

ऐसा दंडप्रणाम करीत । गेला विप्र मठांत ।
देखिले तेथें मूर्तिमंत । परात्पर श्रीगुरु ॥१५॥

साष्‍टांग नमस्कार करीत । असे चरणावरी लोळत ।
केशेंकरुन पाय झाडीत । भक्तिभावें करोनिया ॥१६॥

करसंपुट जोडोनि । स्तुति करी एकाग्र मनीं ।
त्रैमूर्ति तूंचि ज्ञानीं । गुरुमूर्ति स्वामिया ॥१७॥

धन्य धन्य जन्म आपुलें । कृतार्थ पितर माझे झाले ।
कोटि जन्मांचें पाप गेलें । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥

जय जयाजी श्रीगुरुमूर्ति । त्राहि त्राहि विश्वपती ।
परमात्मा परंज्योती । नृसिंहसरस्वती स्वामिया ॥१९॥

तुझे चरण वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
परमात्मा तूंचि होसी । भक्तवत्सला स्वामिया ॥२०॥

तुमचे चरणाचिये प्रौढी । वसती तेथें तीर्थें कोडी ।
वर्णिती श्रुति घडोघडी । चरणं पवित्रं विततं पुराणं ॥२१॥

त्रैमुर्तींचा अवतार । मज दिससी साक्षात्कार ।
भासतसे निरंतर । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥२२॥

परब्रह्म तुम्ही केवळू । हातीं दंड कमंडलू ।
अमृत भरलें सोज्ज्वळू । प्रोक्षितां प्रेत उठतसे ॥२३॥

दंड धरिला या कारणें । शरणांगतातें रक्षणें ।
दुरितदैन्य निवारणें । निज भक्त रक्षावया ॥२४॥

रुद्राक्षमाळा भस्मधारण । व्याघ्रचर्माचें आसन ।
अमृतदृष्‍टि इंदुनयन । क्रूरदृष्‍टीं अग्निसूर्य ॥२५॥

चतुर्विध पुरुषार्थासी । भक्तजना तूंचि होसी ।
तूंचि रुद्र सत्य होसी । तूं नृसिंह जगद्‌गुरु ॥२६॥

विष्णुरुपें करिसी रक्षण । पीतांबर पांघरुण ।
तीर्थ समस्त तुझे चरण । भक्ताभिमानी विष्णु तूंचि ॥२७॥

वांझे कन्या पुत्र देसी । शुष्‍क काष्‍ठ आणिलें पल्लवासी ।
दुभविली वांझ महिषीसी । अन्न पुरविलें ब्राह्मणा ॥२८॥

विष्णुमूर्ति तूंचि जाण । त्रिविक्रमभारती ऐसी खूण ।
साक्ष दिधली अंतःकरण । विश्वरुप दाखविलें ॥२९॥

म्हणविले वेद पतिताकरवीं । अपार महिमा झाला पूर्वीं ।
नरहरिअवतार मूर्ति बरवी । आलेति भक्त तारावया ॥३०॥

ऐसी नानापरी स्तुति करीत । पुनः पुनः नमन करीत ।
सद्‌गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठले ॥३१॥

आनंदाश्रुलोचनीं । निघती संतोषें बहु मनीं ।
नव विधा भक्ति करोनि । स्तुति केली श्रीगुरुची ॥३२॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आश्वासिती ।
माथां हस्त ठेवोनि म्हणती । परम भक्त तूंचि आम्हां ॥३३॥

तुवा जें कां स्तोत्र केलें । तेणें माझें मन धालें ।
तुज वरदान दिधलें । वंशोवंशीं माझा दास ॥३४॥

ऐसा वर देउनी । गुरुमूर्ति संतोषोनि ।
मस्तकीं हस्त ठेवोनि । म्हणती जाय संगमासी ॥३५॥

स्नान करुन संगमासी । पूजा करीं अश्वत्थासी ।
त्वरित यावें मठासी । पंक्तीस भोजन करीं गा ॥३६॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
गुरुनिरोप जेणें रीतीं । आला स्नान करोनिया ॥३७॥

षोडशोपचारें श्रीगुरुसी । पूजा करी भक्तींसी ।
अनेक परी पक्वान्नेंसी । भिक्षा करवी परियेसा ॥३८॥

भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आपुले पंक्ति ।
समस्त शिष्यांहुनी प्रीती । ठाव देती आपलेजवळी ॥३९॥

भोजन झालें श्रीगुरुसी । शिष्यांसहित विप्रांसी ।
संतोषोनि आनंदेंसी । बैसले होते मठांत ॥४०॥

तया सायंदेवविप्रासी । श्रीगुरु पुसती प्रीतींसी ।
तुझें स्थान कोणे देशीं । कलत्र पुत्र कोठें असती ॥४१॥

पुसती क्षेमसमाधान । कैसें तुमचें वर्तन ।
कृपा असे परिपूर्ण । म्हणोनि पुसती संतोषें ॥४२॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे सायंदेव विस्तारोन ।
कन्या पुत्र बंधुजन । समस्त क्षेम असती स्वामिया ॥४३॥

उत्तरकांची म्हणोनि ग्रामीं । तेथें वसोनि आम्ही ।
तुझ्या कृपें समस्त क्षेमी । असों देवा कृपासिंधु ॥४४॥

पुत्रवर्ग बंधु जाणा । करिती संसारयातना ।
आपुले मनींची वासना । करीन सेवा श्रीगुरुची ॥४५॥

करुनि सेवा श्रीगुरुची । असेन स्वामी परियेसीं ।
ऐसा माझे मानसीं । निर्धार असे देवराया ॥४६॥

ऐकोन तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती हासोन ।
आमुची सेवा असे कठिण । आम्हां वास बहुतां ठायीं ॥४७॥

एके समयीं अरण्यांत । अथवा राहूं गांवांत ।
आम्हांसवें कष्‍ट बहुत । तुम्ही केवी साहूं शका ॥४८॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोपिती ।
ऐकोन विनवी मागुती । म्हणे स्वामी अंगिकारा ॥४९॥

गुरुची सेवा करी नरू । तोचि उतरे पैल पारु ।
तयासी कैसें दुःख अघोरु । सदा सुखी तोचि होय ॥५०॥

चतुर्विध पुरुषार्थ । देऊं शके श्रीगुरुनाथ ।
त्यासी नाहीं यमपंथ । गुरुभक्ति मुख्य कारण ॥५१॥

येणेंपरी श्रीगुरुसी । सायंदेव भक्तींसी ।
विनवीतसे परियेसीं । संतोषी झाले श्रीगुरुमूर्ति ॥५२॥

श्रीगुरु तया विप्रा म्हणती । जैसें असे तुझे चित्तीं ।
दृढ असेल मनीं भक्ति । तरीच करीं अंगीकार ॥५३॥

स्थिर करोनि अंतःकरण । करितां सेवा-गुरुचरण ।
झाले मास तीन जाण । ऐक शिष्या नामकरणी ॥५४॥

वर्ततां ऐसें एके दिवशीं । श्रीगुरु निघाले संगमासी ।
सवें घेतलें सायंदेवासी । समस्तांतें वारुनी ॥५५॥

भक्ताचें अंतःकरण । पहावया गेले श्रीगुरु आपण ।
पूर्वज तुमचा भोळा जाण । जात असे संगमासी ॥५६॥

भक्तासहित संगमासी । गेले श्रीगुरु समयीं निशी ।
बैसते झाले अश्वत्थासी । सुखें गोष्‍टी करिताती ॥५७॥

दिवस गेला अस्तमानीं । श्रीगुरु विचार करिती मनीं ।
दृढ याचे अंतःकरणीं । कैसी करणी पाहूं म्हणती ॥५८॥

उठविती वारा अवचित । तेणें वृक्ष पडों पाहत ।
पर्जन्य झाला बहुत । मुसळधारा वर्षतसे ॥५९॥

सायंदेव होता जवळी । सेवा केली तये वेळीं ।
केला आश्रय वृक्षातळीं । वस्‍त्रेंकरुनि श्रीगुरुसी ॥६०॥

पर्जन्य वारा समस्त देखा । साहिले आपण भावें ऐका ।
उभा राहोनि संमुखा । सेवा करी एकभावें ॥६१॥

येणेंपरी याम दोन । पर्जन्य आला महा क्षोभोन ।
आणिक वारा उठोन । वाजे शीत अत्यंत ॥६२॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । शीत झालें बहुवसी ।
तुवां जाउनी मठासी । अग्नि आणावा शेकावया ॥६३॥

गुरुनिरोंपें तत्क्षणीं । ऐक्यभाव धरोनि मनीं ।
निघाला विप्र महाज्ञानी । आणावया वैश्वानर ॥६४॥

निघाला शिष्य देखोनि । श्रीगुरु म्हणती हासोनि ।
नको पाहूं आपुले नयनीं । उभयपार्श्वभागातें ॥६५॥

गुरुनिरोपें येणेंपरी । निघता झाला झडकरी ।
न दिसे वाट अंधकारीं । खुणें खुणें जात असे ॥६६॥

अंधकार महाघोर । पाऊस पडे धुरंधर ।
न दिसे वाटेचा प्रकार । जात असें भक्तिपूर्वक ॥६७॥

मनीं ध्याय श्रीगुरुसी । जातसे तैसा मार्गेसी ।
लवतां वीज संधीसी । तेणें तेजें जातसे ॥६८॥

येणेंपरी द्विजवर । पावला त्वरित गाणगापुर ।
वेशीपाशीं जाऊनि सत्वर । हाक मारिली द्वारपाळा ॥६९॥

तयासी सांगे वृत्तान्त । आणोनि दिधला अग्नि त्वरित ।
घालूनिया भांडयांत । घेवोनि गेला परियेसा ॥७०॥

नसे मार्ग अंधकार । विजेचे तेजें जातसे नर ।
मनीं करितसे विचार । श्रीगुरुंनीं मातें निरोपिलें ॥७१॥

दोहींकडे न पाहें निगुती । श्रीगुरु मातें निरोपिती ।
याची कैसी आहे स्थिति । म्हणोनि पाहे तये वेळीं ॥७२॥

आपुले दक्षिणदिशेसी । पाहतां देखे सर्पासी ।
भिऊनि पळतां उत्तरेसी । अद्‌भुत दिसे महानाग ॥७३॥

पांच फणी दिसती दोनी । सवेंचि येताती धावोनि ।
विप्र भ्याला आपुले मनीं । धावत जातसे भिऊनिया ॥७४॥

वाट सोडुनी जाय रानीं । सवेंचि येताति सर्प दोनी ।
जातां भयभीत होउनी । अति शीघ्र धावतसे ॥७५॥

स्मरतां झाला श्रीगुरुसी । एकभावें धैर्येंसी ।
जातां विप्र परियेसीं । पातला संगमाजवळीक ॥७६॥

दुरुनि देखे श्रीगुरुसी । सहस्त्रदीपज्योतीसरसी ।
दिसती विप्र बहुवसी । वेदध्वनि ऐकतसे ॥७७॥

जवळी जातां द्विजवरु । एकला दिसे श्रीगुरु ।
गेला समस्त अंधकारु । दिसे चंद्र पौर्णिमेचा ॥७८॥

प्रज्वलित केलें अग्नीसी । उजेड झाला बहुवसी ।
झाला विप्र सावधेसी । पाहतसे श्रीगुरुतें ॥७९॥

दोनी सर्प येवोनि । श्रीगुरुतें वंदोनि ।
सवेंचि गेले निघोनि । तंव हा पूर्वींच भ्यालासे ॥८०॥

श्रीगुरु पुसती तयासी । कां गा भयभीत झालासी ।
आम्हीं तूंतें रक्षावयासी । सर्प दोन पाठविले ॥८१॥

न धरीं आतां भय कांहीं । आमुची सेवा कठीण पाहीं ।
विचार करुनि आपुल्या देहीं । अंगिकारीं मुनिसेवा ॥८२॥

गुरुभक्ति असे कठिण । दृढभक्तीनें सेवा करणें ।
कळिकाळाचें नाहीं भेणें । तया शिष्या परियेसा ॥८३॥

सायंदेव तये वेळीं । लागतसे श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणाबहाळी । कृपा करीं म्हणोनिया ॥८४॥

गुरुभक्तीचा प्रकारु । निरोपावा मातें श्रीगुरु ।
जेणें माझें मन स्थिरु । होवोनि राहे तुम्हांजवळी ॥८५॥

श्रीगुरु म्हणती विप्रासी । सांगे कथा सुरसी ।
न गमे वेळ रात्रीसी । ब्राह्म मुहूर्त होय तंव ॥८६॥

पूर्वीं कैलासशिखरासी । बैसला होता व्योमकेशी ।
अर्धांगी पार्वतीसी । कथा एकान्तीं सांगतसे ॥८७॥

गिरिजा पुसे ईश्वरासी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी ।
विस्तारोनि आम्हांसी । सांगा म्हणे तये वेळीं ॥८८॥

शिव सांगे गिरिजेसी । सर्व साध्य गुरुभक्तीसी ।
करावें एकभावेंसी । शिव जो तोचि गुरु होय ॥८९॥

याचें एक आख्यान । सांगेन तुज विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक गिरिजे म्हणतसे ॥९०॥

गुरुभक्ति म्हणिजे सुलभपण । तात्काळ साध्य होय जाण ।
अनेक तप अनुष्‍ठान । करितां विलंब परियेसीं ॥९१॥

नाना तपें अनुष्‍ठानें । करिती यज्ञ महाज्ञानें ।
त्यांतें होती महाविघ्नें । साध्य होतां दुर्लभ ॥९२॥

जो गुरुभक्ति करी निर्मळ । साध्य होईल तात्काळ ।
यज्ञदान तपफळ । सर्व सिद्धि त्यासी होती ॥९३॥

सुलभ असे अप्रयास । जो जाणे गुरुकुलवास ।
एकभावें धरोनि कांस । आराधावें श्रीगुरुसी ॥९४॥

याचा एक दृष्‍टान्त । सांगेन ऐका एकचित्त ।
ब्रह्मयाचा अवतार व्यक्त । त्वष्‍टाब्रह्मा परियेसा ॥९५॥

तयासी झाला एक कुमर । अतिलावण्य सुंदर ।
सर्वधर्मकुशल धीर । योग्य झाला उपनयना ॥९६॥

त्वष्‍टाब्रह्मा पुत्रासी । व्रतबंध करी परियेसीं ।
करावया विद्याभ्यासासी । गुरुचे घरीं निरविला ॥९७॥

गुरुची सेवा नानापरी । करीतसे ब्रह्मचारी ।
वर्ततां ऐशियापरी । अपूर्व एक वर्तलें ॥९८॥

वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला पर्जन्य बहुवशी ।
पर्णशाळा परियेसीं । गळतसे गुरुची ॥९९॥

तये वेळीं शिष्यासी । निरोपिती गुरु त्यासी ।
त्वरित करावें आम्हांसी । एक गृह दृढ ऐसें ॥१००॥

पर्णशाळा पतिवर्षीं । जीर्ण होतसे परियेसीं ।
गृह करावें दृढतेंसी । कधीं जीर्ण नोहे ऐसें ॥१॥

न तुटे कधीं राहे स्थिर । दिसावें रम्य मनोहर ।
असावें सर्व परिकर । करीं शीघ्र ऐसें गृह ॥२॥

ऐसें गुरु निरोपिती । तेच समयीं गुरुची सती ।
सांगतसे अतिप्रीतीं । मातें कुंचकी आणावी ॥३॥

नसावी विणली अथवा शिवली । विचित्र रंगीत पाहिजे केली ।
माझ्या अंगप्रमाण वहिली । त्वरित आणीं म्हणतसे ॥४॥

गुरुपुत्र म्हणे शिष्यासी । मागेन तें आणीं वेगेंसी ।
पादुका पाहिजेत आम्हांसी । उदकावरुनि चालती ऐशा ॥५॥

अथवा चिखल न लागे त्यांसी । न व्हाव्या अधिक पायांसी ।
जेथें चिंतू मानसीं । तेथें घेऊनि जाती ऐशा ॥६॥

इतुकिया अवसरीं । गुरुकन्या काय करी ।
जातां तयाचा पल्लव धरी । आपणा कांहीं आणावें ॥७॥

उंच तानवडें आपणासी । घेऊनि यावें परियेसीं ।
आणिक आणा खेळावयासी । घरकुल एक आपणा ॥८॥

कुंजराचें दांतें बरवें । घरकुल तुवां आणावें ।
एकस्तंभी असावें । कधीं न तुटे न होय जीर्ण ॥९॥

जेथें नेईन तेथें यावें । सोपस्कारासहित आणावें ।
पाट ठाणवीं असावें । तया घराभीतरीं ॥११०॥

सदा दिसावें नूतन । वावरत असावें आपें आपण ।
करावया पाक निष्पन्न । मडकीं करुनि आणीं पां ॥११॥

आणिक एक सांगेन तुज । रांधप करावया शिकवी मज ।
पाक केलिया उष्ण सहज । असों नयें अन्न आणा ॥१२॥

पाक करिता मडकियेसी । न लागे काजळ परियेसीं ।
आणोनि दे गा भांडीं ऐसीं । आणिक सर्व सोपस्कार ॥१३॥

गुरुकन्या ऐसें म्हणे । अंगिकारिलें शिष्यराणें ।
निघता झाला तत्क्षणें । महा अरण्यांत प्रवेशला ॥१४॥

मनीं चिंता बहु करी । आपण बाळ ब्रह्मचारी ।
काय जाणें त्यांचे परी । केवी करुं म्हणतसे ॥१५॥

पत्रावळी करुं नेणें । इतुकें मातें कधीं होणें ।
स्मरतसे एकाग्र मनें । श्रीगुरुचरण देखा ॥१६॥

म्हणे आतां काय करुं । मातें कोण आधारु ।
बोल ठेवील माझा गुरु । शीघ्र इतुकें न करितां ॥१७॥

कवणापासीं जाऊं शरण । कवण राखील माझा प्राण ।
कृपानिधि गुरुविण । ऐसा कवण असे दुजा ॥१८॥

जरी नायकें गुरुचा बोल । शाप देईल तात्काळ ।
ब्रह्मचारी आपण बाळ । म्हणोनि अंगिकार कां केला ॥१९॥

काय गति आपणासी । आतां जाऊं कवणापासीं ।
अशक्‍त बाळ मी अज्ञानेसी । अंगिकार कां केला ॥१२०॥

गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण ।
वेंचीन आतां आपुला प्राण । गुरुनिरोप करीन मी ॥२१॥

ऐसें महा अरण्यांत । जातसे बाळ चिंता करीत ।
श्रमोनिया अत्यंत । निर्वाणमनें जातसे ॥२२॥

पुढें जातां मार्ग क्रमित । भेटला एक अवधूत ।
तेणें बाळ देखिला तेथ । पुसता झाला तये वेळीं ॥२३॥

कवण बाळा कोठें जासी । चिंताव्याकुळ मानसीं ।
विस्तारोनि आम्हांसी । सांग म्हणे तये वेळीं ॥२४॥

ऐसें म्हणतां ब्रह्मचारी । जाऊनिया नमस्कारी ।
म्हणे स्वामी तारीं तारीं । चिंतासागरीं बुडतसें ॥२५॥

भेटलासि तूं निधानु । जैसी वत्सालागीं धेनु ।
दुःखी झालों होतों आपणु । देखतां मन निवालें ॥२६॥

जैसे चकोरपक्षियातें । चांदणें देखतां मन हर्षतें ।
तैसें तुझ्या दर्शनमात्रें । आनंद झाला स्वामिया ॥२७॥

माझें पूर्वार्जित पुण्य । कांहीं होतें म्हणोन ।
तुम्ही भेटलेंती निधान । कृपासिंधु परमपुरुषा ॥२८॥

सांगा आपुलें नाम कवण । आगमन झालें कोठून ।
पहा हें निर्मनुष्य अरण्य । येथें तुम्ही भेटलेती ॥२९॥

व्हाल तुम्ही ईश्वरु । मातें कृपा केली गुरु ।
तुम्हां देखता मनोहरु । अंतःकरण स्थिर झालें ॥१३०॥

कीं होसील कृपाळू । सत्त्वप्रिय भक्तवत्सलू ।
मी दास तुझा करीं सांभाळू । म्हणोनि चरणीं लागला ॥३१॥

नमितां तया बाळकासी । उठवीतसे तापसी ।
आलिंगोनि महाहर्षी । आश्वासीतसे तये वेळीं ॥३२॥

मग पुशिला वृत्तान्त । बाळ सांगे समस्त ।
गुरुंनीं जी जी मागितली वस्त । कवणेंपरी साध्य होय ॥३३॥

आपण बाळ ब्रह्मचारी । न होय कार्य तें अंगिकारीं ।
आतां पडिलों चिंतासागरीं । तारीं स्वामी म्हणतसे ॥३४॥

मग अभय देऊनि अवधूत । तया बाळातें म्हणत ।
सांगेन तुज एक हित । जेणें तुझें कार्य साधे ॥३५॥

विश्वेश्वर आराधन । असे एक निधान ।
काशीपूर महास्थान । सकळाभीष्‍टें साधती ॥३६॥

पंचक्रोश असे क्षिति । तया आगळी विख्याति ।
विष्णुमुख्य ऋषि प्रजापति । तेथें वर लाधले ॥३७॥

ब्रह्मा सृष्‍टि रचावयासी । वर लाधला त्या स्थळासी ।
वर दिधला विष्णूसी । समस्त सृष्‍टि पाळावया ॥३८॥

काशीपूर महास्थान । तुवां तेथें जातांचि जाण ।
होईल तुझी कामना पूर्ण । संदेह न धरीं मनांत ॥३९॥

तुवां जावें त्वरितेंसी । जें जें वसे तव मानसीं ।
समस्त विद्या लाधसी । विश्वकर्मा तूंचि जाण ॥१४०॥

चतुर्विध पुरुषार्थ । साध्य होतील त्वरित ।
यापरीस आणिक स्वार्थ । काय असे सांग मज ॥४१॥

तोचि देव असे दयाळ । विचित्र असे त्याचा खेळ ।
उपमन्यु म्हणोनि होता बाळ । तयातें दिधला क्षीरसिंधु ॥४२॥

नामें आनंदकानन । विख्यात असे महास्थान ।
समस्तांची कामना पूर्ण । तये ठायीं होतसे ॥४३॥

नाम असे पुरी काशी । समस्त धर्मांची हे राशी ।
सकळ जीवजंतूंसी । मोक्षस्थान परियेसा ॥४४॥

जे वास करिती तये स्थानीं । त्यांतें देखताचि नयनीं ।
जाती दोष पळोनि । स्थानमहिमा काय सांगूं ॥४५॥

ऐसें काशीस्थान असतां । कां बा करिसी तूं चिंता ।
तेथील महिमा वर्णितां । अशक्य माझे जिव्हेसी ॥४६॥

तया काशीनगरांत । जे जन तीर्थे हिंडत ।
एकेक पाउलीं पुण्य बहुत । अश्वमेधफळ असे ॥४७॥

धर्म अर्थ काम मोक्ष । जी जी मनीं असे कांक्ष ।
जातांचि होईल प्रत्यक्ष । संदेह न धरीं मनांत ॥४८॥

ऐकोनिया ब्रह्मचारी । साष्‍टांगीं नमस्कारी ।
कोठें असे काशीपुरी । आपण असे अरण्यात ॥४९॥

आनंदकानन म्हणसी । स्वर्गीं असे कीं भूमीसी ।
अथवा जाऊं पाताळासी । कोठें असे सांगा मज ॥१५०॥

या संसारसागरासी । तूंचि तारक जगा होसी ।
ज्ञान मातें उपदेशीं । तारीं मातें स्वामिया ॥५१॥

ऐशिया काशीपुरासी । मातें कोण नेईल हर्षीं ।
विनवूं जरी तुम्हांसी । घेवोनि जावें म्हणोनिया ॥५२॥

कार्य असलिया तुम्हांसी । आम्हां कैसी बुद्धि देशी ।
मी बाळक तुम्हांसी । म्हणोनि चरणीं लागला ॥५३॥

ऐसें म्हणता तापसी । आपण नेईन म्हणे हर्षी ।
तुजकरितां आपणासी । यात्रालाभ घडे थोर ॥५४॥

यापरतें आम्हांसी । काय लाभ विशेषीं ।
वृथा जन्म मानवासी । काशीवास न करितां ॥५५॥

तुजकरितां आपणासी । दर्शन घडे पुरी काशी ।
चला जाऊं त्वरितेंसी । म्हणोनि दोघे निघाले ॥५६॥

मनोवेगें तात्काळीं । पातले विश्वेश्वराजवळीं ।
तापसी म्हणे तये वेळीं । बाळका यात्रा करीं आतां ॥५७॥

बाळ म्हणें तयासी । स्वामी मातें निरोप देसी ।
नेणें यात्रा आहे कैसी । कवणेंपरी रहाटावें ॥५८॥

आपण बाळ ब्रह्मचारी । नेणें तीर्थ कवणेंपरी ।
कवणें विधिपुरःसरीं । विस्तारोनि सांगा मज ॥५९॥

तापसी म्हणे तयासी । सांगेन यात्राविधीसी ।
तुंवा करावें भावेंसी । नेमें भक्तिपूर्वक ॥१६०॥

पहिलें मणिकर्णिकेसी । स्नान करणें नेमेंसी ।
जाऊनिया विनायकासी । पांचाळेश्वरा नमावें ॥६१॥

मग जावें महाद्वारा । विश्वेश्वरदर्शन करा ।
पुनरपि यावें गंगातीरा । मणिकर्णिकास्नान करावें ॥६२॥

मणिकर्णिकेचा ईश्वर । पूजूनिया निर्धार ।
जाऊनिया कंबळेश्वर । पूजा करीं गा भावेंसी ॥६३॥

पुढें ईश्वरवासुकीसी । पूजा करी भक्तींसी ।
पर्वतेश्वर पूजोनि हर्षी । गंगाकेशव पूजीं मग ॥६४॥

ललिता देवी पूजोनि । मग जावें तेथूनि ।
जरासंधेश्वर ध्यानीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥६५॥

सोमनाथ असे थोर पूजावा शूळटंकेश्वर ।
तयापुढें वाराहेश्वर । पूजा करीं गा ब्रह्मेश्वरी ॥६६॥

अगस्त्येश्वर कश्यपासी । पूजा करीं हरिहरेश्वरासी ।
वैजनाथ महाहर्षी । ध्रुवेश्वर पूजीं मग ॥६७॥

गोकर्णेश्वर असे थोर । पूजा करीं गा हाटकेश्वर ।
अस्थिक्षेप तटाकेश्वर । किंकरेश्वर पूजावा ॥६८॥

भारतभूतेश्वरासी । पूजा करीं गा भावेंसी ।
चित्रगुप्तेश्वरासी । चित्रघंट पूजावा ॥६९॥

पाशुपतेश्वर निका । पूजा करोनि तेथें बाळका ।
पितामह असे जो का । ईश्वरातें पूजावें ॥१७०॥

कल्लेश्वरातें वंदूनी । पुढें जावें एक मनीं ।
चंद्रेश्वरातें पूजोनि । पूजा करीं गा विश्वेश्वरा ॥७१॥

पुढें पूजीं विघ्नेश्वर । त्यानंतर अग्नीश्वर ।
मग पूजा नागेश्वर । हरिश्चंद्रेश्वर पूजीं जाण ॥७२॥

चिंतामणि विनायका । सोमनाथ विनायक देखा ।
पूजा करोनि ऐका । वसिष्‍ठ वामदेव पूजावा ॥७३॥

पुढें त्रिसंध्येश्वर । पूजीं लिंग असे थोर ।
विशालाक्ष मनोहर । धर्मेश्वर पूजावा ॥७४॥

विश्वबाहु पूजा निका । पुढें आशा-विनायका ।
वृद्धादित्य असे जो का । पूजा करीं वो मनोभावें ॥७५॥

चतुर्वक्रेश्वर असे थोर । लिंग असे मनोहर ।
पूजा करीं गा ब्रह्मेश्वर । अनुक्रमें करुनिया ॥७६॥

पुनः प्रकामेश्वर असे खूण । पुढें ईश्वरईशान ।
चंडी चंडेश्वरा जाण । पूजा करीं भक्तींसी ॥७७॥

पूजीं भवानीशंकर । धुंडिराज मनोहर ।
अर्ची राजराजेश्वर । लंगूलेश्वर पूजीं मग ॥७८॥

नकुलेश्वर पूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
परान्नपरद्रव्येश्वरासी । पाणिग्रहणेश्वर पूजीं मग ॥७९॥

गंगेश्वर मोरेश्वर पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्वर अर्चून । नंदिकेश्वर पूजीं मग ॥१८०॥

निष्कलंकेश्वर थोर । लिंग असे मनोहर ।
पूजीं मार्कंडेयेश्वर । असुरेश्वर पूजीं मग ॥८१॥

तारकेश्वर असे थोर । लिंग बहु मनोहर ।
पूजा महाकाळेश्वर । दंडपाणि पूजीं मग ॥८२॥

महेश्वरातें पूजोनि । अर्ची मोक्षेश्वर ध्यानीं ।
वीरभद्रेश्वरसुमनीं । पूजा करीं गा बाळका ॥८३॥

अविमुक्तेश्वरापासीं । तुवां जाऊनियां हर्षी ।
पूजा करीं गा भावेंसी । मोदादि पंच विनायका ॥८४॥

आनंदभैरवपूजा करीं । पुनरपि जाय महाद्वारीं ।
जेथें असे मन्मथारि। विश्वनाथ पूजावा ॥८५॥

बाळा तूंचि येणेंपरी । अंतरगृहयात्रा करीं ।
मुक्तिमंडपाभीतरीं जाऊनिया मंत्र म्हणावा ॥८६॥

श्लोक ॥ अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥१॥

इति मंत्रं समुच्चार्य क्षणं वै मुक्तिमान्भवेत्‌ ।
विश्रम्य यायाद्‌भवने निष्पापः पुण्यभाग्भवेत्‌ ॥२॥

ऐसा मंत्र जपून । विश्वनाथातें नमून ।
मग निघावें तेथून । दक्षिणमानसयात्रेसी ॥८७॥

मणिकर्णिकेसी जाउनी । स्नान उत्तरवाहिनी ।
विश्वनाथातें पूजोनि । संकल्पावें यात्रेसी ॥८८॥

तेथोनि निघावें हर्षीं । मोदादि पंच विनायकांसी ।
पूजा करीं गा भक्तींसी । धुंडिराज पूजीं मग ॥८९॥

पूजीं भवानीशंकर । दंडपाणि नमन कर ।
विशालाक्षा अवधार । पूजा तुम्ही भक्तींसी ॥१९०॥

स्नान धर्मकूपेसी । श्राद्धविधि करा हर्षीं ।
पूजा धर्मेश्वरासी । गंगाकेशव पूजीं मग ॥९१॥

पूजावी देवी ललिता । जरासंघेश्वर नमितां ।
पूजीं मग सोमनाथा । वराहेश्वरा भक्तींसी ॥९२॥

दशाश्वमेधतीर्थेसी । स्नान करीं श्राद्धेंसी ।
प्रयागतीर्थें परियेसीं । स्नान श्राद्ध करावें ॥९३॥

पूजोनिया प्रयागेश्वरासी । दशाश्वमेध ईश्वरासी ।
पूजा करीं गा भक्तींसी । शीतलेश्वर अर्चीं मग ॥९४॥

अर्ची मग वंदि देवी । सर्वेश्वर मनोभावीं ।
धुंडिराज भक्ति पूर्वीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥९५॥

तिळभांडेश्वर देखा । पूजा करोनि पुढें ऐका ।
रेवाकुंडीं स्नान निका । मानससरोवरीं मग स्नान ॥९६॥

श्राद्धादि पितृतर्पण । मानसेश्वर मग पूजोन ।
मनकामना पावे जाण । ऐक बाळा ब्रह्मचारी ॥९७॥

केदारकुंडीं स्नान । करावें तेथें तर्पण ।
केदारेश्वर पूजोन । गौरीकुंडीं स्नान करा ॥९८॥

पूजीं वृद्धकेदारेश्वर । पूजीं मग हनुमंतेश्वर ।
पूजोनिया रामेश्वर । स्नान श्राध्द कृमिकुंडीं ॥९९॥

सिद्धेश्वरा करीं नमन । करुनि स्वप्नकुंडीं स्नान ।
स्वप्नेश्वर पूजोन । स्नान करीं गा संगमांत ॥२००॥

संगमेश्वर पूजोन । लोलार्ककूपीं करीं स्नान ।
श्राद्धकर्म आचरोन । गतिप्रदीप ईश्वरासी ॥१॥

पूजीं अर्कविनायका । पाराशरेश्वरा अधिका ।
पूजा करोनि बाळका । सन्निहत्य कुंडीं स्नान करीं ॥२॥

कुरुक्षेत्र कुंड देखा । स्नान करावें विशेखा ।
सुवर्णादि दानादिका । तेथें तुम्हीं करावें ॥३॥

अमृतकुंडीं स्नान निका । पूजीं दुर्गा विनायका ।
दुर्गादेवीसी बाळका । पूजा करीं मनोभावें ॥४॥

पुढें चौसष्‍ट योगिनी । पूजा करीं गा मनकामनीं ।
कुक्कुट द्विजातें वंदुनी । मंत्र तेथें जपावा ॥५॥

श्लोक ॥ वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजः ।
तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्‍नः सुस्वप्नो भवेत्‌ ॥६॥

पुढें मासोपवासासी । पूजिजे गोबाईसी ।
सात कवडया घालूनिया तिसी । नमन भावें करावें ॥७॥

पूजा करीं रेणुकेसी । पुढें स्नान करीं हर्षी ।
शंखोद्धारकुंडेसी । शंखविष्णु पूजिजे ॥८॥

कामाक्षिकुंडीं करीं स्नान । कामाक्षिदेवी पूजोन ।
अयोध्याकुंडीं करीं स्नान । सीताराम पूजावा ॥९॥

लवांकुशकुंडीं करीं स्नान । लवांकुशातें पूजोन ।
लक्ष्मीकुंडीं करीं स्नान । लक्ष्मीनारायण पूजावा ॥२१०॥

सूर्यकुंडीं करीं स्नान । श्राद्धकर्म आचरोन ।
सांबादित्य पूजोन । जावें पुढें बाळका ॥११॥

वैजनाथकुंड बरवें । तेथें स्नान तुवां करावें ।
वैजनाथातें पूजावें । एकभावेंकरुनिया ॥१२॥

गोदावरीकुंडेसी । स्नान करा भक्तींसी ।
गौतमेश्वर लिंगासी । पूजीं बाळ ब्रह्मचारी ॥१३॥

अगस्तिकुंडीं जावोनि । अगस्तेश्वरा नमूनि ।
स्नान करीं मनापासोनि । पूजा करीं भक्तिभावें ॥१४॥

शुक्रकूपीं करीं स्नान । करी शुक्रेश्वर अर्चन ।
मग पुढें अन्नपूर्णा नमून । पूजा करीं भावेंसी ॥१५॥

धुंडिराजातें पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्वर अर्चोन । दंडपाणि पूजावा ॥१६॥

आनंदभैरव वंदोनि । महाद्वारा जाऊनि ।
साष्‍टांगेसी नमोनि । विश्वनाथा अर्चिजे ॥१७॥

ऐसें दक्षिणमानस । यात्रा असे विशेष ।
ब्रह्मचारी करी हर्ष । योगिराज सांगतसे ॥१८॥

आतां उत्तरमानसासी । सांगेन विधि आहे कैशी ।
संकल्प करोनिया हर्षी । निघावें तुवां बाळका ॥१९॥

जावें पंचगंगेसी । स्नान करीं महाहर्षी ।
कोटिजन्मपाप नाशी । प्रख्यात असे पुराणीं ॥२२०॥

पंचगंगा प्रख्यात नामें । सांगेन असतीं उत्तमें ।
किरणा धूतपापा नामें । तिसरी पुण्यसरस्वती ॥२१॥

गंगा यमुना मिळोनी । पांचही ख्याति जाणोनि ।
नामें असती सगुणी । ऐक बाळा एकचित्तें ॥२२॥

कृतयुगीं त्या नदीसी । धर्मनदी म्हणती हर्षी ।
धूतपापा नाम तिसी । त्रेतायुगीं अवधारा ॥२३॥

बिंदुतीर्थ द्वारापासी । नाम जाण विस्तारेंसी ।
कलियुगाभीतरीं तिसी । नाम झालें पंचगंगा ॥२४॥

प्रयागासी माघमासीं । स्नान करितां फळें जैसीं ।
कोटिगुण पंचगंगेसी । त्याहूनि पुण्य अधिक असे ॥२५॥

ऐशापरी पंचगंगेसी । स्नान करीं गा भावेंसी ।
बिंदुमाधवपूजेसी । पूजा करीं गा केशवा ॥२६॥

गोपालकृष्ण पूजोनि । जावें नृसिंहभुवनीं ।
मंगळागौरी वंदोनि । गभस्तेश्वर पूजावा ॥२७॥

मयूखादित्यपूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
पुनरपि जावें हर्षी । विश्वेश्वरदर्शना ॥२८॥

मागुती मुक्तिमंडपासी । तुवां जावें भक्तींसी ।
संकल्पावें विधींसी । निघावें उत्तरमानसा ॥२९॥

मग निघा तेथून । आदित्यातें पूजोन ।
अमर्दकेश्वर अर्चोन । पापभक्षेश्वरा पूजिजे ॥२३०॥

नवग्रहातें पूजोनि । काळभैरवातें वंदूनि ।
क्षेत्रपाळातें अर्चोनि । काळकूपीं स्नान करीं ॥३१॥

पूजा करोनि काळेश्वरा । हंसतीर्थी स्नान करा ।
श्राद्धपितृकर्म सारा । ऐक बाळा एकचित्तें ॥३२॥

कृत्तिवासेश्वरा देखा । पूजा करोनि बाळका ।
पुढें जाऊनि ऐका । शंखवापीं स्नान करीं ॥३३॥

तेथें आचमन करोनि । रत्‍नेश्वरातें पूजोनि ।
सीतेश्वरा अर्चोनि । दक्षेश्वर पूजीं मग ॥३४॥

चतुर्वक्रेश्वरीं पूजा । करीं वो बाळा तूं वोजा ।
पुढें स्नान करणें काजा । वृद्धकाळकूपा जावें ॥३५॥

काळेश्वराचे पूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
अपमृत्येश्वरा हर्षी । पूजा करीं गा बाळका ॥३६॥

मंदाकिनी स्नान करणें । मध्यमेश्वरातें पूजणें ।
तेथोनि मग पुढें जाणें । जंबुकेश्वर पूजावया ॥३७॥

वक्रतुंडपूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
दंडखात कूपेसी । स्नान श्राद्ध तूं करीं ॥३८॥

पुढें भूतभैरवासी । पूजिजे ईशानेश्वरासी ।
जैगीषव्यगुहेसी । नमन करुनि पुढें जावें ॥३९॥

घंटाकुंडीं स्नान करीं । व्यासेश्वरातें अर्चन करीं ।
कंदुकेश्वरातें अवधारीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४०॥

ज्येष्ठवापीं स्नान करणें । ज्येष्ठेश्वरातें पूजणें ।
सवेंचि तुवां पुढें जाणें । स्नान सप्तसागरांत ॥४१॥

तेथोनि वाल्मीकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
भीमलोटा जाऊनि हर्षी । भीमेश्वर पूजावा ॥४२॥

मातृ-पितृकुंडेसी । करणें श्राद्धविधीसी ।
पिशाचमोचन तीर्थेसी । पुढें जावें अवधारा ॥४३॥

पुढें कपर्दिकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
कर्कोटकवापीसी । स्नान करीं गा बाळका ॥४४॥

कर्कोटकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
पुढें ईश्वरगंगेसी । स्नान दान करावें ॥४५॥

अग्नीश्वराचे पूजेसी । चक्रकुंडीं स्नानासी ।
तुंवा जावें भक्तींसी । श्राद्धकर्म करावें ॥४६॥

उत्तरार्क पूजोन । मत्स्योदरीं करीं स्नान ।
ओंकारेश्वर अर्चोन । कपिलेश्वर पूजीं मग ॥४७॥

ऋणमोचन तीर्थेसी । श्राद्धादि करावीं भक्तींसी ।
पापविमोचनतीर्थेसी । स्नानादि श्राद्धें करावीं ॥४८॥

तीर्थ कपालमोचन । स्नान श्राद्ध तर्पण ।
कुलस्तंभाप्रती जाऊन । पूजा करीं गा भक्तींसी ॥४९॥

असे तीर्थ वैतरणी । श्राद्ध करावें तेथें स्नानीं ।
विधिपूर्वक गोदानीं । देतां पुण्य बहुत असे ॥२५०॥

मग जावें कपिलधारा । स्नान श्राद्ध तुम्ही करा ।
सवत्सेसी द्विजवरा । गोदान द्यावें परियेसा ॥५१॥

वृषभध्वजातें पूजोन । मग निघावें तेथून ।
ज्वालानृसिंह वंदोन । वरुणासंगमीं तुम्हीं जावें ॥५२॥

स्नान श्राद्ध करोनि । केशवादित्य पूजोनि ।
आदिकेशव अर्चोनि । पुढें जावें परियेसा ॥५३॥

प्रल्हादतीर्थ असे बरवें । स्नान श्राद्ध तुवां करावें ।
प्रल्हादेश्वरातें पूजावें । एकभावें परियेसा ॥५४॥

कपिलधारा तीर्थ थोर । स्नान करावें मनोहर ।
पूजोनि त्रिलोचनेश्वर । असंख्यातेश्वरा पूजिजे ॥५५॥

पुढें जावें महादेवासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
द्रुपदेश्वर सादरेंसी । एकभावें अर्चावा ॥५६॥

गंगायमुनासरस्वतींशीं । तिन्ही लिंगें विशेषीं ।
पूजा करीं गा भक्तींसी । काम्यतीर्थ पाहें मग ॥५७॥

कामेश्वरातें पूजोनि । गोप्रतारतीर्थ स्नानीं ।
पंचगंगेसी जाऊनि । स्नान मागुतीं करावें ॥५८॥

मणिकर्णिकास्नान करणें । जलशायीतें पूजणें ।
हनुमंतातें नमन करणें । मोदादि पंच विनायकांसी ॥५९॥

पूजा अन्नपूर्णेसी । धुंडिराज परियेसीं ।
ज्ञानवापीं स्नानेंसी । ज्ञानेश्वर पूजावा ॥२६०॥

पूजीं दंडपाणीसी । मोक्षलक्ष्मीविलासासी ।
पूजा पंचपांडवासी । द्रौपदीदुपदविनायका ॥६१॥

पूजा आनंदभैरवासी । अविमुक्तेश्वर हर्षीं ।
पूजोनिया संभ्रमेंसी । विश्वनाथ संमुख सांगें ॥६२॥

श्लोक ॥ उत्तरमानसयात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥६३॥

ऐसा मंत्र जपोनि । साष्टांगें नमस्कारुनि ।
मग निघावें तेथोनि । पंचक्रोशयात्रेसी ॥६४॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र ऐकतां संतोषीं ।
येणेंचि तूं पावशी । चारी पुरुषार्थ इह सौख्य ॥६५॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टे साधिजे ॥६६॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीखंडीं यात्रा निरोपित ।
कथा असती पुराणविख्यात । एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥२६७॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीमहायात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥

॥ ओवीसंख्या ॥२६७॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥






गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा ।
कर जोडुनी कौतुका । नमन करी साष्‍टांगीं ॥१ ॥

जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी ।
नाना धर्म विस्तारोनि । गुरुचरित्र निरोपिलें ॥२॥

तेणें धन्य झालों आपण । प्रकाश केलें महाज्ञान ।
सुधारस गुरुस्मरण । प्राशविला दातारा ॥३॥

एक असे माझी विनंती । निरोपावें मजप्रती ।
आमुच्या पूर्वजें कवणें रीतीं । सेवा केली श्रीगुरुची ॥४॥

तुम्ही सिद्ध महाज्ञानी । होतां श्रीगुरुसन्निधानीं ।
शिष्य झाले कवणे गुणीं । निरोपावें दातारा ॥५॥

ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्ध सांगे विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥६॥

पूर्वीं कथानक सांगितलें । जे कां श्रीगुरुशीं भेटले ।
वोसरग्रामीं एक होते भले । पूर्वज तुमचे परियेसा ॥७॥

तयाचें नाम सायंदेव । केली पूजा भक्तिभाव ।
त्यावरी प्रीति अतिस्नेह । आमुचे श्रीगुरुमूर्तीचा ॥८॥

तेथून आले दक्षिणदिशीं । गाणगापुरीं परियेसीं ।
ख्याति झाली दश दिशीं । कीर्ति वाढली बहुवस ॥९॥

ऐकोनि येती सकळ जन । करिती श्रीगुरुदर्शन ।
जें मनीं करिती चिंतन । पूर्ण होय तयांचें ॥१०॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते गाणगापुरा वस्ती ।
नाम श्रीनृसिंहसरस्वती । भक्तवत्सल निर्धारीं ॥११॥

तुमचा पूर्वज जो का होता । सायंदेव भक्त विख्याता ।
त्याणें ऐकिलें वृत्तान्ता । महिमा श्रीगुरु यतीचा ॥१२॥

भक्तिपूर्वक वेगेंसी । आला गाणगापुरासी ।
आनंद बहु मानसीं । हर्षे निर्भर होउनी ॥१३॥

दुरुनि देखिलें गाणगाभुवन । आपण घाली लोटांगण ।
करी दंडप्राय नमन । ऐशापरी चालिला ॥१४॥

ऐसा दंडप्रणाम करीत । गेला विप्र मठांत ।
देखिले तेथें मूर्तिमंत । परात्पर श्रीगुरु ॥१५॥

साष्‍टांग नमस्कार करीत । असे चरणावरी लोळत ।
केशेंकरुन पाय झाडीत । भक्तिभावें करोनिया ॥१६॥

करसंपुट जोडोनि । स्तुति करी एकाग्र मनीं ।
त्रैमूर्ति तूंचि ज्ञानीं । गुरुमूर्ति स्वामिया ॥१७॥

धन्य धन्य जन्म आपुलें । कृतार्थ पितर माझे झाले ।
कोटि जन्मांचें पाप गेलें । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥

जय जयाजी श्रीगुरुमूर्ति । त्राहि त्राहि विश्वपती ।
परमात्मा परंज्योती । नृसिंहसरस्वती स्वामिया ॥१९॥

तुझे चरण वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
परमात्मा तूंचि होसी । भक्तवत्सला स्वामिया ॥२०॥

तुमचे चरणाचिये प्रौढी । वसती तेथें तीर्थें कोडी ।
वर्णिती श्रुति घडोघडी । चरणं पवित्रं विततं पुराणं ॥२१॥

त्रैमुर्तींचा अवतार । मज दिससी साक्षात्कार ।
भासतसे निरंतर । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥२२॥

परब्रह्म तुम्ही केवळू । हातीं दंड कमंडलू ।
अमृत भरलें सोज्ज्वळू । प्रोक्षितां प्रेत उठतसे ॥२३॥

दंड धरिला या कारणें । शरणांगतातें रक्षणें ।
दुरितदैन्य निवारणें । निज भक्त रक्षावया ॥२४॥

रुद्राक्षमाळा भस्मधारण । व्याघ्रचर्माचें आसन ।
अमृतदृष्‍टि इंदुनयन । क्रूरदृष्‍टीं अग्निसूर्य ॥२५॥

चतुर्विध पुरुषार्थासी । भक्तजना तूंचि होसी ।
तूंचि रुद्र सत्य होसी । तूं नृसिंह जगद्‌गुरु ॥२६॥

विष्णुरुपें करिसी रक्षण । पीतांबर पांघरुण ।
तीर्थ समस्त तुझे चरण । भक्ताभिमानी विष्णु तूंचि ॥२७॥

वांझे कन्या पुत्र देसी । शुष्‍क काष्‍ठ आणिलें पल्लवासी ।
दुभविली वांझ महिषीसी । अन्न पुरविलें ब्राह्मणा ॥२८॥

विष्णुमूर्ति तूंचि जाण । त्रिविक्रमभारती ऐसी खूण ।
साक्ष दिधली अंतःकरण । विश्वरुप दाखविलें ॥२९॥

म्हणविले वेद पतिताकरवीं । अपार महिमा झाला पूर्वीं ।
नरहरिअवतार मूर्ति बरवी । आलेति भक्त तारावया ॥३०॥

ऐसी नानापरी स्तुति करीत । पुनः पुनः नमन करीत ।
सद्‌गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठले ॥३१॥

आनंदाश्रुलोचनीं । निघती संतोषें बहु मनीं ।
नव विधा भक्ति करोनि । स्तुति केली श्रीगुरुची ॥३२॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आश्वासिती ।
माथां हस्त ठेवोनि म्हणती । परम भक्त तूंचि आम्हां ॥३३॥

तुवा जें कां स्तोत्र केलें । तेणें माझें मन धालें ।
तुज वरदान दिधलें । वंशोवंशीं माझा दास ॥३४॥

ऐसा वर देउनी । गुरुमूर्ति संतोषोनि ।
मस्तकीं हस्त ठेवोनि । म्हणती जाय संगमासी ॥३५॥

स्नान करुन संगमासी । पूजा करीं अश्वत्थासी ।
त्वरित यावें मठासी । पंक्तीस भोजन करीं गा ॥३६॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
गुरुनिरोप जेणें रीतीं । आला स्नान करोनिया ॥३७॥

षोडशोपचारें श्रीगुरुसी । पूजा करी भक्तींसी ।
अनेक परी पक्वान्नेंसी । भिक्षा करवी परियेसा ॥३८॥

भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आपुले पंक्ति ।
समस्त शिष्यांहुनी प्रीती । ठाव देती आपलेजवळी ॥३९॥

भोजन झालें श्रीगुरुसी । शिष्यांसहित विप्रांसी ।
संतोषोनि आनंदेंसी । बैसले होते मठांत ॥४०॥

तया सायंदेवविप्रासी । श्रीगुरु पुसती प्रीतींसी ।
तुझें स्थान कोणे देशीं । कलत्र पुत्र कोठें असती ॥४१॥

पुसती क्षेमसमाधान । कैसें तुमचें वर्तन ।
कृपा असे परिपूर्ण । म्हणोनि पुसती संतोषें ॥४२॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे सायंदेव विस्तारोन ।
कन्या पुत्र बंधुजन । समस्त क्षेम असती स्वामिया ॥४३॥

उत्तरकांची म्हणोनि ग्रामीं । तेथें वसोनि आम्ही ।
तुझ्या कृपें समस्त क्षेमी । असों देवा कृपासिंधु ॥४४॥

पुत्रवर्ग बंधु जाणा । करिती संसारयातना ।
आपुले मनींची वासना । करीन सेवा श्रीगुरुची ॥४५॥

करुनि सेवा श्रीगुरुची । असेन स्वामी परियेसीं ।
ऐसा माझे मानसीं । निर्धार असे देवराया ॥४६॥

ऐकोन तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती हासोन ।
आमुची सेवा असे कठिण । आम्हां वास बहुतां ठायीं ॥४७॥

एके समयीं अरण्यांत । अथवा राहूं गांवांत ।
आम्हांसवें कष्‍ट बहुत । तुम्ही केवी साहूं शका ॥४८॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोपिती ।
ऐकोन विनवी मागुती । म्हणे स्वामी अंगिकारा ॥४९॥

गुरुची सेवा करी नरू । तोचि उतरे पैल पारु ।
तयासी कैसें दुःख अघोरु । सदा सुखी तोचि होय ॥५०॥

चतुर्विध पुरुषार्थ । देऊं शके श्रीगुरुनाथ ।
त्यासी नाहीं यमपंथ । गुरुभक्ति मुख्य कारण ॥५१॥

येणेंपरी श्रीगुरुसी । सायंदेव भक्तींसी ।
विनवीतसे परियेसीं । संतोषी झाले श्रीगुरुमूर्ति ॥५२॥

श्रीगुरु तया विप्रा म्हणती । जैसें असे तुझे चित्तीं ।
दृढ असेल मनीं भक्ति । तरीच करीं अंगीकार ॥५३॥

स्थिर करोनि अंतःकरण । करितां सेवा-गुरुचरण ।
झाले मास तीन जाण । ऐक शिष्या नामकरणी ॥५४॥

वर्ततां ऐसें एके दिवशीं । श्रीगुरु निघाले संगमासी ।
सवें घेतलें सायंदेवासी । समस्तांतें वारुनी ॥५५॥

भक्ताचें अंतःकरण । पहावया गेले श्रीगुरु आपण ।
पूर्वज तुमचा भोळा जाण । जात असे संगमासी ॥५६॥

भक्तासहित संगमासी । गेले श्रीगुरु समयीं निशी ।
बैसते झाले अश्वत्थासी । सुखें गोष्‍टी करिताती ॥५७॥

दिवस गेला अस्तमानीं । श्रीगुरु विचार करिती मनीं ।
दृढ याचे अंतःकरणीं । कैसी करणी पाहूं म्हणती ॥५८॥

उठविती वारा अवचित । तेणें वृक्ष पडों पाहत ।
पर्जन्य झाला बहुत । मुसळधारा वर्षतसे ॥५९॥

सायंदेव होता जवळी । सेवा केली तये वेळीं ।
केला आश्रय वृक्षातळीं । वस्‍त्रेंकरुनि श्रीगुरुसी ॥६०॥

पर्जन्य वारा समस्त देखा । साहिले आपण भावें ऐका ।
उभा राहोनि संमुखा । सेवा करी एकभावें ॥६१॥

येणेंपरी याम दोन । पर्जन्य आला महा क्षोभोन ।
आणिक वारा उठोन । वाजे शीत अत्यंत ॥६२॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । शीत झालें बहुवसी ।
तुवां जाउनी मठासी । अग्नि आणावा शेकावया ॥६३॥

गुरुनिरोंपें तत्क्षणीं । ऐक्यभाव धरोनि मनीं ।
निघाला विप्र महाज्ञानी । आणावया वैश्वानर ॥६४॥

निघाला शिष्य देखोनि । श्रीगुरु म्हणती हासोनि ।
नको पाहूं आपुले नयनीं । उभयपार्श्वभागातें ॥६५॥

गुरुनिरोपें येणेंपरी । निघता झाला झडकरी ।
न दिसे वाट अंधकारीं । खुणें खुणें जात असे ॥६६॥

अंधकार महाघोर । पाऊस पडे धुरंधर ।
न दिसे वाटेचा प्रकार । जात असें भक्तिपूर्वक ॥६७॥

मनीं ध्याय श्रीगुरुसी । जातसे तैसा मार्गेसी ।
लवतां वीज संधीसी । तेणें तेजें जातसे ॥६८॥

येणेंपरी द्विजवर । पावला त्वरित गाणगापुर ।
वेशीपाशीं जाऊनि सत्वर । हाक मारिली द्वारपाळा ॥६९॥

तयासी सांगे वृत्तान्त । आणोनि दिधला अग्नि त्वरित ।
घालूनिया भांडयांत । घेवोनि गेला परियेसा ॥७०॥

नसे मार्ग अंधकार । विजेचे तेजें जातसे नर ।
मनीं करितसे विचार । श्रीगुरुंनीं मातें निरोपिलें ॥७१॥

दोहींकडे न पाहें निगुती । श्रीगुरु मातें निरोपिती ।
याची कैसी आहे स्थिति । म्हणोनि पाहे तये वेळीं ॥७२॥

आपुले दक्षिणदिशेसी । पाहतां देखे सर्पासी ।
भिऊनि पळतां उत्तरेसी । अद्‌भुत दिसे महानाग ॥७३॥

पांच फणी दिसती दोनी । सवेंचि येताती धावोनि ।
विप्र भ्याला आपुले मनीं । धावत जातसे भिऊनिया ॥७४॥

वाट सोडुनी जाय रानीं । सवेंचि येताति सर्प दोनी ।
जातां भयभीत होउनी । अति शीघ्र धावतसे ॥७५॥

स्मरतां झाला श्रीगुरुसी । एकभावें धैर्येंसी ।
जातां विप्र परियेसीं । पातला संगमाजवळीक ॥७६॥

दुरुनि देखे श्रीगुरुसी । सहस्त्रदीपज्योतीसरसी ।
दिसती विप्र बहुवसी । वेदध्वनि ऐकतसे ॥७७॥

जवळी जातां द्विजवरु । एकला दिसे श्रीगुरु ।
गेला समस्त अंधकारु । दिसे चंद्र पौर्णिमेचा ॥७८॥

प्रज्वलित केलें अग्नीसी । उजेड झाला बहुवसी ।
झाला विप्र सावधेसी । पाहतसे श्रीगुरुतें ॥७९॥

दोनी सर्प येवोनि । श्रीगुरुतें वंदोनि ।
सवेंचि गेले निघोनि । तंव हा पूर्वींच भ्यालासे ॥८०॥

श्रीगुरु पुसती तयासी । कां गा भयभीत झालासी ।
आम्हीं तूंतें रक्षावयासी । सर्प दोन पाठविले ॥८१॥

न धरीं आतां भय कांहीं । आमुची सेवा कठीण पाहीं ।
विचार करुनि आपुल्या देहीं । अंगिकारीं मुनिसेवा ॥८२॥

गुरुभक्ति असे कठिण । दृढभक्तीनें सेवा करणें ।
कळिकाळाचें नाहीं भेणें । तया शिष्या परियेसा ॥८३॥

सायंदेव तये वेळीं । लागतसे श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणाबहाळी । कृपा करीं म्हणोनिया ॥८४॥

गुरुभक्तीचा प्रकारु । निरोपावा मातें श्रीगुरु ।
जेणें माझें मन स्थिरु । होवोनि राहे तुम्हांजवळी ॥८५॥

श्रीगुरु म्हणती विप्रासी । सांगे कथा सुरसी ।
न गमे वेळ रात्रीसी । ब्राह्म मुहूर्त होय तंव ॥८६॥

पूर्वीं कैलासशिखरासी । बैसला होता व्योमकेशी ।
अर्धांगी पार्वतीसी । कथा एकान्तीं सांगतसे ॥८७॥

गिरिजा पुसे ईश्वरासी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी ।
विस्तारोनि आम्हांसी । सांगा म्हणे तये वेळीं ॥८८॥

शिव सांगे गिरिजेसी । सर्व साध्य गुरुभक्तीसी ।
करावें एकभावेंसी । शिव जो तोचि गुरु होय ॥८९॥

याचें एक आख्यान । सांगेन तुज विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक गिरिजे म्हणतसे ॥९०॥

गुरुभक्ति म्हणिजे सुलभपण । तात्काळ साध्य होय जाण ।
अनेक तप अनुष्‍ठान । करितां विलंब परियेसीं ॥९१॥

नाना तपें अनुष्‍ठानें । करिती यज्ञ महाज्ञानें ।
त्यांतें होती महाविघ्नें । साध्य होतां दुर्लभ ॥९२॥

जो गुरुभक्ति करी निर्मळ । साध्य होईल तात्काळ ।
यज्ञदान तपफळ । सर्व सिद्धि त्यासी होती ॥९३॥

सुलभ असे अप्रयास । जो जाणे गुरुकुलवास ।
एकभावें धरोनि कांस । आराधावें श्रीगुरुसी ॥९४॥

याचा एक दृष्‍टान्त । सांगेन ऐका एकचित्त ।
ब्रह्मयाचा अवतार व्यक्त । त्वष्‍टाब्रह्मा परियेसा ॥९५॥

तयासी झाला एक कुमर । अतिलावण्य सुंदर ।
सर्वधर्मकुशल धीर । योग्य झाला उपनयना ॥९६॥

त्वष्‍टाब्रह्मा पुत्रासी । व्रतबंध करी परियेसीं ।
करावया विद्याभ्यासासी । गुरुचे घरीं निरविला ॥९७॥

गुरुची सेवा नानापरी । करीतसे ब्रह्मचारी ।
वर्ततां ऐशियापरी । अपूर्व एक वर्तलें ॥९८॥

वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला पर्जन्य बहुवशी ।
पर्णशाळा परियेसीं । गळतसे गुरुची ॥९९॥

तये वेळीं शिष्यासी । निरोपिती गुरु त्यासी ।
त्वरित करावें आम्हांसी । एक गृह दृढ ऐसें ॥१००॥

पर्णशाळा पतिवर्षीं । जीर्ण होतसे परियेसीं ।
गृह करावें दृढतेंसी । कधीं जीर्ण नोहे ऐसें ॥१॥

न तुटे कधीं राहे स्थिर । दिसावें रम्य मनोहर ।
असावें सर्व परिकर । करीं शीघ्र ऐसें गृह ॥२॥

ऐसें गुरु निरोपिती । तेच समयीं गुरुची सती ।
सांगतसे अतिप्रीतीं । मातें कुंचकी आणावी ॥३॥

नसावी विणली अथवा शिवली । विचित्र रंगीत पाहिजे केली ।
माझ्या अंगप्रमाण वहिली । त्वरित आणीं म्हणतसे ॥४॥

गुरुपुत्र म्हणे शिष्यासी । मागेन तें आणीं वेगेंसी ।
पादुका पाहिजेत आम्हांसी । उदकावरुनि चालती ऐशा ॥५॥

अथवा चिखल न लागे त्यांसी । न व्हाव्या अधिक पायांसी ।
जेथें चिंतू मानसीं । तेथें घेऊनि जाती ऐशा ॥६॥

इतुकिया अवसरीं । गुरुकन्या काय करी ।
जातां तयाचा पल्लव धरी । आपणा कांहीं आणावें ॥७॥

उंच तानवडें आपणासी । घेऊनि यावें परियेसीं ।
आणिक आणा खेळावयासी । घरकुल एक आपणा ॥८॥

कुंजराचें दांतें बरवें । घरकुल तुवां आणावें ।
एकस्तंभी असावें । कधीं न तुटे न होय जीर्ण ॥९॥

जेथें नेईन तेथें यावें । सोपस्कारासहित आणावें ।
पाट ठाणवीं असावें । तया घराभीतरीं ॥११०॥

सदा दिसावें नूतन । वावरत असावें आपें आपण ।
करावया पाक निष्पन्न । मडकीं करुनि आणीं पां ॥११॥

आणिक एक सांगेन तुज । रांधप करावया शिकवी मज ।
पाक केलिया उष्ण सहज । असों नयें अन्न आणा ॥१२॥

पाक करिता मडकियेसी । न लागे काजळ परियेसीं ।
आणोनि दे गा भांडीं ऐसीं । आणिक सर्व सोपस्कार ॥१३॥

गुरुकन्या ऐसें म्हणे । अंगिकारिलें शिष्यराणें ।
निघता झाला तत्क्षणें । महा अरण्यांत प्रवेशला ॥१४॥

मनीं चिंता बहु करी । आपण बाळ ब्रह्मचारी ।
काय जाणें त्यांचे परी । केवी करुं म्हणतसे ॥१५॥

पत्रावळी करुं नेणें । इतुकें मातें कधीं होणें ।
स्मरतसे एकाग्र मनें । श्रीगुरुचरण देखा ॥१६॥

म्हणे आतां काय करुं । मातें कोण आधारु ।
बोल ठेवील माझा गुरु । शीघ्र इतुकें न करितां ॥१७॥

कवणापासीं जाऊं शरण । कवण राखील माझा प्राण ।
कृपानिधि गुरुविण । ऐसा कवण असे दुजा ॥१८॥

जरी नायकें गुरुचा बोल । शाप देईल तात्काळ ।
ब्रह्मचारी आपण बाळ । म्हणोनि अंगिकार कां केला ॥१९॥

काय गति आपणासी । आतां जाऊं कवणापासीं ।
अशक्‍त बाळ मी अज्ञानेसी । अंगिकार कां केला ॥१२०॥

गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण ।
वेंचीन आतां आपुला प्राण । गुरुनिरोप करीन मी ॥२१॥

ऐसें महा अरण्यांत । जातसे बाळ चिंता करीत ।
श्रमोनिया अत्यंत । निर्वाणमनें जातसे ॥२२॥

पुढें जातां मार्ग क्रमित । भेटला एक अवधूत ।
तेणें बाळ देखिला तेथ । पुसता झाला तये वेळीं ॥२३॥

कवण बाळा कोठें जासी । चिंताव्याकुळ मानसीं ।
विस्तारोनि आम्हांसी । सांग म्हणे तये वेळीं ॥२४॥

ऐसें म्हणतां ब्रह्मचारी । जाऊनिया नमस्कारी ।
म्हणे स्वामी तारीं तारीं । चिंतासागरीं बुडतसें ॥२५॥

भेटलासि तूं निधानु । जैसी वत्सालागीं धेनु ।
दुःखी झालों होतों आपणु । देखतां मन निवालें ॥२६॥

जैसे चकोरपक्षियातें । चांदणें देखतां मन हर्षतें ।
तैसें तुझ्या दर्शनमात्रें । आनंद झाला स्वामिया ॥२७॥

माझें पूर्वार्जित पुण्य । कांहीं होतें म्हणोन ।
तुम्ही भेटलेंती निधान । कृपासिंधु परमपुरुषा ॥२८॥

सांगा आपुलें नाम कवण । आगमन झालें कोठून ।
पहा हें निर्मनुष्य अरण्य । येथें तुम्ही भेटलेती ॥२९॥

व्हाल तुम्ही ईश्वरु । मातें कृपा केली गुरु ।
तुम्हां देखता मनोहरु । अंतःकरण स्थिर झालें ॥१३०॥

कीं होसील कृपाळू । सत्त्वप्रिय भक्तवत्सलू ।
मी दास तुझा करीं सांभाळू । म्हणोनि चरणीं लागला ॥३१॥

नमितां तया बाळकासी । उठवीतसे तापसी ।
आलिंगोनि महाहर्षी । आश्वासीतसे तये वेळीं ॥३२॥

मग पुशिला वृत्तान्त । बाळ सांगे समस्त ।
गुरुंनीं जी जी मागितली वस्त । कवणेंपरी साध्य होय ॥३३॥

आपण बाळ ब्रह्मचारी । न होय कार्य तें अंगिकारीं ।
आतां पडिलों चिंतासागरीं । तारीं स्वामी म्हणतसे ॥३४॥

मग अभय देऊनि अवधूत । तया बाळातें म्हणत ।
सांगेन तुज एक हित । जेणें तुझें कार्य साधे ॥३५॥

विश्वेश्वर आराधन । असे एक निधान ।
काशीपूर महास्थान । सकळाभीष्‍टें साधती ॥३६॥

पंचक्रोश असे क्षिति । तया आगळी विख्याति ।
विष्णुमुख्य ऋषि प्रजापति । तेथें वर लाधले ॥३७॥

ब्रह्मा सृष्‍टि रचावयासी । वर लाधला त्या स्थळासी ।
वर दिधला विष्णूसी । समस्त सृष्‍टि पाळावया ॥३८॥

काशीपूर महास्थान । तुवां तेथें जातांचि जाण ।
होईल तुझी कामना पूर्ण । संदेह न धरीं मनांत ॥३९॥

तुवां जावें त्वरितेंसी । जें जें वसे तव मानसीं ।
समस्त विद्या लाधसी । विश्वकर्मा तूंचि जाण ॥१४०॥

चतुर्विध पुरुषार्थ । साध्य होतील त्वरित ।
यापरीस आणिक स्वार्थ । काय असे सांग मज ॥४१॥

तोचि देव असे दयाळ । विचित्र असे त्याचा खेळ ।
उपमन्यु म्हणोनि होता बाळ । तयातें दिधला क्षीरसिंधु ॥४२॥

नामें आनंदकानन । विख्यात असे महास्थान ।
समस्तांची कामना पूर्ण । तये ठायीं होतसे ॥४३॥

नाम असे पुरी काशी । समस्त धर्मांची हे राशी ।
सकळ जीवजंतूंसी । मोक्षस्थान परियेसा ॥४४॥

जे वास करिती तये स्थानीं । त्यांतें देखताचि नयनीं ।
जाती दोष पळोनि । स्थानमहिमा काय सांगूं ॥४५॥

ऐसें काशीस्थान असतां । कां बा करिसी तूं चिंता ।
तेथील महिमा वर्णितां । अशक्य माझे जिव्हेसी ॥४६॥

तया काशीनगरांत । जे जन तीर्थे हिंडत ।
एकेक पाउलीं पुण्य बहुत । अश्वमेधफळ असे ॥४७॥

धर्म अर्थ काम मोक्ष । जी जी मनीं असे कांक्ष ।
जातांचि होईल प्रत्यक्ष । संदेह न धरीं मनांत ॥४८॥

ऐकोनिया ब्रह्मचारी । साष्‍टांगीं नमस्कारी ।
कोठें असे काशीपुरी । आपण असे अरण्यात ॥४९॥

आनंदकानन म्हणसी । स्वर्गीं असे कीं भूमीसी ।
अथवा जाऊं पाताळासी । कोठें असे सांगा मज ॥१५०॥

या संसारसागरासी । तूंचि तारक जगा होसी ।
ज्ञान मातें उपदेशीं । तारीं मातें स्वामिया ॥५१॥

ऐशिया काशीपुरासी । मातें कोण नेईल हर्षीं ।
विनवूं जरी तुम्हांसी । घेवोनि जावें म्हणोनिया ॥५२॥

कार्य असलिया तुम्हांसी । आम्हां कैसी बुद्धि देशी ।
मी बाळक तुम्हांसी । म्हणोनि चरणीं लागला ॥५३॥

ऐसें म्हणता तापसी । आपण नेईन म्हणे हर्षी ।
तुजकरितां आपणासी । यात्रालाभ घडे थोर ॥५४॥

यापरतें आम्हांसी । काय लाभ विशेषीं ।
वृथा जन्म मानवासी । काशीवास न करितां ॥५५॥

तुजकरितां आपणासी । दर्शन घडे पुरी काशी ।
चला जाऊं त्वरितेंसी । म्हणोनि दोघे निघाले ॥५६॥

मनोवेगें तात्काळीं । पातले विश्वेश्वराजवळीं ।
तापसी म्हणे तये वेळीं । बाळका यात्रा करीं आतां ॥५७॥

बाळ म्हणें तयासी । स्वामी मातें निरोप देसी ।
नेणें यात्रा आहे कैसी । कवणेंपरी रहाटावें ॥५८॥

आपण बाळ ब्रह्मचारी । नेणें तीर्थ कवणेंपरी ।
कवणें विधिपुरःसरीं । विस्तारोनि सांगा मज ॥५९॥

तापसी म्हणे तयासी । सांगेन यात्राविधीसी ।
तुंवा करावें भावेंसी । नेमें भक्तिपूर्वक ॥१६०॥

पहिलें मणिकर्णिकेसी । स्नान करणें नेमेंसी ।
जाऊनिया विनायकासी । पांचाळेश्वरा नमावें ॥६१॥

मग जावें महाद्वारा । विश्वेश्वरदर्शन करा ।
पुनरपि यावें गंगातीरा । मणिकर्णिकास्नान करावें ॥६२॥

मणिकर्णिकेचा ईश्वर । पूजूनिया निर्धार ।
जाऊनिया कंबळेश्वर । पूजा करीं गा भावेंसी ॥६३॥

पुढें ईश्वरवासुकीसी । पूजा करी भक्तींसी ।
पर्वतेश्वर पूजोनि हर्षी । गंगाकेशव पूजीं मग ॥६४॥

ललिता देवी पूजोनि । मग जावें तेथूनि ।
जरासंधेश्वर ध्यानीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥६५॥

सोमनाथ असे थोर पूजावा शूळटंकेश्वर ।
तयापुढें वाराहेश्वर । पूजा करीं गा ब्रह्मेश्वरी ॥६६॥

अगस्त्येश्वर कश्यपासी । पूजा करीं हरिहरेश्वरासी ।
वैजनाथ महाहर्षी । ध्रुवेश्वर पूजीं मग ॥६७॥

गोकर्णेश्वर असे थोर । पूजा करीं गा हाटकेश्वर ।
अस्थिक्षेप तटाकेश्वर । किंकरेश्वर पूजावा ॥६८॥

भारतभूतेश्वरासी । पूजा करीं गा भावेंसी ।
चित्रगुप्तेश्वरासी । चित्रघंट पूजावा ॥६९॥

पाशुपतेश्वर निका । पूजा करोनि तेथें बाळका ।
पितामह असे जो का । ईश्वरातें पूजावें ॥१७०॥

कल्लेश्वरातें वंदूनी । पुढें जावें एक मनीं ।
चंद्रेश्वरातें पूजोनि । पूजा करीं गा विश्वेश्वरा ॥७१॥

पुढें पूजीं विघ्नेश्वर । त्यानंतर अग्नीश्वर ।
मग पूजा नागेश्वर । हरिश्चंद्रेश्वर पूजीं जाण ॥७२॥

चिंतामणि विनायका । सोमनाथ विनायक देखा ।
पूजा करोनि ऐका । वसिष्‍ठ वामदेव पूजावा ॥७३॥

पुढें त्रिसंध्येश्वर । पूजीं लिंग असे थोर ।
विशालाक्ष मनोहर । धर्मेश्वर पूजावा ॥७४॥

विश्वबाहु पूजा निका । पुढें आशा-विनायका ।
वृद्धादित्य असे जो का । पूजा करीं वो मनोभावें ॥७५॥

चतुर्वक्रेश्वर असे थोर । लिंग असे मनोहर ।
पूजा करीं गा ब्रह्मेश्वर । अनुक्रमें करुनिया ॥७६॥

पुनः प्रकामेश्वर असे खूण । पुढें ईश्वरईशान ।
चंडी चंडेश्वरा जाण । पूजा करीं भक्तींसी ॥७७॥

पूजीं भवानीशंकर । धुंडिराज मनोहर ।
अर्ची राजराजेश्वर । लंगूलेश्वर पूजीं मग ॥७८॥

नकुलेश्वर पूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
परान्नपरद्रव्येश्वरासी । पाणिग्रहणेश्वर पूजीं मग ॥७९॥

गंगेश्वर मोरेश्वर पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्वर अर्चून । नंदिकेश्वर पूजीं मग ॥१८०॥

निष्कलंकेश्वर थोर । लिंग असे मनोहर ।
पूजीं मार्कंडेयेश्वर । असुरेश्वर पूजीं मग ॥८१॥

तारकेश्वर असे थोर । लिंग बहु मनोहर ।
पूजा महाकाळेश्वर । दंडपाणि पूजीं मग ॥८२॥

महेश्वरातें पूजोनि । अर्ची मोक्षेश्वर ध्यानीं ।
वीरभद्रेश्वरसुमनीं । पूजा करीं गा बाळका ॥८३॥

अविमुक्तेश्वरापासीं । तुवां जाऊनियां हर्षी ।
पूजा करीं गा भावेंसी । मोदादि पंच विनायका ॥८४॥

आनंदभैरवपूजा करीं । पुनरपि जाय महाद्वारीं ।
जेथें असे मन्मथारि। विश्वनाथ पूजावा ॥८५॥

बाळा तूंचि येणेंपरी । अंतरगृहयात्रा करीं ।
मुक्तिमंडपाभीतरीं जाऊनिया मंत्र म्हणावा ॥८६॥

श्लोक ॥ अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥१॥

इति मंत्रं समुच्चार्य क्षणं वै मुक्तिमान्भवेत्‌ ।
विश्रम्य यायाद्‌भवने निष्पापः पुण्यभाग्भवेत्‌ ॥२॥

ऐसा मंत्र जपून । विश्वनाथातें नमून ।
मग निघावें तेथून । दक्षिणमानसयात्रेसी ॥८७॥

मणिकर्णिकेसी जाउनी । स्नान उत्तरवाहिनी ।
विश्वनाथातें पूजोनि । संकल्पावें यात्रेसी ॥८८॥

तेथोनि निघावें हर्षीं । मोदादि पंच विनायकांसी ।
पूजा करीं गा भक्तींसी । धुंडिराज पूजीं मग ॥८९॥

पूजीं भवानीशंकर । दंडपाणि नमन कर ।
विशालाक्षा अवधार । पूजा तुम्ही भक्तींसी ॥१९०॥

स्नान धर्मकूपेसी । श्राद्धविधि करा हर्षीं ।
पूजा धर्मेश्वरासी । गंगाकेशव पूजीं मग ॥९१॥

पूजावी देवी ललिता । जरासंघेश्वर नमितां ।
पूजीं मग सोमनाथा । वराहेश्वरा भक्तींसी ॥९२॥

दशाश्वमेधतीर्थेसी । स्नान करीं श्राद्धेंसी ।
प्रयागतीर्थें परियेसीं । स्नान श्राद्ध करावें ॥९३॥

पूजोनिया प्रयागेश्वरासी । दशाश्वमेध ईश्वरासी ।
पूजा करीं गा भक्तींसी । शीतलेश्वर अर्चीं मग ॥९४॥

अर्ची मग वंदि देवी । सर्वेश्वर मनोभावीं ।
धुंडिराज भक्ति पूर्वीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥९५॥

तिळभांडेश्वर देखा । पूजा करोनि पुढें ऐका ।
रेवाकुंडीं स्नान निका । मानससरोवरीं मग स्नान ॥९६॥

श्राद्धादि पितृतर्पण । मानसेश्वर मग पूजोन ।
मनकामना पावे जाण । ऐक बाळा ब्रह्मचारी ॥९७॥

केदारकुंडीं स्नान । करावें तेथें तर्पण ।
केदारेश्वर पूजोन । गौरीकुंडीं स्नान करा ॥९८॥

पूजीं वृद्धकेदारेश्वर । पूजीं मग हनुमंतेश्वर ।
पूजोनिया रामेश्वर । स्नान श्राध्द कृमिकुंडीं ॥९९॥

सिद्धेश्वरा करीं नमन । करुनि स्वप्नकुंडीं स्नान ।
स्वप्नेश्वर पूजोन । स्नान करीं गा संगमांत ॥२००॥

संगमेश्वर पूजोन । लोलार्ककूपीं करीं स्नान ।
श्राद्धकर्म आचरोन । गतिप्रदीप ईश्वरासी ॥१॥

पूजीं अर्कविनायका । पाराशरेश्वरा अधिका ।
पूजा करोनि बाळका । सन्निहत्य कुंडीं स्नान करीं ॥२॥

कुरुक्षेत्र कुंड देखा । स्नान करावें विशेखा ।
सुवर्णादि दानादिका । तेथें तुम्हीं करावें ॥३॥

अमृतकुंडीं स्नान निका । पूजीं दुर्गा विनायका ।
दुर्गादेवीसी बाळका । पूजा करीं मनोभावें ॥४॥

पुढें चौसष्‍ट योगिनी । पूजा करीं गा मनकामनीं ।
कुक्कुट द्विजातें वंदुनी । मंत्र तेथें जपावा ॥५॥

श्लोक ॥ वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजः ।
तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्‍नः सुस्वप्नो भवेत्‌ ॥६॥

पुढें मासोपवासासी । पूजिजे गोबाईसी ।
सात कवडया घालूनिया तिसी । नमन भावें करावें ॥७॥

पूजा करीं रेणुकेसी । पुढें स्नान करीं हर्षी ।
शंखोद्धारकुंडेसी । शंखविष्णु पूजिजे ॥८॥

कामाक्षिकुंडीं करीं स्नान । कामाक्षिदेवी पूजोन ।
अयोध्याकुंडीं करीं स्नान । सीताराम पूजावा ॥९॥

लवांकुशकुंडीं करीं स्नान । लवांकुशातें पूजोन ।
लक्ष्मीकुंडीं करीं स्नान । लक्ष्मीनारायण पूजावा ॥२१०॥

सूर्यकुंडीं करीं स्नान । श्राद्धकर्म आचरोन ।
सांबादित्य पूजोन । जावें पुढें बाळका ॥११॥

वैजनाथकुंड बरवें । तेथें स्नान तुवां करावें ।
वैजनाथातें पूजावें । एकभावेंकरुनिया ॥१२॥

गोदावरीकुंडेसी । स्नान करा भक्तींसी ।
गौतमेश्वर लिंगासी । पूजीं बाळ ब्रह्मचारी ॥१३॥

अगस्तिकुंडीं जावोनि । अगस्तेश्वरा नमूनि ।
स्नान करीं मनापासोनि । पूजा करीं भक्तिभावें ॥१४॥

शुक्रकूपीं करीं स्नान । करी शुक्रेश्वर अर्चन ।
मग पुढें अन्नपूर्णा नमून । पूजा करीं भावेंसी ॥१५॥

धुंडिराजातें पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्वर अर्चोन । दंडपाणि पूजावा ॥१६॥

आनंदभैरव वंदोनि । महाद्वारा जाऊनि ।
साष्‍टांगेसी नमोनि । विश्वनाथा अर्चिजे ॥१७॥

ऐसें दक्षिणमानस । यात्रा असे विशेष ।
ब्रह्मचारी करी हर्ष । योगिराज सांगतसे ॥१८॥

आतां उत्तरमानसासी । सांगेन विधि आहे कैशी ।
संकल्प करोनिया हर्षी । निघावें तुवां बाळका ॥१९॥

जावें पंचगंगेसी । स्नान करीं महाहर्षी ।
कोटिजन्मपाप नाशी । प्रख्यात असे पुराणीं ॥२२०॥

पंचगंगा प्रख्यात नामें । सांगेन असतीं उत्तमें ।
किरणा धूतपापा नामें । तिसरी पुण्यसरस्वती ॥२१॥

गंगा यमुना मिळोनी । पांचही ख्याति जाणोनि ।
नामें असती सगुणी । ऐक बाळा एकचित्तें ॥२२॥

कृतयुगीं त्या नदीसी । धर्मनदी म्हणती हर्षी ।
धूतपापा नाम तिसी । त्रेतायुगीं अवधारा ॥२३॥

बिंदुतीर्थ द्वारापासी । नाम जाण विस्तारेंसी ।
कलियुगाभीतरीं तिसी । नाम झालें पंचगंगा ॥२४॥

प्रयागासी माघमासीं । स्नान करितां फळें जैसीं ।
कोटिगुण पंचगंगेसी । त्याहूनि पुण्य अधिक असे ॥२५॥

ऐशापरी पंचगंगेसी । स्नान करीं गा भावेंसी ।
बिंदुमाधवपूजेसी । पूजा करीं गा केशवा ॥२६॥

गोपालकृष्ण पूजोनि । जावें नृसिंहभुवनीं ।
मंगळागौरी वंदोनि । गभस्तेश्वर पूजावा ॥२७॥

मयूखादित्यपूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
पुनरपि जावें हर्षी । विश्वेश्वरदर्शना ॥२८॥

मागुती मुक्तिमंडपासी । तुवां जावें भक्तींसी ।
संकल्पावें विधींसी । निघावें उत्तरमानसा ॥२९॥

मग निघा तेथून । आदित्यातें पूजोन ।
अमर्दकेश्वर अर्चोन । पापभक्षेश्वरा पूजिजे ॥२३०॥

नवग्रहातें पूजोनि । काळभैरवातें वंदूनि ।
क्षेत्रपाळातें अर्चोनि । काळकूपीं स्नान करीं ॥३१॥

पूजा करोनि काळेश्वरा । हंसतीर्थी स्नान करा ।
श्राद्धपितृकर्म सारा । ऐक बाळा एकचित्तें ॥३२॥

कृत्तिवासेश्वरा देखा । पूजा करोनि बाळका ।
पुढें जाऊनि ऐका । शंखवापीं स्नान करीं ॥३३॥

तेथें आचमन करोनि । रत्‍नेश्वरातें पूजोनि ।
सीतेश्वरा अर्चोनि । दक्षेश्वर पूजीं मग ॥३४॥

चतुर्वक्रेश्वरीं पूजा । करीं वो बाळा तूं वोजा ।
पुढें स्नान करणें काजा । वृद्धकाळकूपा जावें ॥३५॥

काळेश्वराचे पूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
अपमृत्येश्वरा हर्षी । पूजा करीं गा बाळका ॥३६॥

मंदाकिनी स्नान करणें । मध्यमेश्वरातें पूजणें ।
तेथोनि मग पुढें जाणें । जंबुकेश्वर पूजावया ॥३७॥

वक्रतुंडपूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
दंडखात कूपेसी । स्नान श्राद्ध तूं करीं ॥३८॥

पुढें भूतभैरवासी । पूजिजे ईशानेश्वरासी ।
जैगीषव्यगुहेसी । नमन करुनि पुढें जावें ॥३९॥

घंटाकुंडीं स्नान करीं । व्यासेश्वरातें अर्चन करीं ।
कंदुकेश्वरातें अवधारीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४०॥

ज्येष्ठवापीं स्नान करणें । ज्येष्ठेश्वरातें पूजणें ।
सवेंचि तुवां पुढें जाणें । स्नान सप्तसागरांत ॥४१॥

तेथोनि वाल्मीकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
भीमलोटा जाऊनि हर्षी । भीमेश्वर पूजावा ॥४२॥

मातृ-पितृकुंडेसी । करणें श्राद्धविधीसी ।
पिशाचमोचन तीर्थेसी । पुढें जावें अवधारा ॥४३॥

पुढें कपर्दिकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
कर्कोटकवापीसी । स्नान करीं गा बाळका ॥४४॥

कर्कोटकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
पुढें ईश्वरगंगेसी । स्नान दान करावें ॥४५॥

अग्नीश्वराचे पूजेसी । चक्रकुंडीं स्नानासी ।
तुंवा जावें भक्तींसी । श्राद्धकर्म करावें ॥४६॥

उत्तरार्क पूजोन । मत्स्योदरीं करीं स्नान ।
ओंकारेश्वर अर्चोन । कपिलेश्वर पूजीं मग ॥४७॥

ऋणमोचन तीर्थेसी । श्राद्धादि करावीं भक्तींसी ।
पापविमोचनतीर्थेसी । स्नानादि श्राद्धें करावीं ॥४८॥

तीर्थ कपालमोचन । स्नान श्राद्ध तर्पण ।
कुलस्तंभाप्रती जाऊन । पूजा करीं गा भक्तींसी ॥४९॥

असे तीर्थ वैतरणी । श्राद्ध करावें तेथें स्नानीं ।
विधिपूर्वक गोदानीं । देतां पुण्य बहुत असे ॥२५०॥

मग जावें कपिलधारा । स्नान श्राद्ध तुम्ही करा ।
सवत्सेसी द्विजवरा । गोदान द्यावें परियेसा ॥५१॥

वृषभध्वजातें पूजोन । मग निघावें तेथून ।
ज्वालानृसिंह वंदोन । वरुणासंगमीं तुम्हीं जावें ॥५२॥

स्नान श्राद्ध करोनि । केशवादित्य पूजोनि ।
आदिकेशव अर्चोनि । पुढें जावें परियेसा ॥५३॥

प्रल्हादतीर्थ असे बरवें । स्नान श्राद्ध तुवां करावें ।
प्रल्हादेश्वरातें पूजावें । एकभावें परियेसा ॥५४॥

कपिलधारा तीर्थ थोर । स्नान करावें मनोहर ।
पूजोनि त्रिलोचनेश्वर । असंख्यातेश्वरा पूजिजे ॥५५॥

पुढें जावें महादेवासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
द्रुपदेश्वर सादरेंसी । एकभावें अर्चावा ॥५६॥

गंगायमुनासरस्वतींशीं । तिन्ही लिंगें विशेषीं ।
पूजा करीं गा भक्तींसी । काम्यतीर्थ पाहें मग ॥५७॥

कामेश्वरातें पूजोनि । गोप्रतारतीर्थ स्नानीं ।
पंचगंगेसी जाऊनि । स्नान मागुतीं करावें ॥५८॥

मणिकर्णिकास्नान करणें । जलशायीतें पूजणें ।
हनुमंतातें नमन करणें । मोदादि पंच विनायकांसी ॥५९॥

पूजा अन्नपूर्णेसी । धुंडिराज परियेसीं ।
ज्ञानवापीं स्नानेंसी । ज्ञानेश्वर पूजावा ॥२६०॥

पूजीं दंडपाणीसी । मोक्षलक्ष्मीविलासासी ।
पूजा पंचपांडवासी । द्रौपदीदुपदविनायका ॥६१॥

पूजा आनंदभैरवासी । अविमुक्तेश्वर हर्षीं ।
पूजोनिया संभ्रमेंसी । विश्वनाथ संमुख सांगें ॥६२॥

श्लोक ॥ उत्तरमानसयात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥६३॥

ऐसा मंत्र जपोनि । साष्टांगें नमस्कारुनि ।
मग निघावें तेथोनि । पंचक्रोशयात्रेसी ॥६४॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र ऐकतां संतोषीं ।
येणेंचि तूं पावशी । चारी पुरुषार्थ इह सौख्य ॥६५॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टे साधिजे ॥६६॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीखंडीं यात्रा निरोपित ।
कथा असती पुराणविख्यात । एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥२६७॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीमहायात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥

॥ ओवीसंख्या ॥२६७॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥






गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

संकल्प करोनिया मनीं । जावें स्वर्गद्वाराभुवनीं ।
गंगाकेशव पूजोनि । हरिश्चंद्र मंडपा जावें ॥१॥

स्वर्गद्वार असे जाण । मणिकर्णिकातीर्थ विस्तीर्ण ।
तुवां तेथें जावोन । संकल्पावें विधीनें ॥२॥

हविष्यान्न पूर्व दिवशीं । करोनि असावें शुचीसी ।
प्रातःकाळीं गंगेसी । स्नान आपण करावें ॥३॥

धुंडिराजातें प्रार्थोनि । मागावें करुणावचनीं ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । विनवावें परियेसा ॥४॥

मग गंगेतें नमोनि । जावें विश्वनाथभुवनीं ।
मग तयाते पूजोनि । भवानीशंकर पूजावा ॥५॥

मग जावें मुक्तिमंडपासीं । नमोनि निघावें संतोषीं ।
धुंडिराजाचे पूजेसी । पुनरपि जावें परियेसा ॥६॥

मागुती यावें महाद्वारा । विश्वेश्वर-पूजा करा ।
मोदादि पंच विघ्नेश्वरा । नमन करावें दंडपाणीसी ॥७॥

पूजा आनंदभैरवासी । मागुतीं यावें मणिकर्णिकेसी ।
पूजोनिया ईश्वरासी । सिद्धिविनायक पूजावा ॥८॥

गंगाकेशव पूजोनि । ललितादेवीसी नमोनि ।
राजसिद्धेश्वर आणा ध्यानीं । दुर्लभेश्वर पूजावा ॥९॥

सोमनाथ पूजा करीं । पुढें शूलटंकेश्वरी ।
मग पूजा वाराहेश्वरी । द्शाश्वमेध पूजा मग ॥१०॥

बंदी देवीतें पूजोनि । सर्वेश्वरातें नमोनि ।
केदारेश्वर धरा ध्यानीं । हनुमंतेश्वर पूजावा ॥११॥

मग पूजावा संगमेश्वरी । लोलार्कातें अवधारीं ।
अर्कविनायका पूजा करीं । दुर्गाकुंडीं स्नान मग ॥१२॥

आर्यादुर्गां देवी पूजोनि । दुर्गा गणेश ध्याऊनि ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । प्रार्थावें तयासी ॥१३॥

विश्वकूपेंत ईश्वरासी । कर्दमतीर्थी स्नान हर्षी ।
कर्दमेश्वरपूजेसी । तुवां जावें बाळका ॥१४॥

जावें कर्दमकूपासी । पूजा मग सोमनाथासी ।
मग विरुपालिंगासी । पूजा करीं ब्रह्मचारी ॥१५॥

पुढें जावें नीलकंठासी । पूजा करीं गा भावेंसी ।
कर जोडोनि भक्तींसी । कर्दमेश्वर पूजावा ॥१६॥

पुनर्दर्शन आम्हांसी । दे म्हणावें भक्तींसी ।
मग निघावें वेगेंसी । नागनाथाचे पूजेतें ॥१७॥

पुढें पूजीं चामुंडेसी । मोक्षेश्वरा परियेसीं ।
वरुणेश्वर भक्तींसी । पूजा करीं गा बाळका ॥१८॥

वीरभद्रपूजेसी । जावोनि द्वितीय दुर्गेसी ।
अर्चावें विकटाक्षा देवीसी । पूजा करीं मनोभावें ॥१९॥

पूजीं भैरव उन्मत्त । विमळार्जुन प्रख्यात ।
काळकूटदेवाप्रत । पूजा करीं गा बाळका ॥२०॥

पूजा करीं महादेवासी । नंदिकेश्वर भैरवासी ।
भृंगेश्वर विशेषीं । पूजा करीं मनोहर ॥२१॥

गणप्रियासी पूजोनि । विरुपाक्षातें नमोनि ।
यक्षेश्वर अर्चोनि । विमलेश्वर पूजीं मग ॥२२॥

भीमचंडीं शक्तीसी । पूजीं चंडीविनायकासी ।
रविरक्ताक्ष गंधर्वासी । पूजा करीं मनोभावें ॥२३॥

ज्ञानेश्वर असे थोर । पूजा पुढें अमृतेश्वर ।
गंधर्वसागर मनोहर । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४॥

नरकार्णव तरावयासी । पूजीं भीमचंडीसी ।
विनवावें तुम्हीं त्यासी । पुनर्दर्शन दे म्हणावें ॥२५॥

एकपादविनायकासी । पुढें पूजीं भैरवासी ।
संगमेश्वरा भरंवसीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥२६॥

भूतनाथ सोमनाथ । कालनाथ असे विख्यात ।
पूजा करीं गा त्वरित । कपर्दिकेश्वरलिंगाची ॥२७॥

नागेश्वर कामेश्वर । पुढें पूजीं गणेश्वर ।
पूजा करीं विश्वेश्वर । चतुर्मुख विनायका ॥२८॥

पूजीं देहलीविनायकासी । पूजीं गणेश षोडशीं ।
उदंडगणेश षोडशीं । पूजा करीं मनोहर ॥२९॥

उत्कलेश्वर महाथोर । असे लिंग मनोहर ।
पुढें एकादश रुद्र । तयांचें पूजन करावें ॥३०॥

जावें तपोभूमीसी । पूजा करीं गा भक्तींसी ।
रामेश्वर महाहर्षीं । पूजीं मग सोमनाथ ॥३१॥

भरतेश्वर असे थोर । लक्ष्मणेश्वर मनोहर ।
पूजीं मग शत्रुघ्नेश्वर । भूमिदेवी अर्चीं मग ॥३२॥

नकुळेश्वर पूजोन । करीं रामेश्वरध्यान ।
पुनर्दर्शन दे म्हणोन । विनवावें परियेसा ॥३३॥

असंख्यात तीर्थ वरुण । तेथें करा तुम्हीं नमन ।
असंख्यात लिंगें जाण । पूजा करावी भक्तींसी ॥३४॥

पुढें असे लिंग थोर । नामें देव सिद्धेश्वर ।
पूजा करीं गा मनोहर । पशुपाणि विनायक ॥३५॥

याची पूजा करोनि । पृथ्वीश्वरातें नमोनि ।
शरयूकूपीं स्नान करोनि । कपिलधारा स्नान करीं ॥३६॥

वृषभध्वजा पूजोनि । ज्वालानृसिंहाचे वंदी चरणीं ।
वरुणासंगमीं स्नान करोनि । श्राद्धादि कर्मे करावीं ॥३७॥

संगमेश्वर पूजावा । सर्वविनायक बरवा ।
पुढें पूजीं तूं केशवा । भावें करुनि ब्रह्मचारी ॥३८॥

पूजा प्रर्‍हादेश्वरासी । स्नान कपिलातीर्थासी ।
त्रिलोचनेश्वरासी । पूजा करीं गा भक्तीनें ॥३९॥

पुढें असे महादेव । पंचगंगातीर ठाव ।
पूजा करीं गा भक्तिभावें । तया बिंदुमाधवासी ॥४०॥

पूजीं मंगळागौरीसी । गभस्तेश्वरा परियेसीं ।
वसिष्‍ठ वामदेवासी । पर्वतेश्वर पूजावा ॥४१॥

महेश्वराचे पूजेसी । पुढें सिद्धिविनायकासी ।
पूजा सप्तवर्णेश्वरासी । सर्वगणेश पूजावा ॥४२॥

मग जावें मणिकर्णिके । स्नान करावें विवेकें ।
विश्वेश्वरातें स्मरोनि निकें । महादेव पूजावा ॥४३॥

मग जावें मुक्तिमंडपासी । नमन करावे विष्णूसी ।
पूजीं दंडपाणीसी । धुंडिराज अर्चावा ॥४४॥

आनंदभैरव पूजोनि । आदित्येशा नमोनि ।
पूजा करीं गा भक्तींसी । मोदादि पंचविनायका ॥४५॥

पूजा करीं गा विश्वेश्वरासी । मोक्षलक्ष्मीविलासासी ।
नमोनि देवा संमुखेसी । मंत्र म्हणावा येणेंपरी ॥४६॥

श्लोक ॥ जय विश्वेश विश्वात्मन्‌ काशीनाथ जगत्पते ।
त्वत्प्रसादान्महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ॥४७॥

अनेकजन्मपापानि कृतानि मम शंकर ।
गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंगप्रदक्षिणा ॥४८॥

ऐसा मंत्र जपोन । पुढें करावें शिवध्यान ।
मुक्तिमंडपा येवोन । आठां ठायीं वंदावें ॥४९॥

प्रथम मुक्तिमंडपासी । नमन करावें परियेसीं ।
वंदोनि स्वर्गमंडपासी । जावें ऐश्वर्यमंडपा ॥५०॥

ज्ञानमंडपा नमोनि । मोक्षलक्ष्मीविलासस्थानीं ।
मुक्तिमंडपा वंदोनि । आनंदमंडपा जावें तुवा ॥५१॥

पुढें वैराग्यमंडपासी । तुवां जावें भक्तींसी ।
येणेंपरी यात्रेसी । करीं गा बाळा ब्रह्मचारी ॥५२॥

आणिक एक प्रकार । सांगेन ऐक विचार ।
नित्ययात्रा मनोहर । ऐक बाळका गुरुदासा ॥५३॥

सचैल शुचि होवोनि । चक्रपुष्करणीं स्नान करोनि ।
देवपितर तर्पोनि । ब्राह्मणपूजा करावी ॥५४॥

मग निघावें तेथोनि । पदादित्येश्वर पूजोनि ।
दंपत्येश्वर नमोनि । श्रीविष्णूतें पूजावें ॥५५॥

मग नमावा दंडपाणि । महेश्वरातें पूजोनि ।
मग निघावें तेथोनि । धुंडिराज अर्चिजे ॥५६॥

ज्ञानवापीं करी स्नान । नंदिकेश्वर अर्चोन ।
तारकेश्वर पूजोन । पुढें जावें मग तुवां ॥५७॥

महाकाळेश्वर देखा । पूजा करीं भावें एका ।
दंडपाणि विनायका । पूजा करीं मनोहर ॥५८॥

मग यात्रा विश्वेश्वर । करीं गा बाळका मनोहर ।
लिंग असे ओंकारेश्वर । प्रतिपदेसी पूजावा ॥५९॥

मत्स्योदरी तीर्थासी । स्नान करावें प्रतिपदेसी ।
त्रिलोचन महादेवासी । दोन्ही लिंगे असतीं जाण ॥६०॥

तेथें बीजतिजेसी । जावें तुवां यात्रेसी ।
यात्रा जाण चतुर्थीसी । कांचीवास लिंग जाणा ॥६१॥

रत्‍नेश्वर पंचमीसी । चंद्रेश्वरपूजेसी ।
षष्ठीसी जावें परियेसीं । ऐक शिष्या एकचित्तें ॥६२॥

सप्तमीसी केदारेश्वर । अष्टमीसी लिंग धूमेश्वर ।
विश्वेश्वर लिंग थोर । नवमी यात्रा महापुण्य ॥६३॥

कामेश्वर दशमीसी । एकादशीसी विश्वेश्वरासी ।
द्वादशीसी मणिकर्णिकेसी । मणिकेश्वर पूजावा ॥६४॥

त्रयोदशी प्रदोषेसी । पूजा अविमुक्तेश्वरासी ।
चतुर्दशीसी विशेषीं । विश्वेश्वर पूजावा ॥६५॥

जे कोणी काशीवासी । असती नर परियेसीं ।
त्यांणीं करावी यात्रा ऐसी । नाहीं तरी विघ्न घडे ॥६६॥

शुक्लपक्षीं येणेंपरी । यात्रा करीं मनोहरी ।
कृष्णपक्ष आलियावरी । यात्रा करा सांगेन ॥६७॥

चतुर्दशी धरोनि । यात्रा करा प्रतिदिनीं ।
सांगेन ऐका विधानीं । एकचित्तें परियेसा ॥६८॥

वरुणानदीं करा स्नान । करा शैल्येश्वरदर्शन ।
संगमेश्वर पूजोन । संगमीं स्नान तये दिनीं ॥६९॥

स्वर्गतीर्थस्नानेंसी । स्वर्गेश्वर पूजा हर्षी ।
मंदाकिनी येरे दिवसीं । मध्यमेश्वर पूजावा ॥७०॥

मणिकर्णिका स्नानेंसी । पूजा ईशानेश्वरासी ।
हिरण्यगर्भ परियेसीं । दोनी लिंगें पूजिजे ॥७१॥

स्नान धर्मकूपेसी । करीं पूजा गोपद्मेश्वरासी ।
पूजा करा तया दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥७२॥

कपिलधारा तीर्थासी । स्नान करा भक्तींसी ।
वृषभध्वज लिंगासी । सप्तमीचे दिवसीं पूजीं पै ॥७३॥

उपाशांतिकूपेसी । स्नान करा भक्तींसी ।
उपशांतेश्वरासी । पूजा करीं तया दिनीं ॥७४॥

पंचचूडडोहांत । स्नान करा शिव ध्यात ।
ज्येष्ठेश्वरा त्वरित । पूजावें तया दिनीं ॥७५॥

चतुःसमुद्रकूपासी । स्नान करीं भावेंसी ।
समुद्रेश्वर हर्षी । पूजा करीं तया दिनीं ॥७६॥

देवापुढें कूप असे । स्नान करावें संतोषें ।
शुक्रेश्वर पूजा हर्षें । पूजा करीं तया दिनीं ॥७७॥

दंडखात तीर्थेंसी । स्नान करोनि देवासी ।
व्याघ्रेश्वरपूजेसी । तुंवा जावें तया दिनीं ॥७८॥

शौनकेश्वरतीर्थेसी । स्नान तुम्ही करा हर्षीं ।
तीर्थनामें लिंगासी । पूजा करा मनोहर ॥७९॥

जंबुतीर्थ मनोहर । स्नान करा शुभाचार ।
पूजावा भावें जंबुकेश्वर । चतुर्दश लिंगें येणेंपरी ॥८०॥

शुक्लपक्षकृष्णेसी । अष्‍टमी तिथि विशेषीं ।
पूजावें तुम्हीं लिंगासी । सांगेन ऐका महापुण्य ॥८१॥

मोक्षेश्वर पर्वतेश्वर । तिसरा पशुपतेश्वर ।
गंगेश्वर नर्मदेश्वर । पूजा करीं मनोभावें ॥८२॥

आणिक भक्तेश्वर गभस्तीश्वर । मध्यमेश्वर असे थोर ।
तारकेश्वरनामें निर्धार । नव लिंगें पूजावीं ॥८३॥

आणिक लिंगें एकादश । नित्ययात्रा विशेष ।
लिंग असे अग्निध्रुवेश । यात्रा तुम्हीं करावी ॥८४॥

दुसरा असे उर्वशीश्वर । नकुलेश्वर मनोहर ।
चौथा असे आषाढेश्वर । भारभूतेश्वर पंचम ॥८५॥

लांगूलेश्वरीं करा पूजा । करा त्रिपुरांतका ओजा ।
मनःप्रकामेश्वरकाजा । तुम्हीं जावें परियेसा ॥८६॥

प्रीतेश्वर असे देखा । मंदालिकेश्वर ऐका ।
तिलपर्णेश्वर निका । पूजा करीं भावेंसी ॥८७॥

आतां शक्तियात्रेसी । सांगेन ऐका विधीसी ।
शुक्लपक्षतृतीयेसी । आठ यात्रा कराव्या ॥८८॥

गोप्रेक्षतीर्थ देखा । स्नान करोनि ऐका ।
पूजा मुख्य भाळनेत्रिका । भक्तिभावेंकरोनिया ॥८९॥

ज्येष्‍ठवापीं स्नानेंसी । ज्येष्‍ठागौरी पूजा हर्षीं ।
स्नान पान करा वापीसी । शृंगार सौभाग्य गौरीपूजा ॥९०॥

विशाळगंगास्नानासी । पूजा विशाळगौरीसी ।
ललितातीर्थस्नानेसी । ललिता देवी पूजावी ॥९१॥

स्नान भवानीतीर्थेसी । पूजा करा भवानीसी ।
बिंदुतीर्थ स्नानासी । मंगळागौरी पूजावी ॥९२॥

पूजा इतुके शक्तींसी । मग पूजिजे लक्ष्मीसी ।
येणें विधी भक्तींसी । यात्रा करीं मनोहर ॥९३॥

यात्रातीर्थ चतुर्थीसी । पूजा सर्व गणेशासी ।
मोदक द्यावे गौरीपुत्रासी । विघ्न न करीं तीर्थवासियांतें ॥९४॥

मंगळ अथवा रविवारेंसी । यात्रा करीं भैरवासी ।
षष्‍ठी तिथि परियेसीं । जावें तुम्हीं मनोहर ॥९५॥

रविवारीं सप्तमीसी । यात्रा रविदेवासी ।
नवमी अष्‍टमी चंडीसी । यात्रा तुम्हीं करावी ॥९६॥

अंतर्गृहयात्रेसी । करावी तुम्हीं प्रतिदिवसीं ।
विस्तारकाशीखंडासी । ऐक शिष्या ब्रह्मचारी ॥९७॥

ऐशी काशीविश्वेश्वर । यात्रा करावी तुम्हीं परिकर ।
आपुल्या नामीं सोमेश्वर । लिंगप्रतिष्ठा करावी ॥९८॥

इतुकें ब्रह्मचारियासी । यात्रा सांगितली परियेसीं ।
आचरण करीं येणें विधींसी । तुझी वासना पुरेल ॥९९॥

तुझे चित्तीं असे गुरु । प्रसन्न होईल शंकरु ।
मनीं धरीं गा निर्धारु । गुरुस्मरण करीं निरंतर ॥१००॥

इतकें सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं ।
ब्रह्मचारी म्हणे हर्षीं । हाचि माझा गुरु सत्य ॥१॥

अथवा होईल ईश्वर । मज कृपाळू झाला सत्वर ।
कार्यं लाधेल निर्धार । म्हणोनि मनीं धरियेलें ॥२॥

न आराधितां आपोआप । भेटला मातें मायबाप ।
गुरुभक्तीनें अमूप । सकाळाभीष्‍टें पाविजे ॥३॥

समस्त देवा ऐशी गति । दिल्यावांचोन न देती ।
ईश्वर भोळा चक्रवर्ती । गुरुप्रसादें भेटला ॥४॥

यज्ञ दान तप सायास । कांहीं न करितां सायास ।
भेटला मज विशेष । गुरुकृपेंकरोनिया ॥५॥

ऐसें गुरुस्मरण करीत । ब्रह्मचारी जाय त्वरित ।
विधिपूर्वक आचरत । यात्रा केली भक्तीनें ॥६॥

यात्रा करितां भक्तींसी । प्रसन्न झाला व्योमकेशी ।
निजस्वरुपें संमुखेसी । उभा राहिला शंकर ॥७॥

प्रसन्न होवोनि शंकर । म्हणे दिधला माग वर ।
संतोषोनि त्वष्‍ट्रकुमार । निवेदिता झाला वृत्तान्त ॥८॥

जें जें मागितलें गुरुवर्यें । आणिक त्याचे कन्याकुमारें ।
सांगता झाला विस्तारें । शंकराजवळी देखा ॥९॥

संतोषोनि ईश्वर । देता झाला अखिल वर ।
म्हणे बाळा माझा कुमार । सकळ विद्याकुशल होसी ॥११०॥

तुवां केली गुरुभक्ति । तेणें झाली आपणा तृप्ति ।
अखिल विद्या तुज होती । विश्वकर्मा तूंचि होसी ॥११॥

चतुर्विध पुरुषार्थ । लाधला तुज परमार्थ ।
सृष्‍टि रचावया समर्थ । होसी जाण त्वष्‍ट्रपुत्रा ॥१२॥

ऐसा वर लाधोन । त्वष्‍टा ब्रह्मानंदन ।
केलें लिंग स्थापन । आपुले नामीं परियेसा ॥१३॥

मग निघाला तेथोनि । केली आयती तत्क्षणीं ।
प्रसन्न होतां शूलपाणि । काय नोहे तयासी ॥१४॥

जें जें मागितलें श्रीगुरुवरें । सकळ वस्तु केल्या चतुरें ।
घेऊनिया सत्वरें । आला श्रीगुरुसंमुख ॥१५॥

सकळ वस्तु देऊनि । लागतसे श्रीगुरुचरणीं ।
अनुक्रमें गुरुरमणि । पुत्र-कन्येंसी वंदिलें ॥१६॥

उल्हास झाला श्रीगुरुसी । आलिंगितसे महाहर्षीं ।
शिष्य ताता ज्ञानराशि । तुष्‍टलों तुझे भक्तीनें ॥१७॥

सकल विद्याकुशल होसी । अष्टैश्वर्ये नांदसी ।
त्रैमूर्ति तुझिया वंशीं । होतील ऐक शिष्योत्तमा ॥१८॥

घर केलें तुवां आम्हांसी । आणिक वस्तु विचित्रेंसी ।
चिरंजीव तूंचि होसी । आचंद्रार्क तुझें नाम ॥१९॥

स्वर्गमृत्युपाताळासी । पसरवीं तुझे चातुर्यासी ।
रचिसी तूंचि सृष्‍टीसी । विद्या चौसष्‍टी तूंचि ज्ञाता ॥१२०॥

तुज वश्य अष्‍ट सिद्धि । होतील जाण नव निधि ।
चिंता कष्‍ट न होती कधीं । म्हणोनि वर देतसे ॥२१॥

ऐसा वर लाधोनि । गेला शिष्य महाज्ञानी ।
येणेंपरी विस्तारोनि । सांगे ईश्वर पार्वतीसी ॥२२॥

ईश्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी ।
एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्‍टें पावती ॥२३॥

भव म्हणिजे सागर । उतरावया पैल पार ।
समर्थ असे एक गुरुवर । त्रैमूर्तीचा अवतार ॥२४॥

या कारणें त्रैमूर्ति । गुरुचरणीं भजती ।
वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें सिद्धि नाहीं ॥२५॥

श्लोक ॥ यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ ।
तस्यैते कथिता ह्यर्था : प्रकाशन्ते महात्मनः ॥२६॥

ऐसें ईश्वर पार्वतीसी । सांगता झाला विस्तारेंसी ।
म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसी । निरोपिलें द्विजातें ॥२७॥

इतुकें होतां रजनीसी । उदय झाला दिनकरासी ।
चिंता अंधकारासी । गुरुकृपा ज्योती जाणा ॥२८॥

संतोषोनि द्विजवर । करिता झाला नमस्कार ।
ऐसी बुद्धि देणार । तूंचि स्वामी कृपानिधि ॥२९॥

नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी ।
स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥१३०॥

काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारोन ।
तया वेळीं होतों आपण । तुम्हांसहित तेथेंचि ॥३१॥

पाहिलें आपण दृष्‍टान्तीं । स्वामी काशीपुरीं असती ।
जागृतीं कीं सुषुप्तीं । नकळे मातें स्वामिया ॥३२॥

म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणा बहाळी । भक्तिभावेंकरोनिया ॥३३॥

जय जया परमपुरुषा । परात्परा परमहंसा ।
भक्तजनमानसहंसा । श्रीनृसिंहसरस्वती ॥३४॥

ऐसें तया अवसरीं । पूर्वज तुझा स्तोत्र करी ।
सांगेन तुज अवधारीं । एकचित्तें करुनिया ॥३५॥

श्लोक ॥ आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं ।
पश्चात्‌ क्षोणिजडा विनाश-दितिजां कृत्वाऽवतारं प्रभो ।
हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं, भूत्वाऽत्मजोऽत्रेर्गृहे ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३६॥

भूदेवाखिलमानुषं विदुजना बाधायमानं कलिं ।
वेदादुश्यमनेकवर्णमनुजा, भेदादि-भूतोन्नतम्‌ ।
छेदः कर्मतमांधकारहरणं श्रीपादसूर्योदयं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३७॥

धातस्त्वं हरिशंकरप्रतिगुरो, जाताग्रजन्मं विभो ।
हेतुः सर्वविदोजनाय तरणं, ज्योतिःस्वरुपं जगत्‌ ।
चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले, पातुः सदा सेव्ययं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३८॥

चरितं चित्रमनेककीर्तिमतुलं, परिभूतभूमंडले ।
मूकं वाक्यदिवांधकस्य नयनं, वंध्यां च पुत्रं ददौ ।
सौभाग्यं विधवां च दायकश्रियं, दत्त्वा च भक्तं जनं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥३९॥

दुरितं, घोरदरिद्रदावतिमिरं, हरणं जगज्जोतिष ।
स्वर्धेंनुं सुरपादपूजितजना, करुणाब्धिभक्तार्तितः ।
नरसिंहेंद्रसरस्वतीश्वर विभो, शरणागतं रक्षकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥१४०॥

गुरुमूर्तिश्चरणारविंदयुगलं, स्मरणं कृतं नित्यसौ ।
चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं सरितादि-भागीरथी ।
तुरगामेधसहस्त्रगोविदुजनाः स्मयक्‌ ददंस्तत्फलं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४१॥

नो शक्यं तव नाममंगल-स्तुवं, वेदागमागोचरं ।
पादद्वं ह्रदयाब्जमंतरजलं निर्धारमीमांसतं ।
भूयो भूयः स्मरन्नमामि मनसा, श्रीमद्‌गुरुं पाहि मां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४२॥

भक्तानां तरणार्थ सर्वजगतां, दीक्षां ददन्योगिनां ।
सुक्षेत्रं पुरगाणगस्थित प्रभो, दत्त्वा चतुष्कामदं ।
स्तुत्वा भक्तसरस्वतीगुरुपदं, जित्वाऽद्यदोषादिकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४३॥

एवं श्रीगुरुनाथमष्‍टकमिदं स्तोत्रं पठेन्नित्यसौ ।
तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरं आनंदवर्धं वपुः ।
पुत्रापत्यमनेकसंपदशुभा दीर्घायुरारोग्यतां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम्‌ ॥४४॥

येणेंपरी स्तोत्र करीत । मागुती करी दंडवत ।
सद्‌गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठियेले ॥४५॥

म्हणे त्रैमूर्ति अवतारु । तूंचि देवा जगद्गुरु ।
आम्हां दिसतोसी नरु । कृपानिधि स्वामिया ॥४६॥

मज दाविला परमार्थ । लाधलों चारी पुरुषार्थ ।
तूंचि सत्य विश्‍वनाथ । काशीपुर तुजपाशीं ॥४७॥

ऐसेंपरी श्रीगुरुसी । विनवीतसे परियेसीं ।
संतोषोनि महाहर्षीं । निरोप देती तये वेळीं ॥४८॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । दाखविली तुज काशी ।
पुढें तुझ्या वंशीं एकविसांसी । यात्राफळ तयां असे ॥४९॥

तूंचि आमुचा निजभक्त । दाखविला तुज दृष्‍टान्त ।
आम्हांपासीं सेवा करीत । राहें भक्ता म्हणती तया ॥१५०॥

जरी राहसी आम्हांपासी । तरी त्वां न वंदिजे म्लेंच्छासी ।
आणोनिया स्त्रीपुत्रांसी । भेटी करीं आम्हांतें ॥५१॥

निरोप देऊनि द्विजासी । गेले गुरु मठासी ।
आनंद झाला मनासी । श्रीगुरुदर्शनीं भक्तजना ॥५२॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां ।
विनवीतसे कर जोडोनि जाणा । भक्तिभावेंकरोनिया ॥५३॥

मागें कथानक निरोपिलें । सायंदेव शिष्य श्रीगुरुंनीं त्यातें निरोपिलें ।
कलत्रपुत्र आणीं म्हणत ॥५४॥

पुढें तया काय झालें । विस्तारोनि सांगा वहिलें ।
पाहिजे आतां अनुग्रहिलें । म्हणोनि चरणीं लागला ॥५५॥

संतोषोनि सिद्ध मुनि । सांगतसे विस्तारोनि ।
सायंदेव महाज्ञानी । गेला श्रीगुरुनिरोपें ॥५६॥

जाऊनि आपुले स्त्रियेसी । सांगता झाला पुत्रासी ।
आमुचा गुरु परियेसीं । असे गाणगापुरांत ॥५७॥

आम्हीं जावें भेटीसी । समस्त कन्यापुत्रांसी ।
म्हणोनि निघाला वेगेंसी । महानंदेंकरोनिया ॥५८॥

पावला गाणगापुरासी । भेटी जहाली श्रीगुरुसी ।
नमन करी भक्तींसी । साष्‍टांगीं तये वेळीं ॥५९॥

कर जोडुनी तये वेळीं । स्तोत्र करी वेळोवेळीं ।
ओंनमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥१६०॥

तूं त्रैमूर्तिचा अवतार । अज्ञानदृष्‍टीं दिससी नर ।
वर्णावया न दिसे पार । तुझा महिमा स्वामिया ॥६१॥

तुझा महिमा वर्णावयासी । शक्ति कैची आम्हांसी ।
आदिपुरुष भेटलासी । कृपानिधि स्वामिया ॥६२॥

जैसा चंद्र चकोरासी । उदय होतां संतोष त्यासी ।
तैसा आनंद आम्हांसी । तुझे चरण लक्षितां ॥६३॥

पूर्वजन्मीं पापराशि । केल्या होत्या बहुवशी ।
श्रीगुरुचे दर्शनेसी । पुनीत झालों म्हणतसे ॥६४॥

जैसा चिंतामणि स्पर्शीं । हेमत्व होय लोहासी ।
मृत्तिका पडतां जंबूनदीसी । उत्तम सुवर्ण होतसे ॥६५॥

जातां मानससरोवरासी । हंसत्व येई वायसासी ।
तैसें तुझे दर्शनेंसी । पुनीत झालों स्वामिया ॥६६॥

श्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तस्था ।
पापं तापं च हरति दैन्यं च गुरुदर्शनम्‌ ॥१॥

टीका ॥ गंगा स्नानानें पापें नाशी । ताप निवारी देखा शशी ।
कल्पवृक्षछायेसी । कल्पिलें फळ पाविजे ॥६७॥

एकेकाचे एकेक गुणें । असतीं ऐसीं हीं लक्षणें ।
दर्शन होतां श्रीगुरुचरणें । तिन्ही फळें पाविजे ॥६८॥

पापें हरती तात्काळीं । तापचिंता जातीं सकळी ।
दैन्यकानन समूळ जाळी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥६९॥

चतुर्विध पुरुषार्थ । देता होय गुरुनाथ ।
ऐसा वोले वेदसिद्धान्त । तोचि आम्हीं देखिला ॥१७०॥

म्हणोनिया आनंदेंसी । गायन करी संतोषीं ।
अनेक रागें परियेसीं । कर्नाटक भाषें करोनि ॥७१॥

राग श्रीराग । कंडेनिंदु भक्तजनराभाग्यनिधियभूमंडलदोळगेनारसिंहसरस्वतीया ॥७२॥

कंडेनिंदुउंडेनिंदुवारिजादोळपादवाराजाकमळांदोळदंतध्यानिसी ॥७३॥

सुखसुवाजनारुगळा । भोरगेलान्नेकामिफळफळा ।
नित्यसकळाहूवा । धीनारसिंहसरस्वतीवरानना ॥७४॥

वाक्यकरुणानेनसुवा । जगदोळगदंडकमंडलुधराशी ।
सगुणानेनीशीसुजनरिगे । वगादुनीवासश्रीगुरुयतिवरान्न ॥७५॥

धारगेगाणगापुरडोलकेलाशीहरी । दासिसोनुनादयाकरुणादली । वरावीतुंगमुनाहोरावनुअनुबिना ।
नारसिंहसरस्वतीगुरुचरणवन्न ॥७६॥

राजगखंडीकंडीनेननमा । इंदुकडेनेनमा ।
मंडलादोळगेयती कुलराये । चंद्रमन्ना ॥७७॥

तत्त्वबोधायाउपनिषदतत्त्वचरित नाव्यक्तवादपरब्रह्ममूर्तियनायना ।
शेषशयनापरवेशकायना । लेशकृपयनीवनेवभवासौपालकाना ॥७८॥

गंधपरिमळादिशोभितानंदासरसाछंदालयोगेंद्रेगोपीवृंदवल्लभना ॥७९॥

करीयनीयानांपापगुरु । नवरसगुसायन्नीं ।
नरसिंहसरस्वत्यन्ना । नादपुरुषवादना ॥१८०॥

यापरी स्तोत्रें श्रीगुरुसी । स्तुति केली बहुवसीं ।
संतोषोनि महाहर्षीं । आश्वासिताती तये वेळीं ॥८१॥

प्रेमभावें समस्तांसी । बैसा म्हणती समीपेसी ।
जैसा लोभ मायेसी । या बाळकावरी परियेसा ॥८२॥

आज्ञा घेउनी सहज । गेला तुमचा पूर्वज ।
सकळ पुत्रांसहित द्विज । आला श्रीगुरुदर्शना ॥८३॥

भाद्रपद चतुर्दशीसी । शुक्लपक्ष परियेसीं ।
आला शिष्य भेटीसी । एकाभावेंकरोनिया ॥८४॥

येती शिष्य लोटांगणीं । एकाभावें तनुमनीं ।
येऊनि लागती चरणीं । सद्गदित कंठ झाला ॥८५॥

स्तोत्र करिती तिहीं काळीं । कर जोडोनि तये वेळीं ।
ओं नमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥८६॥

त्रैमूर्तींचा अवतारु । झालासी तूं जगद्गुरु ।
येरां दिसतोसी नरु । न कळे पार तुझा स्वामिया ॥८७॥

सिद्ध म्हणे नामकरणी । काय सांगू तये दिनीं ।
कैशी कृपा अंतःकरणीं । तया श्रीगुरु यतीचे ॥८८॥

आपुले पुत्रकलत्रेंसी । जैसा लोभ परियेसीं ।
तैसा तुमचे पूर्वजासी । प्रेमभावें पुसताती ॥८९॥

गृहवार्ता सुरसी । क्षेम पुत्रकलत्रेंसी ।
द्विज सांगे मनोहर्षी । सविस्तारीं परियेसा ॥१९०॥

पुत्रकलत्रेंसंहित नमोन । सांगे क्षेम समाधान ।
होते पुत्र चौघेजण । चरणावरी घातले ॥९१॥

ज्येष्‍ठसुत नागनाथ । तयावरी कृपा बहुत ।
कृपानिधि गुरुनाथ । माथां हस्त ठेविती ॥९२॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । तुझ्या ज्येष्‍ठसुतासी ।
आयुष्य पूर्ण असे त्यासी । संतति बहु याची वाढेल ॥९३॥

हाच भक्त आम्हांसी । असेल श्रियायुक्तेसी ।
तुवां आतां म्लेंच्छासी । सेवा न करावी म्हणितलें ॥९४॥

आणिक तूंतें असे नारी । पुत्र होती तीस चारी ।
नांदतील श्रेयस्करी । तुवां सुखें असावें ॥९५॥

जया दिवसीं म्लेंच्छासी । तुवां जावोनि वंदिसी ।
हानि असे जीवासी । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥९६॥

तुझा असे वडिल सुत । तोचि आमुचा निज भक्त ।
त्याची कीर्ति वाढेल बहुत । म्हणती श्रीगुरु तये वेळीं ॥९७॥

मग म्हणती द्विजासी । जावें त्वरित संगमासी ।
स्नान करोनि त्वरितेंसी । यावें म्हणती तये वेळीं ॥९८॥

ग्रामलोक तया दिवसीं । पूजा करितां अनंतासी ।
येऊनिया श्रीगुरुसी । पूजा करितो परियेसा ॥९९॥

पुत्रमित्रकलत्रेंसी । गेले स्नाना संगमासी ।
विधिपूर्वक अश्वत्थासी । पूजूनि आले मठातें ॥२००॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी ।
पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥१॥

ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु ।
आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥२॥

तये वेळीं श्रीगुरु । सांगतां झाला विस्तारु ।
कौंडिण्यमहाऋषीश्वरु । केलें व्रत प्रख्यात ॥३॥

ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु ।
कैसें व्रत आचरावें साचारु । पूर्वीं कोणी केलें असे ॥४॥

ऐसें व्रत प्रख्यात । व्रत दैवत अनंत ।
जेणें होय माझें हित । कथामृत निरोपिजे ॥५॥

येणें पुण्य काय घडे । काय लाभतसे रोकडें ।
ऐसें मनींचें साकडें । फेडावें माझें स्वामिया ॥६॥

ऐसें विनवीतसे द्विजवरु । संतोषोनि गुरु दातारु ।
सांगते झाले व्रताचारु । सिद्ध म्हणे नामधारका ॥७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सांगे गुरुचरित्रविस्तारु ।
ऐकतां भवसागरु । पैल पार पाववी श्रीगुरु ॥८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीयात्रा समस्त करीत ।
श्रोते ऐकती आनंदित । तेणें सफल जन्म होय ॥९॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सांगतसे नामधारक विख्यात ।
जेणें होय मोक्ष प्राप्त । द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥२१०॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीक्षेत्रमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥

॥ ओवीसंख्या ॥२१०॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥




गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी ।
विस्तारावें आम्हांसी । कृपा करीं गा दातारा ॥१॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । समस्त भक्त सेवा करितां ।
त्यांत एक विणकर तंतिक अत्यंता । करीतसे भक्ति श्रीगुरुची ॥२॥

तीन प्रहर संसारयात्रा । करुनि येतसे पवित्रा ।
राजांगण झाडी विचित्रा । नमस्कार करी दुरोनि ॥३॥

ऐसे किती दिवस क्रमिले । व्रत शिवरात्री आलें ।
समस्त यात्रेसी निघाले । मातापिता तंतिकाचे ॥४॥

त्यासी बोलाविती यात्रेसी । तो म्हणतसे नयें तयांसी ।
तुम्ही मूर्ख असा पिसीं । माझा श्रीपर्वत येथेंचि असे ॥५॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणिजे श्रीगुरुभुवन ।
आपण न यें येथून । चरण सोडोनि श्रीगुरुचे ॥६॥

समस्त लोक त्यासी हांसती । पिसें लागलें यासी म्हणती ।
चला जाऊं म्हणोनि निघती । भ्राता माता पिता त्याचे ॥७॥

नगरलोक समस्त गेला । आपण एकला राहिला ।
श्रीगुरुमठासी आला । गुरु पुसती तयासी ॥८॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कां गा यात्रेसी तूं न वचसी ।
तंतिक म्हणे स्वामीसी । माझी यात्रा तुमचे चरण ॥९॥

नाना तीर्थयात्रादि देखा । तुमचे चरणीं असे निका ।
वायां जाती मूर्ख लोक । पाषाणदर्शन करावया ॥१०॥

ऐसें म्हणोनि तंतिक । नमस्कार करी नित्य देख ।
तंव पातली शिवरात्रि ऐक । माघवद्य चतुर्दशी ॥११॥

श्रीगुरु होते संगमासी । दोन प्रहर होतां भक्त परियेसीं ।
आपण गेला स्नानासी । उपवास असे शिवरात्रीचा ॥१२॥

संगमीं स्नान करोनि । श्रीगुरुतें नमस्कारोनि ।
उभा ठेला कर जोडोनि । भक्तिपूर्वक एकोभावें ॥१३॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुझीं समस्त गेलीं यात्रेसी ।
तूं एकलाचि राहिलासी । पहातासी विनोद श्रीपर्वताचा ॥१४॥

पुसती कधीं देखिलासी ? । म्हणे स्वामी नेणें कधींसी ।
तुमचे चरणीं आम्हांसी । सर्व यात्रा सदा असती ॥१५॥

त्याचा भाव पाहोनी । जवळी बोलाविती श्रीगुरुमुनि ।
बैस म्हणती कृपा करुनि । दाखवूं म्हणती श्रीपर्वत ॥१६॥

नयन झांकूनि पादुकेसी । दृढ धरीं गा वेगेंसीं ।
ऐसें म्हणोनि तयासी । मनोवेगें घेऊनि गेले ॥१७॥

क्षण न लागतां श्रीगिरीसी । घेऊनि गेले भक्तासी ।
तीरीं बैसले पाताळगंगेसी । नयन उघडीं म्हणती त्यातें ॥१८॥

क्षणैक मात्र निद्रावस्था । म्हणतां झाला जागृता ।
अवलोकितां पर्वत दिसत । म्हणे स्वप्न किंवा सत्य ॥१९॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कां गा भ्रांतपणें पाहसी ।
वेगें जावें दर्शनासी । क्षौर स्नान करुनियां ॥२०॥

श्रीगुरु ऐसे निरोप देतां । शीघ्र गेला स्नानाकरितां ।
तेथें देखिलीं मातापिता । भ्राता ग्रामलोक सकळिक ॥२१॥

ते पुसती तयासी । कवणें मार्गें आलासी ।
आमुची भेटी कां न घेसी । लपून येणें कोण धर्म ॥२२॥

विनवीतसे मातापित्यांसी । आम्ही निघालों आजि दोन प्रहरेंसी ।
एक घटिका लागली वाटेसी । आतां आलों गुरुसमागमें ॥२३॥

एक हांसती मिथ्या म्हणती । आम्हांसवेंचि आला लपत ।
ऐसें बडिवारें बोलत । अबद्ध म्हणती सकळ जन ॥२४॥

तो कोणासवें न बोले । शीघ्र स्नान क्षौर केलें ।
पुष्पें अक्षता बेलें । घेऊनि गेला पूजेसी ॥२५॥

पूजा करितां लिंगस्थानीं । देखता झाला श्रीगुरुमुनि ।
अति विस्मय करोनि । पूजा केली मनोभावें ॥२६॥

समस्त लोक पूजा करिती । श्रीगुरु सर्व पूजा घेती ।
तंतिक म्हणतसे चित्तीं । श्रीगुरुराज आपणचि शंकर ॥२७॥

ऐसा निर्धार करुनि । पाहिजे प्रसाद-फल खुणी ।
घेऊनि आला गुरुसंनिधानीं । एकचित्तें परियेसा ॥२८॥

श्रीगुरु पुसती तयासी । एधवां राहसी किंवा जासी ।
तंतिक विनवी स्वामियासी । एक देखिलें नवल आतां ॥२९॥

समस्त लोक जाऊनि । देवालयाभीतरीं बैसोनि ।
पूजा करिती तुमचे चरणीं । लिंग न देखों तुम्हीच तेथें ॥३०॥

श्रीगुरु तूं जवळीच असतां । इतुके दुरी कां कष्‍टती वृथा ।
लोक येताति बहुता । काय कारण या स्थाना ॥३१॥

तूं तरी केवळ परमेश्वर । दिसतोसि आम्हां नर ।
न कळे तुझा महिमा अपार । गौप्यरुपें गुरुनाथा ॥३२॥

सर्व जन मूढ होऊन । नेणती तुझें महिमान ।
कां हो येताति या स्थानीं । विस्तारोनि सांग मज ॥३३॥

श्रीगुरु म्हणती ऐक भक्ता । सर्वत्र ईश्वरपूर्णता ।
स्थानमहिमा असे ख्याता । जे अगम्य त्रिभुवनीं ॥३४॥

तंतिक म्हणे स्वामियासी । तूं तरी पूर्ण ब्रह्म होसी ।
स्थानमहिमा वानिसी । विस्तारुनि सांग आम्हां ॥३५॥

श्रीगुरु निरोपिती भक्तासी । येथील महिमा पुससी ।
सांगेन ऐक विस्तारेंसीं । स्कंदपुराणीं असे कथा ॥३६॥

माघवद्य चतुर्दशी । अपार महिमा श्रीपर्वतासी ।
सांगेन ऐक तत्परेसीं । श्रीगुरु म्हणती तंतिकातें ॥३७॥

पूर्वी ख्यात किरातदेशीं । 'विमर्षण' राजा परियेसीं ।
शूर असे पराक्रमेंसीं । समस्त शत्रु जिंकिले तेणें ॥३८॥

आणिक एक कुबुद्धि असे । पारधी करी बहुवसें ।
बलाढय स्थूळ बहु असे । चंचळ सकळ-स्त्रियारत ॥३९॥

सर्वमांस भक्षण करी । ग्राह्य अग्राह्य न विचारी ।
ऐसा वर्ते दुराचारी । ईश्वर पूजी भक्तिभावें ॥४०॥

नित्य पूजा करी अपार । शिवरात्रि आलिया हर्षनिर्भर ।
गीत नृत्य वाद्य परिकर । भक्तिपूर्वक करी पूजा ॥४१॥

आचार तरी बरवा नसे । शिवपूजा करी बहुवसें ।
पत्‍नी त्यासी एक असे । सुलक्षण नाम 'कुमुद्वती' ॥४२॥

सुशील सुगुण पतिव्रता । मनीं करी बहुत चिंता ।
पुरुष आपुला परद्वाररता । ईश्वरभक्ति करीतसे ॥४३॥

ऐसें क्रमितां एके दिवसीं । पुसों लागली आपुले पुरुषासी ।
म्हणे प्राणेश्वरा परियेसीं । विनंति एक असे माझी ॥४४॥

क्षमा करावी माझिया बोला । विस्तारोनि सांगावें सकळा ।
तुम्ही दुराचारी भक्षितां सकळां । परद्वार निरंतर ॥४५॥

तुम्हांला ईश्वरावरी । भक्ति उपजली कवणेपरी ।
सांगावें स्वामी सविस्तारीं । कोप न करावा प्राणनाथा ॥४६॥

राजा म्हणे स्त्रियेसी । बरवें पुसिलें आम्हांसी ।
ज्ञान झालें आतां मानसीं । पूर्व जन्म सांगेन माझा ॥४७॥

पूर्वीं पंपानगरीं आपण । श्वानयोनीं जन्मोन जाण ।
होतों तेथें काळ क्रमोन । शिवरात्रि आली एके दिवसीं ॥४८॥

त्या नगरीं होतें एक शिवालय । समस्त लोक आले पूजावया ।
आपणही गेलों हिंडावया । भक्षावया कांहीं मिळेल म्हणोनि ॥४९॥

उत्साहें लोक पूजा करिती । नाना वाजंतरें वाजतीं ।
गर्भगृहीं प्रदक्षिणा करिती । धरुनि आरति सकळिक ॥५०॥

आपण गेलों द्वारांत । विनोदें पाहूं म्हणत ।
मज देखोनि आले धांवत । काष्‍ठ पाषाण घेवोनियां ॥५१॥

आपण पौळीमध्यें होतों पळत । द्वार घातलें मारूं म्हणत ।
धरा धरा मारा म्हणोनि बोलत । मारुं लागले पाषाणीं ॥५२॥

वाट नाहीं बाहेर जावयासी । अभिलाष असे जीवासी ।
पळतसें देवालयभीतरेसी । मार्ग नाहीं कोठें देखा ॥५३॥

बाहेर जाईन म्हणत । द्वाराकडे मागुती येत ।
सवेंचि लोक पाठीं लागत । सव्य प्रदक्षिणा पळतसें ॥५४॥

लपावया ठाव नाहीं देखा । वेष्‍टिलों पौळीं दुर्गासरिखा ।
पाठी लागले सकळिका । पुन्हा पौळींत पळे तैसाचि ॥५५॥

उच्छिष्‍ट कांहीं मिळेल म्हणोनि । देउळांत गेलों भामिनी ।
काकुळती बहु मनीं । प्राण वांचेल म्हणोनियां ॥५६॥

ऐसा तीन वेळां पळालों । मारतील म्हणोनि बहु भ्यालों ।
मग अंतरगृहीं निघालों । पूजा देखिली तेथ शिवाची ॥५७॥

द्वार धरोनि समस्त लोक । शस्त्रें मारिलें मज ऐक ।
ओढोनि टाकिती सकळिक । शिवालयाबाहेरी ॥५८॥

मज पुण्य घडलें प्रदक्षिणीं । पूजा देखिली नयनीं ।
तेणें पुण्यें राजा होउनि । उपजलों ऐक प्राणेश्वरी ॥५९॥

शिवरात्रि होती ते दिवसीं । न मिळे उच्छिष्‍ट भुक्तीसी ।
प्राण त्यजिला उपवासी । तेंही पुण्य मज घडलें ॥६०॥

आणिक एक पुण्य घडलें । दीपमाळीस दीपक उजळले ।
ते म्यां डोळां देखिले । प्राण त्यजिला शिवद्वारीं ॥६१॥

तेणें पुण्यें झालें ज्ञान । ऐक शिवरात्रीचें महिमान ।;
म्हणसी तूं दुराचारी म्हणोनि । त्याचा संदेह सांगेन ॥६२॥

पूर्वजन्म माझा श्वान । त्याचा स्वभाव सर्वभक्षण ।
सर्वां ठायीं त्याची वासना । तेचि स्वभाव मज असती ॥६३॥

ऐसें स्त्रियेसी सांगितलें । पुन्हा प्रश्न तिणें केले ।
म्हणे स्वामी जें सांगितलें । आपुला जन्म पुरातन ॥६४॥

तुम्ही असा सर्वज्ञानी । माझा जन्म सांगा विस्तारुनि ।
म्हणोनि लागतसे चरणीं । कृपा करीं गा प्राणेश्वरा ॥६५॥

ऐक वपुषे ज्ञान सती । तुझा पूर्व जन्म कपोती ।
करीत होतीस उदरपूर्ती । एके दिवसीं अवधारीं ॥६६॥

पडिला होता मांसगोळा । तो तुवां चोंचीनें धरिला कवळा ।
उडत होतीस आकाशमंडळा । तें दुरुनि देखिलें घारीनें ॥६७॥

कवळ घेईन म्हणोनि । घार आली धांवोनि ।
तूं गेलीस वो पळोनि । महारण्य क्रमीत ऐका ॥६८॥

पाठीं लागली ते घारी । मागें पुढें न विचारी ।
तूं पळालीस ते अवसरीं । श्रीपर्वत-गिरीवरी ॥६९॥

सवेंचि आली ते घारी । तूं गेलीस शिवालय-शिखरीं ।
भोंवों लागलीस प्रदक्षिणापरी । श्रम जाहले तुज बहुत ॥७०॥

दुरोनि आलीस धांवत । प्राण होता कंठगत ।
श्रमोनि शिखरीं तूं बैसत । घारीं येऊनि मारिलें चोंचीं ॥७१॥

घेऊनि गेली मांस-कवळें । तुझें देह पंचत्व पावलें ।
प्रदक्षिणा-पुण्य फळलें । झालीस तुवां राजपत्‍नी ॥७२॥

इतुकिया अवसरीं । पुनः पतीस प्रश्न करी ।
आतां तुमच्या निरोपावरी । ईश्वरपूजा करीन ॥७३॥

पुढें मज काय होईल । तुम्हीं कवण स्थानीं असाल ।
तें विस्तारावें प्राणेश्वरा निर्मळ । आत्मपति राजेंद्रा ॥७४॥

राजा सांगे सतीसी । पुढील जन्म कन पुससी ।
आपण राजा सिंधुदेशीं । जन्म पावेन अवधारीं ॥७५॥

माझी भार्या तूंचि होसी । जन्म पावसी सृंजयदेशीं ।
तेथील राजा पवित्रवंशी । त्याची कन्या होसील ॥७६॥

तिसरा जन्म आपणासी । राजा होईन सौराष्‍ट्रदेशीं ।
तूं उपजसी कलिंगराजवंशीं । माझी पत्‍नी होसील ॥७७॥

चवथा जन्म आपणासी । राजा होईन गांधारदेशीं ।
तूं उपजसी मागध कुळेसी । तैंही माझी प्राणेश्वरी ॥७८॥

पांचवा जन्म आपणासी । राजा होईल अवंतदेशीं ।
तूं दाशार्हराजकुळीं जन्मसी । माझी भार्या होसील तूं ॥७९॥

सहावा जन्म आपणासी । आनर्त नाम राजा परियेसीं ।
यायातिकन्या तूं होसी । तैंही माझी प्राणेश्वरी ॥८०॥

सातवा जन्म आपणासी । राजा होईन पांडयदेशीं ।
रुप लावण्य मजसरसीं । नोहे कवण संसारीं ॥८१॥

ज्ञानी सर्वगुणी होईन । सूर्यकांति ऐसें वदन ।
जैसा रुपें असे मदन । नाम माझें 'पद्मवर्ण' ॥८२॥

तूं जन्मसी वैदर्भकुळीं । रुपसौंदर्यें आगळी ।
जैसी सुवर्णाची पुतळी । चंद्रासारिखें मुखकमळ ॥८३॥

'वसुमती' असें नांव पावसी । तुज वरीन स्वयंवरेंसीं ।
दमयंती नळा जैसी । स्वयंवर होईल तुज मज ॥८४॥

राज्य करीन बहुत दिवस । यज्ञ करीन असमसाहस ।
जिंकीन समस्त देशांस । मंत्रशास्त्र शिकेन बहु ॥८५॥

देवद्विजार्चन करीन । नाना अग्रहार दान देईन ।
ऐशापरी वृद्धाप्य होऊन । राज्यीं स्थापीन पुत्रासी ॥८६॥

आपण चवथा आश्रम घेईन । अगस्त्यऋषीपाशीं जाईन ।
ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन । अंतकाळ होय तंव ॥८७॥

देहावसान होतां । तुज घेईन सांगाता ।
दिव्य विमानीं बैसोनि तत्त्वता । स्वर्गाप्रती जाऊं बळें ॥८८॥

ईश्वरपूजेची महिमा । शिवरात्रिव्रत श्रीशैल्य अनुपम्या ।
म्हणोनि राजा स्त्री घेऊनि संगमा । यात्रा करी शिवरात्री ॥८९॥

श्रीगुरु म्हणती तंतिकासी । शिवरात्री-श्रीपर्वत-महिमा ऐसी ।
ऐक तो श्वान परियेसीं । सप्तजन्मीं राजा झाला ॥९०॥

अंतीं पावला स्वर्गलोक । पर्वतमहिमा ऐसा ऐक ।
तुज जाहलें गुरुमुख । ईश्वरपूजा करीं बरवी ॥९१॥

ग्रामीं असे कल्लेश्वर । गाणगाग्रामीं भीमातीर ।
पूजा करीं गा निरंतर । मल्लिकार्जुनसमान ॥९२॥

संगमेश्वर संगमासी । पूजा करीं अहर्निशीं ।
मल्लिकार्जुन तोचि परियेसीं । न धरीं संदेह मनांत ॥९३॥

तंतिक म्हणे स्वामियासी । स्वामी तूं मज चाळविसी ।
पूजेसि गेलों मल्लिकार्जुनासी । लिंगस्थानीं तुज देखिलें ॥९४॥

सर्वां ठायीं तूंचि एक । झाला अससी व्यापक ।
कल्लेश्वर संगमनायक । एकेक सांगसी आम्हांपुढें ॥९५॥

ऐकोनि श्रीगुरु हांसती । ये रे पादुका धरीं म्हणती ।
नयन त्याचे झांकिती । संगमा आले तात्काळीं ॥९६॥

इतुकिया अवसरीं । मागें गाणगापुरीं ।
श्रीगुरुसी पाहती गंगातीरीं । कोठें गेले म्हणोनियां ॥९७॥

एक म्हणती संगमीं होता । एक म्हणती आम्हीं आलों आतां ।
कोठें गेले पहा म्हणतां । चुकर होती भक्तजन ॥९८॥

श्रीगुरु आले संगमासी । तंतिकास पाठविती मठासी ।
बोलावावया शिष्यांसी । आपण राहिले संगमांत ॥९९॥

तंतिक आला गांवांत । लोक समस्त हांसत ।
क्षौर कां रे केलें म्हणत । तंतिक म्हणे श्रीपर्वता गेलों होतों ॥१००॥

दवणा प्रसाद विभूति । नानापरींचे हार दाखविती ।
लोक ऐसा विस्मय करिती । म्हणती दोनप्रहरीं घरीं होता ॥१॥

एक म्हणती सत्य मिथ्या । त्यासी म्हणती सांग रे सत्या ।
तंतिक म्हणे सवें गुरुनाथा । गेलों होतों वायुवेगें ॥२॥

श्रीगुरु आले संगमासी । मज पाठविलें मठासी ।
बोलाविलें शिष्यांसी । राहूं पाहती आजि संगमीं ॥३॥

एक म्हणती होईल सत्य । मूर्ख म्हणती नव्हे, मिथ्य ।;
तंतिक गेला त्वरित । शिष्यवर्गांसी जाणविलें ॥४॥

सांगितला सकळ वृत्तांत । समस्त गेले संगमा त्वरित ।
पूजा जाहली संगमीं बहुत । सिद्ध म्हणे नामधारकासी ॥५॥

मिथ्या म्हणती जे लोक । त्यांसी होईल कुंभीपाक ।
पंधरा दिवसीं ऐक । यात्रालोक गांवा आले ॥६॥

मग पुसती तयांसी । तेहीं सांगितलें भरंवसीं ।
आनंद झाला भक्तांसी । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥७॥

सिद्धें सांगितलें नामधारकासी । तें मी सांगतसें परियेसीं ।
श्रीगुरुमहिमा अपारेंसी । अमृत सेवितों निरंतर ॥१०८॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीशैलशिवरात्रिमहिमावर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥४३॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या १०८ )

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु






गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धमुनि । श्रीगुरुचरित्र तुम्ही देखिलें नयनीं ।
तुमचें भाग्य काय वानूं वदनीं । परब्रह्म देखिलें असे ॥१॥

तुमचेनि प्रसादेंसीं । अमृतपान झालें आम्हांसी ।
आतां कष्‍ट आम्हां कायसी । सकळाभीष्‍ट लाधलों ॥२॥

तुम्ही भेटलेति मज तारका । दैन्य गेलें सकळ दुःख ।
सर्वाभीष्‍ट लाधलों सुख । गुरुचरित्र ऐकतां ॥३॥

मागें कथानक सांगितलें । श्रीगुरु संगमीं राहिले ।
पुढें काय अपूर्व वर्तलें । निरोपावें दातारा ॥४॥

सिद्ध सांगे नामधारकासी । ऐक वत्सा विस्तारेंसीं ।
विचित्र झालें येरे दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥५॥

'नंदी' नाम एक ब्राह्मण । सर्वांगीं कुष्‍ट श्वेतवर्ण ।
तुळजापुरा जाऊन । वर्षें तीन आराधिलें ॥६॥

तीन संवत्सर उपवास । द्विज कष्‍टला बहुवस ।
निरोप झाला सायासें । चंदलापरमेश्वरीजवळी जाणें ॥७॥

जगदंबेचा निरोप घेऊनि । आला चंदलापरमेश्वरीस्थानीं ।
मास सात पुरश्चरणीं । पुनरपि केले उपवास ॥८॥

नानापरी कष्‍टतां । स्वप्‍न जाहलें अवचिता ।
तुवां जावें त्वरिता । गाणगग्रामस्थानासी ॥९॥

तेथें असती श्रीगुरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
वेष धरिला असे नरु । तेथें होसील उत्तमांगी ॥१०॥

ऐसे निरोप त्यासी जाहले । विप्र म्हणे भलें केलें ।
मास सात कां चुकर केलें । जरी तुझे हातीं नोहेचि ॥११॥

जगन्माता तुळजा भवानी । तिचा निरोप घेऊनि ।
आलों तुजपाशीं ठाकोनि । तूं दैवत म्हणोनियां ॥१२॥

दैवतपण ठाउकें जाहलें । आम्हांसी निरोप दिधलें ।
मनुष्यापाशीं जा म्हणितलें । तुझे हातीं नोहेचि कांहीं ॥१३॥

तूं जगद्दैवत जगदंबा म्हणविसी । आम्हां मनुष्यापाशीं पाठविसी ।
नांव जाहलें दैवतपणासी । भाग्य माझें म्हणतसे ॥१४॥

मनुष्यापाशीं जा म्हणावयासी । लाज नये कैसी तुम्हांसी ।
ओळख जाहली दैवतपणासी । उपवासी सात महिने ॥१५॥

पहिलेंचि जरी निरोप देत । इतुके कष्‍ट आम्हां न होत ।
दुराशा केली मी परदैवत । म्हणोनि, दुःख करी नानापरी ॥१६॥

ऐसें अनेकपरीनें । दुःख करीतसे तो ब्राह्मण ।
पुन्हा मागुती पुरश्चरण । करीन म्हणे तो द्विजवर ॥१७॥

म्हणे मज बरवें होणें । अथवा आपुला प्राण देणें ।
ऐसें बोलोनि निर्वाणें । विप्र धरणें बैसला ॥१८॥

पुनरपि स्वप्न तयासी । तैसेंचि होय परियेसीं ।
आणिक समस्त भोपियांसी । तेणेंचिपरी स्वप्न होय ॥१९॥

सकळ भोपे म्हणती तयासी । आजि स्वप्न झालें आम्हांसी ।
छळण न करीं गा देवीसी । निरोपासरसा जाईं वेगीं ॥२०॥

तूं तरी आतां नव जासी । आम्हां निरोप झाला ऐसी ।
बाहेर घालूं तुम्हांसी । देवळांत येऊं नेदूं ॥२१॥

इतुकें जाहलियावरी । पारणें केलें द्विजवरीं ।
पूजा करी नानापरी । निरोप घेऊनि निघाला ॥२२॥

गाणगाग्रामासी आला । मठीं जाऊनि पुसों लागला ।
भक्तजन सांगती त्याला । संगमीं आहेत गुरुमूर्ति ॥२३॥

भक्त म्हणती तयासी । श्रीगुरु येतील पारणेसी ।
काल शिवरात्री-उपवासी । आतां येतील परियेसीं ॥२४॥

इतुकिया अवसरीं । श्रीगुरु आले साक्षात्कारी ।
ग्रामलोक द्विजातें वारी । राहें दूरी नको सन्मुख ॥२५॥

श्रीगुरु आले मठांत । द्विज उभा होता चिंतीत ।
भक्तजन सांगती मात । विप्र एक आला असे ॥२६॥

सर्वांगीं असे श्वेत । स्वामिदर्शना आलों म्हणत ।
श्रीगुरु म्हणती आपण जाणत । संदेहरुपें आला असे ॥२७॥

म्हणती बोलावा मठांत । भक्त गेले धांवत ।
तया द्विजातें पाचारीत । आला विप्र आंगणा ॥२८॥

दुरोनि देखिलें श्रीगुरुसी । नमन करीत लोळे भूमीसी ।
श्रीगुरु म्हणती तयासी । संदेहरुपें आलासि कां ॥२९॥

देवीपासूनि मनुष्यापाशीं । येणें झालें काय कार्येंसी ।
संदेह करोनि मानसीं । कैसा आलासि द्विजवरा ॥३०॥

ऐसें वचन ऐकोनि । आपुले मनींचें जाणिलें म्हणोनि ।
क्षमा करीं गा स्वामी म्हणोनि । लोटांगणीं येतसे ॥३१॥

म्हणे स्वामी आपण तमांध । तुझे दर्शनें झालों सुबुद्ध ।
अज्ञानें वेष्‍टिलों होतों मंद । नेणें सोय परब्रह्मा ॥३२॥

तूं साक्षात्‌ वस्तु म्हणोनि । नेणों आपण तमोगुणी ।
आजि माझा सुदिन । दर्शनें झालों पुनीत ॥३३॥

पापकर्मी पापी आपण । पापात्मा नेणें निज खूण ।
पापें संभवलों पूर्ण । आलों शरण तुजपाशीं ॥३४॥

तूं भक्तजनां आधार । शरणागता वज्रपंजर ।
ब्रीद वानिती सचराचर । श्रीगुरु नृसिंहसरस्वतीचें ॥३५॥

आजि माझें कुकर्म गेलें । परब्रह्मचरण देखिलें ।
मनोरथ माझे पुरले । कृपासागरा यतिराया ॥३६॥

तूं भक्तजनाची कामधेनु । मनुष्यवेषीं आलासि अवतरोनु ।
तुझा पार जाणे कवणु । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥३७॥

जैसी सगरांवरी गंगा । पावन करावया आली जगा ।
तैसा तूं भक्तसेवकवर्गा । तारावया अवतरलासी ॥३८॥

का अहिल्या झाली पाषाण । दिव्यदेही झाली लागतां चरण ।
तैसें मज आजि निर्गुण । झालें स्वामी गुरुनाथा ॥३९॥

व्रतबंध विवाह झालियावरी । व्याधि उद्भवली आपुले शरीरीं ।
स्त्री राहिली माहेरीं । स्पर्शों नये शरीर म्हणे ॥४०॥

आपुले असती मातापिता । सकळ म्हणती जाईं परता ।
दुःख जाहलें अपरिमिता । संसार त्यजूनि निघालों ॥४१॥

गेलों होतों तुळजापुरा । उपवास केले अपारा ।
मज म्हणती तूं पापभारा । नव्हे तुज बरवें आतां ॥४२॥

निरोप दे जा सन्नतीं । जेथें चंदलापरमेश्वरी वसती ।
तेथें होईल निवृत्ति । पाप जाईल म्हणोनि ॥४३॥

तेथेंही कष्‍ट केले बहुत । नव्हेचि कांहीं, देवी उबगत ।
निरोप झाला जा म्हणत । कृपामूर्ति तुजपाशीं ॥४४॥

ऐसें माझें दैव हीन । उबगताति देव आपण ।
मज देखोनि निर्वाण । बाहेर घाला म्हणताति ॥४५॥

देवता आपण उबगताति । मनुष्य कैसे मज देखती ।
निर्वाणीं आलों तुम्हांप्रती । निर्धार केला मरणाचा ॥४६॥

ऐसा पापी असोनि आपण । काय करावें अंग हीन ।
तोंड न पाहती कुष्‍ठी म्हणोन । मरण बरवें यापरतें ॥४७॥

आतां असे एक विनंति । होय अथवा नव्हे निश्चितीं ।
शीघ्र निरोपावें यति । दैवतें चाळवितीं आशाबद्धें ॥४८॥

मज चाड नाहीं शरीराची । प्राण देईन सुखेंचि ।
तूं रक्षक माउली शरणागताची । निरोपावें दातारा ॥४९॥

ऐसें करुणावचन ऐकोन । श्रीगुरु बोलती हांसोन ।
सोमनाथ ब्राह्मण बोलावून । निरोप देती न्याया संगमासी ॥५०॥

बरवा संकल्प सांगोनि । स्नान करवा षट्‌कूळभुवनीं ।
अश्वत्थप्रदक्षिणा करवूनि । वस्त्रें टाका दूर त्याचीं ॥५१॥

नवीं वस्त्रें द्या यासी । शीघ्र आणा पारणेसी ।
ऐसा निरोप देती त्यांसी । दोघे गेले झडकरी ॥५२॥

स्नान करुनि बाहेर आला । शरीरवर्ण पालटला ।
अश्वत्थप्रदक्षिणा करूं लागला । सु-वर्ण जाहलें सर्वांग ॥५३॥

वस्त्रें देती ब्राह्मणासी । जीर्ण वस्त्रें टाकिती दूरेंसी ।
जेथें टाकिती ते भूमीसी । क्षार भूमि होय त्वरित ॥५४॥

सांगातें घेऊनि द्विजासी । सोमनाथ आला मठासी ।
चरणीं घातलें तयासी । लोक सर्व विस्मित ॥५५॥

नंदीनामें केला नमस्कार । संतोषें स्तोत्र करी अपार ।
हर्षें जाहला निर्भर । लोळतसे पादुकावरी ॥५६॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुझी कामना झाली परियेसीं ।
सर्वांग आहे कैसी । अवलोकोनि पाहें म्हणती ॥५७॥

पाहतां सर्वांग बरवें जाहलें । तावन्मात्र जंघेसी राहिलें ।
पाहतां मन त्याचें भ्यालें । म्हणे स्वामी असे थोडें ॥५८॥

तुझी कृपादृष्‍टि झाली असतां । थोडें राहिलें म्हणे केवीं आतां ।
करीतसे दंडवता । कृपा करीं गा परमात्मा ॥५९॥

श्रीगुरुमूर्ति निरोपिती तयासी । तूं संशय करोनि आलासी ।
मनुष्य काय करील म्हणोनि मानसीं । तेणें गुणें राहिलेंथोडें॥६०॥

त्यासी असे एक प्रतीकार । तुवां कवित्व सांगावें अपार ।
आमुची स्तुति करावी निरंतर । बरवें होईल तुज मग ॥६१॥

नंदीनामा म्हणे स्वामीसी । लिखित नेणें वाचायासी ।
कैसें करुं मी कवित्वासी । मंदमति असे आपण ॥६२॥

काय जाणें कवित्वस्थिति । मज नाहीं काव्यव्युत्पत्ति ।
स्वामी ऐसा निरोप देती । म्हणोनि चरणीं लागला ॥६३॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । मुख उघडीं काढीं जिव्हेसी ।
विभूति शिंपिती तयासी । ज्ञान उपजलें ब्राह्मणा ॥६४॥

चरणांवरी ठेविला माथा । उभा ठेला स्तोत्र करितां ।
म्हणे स्वामी मी नेणता । सेवेसी नव्हे अराणुक ॥६५॥

मायापाशीं वेष्‍टोनि । बुडत होतों संसारगहनीं ।
आठवण न करीं कधीं मनीं । तुझे चरणा विसरलों ॥६६॥

संसार-सागर मायाजाळ । योनीं जन्मोनि चौर्‍यांशीं लक्षकुळ ।
आठवण नव्हे तुझें नाम केवळ । मंदमति जाहली मज ॥६७॥

स्वेदज अंडज उद्भिज्जेंसी । जन्मा आलों पशुयोनीसी ।
तव ज्ञान कैंचें आम्हांसी । स्थावर जंगम जैं होतों ॥६८॥

नानायोनींत मनुष्य विशेष । शूद्रादि याती बहुवस ।
जधीं होतों त्या जन्मास । काय जाणें तुझी सोय ॥६९॥

समस्त जन्मांत एक । ब्राह्मनजन्म विशेख ।
काय करावें होऊनि मूर्ख । गुरुसोय नेणे नर ॥७०॥

मातेचें शोणित पित्याचें रेत । संपर्क जहाला जननीगर्भांत ।
जैसें सुवर्ण मुशीं असे कढत । दिवस पांच बुद्‌बुदाकार ॥७१॥

पंधरा दिवसा होय स्थिर । एक रस होऊनि निर्धार ।
तधीं मी काय जाणें गुरु । नाहीं पंचतत्त्वें मज ॥७२॥

मासें एक पिंड होय । द्वय मासीं शिर पाय ।
तिसरे मासीं सर्व अवयव । नवद्वारें झालीं मग ॥७३॥

पंचतत्त्वे होतीं एक । वायु-आप-पृथ्वी-तेज-ख ।
प्राण आला तात्काळिक । तधीं स्मरण कैंचें मज ॥७४॥

पांचवे मासीं त्वचा रोम । सहावे मासीं उच्छ्वास आम्हां ।
सातवे मासीं श्रोत्र जिव्हा । मेद मज्जा दृढ जाहली ॥७५॥

ऐसे नव मास कष्‍टत । होतों जननिये-गर्भांत ।
रुधिर-विष्‍ठा-मूत्रांत । कष्‍टलों भारी स्वामिया ॥७६॥

माता भक्षी उष्ण क्षार । तेणें तीक्ष्णें कष्‍टलों अपार ।
पडे लोळे अनेक प्रकार । दुःख तेव्हां सांगूं कोणा ॥७७॥

मना आलें भक्षण करीं । दुःख होय मज अपारी ।
ऐसें नवमासवरी । मातागर्भीं कष्‍टलों ॥७८॥

तधीं कैचें तुझें स्मरण । वेष्टिलों होतों मायावरणें ।
स्मरलों नाहीं तुझे चरण । मग योनिमुखीं जन्मलों ॥७९॥

उपजतांचि आपणासी । आयुष्य लिहिलें लल्लाटेसी ।
अर्घ गेलें वृथा निशीं । रात्रीं निद्रा मानवा ॥८०॥

उरले आयुष्यांत देखा । तीन भाग केले विशेखा ।
बाल यौवन वृद्धाप्य ऐका । निर्माण झाले तये वेळीं ॥८१॥

बाळपणीं आपणासी । कष्‍ट झाले असमसाहसी ।
मज घालिती पाळणेसी । मूळमूत्रांत लोळतसें ॥८२॥

बाळपणींचें दुःख आठवितां । शोक होय मज अपरिमिता ।
काय सांगूं गुरुनाथा । नाना आपदा भोगिल्या ॥८३॥

शयनस्थानीं मलमूत्रांत । निरंतर असें लोळत ।
आपली विष्‍ठा आपण खात । अज्ञानतिमिरें वेष्टिलों ॥८४॥

एकादे समयीं आपणासी । पोटशूळ उठे बहुवसीं ।
रोदन करितां परियेसीं । स्तनपान मला करविती ॥८५॥

क्षुधाक्रांत होय बहुत । मज म्हणती पोट दुखत ।
अंगुली घालूनि मुखांत । वोखद मज पाजविती ॥८६॥

ऐसें क्षुधेनें पीडितां बहुत । मज घालिती पाळण्यांत ।
हालविती पर्यंदें गात । क्षुधाक्रांत रुदन करीं ॥८७॥

म्हणती रुदन करितो बाळ । मुखीं शिंपिती कांजीतेल ।
रक्षा बांधिती मंत्रें केवळ । नेणे माता भूक माझी ॥८८॥

पाळण्यांत घालिती कौतुकें । प्रावरणांत असतां वृश्चिकें ।
मारीतसे पाठीं डंक । प्रलाप मी करीतसें ॥८९॥

आणिक पाळणा हालविती । राहें राहें उगा म्हणती ।
स्तनपान मागुती करविती । वृश्चिकविष नेणतां ॥९०॥

तेणें दुःखें स्तनपान न करीं । मागुती घालिती पाळण्याभीतरीं ।
वृश्चिक मज डंक मारी । प्राणांतिक मज होय ॥९१॥

माता खाय अंबट तिखट । स्तनपानें मज अपार वोखट ।
अति मधुर क्षीर अंबट । तेणें खोकतसें सर्वकाळीं ॥९२॥

नाना औषधें मज देती । तेणें माझे डोळे दुखती ।
कुंकुम लवणक्षार भरिती । डोळे आले म्हणोनियां ॥९३॥

ऐसे कष्‍ट धुरंधर । बाळपणीं जाहले अपार ।
वाढलों कष्‍ट भोगीत फार । वर्षें बारा लोटलीं ॥९४॥

तधीं तुझे चरणस्मरणा । मज कैंचें गा देवराणा ।
कष्‍टलों मी याचिगुणा । पूर्वजन्म नाठवेचि ॥९५॥

दोन भाग उरले आपणासी । मदनें व्यापिलें शरीरासी ।
जैसा पतंग दीपासी । भ्रमिजेत उन्मत्त ॥९६॥

नेणें मी गुरु माता पिता । समस्तांतें करी निंदा वार्ता ।
परस्त्रीवरी करीं चिंता । कुळाकुळ न विचारीं ॥९७॥

ब्राह्मणातें निंदा करी । वृद्धाच्या चेष्‍टा करी अपारी ।
मदें व्यापिलें असे भारी । नाठवती तुझे चरण मज ॥९८॥

मांसाचे कवळाकारणें । मत्स्य जाय जेवीं प्राणें ।
तैसा आपण मदनबाणें । वश्य जाहलों इंद्रियांसी ॥९९॥

नानावर्ण स्त्रियां भोगिलें । परद्रव्य अपहारिलें ।
सिद्धमहंतांतें निंदिलें । दृष्‍टीं न दिसे माझे कांहीं ॥१००॥

ऐसा मदनें व्यापूनि । मागें पुढें न पाहें नयनीं ।
पतंग जाय धांवोनि । दीपावरी पडे जैसा ॥१॥

ऐसा वेष्‍टोनि मदनबाणीं । न ऐके सुबुद्धि कधीं श्रवणीं ।
सोय न धरीं तुझे चरणीं । यौवनपण गेलें ऐसें ॥२॥

मग वृद्धाप्य आले शरीरासी । उबग होय स्त्रीपुत्रांसी ।
श्वासोच्छ्वास कफेसीं । सदा खोकला होय मज ॥३॥

अवयव सर्वही गलित होती । केश पांढरे होती त्वरिती ।
दंतहीन, श्रवणें न ऐकिजेति । दृष्‍टीं न दिसे, नासिक गळतें ॥४॥

ऐसा नाना रोगें कष्‍टतां । तुमची सेवा कधीं घडणें आतां ।
स्वामी तारका श्रीगुरुनाथा । संसारसागरा कडे करीं ॥५॥

ऐसा मंदमति आपण । न ओळखेचि तुझे चरण ।
तूंचि केवळ नारायण । अवतार तूं श्रीगुरुमूर्ति ॥६॥

तूंचि विश्वाचा तारक । धरोनियां नरवेष ।
त्रयमूर्ति तूंचि एक । परब्रह्म श्रीगुरुनाथा ॥७॥

दिवांध नेणती तुज लोक । तूंचि विश्वाचा पाळक ।
मी किंकर तुझा सेवक । संसार-धुरंधरीं तारीं मज ॥८॥

ऐसें नानापरी स्तोत्र । करीतसे नंदीनामा पवित्र ।
जन पाहताति विचित्र । त्यांसी म्हणे नंदीनामा ॥९॥

ऐका हो जन समस्त । श्रीगुरू जाणा परब्रह्मवस्तु ।
आपण पाप केलें बहुत । दर्शनमात्रें सर्व गलें ॥११०॥

जैसें तृणाचे बणवीसी । अग्नि लागतां क्षणें कैसी ।
गुरुकृपा होय ज्यासी । पाप जळे तयापरी ॥११॥

'चरणं पवित्रं विततं पुराणं' । ऐसें बोले वेद आपण ।
सेवा सेवा हो गुरुचरण । गुरुवेगळा देव नाहीं ॥१२॥

ब्रह्मदेवें आपण देखा । दुष्टाक्षरें लिहिलीं कपाळिका ।
तैसेही होय निका । श्रीगुरुचरणीं लागतां ॥१३॥

जवळी असतां निधान । कां नोळखा हो तुम्ही जन ।
नृसिंहसरस्वती कामधेनु । भजा भजा हो सकळिक ॥१४॥

इहसौख्य ज्ञान ऐका । अंतीं पावे वैकुंठलोका ।
संदेह नाहीं होईल सुखा । सत्य जाणा हो बोल माझा ॥१५॥

नंदीनामा स्तोत्र करितां । श्रीगुरु संतोषी अत्यंता ।
भक्तांसी ऐसा निरोप देत । 'कवीश्वर' म्हणा यासी ॥१६॥

कवि 'बसवरस' नाम तयासी । निर्धार केला आम्हीं भरंवसीं ।
ऐसें कृपेनें बोलती त्यासी । ऐकोनि चरणीं लागला ॥१७॥

जें कां शेष होतें जंघेवरी । तें तात्काळ गेलें दूरी ।
नंदीनामा आनंद करी । राहिला सेवा करीत देखा ॥१८॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं ।
कथा करीत कवि बसवरसी । श्रीगुरुसेवेसी राहिला ॥१९॥

नामधारक म्हणे सिद्धमुनि । दुसरा कवि 'नरहरि' म्हणोनि ।
तो केवीं झाला शिष्य सुगुणी । कवेश्वर भक्त जाहला ॥१२०॥

तें विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेंसी ।
वांछा असे मानसीं । गुरुचरित्र ऐकावें ॥२१॥

म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । नामस्मरण कामधेनु ॥१२२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजकुष्‍टपरिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः ॥४४॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या १२२ )

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु




गुरूचरित्र – अध्याय पंचेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा निरोपिलीसी ।
नंदीनामा कवि ऐसी । दुसरा आणिक आला म्हणोनि ॥१॥

कवणेंपरी झाला शिष्य । तें सांगावें जी आम्हांस ।
विस्तार करुनि आदिअंतास । कृपा करुनि दातारा ॥२॥

सिद्ध म्हणे नामधारका । सांगों तुतें कथा ऐका ।
आश्चर्य झालें कवतुका । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥३॥

गाणगापुरीं असतां गुरु । ख्याती झाली अपरांपरु ।
लोक येती थोरथोरु । भक्त बहुत जाहले ॥४॥

नंदीनामा कवि होता । कवित्व केलें अपरिमिता ।
समस्त लोक शिकती अमृता । प्रकाश झाला चहूं राष्‍ट्रीं ॥५॥

ऐसें असतां एके दिवसीं देखा । श्रीगुरुसी नेलें भक्तें एका ।
आपुले घरीं शोभनदायका । म्हणोनि नेलें आपुले ग्रामा ॥६॥

हिपरगी म्हणिजे ग्रामासी । नेलें आमुचे श्रीगुरुसी ।
पूजा केली तेथें बहुवसी । समारंभ थोर जाहला ॥७॥

तया ग्रामीं शिवालय एक । नाम 'कल्लेश्वर' लिंग ऐक ।
जागृत स्थान प्रख्यात निक । तेथें एक द्विजवर सेवा करी ॥८॥

तया नाम 'नरहरी' । लिंगसेवा बहु करी ।
आपण असे कवीश्वरी । नित्य करी पांच कवित्वें ॥९॥

कल्लेश्वरावांचूनि । आणिक नाणी कदा वचनीं ।
एकचित्तें एकमनीं । शिवसेवा करीतसे ॥१०॥

समस्त लोक त्यासी म्हणती । तुझे कवित्वाची असे ख्याति ।
श्रीगुरुसी कवित्वावरी प्रीति । गुरुस्मरण करीं तूं कांहीं ॥११॥

त्यांसी म्हणे तो नर । कल्लेश्वरासी विकिलें जिव्हार ।
अन्यत्र देव अपार । नरस्तुति मी न करीं ॥१२॥

ऐसें बोलोनियां आपण । गेला देवपूजेकारण ।
पूजा करितां तत्क्षण । निद्रा आली तया द्विजा ॥१३॥

नित्य पूजा करुनि आपण । कवित्व करी पार्वतीरमणा ।
ते दिवसीं अपरिमाण । निद्रा आली तया देखा ॥१४॥

निद्रा केली देवळांत । देखता जाहला स्वप्नांत ।
लिंगावरी श्रीगुरु बैसत । आपण पूजा करीतसे ॥१५॥

लिंग न दिसे श्रीगुरु असे । आपणासी पुसती हर्षें ।
नरावरी तुझी भक्ति नसे । कां गा आमुतें पूजितोसि ॥१६॥

षोडशोपचारेंसीं आपण । पूजा करी स्थिर मनीं ।
ऐसें देखोनियां स्वप्न । जागृत झाला तो द्विज ॥१७॥

विस्मय करी आपुले मनीं । म्हणे नरसिंहसरस्वती शिवमुनि ।
आला असे अवतरोनि । आपण निंदा त्याची केली ॥१८॥

हाचि होय सद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारु ।
भेट घ्यावी आतां निर्धारु । म्हणूनि आला श्रीगुरुपाशीं ॥१९॥

आला विप्र लोटांगणेंसीं । येऊनि लागला चरणासी ।
कृपा करीं गा अज्ञानासी । नेणों तुझें स्वरुप आपण ॥२०॥

प्रपंचमाया वेष्टोनि । नोळखें आपण अज्ञानी ।
तूंचि साक्षात् शिवमुनि । निर्धार जाहला आजि मज ॥२१॥

कल्लेश्वर कर्पूरगौरु । तूंचि होसी जगद्गुरु ।
माझें मन झालें स्थिरु । तुझे चरणीं विनटलों ॥२२॥

तूंचि विश्वाचा आधारु । शरणागता वज्रपंजरु ।
चरणकमळ वास भ्रमर । ठाकोनि आलों अमृत घ्यावया ॥२३॥

जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु ।
घरा आलिया कामधेनु । दैन्य काय आम्हांसी ॥२४॥

पूर्वीं समस्त ऋषि देखा । तप करिती सहस्त्र वर्षें निका ।
तूं न पवसी एकएका । अनेक कष्‍ट करिताति ॥२५॥

न करितां तपानुष्ठान । आम्हां भेटलासि तूं निधान ।
झाली आमुची मनकामना । कल्लेश्वर लिंग प्रसन्न झालें ॥२६॥

तूंचि संत्य कल्लेश्वरु । ऐसा माझे मनीं निर्धारु ।
कृपा करीं गा जगद्गुरु । म्हणोनि चरणीं लागला ॥२७॥

श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी ।
आजि कैसें तुझे मानसीं । आलासी भक्ति उपजोनि ॥२८॥

विप्र म्हणे स्वामियासी । अज्ञान अंधकार आम्हांसी ।
कैसे भेटाल परियेसीं । ज्योतिर्मय न होतां ॥२९॥

म्यां कल्लेश्वराची पूजा केली । तेणें पुण्यें आम्हां भेटी लाधली ।
आजि आम्ही पूजेसी गेलों ते काळीं । लिंगस्थानीं तुम्हांसि देखिलें ॥३०॥

स्वप्नावस्थेंत देखिलें आपण । प्रत्यक्ष भेटले तुझे चरण ।
स्थिर जाहलें अंतःकरण । मिळवावें शिष्यवर्गांत ॥३१॥

ऐसें विनवोनि द्विजवर । स्तोत्र करीतसे अपार ।
स्वप्नीं पूजा षोडशोपचार । तैसें कवित्व केलें देखा ॥३२॥

मानसपूजेचें विधान । पूजा व्यक्त केली त्याणें ।
श्रीगुरु म्हणती तत्क्षण । आम्ही स्वप्नरुप लोकांसी ॥३३॥

प्रत्यक्ष आम्ही असतां देखा । स्वप्नावस्थीं कवित्व ऐका ।
येणें भक्तें केलें निका । स्वप्नीं भेदूनि समस्त ॥३४॥

ऐसें म्हणोनि शिष्यांसी । वस्त्रें देती त्या कवीसी ।
लागला तो श्रीगुरुचरणासी । म्हणे आपण शिष्य होईन ॥३५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कल्लेश्वर श्रेष्‍ठ आम्हांसी ।
पूजा करीं गा नित्य त्यासी । आम्ही तेथें सदा वसों ॥३६॥

विप्र म्हणे स्वामियासी । प्रत्यक्ष सांडोनि चरणासी ।
काय पूजा कल्लेश्वरासी । तेथेंही तुम्हांसी म्यां देखिलें ॥३७॥

तूंचि स्वामी कल्लेश्वरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
हाचि माझा सत्य निर्धारु । न सोडीं आतां तुझे चरण ॥३८॥

ऐसें विनवोनि स्वामियासी । आला सवें गाणगापुरासी ।
कवित्वें केलीं बहुवसी । सेवा करीत राहिला ॥३९॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । कवीश्वर दोघे श्रीगुरुपाशीं ।
आले येणें रीतीसीं । भक्ति करिती बहुवस ॥४०॥

म्हणे सरस्वती-गंगाधरु । ज्यासी प्रसन्न होय श्रीगुरु ।
त्याचे घरीं कल्पतरु । चिंतिलें फळ पाविजे ॥४१॥

कथा कवीश्वराची ऐसी । सिद्ध सांगे नामधारकासी ।
पुढील कथा विस्तारेंसीं । सांगेल सिद्ध नामधारका ॥४२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे नरहरिकवीश्वर-वरप्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या ४२ )

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु





गुरूचरित्र – अध्याय सेहेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें कथा वर्तली कैसी ।
तें विस्तारोनि सांगावें आम्हांसी । कृपा करीं गा दातारा ॥१॥

सिद्ध म्हणे श्रीमंता । ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा ।
तुज होतील पुत्रपौंत्रा । सदा श्रियायुक्त तूं होसी ॥२॥

सांगो आतां एक विचित्र । जेणें होतील पतित पवित्र ।
ऐसें असे श्रीगुरुचरित्र । तत्परेंसीं परियेसा ॥३॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । सण आला दिपवाळी थोरु ।
शिष्य आले पाचारुं । आपुले घरीं भिक्षेसी ॥४॥

सप्त शिष्य बोलाविती । एकाहूनि एक प्रीतीं ।
सातै जण पायां पडती । यावें आपुले घरासी ॥५॥

एकएक ग्राम एकेकासी । श्रीगुरु म्हणती तयांसी ।
समस्तांच्या घरीं यावें कैसी । तुम्ही आपणचि विचारा ॥६॥

तुम्हीं वांटा आपणियांत । कवणाकडे निरोप होत ।
तेथें आम्हीं जाऊं म्हणत । शिष्याधीन आम्ही असों ॥७॥

आपणांत आपण पुसती । समस्त आपण नेऊं म्हणती ।
एकमेकांत झगडती । आपुला स्वामी म्हणोनियां ॥८॥

श्रीगुरु वारिती तयांसी । तुम्ही भांडतां कासयासी ।
आम्ही एक गुरु सातांसी । एका घरीं येऊं म्हणती ॥९॥

ऐसें वचन ऐकोनि । समस्त विनविती कर जोडूनि ।
स्वामी प्रपंच न पहावा नयनीं । समर्थ-दुर्बळ म्हणों नये ॥१०॥

समस्तांसी पहावें समान । न विचारावें न्यून पूर्ण ।
उपेक्षिसी दुर्बळ म्हणोन । गंगाप्रवेश करुं आम्ही ॥११॥

विदुराचिया घरासी । श्रीकृष्ण जाय भक्तींसीं ।
राजा-कौरवमंदिरासी । नवचे तो भक्तवत्सल ॥१२॥

आम्ही समस्त तुमचे दास । कोणासी न करावें उदास ।
जो निरोप द्याल आम्हांस । तोचि आपण करुं म्हणती ॥१३॥

ऐसें म्हणोनियां समस्त । करिती साष्‍टांग दंडवत ।
समस्त आम्हां पहावें म्हणत । विनविताति श्रीगुरुसी ॥१४॥

श्रीगुरु म्हणती समस्तांसी । येऊं तुमच्या घरासी ।
चिंता न धरावी मानसीं । भाक आमुची घ्या म्हणती ॥१५॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरुवचन । विनविताति सातै जण ।
समस्तां आश्वासितां येऊं म्हणोन । कवणें करावा भरंवसा ॥१६॥

श्रीगुरु मनीं विचारिती । अज्ञानी लोक नेणती ।
तयां सांगावें एकांतीं । एकेकातें बोलावूनि ॥१७॥

जवळी बोलावूनि एकासी । कानीं सांगती तयासी ।
आम्ही येतों तुझे घरासी । कोणापुढें न सांगावें ॥१८॥

ऐसी भाक तयासी देती । उठोनि जाईं गांवा म्हणती ।
दुजा बोलावूनि एकांतीं सांगती । येऊं तुझ्या घरासी ॥१९॥

ऐसें सांगोनि तयासी । पाठविलें ग्रामासी ।
बोलावूनि तिसरेयासी । तेणेंचि रीतीं सांगती ॥२०॥

ऐसें सातै जण देखा । समजावोनि गुरुनायका ।
पाठविले तेणेंचिपरी ऐका । महदाश्चर्य वर्तलें ॥२१॥

एकमेकां न सांगत । गेले सातही भक्त ।
श्रीगुरु आले मठांत । अतिविनोद प्रवर्तला ॥२२॥

ग्रामांतील भक्तजन । हे व्यवस्था ऐकोन ।
विनविताति कर जोडोन । आम्हां सांडोनि जातां स्वामी ॥२३॥

त्यांसी म्हणती श्रीगुरुमूर्ति । आम्ही राहिलों जाणा चित्तीं ।
न करावी मनीं खंती । आम्ही असों येथेंचि ॥२४॥

ऐसें बोलतां संतोषीं । जवळीं होऊं आली निशी ।
दिवाळीची त्रयोदशी । रात्रीं मंगळस्नान करावें ॥२५॥

आठरुप झाले आपण । अपार महिमा नारायण ।
सात ठायींही गेले आपण । गाणगापुरीं होतेचि ॥२६॥

ऐसी दिपवाळी जाहली । समस्तां ठायीं पूजा घेतली ।
पुनः तैसेचि व्यक्त जाहले । गौप्यरुपें कोणी नेणें ॥२७॥

कार्तिकमासीं पौर्णिमेसी । करावया दीपाराधनेसी ।
समस्त भक्त आले दर्शनासी । गाणगाग्रामीं श्रीगुरुजवळी ॥२८॥

समस्त नमस्कार करिती । भेटीं दहावे दिवसीं म्हणती ।
एकमेकातें विचारिती । म्हणती आपले घरीं गुरु होते ॥२९॥

एक म्हणती सत्य मिथ्या । समस्त शिष्य खुणा दावित ।
आपण दिल्हें ऐसें वस्त्र । तें गा श्रीगुरुजवळी असे ॥३०॥

समस्त जाहले तटस्थ । ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत ।
आमुचे गुरु येथेंचि होते । दिपवाळी येथेंचि केली ॥३१॥

विस्मय करिती सकळही जन । म्हणती होय हा त्रैमूर्ति आपण ।
अपार महिमा नारायण । अवतार होय श्रीहरीचा ॥३२॥

ऐसे म्हणोनि भक्त समस्त । नानापरी स्तोत्र करीत ।
न कळे महिमा तुझी म्हणत । वेदमूर्ति श्रीगुरुनाथा ॥३३॥

तूंचि विश्वव्यापक होसी । महिमा न कळे आम्हांसी ।
काय वर्णावें श्रीचरणासी । त्रैमूर्ति तूंचि एक ॥३४॥

ऐसी नानापरी स्तुति करिती । दीपाराधना अतिप्रीतीं ।
ब्राह्मणभोजन करविती । महानंद भक्तजना ॥३५॥

श्रीगुरुमहिमा ऐसी ख्याति । सिद्ध सांगे नामधारकाप्रती ।
भूमंडळीं झाली ख्याति । श्रीनृसिंहसरस्वतीची ॥३६॥

म्हणे सरस्वती-गंगाधरु । जवळी असतां कल्पतरु ।
नोळखिती जन अंध-बधिरु । वायां कष्‍टती दैन्यवृत्तीं ॥३७॥

भजा भजा हो श्रीगुरुसी । जें जें काम्य तुमचे मानसीं ।
साध्य होईल त्वरितेसीं । आम्हां प्रचीति आली असे ॥३८॥

अमृत पान करावयासी । अनुमान पडे मूर्खासी ।
ज्ञानवंत भक्तजनांसी । नामामृत श्रीगुरुचें ॥३९॥

श्रीगुरुसेवा करा हो करा । मारीतसे मी डांगोरा ।
संमत असे वेदशास्त्रां । गुरु तोचि त्रैमूर्ति ॥४०॥

गुरुवेगळी गति नाहीं । वेदशास्त्रें बोलतीं पाहीं ।
जे निंदिती नरदेहीं । सूकरयोनीं जन्मती ॥४१॥

तुम्ही म्हणाल भज ऐसी । आपुले इच्छेनें लिहिलेंसी ।
वेदशास्त्र-संमतेसीं । असेल तरी अंगीकारा ॥४२॥

संसारसागर धुरंधर । उतरावया पैलपार ।
आणिकाचा निर्धार । नव्हे गुरुवांचोनि ॥४३॥

निर्जळ संसार-अरण्यांत । पोई घातली असे अमृत ।
सेवा सेवा तुम्ही समस्त । अमरत्व त्वरित होईल ॥४४॥

श्रीगुरु नृसिंहसरस्वती । अवतरला असे त्रयमूर्ति ।
गाणगाग्रामीं वास करिती । आतां असे प्रत्यक्ष ॥४५॥

जे जे जाती तया स्थाना । तात्काळ होय मनकामना ।
कांहीं न करावें अनुमाना । प्रत्यक्ष देव तेथें असे ॥४६॥

आम्ही सांगतों तुम्हांसी हित । प्रशस्त झालिया तुमचें चित्त ।
गाणगापुरा जावें त्वरित । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥४७॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अष्‍टस्वरुपधारणं नाम षट्‌चत्वारिंशोऽध्यायः ॥४६॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या ४७ )

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु


गुरूचरित्र – अध्याय सत्तेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व एक कथा वर्तली परियेसीं ।
श्रीगुरुचरित्र अतिकवतुकेंसीं । परम पवित्र ऐक पां ॥१॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति जाहली अपारु ।
भक्त होता एक शूद्रु । नाम तया 'पर्वतेश्वर' ॥२॥

त्याच्या भक्तीचा प्रकारु । सांगेन ऐका मन स्थिरु ।
भक्ति केली श्रीगुरु । कायावाचामनेंकरुनि ॥३॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात असती अनुष्‍ठानासी ।
मार्गीं तो शूद्र परियेसीं । आपुले शेतीं उभा असे ॥४॥

श्रीगुरुतें नित्य देखोनि । येई धांवत शेतांतूनि ।
साष्‍टांगीं नमन करुनि । पुनरपि जाय आपुले स्थाना ॥५॥

माध्यान्हकाळीं मठासी । येतां मागुती नमस्कारी परियेसीं ।
ऐसें किती दिवसवर्षीं । शूद्र भक्ति करीतसे ॥६॥

श्रीगुरु तयासी न बोलती । नमन केलिया उगीच असती ।
येणेंविधि बहु काळ क्रमिती । आला शूद्र नमस्कारा ॥७॥

नमन करितां शूद्रासी । पुसती श्रीगुरु संतोषीं ।
कां रे नित्य कष्‍टतोसी । आड पडतोसी येऊनियां ॥८॥

तुझे मनीं काय वासना । सांगे त्वरित विस्तारुन ।
शूद्र विनवी कर जोडून । शेत आपुलें पिकावें ॥९॥

श्रीगुरु पुसती तयासी । काय पेरिलें तुझ्या शेतासी ।
शूद्र म्हणे यावनाळ बहुवसी । पीक जाहलें तुझे धर्में ॥१०॥

तुम्हांसी नित्य नमन करितां । पीक दिसे अधिकता ।
पोटरें येतील आतां । आतां तुझेनि धर्में जेवूं ॥११॥

स्वामी यावें शेतापाशीं । पहावें अमृतदृष्‍टींसीं ।
तूं समस्तां प्रतिपाळिसी । शूद्र म्हणोनि नुपेक्षावें ॥१२॥

श्रीगुरु गेले शेतापाशीं । पाहूनि म्हणती त्या शूद्रासी ।
सांगेन तुज जरी ऐकसी । विश्वास होईल बोलाचा ॥१३॥

जें सांगेन तुज एक वाक्येंसीं । जरी भक्तीनें अंगीकारिसी ।
तरीच सांगूं परियेसीं । एकोभावें त्वां करावें ॥१४॥

शूद्र विनवी स्वामियासी । गुरुवाक्य कारण आम्हांसी ।
दुसरा भाव मजपाशीं । नाहीं स्वामी म्हणतसे ॥१५॥

मग निरोपिती श्रीगुरु त्यासी । आम्ही जातों संगमासी ।
परतोनि येऊं माध्यान्हेसी । तंव सर्व पीक कापावें ॥१६॥

ऐसें सांगोनि शूद्रासी । श्रीगुरु गेले संगमासी ।
शूद्र विचार करी मानसीं । गुरुवाक्य मज कारण ॥१७॥

शीघ्र आला ग्रामांत । अधिकारियासी विनवीत ।
खंडोनि द्यावें आपलें शेत । गत संवत्सराप्रमाणें देईन धान्य ॥१८॥

अधिकारी म्हणती त्यासी । पीक जाहलें बहु शेतासी ।
म्हणोनि गुतका मागतोसी । अंगीकार न करूं जाण ॥१९॥

नानाप्रकारें विनवी त्यासी । द्विगुण देईन गतसंवत्सरासी ; ।
अंगीकारिलें संतोषीं । वचनपत्र लिहूनि घेती ॥२०॥

आपण अभयपत्र घेऊनि । लोक मिळवोनि तत्क्षणीं ।
गेला शेता संतोषोनि । कापीन म्हणे वेगेंसीं ॥२१॥

कापूं आरंभिलें पिकासी । स्त्री-पुत्र वर्जिती त्यासी ।
पाषाण घेऊनि स्त्री-पुत्रांसी । मारुं आला तो शूद्र ॥२२॥

समस्तांतें मारी येणेंपरी । पळत आलीं गांवाभीतरी ।
आड पडती राजद्वारीं । "पिसें लागलें पतीसी ॥२३॥

पीक होतें बहुवसीं । कापूनि टाकितो मूर्खपणेंसीं ।
वर्जितां पहा आम्ही त्यासी । पाषाण घेउनि मारी तो ॥२४॥

संन्यासी यतीश्वराच्या बोलें । पीक सर्वही कापिलें ।
आमुचें जेवितें भाण गेलें । आणिक मासां भक्षितों आम्ही"॥२५॥

अधिकारी म्हणती तयांसी । कापीना कां आपुल्या शेतासी ।
पत्र असे आम्हांपाशीं । गतवत्सरेसीं द्विगुण द्यावें ॥२६॥

वर्जावया माणसें पाठविती । नायके शूद्र कवणें गतीं ।
शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती । पेंवीं धान्य असें तें देईन ॥२७॥

जावोनि सांगती अधिकारियासी । आम्हीं सांगितलें त्या शूद्रासी ।
त्यानें सांगितलें तुम्हांसी । विनोद असे परियेसा ॥२८॥

जरी भीतील अधिकारी । तरी धान्य देईन आतांचि घरीं ।
गुरें बांधीन त्यांचे द्वारीं । पत्र आपण दिलें असे ॥२९॥

अधिकारी म्हणती तयासी । आम्हां चिंता असे कायसी ।
पेंवें ठाउकीं असतीं आम्हांसी । धान्य असे अपार ॥३०॥

इतुकें होतां शूद्र देखा । पीक कापिलें मनःपूर्वका ।
उभा असे मार्गीं ऐका । श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥

नमन करुनि श्रीगुरुसी । शेत कापिलें दाविलें त्यांसी ।
श्रीगुरुनाथ म्हणती तयासी । वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥

विनोदें तुज सांगितलें । तुवां निर्धारें कापिलें ।;
म्हणे तुमचें वाक्य भलें । तेंचि कामधेनु मज ॥३३॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । निर्धार असेल तुझे चित्तीं ।
होईल अत्यंत फळश्रुती । चिंता न करीं म्हणोनियां ॥३४॥

ऐसें सांगोनि श्रीगुरुनाथ । आले आपण ग्रामांत ।
सवें शूद्र असे येत । आपुले घराप्रती गेला ॥३५॥

पुसावया लोक येती समस्त । होतसे त्याचे घरीं आकांत ।
स्त्री-पुत्र सर्व रुदन करीत । म्हणती आमुचा ग्रास गेला ॥३६॥

शूद्र समस्तां संबोखी । न करीं चिंता रहा सुखी ।
गुरुसोय नेणिजे मूर्खीं । कामधेनु असे वाक्य त्यांचें ॥३७॥

एकेकाचे सहस्त्रगुण । अधिक लाभाल तुम्ही जन ।
स्थिर करा अंतःकरण । हानि नव्हे मी जाणें ॥३८॥

नर म्हणतां तुम्ही त्यासी । शिवमुनि असे भरंवसीं ।
असेल कारण पुढें आम्हांसी । म्हणोनि निरोपिलें ऐसें मज ॥३९॥

श्रीगुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैंचें असे त्यासी ।
निधान जोडलें आम्हांसी । म्हणोनि तो शूद्र सांगतसे ॥४०॥

नानापरीनें स्त्री-पुत्रांसी । संबोखीतसे शूद्र अति हर्षीं ।
इष्‍टवर्ग बंधुजनासी । येणेंचि रीतीं सांगतसे ॥४१॥

समस्त राहिले निवांत । ऐसे आठ दिवस क्रमीत ।
वारा वाजला अति शीत । ग्रामींचें पीक नासलें ॥४२॥

समस्त राष्‍ट्रींचें पीक देखा । शीतें नासलें सकळिका ।
पर्जन्य पडिला अकाळिका । मूळनक्षत्रीं परियेसा ॥४३॥

ग्राम राहिला पिकेंवीण । शूद्रशेत वाढलें दशगुण ।
वाढले यावनाळ सगुण । एकेका अकरा फरगडेंसीं ॥४४॥

पीक झालें अत्यंत । समस्त लोक विस्मय करीत ।
देश राहिला स्वभावें दुष्कृत । महदाश्चर्य जहालें देखा ॥४५॥

ते शूद्रस्त्री संतोषोनि । शेता आली पूजा घेऊनि ।
अवलोकीतसे आपुले नयनीं । महानंद करीतसे ॥४६॥

येऊनि लागे पतीचे चरणीं । विनवीतसे कर जोडूनि ।
बोले मधुर करुणावचनीं । क्षमा करणें म्हणतसे ॥४७॥

अज्ञानमदें अति वेष्‍टिलें । नेणतां तुम्हांसी अति निंदिलें ।
श्रीगुरु कैंचा काय ऐसें म्हणितलें । क्षमा करणें प्राणेश्वरा ॥४८॥

ऐसें पतीसी विनवोनि । शेतींचे पांडवांसी पूजोनि ।
विचार करिती दोघेजणी । श्रीगुरुदर्शना जावें आतां ॥४९॥

म्हणोनि सर्व आयतीसीं । पूजों आलीं श्रीगुरुसी ।
स्वामी पुसती तयांसी । काय वर्तमान म्हणोनियां ॥५०॥

दोघेंजण स्तोत्र करिती । जय जया शिवमुनि म्हणती ।
कामधेनु कुळदैवती । तूंचि आमुचा देवराया ॥५१॥

तुझें वचनामृत आम्हां । चिंतामणिप्रकार महिमा ।
पूर्ण जाहलें आमुचें काम्य । शरण आलों तुज आजि ॥५२॥

'भक्तवत्सल' ब्रीद ख्याति । ऐसें जगीं तुज वानिती ।
आम्हीं देखिलें दृष्‍टांतीं । म्हणोनि चरणीं लागलीं ॥५३॥

नाना प्रकारें पूजा आरती । शूद्र-स्त्री करीतसे भक्तीं ।
श्रीगुरु संतोषले अतिप्रीतीं । म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरीं ॥५४॥

निरोप घेऊनि दोघेंजण । गेलीं आपुले आश्रमासी जाण ।
करितां मास काळक्रमण । पीक जाहलें अपार ॥५५॥

गतसंवत्सराहूनि देखा । शतगुण जाहलें धान्य अधिका ।
शूद्र म्हणतसे ऐका । अधिकारियासी बोलावोनि ॥५६॥

शूद्र म्हणे अधिकारियासी । पीक गेलें सर्व गांवासी ।
रिता दिसतसे कोठारासी । आपण देईन अर्ध वांटा ॥५७॥

गतवत्सर-द्विगुण तुम्हांसी । अंगीकृत होय परियेसीं ।
धान्य जाहलें बहुवसीं । शताधिकगुण देखा ॥५८॥

देईन अर्ध भाग मी संतोषीं । संदेह न करा हो मानसीं ।
अधिकारी म्हणती तयासी । धर्महानि केवीं करुं ॥५९॥

गुरुकृपा असतां तुजवरी । पीक जाहलें बहुतापरी ।
नेऊनियां आपुले घरीं । राज्य करीं म्हणती त्यासी ॥६०॥

संतोषोनि शूद्र देखा । विप्रांसी वांटी धान्य अनेका ।
घेऊनि गेला सकळिका । राजवांटा देऊनि ॥६१॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र-महिमा परियेसीं ।
दृढ भक्ति असे सदा ज्यासी । कैंचें दैन्य तया घरीं ॥६२॥

सकळाभीष्‍ट तयासी होती । लक्ष्मी राहे अखंडिती ।
श्रीगुरुसेवा भावभक्तीं । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥६३॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥४७॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ॥ ओंवीसंख्या ६३ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥




गुरूचरित्र – अध्याय अठ्ठेचाळीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व झालें परियेसीं ।
गुरुचरित्र विस्तारेंसी । सांगतां संतोष होतसे ॥१॥

गाणगापुरीं असतां गुरु । ख्याति झाली अपरंपारु ।
भक्त होता एक शूद्रू । तयाची कथा ऐक पां ॥२॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात असता अनुष्‍ठानासी ।
मार्गी तो शूद्र परियेसीं । आपुले शेतीं उभा असे ॥३॥

श्रीगुरुतें नित्य देखोनि । धावत येऊनि शेतांतूनी ।
आपण साष्‍टांगीं नमोनि । पुनरपि जात आपुले स्थाना ॥४॥

माध्यान्हकाळीं मठासी येता । पुनरपि चरणीं ठेवी माथा ।
ऐसे कितीएक दिवस होतां । शूद्राची भक्ति वाढली ॥५॥

श्रीगुरु तयासी न बोलती । नमन केलिया उभे असती ।
येणें विधीं बहु काळ क्रमिती । आला शूद्र नमस्कारा ॥६॥

नमस्कारितां शूद्रासी श्रीगुरु पुसती संतोषीं ।
कां गा नित्य तूं कष्‍टतोसी । नमन करिसी येऊनिया ॥७॥

तुझे मनीं काय वासना । सांग त्वरित आम्हां जाणा ।
शूद्र म्हणे आवड मना । शेत अधिक पिकावें ॥८॥

तयासी पुसती गुरुनाथ । काय पेरिलें शेतांत ।
शूद्र म्हणे यावनाळ बहुत । पीक आलें तुझे धर्मीं ॥९॥

नमस्कारितां तुम्हां नित्य । पीक आलें असे अत्यंत ।
पोटरीं येतील त्वरित । आतां तुझेनि धर्मीं जेवूं ॥१०॥

स्वामी यावें शेतापासीं । पहावें अमृतदृष्‍टींसी ।
तूं समस्तां प्रतिपाळिसी । शूद्र म्हणोनि न उपेक्षावें ॥११॥

श्रीगुरु गेले शेतापासीं । पाहूनि म्हणती त्या शूद्रासी ।
सांगेन एक ऐकसी । विश्वास होईल बोलाचा ॥१२॥

जें सांगेन मी तुजसी । जरी भक्तीनें अंगिकारिसी ।
तरीच सांगूं परियेसीं । एकभावें त्वां करावें ॥१३॥

शूद्र विनवी स्वामियासी । गुरुवाक्य कारण आम्हांसी ।
दुसरा भाव आम्हांसी । नाहीं स्वामी म्हणे तो ॥१४॥

मग निरोपिती श्रीगुरु तयासी । आम्ही जातों संगमासी ।
परतोनि येऊं मध्यान्हासी । तंव कापावें सर्व पीक ॥१५॥

ऐसें सांगोनि शूद्रासी । श्रीगुरु गेले संगमासी ।
शूद्र विचारी मानसीं । गुरुवाक्य आपणा कारण ॥१६॥

शीघ्र आला ग्रामांत । अधिकारियासी विनवीत ।
खंडोनि द्यावें मला शेत । गत संवत्सराप्रमाणें धान्य देईन ॥१७॥

अधिकारी म्हणती तयासी । पीक झालें असे बहुवसीं ।
या कारणें उक्तें मागसी । अंगिकार न करिती ॥१८॥

नाना प्रकारें विनवी त्यांसी । द्विगुण देईन गतसंवत्सरेसी ।
अंगिकारिलें संतोषीं । वचनपत्र लिहून घेती ॥१९॥

आपण अभयपत्र घेऊनि । लोक मिळवोनि तत्क्षणीं ।
गेला शेतांत संतोषोनि । म्हणे कापा तयासी ॥२०॥

कापूं लागतां शेतासी । स्त्री-पुत्र वर्जिती तयासी ।
पाषाण घेऊनि स्त्रियेसी । मारुं आला तो शूद्र ॥२१॥

पुत्रातें मांरी येणेंपरी । पळत आले गांवाभीतरीं ।
आड पडतां राजद्वारीं । पिसें लागलें पतीसी ॥२२॥

पीक असे बहुवसी । कापून टाकितो मूर्खपणेंसी ।
वर्जितां पहा आम्हांसी । पाषाणघाईं मारिलें ॥२३॥

संन्याशाचें माहात्म्य वाचें बोले । पीक सर्व कोमळ कापिलें ।
आमुचें जीवित्व भाणास गेलें । आणिक भक्षितों एक मास आम्ही ॥२४॥

अधिकारी म्हणती तयासी । कापी ना का आपुल्या शेतासी ।
पत्र असे आम्हांपासीं । गतसंवत्सरा द्विगुण धान्य द्यावें ॥२५॥

वर्जावया माणसें पाठविती । शूद्र न ऐके कवणे गतीं ।
शूद्र म्हणे अधिकारी भीतीं । पेवीचे कण आतां देईन ॥२६॥

दूत सांगती अधिकारियासी । आम्हीं सांगितलें शूद्रासी ।
सांगोनि पाठविलें तुम्हांसी । विनोद असे परियेसा ॥२७॥

जरी भितील अधिकारी । तरी देईन आतांचि घरीं ।
गुरें बांधीन तयांचे द्वारीं । पत्र आपण दिलें असे ॥२८॥

दूत सांगती ऐशा रीतीं । पुढें वर्तली काय स्थिति ।
राजा अधिकारी तयाप्रती । काय उत्तर बोलतसे ॥२९॥

अधिकारी म्हणती तयासी । आम्हां चिंता कायसी ।
पेव ठाउकें आहे आम्हांसी । धान्य आहे अपार ॥३०॥

इतुकें होतां शूद्रें देखा । पीक कापिलें मनःपूर्वका ।
उभा असे मार्गीं ऐका । श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥

नमन करोनि श्रीगुरुसी । शेत दाखविलें कापिलें ऐसी ।
श्रीगुरु म्हणती तयासी । वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥

विनोदें तुज सांगितलें । तुवां निर्धारें कापलें ।
शूद्र म्हणे तुमचें वाक्य भलें । तेंचि मज कामधेनु ॥३३॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । निर्धार असे तुझे चित्तीं ।
होईल अत्यंत फळप्राप्ति । चिंता न करीं मानसीं ॥३४॥

ऐसें सांगोनि श्रीगुरुनाथ । आले आपण ग्रामांत ।
सवें शूद्र असे येत । आपुले घराप्रती गेला ॥३५॥

पुसावया येती समस्त । तयाचे घरीं होतो आकांत ।
स्‍त्री-पुत्र सर्व रुदन करीत । म्हणती आपुला ग्रास गेला ॥३६॥

शूद्र समस्तांतें संबोखी । न करीं चिंता रहा सुखी ।
गुरुसोय नेणती मूर्खी । कामधेनु वाक्य तयांचें ॥३७॥

एकेकाचे सहस्‍त्रगुण । अधिक लाभ तुम्हां जाण ।
स्थिर करा अंतःकरण । हानि नव्हे निर्धार पैं ॥३८॥

गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैचें होय त्यासी ।
निधान जोडलें आम्हांसी । म्हणोनि शूद्र सांगतसे ॥३९॥

नर म्हणूं नये श्रीगुरुसी । शिवस्वरुप जाणा भरंवसीं ।
असे कारण पुढें आम्हांसी । म्हणोनि निरोपिलें असे मज ॥४०॥

नानापरी स्‍त्री-पुत्रांसी । संबोधित असे शूद्र अति हर्षीं ।
इष्‍टजन बंधुवर्गासी । येणेंचि रीतीं सांगतसे ॥४१॥

समस्त राहिले निवांत । ऐसें आठ दिवस क्रमित ।
वायु झाला अति शीत । समस्त पिकें नासलीं ॥४२॥

समस्त ग्रामींची पिकें देखा । शीतें नासलीं सकळिका ।
पर्जन्य पडला अकाळिका । मूळ नक्षत्रीं परियेसा ॥४३॥

ग्राम राहिला पिकावीण । शूद्रशेत वाढलें शतगुणें ।
वाढला यावनाळ सगुण । एकेका अकरा फरगडेंसी ॥४४॥

तैं शूद्र-स्‍त्री संतोषोनि । शेता आली पूजा घेऊनि ।
अवलोकितसे आपुले नयनीं । महानंद करितसे ॥४५॥

पीक झालें अत्यंत । देखोनिया समस्त ।
येऊनि जन समस्त तेथ । महदाश्चर्य करीत देखा ॥४६॥

येऊनि लागे पतिचरणीं । विनवीतसे कर जोडोनि ।
बोले मधुर करुणावचनीं । क्षमा करीं म्हणतसे ॥४७॥

अज्ञानमदें अति वेष्‍टिलें । नेणतां तुम्हांतें निंदिलें ।
गुरु कैचा काय म्हणितलें । क्षमा करणें प्राणनाथ ॥४८॥

ऐसें पतीसी संबोधोनि । शेतींचा देव पूजोनि ।
विचार केला दोघांनीं । गुरुदर्शना जावें आतां ॥४९॥

म्हणोनि सांगे स्त्रियेसी । पूजों आलीं श्रीगुरुसी ।
स्वामी पुसती तयांसी । काय वर्तमान म्हणोनिया ॥५०॥

चरणीं लागलीं तेव्हां दोन्ही । हस्तद्वय जोडोनि ।
स्वामीदर्शन उल्हासोनि । उभीं ठाकलीं संमुख ॥५१॥

दोघेंजणें स्तोत्र करिती । जय जयाजी श्रीगुरुमूर्ती ।
कामधेनु कुळदैवत म्हणती । तूंचि आमुचा गुरुराया ॥५२॥

तुझें अमृतवचन आम्हां । चिंतामणिप्रकार महिमा ।
पूर्ण केलें आमुच्या कामा । शरण आलों तुज आम्ही ॥५३॥

भक्तवत्सल ब्रीदख्याति । ऐसें जगीं तुज वानिती ।
आम्हीं देखिलें दृष्‍टांतीं । म्हणोनि चरणीं लागलीं ॥५४॥

नाना प्रकारें पूजा आरती । शूद्र-स्‍त्री करीतसे भक्तीं ।
श्रीगुरु बोलती अतिप्रीतीं । लक्ष्मी अखंड तुझे घरीं ॥५५॥

निरोप घेऊनि दोघेंजण । गेलीं आपुले आश्रमीं जाण ।
करितां मास काळक्रमण । पीक आलें अपार ॥५६॥

गतसंवत्सराहूनि देखा । शतगुणी झालें धान्य अधिका ।
शूद्र म्हणतसे ऐका । अधिकारियातें बोलावोनि ॥५७॥

शूद्र म्हणे अधिकारियासी । पीक गेलें सर्व गांवासी ।
वोस दिसे कोठारासी । आपण देऊं अर्धा भाग ॥५८॥

गतवर्षा द्विगुण तुम्हांसी । अंगिकारिलें मीं परियेसीं ।
धान्य झालें बहुवसीं । शतगुणें अधिक देखा ॥५९॥

परी देईन अर्ध संतोषीं । संदेह न धरा हो मानसीं ।
अधिकारी म्हणती तयासी । धर्महानि केवी करुं ॥६०॥

गुरुकृपा होतां तुजवरी । पीक झालें बहुतांपरी ।
नेऊनिया आपुले घरीं । राज्य करीं म्हणती तया ॥६१॥

संतोषोनि शूद्र देखा । विप्रासी वांटी धान्य अनेका ।
घेऊनि गेला सकळिका । राजधान्य देऊनि ॥६२॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र-महिमा परियेसीं ।
दृढ भक्ति असे ज्यासी । दैन्य कैचें तया घरीं ॥६३॥

सकळाभीष्‍टें त्यासी होती । लक्ष्मी राहे अखंडिती ।
गुरु सेवा हो निश्चिती । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥६४॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । गुरुशिष्यसंवाद विख्यात ।
भक्ता शूद्रा वर प्राप्त । अष्‍टचत्वारिंशोऽध्याय हा ॥६५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम अष्‍टचत्वारिंशो‍ऽध्यायः ॥४८॥

॥ ओवीसंख्या ॥६५॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥






गुरूचरित्र – अध्याय एकोणपन्नासावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक शिष्य सगुण । सिद्धमुनीतें नमन करुन ।
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरोनिया ॥१॥

त्रैमूर्तीचा अवतार । झाला वेषधारी नर ।
राहिला प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणोनिया ॥२॥

भूमीवरी प्रख्यात । तीर्थें असती असंख्यात ।
समस्त सांडोनिया येथ काय कारण वांस केला ॥३॥

या स्थानाचें महिमान । सांगा स्वामी विस्तारोन ।
म्हणोनि धरी सिद्धाचे चरण । नामधारक तये वेळीं ॥४॥

ऐकोन तयाचें वचन । सिद्धमुनि संतोषोन ।
सांगतसे विस्तारोन । ऐका श्रोते एकचित्तें ॥५॥

आश्विन वद्य चतुर्दशीसी । दिपवाळी पर्वणीसी ।
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । स्नान करावें त्रिस्थळीचें ॥६॥

गया-प्रयाग-वाराणशीसी । चला यात्रे पुत्रकलत्रेंसी ।
विप्र म्हणती श्रीगुरुसी । आइती करणें म्हणोनिया ॥७॥

ऐकोन श्रीगुरु हांसती । ग्रामजवळी तीर्थें असती ।
करणें न लागे तुम्हां आइती । चला नेईन तुम्हांसी ॥८॥

ऐसें म्हणोनि भक्तांसी । गेले अमरजासंगमासी ।
स्नान केलें महाहर्षीं । शिष्यांसहित श्रीगुरुंनीं ॥९॥

गुरु म्हणती शिष्यांसी । महिमा अपार संगमासी ।
प्रयागसमान परियेसीं । षट्‌कुळामध्यें स्नान करणें ॥१०॥

विशेष नदी भीमातीर । अमरजासंगम थोर ।
गंगा यमुना वाहे निर्धार । तीर्थ बरवें परियेसा ॥११॥

विशेषें आपण उत्तरे वाहे । याचें पुण्य अपार आहे ।
शताधिक पुण्य पाहे । काशीहून परियेसा ॥१२॥

आणिक अष्‍ट तीर्थें असती । तयांचा महिमा विख्यात जगतीं ।
सांगेन ऐका एकचित्तीं । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥१३॥

ऐकोन श्रीगुरुचें वचन । विनविताती भक्तजंन ।
अमरजानदी नाम कोण । कोणापासाव उत्पत्ति ॥१४॥

श्रीगुरु म्हणती भक्तांसी । बरवें पुसिलें आम्हांसी ।
जालंधर पुराणासी । असे कथा प्रख्यात ॥१५॥

जालंधर नामें निशाचर । समस्त जिंकिलें सुरवर ।
आपुलें केलें इंद्रपुर । समस्त देव पळाले ॥१६॥

देवा दैत्यां झालें युद्ध । सुरवर मारिले बहुविध ।
इंद्रें जाऊनि प्रबोध । ईश्वराप्रती सांगितला ॥१७॥

इंद्र म्हणे ऐक शिवा । दैत्यें मारिलें असे देवां ।
शीघ्र प्रतिकार करावा । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥

आम्ही मारितों दैत्यांसी । रक्त पडतसे भूमीसी ।
अखिल दैत्यबिंदूंसी । अधिक उपजवी भूमीवरी ॥१९॥

स्वर्ग मृत्यु पाताळ । सर्वत्र मारिलें दैत्यकुळ ।
मारिले आमुचे देव सकळ । म्हणोनि आलों तुम्हांपासीं ॥२०॥

ऐसें वचन ऐकोनि । ईश्वर प्रज्वाळला मनीं ।
निघाला रुद्र होऊनि । दैत्यनिर्दाळण करावया ॥२१॥

इंद्र विनवी ईश्वरासी । वधावया दैत्यांसी ।
जीवन आणावया देवांसी । ऐसा प्रतिकार करावा ॥२२॥

संतोषोनि गिरिजारमण । अमृतमंत्र उच्चारोन ।
घट दिधला तत्क्ष्ण । संजीवनी उदक देखा ॥२३॥

तें उदक घेवोनि इंद्रराव । शिंपताचि समस्त देव ।
उठोनिया अमर सर्व । स्वर्गास जाती तये वेळीं ॥२४॥

उरलें अमृत घटीं होतें । घेऊनि जातां अमरनाथें ।
पडिलें भूमीं अवचितें । प्रवाह आला क्षितीवरी ॥२५॥

ते संजीवनी नामें नदी । उद्‌भवली भूमीं प्रसिद्धी ।
अमरजा नाम याचि विधीं । प्रख्यात झाली अवधारा ॥२६॥

या कारणें या नदीसी । जे स्नान करिती भक्तींसी ।
काळमृत्यु न बाधे त्यासी । अपमृत्यु घडे केवी ॥२७॥

शतायुषी पुरुष होती । रोगराई न पीडिती ।
अपस्मारादि रोग जाती । ब्रह्महत्यादि पातकें ॥२८॥

अमृतनदी नाम तियेसी । संगम झाला भीमरथीसी ।
तीर्थ झालें प्रयागसरसी । त्रिवेणीचा संगम ॥२९॥

कार्तिकादि माघमासीं । स्नान करिती भक्तींसी ।
इह सौख्य परलोकासी । मोक्षस्थाना पावती ॥३०॥

सोम-सूर्य-ग्रहणासी । संक्रमण सोम-अमावास्येसी ।
पुण्यतिथि एकादशीसी । स्नान करावें अनंत पुण्य ॥३१॥

साधितां प्रतिदिवस जरी । सदा करावें मनोहरी ।
समस्त दोष जाती दूरी । शतायुषी श्रियायुक्त होय ॥३२॥

ऐसा संगममहिमा ऐका । पुढें सांगतसें तीर्थ विशेखा ।
दिसे अश्वत्थ संमुखा । मनोहर तीर्थ असे ॥३३॥

या तीर्थी स्नान केलिया । मनोहर पाविजे काया ।
कल्पवृक्षस्थानीं अनुपम्या । कल्पिलें फळ पाविजे ॥३४॥

अश्वत्थ नव्हे हा कल्पतरु । जाणावें तुम्हीं निर्धारु ।
जें जें चिंतिती मनीं नरु । पावती काम्यें अवधारा ॥३५॥

ऐसें मनोहर तीर्थ । ठावें असे प्रख्यात ।
संमुख असे अश्वत्थ । सदा असो याचिया गुणें ॥३६॥

जे जन येऊनि सेवा करिती । तयांचे मनोरथ पुरती ।
न धरावा संदेह आतां चित्तीं । ऐसें म्हणती श्रीगुरुनाथ ॥३७॥

आम्ही वसतों सदा येथें । ऐसें जाणा तुम्ही निरुतें ।
दृष्‍टीं पडतां मुक्ति होते । खूण तुम्हां सांगेन ॥३८॥

कल्पवृक्षातें पूजोनि । मग जावें शंकरभुवनीं ।
संगमेश्वर असे त्रिनयनी । पूजा करावी मनोभावें ॥३९॥

जैसा पर्वती मल्लिकार्जुन । तैसा संगमीं रुद्र आपण ।
भक्तिपूर्वक प्रदक्षिण । करावी तुम्ही अवधारा ॥४०॥

नंदिकेश्वरातें नमोनि । नमन करावें चंडस्थानीं ।
पूर्ण नदीं सव्य करोनि । मग जावें सोमसूत्रासी ॥४१॥

सवेंचि परतोनि वृषभासी । नमोनि जावें चंडापासीं ।
पुनः जावें सोमसूत्रासी । येणें विधीं प्रदक्षिणा ॥४२॥

ऐसी प्रदक्षिणा देखा । तीन वेळां करोनि ऐका ।
वृषभस्थानीं येऊनि निका । अवलोकावें शिवासी ॥४३॥

वामहस्तीं वृषण धरोनि । तर्जनी अंगुष्‍ठ शृंगीं ठेवोनि ।
पूजा पहावी दोनी नयनीं । इंद्रासमान होय नर ॥४४॥

धनधान्यादि संपत्ति । लक्ष्मी राहे अखंडिती ।
पुत्र पौत्र त्यासी होती । संगमेश्वर पूजिलिया ॥४५॥

पुढें तीर्थ वाराणशी । अर्घ कोश परियेसीं ।
ग्राम असे नागेशी । तेथोनि उद्‌भव असे जाण ॥४६॥

याचें असे आख्यान । कथा नव्हे प्रत्यक्ष जाण ।
होता एक ब्राह्मण । भारद्वाज गोत्राचा ॥४७॥

विरक्त असे ईश्वरभक्त । सर्वसंग त्याग करीत ।
आपण रत अनुष्‍ठानांत । सदा ध्याई शिवासी ॥४८॥

प्रसन्न झाला चंद्रमौळी । सदाशिव दिसे जवळी ।
विप्रा आल्हाद सर्व काळीं । देहभाव विसरोनि हिंडत ॥४९॥

लोक म्हणती पिसा त्यासी । निंदा करिती बहुवसीं ।
दोघे बंधु असती तयासी । नामें त्यांचीं अवधारा ॥५०॥

एका नाम असे ईश्वर । दुसरा नामें असे पांडुरंगेश्वर ।
बंधु एकला करोनि अव्हेर । आपण निघाले काशीसी ॥५१॥

करोनिया सर्व आइती । सर्व निघाले त्वरिती ।
तया पिशातें पाचारिती । चला जाऊं म्हणोनिया ॥५२॥

ब्रह्मज्ञानी द्विज निका । पिसा म्हणती मूर्ख लोका ।
बंधूंसि म्हणे द्विज ऐका । नका जाऊं काशीसी ॥५३॥

विश्वेश्वर असे मजजवळी । दावीन तुम्हां तात्काळीं ।
आश्चर्य करिती सकळी । दावीं म्हणती बंधुजन ॥५४॥

काशीस जावें अति प्रयास । येथें भेटे तरी कां सायास ।
म्हणोनि बोलताती हर्ष । तये वेळीं अवधारा ॥५५॥

इतुकिया अवसरीं । विप्र गंगास्नान करी ।
ध्यानस्थ होता साक्षात्कारी । ईश्वर आला तयाजवळी ॥५६॥

विनवीतसे शिवासी । आम्हां नित्य पाहिजे काशी ।
दर्शन होय विश्वेश्वरासी । म्हणोनि चरणीं लागला ॥५७॥

ईश्वर भोळा चक्रवर्ती । प्रसन्न झाला अतिप्रीतीं ।
दिसे तीच काशी त्वरितीं । मणिकर्णिका कुंड झालें ॥५८॥

विश्वेश्वराची मूर्ति एक । निघाली कुंडीं विशेख ।
नदी उत्तरे दिसे निक । एकबाणप्रमाण असे ॥५९॥

उदक निघालें कुंडांतून । जैसें भागीरथी गहन ।
ज्या ज्या असती काशींत खुणा । समस्त असती तयासी ॥६०॥

संगम झाला नदी भीमा । तीर्थ असे काशी उत्तमा ।
आचार करिती सप्रेमा । बंधु ज्ञानी म्हणती मग ॥६१॥

म्हणे ब्राह्मण बंधूंसी । काशीस न जावें आमुचे वंशीं ।
समस्तें आचरावें ही काशी । आम्हां शंकरें सांगितलें ॥६२॥

आपुलें नाम ऐसें जाणा । गोसावी नाम निर्धारीं खुणा ।
तुम्हीं बंधु दोघेजणां । आराधावें ऐसें निरोपिलें ॥६३॥

दोघीं जावें पंढरपुरा । तेथें असे पुंडलीकवरा ।
सदा तुम्ही पूजा करा । आराध्या नामें विख्यात ॥६४॥

प्रतिवर्षीं कार्तिकीसी । येथें यावें निर्धारेंसी ।
तीर्थ असे विशेषीं । ऐसें म्हणे ब्राह्मण ॥६५॥

श्रीगुरु म्हणती भक्तासी । काशीतीर्थ प्रगटलें ऐसी ।
न धरावा संशय तुम्हीं मानसीं । वाराणसी प्रत्यक्ष ही ॥६६॥

ऐकोनि समस्त द्विजवर । करिती स्नान निर्मळ आचार ।
तेथोनि पुढें येती गुरुवर । सिद्ध सांगे नामधारका ॥६७॥

श्रीगुरु म्हणती सकळिकांसी । तीर्थ दाविती पापविनाशी ।
स्नानमात्रें पाप नाशी । जैसा तृणा अग्नि लागे ॥६८॥

आपुले भगिनी रत्‍नाईसी । दोष असे बहुवसीं ।
बोलावोनि त्या समयासी । पुसताती श्रीगुरुमूर्ति ॥६९॥

ऐक पूर्वदोष भगिनी । तूं आलीस आमुचे दर्शनीं ।
पाप तुझें असे गहनीं । आठवणें करीं मनांत ॥७०॥

ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । पायां पडे वेळोवेळां ।
अज्ञान आपण मूढ केवळा । इतुकें कैसें ज्ञान मज ॥७१॥

तूं जगदात्मा विश्वव्यापक । तूंचि ज्ञानज्योतिप्रकाशक ।
सर्व जाणसी तूंचि एक । विस्तारोनि सांग मज ॥७२॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । आपुलें पाप मज पुससी ।
वधिलें पांच मार्जारांसी । नेणसी खूण धरीं आपुलीं ॥७३॥

होती मार्जारी गर्भिणी । प्रसूति झाली भांडयामधुनी ।
न पाहतां उदक घालुनी । झाकोनि ठेविली अग्नीवरी ॥७४॥

पांच मार्जारांचा घात । लागला दोष बहुत ।
ऐसें ऐकोनिया त्वरित । श्वेतकुष्‍ठ झाले तिसी ॥७५॥

देखोनिया भयाभीत झाली । श्रीगुरुचरणा येऊनि लागली ।
विनवीतसे करुणा बहाळी । कृपा करी गा गुरुमूर्ति ॥७६॥

करोनि समस्तपापराशि । तीर्थीं जाती वाराणशी ।
मी आलें तुझे दर्शनासी । पापावेगळी होईन म्हणोनि ॥७७॥

श्रीगुरु पुसती तियेसी । तुज राहे पापराशि ।
पुढले जन्मीं जरी भोगिसी । तरी कुष्‍ठ जाईल आतां ॥७८॥

रत्‍नाई विनवी स्वामियासी । उबगलें बहुत जन्मासी ।
याचि कारणें तुझे दर्शनासी । पापावेगळें होऊं म्हणतसें ॥७९॥

आतां पुरे जन्म आपणा । म्हणोनि धरिले तुझे चरणा ।
याचि जन्मीं भोगीन जाणा । पापाचें फळ म्हणतसे ॥८०॥

इतुकें ऐकोनि गुरुमूर्ति । रत्‍नाईस निरोप देती ।
पापविनाश तीर्था जाय त्वरिती । स्नानमात्रें जाईल कुष्‍ठ ॥८१॥

नित्य करीं हो येथें स्नान । सप्तजन्मींचे दोष दहन संदेह न करितां होय अनुमान ।
म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥८२॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । आम्हीं देखिलें दृष्‍टींसी ।
स्नान करितां त्रिरात्रीसी । कुष्‍ठ तिचें परिहारिलें ॥८३॥

ऐसें प्रख्यात तीर्थ देखा । नाम पापविनाशी ऐका ।
जे करिती स्नान भक्तिपूर्वका । सप्तजन्मींचीं पापें जाती ॥८४॥

तीर्थमहिमा देखोन । रत्‍नाबाई संतोषोन ।
राहिली मठ बांधोन । तीर्थासन्निध अवधारा ॥८५॥

पुढें कोटितीर्थ देखा । श्रीगुरु दाविती सकळिकां ।
स्नानमात्रें होय निका । याचें आख्यान बहु असे ॥८६॥

जंबुद्वीपीं जितकीं तीर्थें । एकेक महिमा अपरिमितें ।
इतुकिया वास कोटितीर्थें । विस्तार असे सांगतां ॥८७॥

सोम-सूर्य-ग्रहणासी । अथवा संक्रांतिपर्वणीसी ।
अमापौर्णिमा प्रतिपदेसी । स्नान तेथें करावें ॥८८॥

सवत्सेसी धेनु देखा । सालंकृत करोनि ऐका ।
दान द्यावें द्विजा निका । एकेक दान कोटिसरसे ॥८९॥

तीर्थमहिमा आहे कैसी । स्नान केलिया अनंत फळ पावसी ।
एकेक दान कोटीसरसी । दोन तीर्थीं करावें ॥९०॥

पुढें तीर्थ रुद्रपद । कथा असे अतिविनोद ।
गयातीर्थ समप्रद । तेथें असे अवधारा ।
जे जे आचार गयेसी । करावे तेथें परियेसीं ।
पूजा करा रुद्रपदाची । कोटि जन्मींचीं पापें जाती ॥९२॥

पुढें असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र ।
केशव देव सन्निध तत्र । पुण्यराशिस्थान असे ॥९३॥

या तीर्थी स्नान करिता । ज्ञान होय पतितां ।
अस्थि होती चक्रांकिता । द्वारावतीसमान देखा ॥९४॥

या तीर्थीं स्नान करोनि । पूजा करावी केशवचरणीं ।
द्वारावती चतुर्गुणी । पुण्य असे अवधारा ॥९५॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । समस्त करिती स्नान दान ।
पुढें असे मन्मथदहन । तीर्थ सांगती श्रीगुरु ॥९६॥

ग्रामपूर्वभागेसी । कल्लेश्वर देव परियेसीं ।
जैसें गोकर्णमहाबळेश्वरासी । समान क्षेत्र परियेसा ॥९७॥

मन्मथ तीर्थीं स्नान करावें । कल्लेश्वरातें पूजावें ।
प्रजावृद्धि होय बरवें । अष्‍टैश्चर्यें पाविजे ॥९८॥

आषाढ श्रावण मासीं । अभिषेक करावा देवासी ।
दीपाराधना कार्तिकमासीं । अनंत पुण्य अवधारा ॥९९॥

ऐसा अष्‍टतीर्थमहिमा । सांगती श्रीगुरु पुरुषोत्तमा ।
संतोषोनि भक्त उत्तमा । अति उल्हास करिताती ॥१००॥

म्हणती समस्त भक्तजन । नेणों तीर्थाचें महिमान ।
स्वामीं निरोपिलें कृपेनें । पुनीत केलें आम्हांसी ॥१॥

जवळी असतां समस्त तीर्थें । कां जावें दूर यात्रे ।
स्थान असे हें पवित्र । म्हणोनि समस्त आचरती ॥२॥

अष्‍टतीर्थें सांगत । श्रीगुरु गेले मठांत ।
समाराधना करिती भक्त । महानंद प्रवर्तला ॥३॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । तीर्थमहिमा आहे ऐसी ।
श्रीगुरु सांगती आम्हांसी । म्हणोनि तुज निरोपिलें ॥४॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । क्षेत्र थोर गाणगापुर ।
तीर्थें असती अपरंपार । आचरा तुम्ही भक्तीनें ॥५॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धमुनि-शिष्यसंवाद बहुत ।
गाणगापुरमाहात्म्य विख्यात । एकुणपन्नासाव्यांत कथियेलें ॥१०६॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अमरजासंगमगाणगापुरक्षेत्रमहिमावर्णनं नाम एकोनपंचाशत्तमोऽध्यायः ॥४९॥

॥ ओवीसंख्या ॥ १०६ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥






गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
पूर्वीं रंजक-कथानका । तूंतें आपण निरोपिलें ॥१॥

तयानें मागितला वर । राज्यपद धुरंधर ।
प्रसन्न झाले तयासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥२॥

उपजला तो म्लेंच्छ जातींत । वैदुरीनगरीं राज्य करीत ।
पुत्रपौत्रीं नांदत । महानंदें परियेसा ॥३॥

ऐसा राजा तो यवन । होता आपण संतोषोन ।
अश्व गज अपार धन । पायभारा मिति नाहीं ॥४॥

आपण तरी यातिहीन । पुण्यवासना अंतःकरण ।
दानधर्म करी जाण । समस्त यातीं एकभावें ॥५॥

विशेष भक्ति विप्रांवरी । ती असे पूर्वसंस्कारीं ।
असती देवालयें भूमीवरी । उपद्रव नेदी तयांसी ॥६॥

तया घरचे पुरोहित । तया रायातें शिकवीत ।
आपण होऊन म्लेंच्छ जात । देवद्विज निंदावें ॥७॥

तयांतें तुम्ही सेवितां देख । तेणें होय अपार पातक ।
यातिधर्म करणें सुख । अनंत पुण्य असे जाणा ॥८॥

मंदमति द्विजजाती । देखा पाषाणपूजा करिती ।
समस्तांतें देव म्हणती । काष्‍ठवृक्षपाषाणांसी ॥९॥

धेनूसी म्हणती देवता होय । पृथ्वी सोम अग्नि सूर्य ।
तीर्थयात्रा नदीतोय । समस्तां देव म्हणताती ॥१०॥

ऐसे विप्र मंदमती । निराकारा साकार म्हणती ।
तयांतें म्लेंच्छ जे भजती । ते पावती अधःपात ॥११॥

ऐसे यवनपुरोहित । रायापुढें सांगती हित ।
ऐकोनि राजा उत्तर देत । कोपें करोनि परियेसा ॥१२॥

राजा म्हणे पुरोहितांसी । निरोपिलें तुम्हीं आम्हांसी ।
अणुरेणुतृणकाष्‍ठेंसी । सर्वेश्वर पूर्ण असे ॥१३॥

समस्त सृष्‍टि ईश्वराची । स्थावर जंगम रचिली साची ।
सर्वत्र देव असे साची । तर्कभेद असंख्य ॥१४॥

समस्त जातींची उत्पत्ति । जाणावी तुम्ही पंचभूतीं ।
पृथ्वी आप तेज वायु निगुती । आकाशापासाव परियेसा ॥१५॥

समस्तांची वृद्धि एक । जाणती मृत्तिका कुलाल लोक ।
नानापरीचीं करिती अनेक । भांडीं भेद परोपरी ॥१६॥

नानापरीच्या धेनु असती । क्षीर असे एकचि रीतीं ।
सुवर्ण जाण तेचि रीतीं । परोपरीचे अलंकार ॥१७॥

तैसा देह भिन्न जाण । परमात्मा एकचि पूर्ण ।
जैसा नभीं मृगलांछन । नाना घटीं दिसतसे ॥१८॥

दीप असे एक घरीं । वाती लाविल्या सहस्त्र जरी ।
समस्त होती दीपावरी । भिन्न भाव कोठें असे ॥१९॥

एकचि सूत्र आणोनि । नानापरीचे ओविती मणि ।
सूत्र एकचि जाणोनि । न पाविजे भाव भिन्न ॥२०॥

तैशा जाति नानापरी । असताती वसुंधरीं ।
समस्तांसी एकचि हरी । भिन्न भाव करुं नये ॥२१॥

आणिक तुम्ही म्हणाल ऐसें । पूजिती पाषाण देव कैसे ।
सर्वां ठायीं पूर्ण भासे । विश्वात्मा आहेचि ॥२२॥

प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि । म्हणोनि सांगती प्रसिद्धीं ।
आत्माराम पूजिती विधीं । त्यांचे मतीं ऐसें असे ॥२३॥

स्थिर नव्हे अंतःकरण । म्हणोनि करिती प्रतिमा खूण ।
नाम ठेवोनि नारायण । तया नामें पूजिताती ॥२४॥

तयातें तुम्ही निंदा करितां । तरी सर्वां ठायीं पूर्ण कां म्हणतां ।
प्रतिष्‍ठाव्या आपुले मता । द्वेष आम्हीं न करावा ॥२५॥

या कारणें ज्ञानवंतीं । करुं नये निंदास्तुति ।
असती नानापरी जाती । आपुले रहाटीं रहाटती ॥२६॥

ऐशापरी पुरोहितांसी । सांगे राजा विस्तारेंसी ।
करी पुण्य बहुवसीं । विश्वास देवद्विजांवरी ॥२७॥

राजा देखा येणेंपरी । होता तया वैदुरीनगरीं ।
पुढें त्याचे मांडीवरी । स्फोटक एक उद्भवला ॥२८॥

नानापरीचे वैद्य येती । तया स्फोटकासी लेप करिती ।
शमन न होय कवणे रीतीं । महादुःखें कष्‍टतसे ॥२९॥

ऐसें असतां वर्तमानीं । श्रीगुरु असतां गाणगाभुवनीं ।
विचार करिती आपुले मनीं । राजा येईल म्हणोनिया ॥३०॥

येथें येतां म्लेंच्छ लोक । होईल द्विजां उपबाधक ।
प्रगट झालों आतां ऐक । आम्हीं येथें असूं नये ॥३१॥

प्रगट जहाली महिमाख्याति । पहावया येती म्लेंच्छ जाति ।
आतां रहावें आम्हीं गुप्तीं । लौकिकार्थ परियेसा ॥३२॥

आला ईश्वरनाम संवत्सरु । सिंहेसी आला असे गुरु ।
गौतमी तीर्थ थोरु । यात्राप्रसंगें जावें आतां ॥३३॥

म्हणती समस्त शिष्यांसी । करा आयती वेगेंसी ।
येतो राजा बोलावावयासी । जावें त्वरित गंगेला ॥३४॥

ऐसें ऐकोनि शिष्यजन । विचार करिती आपआपण ।
जरी येईल राजा यवन । केवी होय म्हणताती ॥३५॥

ऐसा मनीं विचार करिती । काय होईल पहा म्हणती ।
असे नरसिंहसरस्वती । तोचि रक्षील आपणांतें ॥३६॥

येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । असतां गाणगापुरीं ख्याति ।
राजा यवना झाली मति । पूर्वसंस्कारीं परियेसा ॥३७॥

स्फोटकाचे दुःखें राजा । अपार कष्‍टला सहजा ।
नानापरी औषधें वोजा । करितां न होय तया बरवें ॥३८॥

मग मनीं विचार करी । स्फोटकें व्यापिलें अपरंपारी ।
वैद्याचेनि नोहे दूरी । काय करावें म्हणतसे ॥३९॥

बोलावूनि विप्रांसी । पुसे काय उपाय यासी ।
विप्र म्हणती रायासी । सांगतों ऐका एकचित्तें ॥४०॥

पूर्वजन्मीं पापें करिती । व्याधिरुपें होऊन पीडिती ।
दानधर्में तीर्थी दैवतीं । व्याधि जाय परियेसा ॥४१॥

अथवा भल्या सत्पुरुषासी- । भजा आपण भावेंसी ।
तयाचे दृष्‍टिसुधारसीं । बरवें होईल परियेसा ॥४२॥

सत्पुरुषाचे कृपादृष्‍टीं । पापें जाती जन्म साठी ।
मग रोग कैचा पोटीं । स्फोटकादि त्वरित जाय ॥४३॥

ऐकोनिया विप्रवचन । राजा करीतसे नमन ।
मातें तुम्ही न म्हणा यवन । दास आपण विप्रांचा ॥४४॥

पूर्वजन्मी आपण । केली सेवा गुरुचरण ।
पापास्तव झालों जाण । यवनाचे कुळीं देखा ॥४५॥

एखादा पूर्ववृत्तान्त । मातें निरोपावा त्वरित ।
महानुभावदर्शन होत । कवणाचा रोग गेला असे ॥४६॥

रायाचें वचन ऐकोनि । विचार करिती विप्र मनीं ।
सांगूं नये या स्थानीं । एकान्तस्थळ पाहिजे ॥४७॥

तुम्ही राव म्लेंच्छजाती । समस्त तुम्हां निंदा करिती ।
आम्ही असों द्विजजाती । केवी करावें म्हणताती ॥४८॥

विप्रवचन ऐकोन । विनवीतसे तो यवन ।
चाड नाहीं जातीवीण । आपणास तुम्हीं उद्धरावें ॥४९॥

ऐसें रायाचें अंतःकरण । अनुतप्त झालें असे जाण ।
मग निरोपिती ब्राह्मण । तया रायातें परियेसा ॥५०॥

विप्र म्हणती रायासी । स्थान बरवें पापविनाशी ।
जावें तुम्हीं सहजेंसी । विनोदार्थ परियेसा ॥५१॥

तेथें असे स्थळ बरवें । एकान्तस्थान पहावें ।
स्नान करावें मनोभावें । एकचित्तें परियेसा ॥५२॥

ऐकोनिया विप्रवचन । संतोषला राजा आपण ।
निघाला त्वरित तेथोन । आला पापविनाश तीर्थासी ॥५३॥

समस्तांतें राहवूनि । एकला गेला तया स्थानीं ।
स्नान करितां तये क्षणीं । आला एक यति तेथें ॥५४॥

राजा देखोनि यतीसी । नमन करी भावेंसी ।
दावीतसे स्फोटकासी । म्हणे उपशमन केवी होय ॥५५॥

ऐकोनि तयाचें वचन । सांगता झाला विस्तारोन ।
महानुभावाच्या दर्शनें । तूंतें बरवें होय जाणा ॥५६॥

पूर्वीं याचें आख्यान । सांगेन ऐक विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक म्हणती तये वेळीं ॥५७॥

अवंती म्हणिजे थोर नगरी । तेथें होता एक दुराचारी ।
जन्मोनिया विप्र उदरीं । अन्य रहाटीं रहातसे ॥५८॥

आपण असे मदोन्मत्त । समस्त स्त्रियांसवें रमत ।
स्नानसंध्या त्यजूनि निश्चित । अन्यमार्गें वागतसे ॥५९॥

ऐसें दुराचारीपणें । रहाटतसे तो ब्राह्मण ।
पिंगला म्हणिजे वेश्या जाण । तयेसवें वर्ततसे ॥६०॥

न करी कर्म संध्यास्नान । रात्रंदिवस वेश्यागमन ।
तिचे घरीं भक्षी अन्न । येणेंपरी दोष केले ॥६१॥

ऐसें असतां वर्तमानीं । ब्राह्मण होता वेश्यासदनीं ।
तेथें आला एक मुनि । वृषभनामा महायोगी ॥६२॥

तया देखोनि दोघें जण । करिती साष्‍टांग नमन ।
भक्तिभावें करोन । घेवोनि आलीं मंदिरांत ॥६३॥

बैसवोनिया पीठावरी । पूजा करिती षोडशोपचारीं ।
अर्घ्यपाद्य देवोनि पुढारी । गंधाक्षता लाविती ॥६४॥

नाना परिम ळ पुष्प जाती । तया योगियासी समर्पिती ।
परिमळ द्रव्यें अनेक रीतीं । समर्पिलीं तया योगेश्वरा ॥६५॥

चरणतीर्थ घेऊन । पान करिती दोघेंजण ।
त्यांतें करविती भोजन । नानापरी पक्वान्नेंसी ॥६६॥

करवूनिया भोजन । केलें हस्तप्रक्षालन ।
बरवा पलंग आणोन । देती तया योगियासी ॥६७॥

तया मंचकीं निजवोन । तांबूल देती आणोन ।
करिती पादसंवाहन । भक्तिभावें दोघेंही ॥६८॥

निद्रिस्त झाला योगेश्वर । दोघें करिती नमस्कार ।
उभें राहोनि चारी प्रहर । सेवा केली भावेंसी ॥६९॥

उदय झाला दिनकरासी । संतोषला तो तापसी ।
निरोप घेऊनि संतोषीं । गेला आपुल्या स्थानाप्रती ॥७०॥

ऐसें विप्रें वेश्याघरीं । क्रमितां क्वचित्‌ दिवसांवरी ।
तारुण्य जाउनी शरीरीं । वार्धक्य पातलें तयासी ॥७१॥

पुढें तया विप्रासी । मरण आलें परियेसीं ।
पिंगला नाम वेश्येसी । दोघें पंचत्व पावलीं ॥७२॥

पूर्वकर्मानुबंधेंसी । जन्म झाला राजवंशीं ।
दशार्णवाधिपतिकुशीं । वज्रबाहूचे उदरांत ॥७३॥

तया वज्रबाहूपत्‍नी । नाम तिचें वसुमती ।
जन्मा आला तिचे पोटीं । तो विप्र परियेसा ॥७४॥

तया वज्रबाहूसी । ज्येष्‍ठ राणीच्या गर्भेसी ।
उद्‌भवला विप्र परियेसीं । राजा समारंभ करीतसे ॥७५॥

देखोनि तिचे सवतीसी । क्रोध आला बहु मानसीं ।
गर्भ झाला सपत्‍नीसी । म्हणोनि द्वेष मनीं धरी ॥७६॥

सर्पगरळ आणोनि । दिल्हें सवतीस नाना यत्‍नीं ।
गरळें भेदिलें अतिगहनीं । तया राजज्येष्‍ठ स्‍त्रियेसी ॥७७॥

दैवयोगें न ये मरण । सर्व शरीरीं झाले व्रण ।
चिंता करी अतिगहन । महाकष्‍ट भोगीतसे ॥७८॥

ऐशापरी राजयुवती । कष्‍टें झाली प्रसूति ।
उपजतां बाळका मातेप्रती । सर्वांग स्फोट वाहत ॥७९॥

विषें व्यापिलें सर्वांगासी । म्हणोनि आक्रंदती दिवानिशीं ।
दुःख करी राजा क्लेशीं । म्हणे काय करुं आतां ॥८०॥

देशोदेशींच्या वैद्यांसी । बोलाविती चिकित्सेसी ।
वेंचिती द्रव्य अपारेंसी । कांहीं केलिया बरवें नोहे ॥८१॥

तया माता बाळकासी । व्रण झाले बहुवसीं ।
निद्रा नाहीं रात्रीसी । सर्वांगीं कृमि पडले असती ॥८२॥

त्यांतें देखोनि रायासी । दुःख झालें बहुवसीं ।
निद्रा नाहीं दिवानिशीं । त्याचे कष्‍ट देखोनिया ॥८३॥

व्यथें करोनि मातासुत । अन्न उदक न वचे क्वचित ।
शरीरीं सर्व क्लेश होत । क्षीण झालें येणेंपरी ॥८४॥

राजा येऊनि एके दिवसीं । पाहे आपुले स्त्री-सुतासी ।
देखोनिया महाक्लेशी । दुःख करीतसे परियेसा ॥८५॥

म्हणें आतां काय करुं । केवी करणें प्रतिकारु ।
नाना औषधें उपचारु । करितां स्वस्थ नव्हेचि ॥८६॥

स्त्री-पुत्रांची ऐशी गति । जिवंत शवें झाली असती ।
यांच्या रोगासी होय शांति । केवी पाहूं म्हणतसे ॥८७॥

आतां यातें पहावयासी । कंटाळा येतो आम्हांसी ।
बरवें नव्हे सत्य यांसी । काय करणें म्हणतसे ॥८८॥

यांतें देखतां आम्हांसी । श्रम होती देहासी ।
नेवोनिया अरण्यासी । त्यांतें त्यजूं म्हणतसे ॥८९॥

जे जे असती पापीजन । त्यांतें जीवन अथवा मरण ।
भोगिल्यावांचोनि न सुटे जाण । आपुलें आपण भोगिजे ॥९०॥

विचार करोनि मानसीं । बोलाविलें कोळियासी ।
सांगतसे विस्तारेंसी । ऐका श्रोते एकचित्तें ॥९१॥

राजा म्हणे सूतासी । माझे बोल परियेसीं ।
नेऊनि आपुले स्त्री -पुत्रांसी । अरण्यांत ठेवावें ॥९२॥

मनुष्यांचा संचार । जेथें नसेल निर्धार ।
तेथें ठेवीं वेगवक्र । म्हणे राजा सूतासी ॥९३॥

येणेंपरी सूतासी । राजा सांगे विस्तारेंसी ।
रथा दिधला संजोगेंसी । घेऊनि गेला झडकरी ॥९४॥

तिचे दासदासी सकळ । दुःख करिती महाप्रबळ ।
माता पिता बंधु सकळ । समस्त प्रलाप करिताती ॥९५॥

दुःख करिती नर नारी । हा हा पापी दुराचारी ।
स्त्री-सुतांसी कैसेपरी । केवी यांतें मारवितो ॥९६॥

रथावरी बैसवोनि । घेवोनि गेला महारानीं ।
जेथें नसती मनुष्य कोणी । तेथें ठेविलीं परियेसा ॥९७॥

सूत आला परतोनि । सांगे रायासी विस्तारोनि ।
महाअरण्य दुर्गम वनीं । तेथें ठेविली म्हणतसे ॥९८॥

ऐकोनि राजा संतोषला । दुसरे स्त्रियेसी वृत्तान्त सांगितला ।
दोघांसी आनंद जाहला । वनीं राहिलीं मातासुत ॥९९॥

मातापुत्र दोघेंजण । पीडताती दुःखेंकरुन ।
कष्‍टती अन्नउदकावीण । महाघोर वनांत ॥१००॥

राजपत्‍नी सुकुमार । तिये शरीरीं व्रण थोर ।
चालूं न शके पृथ्वीवर । महाकंटक भूमीवरी ॥१॥

कडिये घेवोनि बाळकासी । जाय ती मंदगमनेंसी ।
आठवी आपुले कर्मांसी । म्हणे आतां काय करुं ॥२॥

तया वनीं मृगजाति । व्याघ्र सिंहादिक असती ।
सर्प थोर अपरिमिती । हिंडताती वनांत ॥३॥

मातें जरी व्याघ्र मारी । पापापासून होईन दुरी ।
पुरे आतां जन्म संसारीं । वांचोनि काय व्यर्थ जिणें ॥४॥

म्हणोनि जाय पुढें रडत । क्षणोक्षणीं असे पडत ।
पुत्रासहित चिंता करीत । जात असे वनमाजी ॥५॥

उदकाविणें तृषाक्रांत । देह व्रणें असे पीडित ।
व्याघ्रसर्पादि देखत । भयें चकित होतसे ॥६॥

देखे वेताळ ब्रह्मराक्षस । वनगज भालुका बहुवस ।
केश मोकळे पायांस । कांटे धोंडे लागताती ॥७॥

ऐसे महाअरण्यांत। राजश्री असे हिंडत ।
पुढें जातां देखिलें वनांत । गुरें चरती वाणियांचीं ॥८॥

तयांपासीं जावोनि । पुसतसे करुणावचनीं ।
गोरक्षकांतें विनवोनि । मागे उदक कुमारासी ॥९॥

गोरक्षक म्हणती तियेसी । जावें तुवां मंदिरासी ।
तेथें उदक बहुवसी । अन्न तूंतें मिळेल ॥११०॥

म्हणोनि मार्ग दाखविती । हळूहळू जाय म्हणती ।
राजपत्‍नी मार्ग क्रमिती । गेली तया ग्रामांत ॥११॥

तया ग्रामीं नरनारी । दिसताती अपरंपारी ।
ऐकोन आली मनोहरी । पुसे तयां स्त्रियांसी ॥१२॥

म्हणे कवण येथें राजा । संतोषी दिसे समस्त प्रजा ।
ऐकोनि सांगती वैश्यराजा । महाधनिक पुण्यात्मा ॥१३॥

त्याचें नांव पद्माकर । पुण्यवंत असे थोर ।
तूंतें रक्षील साचार । म्हणोनि सांगती तियेसी ॥१४॥

इतुकिया अवसरीं । तया वैश्याचे घरीं ।
दासी होत्या मनोहरी । त्याही आल्या तियेजवळी ॥१५॥

येवोनि पुसती वृत्तान्त । घेवोनि गेल्या मंदिरांत ।
आपल्या स्वामीसी सांगत । आद्यंतेंसीं विस्तारें ॥१६॥

तीस देखोनिया वैश्यनाथ । कृपा करी अत्यंत ।
नेऊनिया मंदिरांत । दिल्हें एक गृह तिसी ॥१७॥

पुसोनिया वृत्तान्त । वाणी होय कृपावंत ।
दिल्हें अन्नवस्त्र बहुत । नित्य तिसी रक्षीतसे ॥१८॥

ऐशी तया वैश्याघरीं । होती रायाची अंतुरी ।
वर्धतसे पीडा भारी । व्रण न वचे परियेसा ॥१९॥

येणेंपरी राजसती । तया वैश्याचे घरीं होती ।
वाढले व्रण तयांसी बहुती । प्राणांतक होतसे ॥१२०॥

वर्ततां ऐसें एके दिवसीं । मरण आलें कुमारकासी ।
प्रलाप करी बहुवसी । राजपत्‍नी तये वेळीं ॥२१॥

मूर्च्छा येऊनि तये क्षणीं । राजपत्‍नी पडे धरणीं ।
आपुलें कर्म आठवोनि । महाशोक करीतसे ॥२२॥

त्या वाणियाच्या स्त्रिया देखा । संबोखिताति ती बाळिका ।
कवणेंपरी तिचे दुःखा । शमन नोहे परियेसा ॥२३॥

नानापरी दुःख करी । आठवीतसे पूर्वापारी ।
म्हणे ताता माझ्या सौरी । कोठें गेलासी बाळका ॥२४॥

राजकुमारा पूर्णचंद्रा । माझ्या आनंदसमुद्रा ।
मातें धरिसी मौनमुद्रा । तूंतें काय बरवें असे ॥२५॥

मातापिता बंधुजन । सोडोनि आल्यें सकळ जाण ।
तुझा भरंवसा होता पूर्ण । मातें रक्षिसी म्हणोनिया ॥२६॥

मातें अनाथ करोनि । तूं जातोसि सोडोनि ।
मज रक्षिता नसे कोणी । प्राण त्यजीन म्हणतसे ॥२७॥

येणेंपरी राजनारी । दीर्घस्वरें रुदन करी ।
देखोनिया नरनारी । दुःख करिती परियेसा ॥२८॥

समस्तही दुःखाहुनी । पुत्रशोक केवळ वाहि ।
मातापितरांतें दाहोनि । भस्म करी परियेंसा ॥२९॥

येणेंपरी दुःख करितां । ऋषभ योगी आला त्वरिता ।
पूर्वजन्मींच्या उपकारार्था । पातला तेथें महाज्ञानी ॥१३०॥

योगियातें देखोनि । वंदिता झाला तो वाणी ।
अर्घ्यपाद्य देवोनि । उत्तम स्थानीं बैसविला ॥३१॥

योगी तया अवसरीं । पुसे कवण दीर्घस्वरीं ।
शोक करितसे अपारीं । कवण असे म्हणतसे ॥३२॥

सविस्तर वैश्यनाथ । सांगता जाहला वृत्तान्त ।
योगीश्वर कृपावंत । आला तिये जवळीक ॥३३॥

म्हणे योगी तियेसी । मूढपणें दुःख करिसी ।
कवण जन्मला भूमीसी । कवण मेला सांग मज ॥३४॥

देह म्हणिजे विनाशी जाण । जैसा गंगेंत दिसे फेण ।
व्यक्ताव्यक्त सवेंचि होय जाण । जलबुद्‌बुदापरी देखा ॥३५॥

पृथ्वी तेज वायु आप । आकाश मिळोनि सर्वव्याप ।
पंच गोठली शरीररुप । दिसत असे परियेसा ॥३६॥

पंच भूतें पांचांठायीं । निघोन जातां शून्य पाहीं ।
दुःख करितां अवकाश नाहीं । वृथा कां तूं दुःख करिसी ॥३७॥

गुणापासाव उत्पत्ति । निज कर्में होय निरुती ।
काळ नाचवी दृष्‍टिविकृतीं । वासना तयापरी जाणा ॥३८॥

मायेपासोनि माया उपजे । होय गुणें सत्त्वरजें ।
तमोगुणें तेथें सहजें । देहलक्षण येणेंपरी ॥३९॥

या तीन गुणांपासाव । उपजताती मनुष्यभाव ।
सत्त्वगुणें असती देव । रजोगुण मनुष्याचा ॥१४०॥

तामस तोचि राक्षस । जैसा गुण असे त्यास ।
तैसा जन्मे पिंडाभास । कधीं स्थिर नव्हेचि ॥४१॥

या संसारवर्तमानीं । उपजती नर कर्मानुगुणीं ।
जैसें अर्जित असे पूर्वपुण्यीं । सुखदुःखें घडती देखा ॥४२॥

कल्पकोटिवर्षांवरी । जिवंत असती सुर जरी ।
तेही न राहती स्थिरी । मनुष्यांचा काय पाड ॥४३॥

या कारणें ज्ञानीजनें । उपजतां संतोष न करणें ।
मेलिया दुःख न करणें । स्थिर नव्हे देह जाणा ॥४४॥

गर्भ संभवें जिये काळीं । विनाश म्हणोनि जाणती सकळी ।
कोणी मरती यौवनकाळीं । क्वचिद्वार्धक्यपाणीं जाणा ॥४५॥

जैसें कर्म पूर्वार्जित । तेणेंपरी असे घडत । मायामोहें म्हणत । सुत नरदेही हे ॥४६॥

जैसें लिखित ललाटेसी । ब्रह्मदेवें लिहिलें परियेसीं ।
कालकर्म उल्लंघावयासी । शक्ति न होय कवणा जाणा ॥४७॥

ऐसें अनित्य देहासी । कां वो माते दुःख करिसी ।
तुझी पूर्वपरंपरा कैसी । सांगा आम्हां म्हणतसे ॥४८॥

तूं जन्मांतरीं जाणा । कवणा होतीस अंगना ।
किंवा झालीस जननी कोणा । भगिनी कोणाची सांग पां ॥४९॥

ऐसें जाणोनि मानसी । वायां कां हो दुःख करिसी ।
जरी बरवें तूं इच्छिसी । शरण जाईं शंकरा ॥१५०

ऐसें ऐकोनि राजयुवती । करी ऋषभयोगिया विनंति ।
आपणासी झाली ऐसी गति । राज्यभ्रष्‍ट होऊनि आल्यें ॥५१॥

मातापिता बंधुजन । सोडोनि आलें मी रान ।
पुत्र होता माझा प्राण । भरंवसा मज तयाचा ॥५२॥

तया जहाली ऐशी गति । आपण वांचोनि काय प्रीति ।
मरण व्हावें मज निश्चिती । म्हणोनि चरणीं लागली ॥५३॥

ऐसें निर्वाण देखोनि । कृपा उपजली योगियामनी ।
पूर्व उपकार स्मरोनि । प्रसन्न झाला तये वेळीं ॥५४॥

भस्म काढोनि तये वेळीं । लाविलें प्रेताचे कपाळीं ।
घालितां त्याचे मुखकमळीं । प्राण आला परियेसा ॥५५॥

बाळ बैसला उठोनि । सर्वांग झालें सुवर्णवर्णी ।
मातेचे व्रणही तेच क्षणीं । जाते झाले तात्काळ ॥५६॥

राजपत्‍नी पुत्रासहित । करी योगियासी दंडवत ।
ऋषभयोगी कृपावंत । आणीक भस्म प्रोक्षीतसे ॥५७॥

तात्काळ तया दोघांसी । शरीर होय सुवर्णसंकाशी ।
शोभायमान दिसे कैसी । दिव्य काया उभयतांची ॥५८॥

प्रसन्न झाला योगेश्वर । तये वेळीं दिधला वर ।
तुम्हां न होय जराजर्जर । तारुण्यरुप चिरंजीवी ॥५९॥

तुझा सुत भद्रायुषी । कीर्ति वरील बहुवशी ।
राज्य करील परियेसीं । पित्याहूनि अधिक जाणा ॥१६०॥

ऐसा वर देऊनि । योगी गेला तेथोनि ।
ऐक राजा एकमनीं । सत्पुरुषाचें महिमान ॥६१॥

सत्पुरुषाची सेवा करितां । तुझा स्फोटक जाईल त्वरिता ।
तुवां न करावी कांहीं चिंता । दृढ धरीं भाव एक ॥६२॥

ऐसें यतीचें वचन ऐकोनि । राजा नमन करी तये क्षणीं ।
विनवीतसे कर जोडोनि । कोठें असे सत्पुरुष ॥६३॥

मातें निरोपावें आतां । जाईन आपण तेथें तत्त्वतां ।
मजला त्यांचें दर्शन होतां । होईल बरवें म्हणतसे ॥६४॥

ऐकोनि राजाचें वचन । सांगतसे मुनि आपण ।
भीमातीरीं गाणागाभुवन । असे तेथें परमपुरुष ॥६५॥

तयापासीं तुवां जावें । दर्शनमात्रें होईल बरवें ।
ऐकोनि राजा एकभावें । निघता झाला तये वेळीं ॥६६॥

एकभावें राजा आपण । घ्यावया श्रीगुरुदर्शन ।
प्रयाणावरी करी प्रयाण । आला गाणगापुरासी ॥६७॥

ग्रामीं पुसे सकळिकांसी । कोण येथें एक तापसी ।
रुप धरिलें संन्यासी । कोठें आहे म्हणतसे ॥६८॥

भयभीत झाले सकळिक । म्हणती आतां नव्हे निक ।
श्रीगुरुसी पुसतों ऐक । काय करील न कळे म्हणती ॥६९॥

कोणी न बोलती तयासी । राजा कोपला बहुवसी ।
म्हणे आलों भेटीसी । दावा आपणा म्हणतसे ॥१७०॥

मग म्हणती समस्त लोक । श्रीगुरु अनुष्‍ठानस्थान असे निक ।
अमरजासंगमीं माध्यान्हिक । करोनि येती ग्रामातें ॥७१॥

ऐसें ऐकोनि म्लेंच्छ देखा । समस्तां वर्जूनि आपण एका ।
बैसोनिया आंदोलिकां । गेला तया स्थानासी ॥७२॥

दुरोनि देखतां श्रीगुरुसी । चरणीं चाले म्लेंच्छ परियेसीं ।
जवळी गेला पहावयासी । नमन करुनि उभा राहे ॥७३॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कां रे रजका कोठें अससी ।
बहुत दिवशीं भेटलासी । आमचा दास होवोनिया ॥७४॥

ऐसें वचन ऐकोनि । म्लेंच्छ झाला महाज्ञानी ।
पूर्वजन्म स्मरला मनीं । करी साष्‍टांग दंडवत ॥७५॥

पादुकांवरी लोळे आपण । सद्‌गदित अंतःकरण ।
अंगीं रोमांच उठोन । आनंदबाष्पें रुदन करी ॥७६॥

पूर्वजन्मीं आठवोन देखा । रुदन करी अति दुःखा ।
कर जोडून विनवी ऐका । नाना परी स्तोत्र करी ॥७७॥

राजा म्हणे श्रीगुरुसी । कां उपेक्षिले आम्हांसी ।
झालों आपण परदेशी । चरणावेगळें केलें मज ॥७८॥

अंधकारसागरांत । कां घातलें मज येथ ।
मी होऊनि मदोन्मत्त । विसरलों चरण तुझे ॥७९॥

संसारसागरमायाजाळीं । बुडालों आपण दुर्मति केवळीं ।
सेवा न करीं चरणकमळीं । दिवांध झालों आपण ॥१८०॥

होतासि तूं जवळी निधान । न ओळखें आपण मतिहीन ।
तमांधकारीं वेष्‍टोन । तुझे चरण विसरलों ॥८१॥

तूं भक्तजनां नुपेक्षिसी । निर्धार होता माझे मानसीं ।
अज्ञानसागरीं आम्हांसी । कां घातलें स्वामिया ॥८२॥

उद्धरावें आतां मज । आलों आपण हेंचि काज ।
सेवोनि तुझे चरणरज । असेन आतां राज्य पुरे ॥८३॥

ऐसें नानापरी देखा । स्तुति करी राजा ऐका ।
श्रीगुरु म्हणती भक्त निका । तुझी वासना पुरेल ॥८४॥

राजा म्हणे श्रीगुरुसी । झाला स्फोटक आपणासी ।
व्यथा होतसे प्रयासी । कृपादृष्‍टीं पहावें ॥८५॥

ऐसें वचन ऐकोन । श्रीगुरु करिती हास्यवदन ।
स्फोटक नाहीं म्हणोन । पुसताती यवनासी ॥८६॥

राजा पाहे स्फोटकासी । न दिसे स्फोटक अंगासी ।
विस्मय करीतसे मानसीं । पुनरपि चरणीं माथा ठेवी ॥८७॥

राजा म्हणे स्वामियासी । तुझें प्रसन्नत्व आम्हांसी ।
राज्य पावलों संतोषीं । अष्‍टैश्चर्य माझें अवलोकावें ॥८९॥

भक्तवत्सल ब्रीद तुझें । वासना अर्थ पुरवीं माझे ।
इंद्रियसंसार उतरीं ओझें । लीन होईन तुझे चरणीं ॥१९०॥

श्रीगुरु म्हणती तयासी । आम्ही तापसी संन्यासी ।
येऊं नये तुझे नगरासी । महापातकें होती तेथें ॥९१॥

नगरीं नित्य धेनुहत्या । यवनजाति तुम्ही सत्या ।
जीवहिंसा मद्यपी कृत्या । वर्जावें आतां निर्धारें ॥९२॥

सर्व अंगिकार करोनि । राजा लागे दोन्ही चरणीं ।
म्हणे मी दास पुरातनीं । पूर्वापारीं दृष्‍टि देणें ॥९३॥

पूर्वी माझें जन्म रजक । स्वामीवचनें राज्य विशेख ।
पावोनि देखिलें नाना सुख । उणें एक म्लेंच्छजाति ॥९४॥

दर्शन होतां तुझे चरण । संतुष्‍ट झालें अंतःकरण ।
पुत्रपौत्र दृष्‍टीं पाहोन । मग मी राहीन तुझे सेवे ॥९५॥

ऐसें नानापरी देखा । राजा विनवी विशेखा ।
पाया पडे क्षणक्षणिका । अतिकाकुळती येतसे ॥९६॥

श्रीगुरु मनीं विचार करिती । पुढें होणार ऐसी गति ।
कलियुगीं असे दुर्जन जाति । गौप्य असतां पुढें बरवें ॥९७॥

सहज जावें सिंहस्थासी । महातीर्थ गौतमीसी ।
जावें हें भरंवसी । आतां आम्हीं गुप्त व्हावें ॥९८॥

ऐसें मनीं विचारुनि । श्रीगुरु निघाले संगमाहूनि ।
राजा आपुले सुखासनीं । बैसवी प्रीती करोनिया ॥९९॥

पादुका घेतल्या आपुले करीं । सांगातें येतसे पादचारीं ।
श्रीगुरु म्हणती आरोहण करीं । लोक निंदा तुज करिती ॥२००॥

राष्‍ट्राधिपति तुज म्हणती । जन्म तुझा म्लेंच्छजाती ।
ब्राह्मणसेवें तुज हांसती । जाति दूषण करितील ॥१॥

राजा म्हणे स्वामी ऐका । कैचा राजा मी रजका ।
तुझे दृष्‍टीं असे निका । लोह सुवर्ण होतसे ॥२॥

समस्तांसी राजा आपण सत्य । मी रजक तुझा भक्त ।
पूर्ण झाले मनोरथ । तुझें झालें दर्शन मज ॥३॥

इतुकिया अवसरीं । समस्त दळ मिळालें भारी ।
मदोन्मत्त अतिकुंजरी । वारु नाना वर्णाचे ॥४॥

उभा राहोनि राजा देखा । समस्त दाखवी सैन्यका ।
संतोष मनीं अति हरिखा । आपुलें ऐश्वर्य दाखवितसे ॥५॥

श्रीगुरु निरोपिती यवनासी । आरोहण करीं वारुवेसी ।
दूर जाणें असे नगरासी । निरोप आमुचा नको मोडूं ॥६॥

श्रीगुरुवचन ऐकोन । समस्त शिष्यांतें आरोहण ।
देता झाला तो यवन । आपण वाजीं आरुढला ॥७॥

आनंद बहु यवनाचे मनीं । हर्षनिर्भर न माये गगनीं ।
श्रीगुरुभेटी झाली म्हणोनि । अति उल्हास करीतसे ॥८॥

श्रीगुरुमूर्ति बोलाविती यवनासी । म्हणती झालों अतिसंतोषी ।
तूं भक्त केवळ गुणराशी । संतुष्‍ट झालों आपण आजी ॥९॥

आम्ही संन्यासी तापसी । नित्य करावें अनुष्‍ठानासी ।
तुम्हांसमागमें मार्गासी । न घडे वेळीं संध्यादिक ॥२१०॥

यासी उपाय सांगेन । अंगिकार करावा जाण ।
पुढें जाऊं आम्ही त्वरेनें । स्थिर यावें तुम्हीं मागें ॥११॥

पापविनाशी तीर्थासी । भेटी होईल तुम्हांसी ।
ऐसें म्हणोनि रायासी । अदृश्य झाले गुरुमूर्ति ॥१२॥

समस्त शिष्यांसहित । श्रीगुरु गुप्त झाले त्वरित ।
मनोवेगें मार्ग क्रमित । गेले वैदूरपुरासी ॥१३॥

पापविनाशी तीर्थासी । श्रीगुरु पातले त्वरितेंसी ।
राहिले तेथें अनुष्‍ठानासी । समस्त येती भेटावया ॥१४॥

साखरे सायंदेवाचा सुत । भेटीस आला नागनाथ ।
नानापरी पूजा करीत । समाराधना आरंभिली ॥१५॥

श्रीगुरु नेऊनि आपुले घरा । पूजा केली षोडशोपचारा ।
आरती करोनि एक सहस्त्रा । समाराधना करी बहुत ॥१६॥

इतुकें होतां झाली निशी । श्रीगुरु म्हणती नागनाथासी ।
सांगोनि आलों म्लेंच्छासी । पापविनाशीं भेटूं म्हणोनि ॥१७॥

जाऊं आतां तया स्थानासी । राहतां यवन येईल परियेसीं ।
उपद्रव होईल ब्राह्मणांसी । विप्रघरा म्लेंच्छ येती ॥१८॥

ऐसें सांगोनि आपण । गेले पापविनाशीं जाण ।
शुभासनीं बैसोन । अनुष्‍ठान करीत होते ॥१९॥

इतुकिया अवसरीं । राजा इकडे काय करी ।
गुरुनाथ न दिसती दळभारीं । मनीं चिंता बहु वर्तली ॥२२०॥

म्हणे कटकटा काय झालें । गुरुनाथें मज उपेक्षिलें ।
काय सेवे अंतर पडलें । तेणें गेले निघोनिया ॥२१॥

मागुती मनीं विचारी । पुढें जातों म्हणोनि येरी ।
पापविनाशी तीर्थातीरीं । भेटी देतों म्हणितलें ॥२२॥

न कळे महिमान श्रीगुरुचें । कोण जाणें मनोगत त्यांचें ।
दैव बरवें होतें आमुचें । म्हणोनि चरणांचें दर्शन झालें ॥२३॥

राजस्फोटक होता मज । आलों होतों याचि काज ।
कृपानिधि श्रीगुरुराज । भेटी झाली पुण्य माझें ॥२४॥

पुढें गेले निश्चित । म्हणोनि मनीं विचार करित ।
दिव्य अश्वावरी आरुढोनि त्वरित । निघाला राजा परियेसा ॥२५॥

चतुश्चत्वारिंशत्‌ क्रोश देखा । राजा पातला दिवसें एका ।
पापविनाशी तीर्थीं देखा । अवलोकितसे श्रीगुरुसी ॥२६॥

विस्मय करी अति मानसीं । येऊनि लागला चरणांसीं ।
विनवीतसे भक्तींसी । गृहाप्रति यावें म्हणतसे ॥२७॥

नगर सर्व श्रृगांरिलें । प्रवाळ-मोतियां तोरण केलें ।
गुडिया मखर उभारविलें । समारंभ थोर नगरांत ॥२८॥

बैसवोनिया पालखींत । आपण चरणचालीं येत ।
नवरत्‍न असे ओवाळित । नगर लोक आरत्या आणिती ॥२९॥

ऐशा समारंभें राजा देखा । घेऊनि गेला गुरुनायका ।
विस्मय झाला सकळ लोकां । महदाश्चर्य म्हणताती ॥२३०॥

लोक म्हणती म्लेंच्छजाती । पहा हो विप्रपूजा करिती ।
राजा अनाचारी म्हणती । जातिधर्म सांडिला आजी ॥३१॥

ज्याचें पाहूं नये मुख । त्याची सेवा करी देख ।
राजा नष्‍ट म्हणोनि सकळिक । म्लेंच्छजाती बोलती ॥३२॥

विप्रकुळ समस्त देख । संतोष करिती अतिकौतुक ।
राजा झाला विप्रसेवक । आतां बरवें राज्यासी ॥३३॥

ऐसा राव असतां । महाराष्‍ट्रधर्मीं वर्ततां ।
आपुला द्वेष तत्त्वतां । न करील जाण पां ॥३४॥

ऐसा राजा असतां बरवें । ज्ञानवंत असे स्वभावें ।
ब्रह्मद्वेषी नव्हे पहावें । पुण्यश्लोक म्हणती ऐसा ॥३५॥

नगरलोक पहावया येती । नमस्कारिती अतिप्रीतीं ।
राजे चरणचालीं येती । लोक म्हणती आश्चर्य ॥३६॥

एक म्हणती हा होय देव । म्हणोनि भजतो म्लेंच्छराव ।
या कलियुगीं अभिनव । देखिलें म्हणताती सकळिक ॥३७॥

सवें वाजंत्र्यांचे गजर । बंदीजन वाखाणिती अपार ।
राजा हर्षें निर्भर । घेऊनि जातो गुरुसी ॥३८॥

नानापरीचीं दिव्य वस्त्रें । वांटीतसे राजा पवित्रें ।
द्रव्य ओवाळुनि टाकी पात्रें । भिक्षुक तुष्‍टले बहुत देखा ॥३९॥

ऐशा समारंभें देखा । घेऊनि गेला राजा ऐका ।
महाद्वारीं पातलें सुखा । पायघडया अंथरती ॥२४०॥

नानापरीचीं दिव्यांबरें । मार्गीं अंथरती अपारें ।
वाजती भेरी वाजंत्रें । राजगृहा पातले ॥४१॥

मरासिंहासनस्थानीं । श्रृंगार केला अतिगहनीं ।
जगद्‌गुरुतें नेऊनि । सिंहासनीं बैसविलें ॥४२॥

राजमंदिरींच्या नारी । आरत्या घेऊनिया करीं ।
ओवाळिती हर्षनिर्भरीं । अनन्यभावें करोनियां ॥४३॥

समस्त लोक बाहेर ठेवोन । श्रीगुरु होते एकले आपण ।
सवें शिष्य चवघेजण । जवळी होते परियेसा ॥४४॥

अंतःपुरींचे कुलस्त्रियांसी । पुत्रपौत्रीं सहोदरासी ।
भेटविलें राजें परियेसीं । साष्‍टांगीं नमन करिती ते ॥४५॥

राजा विनवी स्वामियासी । पुण्यें देखिलें चरणांसी ।
न्याहाळावें कृपादृष्‍टीसी । म्हणोनि चरणीं लागला ॥४६॥

संतोषले श्रीगुरुमूर्ति । तयांसी आशीर्वाद देती ।
राजयातें बोलाविती । पुसताती गृहवार्ता ॥४७॥

श्रीगुरु म्हणती तयासी । संतुष्‍ट झालास कीं मानसीं ।
अजूनि व्हावें कांहीं भावेंसी । विस्तारोनि सांग म्हणती ॥४८॥

राजा विनवी स्वामियांसी । अंतर पडतें चरणासी ।
राज्य केलें बहुवसीं । आतां द्यावी चरणसेवा ॥४९॥

ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । आमुची भेटी श्रीपार्वतीं ।
तुझे पुत्र राज्य करिती । तुवां यावें भेटीसी ॥२५०॥

ऐसा निरोप देऊनि । श्रीगुरु निघाले तेथोनि ।
राजा विनवी चरण धरोनि । ज्ञान मजला असावें ॥५१॥

कृपासिंधु गुरुनाथ । ज्ञान होईल ऐसें म्हणत ।
आपण निघाले त्वरित । गेले गौतमी- तीरासी ॥५२॥

स्नान करोनि गौतमीसी । आले गाणगापुरासी ।
आनंद झाला समस्तांसी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥५३॥

संतुष्‍ट झाले समस्त लोक । पहावया येती कौतुक ।
वंदिताती सकळिक । आरती करिती मनोभावें ॥५४॥

समस्त शिष्यांतें बोलाविती । श्रीगुरु त्यांसी निरोपिती ।
प्रगट झाली बहु ख्याति । आतां रहावें गुप्तरुपें ॥५५॥

यात्रारुपें श्रीपर्वतासी । निघावें आतां परियेसीं ।
प्रगट बोले हेचि स्वभावेंसी । गुप्तरुपें राहूं तेथें ॥५६॥

स्थान आपुलें गाणगापुरीं । येथूनि न वचे निर्धारीं ।
लौकिकमतें अवधारीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥५७॥

प्रगट करोनिया यात्रेसी । वास निरंतर गाणगाभुवनासी ।
भक्तजन तारावयासी । राहूं येथें निर्धार ॥५८॥

कठिण दिवस युगधर्म । म्लेंच्छराजा क्रूरकर्म ।
प्रगटरुपें असतां धर्म । समस्त म्लेंच्छ येती ॥५९॥

राजा आला म्हणोनि । समस्त यवन ऐकोनि ।
सकळ येती मनकामनी । म्हणोनि गुप्त असावें ॥२६०॥

ऐसें म्हणोनि शिष्यांतें । सांगितलें श्रीगुरुनाथें ।
सिद्ध सांगे नामधारकातें । चरित्र ऐसें श्रीगुरुचें ॥६१॥

पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन ।
समस्त येती करावया भजन । म्हणोनि गुप्त राहिले ॥६२॥

लौकिकार्थ दाखवावयासी । निघाले आपण श्रीशैल्यासी ।
कथा असे विशेषी । सिद्ध म्हणे नामधारका ॥६३॥

गंगाधराचा सुत । सरस्वती असे विनवीत ।
प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । देखिलें असे गाणगापुरीं ॥६४॥

सद्भावें भजती भक्तजन । त्यांची कामना होईल पूर्ण ।
संदेह न धरीं अनुमान । त्वरित सिद्धि असे जाणा ॥६५॥

न लागतां कष्‍ट सायास । कामना पुरती गाणगापुरास ।
भक्तिभावें विशेष । कल्पवृक्ष तेथें असे ॥६६॥

जें जें कल्पिलें फळ । त्वरित पावती सकळ ।
धनधान्यादि विपुळ । पुत्रपौत्रादि शीघ्र होती ॥६७॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । हें गुरुचरित्र दिनीं निशीं ।
मनोभावें वाचनेंसी । सकळ कामना पुरतील ॥६८॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारका सांगत ।
यवनाचा उद्धार येथ । तुम्हांकारणें सांगितला ॥२६९॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सार्वभौमस्फोटकशमने ऐश्वर्यावलोकने वैदुरीप्रवेशो नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥

॥ ओवीसंख्या ॥२६९॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥


गुरूचरित्र – अध्याय एकावन्नावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । कथा सांगितली आम्हांसी ।
म्लेंच्छराजें श्रीगुरुसी । होतें नगरासी नेलें ॥१॥

तेथोन आले गाणगाभुवना । पुढील वर्तल्या निरुपणा ।
सांगा स्वामी कृपाघना । गुरुचरित्र आम्हांसी ॥२॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा ।
ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥३॥

राजाची भेट घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं ।
योजना करिती आपुल्या मनीं । गुप्त रहावें म्हणोनिया ॥४॥

प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटीसी ।
उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना जाती येतील ॥५॥

म्हणोनि आतां गुप्त व्हावें । लोकमतें निघोनि जावें ।
पर्वतयात्रा म्हणोनि भावें । निघाले श्रीगुरु परियेसीं ॥६॥

गुप्त राहिले गाणगापुरीं । प्रगट दाविलें लोकाचारीं ।
निघाले स्वामी पर्वतगिरीं । शिष्यांसहित अवधारा ॥७॥

भक्तजन बोळवित । चिंता करीत अत्यंत ।
श्रीगुरु संबोखिती समस्त । रहावविती अतिप्रीतीनें ॥८॥

दुःख करिती सकळ जन । लागताती श्रीगुरुचरण ।
स्वामी आम्हांतें सोडून । केवी जातां यतिराया ॥९॥

भक्तजनांची तूं कामधेनु । आम्ही बाळक अज्ञानु ।
होतासि आम्हां निधानु । सोडोनि जातां श्रीगुरु ॥१०॥

नित्य तुझें करितां दर्शन । दुरितें जाती निरसून ।
जी जी कामना इच्छी मन । त्वरित पावे स्वामिया ॥११॥

बाळकातें सोडोनि माता । केवी जाय अव्हेरितां ।
तूं आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताती ॥१२॥

ऐकोनि नानापरी विनंति । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति ।
संबोखिती अतिप्रीतीं । न करा चिंता म्हणोनि ॥१३॥

आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं ।
वसों माध्यान्हीं मठधामीं । गुप्तरुपें अवधारा ॥१४॥

जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांतें प्रत्यक्ष दिसों आम्ही ।
लौकिकमतें अविद्याधर्मीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥१५॥

प्रातःस्नान कृष्णातीरीं पंचनदी वृक्ष औदुंबरीं ।
अनुष्‍ठाना बिंदुक्षेत्रीं । माध्यान्हीं येतों भीमातटीं ॥१६॥

अमरजासंगमीं स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणीं ।
चिंता न करा अंतःकरणीं । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥१७॥

ऐसें सांगती समस्तांसी । संदेह न धरावा मानसीं ।
गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसों आम्ही त्रिवाचा ॥१८॥

जे जे जन भक्ति करिती । त्यांसी आमुची अतिप्रीति ।
मनकामना पावती । सिद्धवाक्य असे आमुचें ॥१९॥

अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष । संगमीं असे प्रत्यक्ष ।
तुमच्या मनीं जें अपेक्ष । त्वरित होय पूजितां ॥२०॥

कल्पवृक्षातें पूजोनि । मग यावें आमुचे स्थानीं ।
पादुका ठेवितों निर्गुणी । पूजा करा मनोभावें ॥२१॥

विघ्नहर चिंतामणी । त्यातें पूजितां एकमनीं ।
चिंतिलें फळ तत्क्षणीं । लाभे तुम्हां अवधारा ॥२२॥

समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक ।
अष्‍टतीर्थें असती विशेख । आचरावीं मनोभावें ॥२३॥

संतोषकारक आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती ।
भक्तजन जें इच्छिती । त्वरित होय अवधारा ॥२४॥

ऐसें सांगोनि तयांसी । निघालें स्वामी परियेसीं ।
भक्त परतोनि मठासी । आले चिंतित पायांतें ॥२५॥

चिंतित निघती मठांत । तेथें दिसती श्रीगुरुनाथ ।
लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रैमूर्ति ॥२६॥

यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर ।
सत्य बोलिले निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥२७॥

सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं ।
यापरी गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥२८॥

दृष्‍टान्त दाखविला भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी ।
पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥२९॥

शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा ।
जाणें असे पैलतीरा । ऐक्य होऊं मल्लिकार्जुनीं ॥३०॥

निरोप देतां श्रीगुरुमूर्ति । आणिलीं पुष्पें शेवंती ।
कुमुदें कल्हारें मालती । कर्दळीपर्णें वेष्‍टोनि ॥३१॥

आसन केलें अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पात्र ।
शिष्यां सांगती वेगवक्र । जावें तुम्ही गृहासी ॥३२॥

दुःख करीत येत सकळी । यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी ।
गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न धरावा दुजा तुम्ही ॥३३॥

लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्‍टान्तीं दिसतों ।
भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥३४॥

ऐसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथोनि ।
पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥३५॥

कन्यागतीं बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति ।
सूर्य चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥३६॥

शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी ।
शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥३७॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी ।
पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥३८॥

येतील पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं ।
पूजा करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥३९॥

आणिक सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण ।
त्याचे घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥४०॥

नित्य जें जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति ।
तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥

व्याधि न होय त्यांचे घरीं । दरिद्र जाय त्वरित दुरी ।
पुत्रपौत्र श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥४२॥

ऐकतील चरित्र माझें जरी । वाचतील नर निरंतरी ।
लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥४३॥

ऐसें सांगोनि भक्तांसी । श्रीगुरु जहाले अदृशी ।
चिंता करिती बहुवशी । अवलोकिती गंगेंत ॥४४॥

ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं पातले नावेकर ।
तिहीं सांगितला विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले ॥४५॥

शिष्यवर्गासी मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर ।
होतों आम्ही पैलतीर । तेथें देखिले मुनीश्वर ॥४६॥

संन्यास वेष दंड हातीं । नामें श्रीनृसिंहसरस्वती ।
निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगा म्हणोनि ॥४७॥

आम्हांस आज्ञापिती मुनि । आपण जातों कर्दळीवनीं ।
सदा वसों गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥४८॥

भ्रांतपणें दुःख करितां । आम्हीं देखिलें दृष्‍टान्ता ।
जात असतां श्रीगुरुनाथा । सुवर्णपादुकां त्यांचे चरणीं ॥४९॥

निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुल्या स्थानासी ।
सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥५०॥

प्रसादपुष्पें आलिया । घ्यावीं शिष्यें काढोनिया ।
ऐसें आम्हां सांगोनिया । श्रीगुरु गेले अवधारा ॥५१॥

ऐसें सांगती नावेकर । समस्त राहिले स्थिर ।
हर्षें असती निर्भर । प्रसादपुष्पें पहाती ॥५२॥

इतुकिया अवसरीं । आलीं प्रसादपुष्पें चारी ।
मुख्य शिष्यें प्रीतिकरीं । काढोनि घेतलीं अवधारा ॥५३॥

नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य कोण उपदेशीं ।
विस्तारोनिया आम्हांसी । पुष्पें कोणा लाभलीं ॥५४॥

सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका ।
असती गाणगापुरीं ऐका । गेले शिष्य आश्रमा ॥५५॥

आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी ।
तयांचीं नामें परियेसीं । सांगेन ऐका विस्तारोन ॥५६॥

बाळकृष्णसरस्वती । उपेंद्रमाधवसरस्वती ।
पाठविते झाले प्रीतीं । आपण राहिले संगमीं ॥५७॥

गृहस्थधर्म शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत ।
त्रिवर्ग आले श्रीपर्वताप्रत । चवथा होतों आपण ॥५८॥

साखरे नाम सायंदेव । कवीश्वर-युग्में पूर्वभाव ।
नंदी नामें नरहरी देव । पुष्पें घेतलीं चतुर्वर्गी ॥५९॥

गुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण ।
तींच पुष्पें मज पूजन । म्हणोनि पुष्पें दाखविती ॥६०॥

ऐसा श्रीगुरुचा महिमा । सांगतसे अनुपमा ।
थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे सांगतां ॥६१॥

श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु ।
दुःख दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥६२॥

ऐसें श्रीगुरुचरित्र । श्रवणीं कीर्तनी अतिपवित्र ।
सुखें नांदती पुत्रपौत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥६३॥

धर्म अर्थ काम मोक्ष । तयांसी लाभे प्रत्यक्ष ।
महा आनंद उभयपक्ष । पुस्तक लिहितां सर्वसिद्धि ॥६४॥

ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले ।
सकळाभीष्‍ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥६५॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रीगुरुचरित्र अतिमनोहर ।
ऐकतां पावती पैल पार । संसारसागरा तरोनिया ॥६६॥

श्रीगुरुचरित्र ऐकतां । सकळाभीष्‍टें तत्त्वतां ।
लाधती म्हणोनि समस्तां । ऐका म्हणे नामधारक ॥६७॥

अमृताची असे माथणी । स्वीकारितां भाविक जनीं ।
धर्मार्थ काम मोक्ष साधनीं । हेचि कथा ऐकावी ॥६८॥

पुत्रपौत्रां ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड ।
राहे लक्ष्मी स्थिर अखंड । श्रवणमात्रें घरीं नांदे ॥६९॥

चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणे परमार्थ ।
श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशीं ॥७०॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । श्रोतयांसी करी नमस्कार ।
कथा ऐका मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥७१॥

मुख्य भाव कारण । प्रेमें करितां श्रवण पठण ।
निजध्यास आणि मनन । प्रेमें करोनि साधिजे ॥७२॥

श्रीनृसिंहसरस्वती शंकर । त्याचे चरणीं अर्पण साग्र ।
त्याचेचि प्रसादें समग्र । समस्त प्रजा सुखी असती ॥७३॥

ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानीं । शुद्ध वस्त्रीं शुद्ध मनीं ।
नित्य पूजा करोनि । ग्रंथ गृहामाजीं ठेवावा ॥७४॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धनामधारकसंवाद अमृत ।
गुरुसमाधि नाम विख्यात । एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥७५॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥

॥ ओवीसंख्या ॥७५॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥




गुरूचरित्र – अध्याय बावन्नावा

।। श्रीगणेशाय नमः ।।

नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी ।
पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥

सिद्ध म्हणे शिष्योत्तमा । काय सांगूं सद्‌गुरुची महिमा ।
आतां वर्णनाची झाली सीमा । परी गुरुभक्तिप्रेमा नावरे ॥२॥

श्रीगुरु सिद्ध झाले जावयासी । श्रीपर्वतीं यात्राउद्देशीं ।
हा वृत्तान्त नागरिक जनासी । कळला परियेसीं तात्काळ ॥३॥

समस्त जन आले धावत । नरनारी सर्व मिळाल्या बहुत ।
गुरुसी प्रार्थित अनेक भक्त । श्रीपर्वतासी स्वामी कां जातां ॥४॥

आम्हांसी भासतें व्यक्त । तुम्ही अवतार करितां समाप्त ।
निरंतर आपण असा अव्यक्त । परिजनांसी सुव्यक्त दिसत होतां ॥५॥

तुमचे चरणांचें होतां दर्शन । पातकांचें होतसे दहन ।
आतां कैसें करतील जन । म्हणोनि लोटांगणें घालिती ॥६॥

पुढें आम्हांस काय गति । आम्हीं तरावें कैशा रीतीं ।
स्वामीचे चरण नौका होती । तेणें पार उतरत होतों ॥७॥

तुम्ही भक्तास कामधेनूपरी । कामना पुरवीत होतां बरी ।
म्हणोनि जगले आजवरी । याउपरी आम्हीं काय करावें ॥८॥

स्वामीकरितां गाणगापूर । झालें होतें वैकुंठपूर ।
आतां दीपाविणें जैसें मंदिर । तैसें साचार होईल हें ॥९॥

माउलीविणें तान्हें बाळ । कीं देवाविणें देऊळ ।
जळाविणे जैसें कमळ । तैसें सकळ तुम्हांविणें ॥१०॥

माता पिता सकळ गोत । इष्‍टमित्र कुळदैवत ।
सर्वही आमुचा गुरुनाथ । म्हणोनि काळ क्रमित होतों ॥११॥

आपुल्या बाळकांसी अव्हेरुनी । कैसें जातां स्वामी येथुनी ।
अश्रुधारा लागल्या लोचनीं । तळमळती सकळ जन ॥१२॥

तेव्हां गुरु समस्त जनांप्रती । हास्यवदन करुनि बोलती ।
तुम्ही जनहो मानूं नका खंती । सांगतों यथास्थित तें ऐका ॥१३॥

आम्ही असतों याचि ग्रामीं । स्नान पान करुं अमरजासंगमीं ।
गौप्यरुपें रहातों नियमीं । चिंता कांहीं तुम्हीं न करावी ॥१४॥

राज्य झालें म्लेंच्छाक्रांत । आम्ही भूमंडळीं विख्यात ।
आमुचे दर्शनास बहु येथ । यवन सतत येतील पैं ॥१५॥

तेणें प्रजेस होईल उपद्रव । आम्ही अदृश्य रहातों यास्तव ।
ज्यास असे दृढ भक्तिभाव । त्यास दृश्य स्वभावें होऊं ॥१६॥

लौकिकामध्यें कळावयासी । आम्ही जातों श्रीशैल्यपर्वतासी ।
चिंता न करावी मानसीं । ऐसें समस्तांसी संबोधिलें ॥१७॥

मठीं आमुच्या ठेवितों पादुका । पुरवितील कामना ऐका ।
अश्वत्थवृक्ष आहे निका । तो सकळिकांचा कल्पतरु ॥१८॥

कामना पुरवील समस्त । संदेह न धरावा मनांत ।
मनोरथ प्राप्त होती त्वरित । ही मात आमुची सत्य जाणा ॥१९॥

संगमीं करुनिया स्नान । पूजोनि अश्वत्थनारायण ।
मग करावें पादुकांचें अर्चन । मनकामना पूर्ण होतील ॥२०॥

विघ्नहर्ता विनायक । आहे तेथें वरदायक ।
तीर्थें असती अनेक । पावाल तुम्ही सुख अपार ॥२१॥

पादुकांची करुनि पूजा । त्रिकाळ आरती करुनि ओजा ।
आमुचें वचन यथार्थ समजा । म्हणोनि द्विजांसी गुरु सांगती ॥२२॥

आम्ही येथेंच रहातों मठांत । हें वचन जाणावें निश्चित ।
ऐसें संबोधूनि जना आद्यंत । निघाले त्वरित गुरुराज पैं ॥२३॥

समागमें जे धावले जन । त्यांचें करुन समाधान ।
शिष्यांसहित त्वरित गतीनें । गेले निघून श्रीगुरु ॥२४॥

लोक माघारे परतले । समस्त गुरुच्या मठासी आले ।
तेथें समस्तांनीं गुरु देखिले । बैसले होते निजासनीं ॥२५॥

सवेंचि पहातां झाले गुप्त । जन मनीं परम विस्मित ।
आम्ही सोडूनि आलों मार्गांत । येथें गुरुनाथ देखिले ॥२६॥

सर्वव्यापी नारायण । त्रैमूर्ति अवतार पूर्ण ।
चराचरी श्रीगुरु आपण । भक्तांकारणें रुप धरिती ॥२७॥

ऐसा दृष्‍टान्त दावूनि जनांसी । आपण गेले श्रीशैल्यासी ।
पावले पाताळगंगेसी । राहिले त्या दिवसीं तेथें ॥२८॥

श्रीगुरु शिष्यांसी म्हणती । मल्लिकार्जुनासी जावोनि शीघ्र गतीं ।
पुष्पांचें आसन यथास्थितीं । करोनि निगुती आणावें ॥२९॥

शिष्य धावले अति शीघ्र । पुन्नागादि कंद कल्हार ।
करवीर बकुळ चंपक मंदार । पुष्पें अपार आणिलीं ॥३०॥

त्या पुष्पांचें केलें दिव्यासन । तें गंगाप्रवाहावरी केलें स्थापन ।
त्यावरी श्रीगुरु आपण । बैसले ते क्षणीं परमानंदें ॥३१॥

बहुधान्य संवत्सर माघमास । कृष्णप्रतिपदा शुभ दिवस ।
बृहस्पति होता सिंहराशीस । उत्तर दिशे होता सूर्य पैं ॥३२॥

शिशिर ऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण ।
ऐसे शुभमुहूर्तीं गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते झाले ॥३३॥

मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं । बैसोनि शिष्यास संबोधोनि ।
आमुचा वियोग झाला म्हणोनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ॥३४॥

त्या गाणगापुरांत । आम्ही असोच पूर्ववत ।
भावता दृढ धरा मनांत । तुम्हां दृष्‍टान्त तेथें होईल ॥३५॥

आम्ही जातों आनंदस्थानासी । तेथें पावलों याची खूण तुम्हांसी ।
फुलें येतील जिनसजिनसीं । तुम्हांस तो प्रसाद ॥३६॥

पुष्पांचें करिता पूजन । तुम्हां होईल देव प्रसन्न ।
भक्तिभावें करावी जतन । प्राणासमान मानुनी ॥३७॥

आणिक एक ऐका युक्ति । जे कोणी माझें चरित्र गाती ।
प्रीतीनें नामसंकीर्तन करिती । ते मज प्रिय गमती फार ॥३८॥

मजपुढें करितील गायन । जाणोनि रागरागिणी तानमान ।
चित्तीं भक्तिभाव धरुन । करिती ते मज कीर्तन परमानंदें ॥३९॥

भक्त मज फार आवडती । जे माझें कथामृत पान करिती ।
त्यांचे घरीं मी श्रीपती । वसतों प्रीतीनें अखंडित ॥४०॥

आमुचें चरित्र जो पठण करी । त्यास लाभती पुरुषार्थ चारी ।
सिद्धि सर्वही त्याच्या द्वारीं । दासीपरी तिष्‍ठतील ॥४१॥

त्यासी नाहीं यमाचें भय । त्यास लाभ लाभे निश्चय ।
पुत्रपौत्रांसहित अष्‍टैश्चर्य । अनुभवोनि निर्भय पावे मुक्ति ॥४२॥

हें वचन मानी अप्रमाण । तो भोगील नरक दारुण ।
तो गुरुद्रोही जाण जन्ममरण । दुःख अनुभवणें न सुटे त्यासी ॥४३॥

या कारणें असूं द्या विश्वास । सुख पावाल बहुवस ।
ऐसें सांगोनि शिष्यांस । श्रीगुरु तेथूनि अदृश्य झाले ॥४४॥

शिष्य अवलोकिती गंगेंत । तों दृष्‍टीं न दिसती श्रीगुरुनाथ ।
बहुत होवोनि चिंताक्रांत । तेथें उभे तटस्थ झाले ॥४५॥

इतुकियात आला नावाडी तेथ । तो शिष्या सांगे वृत्तान्त ।
गंगेचे पूर्वतीरीं श्रीगुरुनाथ । जात असतां म्यां देखिले ॥४६॥

आहे वेष संन्यासी दंडधारी । काषयांबर वेष्‍टिलें शिरीं ।
सुवर्णपादुका चरणामाझारीं । कांति अंगावरी फाकतसे ॥४७॥

तुम्हांस सांगा म्हणोनि । गोष्‍टी सांगितली आहे त्यांनीं ।
त्यांचे नांवें श्रीनृसिंहमुनि । ते गोष्‍टी कानीं आइका ॥४८॥

कळिकाळास्तव तप्त होउनी । आपण असतों गाणगाभुवनीं ।
तुम्हीं तत्पर असावें भजनीं । ऐसें सांगा म्हणोनि कथिलें ॥४९॥

प्रत्यक्ष पाहिले मार्गांत । तुम्ही कां झाले चिंताक्रांत ।
पुष्पें येतील जळांत । घेऊनि निवांत रमावें ॥५०॥

नावाडी यानें ऐसें कथिलें । त्यावरुनि शिष्य हर्षले ।
इतुकियांत गुरुप्रसाद फुलें । आलीं प्रवाहांत वाहत ॥५१॥

तीं परमप्रसादसुमनें । काढोनि घेतलीं शिष्यवर्गानें ।
मग परतले आनंदानें । गुरुध्यान मनीं करित ॥५२॥

सिद्धासी म्हणे नामधारक । पुष्पें किती आलीं प्रासादिक ।
शिष्य किती होते प्रमुख । तें मज साद्यंत सांगावें ॥५३॥

सिद्ध म्हणे नामधारका । तुवां भली घेतली आशंका ।
धन्य बा तुझ्या विवेका । होसी साधक समर्थ ॥५४॥

खूण सांगतों ऐक आतां । श्रीगुरु गाणगापुरीं असता ।
बहुत शिष्य होते गणितां । नाठवती ते ये समयीं ॥५५॥

ज्यांणीं केला आश्रमस्वीकार । ते संन्यासी थोर थोर ।
तीर्थें हिंडावया गेले फार । कृष्णबाळसरस्वती प्रमुख ते ॥५६॥

जे शिष्य झाले गृहस्थ केवळ । ते आपुल्या गृहीं नांदती सकळ ।
तारक होते श्रीगुरुनाथ प्रबळ । भक्त अपरिमित तारिले ॥५७॥

श्रीजगद्गुरुच्या समागमीं । चारीजण होतों आम्ही ।
सायंदेव नंदी नरहरी मी । श्रीगुरुची सेवा करीत होतों ॥५८॥

चौघांनीं घेतलीं पुष्पें चारी । गुरुप्रसाद वंदिला शिरीं ।
हीं पहा म्हणोनि पुष्पें करीं । घेऊनि झडकरी दिधलीं ॥५९॥

चौघांनीं चारी पुष्पांसी । मस्तकीं धरिलीं भावेंसी ।
आनंद झाला नामधारकासी । गुरुप्रसाद त्याचे दृष्‍टीं पडला ॥६०॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारकासी सांगत ।
श्रीगुरुप्रसाद झाला प्राप्त । द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥६१॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रसादप्राप्तिर्नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥

॥ ओवीसंख्या ॥६१॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥




गुरूचरित्र – अध्याय त्रेपन्नावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविंदाभ्यां नमः ।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।

श्रोते व्हावें सावधान । गुरुचरित्राध्याय बावन्न ।
ऐकोनि नामधारकाचे मन । ब्रह्मानंदीं निमग्न पैं ॥१॥

सेवूनि गुरुचरित्रामृत । नामधारक तटस्थ होत ।
अंगीं घर्मपुलकांकित । रोमांचही ऊठती ॥२॥

कंठ झाला सद्गदित । गात्रें झालीं सकंपित ।
विवर्ण भासे लोकांत । नेत्रीं वहाती प्रेमधारा ॥३॥

समाधिसुखें न बोले । देह अणुमात्र न हाले ।
सात्त्विक अष्‍टभाव उदेले । नामधारक शिष्याचे ॥४॥

देखोनि सिद्ध सुखावती । समाधि लागली यासी म्हणती ।
सावध करावा मागुती लोकोपकाराकारणें ॥५॥

म्हणोनि हस्तें कुरवाळिती । प्रेमभावें आलिंगिती ।
देहावरी ये ये म्हणती । ऐक बाळा शिष्योत्तमा ॥६॥

तूं तरलासी भवसागरीं । रहासी ऐसा समाधिस्थ जरी ।
ज्ञान राहील तुझ्या उदरीं । लोक तरती कैसे मग ॥७॥

याकारणें अंतःकरणीं । दृढता असावी श्रीगुरुचरणीं ।
बाह्य देहाची रहाटणी । शास्त्राधारें करावी ॥८॥

तुवां विचारिलें म्हणोनि । आम्हां आठवली अमृताची वाणी ।
तापत्रयातें करी हानि । ऐशी अनुपम्या प्रगटली ॥९॥

तुजमुळें आम्हां आठवलें । तुवां आम्हां बरवें केलें ।
त्वांही एकाग्रत्वें ऐकिलें । आतां हेंच विस्तारीं ॥१०॥

नामधारका ऐशिया परी । सिद्ध सांगती परोपरी ।
मग तो नेत्रोन्मीलन करी । कर जोडोन उभा ठाके ॥११॥

म्हणे कृपेचें तारुं । तूंचि या विश्वास आधारु ।
भवसागर पैल पारु । तूंचि करिसी श्रीगुरुराया ॥१२॥

ऐसें नामधारक विनवीत । सिद्धाचे चरणीं लागत ।
म्हणे श्रीगुरुचरित्रामृत । अवतरणिका मज सांगा ॥१३॥

या श्रीगुरुचरितामृतीं । अमृताहूनि परमामृतीं ।
भक्तजनाची मनोवृत्ति । बुडी देवोनि स्थिरावली ॥१४॥

अतृप्त आहे अजूनि । हेचि कथा पुनः सुचवोनि ।
अक्षयामृत पाजूनि । आनंदसागरीं मज ठेवा ॥१५॥

बहु औषधींचें सार काढोन । त्रैलोक्यचिंतामणी रसायण ।
संग्रह करिती विचक्षण । तैसें सार मज सांगा ॥१६॥

ऐकोनि शिष्याची प्रार्थना । आनंद सिद्धाचिया मना ।
म्हणती बाळका तुझी वासना । अखंड राहो श्रीगुरुचरित्रीं ॥१७॥

श्रीगुरुचरित्राची ऐका । सांगेन आतां अवतरणिका ।
प्रथमपासूनि सारांश निका । बावन्नाध्यापर्यंत ॥१८॥

प्रथमाध्यायीं मंगळाचरण । मुख्य देवतांचें असे स्मरण ।
श्रीगुरुमूर्तींचें दर्शन । भक्तांप्रती जाहलें ॥१९॥

द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती ।
श्रीगुरुसेवा दीपकाप्रती । घडली ऐसें कथियेलें ॥२०॥

नामधारका अमरजासंगमा । श्रीगुरु नेती आपुले धामा ।
अंबरीष दुर्वास यांचा महिमा । तृतीयाध्यायीं कथियेला ॥२१॥

चतुर्थाध्यायीं अनसूयेप्रती । छळावया त्रैमूर्ति येती ।
परी तियेचे पुत्र होती । स्तनपान करिती आनंदें ॥२२॥

पंचमीं श्रीदत्तात्रेय धरी । स्वयें अवतार पीठापुरीं ।
श्रीपादश्रियावल्लभधारीं । तीर्थयात्रेसी निघाले ॥२३॥

सहाव्यांत लिंग घेउनी । रावण जात गोकर्णीं ।
विघ्नेश्वरें विघ्न करुनी । स्थापना केली तयाची ॥२४॥

गोकर्णमहिमा असंख्यात । रायाप्रती गौतम सांगत ।
चांडाळी उद्धरली अकस्मात । सातव्या अध्यायीं वर्णिती ॥२५॥

माता पुत्र जीव देत होतीं । तयाप्रती गुरु कथा सांगती ।
शनिप्रदोष व्रत देती । ज्ञानी करिती अष्‍टमीं ॥२६॥

नवमाध्यायीं रजकाप्रती । कृपाळू गुरु राज्य देती ।
दर्शन देऊं म्हणती पुढती । गुप्त झाले मग तेथें ॥२७॥

तस्करीं मारिला भक्त ब्राह्मण । तस्करां वधिती श्रीगुरु येऊन ।
ब्राह्मणाला प्राणदान । देती दशमाध्यायांत ॥२८॥

माधव ब्राह्मण करंजपुरीं । अंबा नामें त्याची नारी ।
नरसिंहसरस्वती तिचे उदरीं । एकादशीं अवतरले ॥२९॥

द्वादशाध्यायीं मातेप्रती । ज्ञान कथुनी पुत्र देती ।
काशी क्षेत्रीं संन्यास घेती । यात्रा करिती उत्तरेची ॥३०॥

मातापित्यांतें करंजपुरीं । भेटोनि येती गोदातीरी ।
कुक्षिव्यथेच्या विप्रावरी । कृपा करिती त्रयोदशीं ॥३१॥

क्रूर यवनाचें करुनि शासन । सायंदेवास वरदान ।
देती श्रीगुरु कृपा करुन । चौदाविया अध्यायीं ॥३२॥

पंचदशीं श्रीगुरुमूर्ति । तीर्थें सांगती शिष्यांप्रती ।
यात्रे दवडूनि गुप्त होती । वैजनाथीं श्रीगुरु ॥३३॥

षोडशीं ब्राह्मण गुरुभक्ति । कथूनि दिधली ज्ञानशक्ति ।
श्रीगुरु आले भिल्लवडीप्रती । भुवनेश्वरीसन्निध ॥३४॥

भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण । जिव्हा छेदोनि करी अर्पण ।
त्यास श्रीगुरुंनी विद्या देऊन । धन्य केला सप्तदशीं ॥३५॥

घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा ।
वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्‍टादशाध्यायांत ॥३६॥

औदुंबराचें करुनि वर्णन । योगिनींस देऊनि वरदान ।
गाणगापुरास आपण । एकोनविंशीं श्रीगुरु गेले ॥३७॥

स्त्रियेचा समंध दवडून । पुत्र दिधले तिजला दोन ।
एक मरतां कथिती ज्ञान । सिद्धरुपें विसाव्यांत ॥३८॥

तेचि कथा एकविंशीं । प्रेत आणिलें औदुंबरापाशीं ।
श्रीगुरु येऊनि तेथे निशीं । पुत्र उठविती कृपाळू ॥३९॥

भिक्षा दरिद्रयाघरीं घेती । त्याची वंध्या महिषी होती ।
तीस करुन दुग्धवंती । बाविसाव्यांत वर दिधला ॥४०॥

तेविसाव्यांत श्रीगुरुस । राजा नेई गाणगापुरास ।
तेथें उद्धरती राक्षस । त्रिविक्रम करी श्रीगुरुनिंदा ॥४१॥

भेटों जाती त्रिविक्रमा । दाविती विश्वरुपमहिमा ।
विप्र लागे गुरुपादपद्मा । चोविसाव्यांत वर देती ॥४२॥

म्लेंच्छांपुढें वेद म्हणती । विप्र ते त्रिविक्रमा छळती ।
त्याला घेऊनि सांगातीं । गुरुपाशीं आला पंचविंशीं ॥४३॥

सव्विसाव्यांत तया ब्राह्मणां । श्रीगुरु सांगती वेदरचना ।
त्यागा म्हणती वादकल्पना । परी ते उन्मत्त नायकती ॥४४॥

सत्ताविशीं आणोनि पतिता । विप्रांसी वेदवाद करितां ।
कुंठित करोनि शापग्रस्ता । ब्रह्मराक्षस त्यां केलें ॥४५॥

अष्‍टाविंशीं तया पतिता । धर्माधर्म सांगोनि कथा ।
पुनरपि देऊनि पतितावस्था । गृहाप्रती दवडिला ॥४६॥

एकोनत्रिंशीं भस्मप्रभाव । त्रिविक्रमा कथितां गुरुराव ।
राक्षसा उद्धरी वामदेव । हा इतिहास तयांतची ॥४७॥

त्रिंशाध्यायीं पति मरतां । तयाची स्त्री करी बहु आकांता ।
तीस श्रीगुरु नाना कथा । कथून शांतवूं पाहती ॥४८॥

एकतिसाव्यांत तेचि कथा । पतिव्रतेचे धर्म सांगतां ।
सहगमनप्रकार बोधितां । ते स्त्रियेतें जगद्गुरु ॥४९॥

सहगमनीं निघतां सती । श्रीगुरुस झाली नमस्कारिती ।
आशीर्वाद देवोनि तिचा पति । बत्तिसाव्यांत उठविला ॥५०॥

तेतिसाव्यांत रुद्राक्षधारण । कथा कुक्कुटमर्कट दोघेजण ।
वैश्य- वेश्येचें कथन । करिती रायातें परस्पर ॥५१॥

रुद्राध्यायमहिमा वर्णन । चौतिसाव्यांत निरुपण ।
राजपुत्र केला संजीवन । नारद भेटले रायातें ॥५२॥

पंचत्रिंशत्प्रसंगांत । कचदेवयानी कथा वर्तत ।
आणिक सोमवारव्रत । सीमंतिनीच्या प्रसंगें ॥५३॥

छत्तिशीं ब्रह्मनिष्‍ठ ब्राह्मणा । स्त्रियेनें नेलें परान्नभोजना ।
कंटाळुनी धरिती श्रीगुरुचरणा । त्याला कर्ममार्ग सांगती ॥५४॥

सप्तत्रिंशीं नाना धर्म । विप्रा सांगोनि ब्रह्मकर्म ।
प्रसन्न होवोनि वर उत्तम । देती श्रीगुरु तयांतें ॥५५॥

अष्‍टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण । तिघांपुरतें आणिलें अन्न ।
जेविले बहुत ब्राह्मण । आणिक गांवचे शूद्रादि ॥५६॥

सोमनाथाची गंगा युवती । साठ वर्षांची वंध्या होती ।
तीस दिधली पुत्रसंतती । एकुणचाळिसावे अध्यायीं ॥५७॥

नरहरीकरवीं शुष्क काष्‍ठा । अर्चवूनि दवडिलें त्याच्या कुष्‍ठा ।
शबरकथा शिष्यवरिष्‍ठां । चाळिसाव्यांत सांगती ॥५८॥

एकेचाळिसीं सायंदेवा । हस्तें घेती श्रीगुरुसेवा ।
ईश्वरपार्वतीसंवाद बरवा । काशीयात्रानिरुपण ॥५९॥

पुत्रकलत्रेंसी सायंदेव । येऊनि करिती श्रीगुरुस्तव ।
त्याला कथिती यात्राभाव । वरही देती बेचाळिसी ॥६०॥

त्रेचाळिसीं अनंतव्रत । धर्मराया कृष्ण सांगत ।
तेचि कथा सायंदेवाप्रत । सांगोनि व्रत करविती ॥६१॥

चवेचाळिसीं तंतुकार भक्तासी । श्रीपर्वत दावूनि क्षणेसी ।
शिवरात्रीपुण्यकथा त्यासी । विमर्षण राजाची कथियेली ॥६२॥

पंचेचाळिसीं कुष्‍ठी ब्राह्मण । आला तुळजापुराहून ।
त्याला करवूनि संगमीं स्नान । कुष्‍ठ नासूनि ज्ञान देती ॥६३॥

कल्लेश्वर हिपरगे ग्रामास । श्रीगुरु भेटती नरहरी कवीस ।
आपुला शिष्य करिती त्यास । शेचाळिसीं अध्यायीं ॥६४॥

सत्तेचाळिसीं दिवाळी सण । गुरुसी आमंत्रिती सातजण ।
तितुकीं रुपें धरुनि आपण । गेले मठींही राहिले ॥६५॥

अठ्‌ठेचाळिसीं शूद्रशेतीं । त्याचा जोंधळा कापूनि टाकिती ।
शतगुणें पिकवूनि पुढती । आनंदविलें तयातें ॥६६॥

एकोनपंचाशतीं श्रीगुरुमूर्ति । अमरजासंगममाहात्म्य कथिती ।
आणिकही तेथें सांगती । कुष्‍ठ दैवार्जितीं रत्‍नाबाईचें ॥६७॥

म्लेंच्छाचा स्फोटक दवडिती । भक्तीस्तव त्याचे नगरा जाती ।
पुढें श्रीपार्वतीं भेटों म्हणती । पन्नासावे अध्यायीं ॥६८॥

एकावन्नबावन्नांत गुरुमूर्ति । देखूनिया क्षितीं पापप्रवृत्ति ।
उपद्रवितील नाना याती । म्हणोनि गुप्तरुपें रहावें ॥६९॥

ऐसा करुनि निर्धार । शिष्यांसी सांगती गुरुवर ।
आजि आम्ही जाऊं पर्वतावर । मल्लिकार्जुनयात्रेसी ॥७०॥

ऐसें ऐकूनि भक्तजन । मनीं होती अतिउद्विग्न ।
शोक करिती आक्रंदोन । श्रीगुरुचरणीं लोळती ॥७१॥

इतुकें पाहुनी गुरुमूर्ति । वरद हस्तें तयां कुरवाळिती ।
मद्भजनीं धरा आसक्ति । मठधामीं राहोनिया ॥७२॥

ऐसें बोधूनि शिष्यांसी । गुरु गेले कर्दळीवनासी ।
नाविकमुखें सांगूनि गोष्‍टीसी । निजानंदीं निमग्न होती ॥७३॥

ऐसें अपार श्रीगुरुचरित्र । अनंत कथा परम पवित्र ।
त्यांतील बावन्न अध्यायमात्र । प्रस्तुत कथिलें तुजलागीं ॥७४॥

सिद्ध म्हणे नामधारका । तुज कथिली अवतरणिका ।
श्रीगुरु गेले वाटती लोकां । गुरु गुप्त असती गाणगापुरीं ॥७५॥

कलियुगीं अधर्म वृद्धि पावले । म्हणोनि श्रीगुरु गुप्त झाले ।
भक्तजनाला जैसे पहिले । तैसेच भेटती अद्यापि ॥७६॥

हे अवतरणिका सिद्धमाला । श्रीगुरु भेटती जपे त्याला ।
जैसा भावार्थ असे आपुला । तैशीं कार्यें संपादिती ॥७७॥

नामधारका शिष्य भला । अवतरणिकेचा प्रश्न केला ।
म्हणोनि इतिहाससारांशाला । पुनः वदलों सत्‌शिष्या ॥७८॥

पूर्वीं ऐकिलें असेल कानीं । त्यातें तात्काळ येईल ध्यानीं ।
इतरां इच्छा होईल मनीं । श्रीगुरुचरित्रश्रवणाची ॥७९॥

ऐसी ही अवतरणिका जाण । तुज कथिली कथांची खूण ।
इचें सतत करितां स्मरण । कथा अनुक्रमें स्मरतसे ॥८०॥

ऐसें वदे सिद्धमुनि । नामधारक लागे चरणीं ।
विनवीतसे कर जोडोनि । तुझे वचनें सर्व सिद्धि ॥८१॥

आतां असे विनवणी । श्रीगुरुसप्ताहपारायणीं ।
किती वाचावें प्रतिदिनीं । हें मज सांगा श्रीगुरुराया ॥८२॥

सिद्ध म्हणती नामधारका । तुवां प्रश्न केला निका ।
परोपकार होईल लोकां । तुझ्या प्रश्नेंकरुनिया ॥८३॥

अंतःकरण असतां पवित्र । सदाकाळ वाचावें गुरुचरित्र ।
सौख्य होय इहपरत्र । दुसरा प्रकार सांगेन ॥८४॥

सप्ताह वाचावयाची पद्धति । तुज सांगों यथास्थिति ।
शुचिर्भूत होवोनि शास्त्ररीतीं । सप्ताह करितां बहु पुण्य ॥८५॥

दिनशुद्धि बरवी पाहून । आवश्यक स्नानसंध्या करुन ।
पुस्तक वाचावयाचें स्थान । रंगवल्लयादि शोभा करावी ॥८६॥

देशकालादि संकल्प करुन । पुस्तकरुपीं श्रीगुरुचें पूजन ।
यथोपचारें करुन । ब्राह्मणांसही पूजावे ॥८७॥

प्रथम दिवसापासोन । बसावया असावें एक स्थान ।
अतत्त्वार्थभाषणीं धरावें मौन । कामादि नियम राखावे ॥८८॥

दीप असावे शोभायमान । देवब्राह्मणवडिलां वंदून ।
पूर्वोत्तरमुख करुन । वाचनीं आरंभ करावा ॥८९॥

नवसंख्या अध्याय प्रथम दिनीं । एकविंशतीपर्यंत द्वितीय दिनीं ।
एकोनत्रिंश तृतीय दिनीं । चतुर्थदिवशीं पसतीस ॥९०॥

अडतीसपर्यंत पांचवे दिनीं । त्रेचाळिसवरी सहावे दिनीं ।
सप्तमीं बावन्न वाचोनि । अवतरणिका वाचावी ॥९१॥

नित्य पाठ होता पूर्ण । करावें उत्तरांगपूजन श्रीगुरुतें नमस्कारुन ।
उपहार कांहीं करावा ॥९२॥

या प्रकारें करावें सप्तदिन । रात्रीं करावें भूमिशयन ।
सारांश शास्त्राधारें करुन । शुचिर्भूत असावें ॥९३॥

एवं होतां सप्तदिन । ब्राह्मणसुवासिनीभोजन ।
यथाशक्ति दक्षिणा देऊन । सर्व संतुष्‍ट करावे ॥९४॥

ऐसें सप्ताह अनुष्‍ठान । करितां होय श्रीगुरुदर्शन ।
भूतप्रेतादि बाधा निरसन । होवोनि सौख्य होतसे ॥९५॥

ऐसें सिद्धांचें वचन ऐकोनि । नामधारक लागे चरणीं ।
म्हणे बाळाची आळी पुरवोनि । कृतकृत्य केलें गुरुराया ॥९६॥

श्रोते म्हणती वंदूनि पायीं । श्रीगुरु केली बहु नवलाई ।
बाळका अमृत पाजी आई । तैसें आम्हां पाजिलें ॥९७॥

प्रति अध्याय एक ओंवी । ओंविली रत्‍नमाळा बरवी ।
मनाचे कंठीं घालितां पदवी । सर्वार्थाची पावती ॥९८॥

सिद्धांचें वचन रत्‍नखाणी । त्यांतूनि नामधारक रत्‍नें आणी ।
बावन्न भरोनि रांजणीं । भक्तयाचका तोषविलें ॥९९॥

किंवा सिद्ध हा कल्पतरु । नामधारकें पसरिला करु ।
यांचा करोनि परोपकारु । भक्तांकरितां बहु केला ॥१००॥

किंवा सिद्धमुनि बलाहक । नामधारक शिष्य चातक ।
मुख पसरोनि बिंदु एक । मागतां अपार वर्षला ॥१॥

तेणें भक्तां अभक्तां फुकाचा । सकळां लाभ झाला अमृताचा ।
ह्रदयकोशीं खळजनांचा । पाषाण समयीं पाझरे ॥२॥

श्रीगुरुरायाचे धरुं चरण । सिद्धमुनीतें करुं वंदन ।
नामधारका करुं नमन । ऐसें करीं नारायण ॥३॥

श्रीगुरुरुपी नारायण । विश्वंभरा दीनोद्धारणा ।
आपणा आपुली दावूनि खुणा । गुरुशिष्यरुपें क्रीडसी ॥१०४॥

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशदध्यायसारे अवतरणिका नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु । शुभं भवतु । ओवीसंख्या ॥१०४॥

श्रीगुरुचरित्रं समाप्तं । एकंदर ओवीसंख्या ॥७३८५॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Comments

Popular posts from this blog